विपश्यना- समज आणि गैरसमज.

प्रस्तावना : -> श्री. मिलिंद जोशी यांच्या विपश्यना शिबिर या तीन भागात काही समज आणि गैरसमज आढळून आले. त्या लेखातील निवडक भागावर माझे मत प्रदर्शन करीत आहे.

विपश्यना अशा गोष्टींचं सुद्धा 'इंस्टंट-पॅकेज-मिक्स' मिळू शकतं हे तुम्हाला माहिती आहे?

पूर्वी ( १०००/१५०० वर्षापूर्वी) विपश्यनेचे असेच शिबीर लागत असत. ती शिबीरे सात आठवड्याची असत. आता लोकांकडे इतका वेळ नसतो आणि या अडचणीमूळे या जगतकल्याणकारी विद्येचा लाभच होत नाही असे विचार करुन तज्ज्ञांनी वेगळ्या काळावधीचे शिबिर आयोजन करण्याचा प्रयत्न केला. यात ११ दिवसाचे शिबिर हे व्यावहारीक दृष्ट्या / विपश्यनेच्या फलश्रुतीने योग्य ठरत आहे असे मत ठरल्याने ११ दिवसाचे शिबीर अयोजित केले जाते. जुने साधक ३० दिवसाच्या शिबिरातही भाग घेऊ शकतात.

दहा दिवस जगापासून लांब रहायचं आणि दहा दिवसात तुम्ही कुणाशी किंवा कुणी तुमच्याशी बोलणार नाही, या दोन मोठ्या आकर्षणांनीही मी उद्युक्त झालो.

ही मनाला आणि चित्त शुद्धी करणारी अशी प्रक्रिया आहे. लांब राहणे अथवा मौन पाळणे ही फारच लहान अशी साध्य आहेत.

आता प्रश्न असा आहे की जिथं स्वतः गौतम बद्धासारख्या तपस्व्याला सुद्धा हे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, बोधी प्राप्त करण्यासाठी, सारं आयुष्य वेचावं लागलं, ज्यानं स्वतःच शिकवणूकीतून असं सांगितलं की हे संपूर्ण तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी तुम्हाला हा जन्म कदाचित अपुरा पडेल आणि तुम्हाला अजून एक जन्म घ्यावा लागेल, तिथं दहा दिवसात धम्म म्हणजे काय ते संपूर्ण शिकवून खात्रीनं मनःशांती मिळवून देणार्या मार्गावर नेऊन सोडण्याची शाश्वती कुणी देत असेल तर यावर कितपत विश्वास ठेवावा? किंवा मनःशांतीचा मार्ग दहा दिवसात मिळतही असेल - कदाचित - पण म्हणून हे म्हणजेच धम्म किंवा बुद्धाचं सारं तत्वज्ञान आहे का?

हो आहे. शेवटी ही प्रक्रिया आहे. ही कधीही सुरु होऊ शकते आणि काळाच्या बंधनापलिकडे असल्यामुळे असा संशय योग्य नाही.

दुर्दैवाने दहा दिवसांच्या विपश्यना कोर्समध्ये सतिपठ्ठणाचा उल्लेखही नव्हता आणि आनापान सती म्हणजे नाकाच्या शेंड्याजवळ श्वासावर लक्ष्य केंद्रित करणं असं सांगून तीन दिवसात आनापान सती उरकून टाकण्यात आलं.

शिबिरासाठी कसा आणि किती वेळ अभ्यासक्रम असावा हे ठरविण्याचे आधिकार विपश्यना समिती कडे असावे हे सर्वांना मान्य असावे. आपणास जर असा काही अभ्यासक्रम ठरवायचा असल्यास तो नक्कीच ठरविणे.

सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की मरकळच्या ज्या विपश्यना केंद्रात मी हा कोर्स केला त्या केंद्रातल्या शिक्षकांना सुद्धा इतर बुद्ध तत्त्वज्ञानाबद्दल फारशी माहिती नव्हती. साधकाला शिक्षकाबरोबर तात्त्विक, बौद्धिक चर्चा करायला परवानगी नाही.

