यमक

यमक
आज एका शब्दालंकाराची माहिती घेऊ,[ उपक्रम काही शाळा नाही की जेथे उपमे नंतर उत्प्रेक्षा यावयालाच पाहिजे.] खरे म्हणजे यमक हा अनिर्वार्य अलंकार नाही. संस्कृतमध्ये तर नाहीच नाही, पण मराटीत मात्र तो पहिल्यापासून लोकप्रिय [की कवीप्रिय म्हणू ? ] आहे, अट्टाहासाने निर्यमकी कवितेला सुरवात करे पर्यंत यमक नाही म्हणजे कवीची शब्दसंपत्ती अथवा प्रतिभा कमी दर्जाची आहे अशीच समजूत होत असे. मला वाटते या बाळबोध समजुतेचे कारण बालवयात, शाळेत जाण्याच्या आधीच, कानावर पडणारी कविता.
येरे येरे पावसा तुला देतो पैसा किंवा येग येग सरी माझे मडके भरी, अथवा त्या आधीची अडगुळ, मडगुळ, सोन्याच कडबुळ, ही गाणीच कानावर पडत आल्याने, यमक हा कवितेचा अविभाज्य घटक असे वाटू लागले तर नवल नव्हे. सुरवातीच्या काव्यामध्ये, उदा. ओवीमध्ये, यमक हा अंगीभूत भाग होता. ओढाताण जवळ जवळ नव्हतीच. पंत काव्यात मात्र तो कवीच्या पांडित्याचा भागच होऊ लागला. पण ते पुढे.
यमक म्हणजे काय ?एकाहून जास्त अक्षरांची त्याच क्रमाने परंतु भिन्न अर्थांनी आवृत्ती झाली म्हणजे यमक अलंकार होतो.[ या अर्थी वरील बालगाण्य़ातील उदाहरणे यमक नव्हेत.] गझलांमध्ये यमक असावेच लागते. त्यामुळेच मराठी कवींना गझल सहजसाध्य वाटत असावी.म्हणे की उर्दु नंतर सर्वात जास्त गझला मराठीतच होतात. शक्य आहे. वाचकांना कोण विचारतो म्हणा ! अस्तु. यमक म्हणजे नक्की काय ते सांगितल्यानंतर त्याचे प्रकार पाहू.
मुख्य प्रकार तीन. [१] पादवृत्ति,[२] पादभागवृत्त्ति, [३] आवृत्ति.

१. पादवृत्ति यमक
एका पादातील सर्वच अक्षरे त्याच क्रमाने पण भिन्न अर्थांनी दुसऱ्या पादात आवृत्त झाल्यास पादवृत्ति यमक होते. याचे ११ पोटभेद. हे पोटभेद पहिल्या पादाची अक्षरे दुसऱ्या/तिसऱ्या/चौथ्या पादात आवृत्त झाल्यास, दुसऱ्याची तिसऱ्या/ चौथ्या पादात झाल्यास, असल्या गणिती पद्धतीवर बसवलेले आहेत. त्यांची नावे.... काय करावयाची आहेत ? आपण थोडीच परिक्षा देणार आहोत ! काही उदाहरणे बघा. जेथे यमक आहे तेथे अधोरेखित केले आहे.

हार विलासवतीनें
केला हा लक्ष्मणप्रसूनें,कीं,
हारविला सवतीनें
,. क्षितिनें,पुजिला सुरप्रसूनें कीं.

महाभारत, ..मोरोपंत
आता पंचाईत अशी की, यमकाची भारदस्त उदाहरणे द्यावयाचे म्हटले की या पंडित काव्याचा अर्थही दिला पाहिजे. विषय आहे युद्धानंतरच्या गांधारी विलापाचा. दुर्योधनाचे प्रेत पाहून ती म्हणते,
" लक्ष्मणाच्या विलासवती मुलीने, म्हणजे दुर्योधनाच्या बायकोने, आपल्या विलासासाठी केलेला हा हार[दुर्योधन]तीच्या सवतीने, पृथ्वीने,हारवला ; स्वर्गातील फ़ुलांनी त्याची पुजा केली. "
पाया नमी दे वंश सारा,
पा या न मी दे इनवंशसारा
न या वयामाजि भला जना दे,
न यावया मा जिभ लाज ना दे.
आनंदतनय
रामाला मागावयाला आलेल्या विश्वामित्राला दशरथ म्हणतो, " पायाला नमस्कार करतो, सारे कुटुंब देतो, पण या सूर्यवंशतिलकाला देत नाही. या वयामध्ये इतरांना कोण आपला मुलगा देईल ? नाही म्हणावयाला जिभेला लाज वाटत नाही.

