अनुप्रास

अनुप्रास
शाळेत असतांना जा कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे

१] देवी दयावती दवडसि दासाची दु :खदुर्दशा दूर
पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर !
मोरोपंत

२] कुरुकटकासि पहाता,
तो उत्तर बाळ गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि,
बालिश बहु बायकांत बडबडला !
मोरोपंत
लहानपणी द द ,प,प,ब,ब, यांची पुनरावृत्ति मजेदार वाटावयाची. शिवाय पाठ करावयालाही सोपे. माध्यमिक शाळेत अलंकार म्हणून उपमा, उत्प्रेक्षा व्याकरणाच्या एक भाग म्हणून शिकवावयास सुरवात केली आणि सगळी मजाच गेली. सदाशिव पेठेत बरीच वर्षें काढल्यामुळे कोणत्याही विषयावर [विशेषत : आपला अभ्यास नसलेल्या ] ठोकून मत द्यावयाचा अधिकार मला आहेच. तेंव्हा माझे असे ठाम मत आहे कीं लहान मुलांना मराठीची गोडी लावावयाची असेल तर अभ्यासक्रमात व्याकरण हा विषय ठेवावा पण परिक्षेमध्ये अजिबात ठेवूं नये. व्याकरणाची धास्ती न घेता मुले चांगले वाङ्मय वाचू लागली तर केवळ वाचनानेच मुलांचे मराठी सुधारेल व आवड वाढल्याने
मराठीला बरे दिवस येतील. [हा चर्चेचा विषय करावा; अनेक "शरद" भाग घेऊ शकतील !] असो. तर काय सांगत होतो की हा " अनुप्रास " लहानपणापासून ओळखीचा.

जेव्हा एक किंवा अनेक व्यंजनांची आवृत्ती होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. याचे तीन प्रकार; [१] छॆकानुप्रास, [२] वृत्यनुप्रास, [३] शब्दानुप्रास. पहिला व तीसरा फ़ार प्रचारात नाहीत व म्हणून महत्वाचेही नाहीत. आपण नेहमी बघतो तो वृत्यनुप्रास. याची आणखी उदाहरणे :

[३] हंसे मुक्ता नेली
मग केला कलकलाट काकांनीं ,
हाकानी नभ भरले
जाय सुरांच्याही नाद हा कानीं !
म्रोरोपंत

[४] डुमडुमत डमरु ये,खणखणत शूल ये,
शंख फ़ुंकीत य़ॆ, येइ रुद्रा !
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !
कडकडा फ़ोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ,उधळ गिरि जशी मृत्त्तिका,
खवळवीं चहुकडे या समुद्रां !
भा.रा.तांबे.

अनुप्रासात व्यंजनांची पुनरावृत्ती होत असते, स्वर वेगवेगळे असले तरी चालतात.

शरद

Comments

वाचनीय

लेख आवडला. भाषालंकार मालिका वाचनीय होत आहे.

दहावीच्या अभ्यासक्रमात 'अनुप्रास' होता. तेव्हाचे ठरलेले उत्तर -
गारा, वारा, पर्जन्यधारा यांचा एकच मारा होऊन "रमावरा, आता तुम्हीच तारा!" असे म्हणत वर्‍हाडी मंडळी सैरावैरा पळत सुटली.

अनुप्रास

शरदरावांचे लेख मस्तच ! पण समजून घेण्यासाठी विसुनानांने सांगितलेले उदा. एकदम मस्त.

>>गारा, वारा, पर्जन्यधारा यांचा एकच मारा होऊन "रमावरा, आता तुम्हीच तारा!" असे म्हणत वर्‍हाडी मंडळी सैरावैरा पळत सुटली.

इथे 'रा' हे अक्षर पुन्हा-पुन्हा आल्यामुळे जो एक नाद निर्माण होतो तो अनुप्रास,

-दिलीप बिरुटे

कुठलेसे यमक आहे काय?

गारा, वारा, पर्जन्यधारा यांचा एकच मारा होऊन "रमावरा, आता तुम्हीच तारा!" असे म्हणत वर्‍हाडी मंडळी सैरावैरा पळत सुटली.

हा अनुप्रास म्हणावा की कुठल्याशा प्रकारचे यमक?

मराठीत यमक "र्‍हाईम" या इंग्रजी शब्दाचा पर्याय म्हणून कधीकधी वापरला जातो. म्हणजे पदभाग-यमकच असे वाटते. कवितेच्या ओळीनंतरच असे यमक आले, तर अनुप्रास साधत नाही, खरे. पण ओळीत एकच अंत्य ध्वनी असलेले अनेक शब्द मुद्दामून घेतले समजा. (आणि शब्दाच्या अंती यती आपोआप साधली जाते.) म्हणजे विसुनानांचे दिलेले उदाहरण घ्या. तर ऐकणार्‍याला यमकाची जाणीव होते, की अनुप्रासाची?

