संतांची कविता
आज आपण नामदेव महाराजांचे एक पद पाहणार आहोत. वेळ पावसाळ्याची आहे. विरही जनांना प्रियकराची ओढ लागण्याचा काळ.ज्ञानेश्वर महाराजांची विरहणीची निळियाचे ध्यान धरून बसण्याची वेळ. पण नामदेवांना सद्गुरु भेटलेले असल्याने ते केवळ माणसांत अडकून बसलेले नाहीत.त्यांची विशाल नजर आतां निसर्गाकडे वळली आहे.तेथेही त्यांना "हमसफ़र"च भेटतात पहा.
मल्हार महुडे गगनी दाटले, विजु खळे गर्जिंनले, गर्जिनले गे माये !
गोविंद पहाया, पहाया लवकरी, कैसे वरुषताहे, मधुधारी गे माये !
आनंदे मयुरे, नाचती आपैसे, प्रेमे नीळकंठ झाले, नीळकंठ झाले माये !
नामया स्वामी दृष्टी,स्वामी दृष्टी सोज्वळ, जीव लागला गोपाळे,गोपाळे गे माये !
महुडा---मेघ, , आपैसे --- आपोआप,नैसर्गीक रित्या ,
गोविंद गोकुळात खेळतो आहे, गोपींची झिंम्मड आहेच. आकाशातील ढगांनाही मागे रहावत नाही. घननीळाला पहावयाला मोठमोठे मेघही गर्दी करून,दाटीमुटीने,गर्जना करत, गोविंद नीट दिसावा म्हणून वीजेचा प्रकाश टाकत आले.आले म्हणजे कोसळलेच की हो!
नामदेव म्हणतात "कैसे वरुषताहे" ,पहा,काय घाई झाली आहे पहा!.आणि येथे एक सुरेख विशेषण वापरले आहे "मधुधारी. मधासारखी गोड धार.कशामुळे गोड? आंतरिक प्रेमामुळे गोड, कीं गोविंदाचा अंगसंग होणार या कल्पनेने गोड ? आपण आपल्या रसिक कल्पनाशक्तीने वाढवाल तेवढी गोडी वाढणारच आहे.आणि जमिनीवर आजुबाजुला काय दिसत आहे? मोर
आनंदाने,आपैसे, आपण होऊन,नाचताहेत. मोरांचा गळा निळा म्हणून ते नीळ्कंठ. गळा निळा कशाने झाला? हलाहल पिऊन शंकर नीळकंठ झाले तर मोठ्या प्रेमाच्या नजरेने गोविंद,निळिया,प्याला म्हणून मोर नीळकंठ.आकंठ पिणे येथे पुरेसे झाले नाही!नामयाचा स्वामी प्रेमळ आहे, सर्वांकडे प्रेमाने बघत आहे म्हणून सर्वांचा जीव गोपाळावर लागला आहे.
समित्पाणी
Comments
मधुधारी
आम्हाला अगोदर वाटल कि मधुशाला मधील मधु. नामदेव राव लई भारी हायेत कि, मंग त्यान्ला कच्चे मडके का म्हन्तात?
प्रकाश घाटपांडे
कारण
मंग त्यान्ला कच्चे मडके का म्हन्तात?
गोष्टीवरून विचार केला तर समजते की नामदेव त्यावेळेस संतपदाला पोचलेले होतेच, समाजमान्य व्यक्तिमत्व होते. पण कुठेतरी साक्षात भगवंत माझ्याशी बोलतो असा आणि अजून काही कारणाने असला तर अहंकार/अहंभाव त्याच्यात दडून राहीला होता. बाकी सर्व दोष निघून गेलेला पण अहंभाव न गेल्याने हे मडके त्या अर्थी कच्चेच राहीले होते. अर्थात तो एक विशिष्ठ प्रसंग आहे. त्या नंतर त्यांनी विसोबा खेचरांकडून ज्ञानप्राप्ती करून घेतली (मिपावाले नाही बरका... नाहीतर राडाच;) ) आणि नंतर (विशेष करून कुलकर्णी कुटूंब संजीवन समाधी अथवा भौतिकपद्धतीने जग सोडून गेल्यावर) बरेच कार्य केले. तेंव्हा ते कच्चे मडके राहीले नव्हते.
छान
शरदराव,
सुरेख पद आहे.
मल्हार ह्या शब्दाचा अर्थ काय असावा? 'एक संगीतातला राग' इतकाच तो नक्कीच नसावा. नामदेवांनी इथे हा शब्द वापरल्यानंतर काही वर्षांनी रागांना अधिकृत नावे वगैरे दिली असावीत असे मला वाटते. मात्र 'मेघमल्हार' प्रमाणे हा शब्दही इथे मेघांच्या जोडीनेच आला आहे. त्याबाबत काही सांगता येईल का?
नामदेवांची पदे मी अजिबातच वाचलेली नाहीत. थोडीशी शंका आली.
ज्ञानेश्वर किंवा तुकारामांच्या अभंगांमध्ये जशी ६-६-६-४ वगैरे प्रकारची रचना शक्यतो असते तसे इथे नाही. हा काही तरी वेगळा प्रकार दिसतो. नामदेवांच्या सर्व पदांचे स्वरूप असेच आहे का? हा कोणता वेगळा अलंकार आहे का?
तुकारामांनी त्यांच्या अभंगांमध्ये विविध प्रकारची रुपके वापरून विठठलाचे वर्णन केले होते. 'अंगसंग' हा शब्द अर्थ समजावताना आपण इथे वापरला आहे.
या शब्दाचा वापर तुकारामांच्या वेश्येचे रुपक वापरून केलेल्या अभंगांमध्ये आहे.
उदा.
हाचि नेम आता | न फिरे माघारी ||
बैठले शेजारी |गोविंदाचे||
बळियाचा अंगसंग| झाला आता||
नाही भयचिंता | तुका म्हणे ||
नामदेवांच्या अभंगांमध्येही अशा प्रकारच्या काही रचना आहेत का?
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अवांतर
नामदेवांचे जीवनवृत्त इथे वाचता येईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मल्हारचा अर्थ इत्यादी
शरद
हाची नेम आता
आपण दिलेल्या अभंगातल्या मधल्या दोम ओळी अशा
घररिघी झाले, पट्टराणी बळे
वरिले सावळे, परब्रह्म !
हा अभंग शिंदळीचे अभंगातला एक असून शिंदळीचा अर्थ वेसवा-वेश्या असा नसून बाहेरख्याली,बदफ़ैली,व्यभिचारी असा आहे. वेश्या आणि शिंदळीमध्द्ये फ़रक करावयास हवा.
३०० वर्ष्यांपूर्वी महाराष्ट्रात [आणि अजूनही काही आदिवासी जमातीत ] स्त्रीला आवडत्या पुरुषाच्या घरांत घुसून रहाण्याचा अधिकार होता.आणि घरातल्या बायका, [विशेषत: घरधनीण],हतबल असाव्यात असे दिसते!
अभंगाच्या घाटाबद्द्दल, ६- ६-६-४, वगैरे प्रा. यनावाला माहीती देतील. पण याचा अलंकाराशी संबंध नाही.
नामदेवांच्याच नव्हे तर सर्वच संतांच्या रचनेत ढिसाळपणा भरपूर आहे.यामुळेही संत कवी- पंत कवी असा भेद केला गेला असावा.
पूर्वी पंढरपूरला विठ्ठलाला [मूर्तीला] शब्दष: आलिंगन देण्याची,मिठी घालावयाची, पध्दत होती. म्हणून "अंगसंग".
मल्हार--
मल्हार या शब्दाचा मराठी [व हिंदी] शब्दकोषात रागविशेष असाच अर्थ दिला आहे व तो आपण लिहल्याप्रमाणे त्या अर्थाने नामदेवांनी वापरला असावा असे वाटत नाही. मल हरण करणारा तो मल्हार असा अर्थ घेतला तर उन्हाळ्यातली धूळ धुणारा ,घरें-दारें, झाडे-झुडपें साफ़ करणारा " पाऊस" असा घेतां येतो व मल्हार महुडे म्हणजे पाऊस-मेघ, पावसाचा-पावसाळी ढग, असा चपखळ अर्थ मिळतो. पदातील ढग हा पावसाळीच हवा.
समित्पाणी
पटण्यासारखे
तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे.
धन्यवाद.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अजिबात पटण्यासारखा नाही, पण..