२. पादभागवृत्ति यमक
एका पादातील सर्वच अक्षरे आवृत्त न होता सुरवातीची वा अखेरची काही अक्षरे दुसऱ्या पादात आवृत्त झाल्यास पादभागवृत्ति यमक होते.[ओळीचा थोडासा भाग]

अयि गोदे ! त्वत्प्रसाद व्हाया यत्न असे मम हा सगळा.
विशंक गातो, गोड नसेना, सद्गद आहे यास गळा [यास---मला, कवीला]
प्रगटुनि येथे मूर्तिमती तूं देशिल दर्शनलाभ जना
तोवरी माते ! करीत राहिन एकलयाने तव भजना !
भजनातहि मज बालवयींच्या सहजचि होतिल आठवणी.
हृदय विदारूनि दावूं कुणाला सुखासुखाच्या सांठवणी ?
गोदागौरव --- चंद्रशेखर

मुखीं हरि ! वसो तुझी कुशलधाम नामावली
क्षणात पुरवील जो सकल कामना मावली .
कृपा करिसि तूं जग़त्त्रयनिवास ! दासांवरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजना सदा सांवरी.
केकावली- मोरोपंत
सेवुन संतत पाला
संत तपाला यदर्थ करतात,
तो प्रिय या स्तवना कीं
य़ास्तव नाकीं हि तेंच वरितात. [नाकीं --- स्वर्गात]
मोरोपंत
३. आवृत्ति यमक
एखाद्या चरणातील अक्षरे त्याच क्रमाने पण भिन्न अर्थाने त्याच चरणात आवृत्त झाली असतील तर आवृत्ति यमक होते.
फ़िरविते रविते दधिभीतरी,
मिरविते रवितेज नगांवरी,
स्वकरिं ते करि चंचलता, मनीं
उपरमे परमेश्वर गायनीं .
उखळबंधन-- वामन

लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
१. यमकात व्यंजनाप्रमाणे स्वरही तेच पाहिजेत. स्वर भिन्न असल्यास प्रास होतो, यमक नाही.
२. आवृत्त अक्षरे कमित कमेरे दोन पाहिजेत. मराठीत अंत्य यमकात शेवटचे एक अक्षर आवृत्त झाले तर चालते.किमान आधीचा स्वर एक असावा.
३. यमकात आवृत्त अक्षरांचा अर्थ भिन्न असला पाहिजे.
४. यमकाकरिता ल् व र् , ब् व व् , स् व ष् , न् व ण् ही व्यंजने अभिन्न मानली जातात.विसर्ग व अनुस्वार यांची आवृत्ति झाली नाही तरे चालते
परत एकदा विनवणी . उदाहरणे द्या.
शरद
वर्डपॅडवरून प्रत चिकटवतांना अधोरेखिते गेली हो ! कृपा करून स्वत : शोधा. तेवढ्यात शिकून घेईन म्हणतो.
शरद

Comments

यमक

शाळेत शिकवलेले यमकाचे एक उदाहरण (अंशतः) लक्षात आहे

बाई मी उगवताच रविला
काहीतरी काहीतरी चरवीला
आत गे फिरविताच रविला
सार काढुनी हरी चरविला
यातले रवी, चरवी , रवी आणि चरविणे हे अर्थ स्पष्ट आहेत.
सन्जोप राव

यमक

शरदराव, लेखाबद्दल प्रथम आपले आभार !
यमक माहित होते पण.. पादवृत्ति,पादभागवृत्त्ति, आवृत्ति. हे काही वाचलेले नाही राव ! :(
पुष्पयमक, दामयमक, हे माहित आहे. जरा अधिक स्पष्ट करुन सांगितले तर समजण्यास मदत होईल.

यमकांच्या प्रकारांसाठी व्याकरणाचे कोणते पुस्तक शोधावे / अभ्यासावे कृपया तेही सांगा !

यमकाच्या उदाहरणासाठी बालकवींच्या 'प्रेमाचें गाणें' तील काही ओळी टंकतो.

'प्रेमावाचुनि सर्व सुने;
जग भासे बापुडवाणे;
मोठ्या उल्हासे म्हणूनी
प्रेमाची रचितों गाणी

आकाशी ते
जगी विलसते
दिशांत हसते
विश्व वेष्टीले प्रेमाने
प्रेमावाचुनि सर्व सुने

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत

ट ला ट जोडणे म्हणजे यमक एवढीच माहिती असलेल्या माझ्यासारख्याला ही माहिती नवी आणि उपयुक्त आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा!