आम्रफलाशी कर्तव्य असावे, बीजाचे काय बरे काम असावे? ही साधना बुद्धाने विकसित केलेली असो अथवा इतर कोणी? येथे फक्त प्रात्यक्षिकच करावे असे अभिप्रेत असतांना प्रत्येक ठिकाणी अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ असावा?

आणखी एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे गोएंकाजींचं जे साहित्य (पुस्तके, कॅसेट्स वगैरे) सर्वांना उपलब्ध आहे त्यात कुठेही चौथ्या दिवशी 'दिल्या' जाणाऱ्या विपश्यनेच्या तंत्राची एवढीशीही माहिती दिलेली नाही. म्हणजे जगासमोर येणाऱ्या साहित्यात फक्त तत्त्वज्ञान आणि तंत्र मात्र कोर्समध्ये ऐकण्यापुरतंच! तेसुद्धा साधकांना फक्त तिथंच आणि त्याच वेळेला ऐकता येणार. घरीही नेता येणार नाही किंवा त्यावर नोट्सही काढायला परवानगी नाही. हे सगळं काही पटत नाही.

अहो, एकदा तंत्र शिकल्यावर या ध्वनीफितीची काय गरज? अकारण बुद्धीविलास आणि वाणीविलासाची काय गरज?

विपश्यनेच्या कोर्समध्ये दहा दिवस रोज जवळ जवळ दहा अकरा तास मांडी घालून बसल्यामुळे पाय, मान पाठ जबरदस्त दुखतात.

अहो, मन आणि शरीराचा अतुट असा संबंध आहे. मनाच्या विकारांचे प्रकटीकरण शरीराच्या संवेदनात व्यक्त होते. हाच विपश्यनेचा गाभा आहे. पूर्वीही अंग दुखत असे, तेंव्हा आपण अंगदुखी म्हणून पाहत असतो. विपश्यनेच्या सत्रातही अंग दुखते, ते आपण तटस्थ आणि साक्षीभावाने पाहत असतो. संवेदना बदलत जातात. जगातली कोणतीही गोष्ट क्षणिक आहे हे तत्वज्ञान आपल्या मनावर ठसत जाते. येथे कोणताही तर्क नाही, कोणताही आग्रह नाही, केवळ अनुभुती आणि प्रत्यक्ष ज्ञान. हा गाभा आपणास समजला नाही अथवा आपण समजुन घेतला नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते

बुद्ध तत्त्वज्ञानावर शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत. जर विपश्यना रिसर्च इंस्टिट्यूट धम्मचक्र फिरत राहावं म्हणून आणि जास्तीत जास्त लोकांना या तत्त्वज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून काम करतीये तर अशी चांगली पुस्तकं साधकांना देण्यात या संस्थेला स्पर्धात्मक धोका वाटतो का?

आपण हा प्रश्न विपश्यना केंद्राला विचारु शकता. मुख्य म्हणजे प्रत्येकाने साधना करावी मग अशा पुस्तकाची गरजच राहणार नाही. विपश्यना ही ध्यानपद्धती आहे, चर्चा पद्धती नव्हे.

हा लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की गोएंकाजींच्या विपश्यना कोर्समध्ये शिकवलं जाणारं तत्त्वज्ञान हे म्हणजे एक 'पॅकेज ऑफ इंस्टंट विपश्यना मिक्स' आहे हे तुमच्या लक्षात आणून द्यावं. तदनंतरही खऱ्या आणि रसभरित बुद्ध तत्त्वज्ञानाची गोडी चाखायची का कॅंड फूड खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

हा आपला मोठेपणा आहे. आपले ज्ञान पाहता आपण स्वतः असा एखादे शिबिर चालवावे. कोणास ठाऊक बुद्धाचे अप्रकाशित असे तंत्र आपण जगाला सांगु शकाल.