माझ्या कानाला तरी "गारा, वारा, धारा"मध्ये यमकाची अनुभूती अनुप्रासापेक्षा अधिक जाणवते.

वारा आणि वारी उधळत वारूती स्वा वी वैरी विखत वाईट वेळ निवारो.
येथे मात्र स्वरभेदामुळे शब्दाच्या अंती सुद्धा माझ्या कानाला 'यमक' असे काही ऐकूच येत नाही, अनुप्रासच ऐकू येतो. (फक्त "र" अधोरेखित केला आहे, "व"चा अनुप्रास अधोरेखित केलेला नाही.)

दोन्हीही...

>>विसुनानांचे दिलेले उदाहरण घ्या. तर ऐकणार्‍याला यमकाची जाणीव होते, की अनुप्रासाची?
खरं म्हणजे यमकाची जाणीव होते.पण व्याकरणकार अनुप्रासाबद्दल लिहितांना म्हणतात की, एखाद्या वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला एक सौदर्य प्राप्त होते तेव्हा तो अनुप्रास. आणि वरील उदाहरणात मात्र तो नाद, ती लय जाणवते असे वाटते.

-दिलीप बिरुटे

सुंदर

लेखमालिकेतील हा लेखही सुरेख. वाचक्नवी यांनी लाटानुप्रास असे एक नाव सांगितले होते. त्या प्रकाराचे नाव वर आले नाही असे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लाटानुप्रास

लाटानुप्रास म्हणजेच शब्दानुप्रास. यात एक शब्द त्याच अर्थाने पण निराळ्या रीतीने परत येतो. फ़ारसा आकर्षक नसल्याने उदाहरण
दिले नाही.
शरद

लाटानुप्रास

लाटानुप्रास अगदीच आकर्षक नाही असे नाही. ही उदाहरणे पहा:--
१. जान्हवीसुतासवें लढावयास संगरीं ।
चक्र चक्रपाणि पाणिमाजिं तो सदा धरी ॥ (तो चक्रपाणि पाणिमाजीं चक्र धरी.)
२. पद्म पद्मलोचना घेउनी करीं जना । (पद्मलोचना स्त्री करीं पद्म घेउनी..)
३. किंतु कर्ण भेदि नीलकंठकंठज स्वर। (नीलकंठ मोर, कर्णभेदि स्वर कंठातून काढतो.)
--वाचक्‍नवी

आताच वाचलेले उदाहरण

आताच रामजोशांच्या कवितांच्या पुस्तकाची पाने पलटताना या ओळी वाचल्या :

भज भज भवजलधिमाजि मनुजा शिवाला ॥ धृ ॥
धरशिल दृढ चरणकमल
घडिभरि तरी करुनि विमल ॥ १ ॥
...

धृवपदात भ-भ-भ ज-ज म-म व-व ल-ल अशी आलटून-पालटून पुनरावृत्ती होताना दिसते.

पहिल्या कडव्यात स्वरांची पुनरावृती होताना दिसते : घडिभरि तरी - अ-इ-अ-इ-अ-इ
"अनु"प्रास नाही, हे व्याख्येवरून कळते, पण "प्रास" आहे का?

- - -
वरील "प्रास"चे उत्तर.
हेमचंद्राच्या काव्यानुशाशनात "प्रास" नामक कुठला अलंकार दिलेला नाही.

गूगलून शोधता असे दिसते की तेलुगू आणि कन्नड काव्यामध्ये पदाच्या (?चरणाच्या) प्रथम किंवा द्वितीय अक्षराची अनुवृत्ती झाल्यास त्याला "प्रास" (प्रथमाक्षरप्रास किंवा द्वितीयाक्षरप्रास) असे म्हणतात.

पारंपारिक मराठी कवितांत अंत्ययमक जवळजवळ सक्तीचे असते, तसे प्राचीन कन्नड कवितांत द्वितीयाक्षरप्रास हा सक्तीचा असे, असे हल्लीच कुठे वाचनात आले. कुठल्या कुठे साम्ये दिसतात - मध्ययुगीन/प्राचीन इंग्रजी कवितांमध्ये प्रथमाक्षरप्रासाची प्रथा होती, असे वाचले आहे.

शब्दानुप्रास

श्री. वाचन्कवी यांचे उदाहरण शब्दानुप्रासाचे आहे कारण त्यात चक्र, पद्म, कंठ हे शब्द एकाच अर्थाने पण निराळ्या रीतीने आले आहेत.
शब्दानुप्रास यालाच लाटानुप्रास असेही म्हणतात. दामयमक यालाच अंतादिक यमक म्हणतात.
आ.धनंजय यांनी दिलेल्या उदाहरणातील धृवपदात व्यंजनांची आवृत्ती झाली असल्याने अनुप्रास झाला आहे. कडव्यात स्वरांची आवृत्ती झाल्याने अनुप्रास नाही.
शरद

सोपे केले पाहिजे...

