माझ्या संग्रहातील पुस्तके -४ - घर -दार
व्यंकटेश माडगूळकरांच्या अगदी सुरुवातीच्या काही पुस्तकांपैकी या एका पुस्तकाची एक दुर्मिळ प्रत माझ्याजवळ आहे. ११८ पानांच्या या छोटेखानी पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५९ साली वोरा ऍन्ड कंपनीने प्रकाशित केली होती. माडगूळकरांनी हे पुस्तक जयंतराव टिळकांना अर्पण केले आहे. किंमत फकिस्त दोन रुपये!
माडगूळकरांचे हे पुस्तक त्यांच्या इतर बर्याच पुस्तकांप्रमाणे 'गावाकडच्या गोष्टी' सांगणारे आहे. गावाकडच्या जागा, माणसे, प्रसंग यांवर आधारित हे लहान लहान लेख आहेत. शांतारामांनी या पुस्तकाला लिहिलेल्या 'आशय' नावाच्या प्रस्तावनेत माडगूळकरांच्या लिखाणाचा सुरेख आढावा घेतला आहे. खरे तर ती प्रस्तावनाच इथे टंकून काढली तरी काम भागेल. ते म्हणतात,' नवर्याच्या साधेपणावर कावणारी पण त्याच्या प्रतिष्ठेसाठी रौद्ररुप धारण करणारी आई (पाणी), मरणाच्या वाटेवरही आपला विनोद खचू न देणारे सन्मार्गी दादा (दादा), वर्डस्वर्थच्या मायकेलप्रमाणे म्हातारपणात झालेल्या मुलावर जीव लावणारे व तो गेल्यावर नियतीपुढे हतबल झालेले बिटाकाका (बिटाकाका); ही सगळी माणसे साधी खरी, पण त्यांची कहाणी वाचताना आंतड्याला पीळ पडतो.' हे असे असले तरी माडगूळकरांची भूमिका ही संवेदनशील पण तटस्थ बघ्याची आहे हे शांतारामांनी अचूक टिपले आहे. खेड्याचे, खेड्यातल्या माणसांचे, जनावरांचे, पशुपक्षांचे आणि त्यांच्या दु:खांचे रेखाटन करताना माडगूळकरांच्या लिखाणात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. चिमण्यांच्या उद्ध्वस्त जीवनाचे वर्णन करुन ते म्हणतात, 'आपल्याला हळहळ वाटते, पण पाखरांच्या दुनियेत ना खंत ना खेद! अपघाताने ती खचत नाहीत, जिद्दीनं जगतात. सकाळी उठल्या उठल्या कुणी श्रोता नसताना एकटीच गात बसतात. वाट्याला आलेले जीवन ती जसेच्या तसे पत्करतात आणि आकाशात गिरक्या घेत गातात.'
माडगूळकरांच्या या लेखनवैशिष्ट्यांबरोबरच या पुस्तकात दिसून येणारी त्यांची मर्यादाही शांतारामांनी स्पष्ट केली आहे. या संग्रहातील सगळ्या आठवणी एकाच साचातल्या काहीशा एकसुरी वाटतात असे ते म्हणतात, आणि तसे ते आहेही. कदाचित संग्रहात एकसूत्रीपणा आणण्याच्या दृष्टीने हे केले असावे, हे त्यांचे मतही पटते.
जुन्या काळातले, खेड्यातले अस्सल देशस्थी ब्राह्मणाच्या घरातले जुने वातावरण. आता कायमचे काळाच्या पोटात गडप झालेले माणसांचे देशी साचे. त्यांचे गावरान बोल, त्यांचे विचार, त्यांचे प्रश्न आणि त्यांवर त्यांनी शोधलेली तसलीच गावठी उत्तरे. आज हे सगळे कदाचित विसंगत वाटेल. मराठी माणसावर कायम होत आलेला 'रम्य भूतकाळ' या दोषारोपाला अधोरेखित करणारेही वाटेल. एखाद्या टीकाकाराला हे सगळे उबवलेले, जाणीवपूर्वक ओकार्या काढल्यासारखे 'पॉवर्टी पोर्न' ही वाटेल. पण हे सगळे बाजूला ठेवून हे पुस्तक वाचले तर माडगूळकरांच्या लिखाणातला देशी मातीचा वास जाणवल्याशिवाय रहाणार नाही. जीवनाच्या बहुपदरी पेडाप्रमाणे हा वासही निरनिराळ्या वासांतून बनला आहे. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, साधेपणाचे, भपकेबाजीचे, भक्ती-श्रद्धेचे, स्वार्थाचे, दु:खाचे, असहायतेचे असे अनेक वास मिळून हा मातकट वास तयार झाला आहे. गावठी, उग्र, टोकदार कडेकोपरे असलेला, पण अगदी खरा आणि जिवंत वास.