माझा लेख ऐकिव आणि पूर्वग्रहावर आधारित कसा काय आहे जरा सांगाल का? मी स्वतः हा कोर्स पूर्ण केला, त्यानंतर मी यासंदर्भात पुरेसं वाचनही केलं आणि मग माझी मतं तयार केली, याला ऐकिव माहिती म्हणतात का? हा कोर्स मी मोठ्या अपेक्षेने केला होता. माझ्या लेखात मी म्हटलंय की माझ्या मोठ्या भावानं आणि दोन चार इतर विचारी मित्रांनी या कोर्सबद्दल चार चांगल्या गोष्टी सांगितल्यामुळेच मी हा कोर्स करायला उद्युक्त झालो. माझा आधीच काही पूवग्रह होता हा निष्कर्ष आपण कसा काढलात हे काही कळलं नाही.

इतरासाठी आपला अनुभव हा ऐकिव माहिती आहे. माझीही माहिती / अनुभव / शिफारस ही ऐकीवच असेल. शिबिरात रोज १ १/२ ते २ तास धर्मचर्चा चालते. अनेक समज / गैरसमज यांची उकल केली जाते. शेवटी आपण अशी माहिती देतो ती आपापल्या आकलनाच्या, आवडीच्या निकषावरच देत असतो.

असो. या लेखाद्वारे आपण अनेकांचे लक्ष वेधले आहे, कोणास ठाऊक यातून एखादा या तंत्राकडेही ओढला जाईल. असे झाले तर हे आपले यशच असेल.

द्वारकानाथ कलंत्री

लेखनविषय: दुवे:

Comments

विस्तॄत

इतरासाठी आपला अनुभव हा ऐकिव माहिती आहे. माझीही माहिती / अनुभव / शिफारस ही ऐकीवच असेल.
विस्तॄत प्रतिसाद इतर मंडळी देतीलच. मला फक्त हे वाक्य वाचून् आश्चर्य वाटले. या न्यायाने मला ९९.९९९% जेवढी माहिती आहे ती ऐकीवच आहे. उदा. मी हायड्रोजनचा शोध लावलेला नाही, पृथ्वीचा परिघ मोजलेला नाही, डोकेदुखीवर ऍस्पिरिन नेमके कसे काम करते हे पडताळून पाहिलेले नाही, इ. इ. मग ही माहिती `ऐकीव` धरली तर मी तिच्यावर विश्वास ठेवायचा की नाही? आणि मला फक्त चहा करणे, चित्रपट बघणे आणि संकेतस्थळांवरील चर्चांमध्ये स्वतःचे आयुष्य (वाया) घालवणे याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव आहे.

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

चांगला प्रश्न.

विपश्यना, योगमार्ग, मंत्र-जप इत्यादी परमेश्वरप्राप्तीचे - चित्त शुद्ध करण्याचे मार्ग समजले गेले आहेत. प्रत्येकाची प्रकृती / प्रवृती वेगवेगळी आहे. त्यामूळे मला जे काही आवडले / पटले ते इतरांना आवडेलच याची खात्री नाही. अनेकदा कोणी सांगत असतो की अमुक चित्रपट-पुस्तक -व्यक्ति भिकार आहे आणि आपला अनूभव वेगळाच असतो. म्हणून मी सांगितले की अशा ऐकिव माहितीवर अवलंबुन असण्यापेक्षा आपण आपला अनुभव घेतलेला बरा.

दुसरी बाजू म्हणजे पृथ्वीचा परिघ कितीही असला तरी व्यक्तिशः आपल्याला काय फरक पडतो? त्यामूळे प्रत्येक गोष्टीचा पडताळा प्रत्येकालाच अशक्य आहे. मात्र विपश्यना, योगासनाच्या वर्गाला जाणे आणि अनुभव घेणे प्रत्येकालाच शक्य आहे.एकदा या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर त्यामार्गावर चालणे अथवा सोडणे हा त्याचा विषय आहे.

धन्यवाद

श्री. कलंत्री यांनी माहिती दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद.

आम्रफलाशी कर्तव्य असावे, बीजाचे काय बरे काम असावे?

