भावनिक ठेव (इमोशनल बँक अकाउंट)

नेहमी रागावणारा माणूस रागावला तर त्याच्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. बर्‍याच वेळा उशीरा येणारा कर्मचारी वरिष्ठांची बोलणी खातो. पण नेहमी शांत असणारा माणूस एखादे वेळेस रागावला तर त्याला रागवायला खरच काहीतरी कारण असले पाहिजे असा विचार इतर करतात. कधी उशीरा न येणारा कर्मचारी क्वचित एखाद्या दिवशी उशीरा आला तर काहीतरी खरोखरच अडचण असली पाहिजे नाहीतर तो उशीरा येणारा नाही असे त्याचे वरिष्ठ त्याच्या बाजूने विचार करतात.
हा फरक का पडतो ते समजण्यासाठी आपण बँकेच्या खात्याचे उदाहरण घेऊ. बँकेत आपल्या खात्यावर आपण पैसे जमा केलेले असले तरच ते आपल्याला अडचणीच्या वेळेस काढता येतात. जिव्हाळा, विश्वास या भावनांचेही असेच आहे. जर आपण आपल्या वागणुकीने या भावना दुसर्‍याच्या मनाच्या बँकेत जमा केल्या असतील तर एखाद्या प्रसंगी आपण घसरलो तरी दुसरा आपल्याला समजून घेतो. या ठिकाणी त्याच्याकडे आपल्यासाठी जमा असलेल्या भावना तो खर्च करतो. हे म्हणजे खात्यातून रक्कम काढण्यासारखे आहे.
एखाद्या संबंधांतून फार अपेक्षा ठेवल्याने आपण दुसर्‍याला जमेपेक्षा ज्यास्त भावना खर्चायला लावतो. मग आपल्याशी संबंध त्याच्यासाठी ओझे होऊन बसते. म्हणून कुठल्याही नात्यातून काही अपेक्षा करतांना त्या नात्याला आपण किती दिले आहे म्हणजे आपली त्या नात्यातील भावनिक ठेव किती आहे याचा प्रथम विचार करायला पाहिजे व त्यातून आवश्यक तेवढेच काढून घ्यायला हवे.
आपल्या मुलांना काही समजावून सांगताना त्यांच्या मनाच्या बँकेत आपली भावनिक ठेव किती शिल्लक आहे ते प्रथम पाहिले पाहिजे. ही शिल्लक मुलांची बाजू शांतपणे ऐकून घेतल्याने व त्यावर त्यांच्याशी मोकळ्या मनाने विचारविनिमय केल्याने वाढते. मग मुले फक्त तुम्ही सांगितले तेवढेच करत नाहीत तर त्याहीपेक्षा काहीतरी अधिक चांगले करतात.
मैत्री, कार्यालयीन संबंध या नात्यांमधेही भावनांचा जमा-खर्च-शिल्लक हा समतोल राखणे गरजेचे आहे. ओव्हरड्राफ्ट करू नये.
आत्यतिक विश्वासाच्या, मैत्रीच्या नात्यात खर्चापेक्षा शिल्लक बरीच ज्यास्त असते. इतकी की माणसे भावनिक ठेवीदारासाठी काहीही करायला तयार होतात. तानाजी मालुसरेचे "आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे" हे उद्गार त्याचेच द्योतक आहे.
(वरील लेख एका पुस्तकातील इमोशनल बँक अकाउंट या कल्पनेवर आधारित आहे. पण त्याचा निश्चित संदर्भ सापडत नसल्याने देता येत नाही. त्याबद्दल क्षमस्व. कुणाला माहीत असल्यास जरूर सांगावा.)

Comments

चांगला लेख आवडला

प्रेम, जिव्हाळा, विश्वास, सहकार्‍याच्या मनाच्या बँकेत जमा करायचे आणि त्याचा थोडा-थोडा उपयोग घेत राहावे ही चांगलीच कल्पना. पण..आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे यात आम्हाला कर्तव्य श्रेष्ठ हा विचार कळतो. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांचे असे मत आहे की, भीती, क्रोध, आणि प्रेम या भावना व्यक्तीत जन्मतःच असतात. पण कोणत्या आकस्मिक घटनांमुळे भावनांचे उद्दीपन होते, त्याला असे का करावे वाटते, त्याबद्दल जरा लेखात काही आले असते तर लेखाला जरा वजन आले असते असे वाटले.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!

संदर्भ सापडला

लेखाचा संदर्भ: "इमोशनल बँक अकाउंट" पान १८८, सेवन् हॅबिट्स् ऑफ् हायली इफेक्टिव् पीपल्, लेखक - स्टीफन् कोव्हे

उत्तम् लेख

उत्तम लेख. आवडला.

असेच...

