फोर्थ डायमेन्शन २


माणसं, इथून तिथून सारखेच...

..

एक काळ असा होता की प्रत्येक अमेरिकन माणसाला रशियातील लोक म्हणजे अत्यंत अडाणी, भावनाशून्य, क्रुर, उलटया काळजाचे, मद्दड, मूर्ख.... आपल्याहून फार वेगळे, .... असेच वाटत होते. जगात घडलेल्या, घडणाऱ्या सर्व वाईट गोष्टींना रशियनच जवाबदार आहेत असे वाटत होते. घरात माशी शिंकली, किंवा मूल मुतले तरी त्यात रशियाचा हात दिसायचा. ही विधानं चुकीचे असू शकतील असे कधीच कुणाला वाटत नव्हते. झपाटलेल्या भुतासारखे रशियन भूत त्यांच्या मानगुटीवर सतत बसलेले होते.
आपल्याही देशात पाकिस्तानातील (किंवा भारतातील!) मुस्लिम लोकाबद्दलसुध्दा अशीच भाषा वापरली जाते. आपल्या येथील अत्यंत सामान्य माणसालासुध्दा पाकिस्तानमधील प्रत्येक पाकी अत्यंत व्रू।र, निर्दयी, दुष्ट, हिंस, मूर्ख असाच वाटतो. कारण अगदी लहानपणापासूनच विद्वेशाची बीजे पेरलेली असतात. स्वत:चा कमकुवतपणा ववा दुबळेपणा लपविण्यासाठी ते अशाच एखाद्या लक्ष्याच्या शोधात असतात. कॉल हिम डॉग ऍंड शूट .... ही प्रवृत्ती बळावलेली असते. यातूनच मिथके तयार होतात. मोठी माणसं खुजी वाटू लागतात. अफवा पसरतात. छोटीशी घटना फुगवून सांगतात. प्रसार माध्यमं या आगीत तेल ओतत असतात. आपणही निर्बुध्दपणे या गोष्टींचा स्वीकार करू लागतो. मग मात्र आपलीच आपल्याला लाज वाटू लागते.
देशाच्या सीमेच्या पलिकडे घडत असलेल्या सर्व घटनांना बातमीमूल्य असतेच असे नाही. त्यामुळे पहिल्या पानावर जाड मथळयाखाली दिलेल्या तिथल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचतही नाहीत.पोचल्यातरी फार त्रोटकपणे, कुठल्यातरी किरकोळ बातमीच्याआड छापल्या जातात. अशीच एक बातमी अब्दुल कादिर या तरुणाची आहे. ती त्रोटक बातमीसुध्दा मन हेलावून टाकणारी आहे. अब्दुल कादिर कोण आहे, कुठला आहे याबद्दल त्या बातमीत विशेष माहिती नसली तरी जे काही त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तेवढेच सांगण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.
अब्दुल कादिर हा पाकिस्तानी सैन्यातील हवालदार दर्जाचा एक सामान्य सैनिक. वय वर्षे सुमारे 25-26. संयुक्त राष्ट्र संघाच्या निमंत्रणावरून पाकिस्तानी सैन्य आफ्रिकेतील अंगोला येथे दाखल झालेली असते. अब्दुल कादिरसुध्दा सैन्याबरोबर तेथे गेलेला असतो. कादिरची बायको हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून त्याला एकदा भेटायला आलेली असते. कदाचित आफ्रिकेतील घनदाट जंगलातील मोडक्या तोडक्या झोपडीवजा क्वार्टर्समध्ये ते दोघे पुनर्मिलनाचे, सुखदुखाचे अनुभव घेत असावेत. त्याच क्षणासाठी एवढया लांबून ती तेथे आलेली असते.
अचानकपणे एके दिवशी दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या लोकांची फौज काळया लोकांना ठार मारण्यासाठी जोरदार हल्ला करू लागते. गोळयांचा वर्षाव होतो. काळयांच्या रक्षणासाठी असलेल्या पाकिस्तानी सैनिकाफ्की 8-10 सैनिक मरतात. इतर सैनिक पळून जातात. फक्त अब्दुल इजा झालेली नसतानासुध्दा पळून जात नाही. गोरे सैनिक त्याला पकडून जेलमध्ये टाकतात. सेनेच्या अधिकृत वृत्तानुसार गोळीबारामध्ये अब्दुल कादिरच्या बायकोला गोळी लागते व ती मरते. अब्दुल कादिर बायकोचा मृत शरीर सोडून जीव वाचविण्यासाठी पळून जाण्यास तयार होत नाही. हे वृत्त पुन: पुन: सादर करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या निवेदिकेलासुध्दा आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपविता आले नाहीत.
पळून जाण्याची संधी असतानासुध्दा पत्नीच्या मृत शरीराला कवटाळून रडणाऱ्या अब्दुल कादिरचे वागणे सर्वांना बुचकळयात टाकणारे होते. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तो पळून का गेला नाही?बायकोच्या थंड निर्जीव शरीराजवळ का थांबला? कदाचित तिच्यावर मन:पूर्वक प्रेम करत असेल? शेवटच्या दर्शनासाठी अधिर झालेला असेल? धाय मोकलून रडावेसे वाटले असेल? मुला-बाळांचा विचार डोक्यात आला असेल? युध्दाची निष्फळता लक्षात आली असेल? नशीबाच्या अन्याय वर्तनावर चिडला असेल? स्वत:चे काय होणार याचे भानही नसेल. काहीही होऊ शकते. आपल्याला कळायला मार्ग नाही. पण आपण अंदाज करू शकतो. फक्त अंदाज. अब्दुल कादिरची कृतीच या प्रश्नांना उत्तर देवू शकेल.
दक्षिण आफ्रिकेच्या तुरुंगात कादिर खितपत पडला आहे. पाकिस्तानचा म्हणून नव्हे, मुस्लिम म्हणून नव्हे, काळा म्हणून नव्हे, सैनिक किंवा शत्रू म्हणून .... किंवा याफ्की कुणीही नव्हे. आता तो एक हाडा-मासाचा संवेदनशील माणूस. स्वत:च्या पत्नीवर नि:सीम प्रेम करणारा तरुण.
अब्दुल कादिर, तू काय आहेस, कुठे आहेस, यापेक्षा तू जे काही करू शकलास त्याने मन भरून येते. त्याला भाषा नाही. देश नाही. धर्म नाही. वंश नाही. काळाचे बंधन नाही. परिस्थितीच्या सीमा नाहीत. केवळ प्रेम, उत्कट प्रेम, मृत्युलाही न घाबरणारे प्रेम!
पाकिस्तानमधील लोक म्हणजे अत्यंत क्रुर, निर्दयी, दुष्ट, हिंस, मूर्ख, उलटया काळजाचे......
आपल्याहून फार वेगळे.......
खरोखरच ते वेगळे आहेत का?