गावाकडच्या देशस्थी ब्राह्मणाच्या स्वभावातला आळशीपणा, ऐदीपणा, बसून खाण्याची वृत्ती आणि काम म्हटले की चालढकल करण्याची वृत्ती यावर माडगूळकर गमतीने लिहितात. कर्तबगार आजोबांनी वाडा बांधला आणि आता शेवटी दरवाजा बसवायचा तेवढ्यात ते वारले. मुळातच मवाळ आणि कचखाऊ स्वभावाच्या वडिलांच्या हातून तो तयार असलेला दरबवाजा सुताराकरवी घराला बसवून घेणेही काही झाले नाही. आज करु, उद्या करु असे म्हणताम्हणता ते काम कायमचे राहून गेले, हे वाचताना तशी काही माणसे डोळ्यासमोर उभी रहातात. मोठ्या झाडांच्या सावलीत खुरटलेली लहान रोपटीच ही. स्वभावाने गरीब, सज्जन, पण कसलीच उमेद, महत्वाकांक्षा नसलेली. आयुष्यभर आपण बरे, आपली चाकरी बरी अशी कुचमत राहिलेली ही बिनकण्याची माणसे. अशी असंख्य ओळखीची माणसे माडगूळकरांच्या लिखाणात जागोजागी दिसतात.
गावाकडच्या लोकांचे बोल जसेच्या तसे टिपणे हा तर थोरल्या आणि धाकट्या माडगूळकरांचा हातखंडाच होता. एखाद्याला वाटावे, की हे लोक बोलत असताना लेखकाने आतल्या खोलीत बसून हे संवाद घाईघाईने उतरवून घेतले असतील की काय! 'कुणी खाल्लं लोणी?' या आईच्या प्रश्नाला मुलगा 'मी नाही गं' असं उत्तर देतो, त्यावर संतापून आई 'रांडरा, खोटं बोलतोस?' असं म्हणते. स्वतःच्या पोराला 'रांडरा' वगैरे म्हणायला आईला काही वाटत नाही. (आणि त्यातली विसंगती तर तिच्या लक्षातही येत नाही). हीच आई चाकरीच्या गावाहून वेडावाकडा, गैरसोयीचा प्रवास करुन घरी परतल्यावर दमलेल्या, वैतागलेल्या अवस्थेत मुलाच्या 'आई, शेतात आता काय असेल गं?' या प्रश्नावर कावून म्हणते,' असतील ढेकळं. फाल्गुनात काय असणार रे?' खेड्यातल्या बायकांचे असले हे मराठी महिने, सण, ऋतू यांच्या संदर्भाने बोलणे हे ज्याने खेड्यात चार वर्षे काढली आहेत, त्यालाच कळेल. गावाकडची भाषा रांगडी असली तरी मोकळी असते; म्हणजे पूर्वी तरी ती तशी असे. पडीक रानात उगवून आलेली पात्रीची भाजी गोळा करुन आणणार्या लेखकाला बिटाकाका म्हणतो, ' लेका, रामोशांच्या पोरांत हिंडून बरा गुण घेतलास. म्हारापोरांची ही भाजी तूच खुडून आणतोस?' यातला जातीच उल्लेख आजही खटकत नाही. न्हाव्याचा शंकर, पाटलाचा तुळशीराम, देलमाराचा भान्या आणि मोमिनाचा अकबर्या हे माझे दोस्त होते, हे वाचताना जातीपातीचा चर्यांनी अद्याप न भेगाळलेले एकसंध खेडे डोळ्यांसमोर उभे रहाते.
घरातली वडील माणसे, भाऊ, काका, आजोबा, शाळेतले मास्तर, शेतावरचे वाटेकरी यांची चित्रे माडगूळकरांनी आपल्या सोप्यात आणून बसवली आहेत. कचखाऊ स्वभावाचा नवरा, त्याची फिरतीची नोकरी, पोराबाळांचे लेंढार, दुखणीबाणी, कर्मठ वातावरण, कुळाचार, उपासतापास आणि या सगळ्याला पाठ देऊन असलेले अठराविश्वे दारिद्र्य - या सगळ्याशी टक्कर देत ताठ उभी असलेली आई. तिच्याबद्दल तर माडगूळकर बंधुद्वयांनी उदंड लिहिले आहे. पण ही आई आहे चारचौघींसारखीच. स्वयंपाक जवळजवळ होत आलेला असताना घरात इकडेतिकडे फिरत काहीतरी अरबटचरबट खाणार्या नवर्यावर खेकसणारी. 'जळ्ळं मेलं ते अभद्र खाणं! झाला स्वयंपाकाला थोडा उशीर, लागली असेल भूक, पण हे काय?' हे तिचे बोल एक चिरंतन वैश्विक सत्यच सांगून जातात.
