संत, पंत, आणि तंत

संत, पंत आणि तंत
मराठीच्या इतिहासात,म्हणजे १८५० च्या पूर्वी , गद्य फ़ार कमी लिहले गेले. कवडेच जास्त. या अनंत कवीवर्यांची विभागणी एका मजेदार पद्धतीने केली जात असे. संत,पंत आणि तंत.
संत ..... ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादि.महानुभाव लेखकांना आपण याच कप्प्यात टाकू.
पंत ...... मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित इत्यादि.
तंत ...... पोवाडे, लावण्या लिहणारे... राम जोशी, होनाजी, अनंत फ़ंदी इत्यादि.
संतांच्या लेखनाचे प्रयोजन एकच. बुडणारय़ा लोकाना वाचवणे. आता ही चांगली प्रतिभावंत माणसे हो. जागतिक साहित्यात प्रथम श्रेणीत बसणारी. पण हे " वाचवण्याचे ’ भूत मानगुटीवर बसलेले ! मोठ्या मिनतवारीने, पंच पक्वांनानी भरलेल्या ताटात, एका कडेला थोडीशी चटणी वाढावी, तसे त्यांनी ललित लेखन केले. त्याचा थोडासा आस्वाद आपण मागे घेतला आहेच.
पंत ही व्युत्पन्न जात. संस्कृतचा, काव्य शास्त्राचा अभ्यास केलेली. छंद माहितेचे. ललित लेखनाचे हौस असलेले. पण तरीही धार्मिक बंधन पाळणारे. सर्व सामान्य लोकांची मनोरंजनाची गरज तर भागवयाची पण बायका-मुलांना ऐकावयास संकोच वाटू नये ही लक्ष्मणरेषाही ओलांडवयाची नाही. त्यांनी महाभारत-पुराणातील आख्याने निवडली व त्यावर रसाळ काव्य केले. रसाळ ! एका विशेषणात त्यांच्या काव्यातील नवरसांची ओळख पटावी. आणि परत हे सर्व सोपे-सुलभ.जरा प्रयत्न करा. शाळेत किती सहजपणाने मोरोपंत- वामन पंडित पाठ झाले होते, केले होते म्हणत नाही, हे आठवेल. धडाधडा म्हणतांना मजा यावयाची. " देवी दयावती दवडसी दासाची दु:खदुर्दशा दूर पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय; पूर ." आठवले की परत शाळेतला वर्ग, ठणठणीत आवाजात केलेले कोरडे घसे [माफ़ करा, यना सर ] याद येतात. तर असे हे पंत आणि पंडित.
तंत ...... हे निराळेच. यांची ओळख शाळेतली नव्हेच. आता अनंत फ़ंदीचा " बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको " हा फ़टका वा होनाजीची " घनश्याम सुंदरा " शाळेतच शिकलो पण ते झाले अपवाद. यांचे क्षेत्र ग्रामिण महाराष्ट्र. ऐकणारे तरुण [also not so young !} रस दोनच. वीर व शृंगार.भाषा जरा ओबड धोबडच. पण विषयाचा वेध अचूक घेणारी.पोवाडा असो वा लावणी असो हृदयाला भिडलीच समजा. रोखठोक मामला. पोवाडे आता कमी झाले तरी लावणी तर अजूनही लिहली जात आहेच.
तर आता आपणास आता या दोन दालनात प्रवेश करावयाचा आहे. मी माझी आवड सादर करणार आहेच पss ण [ हा पंडित बाईंचा परिणाम !] या वेळी थोडासा बदल करीन म्हणतो.
मीच सुरवात करण्याची गरज काय ? हे सदर " आपली आवड " म्हणून सुरु करू. तुम्ही तुमची आवड कळवा.संपूर्ण कविता दिल्यास उतमच.नाहीतर ती मिळवावयाचा प्रयत्न करू.
सर्वानी रसास्वाद घेऊ. तर चेंडू तुमच्या कोर्टात.
उपक्रम कवितांकरता नाही हे मान्य, पण माझा उद्देश जुन्या काव्याचा अभ्यास व्हावा असा आहे. संपादक मंडळाला पटले नाही तर छुट्टी !
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

उपक्रम चांगला आहे, तुमच्या आणि इतर जाणकारांच्या आवडीच्या उदाहरणांची वाट पाहतो. आता लगेच आठवणारी दोन उदाहरणे म्हणजे -

मोरोपंतांचे 'सुसंगति सदा घडो'

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो
सदंघ्रिकमळी दडो, मुरडिता हटाने अडो | वियोग घडता रडो, मन भवच्चरित्रीं जडो
न निश्चय कधी ढळो, कुजनविघ्नबाधा टळो | न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो
स्वतत्त्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो | पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोध जळो

याचा अर्थ श्री. वालावलकरांनी मागे एका प्रतिसादात दिलाच आहे.

