चार जनार्दन

जनार्दनस्वामी, एका जनार्दन, रामा जनार्दन आणि जनी जनार्दन

[१] जनार्दन स्वामी [इ.स. १५०४-१५७५] हे संत कवी दौलताबाद किल्ल्यावर मुसलमानांकडे नोकरी करत होते. चांद बोधले नावाचे यांचे गुरू. पण प्रत्यक्ष दत्त गुरूंकडून, आत्मबोधाचे रहस्य प्राप्त झाले अशी समजूत.काही स्फ़ूट अभंग व आत्मानात्मविवेकसार नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. किल्ल्यावर देह ठेवला.तेथे समाधी.
[२] एका जनार्दन [शके१४५५-१५२१]. एकनाथ महाराजांनी आपल्या गुरूवरील अपार भक्तीने स्विकारलेले नाव..सर्व संतांना सद्गुरू मिळाले, पण सर्वांत सुदैवी ज्ञानेश्वर महाराज व एकनाथ महाराज. यांना गुरूचा सहवास, शिकवण जास्त काळ लाभली. दोघांची गुरूभक्ती अनाकलनीय म्हणावी अशी.. ज्ञानेश्वरांनी जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे, गुरू महिमा वर्णून आपली सर्व संपदा आध्यात्मिक, ग्रांथिक, लौकिक, सर्व काही, गुरूचरणी अर्पण केली. तीच गोष्ट एकनाथांची. " ओंकारस्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा, तुज नमो," या सारख्या अभंगात त्यांची अपार गुरू भक्ती दिसून येते. यांची ग्रंथसंपदा अफ़ाटच म्हटली पाहिजे.
भागवत टीका, रुक्मिणीस्वयंवर,बालक्रिडा, प्रल्हाद-चरित्र, स्वात्मसुख,आनंदलहरी, गीतासार, अभंग,भावार्थरामायण, पदे, भारुडॆ, जोहार, अर्जदास्त, कोल्हाटीण, बालसंतोष,पांगुळ, जोगवा , यादी तरी किती द्यावयाची ? अंदाज म्हणून सांगतो, भजनी मंडळे, वासुदेव, फ़िरते जोशी, फ़ड, इत्यादी सर्व मिळून महाराष्ट्रात जेथे जेथे धार्मिक गीते [सर्वांगानी] गायली जातात त्यांमध्ये सिंहाचा वाटा एकनाथ महाराजांचाच असतो ! कारण त्यांनी जाणीवपूर्वक आपले लेखन सर्व थरांतील आबालवृद्धांकरिता केले. मुसलमान राजवटीत महाराष्ट्र्धर्म टिकवून ठेवावयाचा असेल तर केवळ उच्च
वर्णियांकरिता लिहून उपयोग नाही याचे त्यांना भान होते. पुढील शतकातील रामदास-तुकाराम यांचे जन्म एकनाथांच्या मृत्युसमयीचे आहेत. या दोघांनी एकनाथांचे कार्यच पुढे चालू ठेवले.
शिवाजी महाराजांच्या कार्याची उभारणी करण्याकरिता भूमी तयार करण्याचे काम एकनाथ महाराजांचेच.
मराठीवर आणखी एक मोठे ऋण महाराजांनी करून ठेवले आहे.ज्ञानेश्वर महाराज जाऊन ३०० वर्षे झाली होती. ज्ञानेश्वरीत प्रचंड पाठभेद निर्माण झाले होते. अनेक हस्तलिखिते गोळा करून
शुद्ध पाठ तयार करण्याचे काम एकनाथांनी केले ! जमले तर महाराजांच्या काव्याची उदाहरणे एखाद्या निराळ्या लेखात देण्य़ाचा विचार आहे.

[३] रामा जनार्दन यांची माहिती उपलब्ध नाही. ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंगाचे अवतार मानणाऱ्या यांच्या एका आरतीने त्यानी आपले नाव अमर करून ठेवले. " आरती ज्ञानराजा ".
ज्ञानेश्वर महाराज व शंकराचार्य यांच्या अद्वैतामधील बिंदुमणी फ़रक एका ओळीत त्यांनी अचुकपणे नोंदला आहे. " विश्व ब्रह्मची केले " आचार्यांच्या म्हणण्याप्रमाणॆ जग मिथ्या तर
महाराज म्हणतात नाही, जगही ब्रह्माचाच आविष्कार आहे. अहाहा. तीन शब्दात सर्व ज्ञानेश्वरी !