प्रश्नाला प्रश्नानेच उत्तर देणे, जरा कुठे पन्नाशी उलटली नाही तोवर निरवानिरवीची भाषा सुरु करणे असे बारकावे माडगूळकरांनी छान जमवले आहेत. या जोडीला माडगूळकरांच्या लिखाणात जागोजागी जुन्या कविता, गाणी, संतांचे अभंग, आर्या यांचे संदर्भ येतात. अण्णा माडगूळकरांच्या कविता, गाणी वाचताना हे जाणवतेच, पण धाकले तात्या माडगूळकर गद्य लिखाणातही त्याचा फार सुंदर वापर करतात. त्यामुळे त्यांच्या मूळच्याच कसदार लिखाणाला एक खानदानी पोत येतो. वैशाखात उन्हाला टाकलेल्या एखाद्या गोधडीसरखे त्यांचे लिखाण फुलून येते.
खेड्यातल्या भकास, रुक्ष जीवनात विरंगुळा, करमणूक असले काही काही नसते. मग हे परिस्थितीचे फटके खात जगणारे लोक कसले सण, कसले उत्सव, कसल्या पूजा यातच मन रमवतात. रुईच्या पानांनी केलेली मारुतीची पूजा, खंडोबाजी पालखी, रामनवमी, गोपाळकाला, हरिविजय, पांडवप्रताप अशा पोथ्यांचे वाचन अशातच मनोरंजन शोधतात. नुसते मनोरंजन नव्हे तर मनाला आधारही शोधतात.'भलं हुईल म्हंतासा दादा? कुटलं आलंय हुयाला? का हुईल वं? हुईल, हुईल....' अशा आशा बाळगून दिवसाच्या गाठी मारत बसतात. आयुष्यभर गरिबीत खस्ता काढून गरिबीतच मरुन जातात. अशातच मुकटा नेसून व्यंकटेशस्तोत्र म्हणत पूजा करणारे आणि शेवटी नैवेद्याची बारकी वाटीभर दूध पिण्यासाठी 'यंकाप्पा' अशी हाक मारणारे प्रेमळ दादा आहेत, आयुष्यभर भणंगपणाने फिरुन शेवटी पाठ टेकायला गावात आलेले आणि शेवटी चिंध्यापांध्यात जपलेले तोळाभर सोन्याचे वळे अण्णांच्या हातावर ठेवणारे तात्या आहेत, आपल्या पुतण्याला भेटण्यासाठी, त्याला एकवार बघण्यासाठी साठ- पासष्ठ मैल चालून येणारे बिटाकाका आहेत. 'दादा', 'तात्या' आणि 'बिटाकाका' ही माडगूळकरांची व्यक्तिचित्रे तर पुस्तकांच्या पानांतून उठून आपल्याला भेटायला येतात. आपल्याशी चार सुखदु:खाचे शब्द बोलतात, काय आपण चहा-पाणी देऊ ते घेतात आणि जरा वेळानं 'बरं आहे बाळांनो, येतो आता, सुखी र्हावा..' असं म्हणत आपल्या दुखर्या गुढग्यांना नेट देत उठतात आणि चालू लागतात. त्यांच्या फाटक्या पायताणांचा, हातातल्या काठीचा आणि 'पांडुरंगा..पांडुरंगा' अशा अस्पष्ट कापर्या बोलांचा आवाज बराच वेळ येत रहातो.
मनाला भूल घालणारे असे हे माडगूळकरांचे 'घर-दार' माझ्या संग्रहात आहे.
Comments
वा!
वा! सुरेख. अजून काही लिहिले तर शब्दबंबाळ व्हायची भीती वाटावी इतकी ही पुस्तकाची ओळख सुरेख उतरली आहे. हे पुस्तक अजूनही उपलब्ध असावे का? (चिवट आशेचा एक तंतू)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अत्यंत सुरेख
नंदनशी १०० टक्के सहमत आहे.
ह्या पुस्तकाचे इतके सुरेख परीक्षण जमले आहे की १. अशा लेखनाबद्दल आणि २. पुस्तक तुमच्याकडे असल्याबद्दल तुमचा हेवा वाटतो.