आणि वामनपंडितांनी भर्तृहरिच्या वैराग्यशतकाचे केलेले समश्लोकी भाषांतर -

गेला तो नृप, ते प्रधान अवघे, ती पंडितांची सभा
गेली ती नगरी, तशा शशिमुखी, त्या तप्तहेमप्रभा॥
गेला तो नृपपुत्र, त्या शुभकथा, म्या देखिलें सर्व जें
तें जेणें स्मरणास योग्य रचिले, काळास त्या वंदिजे॥

मला वाटते, मागे सुभाषितांच्या चर्चेत वाचक्नवींनी याचा उल्लेख केला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

तंत

तंत म्हणजेच शाहीर का?तंत हा शब्द नव्याने कळला. लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे. यावर होणारी चर्चा वाचनीय ठरावी.

अवांतरः

उपक्रम कवितांकरता नाही हे मान्य, पण माझा उद्देश जुन्या काव्याचा अभ्यास व्हावा असा आहे.

उपक्रमावर स्वलिखीत किंवा इतरांच्या कविता, ललित लेखन जसेच्या तसे छापण्यास मनाई आहे असे वाटते. साहित्यिकांच्या लेखनाचे रसग्रहण, त्यातून उलगडणारे अर्थ, शास्त्र इ. यांसाठी तर साहित्य आणि साहित्यिक असा काहीसा समुदायही आहे.

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार
ह्या गाण्यात 'जय संतकवी, जय पंतकवी, जय तंतकवी रसदार' अशी एक ओळ आहे. त्यामुळे हा शब्द ओळखीचा असला तरी अर्थ पुरेसा कळलेला नाही.

चांगला धागा

("तंत" म्हणजे तंतुवाद्य - संगीतबद्ध गाते रचणारे कवी असा अर्थ आहे काय?)

चित्रपटातले होनाजी बाळांच्या एका गीताचे पालुपद काय ते आठवते -

लटपट लटपट तुझे चालणे गं
मोठ्या नखर्‍याचे
बोलणे गं
मंजुळ मैनेचे
(नारि गंऽऽ, नारि गंऽऽ)

(बाकी कडवी येथे सापडली)

कांती नवनवतीची, दिसे चंद्राची, प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी

"चंद्राची प्रभा ढवळी", हे चांदण्याच्या रंगाच्या छटेचे वर्णन मला फार नेमके वाटते.
लाल ओठांपेक्षा पवळ्या रंगाचे ओठ... ही वास्तवात दिसणारी एक रंगछटा आहे, तरी या नाजूक वर्णनात अलंकार आहे - ते रत्नही डोळ्यासमोर येते - पुढे "सगुण गहिना" म्हणणार आहे, त्याचे पूर्वसाद येथे येतात.

बिरुटेसरांनीही मनावर घ्यावे, आणि शाहीर-लावणी काव्याबद्दल उदाहरणे देतदेत रसग्रहण सांगावे. या काव्याचे माझे लेखन नगण्य आहे. या धाग्यातून मला "तंत" कवींच्या काव्याची थोडी तरी ओळख झाली, तर आवडेल.

शाहीर

शरद यांचा मराठी साहित्याचा चांगला परिचय / अभ्यास दिसतो. ती एक चांगलीच गोष्ट आहे. मराठी साहित्याचे अभ्यासक संत,पंत, आणि तंत...ते अगदी बखरी पर्यंतच्या साहित्यप्रवाहांच्या काळाला 'मध्ययुगीन मराठी वाड;मयाचा काळ, म्हणून संबोधतात.

चर्चा खूप पुढे गेली आहे. पण धनंजय, एक किस्सा मला सांगायचा मोह आवरेना. मराठ्यांची खरी गाणी म्हणून शाहिरांच्या कविता ओळखल्या जातात. त्याची सुरुवात यादवकाळात काही उल्लेख येतात म्हणून तेव्हापासून मानले पाहिजे. पण शाहिरी वाड;मयाचे अभ्यासक श्री. म. ना. सहस्त्रबुद्धे यांनी शाहिरीवाडःमयाचे मूळ वैदिक वाड्;मयापर्यंत भिडवले आहे. इंद्राचा सम्राट म्हणून जेव्हा जयघोष झाला तेव्हा विश्वदेवांनी ऐतरेय ब्राह्मणात त्याचे गूण गायले ते इंद्राचा पोवाडाच होय अशी एक व्युत्पत्तीच्या आधारे त्याचे प्राचिनत्व ठासवण्याचा प्रयत्न केला आहे. असो,..