[४] जनी जनार्दन एकनाथांचे गुरूबंधू.आईचे नाव जनी.त्यावरून यांनी काव्यात जनी जनार्दन अशी मुद्रा घेतली. निर्विकल्प ग्रंथ हा ७०० ओव्यांचा आहे.महावाक्यनिवारण, सीता
स्वयंवर व काही हिंदी पदे अशी इतर काव्य रचना.
या शिवाय इतर काही कवींनी या नावांखाली रचना केलेली आढळते.
खरे म्हणजे हा आ. धनंजय यांच्या " पाळण्या" वरील प्रतिसाद. अंमळ मोठा झाल्याने निराळा देत आहे.
शरद

Comments

राम जनार्दनी

गावात हरिपाठ व्हायचा त्यावेळी बाळ मिस्त्री ही आरती म्हणायचे ऐकून आमची पाठ झाली होती. शब्द तोड अशीच होती

आरती ज्ञानराजा ,महा कैवल्य तेऽजा सेविती साधुसंत|
मनु वेधला माझा आरती ....||
लोपले ज्ञान जगीऽऽ
हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग |
नांव ठेविली ज्ञानी , आरती ...||
प्रगट गुह्य बोलेऽऽविश्व ब्रम्हची केले
राम जनार्दनी पायि मस्तकी ठुले आरती..
यानंतर लगेच तुकारामाची असयाची.
आरती तुकारामा स्वामी सदगुरु धामा
सच्चितानंद मुर्ती पाऽय दाखवी आम्हा आरती ..|
राघवे सागरात पाषाण तारिले कौतुक तुकोबाचे अभंग रचिले म्हणोनि

पुढचे आठवत नाही

वारकरी संप्रदायातील हरिपाठ असल्याने शब्दांचे तुकडे ठेक्याच्या सोईनुसार असायचे.
प्रकाश घाटपांडे
ता.क. ही आरती येथे उपलब्ध आहे

आरती

दुसरे कडवे असे

कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी
नारद तुंबरू साम गायन करी !!
शेवट असा पाहिजे
रामा जनार्दनी पायी मस्तक ठेले !! [ठेले ... ठेवले]
शरद

तुकारामाची आरती

संत तुकारामांची आरती देखील रामा जनार्दन यांचीच आहे असे दिसते.

एकनाथांविषयीच्या "नाथाच्या घरची उलटी खूण" या म्हणीविषयी काही माहिती आहे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ज्ञानाचा एका.

ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका अशी म्हण वारकरी संप्रदयात प्रचलित आहे आणि विचार केला तर सार्थच आहे.

एकनाथ महाराज म्हणावे तर आचार्य, म्हणावे तर संत, म्हणावे तर लोककवी आणि म्हणावे तर क्रांतिकारक.

इतका लोकविलक्षण असा पुरुष महाराष्ट्रात जन्माला यावा हे आपले भाग्यच.

किर्तनाचा फड रंगात यावा, तुकारामाचा अभंग असावा आणि बुवांनी एखादी एकनाथाची कथा सांगावी. डोळ्यासमोर साक्षात एकनाथाचे चरित्र आणि कर्तत्व उभे राहते. रामेश्वराची कावड एखाद्या गाढवाच्या मुखी टाकणारे अथवा एखाद्या दलिताचे लेकरु कड्यावर घेणारे यांच्या कथा मात्र अस्सल ग्रामीण भागातील किर्तनातच ऐकाव्या. मंत्रमुग्धता काय असते ते तेथेच समजते.

महाराष्ट्राचे हे सर्व संस्काराचे विद्यापीठच आहे असे मान्य करावेच लागेल.

चांगली माहिती

आंधळा मागतो एक डोळा... चार जनार्दनांविषयी माहिती मिळाली.

दौलताबादच्या किल्ल्यावरती जनार्दनस्वामी ध्यान लावत ती गुहा अजून दाखवतात.

चार नव्हे पंचक

एकनाथ पंचकातील साधूकवी म्हणून ज्या पाचांचा उल्लेख करण्यात येतो ते असे, एकनाथ, दासोपंत, जनीनार्दन,रामाजनार्दन,विठारेणूकानंदन.

विठारेणूकानंदन, हे माहूरच्या रेणूकादेवीचे भक्त असून त्यासंबधी त्यांची काही पदे आहेत. यांच्या पदांतून् आई-अदिपुरुषा हे नाव वारंवार आलेले दिसते. यांनी सीतास्वयंवर नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे.

मराठी साहित्यात त्याची वाड;मयसंपदा एकनाथांच्या तोडीची आहे असे म्हटल्या जाते.

