दहशतवाद आणि आपद्धर्म- विश्राम ढोले
नुकताच उपक्रमावर आपद्धर्माविषयी चर्चा झाली. दैनिक सकाळ मध्ये माध्यम- माध्यम हे सदर लिहिणारे विश्राम ढोले यांचा हा दि. १९ जाने २००९ मधील लेख. विश्राम ढोले हे पुणे विद्यापीठात मास कम्युनिकेशन विभागात प्राध्यापक आहेत.तसेच संवेदनशील असे पत्रकार-लेखक आहेत. ते सातत्याने लेखन करत असतात. त्यांचा यापुर्वीचा एक लेख उपक्रमावर मतदान टेलीलोकशाहीतील टाकला होता. त्यांना उपक्रमाचे सदस्य होण्याचे निमंत्रण केले आहेच .उपक्रमावरील सदस्यांना या लेखाविषयी काय वाटते?
राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी प्रसारमाध्यमांकडून होणाऱ्या वार्तांकनाबाबत केंद्राने कायद्यात केलेल्या दुरुस्त्यांना वृत्तवाहिन्यांकडून विरोध होत आहे. तो योग्य असला तरी देशावरील संकटकाळात माध्यमांनीही आपद्धर्म पाळला पाहिजे याचे भान येणे आवश्यक आहे..
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा "केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन)' कायद्यातील दुरुस्तीचा गेल्या आठवड्यातील प्रस्तावाला साऱ्या वृत्तवाहिन्यांनी एकत्र येऊन त्याला ठाम विरोध दर्शविला आहे. वाहिन्यांच्या संपादकांनी घाईघाईने नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. थेट पंतप्रधांनांकडेही विरोध व्यक्त केला. अखेर सर्व संबंधित घटकांशी चर्चा केल्याशिवाय आणि विविध दृष्टिकोन लक्षात घेतल्याशिवाय या दुरुस्ती विधेयकाबाबत पुढचे पाऊल उचलले जाणार नसल्याचे पंतप्रधानांनी आश्वासन दिले आणि हा वाद तूर्त थांबला.
माध्यमांच्या नियमनाबाबत आपल्याकडे गोंधळाची परिस्थिती असल्याचे या घडामोडींमुळे पुन्हा स्पष्ट झाले. होऊ घातलेल्या दुरुस्त्यांमधील अनेक कलमे वरकरणी तरी अर्थाच्या दृष्टीने संदिग्ध आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने अव्यवहार्य आहेत. मुंबईवरील हल्ल्याच्या वार्तांकनाच्या पार्श्वभूमीवर या दुरुस्त्या आल्या आहेत. मात्र, "दहशतवादी हल्ले, युद्ध वा तत्सम राष्ट्रीय आणीबीणीचे अपवादात्मक प्रसंग यांच्यापुरता या दुरुस्त्यांचा संदर्भ मर्यादित आहे,' असे प्रस्तावात निःसंदिग्धपणे म्हटलेले नाही. शब्दांचे अन्वयार्थ काढून दंगली, राजकीय आंदोलने, महत्त्वपूर्ण तपास अशा अनेक परिस्थितींनाही या दुरुस्त्या लागू करता येऊ शकतात. आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने संवेदनशील प्रसंग कोणते हे ठरविण्याचे आणि त्यानुसार माध्यमांच्या नियंत्रणाबाबत थेट अंमलबजावणीचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस आयुक्ताच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हेतूंविषयी शंका
वास्तविक राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने आणीबाणीचे प्रसंग कोणते, माध्यमांनी त्या वेळी कसे वागावे याबाबत काही ठरविणारी, देखरेख आणि अंमलबजावणी करणारी यंत्रणाही राष्ट्रीय पातळीवरची आणि उच्चस्तरीय असली पाहिजे, हा साधा तर्क आहे. मात्र तसे न करता हे अधिकार अगदी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर आणले गेले आहेत. त्यामुळे एक तर या यंत्रणेकडून एकाच स्वरूपाच्या घटनांचे अर्थ वेगवेगळे लावले जाण्याची भीती निर्माण होते. शिवाय अशा पातळीवरच्या यंत्रणांवर राजकीय दबाव आणणे, त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे सरकारच्या हेतूंविषयी माध्यमांच्या शंका उपस्थित होतात.