("तंत" म्हणजे तंतुवाद्य - संगीतबद्ध गाते रचणारे कवी असा अर्थ आहे काय?)

हो, असाच अर्थ आहे. बाकी, प्रभाकर,रामजोशी,होनाजीबाळा, परशराम,सगनभाऊ,अनंतफंदी, यांच्या काही लावण्या शोधून टाकतो.
त्यांच्या लावण्यामधून येणार्‍या स्त्री सौंदर्याची वर्णने वाचण्यासारखी आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काव्याचे प्रकार

लोकसत्तेतील एका पत्रव्यवहारात काव्याचे विविध प्रकार वाचायला मिळाले.

http://www.loksatta.com/daily/20030210/lmchar.htm

काव्यप्रकारांचे आकृतीबंध खालील प्रमाणेः-

१) अभंग, २) आरती, ३) धावा, ४) स्तोत्र, ५) आर्या, ६) कीर्तन, ७) भजन, ८) प्रार्थना, ९) श्लोक, १०) करुणाष्टक, ११) मंगलाष्टक, १२) महाकाव्य, १३) पोवाडा, १४) विडा, १५) लावणी, १६) गौळण, १७) भारुड, १८) गोंधळ, १९) भूपाळी, २०) कटाव, २१) चंपू, २२) फटका, २३) झगडा, २४) धवळे, २५) लळित, २६) ओवी, २७) पाळणा, २८) कविता २९) सुनीत, ३०) विराणी, ३१) गझल, ३२) शास्त्रीयगीत , ३३) भावगीत, ३४) लोकगीत, ३५) नाट्यगीत, ३६) सिनेगीत, ३७) समरगीत, ३८) बालगीत, ३९) अंगाईगीत, ४०) क्रीडागीत.

यात पंत-तंत-संत असे वर्गीकरण करता येईल का ? यात चंपू, झगडा, धवळे, लळित हे काय प्रकार आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काही उत्तरे

चंपू म्हणजे काय ते माहिती नाही पण राजवाड्यांनी जयराम पिंडे या शहाजीकालीन लेखकाच्या "राधामाधवविलासचंपु" नावाच्या ग्रंथाचे संपादन/पुनरुज्जीवन केले असे अंधुक आठवते. तत्कालीन कर्नाटक इतिहासाबद्दल यात माहिती आहे.

"धवळे" हा प्रकार चक्रधरकालीन साहित्याशी संबंधित असावा. "लळित" हे सुद्धा तत्कालीनच , असे अंधुकसे आठवते. (लीळाचरित्र या ग्रंथाचे नाव "लळित" या शब्दाशी संबंधित असावे काय ? )

चम्पूकाव्य

चम्पूकाव्य म्हणजे गद्य व पद्याचे मिश्रण असणारे काव्य. भोजराजाचे चम्पुरामायण हे एक प्रसिद्ध उदाहरण.

लळित...

मागे सकाळमध्ये अणुकराराचे लळित असा शब्दप्रयोग वाचल्याचे आठवते. आता हे लळित अजून कुठले? भिजत पडलेले घोंगडे असा काही अर्थ?

सौरभ.
==================

घोंगडे नसावे

अणुकराराचे लळित हे अणुकराराचे कवित्त्व अशा अर्थाने वापरले असावे घोंगडे हा अर्थ नसावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लळित/लळत

"लळत-लोंबत पडलेले प्रकरण" या वाक्प्रयोगाशी साधर्म्य असणारे काहीतरी असाही एक अर्थ असू शकतो.

मोल्सवर्थमधील अर्थ

लळीत (p. 712) [ laḷīta ] n (ललित S) A dramatic entertainment on the concluding night of the नवरात्र. 2 The songs or verses composed for and recited on the occasion. 3 fig. Calamitous close or conclusion; the catastrophe. 4 A term for the last अभंग of a series, considered as शेवटचें मंगल, q. v. under मंगल. लळतावर or लळितावर येणें To get up into a fume or fit of rage.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अधुनीक लावण्या

विषय आणि चर्चा छान आहे! जसे आठवते तसे लिहीत जात आहे...

तंत मधे जर लावण्या येत असतील तर अर्थात शाहीर राम जोशींची "सुंदरा मना मधे भरली" आणि होनाजी बाळामधील वर धनंजयने सांगितलेली "लटपट लटपट" आहेतच. तशाच पिंजर्‍यातील लावण्या एकापेक्षा एक आहेत (तंत जर तंतुवाद्यामुळे आले असेल, तर तुनतुन्याचा सूड उगवण्यासाठी केलेली प्रतिज्ञा देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे). (जगदीश खेबुडकर?)