>>दामयमक यालाच अंतादिक यमक म्हणतात.
सोपी भाषा वापरली तर समजून घेणे सोप जाईल असे वाटते. जसे, ओळीतील शेवटच्या शब्दाने पुढील ओळीची सुरुवात होणे म्हणजे दामयमक .
श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया
मा राया जनकाची-होय सुता त्रिजगदाधि साराया
सारा या प्रभुची हे-लीला गाती सदैवही सु-कवी ।

तसे लाटानुप्रासाचे उदाहरण दिले तर समजून घेता येईल पण आपण म्हणता की, 'फ़ारसा आकर्षक नसल्याने उदाहरण
दिले नाही.' यातला 'फारसा आकर्षक' हे समजले नाही. ( म्हणजे लाटानुप्रास लेखनात वापरतांना आकर्षक दिसत नाही, असे का ? )

लाटांप्रमाणे

बिरुटेसर,

माझ्या मते लाटांप्रमाणे शब्दसमूहांच्या जोड्या अनुप्रास निर्माण करतात त्याला लाटानुप्रास म्हणता येईल. काही ओळींमध्ये लाटा ओसरल्या आहेत असेही दिसते. (म्हणजे अनुप्रास नाही)

बरोबर का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बरोबर असावे

>>शब्दसमूहांच्या जोड्या अनुप्रास निर्माण करतात त्याला लाटानुप्रास म्हणता येईल. काही ओळींमध्ये लाटा ओसरल्या आहेत असेही दिसते.

शब्दसमूहाच्या जोड्या म्हणजे लाटानुप्रास पटतंय. पण सारखेच शब्द यायला पाहिजेत का ? समजा 'पाणि' आणि पुढे 'आणि' आले तर ,
मग लाटानुप्रास नाही का ?

चक्र चक्रपाणि पाणिमाजिं तो सदा धरी ॥
पद्म पद्मलोचना घेउनी करीं जना ।
किंतु कर्ण भेदि नीलकंठकंठज स्वर।

दाम(संस्कृत) म्हणजे दांवे, कासरा.

गाडीवानाच्या हातातील दाव्याची दोरी जशी एका बैलाच्या मानेकडे जाते आणि तिथून सुरू होऊन परत गाडीवानाकडे येते आणि परत तिथून सुरू होऊन दुसर्‍या बैलाच्या मानेकडे जाते, तसेच एका चरणाचा शेवट(अंत) तीच दुसर्‍या चरणाची सुरुवात(आदि) अशा रीतीने रचलेल्या काव्यातला शब्दालंकार तो अंतादिक ऊर्फ दामयमक.
लाटानुप्रास म्हणजे लाट देशातील लोकांचा आवडता अनुप्रास, ही माहिती मजेशीर आहे.--वाचक्‍नवी

अंतादिक यमक

अंतादिक यमकाचे उदाहरण
सेवुनि संतत पाला
संत तपाला यदर्थ करतात,
तो प्रिय या स्तवना कीं
य़ास्तव नाकीं हि तेंच वरतात.
लेखात दिले आहेच, फ़क्त नाव दिले नव्हते.
शरद

लाटानुप्रास

[१]लाटानुप्रास हे नाव पडावयाचे कारण हा अनुप्रास लाट देशातील कवीना प्रिय होता. येथे लाट [पाण्याची] हीचा संबंध नाही.
त्यामुळे ओळींमधील लाटा-- शब्दांच्या जोड्या वगैरे गैरलागू.
[२] पाणि पुढे आणि आले तर शब्दानुप्रास नाही.
[३] श्री. वाचक्नवी यांनी एक उदाहरण दिले आहेच. मी एक देतो.

एका क्षणप्रभावे बनली अन्योन्न मित्र जिवलग ती,
लगबगती भेटाया, भेट न होता मनांत तगमगती !
येथे भेट हा शब्द त्याच अर्थाने पण निराळ्या रीतीने दोनदा आल्यामुळे शब्दानुप्रास साधला आहे.
यमकामध्ये तीच अक्षरे निरनिराळे शब्द बनून येतात व जास्त मनोरंजक होतात. हे माझे मत. आपणाला शब्दानुप्रास आवडत असेल तर
आपली मर्जी. उदाहरणे देण्याचा प्रयत्न मी करीन.
शरद

लाट देश कोणता?

लाट देशातील कवीना प्रिय होता.