पुस्तक उपलब्ध असेल की नाही याची शंकाच वाटते. माणदेशी माणसे सारखे बेस्टसेलरही मागे आऊट ऑफ प्रिंट झाले होते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वाचताना त्रास
याच वातावरणात लहानाचा मोठा झाल्याने वाचताना त्रासही झाला बरंही वाटलं. श्रावणात मारुतीच्या देवळात पोथी वाचणारे तपस्वी गुरुजी, हरिपाठाला पोरांना पकडुन नेणारा बटा, भसाड्या आवाजात पण तल्लीन होउन भजन म्हणणारे बाळ मिस्री, पखवाज वाजवणारा बाबु गुरव, हार्मोनियमवर बसणारे आमचे शेजारी झुंबरशेट, श्राद्ध, पक्ष, चंपाषष्ठी ला येणार्याला आईला सैपाकाला मदत करणार्या सुमनताई, कार्तिकात पहाटे काकड्याला येणार्या शिंपी आळी सुतार आळीतल्या बायका, नागपंचमीला उंच झोका घेणार्या लोहाराच्या बायका, हगाम्याला "है का शिंगजोड?" अस म्हणुन पहिलवानाला प्रतिस्पर्धी शोधण्यासाठी पुकारा करणारा युसुफ गवंडी, बाजाराच्या दिवशी वाड्यावर विसाव्याला येणारे पंचक्रोशीतील म्हातारे, ' कुत्र्याला पाय लाउ नये खंडोबा अस्तोय' असे सांगणारे शेतातील गडी चंदु, गोविंदा, रामा, शंकर, सहादु; शेताच्या वाटण्या झाल्यावर गुरांच्या, गड्यांच्या व कुत्र्यांच्याही वाटण्या होताना थबकलेले हात, रामभाउ पाटलाच्या नावानं.. करत गुबुगुबु करत येणारा नंदीबैलवाला, चंपाषष्ठीच्या दुसर्या दिवशी येणारे चोपडेकर महराज व त्यांचा लवाजमा, डोल्याच्या दिवशी पहार फिरवणारा युसुफभाई व 'धक्का लागला त्या बाईला तेल सर्व सांडुनी गेला' या समुह गानात सहभागी होणारे सर्वधर्मिय, सर्व लोकास कळविण्यात येते की बेऽऽ ल्हे गावातील ....दवंडी पिटणारा हिरा महार , 'तुझ्या म्हतार्यानी तरी वाचल होत का?' अस म्हणत पोरांना वाटेला लावणारा गावातला पहिलावहिला ग्रंथपाल दत्तु बाम्हन ...........................................................................................
(नॉस्टल्जिक)
प्रकाश घाटपांडे
बरोबर
प्रकाशरावांशीही सहमत आहे. याच वातावरणात मोठा झाल्याने सकाळी पाच पांडवांच्या विहिरीत मारलेली डुबकी. विहिरीतील आंघोळ होता होता विठ्ठलाच्या देवळातून ऐकू आलेले काकडारतीचे सूर. खिरापत चुकू नये म्हणून ओले डोके तसेच ठेवून पळत पळत मंदिरात जाण्याची गडबड. कपाळावर दिवसभर काळजीपूर्वक जपलेला गोपीचंदनाचा टिळा. मारुतीच्या देवळाशेजारी ७५ पैशात वडापाव विकणारा शांताराम, चिन्यामिन्या बोरांचा २५ पैशाचा वाटा १५ पैशाला देणारी शाळेतली मावशी, जेवणाच्या सुटीत खालेली गुडदाणी.
छ्या. रावसाहेबांनी अगदी नॉस्टॅल्जिक केले बुवा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ह्म्.....
मला वाटतं 'गोष्टी घराकडील' या माडगूळकरांच्या पुस्तकाचेच 'घर-दार' हे पूर्वीचे नाव आहे बहुधा.
गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे
झाले पहा कितीक हे विपरीत सारे
आहे घरासचि असे गमते मनास
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास
- केशवसुत
ह्या ओळी अर्पण पत्रिकेवर आहेत का? कारण वर तुम्ही दिलेले बहुतेक सर्व प्रसंग (excerpt), 'गोष्टी घराकडील' पुस्तकात वाचल्याचे आठवते.
अर्थात ही एक शक्यता झाली. पण माडगूळकरांची पात्रं, घटना त्यांच्या इतर अनेक पुस्तकातून बर्याचदा परत भेटतात असे मला वाटते.
या द्विरुक्तीबद्दल तुमचे काय मत आहे सन्जोप राव?
-सौरभ.
==================
परीक्षण
परीक्षण आवडले. त्यावरच्या घाटपांडे आणि अजानुकर्ण यांच्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत.
माडगूळकर यांना मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळण्याचे एक महत्त्वाचे कारणच मुळी हे की त्यांच्या साहित्यातून सांस्कृतिक दस्तावेजाचे चित्र आपल्याला पहायला मिळते. गावाकडची माणसे , त्यांच्या कहाण्या , ती माणसे जगतात तो काळ , तेथील भौगोलिक परिस्थिती या सार्याकडे एका तटस्थतेने पहाण्याची , मात्र त्या सार्याचे मर्म टिपण्याची माडगूळकरांची अनलंकृत तरी प्रभावी शैली. पन्नास, साठ च्या दशकात आलेल्या त्यांच्या पुस्तकांवर या सगळ्या ताजेतवानेपणाची छटा आहे.