म्हणतो...
दुसरर्‍या बाजूही काही सदस्यांनी उलगडल्या आहेत. मात्र ते तितकेसे पटले नाही.:-(

सौरभ.

==================

उपयोग

बहुतेक माणसांना इतरांच्या वागण्यामध्ये काही सामायिक गोष्टी (पॅटर्न्स) शोधण्याची आणि त्यानुसार त्यांची वर्गवारी (क्लासिफिकेशन) करण्याची सवय असते. तसे करणे त्यांच्याशी आपल्या वागण्या-बोलण्याची पद्धत ठरवताना सोयीचे पडते. त्यामुळे तुम्ही सांगितलेले ठेवींचे तत्त्व बहुतेक ठिकाणी लागू होईल, त्यामुळे हे बरेच उपयोगी आहे असे वाटते.

पण हा विचार सर्वसमावेशक नाही असे वाटते. म्हणजे माणसांच्या काही विशिष्ट वर्तनाचे/प्रतिक्रियांचे स्पष्टीकरण/कारण देण्यासाठी हे तत्त्व उपयोगास येईल पण सर्व प्रकारच्या वर्तनाचे/प्रतिक्रियांचे स्पष्टीकरण देण्यासाठी हे उपयोगाचे नाही. उदा. तानाजीच्या उदाहरणात केवळ भावनिक ठेव (शिवाजीविषयी आदर/प्रेम) हेच कारण होते असे नाही तर इतर जसे कर्तव्यबुद्धी,राष्ट्रप्रेम इ. भावना कारणीभूत होत्या.

अवांतर - अधिक खोलवर गेल्यास अश्या विचारातून एखाद्या व्यक्तिविषयी पूर्वग्रह बनवण्याकडे कल जाईल वाटते. याचा उपयोग तारतम्याने केलेला चांगला.

संबंधांतून फार अपेक्षा

एखाद्या संबंधांतून अपेक्षा ठेवणे हे रास्त आहे. किंबहुना, अपेक्षा ठेवून संबंध निर्माण झाले नाहीत तरीही संबंध निर्माण झाल्यावर अपेक्षा निर्माण होतातच. परंतु, कोणत्याही नात्यात संबंध हे दोन्हीकडून सारखे ठेवणे गरजेचे असते. "वन वे ट्रॅफिक" सुरू झाले की संबंध तुटू लाततात.

नवीन म्हणतात त्या प्रमाणे -

बहुतेक माणसांना इतरांच्या वागण्यामध्ये काही सामायिक गोष्टी (पॅटर्न्स) शोधण्याची आणि त्यानुसार त्यांची वर्गवारी (क्लासिफिकेशन) करण्याची सवय असते.

याचबरोबर फार अपेक्षा ठेवल्याने माणूस आपल्या संबंधीतांनी आपल्याला सतत समजूनच घेतले पाहिजे अशी आशा ठेवू लागतो. हे करताना मी कसाही वागलो तरी माझ्या आप्तांनी मात्र माझ्याशी चांगले वागावे अशी इच्छा ठेवून असतो. अनेकदा मुलांच्या बाबतीत हेच होते. आई-वडिल आपल्याशी समजून वागतात त्यामु़ळे त्यांनी तसे वागणे हे त्यांचे कर्तव्य आहे असा त्यांचा समज होऊ लागतो. मग, केवळ एकदा फटकावल्याने किंवा फटकारल्याने टोकाची भूमिका घेणारी माणसे दिसून येतात.

मला वाटते, नात्यांमध्ये एकास एक असा काही नियम नसतो. बरेचदा, लोक अनेक चांगल्या, आवडत्या किंवा पॉझिटिव गोष्टी विसरून एखादी निगेटिव्ह किंवा नावडती गोष्ट मनात धरून ठेवतात. त्यामुळे बँकेत कितीही ठेव गोळा केली तरी ती वेळप्रसंगी कामास येईलच असे नाही.

अर्थातच, लेख ज्या उद्देशाने लिहिला आहे तो उद्देश चांगला असून त्यावर अंमल करणे योग्यच आहे.

उपकार आणि परतफेड

बहुतेक वेळी देणार्‍याचा हात वर असतो आणि दीर्घ काळ तो वरच राहतो, त्यामुळे घेणारा कधीच त्याची परतफेड त्यालाच करू शकत नाही. पण आपल्याकडे असलेली ही भावनिक ठेव तो दुसर्‍या गरजू माणसाला मदत करून त्याच्या सुपूर्द करू शकतो. दुसरा तिसर्‍याला, तिसरा चौथ्याला अशी ही साखळी चालत राहिली तर ज्या वेळी पहिल्याला गरज पडेल तेंव्हा त्याला एक दाता मिळतो. असे आमच्या लहानपणी आम्हाला सांगितले जात असे.

 
^ वर