शंकासुर - २

कट्टर मराठी प्रेमींनी लिहिताना, वाचताना आणि बोलताना - नाहीये, जाणारोत, आलाय असे शब्द वापरण्याऐवजी नाही आहे, जाणार आहोत, आला आहे असे शब्द वापरल्यास मराठी भाषा टिकण्यास अधिक मदत होऊ शकेल का? का बोलीभाषेप्रमाणे मराठी लिहायला हवी?

शिरीष / श्रीईश.

लेखनविषय: दुवे:

Comments

बोली आणि औपचारिक मराठी

मला वाटते/वाटतं संवाद लिहितांना किंवा संवाद साधण्याच्या हेतूने/हेतूनी लिहितांना बोलीभाषेप्रमाणे लिहिणे/लिहिणं, उदा. नाहिये, जाणारोत, आलाय, वाचकाला गुंतवून ठेवण्यासाठी अधिक परिणामकारक ठरते/ठरतं. एरवी, म्हणजे औपचारिक लेखनांत/लेखनात नाही आहे, जाणार आहोत, आला आहे अशी व्याकरणप्रमाणित रूपे/रूपं वापरावीत. इंग्रजी लेखनातही बोलीभाषेची रूपे/रूपं वापरली जातात. त्याचा भाषा टिकण्याशी काही संबंध असेल असे/असं वाटत नाही.
(वरील मजकुरांतील पर्यायी शब्दरूपे बोलीभाषेंतील आहेत. मात्र अशी रूपे वापरण्यासाठी कधीकधी अनुच्चारित अनुस्वारांचा उपयोग करावा लागतो).

सहमत आहे.

.

मराठीत संधी करून लिहिण्याची प्रथा नाही

नाहीये, जाणारोत, आलाय
हे सर्व व्याकरणशुद्ध आहेत. मराठीत फक्त पदाच्या अंतर्गत (आणि समासाच्या प्रसंगातले) असलेले संधीच लिहायची पद्धत आहे. (शरद् कोर्डे यांच्याशी "व्याकरणप्रमाणित" शब्द सोडला, तर बाकी मी सहमत आहे.)

वाक्यातील दोन वेगवेगळ्या पदांच्या मध्ये संधी झाले तर ते लिहिण्याची पद्धत नाही.

या बाबतीत वेगवेगळ्या भाषांमध्ये काय प्रकार शिष्टसंमत आहे, त्याबद्दल कुठलाच नियम सांगता येत नाही.
संस्कृतात सर्वच्या सर्व संधी (ध्वनी गाळले काय, जोडले काय) ते तसे उच्चारानुसारी लिहायची पद्धत आहे.
सर्वे+आगताः = सर्व आगता: । कान्+कान्? = कांस्कान्?
वगैरे. शब्दकोशातले रूप ध्वनि-अनुसासारी संधी न करता लिहिले तर अशिक्षित मानले जाते.

फ्रेंच/स्पॅनिश मध्ये कधीकधी संधिनियमांप्रमाणे केलेले बदल उच्चारुनासारी लिहितात, बहुतेकवेळा पदाचे शब्दकोशातले/विभक्तिरूपावलीतले रूपच योजतात.
Le+amour, le+pays (ल + आमू किंवा ल + पेई) = l'amour, le pays (लामू आणि ल पेई) इथे 'le' चे लेखी रूप उच्चारानुसार बदलते
मात्र
Petit+amour, petit+pays (पतीत्+आमू किंवा पतीत्+पेई) = petit amour, petit pays (पतीतामू, पती पेई) इथे 'petit' चे लेखी रूप बदलत नाहीत.

मराठीमध्ये संधी करून कधीच न लिहिण्याची, नेहमी शब्दकोश/विभक्तिरूपावलीतले रूपच लिहिण्याची पद्धत आहे.
हात+दे = "हाद्दे" हाच उच्चार मराठीत होतो, हा मराठीतला संधीनियम आहे, हे शंभर-एक वर्षांपासून मराठी अभ्यासकांना ठाऊक आहे. पण तसे लिहिण्याची पद्धत मराठीत नाही.
इंग्रजीमध्येसुद्धा औपचारिक लेखनात संधी न करताच लिहायची पद्धत आहे - अपवाद कविता. कवितांमध्ये मात्रांची संख्या फार महत्त्वाची असते, म्हणून 'Tis, 'n', वगैरे उच्चारानुसारी लिहून लयबद्ध वाचनाची सोय लेखक करतो. (हा प्रकार मराठी कवितालेखनातही सापडतो.)