मला स्वतःला माडगूळकरांची एक व्यक्ती आणि लेखक म्हणून सतत वृद्धिंगत होत रहाण्याची क्षमता थक्क करून सोडते. त्यांनी कथा, कादंबर्या लिहिल्या. रेखाटने केली. आपल्या कुटुंबावर , पाहिलेल्या व्यक्तींवर लिहिले. जंगलांवर लिहिले , शिकारींवर लिहिले , देशोदेशीच्या शिकार्यांवर, प्रवासांवर लिहिले. आणि जे लिहिले त्यावर स्वतःची मोहर उमटवली. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा दबदबा निर्माण झाला. आणि हे सगळे अनुभवताना लिखाणात (आणि ऐकीव-वाचिक माहितीनुसार जीवनातही ) एक प्रकारचा नामानिराळेपणा अंगिकरला. हा सगळा आवाका थक्क करणारा वाटतो.
या निमित्ताने
या लेखाच्या निमित्ताने मनात घोळत असलेला एक विचार व्यक्त करतो. माडगूळकर आणि जी ए हे दोन्ही दिग्गज लेखक. दोन्ही लेखकांनी १९४५-५० नंतरच्या मराठी साहित्यामधे महत्त्वाचे योगदान केलेले. दोघांचे बलस्थान म्हणजे कथा. (जी एंनी दुसरे काही लिहिले नाही. माडगूळकरांनी बरेच काही - आणि वेगळ्या प्रकारचे - लिहिले.) दोन दर्जेदार , चांगल्या गोष्टींची तुलना करू नये म्हणतात. पण माझ्या मनात कित्येक वर्षांपासून हे चाललेले आहे. अर्थात , मी "कोण मोठा नि कोण छोटा" असल्या फालतू गोष्टींमधे बिलकुल पडत नाही. ही तुलना मला फार रोचक वाटत आलेली आहे. काही मुद्द्यांचा केवळ निर्देश करतो आणि माझे हे अति-अवांतर पोस्ट् आवरतो.
१. जीवनविषयक दृष्टिकोन म्हणा, मते म्हणा : जी एंचा सुप्रसिद्ध "नियती"वाद. माडगूळकरांनी असा एकच एक (किंवा एकाच प्रकारचा असा) दृषिकोन मांडल्याचे मला स्मरत नाही.
२. सामाजिकता : जी एंच्या कथेत सामाजिक बाजू एक पर्यावरण म्हणून येताना दिसते. त्यांच्या कथेतल्या घटना , पात्रे यांचे चलनवलन यांच्या मागचे शक्तिशाली घटक सामाजिक रूढी , परंपरा, शोषण , असमानता इ. इ. क्वचितच असते. किंवा असले तरी , जी ए त्यांना डावलून व्यक्तीच्या वैयक्तिक उलाघालीकडे पहातात. ("यल्लूभीमा" , "संका" , "गणेशवाडी भट".) माडगूळकरांचा प्रकृतिधर्म त्या मानाने एकंदर सामाजिक दृष्टिकोनाच्या बाबतीत परंपरागत म्हणता येईल. ("माणसे जगायला गावाबाहेर पडली.")
३. निसर्गातल्या , पर्यावरणातल्या गोष्टी : माडगूळकर चालत्याबोलत्या निसर्गकोषाप्रमाणे असल्याचे जाणवते. माडगूळकरांचे मन जंगलात , शिकारीत, पशु-पक्षांत रमते. त्याच्या वर्णनांवरच त्यांचे लेख/पुस्तके आहेत. जी एंच्या कथेतही पशु-पक्षांची वर्णने , उल्लेख येतात. पण कधीकधी तेसुद्धा "मीन्स् टोवर्डस् ऍन् एंड्" असल्यासारखे. माणसाचे प्राणीसृष्टीशी नाते काय ? नाते प्रस्थापित झाले तरी त्याचे स्वरूप कितपत चिरंतन आहे ? त्याच्या वियोगातून होणर्या दु:खाची जातकुळी काय ? इ. इ. थोडक्यात , त्यांना सामाजिकतेचे वावडे आहे , पण "माणूसपणा"बाबत कुतुहल आहे आणि पर्यावरणाचा धागाही इथे जोडला जातो.
लिहिण्यासारखे अन्य आहे; पण मला हा धागा "हायजॅक्" करायचा नाही. तस्मात् इथे थांबतो !