माध्यमांच्या नियंत्रणाचे दुरुस्तींमध्ये सुचविण्यात आलेले स्वरूप कठोर आणि जाचक आहे. एखाद्या प्रसंगाचे चित्रण पुनःपुन्हा दाखवावे काय, वार्ताहराच्या "फोन इन माहिती'मुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते काय, अशा अनके गुंतागुंतीचे आणि संपादकीय स्वरूपाचे निर्णय घेण्याचे, प्रसारण थांबविण्याचे, कॅमरे जप्त करण्याचे अधिकार या सामान्य पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेकडे देण्यात आले आहे. त्यातील काही तरतुदी प्रसंगी "सेन्सॉरशिप'च्या अंगाने जाणाऱ्या आहेत. लोकशाही देशांमध्ये फक्त अत्यंत अपवादात्मक स्थितीतच वापरले जाव्यात अशा या तरतुदी आहेत. मात्र "तरतुदी अपवादात्मक स्थितीसाठीच्या आणि अंमलबजावणीसाठी संदिग्धतेमुळे रान मोकळे,' अशी विचित्र कोंडी या दुरुस्त्यांमुळे झाली आहे. दुरुस्त्यांचा रोख म्हणूनच दहशतवादी हल्ल्यांसारख्या अपवादात्मक आणि राष्ट्रीय बाबींच्या संदर्भात आहे की गुन्हे, न्यायालयीन खटले, दंगली, हिंसक आंदोलने, "स्टींग ऑपरेशन' यांसारख्या अनेकदा घडणाऱ्या आणि स्थानिक वा प्रादेशिक प्रसंगाच्या संदर्भात, हे स्पष्ट होत नाही.
माध्यमांनी अशा अनेकदा घडणाऱ्या प्रसंगांमध्येही नीतिमूल्ये पाळावीत, सार्वजनिक आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण करावे आदी अपेक्षांत चूक नाही. त्यासाठी माध्यमांचे योग्य नियमन व्हावे हेही योग्य. मात्र या पातळीवरच्या दैनंदिन नियमनाच्या बाबतीत सरकारने शक्यतो थेट हस्तक्षेप करू नये. ते काम एक तर माध्यमांकडेच सोपवावे वा त्यासाठी माध्यमांचा सहभाग असलेली आणि घटनात्मक अधिष्ठान असलेली "प्रेस कौन्सिल'सारखी यंत्रणा निर्माण करावी, हा लोकशाहीतील एक दंडक आहे. पण सरकारी पातळीवर आतापर्यंत त्याबाबत काही हालचाली नाहीत. शिवाय गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष वाहिन्यांनीच एकत्र येऊन वृत्तप्रसारण मानक प्राधिकरण स्थापल्यानंतर आता सरकारने पुन्हा काही करावे याची आवश्यकता राहिलेली नाही.
मात्र खरोखरच राष्ट्रीय आपत्ती आली असताना माध्यमांनी काय करावे आणि माध्यमांचे काय करावे याबाबत आपल्याकडे काही धोरण नव्हते. काही अहवाल लिहिले गेले, समित्या स्थापण्यात आल्या; पण पुढे काही झाले नाही. आणि आता या दुरुस्त्यांचा प्रस्ताव आला. त्यात सुचविण्यात आलेले सरकारी नियंत्रण फक्त आणीबाणीच्या प्रसंगातील आपद्धर्म म्हणून स्वीकारले जावेत असे आहेत. वास्तविक याबाबत जसे सरकारने भान ठेवण्याची आवश्यकता आहे; तसेच माध्यमांनीही ठेवण्याची गरज आहे. म्हणूनच अशा प्रसंगी माध्यमांनीही आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नेहमीचे तुणतुणे वाजविण्याचे सोडले पाहिजे. एरवी सदैव घेत असलेली सरकारच्या विरोधकाची भूमिकाही अशा प्रसंगी काही काळ स्थगित ठेवली पाहिजे. स्पर्धात्मकता, स्वातंत्र्य, माहिती मिळविण्याचा अधिकार वगैरे एरवी ठीक असणाऱ्या गोष्टींना अशा प्रसंगी दूर ठेवले पाहिजे.