माडगुळकरांनी लिहीलेल्या लावण्या तशाच छान आहेत - जाळी मंदी पिकली (मल्हारी???), स्त्री थोर की पुरूष यावरील सवालजवाब (चित्रपट आठवत नाही) आणि सांगते ऐकामधील "पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा" या लक्षात ठेवण्यासारख्या लावण्या तात्काळ आठवतात.

अधुनिक लावण्यांत शहरी भागात पण प्रसिद्ध (पॉप्युलराइझ्ड) करणारे असे विसरता न येणारे नाव म्हणजे - सुलोचना चव्हाण - त्यांच्या ठसक्यातील अनेक लावण्या प्रसिद्ध आहेतच. पण त्यातल्या त्यात सरळ :-) लावणी म्हणजे - येऊ कशी कशी मी नांदायला...आठवली.

सरते शेवटी न विसरता येणारे अजून एक नाव म्हणजे दादा कोंडके! - त्यांच्या सोंगाड्या आणि सुरवातीच्या चित्रपटातील लावण्या या लोकगीतांच्या जवळ जाणार्‍या होत्या. नंतरच्या अर्थातच निव्वळ कोंडकेगीत ठरल्या :-)

नटरंगी नार

पठ्ठे बापूरावांचं गाणं आठवलं 'नटरंगी नार मारी काळजात वार'. कोणाला संपूर्ण माहित आहे का?

नटरंगी नार

नटरंगी नार, मारी काळजात वार
पाडी कासोट्याला पार, चापुनिया पट्टी
पाटलाला घातला गळा, कुलकर्ण्याला घालते डोळा
मास्तरानं सोडली शाळा हिच्यासाठी...

अशा ओळी पुलंच्या वटवटमध्ये ऐकल्या आहेत


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संत,पंत आणि तंत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
**तंत म्हणजे तंतुवाद्य असे श्री. धनंजय लिहितात ते खरेच आहे.पोवाडे आणि लावणी गायनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे तुणतुणे.म्हणून अशा रचना लिहिणार्‍यांना तंत कवी असे नाव दिले. संत,पंत या शब्दांशी प्रास साधण्यासाठी तंत हा शब्द योजला हे स्पष्टच आहे.
**श्री.आजानुकर्ण यांनी जी नामावली दिली आहे ती पद्यलेखनाच्या प्रकारांची.संतकवी,पंतकवी ,तंतकवी आणि आधुनिक कवी अशी कवींची ढोबळमानाने केलेली विभागणी आहे.
**१ संतकवी:--आरत्या,स्तोत्रे,श्लोक, अभंग ,ओव्या, अशा देवस्तुती आणि देवभक्तिपर रचना लिहिणारे कवी. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम,रामदास, एकनाथ आदि.
...२पंतकवी:--विशेषतः गणवृत्तांत, तसेच आर्या,गीती अशा मात्रावृत्तांत संस्कृतप्रचुर भाषेत रचना करणारे.वामन पंडित, रघुनाथ पंडित, मुक्तेश्वर,श्रीधर, मोरोपंत इ.
...३ तंतकवी: पोवाडे(वीररस) आणि लावण्या(शृंगाररस) लिहिणारे कवी.रामजोशी, होनाजी बाळा, प्रभाकर, सगनभाऊ, इ. (श्री.शरद यांनी हे लिहिलेच आहे. श्री. विकास यांनी आधुनिक लावण्यांविषयींही लिहिले आहे)
....४.आधुनिक कवी:केशवसुत आणि त्यांच्या नंतरचे कवी.

निरोष्ठ रामायण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मोरोपंतांनी निरोष्ठ रामायण लिहिले आहे असे कुठेतरी ऐकले/वाचलेले स्मरते.यांत 'प' वर्गातील सर्व अक्षरे गाळली आहेत. म्हणजे तोंडात चघळता विडा असला( अथवा ओष्ठशलाका लावली असली) तरी कोणतीही अडचण न येता हे पद्य स्पष्टोच्चार करीत म्हणता येते. निरोष्ठ रामायण उपलब्ध असल्यास त्यांतील काही भाग वानगी म्हणून इथे द्यावा.