हे तितकेसे पटले नाही
२. सामाजिकता : जी एंच्या कथेत सामाजिक बाजू एक पर्यावरण म्हणून येताना दिसते. त्यांच्या कथेतल्या घटना , पात्रे यांचे चलनवलन यांच्या मागचे शक्तिशाली घटक सामाजिक रूढी , परंपरा, शोषण , असमानता इ. इ. क्वचितच असते.
किंबहुना जीएंना जुन्याचे किंवा परंपरेचे फारच आकर्षण आहे हे नेहमीच जाणवते. अनेक पत्रांमधून जीएंनी आधुनिक स्त्रियांबाबत व्यक्त केलेली नाराजी त्यांच्या कथांमधूनही दिसली आहे. परंपरा-शोषण म्हणाल तर राधी किंवा बळी या कथा आणि सामाजिक जाणीव म्हणाल तर कुसुमगुंजातील होळी, भूक या कथा यामागची प्रेरणा सामाजिक रुढी, असमानता याच आहेत हे जीएंनी अमान्य केले तरी कोणालाही पटेल. किंबहुना कुसुमगुंजाच्या प्रस्तावनेत पुरुषोत्तम धाक्रस यांनी (कदाचित जीएंना न आवडणारा) असा सामाजिक जाणीवेचा उल्लेखही केला आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आमचेबी दोन पैसे...
व्यंकटेश माडगुळकर म्हटले की, आम्हाला 'बनगरवाडी' ची आठवण होते. कथानकप्रधान कादंबरीचा काळ जाऊन व्यक्तिप्रधान कादंबरी आकाराला येत असतांना माणदेशच्या परिसरातील एक दुष्काळी भाग 'बनगरवाडी' हे गाव नव्हे तर, पात्र त्यांनी उभे केले असे म्हणावे लागेल. बनगरवाडीचा सारा माळ त्यांनी सजीव केला. बारीकसारीक हालचालींची नोंद केली, निसर्गाची नोंद घेवून बनगरवाडीबरोबर लेखकाने एक आदर्श मास्तर वाचकांसमोर उभा केला. मेंढपाळी विश्वात रमणार्या नायकाचे सारे जीवनच बनगरवाडीमय झालेले दिसते. अवर्षणाच्या भीतीत जगण्याची धडपड करणारी बनगरवाडी निसर्गापूढे हतबल ठरते, कादंबरीच्या शेवटी मास्तराची बदली होते, मास्तर गावही सोडून जायला लागतो. तेव्हा वाचकाला आपलं स्वतःचं गाव उद्ध्वस्त झाल्याचा अनुभव येतो.
व्यंकटेश माडगुळकरांची' माणदेशी माणसं " हाही कथासंग्रह असाच आहे. माणदेशच्या वैराण माळावर दु:ख, दारिद्र्य, अज्ञानाने गांजलेल्या अशा सर्व माणसांची स्पंदने त्यांच्या कथेतून उमटतांना दिसतात. त्यांच्या या कथा व्यक्तिचित्रणात्म स्वरुपाच्या आहेत त्यातून माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे ते टीपतात. माडगुळकरांची भाषा वर उल्लेख आलेत तसे सोपी, गावरान असल्यामुळे मोजक्या शब्दात ती मोठा आशय व्यक्त करते..त्याचबरोबर त्यांच्या लेखनातील माणसं आपली वाटतात. त्यांच्या लोकप्रियतेचे हेही एक कारण असावे.
स्वातंत्र्यानंतर पहिली पिढी खेड्यातील होती. पेंडसे, माडगुळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, आणखी बरीच नावे सांगता येतील की, ज्यांनी याच काळात साहित्याची निर्मिती केली. मात्र बदलते खेडे त्यांच्या लेखनातून फारसे आले नाही असे म्हटले जात असले तरी माडगुळकर लोकप्रिय का होतात त्याचे कारण असे वाटते की, त्यांच्या लेखनातील माणदेशी माणसं वाचकांना नवी होती. शहरी वाचकांना काय आवडेल ते पाहतांना शहरी वाचकाला ग्रामीण जीवनाबद्दल जरा सहानुभूती असते जसे, समाज, दारिद्रय्, दु:ख, अज्ञान,बेरकीपणा, टगेगिरी.. यात गुरफटलेली माणसं माडगुळकरांनी हेरली. आणि गोष्टी सांगणार्याच्या भुमिकेत जावून अपरिचित माणसांचा आपल्याला परिचय करुन दिला. तेव्हा त्यांची बोली, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती, संकेत, हे सर्व वाचकांना सांगण्याच्या शैलीमुळे त्यांनी वाचकाला खिळवून ठेवले. ती माणसं वाचतांना माणूस हरवून जातो. माडगुळकरांनी मध्यमवर्गीय वाचकांना खिळवून ठेवले...म्हणून ते लोकप्रिय झाले असेही वाटते.
छान प्रतिसाद
घाटपांडे साहेब, आजानुकर्ण आणि बिरुटे साहेबांचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडले. धन्यवाद.
जी.ए. आणि माडगूळकर दोन्ही आवडते लेखक असल्याने त्यांच्यांत डावेउजवे सोडाच, पण त्यांची तुलनाही करणे शक्य नाही. मुक्तसुनीतांच्या प्रतिसादावर एवढेच लिहितो.
'घर-दार' म्हणजेच 'गावाकडच्या गोष्टी' आहे का? जाणकारांनी प्रकाश टाकावा. अर्पणपत्रिकेत अशा ओळी नाहीत.
द्विरुक्तीबाबत म्हणाल तर प्रत्येक लेखकाच्या लिखाणात असे अस्पष्ट का होईना संदर्भ येत रहातात. नारायण धारपांसारख्या 'समर्थ' लेखकाच्याही काही कादंबर्यांमध्ये घोळ होतो. जी.एं. बाबतही असे होते. ('तुती' व 'कैरी') याला लेखकावर झालेले संस्कार कारणीभूत असावेत असे वाटते. ही लेखकाची मर्यादाही मानता येईल.
सन्जोप राव
थोडे स्पष्टीकरण
जी.ए. आणि माडगूळकर दोन्ही आवडते लेखक असल्याने त्यांच्यांत डावेउजवे सोडाच, पण त्यांची तुलनाही करणे शक्य नाही. मुक्तसुनीतांच्या प्रतिसादावर एवढेच लिहितो.
माझ्या प्रतिसादात मी स्पष्टपणे असे म्हण्टलेले आहे की यात लहान-मोठेपणासारख्या बालीश गोष्टींची चर्चा नाही. काही मुद्द्यांच्या बाबतीत एकाच कालखंडातल्या दोन महत्त्वाच्या लेखकांच्या लिखाणातले गुणधर्म टिपण्याचा माझा प्रयत्न आहे.
गावाकडच्या गोष्टी
>>'घर-दार' म्हणजेच 'गावाकडच्या गोष्टी' आहे का?
घर-दार म्हणजेच 'गावाकडच्या गोष्टी' ( १९५१ ?)
जी.ए. आणि माडगूळकर
लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, पण माडगुळकरांचे काही निवडक लेखन सोडता (माणदेशी माणसं, बनगरवाडी इ.इ.) बाकिचे लेखन (जे माझ्या वाचनात आले) काहीसे सामान्य दर्जाचेच वाटले होते. जी.एंच्या बाबतीत कधी तितका भ्रमनिरास झाला नाही.
असो सुरुवातीलाच उल्लेखल्याप्रमाणे हे माझ्या मर्यादित वाचनातुन केलेले निरिक्षण आहे, लहान तोंडी मोठा घास असू शकतो
ऍपल आणि ऑरेंज
हा वाक्प्रयोग मी सांगायला नको. बासुंदी ती बासुंदी, भजी ती भजी!
सन्जोप राव
ह्म्....
कोलबेर, ही घ्या माडगूळकरांच्या लेखनाची यादी.
कथासंग्रहः
हस्ताचा पाऊस, गावाकडच्या गोष्टी, काळी आई, उंबरठा, पारितोषिक, सीताराम एकनाथ, माणदेशी माणसे, वाघाच्या मागावर, घर-दार, जांभळाचे दिवस, वारी, कांगारुचं चांगभलं, माडगूळकरांची कथा, डोहातील सावल्या, वाळूचा किल्ला, बाजार, ओझं, गोष्टी घराकडील.
अनुवाद
सुमिता, मंतरलेलं बेट, मी आणि माझा बाप, सिंहाच्या देशात.
कादंबर्या
कोवळे दिवस, बनगरवाडी, पुढचं पाऊल, करुणाष्टक, वावटळ, सत्तांतर.
नाटके
सती,पती गेले ग काठेवाडी, तु वेडा कुंभार, नामा सातपुते, बिन बियांचे झाड, कुणाचा कुणाला मेळ नाही, बिकट वाट वहिवाट.
ललित
पांढर्यावर काळे, चित्रे आणि चरित्रे, अशी माणसं:अशी साहसं, नागझिरा, जंगलातील दिवस, वाटा.
प्रवासवर्णन
पांढरी मेंढरे हिरवी कुरणे
कोलबेर, उगीच शिष्टपणा/खवचटपणा करण्यासाठी ही यादी दिलेली नाही. नोंद करुन ठेवावी म्हणून दिलेली आहे, झालाच कुणाला तर उपयोग होईल. मिळतील तशी यातली पुस्तकं वाचून बघा. तुमचे मत बदलले तर मला आनंद वाटेल. :-)
मी देखील यातली सगळी पुस्तकं वाचलेली नाहीत. थोडीफार वाचली त्यात तरी त्यांचे लेखन मला सामान्य दर्जाचे वाटले नाही.