दहशतवादाचा प्राणवायू...
आणीबाणीच्या परिस्थितीशी झगडणारी व्यवस्था म्हणून सरकारी प्राधान्यांना माध्यमांनाही निदान मर्यादित कालावधीसाठी तरी प्राधान्य दिले पाहिजे. त्यांचे नियंत्रण मानले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारासोबत लोकशाही माध्यमांवर ही जबाबदारीदेखील टाकत असते.
दहशतवादासारख्या घटनांमध्ये तर माध्यमांचा त्यांच्या नकळत आणि अगदी अपरिहार्यपणे वापर होत असतो. आधुनिक समाजव्यवस्थेतील माध्यमांचा या स्थानाचा आणि माध्यमांच्या कार्यपद्धतीचा दहशतवादी अगदी चपखलपणे वापर करीत असतात. हिंसा घडवून नाक दाबले, की माध्यमाकडून मिळणाऱ्या प्रसिद्धीचे तोंड अगदी अपरिहार्यपणे उघडते हे दहशतवाद्यांना चांगले माहीत आहे. ही प्रसिद्धी व त्यातून निर्माण होणारी दहशत म्हणजे तर दहशतवादाचा प्राणवायूच. म्हणूनच दहशतवादाविरोधातल्या व्यूहरचनेमध्ये माध्यमांचा सकारात्मक वापर करून घेण्याचा अधिकार सरकारलाही असलाच पाहिजे. त्यासाठी काही काळ थोडे निर्बंध सहन करण्याची मानसिकता माध्यमांनीही दाखविली पाहिजे. हे देशाच्या, स्वतः माध्यमांच्या आणि त्यांच्या प्रेक्षकांच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. म्हणूनच अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बेलारुस, कॅनडा यांसारख्या दहशतवादाचे चटके बसलेल्या देशांनी, अशा प्रसंगी माध्यमांनी काय करावे याबाबत कडक कायदे केले आहेत; आचारसंहिता तयार केल्या आहेत.
मुंबईवरील हल्ल्यांनंतर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांच्या संघटनेनी अशा प्रसंगी पाळायची एक आचारसंहिता तयार केली. ही बाब स्वागतार्हच आहे. पण अशा आपत्तीच्या प्रसंगी फक्त स्वनियमन नव्हे तर सरकारसोबत सहनियमनचाही गरज असते. दहशतवादविरोधातील व्यूहरचनेचाच तो एक भाग आहे, ही भूमिका माध्यमांनीही घेण्याची आवश्यकता आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य म्हणजे फक्त सरकारी नियंत्रणापासूनचेच स्वातंत्र्य नाही. ते दहशतवाद्यांविरुद्धचेही स्वातंत्र्य आहे हे भान येण्याची गरज आहे. म्हणूनच प्रस्तावित तरतुदींना विरोध करताना त्यातील आपद्धर्माचा मूळ गाभा स्वीकारण्याचा मोकळेपणाही माध्यमांनी दाखविला पाहिजे.
Comments
महत्वाचा विषय
लेख आवडला आणि विषय महत्वाचा आहे. मूळ गाभा जो आपद्धर्माशी निगडीत आहे तो महत्वाचा वाटतो. आज प्रसिद्धीमाध्यमे कोठलीच बंधने पाळतात असे म्हणायला जागा नाही. ती निष्पक्षपाती (राजकीय पक्ष इतक्या अर्थाने नाही तर जो काही प्रसिद्धी/बातमीचा विषय आहे त्यासंबंधात) असतात का हा अजूनही एक वेगळा मुद्दा आहे.