लेखनविषय: दुवे:

Comments

माणसाचे माणसाशी वर्तन

सर्वप्रथम, पाकिस्तानी असला तरी तो आपल्यासारखाच माणूस आहे हा विचार बर्‍याच भारतीयांच्या मनात नसतो असे मला वाटत नाही. किंवा, सर्वच पाकिस्तानी वाईट असा विचार सर्वसामान्य भारतीयाच्या मनात रुजला असल्यास हिंदु दहशतवादी मोठ्याप्रमाणावर तयार झाले आहेत असे दिसत नाही.

परंतु, माणसाचे आपल्या आप्तांशी वर्तन प्रेमाचे किंवा जिव्हाळ्याचे असणे स्वाभावीक आहे. जे अब्दुल कादिरच्या वागण्यातून दिसून आले. त्याच्या ऐवजी एखादा आफ्रिकन, युरोपीयन किंवा आशियाई असता तरी त्याने हेच वर्तन केले असते असे म्हणण्यास जागा आहे. त्यामुळे सदर वर्तन हे एखाद्या पाकिस्तान्याचा मोठेपणा ठरू शकत नाही.

उलट परिस्थितीत, म्हणजे अब्दुल कादिर आणि त्याच्या फौजेने असाच शत्रुपक्षावर हल्ला केला असता आणि एखाद्या सैनिकाची बायका मुले त्याला सापडली असती किंवा एखादा सैनिक आपल्या मृत बायका-मुलांबरोबर दिसता तर अब्दुल कादिरचे वर्तन कसे राहते हे पाहणे आवश्यक आहे कारण यालाच माणुसकी म्हणतात.

मेलेल्या जोडिदारामुळे प्राणीही अगतिक बनल्याची उदाहरणे देता येतील.

संबंध समजला नाही

सर्वप्रथम ही बातमी अजून कुठे आली असल्यास अवश्य दुवा द्यावा.

माणसे इथून तिथून सारखीच म्हणताना एखादी व्यक्ती स्वतःच्या जीवलग पत्नीच्या मृतदेहापासून दुर्‍ जाऊ शकत नाही आणि त्यामुळे अडकतो त्याचा आणि आपण म्हणत असलेल्या आणि आपल्याला वाटत असलेल्या भारतीयांच्या पाकीस्तानद्वेषाचा नक्की काय संबंध ते समजले नाही.