रोचक

वा अतिशय रोचक माहिती
गुगलून निरोष्ठ रामायण मिळाले नाहि मात्र् पुढे दिलेली रोचक माहिती कळली: (युनिकोडीत नसल्याने टंकत आहे चुभुद्याघ्या)
=========
मोरोपंतांचे निरोष्ठ रामायण आपल्याला ज्ञात आहे. हे रामायण म्हणताना ओठ एकमेकांना स्पर्श करत नाहित. या रामायणात 'राम" हा शब्द नाहि. तर 'रघुनाथ' हा शब्द आहे कारण हे निरोष्ठ रामायण आहे.
काव्याचा असा अद्भुत प्रकार दैवज्ञ सूर्य कवीने "रामकृष्ण काव्य पिलोम" या काव्य रचनेत केला आहे. या श्लोकांचे वैशिष्ट्य असे आहे की नेहेमीप्रमाणे वाचताना त्यात रामाचे वर्णन येते व तीच ओळ उलट्या क्रमाने वाचल्यास त्यात कृष्णाचे वर्णन येते!
=============
संपूर्ण लेख इथे वाचता येईल

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

लळित

सुरवात तर छान झाली. प्रथम गुणिजनांनी विचारलेल्या काही गोष्टींचा विचार करू.

लळित :
हा एक प्राचीन मराठी नाट्यप्रकार आहे. विष्णुदास भाव्यांची नाटके यापासून उचलली आहेत म्हणावयास हरकत नाही. ग्रामिण भागातल्या ह्या नाटयाला गरजा फ़ार कमी होत्या.
१-१/२ फ़ूट उंचीचा बाकांवर फ़ळ्या टाकून १२ x १८ फ़ूटाचा रंगमंच तयार करण्यात येई. पडदे वगैरे नसत.एका बाजूला साथवाले व सूर देणारी मुले बसत. दुसरी बाजू पात्रांना येण्या-जाण्या
साठी.मशालींच्या उझेडात लळित सादर केले जाई. लळिताचा मुख्य भाग म्हणजे सोंगे.भालदार, चोपदार, वासुदेव, गोंधळी, वाघ्या-मुरली, बहिरा मुका, आंधळा इत्यादींची सोंगे आणत रावण वध हा बहुतेक वेळी शेवटचा प्रवेश असे.धार्मिक उपदेश व मनोरंजन हा उद्देश.कर्नाटकची भागवत नाटके, बंगालची कृष्णलीला,मथुरेची व्रजविहार परंपरा ही महाराष्ट्रातील लळिताशी साम्य दाखवितात. लिखित संहिता नसल्याने गोंधळ घालावयास भरपूर वाव. म्हणून तर वर्तमान पत्रात सळित शब्द वापरला असावा.
आता थोडी गंमत
हेमाडपंतांच्या नावावर असलेल्या " हेमाद्रिकृत लेखन कल्पतरु " या पुस्तकातील एक प्रकरण पाहू. पत्र लिहताना " मायने " काय लिहावेत याचे मार्गदर्शन
येथे केले आहे.
श्रीमंत स्वप्रभूला,श्रीया मंडित दिवाणलोकांस !
श्रीया विराजित असे प्रभुच्या सर्वाही बंधुवर्गास !!
यजमानास.त्याचे दिवाणास व बांधवांकरिताचे मायने हे असे.
नातेवाईकांकरिता पुढीलप्रमाणॆ
स्वपित्यास तीर्थरूप हे, स्वरूप गुरुमातुलासि चुलत्यास !
स्वाग्रज वृद्ध्जना याहूनि लिहणे कदा न भलत्यास !!
आता हे बघा
" चरणारविंदि मस्तक ठेवुन विज्ञप्ति " पत्निने लिहावी !
" अशिर्वाद उपरि " हे भर्त्याने योग्य रीति जाणावी !!
हे पुरेसे वाटले नाही तर
श्रीमंता,सगुणेश्वरा,नरवरा, चातुर्यरत्नाकरा,!
मद् भर्त्या,मधुरोत्तरा,श्रमहरा, सौंदर्यविद्याधरा !!
शास्त्रज्ञा,सुखसागरा,शुभतरा, सौभाग्यभाग्याकरा !
माझ्या पूज्यसुरा,सदा प्रियकरा भर्तार प्राणेश्वरा !!
मला वाटते, आज आय.टी.त काम करणारी पत्नी आपल्या पतीला असे पत्र लिहेल तर नवरा फ़ीट येऊनच आडवा होईल, नुसता मायना वाचूनच !
पण खरी खोंच पुढेच आहे,
पत्नीला " आशिर्वाद " लिहावयाचा. पण रखेलीला नाही. कवीची सूचना
" " आज्ञा करितो की " हे प्रारंभी तूं लिही स्वरक्षेला "
शरद

 
^ वर