संधीनियमांबद्दल अशा प्रकारे वेगवेगळ्या परंपरा आहेत, आणि अशा वेगवेगळ्या परंपरा वापरणार्‍या अनेक भाषा टिकलेल्या आहेत.

त्यामुळे अमुक लेखनपरंपरा केल्यामुळे भाषा अधिक टिकेल असे म्हणता येत नाही. भाषा रोज-उपयोगासाठी, व्यापारासाठी आणि पांडित्यासाठी सर्व अंगांनी वापरली गेली तर ती टिकते, मग संधी लिहायचे की नाही याबद्दल काही का नियम असो.

आपण

नेहेमी बोलताना अशा औपचारिक भाषेचा वापर केला तर रोज बातम्या ऐकल्यासारखे वाटेल. संपूर्ण वाक्य न उच्चारता नाहिये, जातोयना असे शब्द वापरणे, निरनिराळ्या लांबलचक शब्दांना छोटे करणे*, परभाषीक शब्दांना आपला साज चढवून आपलेसे करणे हेच तर भाषेच सौदर्य आहे.ते नष्ट केले तर भाषा नीरस आणि कंटाळवाणी होऊन जाईल.

* या संदर्भात मागे मनोगतावर वाचलेले एक वाक्य आठवले, "भरत ला बेडी टाकतोय, नक्की ये." हे कुठल्याही कट्टा संस्कृतीमधले नॉर्मल वाक्य आहे. हेच "भरत नाट्य मंदीरामध्ये लग्नाची बेडी या नाटकाचा प्रयोग ठेवला आहे, नक्की ये" असे म्हटले तर ऐकणारा जो कुणी पक्या, दिल्या असेल तो वाक्य अर्धे संपेपर्यंत बाईकला किक मारून बुंगाट पळून जाईल.

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

काही कोकणी/कोकणस्थ रुपे

यावरून आठवले. पेंडशांच्या कादंबर्‍यांमधे कोकणी माणसांच्या तोंडी असलेली क्रियापदाची रूपे : "बजापाला काही अक्कल नाय्यै." किंवा स्त्रीपात्रांच्या तोंडी आलेली क्रियापदाची रूपे : "मग ? इतकेच होते तर कराच्चा अभिषेक ! "

अवांतर :
"भरत ला बेडी टाकतोय, नक्की ये."

हाहा , महान !

कट्टर

कट्टर मराठी प्रेमींनी लिहिताना...
हे वाचून कट्टर मराठी प्रेमी म्हणजे नेमके कोण अशी शंका आली. कट्टर हा शब्द टोकाचे विचार असणार्‍यांसाठी बरेचदा वापरला जातो.

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

कट्टर

कट्टर हा शब्द कष्टतर वरून आला असावा ;) जे लोक मराठी भाषा बोलण्याचे खडतर "कष्ट घेतात" त्यांच्या विषयी शिरीषराव बोलत असावेत बहुदा :))
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

कट्टर आणि कर्मठ

कट्टर हा शब्द कष्टतर(खडतर)वरून आला असावा ही कल्पना भन्‍नाट आहे. कदाचित तो कटुतर यावरूनही आला असेल. जे मराठी भाषा बोलण्याचे कटुतर काम करतात ते आंतरबाह्य कट्टर(कडवे) मराठी.
यावरून आठवले. हिंदीत निवडणुकांच्या मोसमात भिंतीभितींवर उमेदवारांच्या नावामागे आवर्जून कर्मठ हे विशेषण लावलेले आढळते. सुरुवातीला वाटले, की सनातनी असणे हे इथल्या होतकरू विधायकांना 'मस्ट' असावे. नंतर लक्षात आले की हा तर मराठी 'कामसू'चा हिंदी पर्याय!--वाचक्‍नवी

 
^ वर