वरील प्रियालीच्या उत्तराशी सहमत.

आपल्या लेखातील खटकलेली गोष्ट म्हणजे जणू काही सर्व पाकीस्तानचा द्वेषच करतात. आणि पाकीस्तानी जणू काही भारतीयांवर प्रेमाचा वर्षाव करतात...

अब्दुल कादीर स्वतःच्या मृत पत्नीजवळून जाउ न शकल्याने समजा साऊथ अफ्रिकेत अडकला असला म्हणून आपल्याला वाईट वाटते... मला सांगा आज किती भारतीय पाकिस्तानात अडकलेत आणि कुठल्या अवस्थेत आहेत ह्याबद्दल आपण कधी विचार केला आहे का आणि आपले मत काय ते समजून घेयला आवडेल. त्यात फक्त सैनीक नसून सामान्यपण अडकलेत हे माहीत असेलच. कार्गिलमधे भारतीय सैनिकांना हालहाल करून कसे मारले याची माहीती आपल्याला असल्यास त्याबद्दल नक्की काय वाटले? ते काय तिथे हिंदू म्हणून लढत होते? त्यांचे काय त्यांच्या बायकापोरांवर प्रेम नव्हते? कार्गिलच्या वेळेस जे पाकीस्तानी सैनीक भारतात लढताना मेले त्यांनापाकीस्तानी सरकार परत साधे त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी परत घेयला तयार नव्हते त्याबद्द्ल काय मत आहे?

>>>पाकिस्तानमधील लोक म्हणजे अत्यंत क्रुर, निर्दयी, दुष्ट, हिंस, मूर्ख, उलटया काळजाचे......आपल्याहून फार वेगळे......खरोखरच ते वेगळे आहेत का?

आपल्याला काय वाटते? काश्मिरमधे सामान्यांना झालेली मारहाण, पसरवलेली दहशत, संसदेवरील बाँब हल्ले, कार्गिल, मुंबईतील हल्ले, अक्षरधाम वरील हल्ले हे सर्व सीमेच्या दुसर्‍याबाजूने झालेत ही वस्तुस्थिती आहे. त्याबद्द्ल नक्की काय वाटते ते समजले तर बरे होईल. ते कुठले डायमेन्शन, पाचवे का? आज जी काह् पाकीस्तानची अवस्था आहे ती पाहता किमान पक्षी दोन देशात तरी प्रचंड फरक दिसतो ही वस्तुस्थिती आहे. स्वात प्रांतात तालीबान येऊन थडकले आहेतच आता इस्लामाबाद दुर आहे असे वाटत नाही. त्यामुळे त्यांचा द्वेष न करता पण एक "डेंजर झोन" म्हणूनच त्यांच्या कडे बघणे या शिवाय काही पर्याय नाही असे नक्की वाटते.

माणूस नावाचा प्राणी | द्वेषाची बीजे

धर्म, नागरिकत्व आणि इतर पुटे निघाली की आत असतो माणूस नावाचा प्राणी.

तुमचा आणखी एक मुद्दा पटला - द्वेषाची भावना जर सरकारी आणि इतर यंत्रणांमधून पसरवली जात असेल तर त्याचा परिणाम अनेक लोकांची मानसिकता बदलण्यात होतो. अमेरिका-रशिया, भारत-पाकिस्तान ही त्याची उदाहरणे होत.

पण मला असे वाटते की भारतीयांच्या मनात ही द्वेषभावना इतकी नाही जितकी पाकिस्तानी लोकांच्या मनात आहे. गुलाम अली पासून अदनान सामी पर्यंत किंवा इम्रान खान पासून अक्रम पर्यंत अनेक पाकिस्तानी लोकांना भारतीयांनी फक्त पाकिस्तानी म्हणून न पाहता एक माणूस/कलाकार/खेळाडू म्हणून पाहिले. सीमेपलीकडे तसे आहे असे वाटत नाही.

आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तान विरुद्ध जनमत तीव्र राहणे ही भारतीय राजकारण्यांची/सरकारी यंत्रणेची 'गरज' कधीही नव्हती. भारतात इतर अनेक महत्त्वपूर्ण विषय चर्चेत आणि प्रचारात असतात. याउलट पाकिस्तानातील सरकारांना आणि महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी सैन्याला भारतविरोध किंवा भारताची भीती हा इतर त्रासदायक विषय दाबण्याचा सोयीस्कर मार्ग वाटतो.