सन्जोप राव, यादीप्रमाणे 'गोष्टी घराकडील', 'गावाकडच्या गोष्टी' आणि 'घरदार' ही तीनही वेगवेगळी पुस्तके दिसतात. :-(
अशीच यादी जी.एं ची मला हवी आहे. सन्जोप राव तुम्हाला देता येईल का?
पानवलकरांची देखील अशी यादी कुणाकडे आहे का? नंदन, तुम्हाला देता येईल का?
-सौरभ.
==================
यादी
श्री. दा. पानवलकरांचे साहित्य -
सूर्य, औदुंबर, जांभूळ, एका नृत्याचा जन्म, कांचन, संजारी, गजगा, चिनाब, शूटिंग, श्री. दा. पानवलकर यांची कथा. [शूटिंगबद्दल येथे वाचता येईल. सूर्य या कथासंग्रहातील एक सुरेख कथा येथे दिली आहे.]
'सोनपावले'च्या अखेरीस जीएंच्या साहित्याची सूची आहे. त्याप्रमाणे निळासावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन, काजळमाया, रक्तखुणा, सांजशकुन, पिंगळावेळ, कुसुमगुंजा, डोहकाळिमा, सोनपावले, नियतिदान हे कथासंग्रह; अमृतफळे, ओंजळधारा, पैलपाखरे, आकाशफुले हे आधारित/अनुवादित कथासंग्रह; मुग्धाची रंगीत गोष्ट आणि बखर बिम्मची हे बालसाहित्य; माणसे - अरभाट आणि चिल्लर हे दीर्घ ललितलेखन; स्वातंत्र्य आले घरा, रानातील प्रकाश, रान, शिवार, गाव, वैर्याची एक रात्र, एक अरबी कहाणी, लॉर्ड ऑफ दी फ्लाईज, सोन्याचे मडके या अनुवादित कादंबर्या; जी.एं.ची निवडक पत्रे (४ खंड) हा पत्रसंग्रह आणि 'दिवस तुडवत अंधाराकडे' हे नाटकाचे भाषांतर (अप्रकाशित) एवढी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद....
नंदन, माहितीबद्दल आभार. तुमच्या ब्लॉगवरची कथा आधीच वाचलेली होती. शूटिंगचा दुवा मात्र वाचलेला नव्हता.
'श्री.दा.पानवलकर यांची कथा' हे हातकणंगलेकरांनी संपादित केलेले पुस्तक का? मी ते वाचले आहे. त्यात सगळ्याच उत्तमोत्तम निवडक कथा आहेत.
जीएंच्या वाचलेल्या पुस्तकांची नोंद न ठेवल्याने आता सगळी गल्लत होऊन गेली आहे. कुठले वाचले, कुठले राहिले आठवत नाही. पाचाक्षरी नावांमुळे गोंधळात भर! :-)
==================
सत्तांतर बाबत
सत्तांतर या पुस्तकासंदर्भात मला फार दिवसांपासून एक शंका आहे. ह्या पुस्तकाची केवळ थीमच नव्हे तर संपूर्ण पुस्तक हे एका इंग्लिश पुस्तकाचे भाषांतर आहे आणि त्याचे योग श्रेय मूळ लेखकाला न देता किंवा तसा उल्लेखही न करता माडगूळकरांनी ही कल्पना स्वतःच्या नावावर खपवली असे मी काही वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते. माडगूळकरांच्या साहित्याबाबत इथे अनायासे चर्चा चालूच आहे. या गोष्टीबाबत कोणाला काही माहिती आहे का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
असेच म्हणते
होय, या गोष्टीबद्दल मीही वाचलेले आहे. बहुधा दिवाळी अंकात. (अर्थात 'दीपावली' नसणारच!)
आमचा गाव
हे वाचून तर मला माझाच गाव आठवला...रांगडी पण साधी सरळ माणसे...साधाच पण चवदार अन्न...ते शेत, ते शिवार...चावडी...यष्टी ठेसन....किती काळ झाला जाऊन...हल्लीच वर्षभर होते भारतात पण काही जायला जमले नाही आणि आता खूप टोचणी लागून राहिली आहे....
भुतकळात रमलेली
- शिल्पा
आमचा गाव
हे वाचून तर मला माझाच गाव आठवला...रांगडी पण साधी सरळ माणसे...साधाच पण चवदार अन्न...ते शेत, ते शिवार...चावडी...यष्टी ठेसन....किती काळ झाला जाऊन...हल्लीच वर्षभर होते भारतात पण काही जायला जमले नाही आणि आता खूप टोचणी लागून राहिली आहे....
भुतकळात रमलेली
- शिल्पा