सहमत आहे. (कोयीचा आंब्याशी अवश्यसंबंध असतो म्हणून मी हा दाखला वेगळा देईन "सुग्रास जेवण आईच्या हातचे की मावशीच्या असा फरक का करा?")

श्री मिलिंद जोशी यांनी "हिप्नोसिस"चा उल्लेख केला. पण ती मास हिप्नोसिस (सार्वजनिक स्वप्नावस्था) की सेल्फ-हिप्नोसिस (स्वयंनियोजित-स्वप्नावस्था)चे प्रशिक्षण यातही फरक करावा असे मला वाटते. स्वतंत्रपणे ही सुखकारक मानसिक स्थिती निर्माण करायचे प्रशिक्षण मिळत असेल, तर माझ्या मते काही वाईट नाही.

प्रश्न असा आहे, की शरिराच्या एक-एक भागावर चित्त एकाग्र करून ती स्थिती प्राप्त होते आहे, की "झनझनाहट, फनफनाहट" या लयबद्ध नादाने?

(मागे मी चिन्मय मिशनच्या योगासनांच्या वर्गाला गेलो होतो. प्रशिक्षकाने शवासन चालू असताना चित्त असेच काही एकाग्र करायला सांगितले. धीर-गंभीर आवाजात अंग-प्रत्यंगाचे नाव प्रशिक्षक घेत होता. तिथे विविध इंद्रियांवर चित्त एकाग्र करण्याचा फायदा होता असे प्रशिक्षकाचे मत होते. त्यामुळे त्या प्रकारच्या शब्दघोषाशिवायच हे आसन घरी करण्याचे ते प्रशिक्षण होते. मुद्दामून त्या शब्दघोषाचे ध्वनिमुद्रण घरीसुद्धा वापरणे उलट तोट्याचेच असू शकेल. विपश्यना संस्थेचे असे काही मत आहे काय?)

ज्या वैद्यकीय चाचणीत मी मदत करतो आहे, त्यातही विचार असाच आहे - रुग्णाला दिलासा मिळत असेल तर कारणमीमांसा कळली नाही तरी (सुरुवातीला तरी) चालेल.

तरी (श्री. जोशी यांच्यासारखी) कारणमीमांसा करण्यात ज्यांना रस आहे, त्यांच्यासाठी विपश्यना-धम्म-संस्थेने आवर्जून सोय केली पाहिजे, असे वाटते. केंदामध्ये ध्यानस्थ मुद्रेत कंबर-पाठ दुखते ती घरीसुद्धा ध्यानस्थ मुद्रेत दुखेल, असे समजावून सांगितल्यास बरे. नाही तर केंद्रातले दुखणे म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा कढ, घरचे दुखणे मात्र सांध्यांतले वंगण कमी झाल्याचे लक्षण, अशी भलावणी केंद्र करते आहे, असा विचार कोणाच्या मनात येऊ शकतो.

पटले नाहि

मुळ लेखात श्री. जोशी यांनी जे घडले त्याबद्दल त्यांच्या मनात आलेले प्रश दिले आहेत. तेच खरे आहे असा दावा कोठेहि नाहि त्यामुळे ह्या चिकित्सेची गरज नव्हती असे वाटते. असो. हा लेख (खरंतर मुळ लेखाला प्रतिसाद)फारसा पटला नाहि..

इच्छा आणि वेळ जुळून आली तर विस्तृत प्रतिसाद देईन
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

अनुभूती

विपश्यनेचा अनुभव हा अनुभुती ठरावा. त्यामुळे त्यात व्यक्तिसापेक्षता येते. श्रद्धा अंधश्रद्धांच ही असेच आहे. समज गैरसमज हे शेवटी आकलनावर ठरतात.

आम्रफलाशी कर्तव्य असावे, बीजाचे काय बरे काम असावे?

आम खानेसे मतलब पेडसे क्या लेना देना? अशा अर्थाने जर घेतले. तर बरे वाटण्याशी मतलब उपचाराच्या शास्त्रीयतेशी रोग्याला घेणे देणे नाही. हा रोग्याच्या मानसिकतेशी संबंधीत गोष्ट आहे. जेव्हा वेदना असह्य होतात त्यावेळी वेदनाशामक ही बाब महत्वाची ठरावी.पण वेदनाशमन म्हणजे रोगाचा समूळ परिहार नव्हे. प्लासिबो जसे काम करते तसे विपश्यना देखील करु शकते हे मान्य. अश्रद्ध माणसात श्रद्धा उत्पन्न करणे वा श्रद्धाळु माणसात अश्रद्धा उत्पन्न करणे हे अवघड असते.
बदल हा अनुभवातून होतो. ' मिलिंद जोशी अश्रद्ध आहेत परंतु अनुभव न घेताच बोलणे त्यांना मान्य नाही म्हणुन् ते स्वत: असा प्रयोग करुन बघतात व आलेला अनुभव ते तो सांगतात इतकेच.' असे आम्ही म्हणालो तर ते किमान आम्हाला स्वत:ला मान्य आहे. वैज्ञानिक दृष्टीकोणातुन विपश्यना कडे कसे पाहता येईल? हा वेगळा विषय ठरावा.
प्रकाश घाटपांडे

नेमके काय करायवयाला ह्ववे?

मी स्वतः विपश्यनेचे ५ शिबिर केले आहेत. ( ९२-९४ च्या दरम्यान.) व्यक्तिशः मला विपश्यनेचे तंत्र आवडते / भावते. जेंव्हा जेंव्हा शक्य असेल तेंव्हा मी इतरांनी विपश्यनेला जावे असा सल्ला देत असतो.

मिलिंद जोशी यांचे कथन ऐकुन मी विलक्षण अस्वस्थ झालो आणि त्यांच्या लेखावर "प्रचंड अपयश" असा प्रतिवाद देऊन मो़कळाही झालो. पण हा प्रतिसाद योग्य नाही याचीही जाणीव मला होतीच.

काल मला परत मरकळच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. कालच एका शिबिराचा समारोप झाला होता. तेथे काही नव्या -जुन्या शिबिरार्थींशी गप्पा मारण्याचाही योग आला.

बर्‍याच वेळेस दुसरे शिबिर केल्यानंतर असे वाटते की अगोदरच्या शिबिरापेक्षा दुसर्‍या शिबिरात या तंत्राचा उलगडा बर्‍यापैकी झाला आहे. असे शिबिर आणि साधना नियमित केल्यानंतर हे तंत्र समजत जाते. या उलट असेही ऐकण्यात आले आहे की वर्षोनुवर्ष शिबिर करुनही काही लोकांना मुलभूत तंत्र समजत नाही किंवा त्यांच्या अपेक्षा चूकिच्याच असतात.

हाच अनुभव मला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या दोन अभ्यासक्रमात आला होता. ( बेसिक आणि प्रगतचा अभ्यासक्रम).

मिलिंद जोशी यांनी हे तंत्र ५०% जरी आवडले असेल तर परत काही काळावधीनंतर एक शिबिर करावे आणि आपल्या आजच्या मताकडे पुनर्विचारार्थ ठेवावे.

मिलिंदनी आपले मत मांडण्यास जसा उताविळपणा केला तसा माझ्याकडूनही झाला आहे असे वाटते. असो, सर्वेनो सुखिनोसन्तु अर्थातच भवतु सब्ब मंगलम्.

हे सुंदर

मन आणि शरीराचा अतुट असा संबंध आहे. मनाच्या विकारांचे प्रकटीकरण शरीराच्या संवेदनात व्यक्त होते. हाच विपश्यनेचा गाभा आहे. पूर्वीही अंग दुखत असे, तेंव्हा आपण अंगदुखी म्हणून पाहत असतो. विपश्यनेच्या सत्रातही अंग दुखते, ते आपण तटस्थ आणि साक्षीभावाने पाहत असतो. संवेदना बदलत जातात. जगातली कोणतीही गोष्ट क्षणिक आहे हे तत्वज्ञान आपल्या मनावर ठसत जाते. येथे कोणताही तर्क नाही, कोणताही आग्रह नाही, केवळ अनुभुती आणि प्रत्यक्ष ज्ञान.
आवडले!
हे सुंदर आहे. काही गोष्टींचा ठसा विशिष्ट प्रकारेच घ्यावा यात् संशय नाही.

आपला
गुंडोपंत

केवळ शब्द माझे आहे.

वरील निवेदनातील शब्द माझे आहे, मूळ कल्पना भगवान बुद्धांची आहे.

ज्ञानप्राप्ति झाल्यानंतर एकाने बुद्धाला विचारले की भगवान, आपणामधे काय बदल झाला आहे. भगवानाने उत्तर दिले, पूर्वीही भुक लागत होती, झोप येत होती आणि आताही भुक लागते आणि झोप येते. फरक झाला असलाच तर इतकाच झाला आहे की, पूर्वी भुक / झोप मला लागत असे आणि आता भुक आणि झोप या शरीराला लागते.

विपश्यनेचा गाभा हा आहे.

मी इगतपुरीला १० दिवसांचा वर्ग केला.

मला आणि माझ्या सहनिवासिनीला ते मौन वैगरे झेपणारे नव्हते. आम्ही अखंड गप्पा मारायचो, भरपुर खादाडायचो आणि कुठलीही गोष्ट अजिबात गांभिर्याने करायचो नाही.

पण तिला शेवटच्या तीन दिवसात सतत एकच स्वप्न पडायचे - ती वाळवंटात चालली आहे आणि दुरून लोकसंगीताचे सुर ऐकू येत आहेत. ते संगीत तिने कधीच ऐकले नव्हते.

मात्र तिथल्या गुरुंनी सांगितले की तिला पूर्वजन्मीची आठवण येत आहे. आता ह्या गोष्टीचे वैज्ञानिक विश्लेषण कसे काय करायचे? हे जर खरे असेल तर नक्कीच विपश्यनेत काही तरी प्रचंड ताकद आहे.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

आणि खोटे असेल तर्...

हे जर खरे असेल तर नक्कीच विपश्यनेत काही तरी प्रचंड ताकद आहे.

आणि हे खोटे असेल तर विपश्यना कमी महत्त्वाची आहे असेच मानावे लागेल. बुद्धाने पुनर्जन्माच्या कल्पनेचा निषेध केला आहे. पण त्यावर जातककथांचे खंड प्रसिद्ध झाले आहे.

कोणतीही गोष्ट जर आणि तर च्या स्वरुपात असेल तर तिचा स्विकार करता येईल का?

कलंत्रीकाका

आणि हे खोटे असेल तर विपश्यना कमी महत्त्वाची आहे असेच मानावे लागेल.

प्रश्न खर्‍याखोट्याचा नाही तर जगात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची शहानिशा करण्याची मानवी बुद्धिची क्षमता आहे का हा आहे. माझे विधान "हे जर खरे असेल तर" ह्याचा अर्थ ह्या गोष्टीचे मुल्यमापन, सत्यता-असत्यता करण्याची माझी क्षमता नाही इतकेच.

ऋषीमुनी पण देवाला हेच म्हणतात, अज्ञान, अहंकार, मद, मत्सर इ. दूर करून कृपया मला सत्याचे दर्शन घडू दे. सत्य समजणे सोपे नव्हे आणि आपल्याला सत्य समजत नाही हे समजणे पण सोपे नव्हे.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

नवीन माहिती.

जवळ जवळ १५ वर्षांनतंर या महिन्याच्या पूर्वाधात पुण्यामध्ये स्वारगेट जवळ मी विपश्यनाचे सहावे शिबीर केले. एक काळाचा टप्पा म्हणून सुद्धा मी या शिबीरात विचार करत होतो. माझेच लेख, प्रतिक्रिया मी वाचल्यानंतर मी किती वरवरचा विचार करत होतो हे समजले.

सुदैवाने या शिबीरात अजून खोलवर जाता आले याचा मला आंनद वाटतो.

 
^ वर