अवांतर - पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरील चर्चा कार्यक्रमात अजूनही लोकांना "भारताने पाकिस्तानचे अस्तित्व मान्य केले पाहिजे" असे म्हणताना ऐकून आश्चर्य वाटले. म्हणजे भारताने पाकिस्तानचे अस्तित्वच अजून मान्य केले नाही अशी त्यांची समजूत आहे की काय?

याबद्दल

पाकिस्तानबद्दल, काश्मीर प्रश्न, लष्कर, आणि अफगाणिस्तान, आणि भारतियांच्या सध्याच्या विचारांबद्दल एका अमेरिकन वार्ताहराचे मत ऐका : एनपीआर रेडिओचा हा एक दुवा ऐका, (आजच ऐकले - मुलाखत मोठी आहे, पण ऐकण्यासारखी आहे.)
एनपीआरचा दुवा

हं

सीमेपलीकडे तसे आहे असे वाटत नाही.

हेच दोन्हि कडील लोकांना वाटत रहावे अशीच रचना आहे.. जर तुम्हाला असे वाटले/जाणवले की तुमच्यासारखे विचार करणारे तिथेहि बरेच जण आहेत तर तुमचा दृष्टीकोन बदलणार नाहि का? आणि तेच तर दोन्हिकडील नेत्यांना नको आहे.

भीती-द्वेष नसला तर भक्ती-पोकळ देशप्रेम वगैरे वाटणार तरी कसे?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

धोका

.पण मला असे वाटते की भारतीयांच्या मनात ही द्वेषभावना इतकी नाही जितकी पाकिस्तानी लोकांच्या मनात आहे.
२.गुलाम अली पासून अदनान सामी पर्यंत किंवा इम्रान खान पासून अक्रम पर्यंत अनेक पाकिस्तानी लोकांना भारतीयांनी फक्त पाकिस्तानी म्हणून न पाहता एक माणूस/कलाकार/खेळाडू म्हणून पाहिले.
३.सीमेपलीकडे तसे आहे असे वाटत नाही.

मुद्दा क्र.२ शी सहमत. त्यांना तसे न पाहणारे लोकसुद्धा संख्येने कमी असले तरी आहेत
मुद्दा क्र.१ आणि ३ ही फक्त आपली समजूत आहे. ती वस्तुस्थितीला तितकीसी धरून नाही असे पाकिस्तानात जाऊन आलेल्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आणि खेळाडूंनी जाहीररीत्या सांगितले आहे.
पण ते इतके महत्वाचे नाही. पाकिस्तानतले फक्त १ टक्का लोक जरी भारताचा द्वेष करत असले आणि ते भारताविरुद्ध कारवाया करत असले तरी उरलेले ९९ टक्के त्यांना थांबवू शकत नाहीत. त्यांच्यापासून असलेला धोका काही कमी होत नाही.

सहमत

घारे सरांच्या विवेचनाशी पुर्ण पणे सहमत आहे. समाजकंटक एखादा टक्का असतात पण उरलेल्या ९९ टक्के लोकांना वेठीस धरण्याची त्यांची क्षमता असते.
प्रकाश घाटपांडे

माणसं, इथून तिथून सारखेच...

हा लेख पाकींना सहानुभूती दाखवण्यासाठी लिहिलेला नसून माणुसकीचा एक पैलू दाखवण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. हे जर स्पष्ट होत नसल्यास ती चूक लेखकाची आहे.
लेखामधील स्थळ व पात्रांची नावे पूर्णपणे बदलली तरी आशय तोच राहील. त्यामुळे संबंध शोधणे, पाकीने हल्ला केल्यास काय होईल, आपण त्यांचा किती सन्मान ठेवतो व ते तितके ठेवत नाही इत्यादी गोष्टी गौण ठरतील.
श्री घारे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे सामान्यांचा बोलविता धनी वेगळा राहून भडकवत असतो. व सामान्य परिस्थितीचे बळी ठरतात व असहाय ठरतात. त्यामुळे आपल्या येथील सामान्य व पाकिस्तानातील सामान्य अशी तुलना करण्याची पण गरज नाही.
मुळात हा लेख भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध कसे सुधारावेत असे अनेकाना वाटले असावे. त्यामुळे लेखावरील प्रतिसादांची दिशा बदलल्यासारखी वाटते.

सहमत आहे

लेख आवडला. एक वेगळा विचार आणि त्यानुषंगाने दिलेली घटना मला तरी विसंगत वाटले नाही. घारे सरांचा प्रतिसादही बोलका आहे.

 
^ वर