म्हणजे नक्की कोणता देश?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लाट देश

ही माहिती चुकून दुसरीकडे पडली आहे, इथेही देतो.
लाट देश
लाट्यायन ब्राह्मणांची वस्ती दक्षिण गुजराथमध्ये होती.लाटयायनचा अपभ्रंश लाट [ व पुढे लाड ]. त्यावरून ह्या भागाला लाटदेश असे नाव पडले. इ.स. ७१२ मध्ये महंमद कासीमने सिंधवर स्वारी केल्यावर गुजराथवरही आक्रमण होईल या भीतीने पुष्कळसे लोक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात जाऊन राहिले.यांमधील जमातीना लाड ब्राह्मण, लाड सोनार, लाड साळी, लाड मराठे,लाड तेली इत्यादी नावे पडली. लाड ब्राह्मणांची जानवी मुसलमान राजकर्त्यांनी हिरावून घेतली व त्यांमधील उपनयन संस्कारही बंद पडले.
ते वैश्य मानले जाऊ लागले. १९२० च्या सुमारास परत त्यांनी उपनयन संस्कार, जानवी वगैरे स्विकारले आणि आता ते ब्राह्मण म्हणूनच ओळखले जातात.
शरद

लाट्यायन

लाट्यायन वगैरे शब्दही माझ्यासाठी नवीन आहेत. माहितीबद्दल धन्यवाद.

शम्मी कपूरचा लाट साहिब नावाचा एक पिक्चर होता असे रंगोलीत पाहिल्याचे आठवते. मला लाट देशावरून ते आठवले होते.

(ह. घ्या.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रश्नपत्रिका

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रश्नपत्रिका:
श्री.शरद यांनी भाषेच्या अलंकारांविषयी उत्तम लेख लिहिले आहेत.हे लेख वाचून आपली या विषयाची उजळणी झाली.श्री.शरद यांनी अपह्‍नुती,उपमा,उत्प्रेक्षा,रूपक या अर्थालंकारांचा,तसेच यमक आणि अनुप्रास या शब्दालंकारांचा परिचय करून दिला आहे.
त्यावर आधारित असे हे प्रश्न आहेत.इथे अलंकार केवळ ओळखायचे आहेत.एकाच उदाहरणात दोन अथवा अधिक अलंकार असू शकतील. अशावेळी जो प्रकर्षाने प्रतीत होईल तो अलंकार मानावा. शब्दालंकारापेक्षा अर्थालंकाराला प्राधान्य देणे उचित ठरेल.
**********
(१) पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा।
कुठे बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा॥
*
(२)तल्लिलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनि कवि कवण तरी।
जय संजीवनी जननि पयोदे श्रीगोदे भवताप हरी॥
*
(३) तो शर गरवरधरसा पविसा रविसा स्मरारिसायकसा।
पार्थभुजांतरिं शिरला वल्मीकामाजि नागनायकसा॥
*
(४)माझ्या छकुलीचे डोळे दुध्या कवsडिचे डाव
बाई कमळ कमळ गोड चिडीचं ग नांव
जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई खडिसाखsरेचे खडे।
*
(५)रदन दिसति जणू शशिबिंबाचे खंड मुखी खोविले
कुरल केश शिरिं सरल नासिका नेत्र कमलिनीदले।
*
(६)त्वां काय कर्म करिजे लघुलेकराने।
बोलोनिया मग धनू धरिलें कराने॥
*
(७)शाळिग्रामासम काळा देह कसा घोटीव ।
तेजदार नागावाणी दिसे कोवळा जीव ॥
*
(८)जिच्यावरि नद्या ,झरे, नहि जवाहिरे गोमटी
जिच्या घनवनस्पती, परि न पैठणी पोपटी॥
*
(९)हे मंद मंद पदसुंदर कुंददन्ती।
चाले जसा मदधुरंधर इंद्रदन्ती ।
हंसा धरूं जवळि जाय कृशोदरी ते ।
निष्कंप कंकणकरासि पुढे करी ते ॥
*
(१०)भो पंचम जॉर्ज भूप, धन्य धन्य! विबु्धमान्य,सार्वभौम भूवरा।
बहुत काळ तूच पाळ ही वसुंधरा, हे नयधुरंधरा॥
(नयधुरंधर=न्यायदानात कुशल)
*
(११) न हे नभोमंडळ वारिराशी।
न तारका फेसचि हा तयासी।
न चंद्र हा नावचि चालताहे ।
न अंक तो तीवर शीड आहे॥
*
(१२) कालिंदीतटपुलिनलांच्छितसुरतनुपादारविंद जयजय।
*
(१३)किती माझा कोंबडा ऐटदार
चाल त्याची किती बरे डौलदार
शिरोभागी छानसा तुरा हाले
जणू जास्वंदी फूल उमललेले।
*
(१४)सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो।
*
(१५)पंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधी नमितो
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो।
*****************************************************
कृपया उत्तरे प्रतिसादात लिहावी. व्य.नि. नको.
**********************************************

 
^ वर