फोर्थ डायमेन्शन १

नमस्कार ! माझे मित्र प्रकाश घाटपांडे यांनी मला उपक्रम विषयी माहिती दिली. उपक्रम हे संकेतस्थळ मला नवीन आहे. काही विचार आपल्याबरोबर शेअर करीत आहे. त्यावर आपली मते स्वागतार्ह आहेत.

फोर्थ डायमेन्शन - 1

नवीन वर्ष सुखाचे, भरभराटीचे......

नवीन वर्ष उजाडण्यापूर्वी आपल्यातील (किमान) काही जण तरी पुढील वर्षभरात काही उद्दिष्टे गाठण्याचा संकल्प करत असतात. (त्यातील किती उद्दिष्टे सफल होतात हे न विचारलेले बरे!) विद्यार्थी-जीवनात तर अशा उद्दिष्टांची लांबलचक यादी असते. लिहून काढल्यास शंभर पानी वही संपून जाईल. उद्दिष्टातील शब्दांची आतिषबाजी, उधळण, यांचा बारकाईने अभ्यास केल्यास जीवनभरातील सर्व समस्या खरोखरच नाहिशा होणार असाच आभास निर्माण होईल. अभ्यासाचे वेळापत्रक (जे नेहमीच कोलमडते), प्रत्येक विषयाबद्दल माहिती मिळवण्यासाठीचे (निष्फळ) प्रयत्न, परीक्षेतील यशाचे शिखर गाठण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कोलांटी -उडया, पालकाकडून मिळणाऱ्या पॉकेट मनीतील काटकसर, मनोरंजन-मित्र-मैत्रिणांगना फाटा, लैंगिक भूक दाबण्याचे (वृथा) प्रयत्न.... एक ना दोन.... अशा अनेक उद्दिष्टांची यादी तयार केली जाते, यादीत भरही पडत जाते. परंतु नव वर्षाच्या पार्टीची बेहोषी उतरायच्या आतच ही उद्दिष्टे हवेत विरूनही जातात.
जस जसे आपण मोठे होऊ लागलो तस तसे या उद्दिष्टांची संख्या कमी होऊ लागली. काही वर्षानंतर असे काही उद्दिष्ट ठरवणे हास्यास्पद वाटू लागले. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांच्यामागे धावण्यात अर्थ नाही, हे कळू लागले. तरीसुध्दा सवयीच्या परिणामामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी वर्षभरासाठी काही योजना हव्यात, वैयक्तिकरित्या आपल्यात काही सुधारणा हव्यात असे तीव्रतेने वाटू लागते. मग आपण गेल्या वर्षभराचा आढावा घेऊ लागतो. जमाखर्च करू लागतो. यावरून काही उणीवा लक्षात येतात. व आपण पुढचा अंदाज ठरवू लागतो.
फारच उदात्त ध्येय ठेवल्यास ते आपल्या आवाक्याचे बाहेरचे आहे हे मात्र आजकाल आपल्याला कळू लागले आहे. (आपल्या जुन्या पुराण्या स्कूटरला फारच शुध्द पेट्रोल टाकल्यास स्कूटर पळणारच नाही. तिला नेहमीचेच भेसळयुक्त पेट्रोल लागते हे उमजू लागले!) आपल्या साध्या सरळ जीवनासाठी फार उदात्त, उच्च श्रेणीचे, सर्वश्रेष्ठ असे काही नको असते. ज्या काही किमान गोष्टी हव्या तेवढया मिळाल्या तरी बस्... आयुष्य सार्थकी लागले. अशा वेळी पुन: एकदा विद्यार्थदशेची आठवण येते. यादी कराविशी वाटते.
अशीच एक यादी खास तुमच्यासाठी...
1 सर्व काही वाटून घ्यावे. Share everything
2 इतराना न्याय वागणूक द्यावे. Fair play
3 कुणालाही दुखवू नये. (अगदी रस्त्यावरच्या कुत्र्यालासुध्दा!) Don't hurt.
4 चुकून दुखावल्यास ताबडतोब क्षमा मागावे. Say sorry.
5 वस्तू जिथून काढून घेतल्या होत्या, तेथेच त्या परत ठेवाव्यात. Replace at same place.
6 आपली नसलेली वस्तू घेऊ नये. त्याला हातसुध्दा लावू नये. Don't touch.
7 खाण्यापूर्वी, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावे. Wash hands before eating
8 वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. Follow traffic rules strictly.
9 शिकत रहावे. त्याचा विचार करावा. Learn. Think.
10 आश्चर्यजनक व चमत्कारिक अशा गोष्टीपासून चार हात लांब रहावे. (अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याची सवय जडल्यास आपला सर्वनाश नक्कीच!) Don't believe miracles
11 कायम सावध असावे. Be alert.
12 प्रत्येक घटनेकडे डोळसपणे, चौकसपणे पहावे. Look..
आपल्यासारख्यांच्या आयुष्यासाठी एवढया गोष्टी पुरेशा ठरतील. यातील कुठलेही विधान घेऊन कुटुंब, समाज, कामाचे ठिकाण, शासन व्यवस्था इत्यादींच्या संदर्भात अन्वयार्थ लावल्यास आपण आपल्या भोवतालचे जग नक्कीच बदलू शकू. आपले जीवन सुसहृ करू शकू. वाटून घेण्याची मानसिकता सर्वांना आपलेसे करू शकते. आयुष्याच्या कुठल्याही पायरीवर असलो तरी वाटून घेणे नेहमीच हितकारक ठरेल. एकमेकांना आधार देण्याचा सर्वानीं निर्धार केल्यास जीवन नक्कीच जगण्यालायक ठरेल. न्याय वागणूकीत विषमतेला स्थान नाही. चार गोड शब्द बोलल्यास नुकसान तरी होणार नाही. क्षमा मागण्यात कसला आलाय कमीपणा? वस्तूंची जागा बदलत राहिल्यास नंतर त्याचा तुम्हालाच त्रास. अनोळखी वस्तूंना हाताळल्यास काहिही होवू शकते. वाहतुकीचे नियम मोडून स्वत:चे (व इतराचे) जीव धोक्यात घालण्यातून काय मिळवणार? आपल्या आरोग्याचे रक्षण करणे ही आपली जवाबदारी आहे. शिकण्यासारखे जगात भरपूर आहे. विचार करण्याच्या सवयीमुळे चांगले काय वाईट काय याचा उलगडा होतो. आश्चर्यचकित होणे किंवा चमत्कारावर विश्वास ठेवण्याचे सोडून दिल्यास बुवा-बाबा, आर्थिक गुन्हेगार यांच्या तावडीत सापडणार नाही. सावध असल्यास आपल्याला कुणीही सहजासहजी फसवणार नाही. सावधपणातून धोक्याची सूचना मिळते. डोळसपणा आपल्याला विचार करण्यास, पुनर्विचार करण्यास व विचारपूर्वक कृती करण्यास भाग पाडू शकेल.
...कदाचित हे नवीन वर्ष आपल्यात बदल घडवून आणू शकेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

भावे प्रयोग

खरे बोलावे
प्रेम करावे
सदाचाराने वागावे
सर्व धर्मात हे सांगितले आहेच.

प्रकाश घाटपांडे

क्रमांक ५

एकदम पटले.[उदा. चुंबन]
शरद

नमस्कार

उपक्रमावर स्वागत.

लेख चांगला आहे. मला या लेखात नवे काही मिळाले नाही तरी हा एक चांगला लेख आहे नक्की.

पुलेशु [पुढील लेखनास शुभेच्छा!]

 
^ वर