आमचे यमक म्हणजे "'प्राची' ला 'गच्ची'" असते. :-)
लेखामुळे बरेच काहि नवे कळले.. धन्यु!
अजुन येऊ द्या

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

दाम यमक आणि पुष्प यमक

बिरुटे सरांनी विचारलेली माहिती माझ्याकडे नव्हती. श्री. वाचक्नवी यांनी ती पुरवली.धन्यवाद.
दाम म्हणजे दावे, कासरा, माळ. त्यांच्यात ज्याप्रमाणे एक पदर संपला की दुसरा सुरू होतो त्याप्रमाणे, म्हणजे एका चरणाचा अंत्य व दुसर्‍या चरणाचा आरंभ यांतील यमक.
श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया।
मा राया जनकाची-होय सुता त्रिजगदाधि साराया सारा या प्रभुची हे-लीला गाती सदैवही सु-कवी ।
सुकवी; भव-जलि-निधितें, निरुपमसुख रसिक-जन-मनीं-पिकवी ॥॥(मोरोपंत)
पुष्पयमक(फुलाच्या पाकळ्याप्रमाणे एकेका चरणात यतीचे ठिकाणी अनेक वेळा येणारे यमक):
सुसंगति सदा घडो, सुजन-वाक्य कानीं पडो, । कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो, ॥
सदंघ्रिं-कमळीं दडो, मुरडितां हटानें अडो, । वियोग घडतां रडो, मन भवच्चरित्रीं जडो ॥ _मोरोपंत
अधिक माहितीसाठी वि.वा भिड्यांचे अर्थालंकार या २६३ पानी पुस्तकाच्या संगणकीय पान 25 of 263 पासून पुढे, म्हणजे छापील पृष्ठ १२ पासून परिच्छेद ४३ ते ४९ इथे पहा.--वाचक्‍नवी
शरद

गणपतीच्या आरतीतली पुष्पयमके का?

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
...
लंबोदर पीतांबर...
सरळसुंड वक्रतुंड...

आरतीतली पहिली दोन पुष्पयमके, बाकी नाहीत.

पुष्पयमकासाठी, यमक यतीच्या जागी हवे. १७ अक्षरी पृथ्वी वृत्तात यति ८व्या आणि नंतर नवव्या अक्षरानंतर असतो. म्हणून,

सुसंगति सदा घडो(यति) सुजन-वाक्य कानी पडो(यति)
कलंक मतिचा झडो(यति) विषय सर्वथा नावडो(यति)
सदंघ्रिं-कमळीं दडो(यति) मुरडिटा हटानें अडो(यति)
वियोग घडतां रडो(यति)मन भवच्चरित्रीं जडो(यति).

आरतीमध्ये... सुखकर्ता(यति) दुखहर्ता(यति) वार्ता(यति नाही) विघ्नाची
नुरवी(यति नाही) पुरवी(यति नाही) प्रेम....--वाचक्‍नवी

मराठीत नाही पण

संस्कृतात माहीत आहे एक पादावृत्ती यमक. मराठी कवितेचा माझा व्यासंग नगण्य असल्यामुळे हे देत आहे :
नतं नयति कैलासं नगं गानसरस्वती ।
न तं नयति कैलासं न गंगा न सरस्वती ॥

(ज्या प्रमाणे) गायन-सरस्वती विनत माणसाला कैलास पर्वतापाशी नेते, त्याला कैलासापाशी गंगा नाही नेत, सरस्वती नाही नेत.

मला वाटते अशा पूर्ण पादावृत्ती यमकात कृत्रिमपणा फार असतो.

या प्रकाराला समुद्रकयमक..

मराठीत या प्रकारच्या यमकाला समुद्रकयमक म्हणतात. पहा:-
अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा ।
अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा ॥
(मोरोपन्त)
किंवा, दोन ओळींचे युग्मकयमक. उदा.
पायां नमीं देइन वंश सारा । पा या न मी दे इनवंशसारा ॥ [दशरथ विश्वामित्राला म्हणतो, " एकवेळ मी पायां पडून नमस्कार करीन; सारा वंश देईन, पण मी या सूर्यकुलभूषण रामाला (तुझ्या) यज्ञरक्षणासाठी(पा या)देणार नाही."](इन=सूर्य).--वाचक्‍नवी

 
^ वर