-दिलीप बिरुटे
(उपक्रमी)

माहुर गड निवासी

आपल्या आजीकडील काही पदे, कविता वाचायला मजा येईल. मग संदर्भ आणि साहित्याची पडताळणी करु !!!
माहुर गड निवासी रेणुका मातेचा जोगवा..मला खूप आवडतो. आता तो कोणी लिहिलेला आहे, मला माहित नाही.

माहुर गडावरी ग, माहुर गडावरी ग तुझा वास !
भक्त येती ते दर्शनास.
माहुर गडावरी ग, माहुर् गडावरी ग तुझा वास !
पिवळे पातळ गं, पिवळे पातळ बुट्टीदार , अंगी चोळी ती हिरवीगार
पितांबराची खोवलि कास !!
बिंदी बिजवरा गं, बिंदी बिजवरा ग, भाळी शोभे !
काफ बाल्याने कान ही साजे !
इच्या नथेला गं, इच्या नथेला हिरवे गोस
भक्त येती ते दर्शनास..

सुरेख तालात ऐकतांना मजा येते, अजून पुढे काही ओळी आहेत पण 'इकडच्यांना' आता पुढे काही आठवत नाही म्हणतात. ;)

-दिलीप बिरुटे

बरीच

माहिती मिळाली. :-) सर्वांचे धन्यवाद.

हेच

बरीच माहिती मिळाली.

हेच बोल्तो..!

आपला,
तात्या जनार्दन.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

नेसले गं बाई चंद्रकळा ठिपक्याची

जमले तर महाराजांच्या काव्याची उदाहरणे एखाद्या निराळ्या लेखात देण्य़ाचा विचार आहे.

शरदराव अगदी अवश्य ही उदाहरणे द्यावीत.

एकनाथ महाराजांच्या काही गौळणी लहानपणी आमच्या गावच्या यात्रेत लावत असत. (नंतर त्याची जागा जगजीत सिंगच्या हे राऽऽम हे राऽऽम ने घेतली. आणि आता कोंबडी पळालीने).

नेसले गं बाई चंद्रकळा ठिपक्याची, राधे वाकून टाक सडा, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी या गौळणी सुरेख होत्या. (त्या एकनाथांच्याच असाव्यात असे वाटते. बाकीच्या गौळणी आठवत नाहीत.)

नेसले गं बाई मी चंद्रकळा ठिपक्याची बाई ठिपक्याची बाई ठिपक्याची
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची
शिटी मारुन करतो गोळा गोपाळांचा मेळा
राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा
शर्थ झाली बाई याच्या निर्लज्जपणाची, या कान्हाची, या कृष्णाची..
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची
पाणीयाशी जाता बाई वाटेवरी उभा कान्हा
सोड देवा पदर माझा नार आहे परक्याची, या कान्हाची, या कृष्णाची..
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची
अजून याला नाही कळे, करीतसे भलते चाळे
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची(?)
एका जनार्दनी गौळण हसुनी, हरी चरणांशी मिठी मारुनी
फिटली गं बाई माझ्या हौस यौवनाची, या कृष्णाची या कान्हाची
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची

तुमच्या काव्यमालेमध्ये गौळणींनाही स्थान द्यावे ही विनंती.

दुरुस्तीः आधी आयपॉडमध्ये ऐकून टंकन करताना अधोरेखित ओळ नीट ऐकू आली नव्हती. खालील दुव्यावरही नक्की काय आहे ते कळत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सापडली

प्रकाटाआ

सापडली

'नेसले गं बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची' ही ओरिजिनल गौळण सापडली. क्या बात है.

अवांतरः धिंगाणा डॉट कॉमवरील "माठाला गेला तडा" या अल्बममध्ये वैशाली सामंत व इतरांच्या आवाजात काही गवळणी ऐकता येतील मात्र त्या जुन्या गौळणींइतक्या मजेदार नाहीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गेला टिचकी मारून कान्हा, गोर्‍या गालावरी

गेला टिचकी मारून कान्हा, गोर्‍या गालावरी...

ही गौळण हवी आहे. पहा कोणाला मिळते का ते. मी एक गौळण इथे देत आहे.

वाकून टाक सडा,
गं राधे जरा, वाकून टाक सडा ।। धृ ।।

केस कुरळे उडतील भुरूभुरू,
आवळून बांध बुचडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।१।।

शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील,
पदर खोच कमरेला, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।२।।

गावातील लोक टकमक बघतील,
थुंकून टाक विडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।३।।

एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।४।।

_______________________________________________
भो भद्रं कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

वाकून टाक सडा

वाकून टाक सडा ही गौळण ऐकण्यासाठी येथे जा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर