फोर्थ डायमेन्शन - 3


प्रथम क्रमांकाचा निबंध

शाळा कॉलेजमधील निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्यांचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते. मुळात अभ्यासाचे एवढे मोठे ओझे असतानासुध्दा अशा पाठयबाहृ उपव्र।मामध्ये उत्साहाने भाग घेण्यासाठी एका वेगळयाच मानसिकतेची गरज असते. निबंध स्पर्धेत इतर स्पर्धेतल्याप्रमाणे ग्लॅमर नाही. वक्तृत्व, देशी -विदेशी खेळ, नाटक-एकांकिका, गायन - वादन इत्यादी प्रकारात सर्वासमोर मिरवता येते, भोवती मित्र-मैत्रिणींचा घोळका जमतो, कौतुक करतात. (शिव्या पण देतात.) इंप्रेशन मारण्याची संधी असते. परंतु निबंध स्पर्धा तुलनेने रुक्ष, बुध्दिमत्तेला आव्हान देणारी, पूर्व तयारीची अपेक्षा करणारी व केवळ निबंध परिक्षकाकडूनच पाठीवर थाप मिळवणारी असते. त्यामुळे टाळया वाजवण्यातच भाग घेणाऱ्यांना निबंधस्पर्धकांचा हेवा वाटतो. हे कसे काय जमते? असे उद्गार काढून निबंध हा प्रकार चटकन विसरला जातो. शाळा-कॉलेजच्या स्नेहसंमेलनात निबंधस्पर्धेकडे बिनखर्चिक, एक उरकून टाकण्याचा कार्यव्र।म, म्हणून बघितले जाते. अशाच एका शाळेतील निबंधस्पर्धेची ही एक छोटीशी गोष्ट आहे.
शाळेच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्वस्पर्धा, निबंधस्पर्धा, गायनस्पर्धा, विविध प्रकारच्या व्रगडास्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम त्या शाळेत होता. बहुतेक विद्यार्थी-विद्यार्थिनी कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धेत आवर्जून भाग घेत होते. निबंध स्पर्धेसाठी विषय होता: गोष्टींच्या पुस्तकातील मला आवडलेला हीरो किंवा आवडलेली हिरोइन. हॅरी पॉटर, सुपरमॅन, शक्तिमान, जेस्सी, फास्टर फेणे, चिंटू, बंडू असे अनेक अतिरथी-महारथी हीरो-हिरोइन्स असताना नववीत शिकत असलेल्या एका मुलीने मात्र फार वेगळया हिरोइनची निवड केली होती.
तिने लिहिलेला निबंध असा होता:
जी हिरोइन आपल्यातील उणिवा समजून घेऊन त्यावर मात करते, आपल्या मर्यादा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करते, स्वत:च्या गरजा ओळखून त्या मिळवण्यासाठी पुढाकार घेते, स्वत:ला काय हवे काय नको व त्याची कारणं कोणती यांचा विचार करू शकते, पुढचे पाऊल ठेवताना कुठल्या अडचणी येऊ शकतात याचे संपूर्ण भान ठेऊन पाऊल उचलते, आपले साध्य काय व त्यासाठी काय करायला हवे याची जाण असते, यश मिळाल्यानंतरही फुगून न जाता स्मित हास्याने पारितोषक स्विकारू शकते, अशी हिरोइन मला फार आवडते. व तिने निवडलेली हिरोइन दुसरी-तिसरी कुणी नसून ससा व कासव यांची शर्यत या गोष्टीतील कासव असून ही हिरोइन तिच्या सर्व निकषांची पूर्ती करते.
कासव व ससा यांची बरोबरी होऊ शकत नाही, तरीसुध्दा शर्यतीला होकार दिलेली चूक उमगून त्यावर मात करण्याचा प्रयत्न कासवाने केला. कासवाला सश्यासारखे पळता येणार नाही हे माहीत होते. परंतु न डगमगता, बेफिकिर न राहता, निरुत्साही न होता, सातत्याने आपले काम करत राहिल्यास यश नक्कीच मिळेल याची खात्री कासवाला होती. स्वत:ला शर्यत जिंकायचे आहे व त्यासाठी आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे याची पूर्ण जाणीव कासवाला होती. शर्यतीतील अडचणी समजून घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न कासव करत होता. वाटेत अडथळे होते, शर्यतीचा मार्ग चढ-उतारांचा होता, तरीसुध्दा आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करण्याची धडपड कासव करत होती. नाउमेद न होता साध्य गाठण्याच्या प्रयत्नात होती. शर्यत जिंकणे हे एकमेव लक्ष्य तिच्यापुढे होते. त्यासाठी तिने जिवाचे रान केले व शर्यत जिंकली. जिंकल्यानंतर नम्रतेने आपले यश स्वीकारले.
आपणही आपले आयुष्य जगताना कासवाच्या गतीनेच जात असतो. परंतु या गोष्टीतील कासवासारखी चिकाटी, लक्ष्य गाठण्यासाठी अडचणींवर मात करण्याची मानसिकता, सततचा प्रयत्न इत्यादी गुणविशेष विकसित केल्यास आयुष्याची विषम स्पर्धा जिंकणे कठिण वाटणार नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

वेगळीच ध्येयमूर्ती - पण खरीच तितकी वेगळी का?

मुलीने वेगळीच धेयमूर्ती निवडली. वेगवान सशाऐवजी कामसू कासवाची. हे स्तुत्य आहे. तरी -

खरे म्हणजे मुलीने चाचणीला चकवले, असे मला वाटते. येथे कासव ही कुठली अनुकरणीय व्यक्ती नसून एक अंगीकार करायची प्रवृत्ती आहे. नोकरीसाठी येणार्‍या अर्जांत कित्येकदा लोक आपण "एक लक्ष्यावर नजर ठेवणारे", "अडचणींनी न बधता काम करणारे" असल्याचे लोक सांगतात. खुद्द इसापाची (का कोणाची) ती सशा-कासवाची कथा अफाट लोकप्रिय आहे. त्यामुळे सैद्धांतिक पातळीवर (आणि नोकरीच्या अर्जांतही) ही प्रवृत्ती महत्त्वाची मानणारे खूप लोक असतात.

खरे तर बहुतेक कथा कादंबर्‍यांतल्या नायक-नायिका सामान्यतेच्या अयोग्य लोकापवादाखाली दडलेल्या असामान्य विभूती असतात. हॅरी पॉटर मावशी-मावशाच्या घरच्या नावडता, तिरस्कारलेला मुलगा; पण आतून असामान्य. सिंडरेला तशीच. सुपरमॅन दिवसातला बहुतेक वेळ भित्रट आणि बुजरा क्लार्क केंट म्हणून घालवतो. म्हणजे जात्याच सर्व प्रकारे परिपूर्ण असलेल्या नायकांपेक्षा, आजूबाजूच्यांकडून हिणावलेले तरी खरोखर विलक्षण नायक लोकांना "आपल्यासारखे" वाटण्याची कल्पना रम्य वाटते.

सिंडरेला ही कासवच नाही काय? तिच्या दुष्ट सावत्र बहिणी तुरुतुरू ऐट मिरवीत होत्या तशी ही मनाला प्रेमळ बनवत होती, आणि कस्स्टाची कामे करत होती. आणि शेवटी कासवासारखीच सिंडरेलाही शर्यत जिंकली.

- - -
(अवांतर : कथेच्या आधी लिहिलेला "वक्तृत्व, देशी -विदेशी खेळ, नाटक-एकांकिका, गायन विरुद्ध निबंध" परिच्छेद थोडासा असंबद्ध वाटला. दुसरे-तिसरे बक्षिस मिळणारे लोकही [सुपरमॅन, फास्टर फेणे वगैरे नायक मानणारे] निबंधच लिहीत होते. त्यामुळे
वक्तृत्व : निबंध :: सुपरमॅन : कासव
असा ओढूनताणून लावलेला संबंध मला पटत नाही.)

सिनर्जी

ससा आणि कासवाची गोष्ट आता जुनी झाली. ससा आणि कासव दोघांनी मिळून काम करण्याचे दिवस आले आहेत. ही नव्या युगातली गोष्ट अजून त्या मुलीला कोणी सांगितलेली दिसत नाही.

बोधकथा

१) शाळेतल्या मुलांसाठी आहे
२) ९ वीतल्या मुलीची आहे
या पार्श्वभुमिवर विचार केल्यास मुलीने वेगळेपण स्विकारले इतकेच.
प्रकाश घाटपांडे

कासव

जी हिरोइन आपल्यातील उणिवा समजून घेऊन त्यावर मात करते, आपल्या मर्यादा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करते, स्वत:च्या गरजा ओळखून त्या मिळवण्यासाठी पुढाकार घेते, स्वत:ला काय हवे काय नको व त्याची कारणं कोणती यांचा विचार करू शकते, पुढचे पाऊल ठेवताना कुठल्या अडचणी येऊ शकतात याचे संपूर्ण भान ठेऊन पाऊल उचलते, आपले साध्य काय व त्यासाठी काय करायला हवे याची जाण असते, यश मिळाल्यानंतरही फुगून न जाता स्मित हास्याने पारितोषक स्विकारू शकते, अशी हिरोइन मला फार आवडते. व तिने निवडलेली हिरोइन दुसरी-तिसरी कुणी नसून ससा व कासव यांची शर्यत या गोष्टीतील कासव असून ही हिरोइन तिच्या सर्व निकषांची पूर्ती करते.

कासवाच्या गोष्टीत कासवाने असं कधी केलं? कासव आपल्या वाटेने न थांबता चालत राहीलं आणि शर्यतीच्या अखेरपर्यंत पोहोचलं पण वर लिहिल्याप्रमाणे काही केल्याचं जाणवत नाही.

बायदवे, मूळ गोष्ट मिश्टर ससा आणि मिश कासव अशी होती का?

- राजीव.

 
^ वर