मल्हारचा अर्थ मल हरण करणारा असा करावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. पण तूर्त दुसरा काही उपाय दिसत नाही. मल्हार हे इथे रागाचे नाव नाही हे नक्की!--वाचक्नवी
ओवी
६-६-६-४, ७-७-७-४, ८-८-८-४ किंवा ८-८-८-८अशा रचनांना साधारणपणे ओवी किंवा झोपाळ्यावरची ओवी म्हणतात. शेवटच्या प्रकारात दुसर्या आणि चौथ्याओळीअंती यमक असले पाहिजे. बाकीच्या तीन प्रकारांत दुसर्या-तिसर्या चरणान्ती . --वाचक्नवी
मल्हार
मल्हार या शब्दाचा मराठी [व हिंदी] शब्दकोषात रागविशेष असाच अर्थ दिला आहे
मल्हाराचा अर्थ 'खंडोबा' असाही आहे आणि 'योग' असाही शब्दकोशात सापडतो.
पण पुढे 'खंडोबाचे 'महुडे गगनी दाटले, विजु खळे गर्जिंनले, गर्जिनले गे माये ! हे काही जमेना :(
मल्हार
संस्कृत कोशात मल्हार सापडलाच नाही, सापडला तो मल्लार-अर्थ रागविशेष. मराठीत मल्लारि(मल्ल नावाच्या राक्षसाचा शत्रू) हा शब्द आहे. याचेच रूपान्तर होऊन , मल्हार, मल्हारीमार्तंड मराठीत आले. संस्कृतमध्ये एक मल्हा मिळाला, अर्थ एक प्रकारची गाय. योग असा अर्थ मात्र सापडला नाही. चमेली-मोगरा अशा अर्थाचे मल्ला, मल्ली, मल्लिका हिन्दीत आहेत.
मल्हार महुडेचे गूढ कायमच आहे. --वाचक्नवी
मल्हार
मल्लारी, ( पु. ) मल्लारी, मल्हार, मल्हारि ( सं. मल्ल+अरि. पु. ) खंडोबा.
मल्हार (सं. मल्लारि. पु. ) खंडोबा, गायनातला एक राग; योग.
( आणखी थोडा वेळ द्या शोधुन देईन. पण नाहीच असे म्हणु नका )
पाहा, मराठी शब्दरत्नाकर : कै. वा. गो. आपटे..................सुधारित आवृत्तीए २००२, नोव्हेंबर २००५. पृ. क्र.५३१,
अवांतर : नामदेव खरा तर चरित्रकार, जरासा भाबडाही, तितकाच अद्भुततचे आकर्षण असलेला. अभंगाऐवजी ओवीरुपाने लिहिलेली आख्याने, रसाळ निवेदन त्यांचे वैशिष्टे....
त्यांनी लिहिलेल्या बाळक्रिडेच्या अभंगावरुन 'मल्हार' हा शब्द त्यांनी श्रीकृष्णासाठी वापरलेला असावा असे वाटते. त्यांच्या रुपकाचे अभंग हे सहज सोपे आहेत. त्यामुळे या रचनेचा कसा अभ्यास करावा किंवा अर्थ काढावा जरा कठीणच काम दिसते.
शिंपीयाचे कुळी जन्म मज झाला, परी हेतु गुंतला सहासिवी !!
रात्री माजी शिवी ! दिवसामाजीशिवी ! आराणूक जिवी नाही माझ्या
सुई आणि सातुळी ! कात्री गज दोरा ! मांडीला पसा सदासिवी !!
नामा म्हणे श्वी विठोबाचे अंगी ! त्याचे नी मी जगी धन्य जालो !!!
शिवाशीवी करणारा आणि -
युगे अठठावीस विटेवरी उभा ! वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा '
किंवा
'नाचु किर्तनाचे रंगी ! ज्ञानदिप लावू जगी' अशी सहज सोपी महत्त्वकांक्षा साकार करणा-या नामदेवांची ''मल्हार महुडे गगनी दाटले, विजु खळे गर्जिंनले, गर्जिनले गे माये '' ही ओळ जरा अवघडच वाटत आहे.
वृत्त आणि अलंकार
नामदेवांच्या पदाचे वृत्त आणि काव्यप्रकार काय असेल तो असो, पण त्यातील अलंकार लाटानुप्रास आहे.
गर्जिंनले, गर्जिनले ; पहाया, पहाया ; नीळकंठ झाले, नीळकंठ झाले ; स्वामी दृष्टी,स्वामी दृष्टी; गोपाळे,गोपाळे , अशी अक्षरांची पुनरुक्ती होणे हा अनुप्रासच. अधिक माहितीसाठी वि.वा.भिड्यांचे 'अर्थालंकारांचे निरूपण' हे पुस्तक पहा. २६३ पेजेसच्या या पुस्तकाचे २४ वे पेज(पान ११, परिच्छेद ४२). पुस्तक इथे आहे.--वाचक्नवी