तरी देखील मुंबई हल्ल्याच्या वेळेस जी काही प्रसिद्धी, माध्यमे सातत्याने देत होती ते एक मोठे काम त्यांनी केले असेच त्यात असलेल्या तृटी लक्षात घेत असताना देखील मला वाटते. आज सरकार घाबरले असेल तर त्याचे कारण त्यांची लक्तरे वेशीवर या प्रसिद्धीमुळे टांगली गेली आहेत, हे आहे.
आज अधुनिक भारत हा लोकशाही म्हणून प्रौढत्वाकडे जात आहे. ४७ ते साधारण नव्वदच्या दशकापर्यंत चा कालावधी पाहीला तर काय समजते? - माध्यमांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बरेच अंकूश असायचे. बहुंताशी सरकारी यंत्रणा आणि अर्थातच राजकीय पक्षांचे सरकार यांचे नियंत्रण असायचे. दंगल झाली तरी त्याची बातमी कशी देयची, विशेष करून ते जर हिंदू-मुस्लीम वैमनस्य असेल तर त्यात एका जमातीकडून दुसर्या जमातीवर हल्ले असले अफवांना जास्तच मदत होईल असे लिहीणे असायचे. (असे म्हणायचे कारण इतकेच की पंजाब/शिख दहशतवाद असे म्हणायला कोणाची हरकत नसायची). कारणे अनेक आहेत आणि त्यावर चर्चा करता येईल, पण एकंदरीत राव सरकार आणि त्यानंतर आलेल्या सर्व सरकारांच्या प्रगतीशील आणि व्यक्तीस्वातंत्र्यांच्या धोरणामुळे एकंदरीत अनेक वृत्तवाहीन्या आल्या, एका पक्षाची निरंकूश सत्ता संपली, न्यायालये प्रबळ झाली, भारतीयांचे परदेशात जाणे वाढले आणि सगळ्यात महत्वाचे आंतर्जाल आले.
आज त्याचा चांगला परीणाम इतकाच झाला आहे की प्रमुख वृत्तपत्रांना (टोकाची सोडून - त्यात सामना येईल आणि तहलका पण येईल) कुठेतरी समतोल गाठावा लागतो. उ.दा. : मग लोकसत्तेत केतकर संपादक असले तरी सुधींद्र कुलकर्णींचे लेख पण येतात, टाईम्स मधे तरूण विजयंचे लेख येतात तर म.टा. चे माजी संपादक आता शिवसेनेकडून राज्यसेभेत जाऊनही म.टा.चे संपादक सल्लागार राहू शकतात आणि त्याच बरोबर म.टा. मधे संघ, शिवसेना. हिंदूत्वाला झोडपणारे लेखपण येऊ शकतात. तेच सकाळ संदर्भात म्हणता येईल..
मात्र असा चांगला परीणाम दिसत असताना देखील प्रसिद्धीमाध्यमे ही राजकारण्यांसारखीच विकाऊ आहेत असे वाटायला जागा झाली आहे. ते विशेष करून वृत्तपत्रांपेक्षा वृत्तवाहीन्यांमुळे झाले आहे. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळते अशी अवस्था...
म्हणूनच आचारसंहीता वगैरे असली पाहीजे पण ती दुहेरी असली पाहीजे. म्हणजे जर माध्यमांना अशावेळेस आचारसंहीता पाळावी लागत असेल तर ती राजकीय पक्ष, सरकार आणि पुढार्यांना पण लागू होणे महत्वाचे आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात जेंव्हा बेलगाम बोलणारे पुढारी (सर्वच पक्षाचे) या माध्यमांचा उपयोग स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करणार असतील तर त्याबद्द्ल काय? किमान सरकारमधे तरी अशावेळेस एकच प्रवक्ता मंत्री असला पाहीजे. पक्षाकडून नव्हे... (९/११ नंतर असा प्रकार वीट येईल इतका संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफिल्ड आणि ऍटर्नी जनरल जॉन ऍशक्रॉफ्ट यांनी केला - पण इतर सर्व तेंव्हा शिस्त असल्याप्रमाणे गप्प असायचे. आचारसंहीत नसूनही).
बाकी अमेरिकेशी तुलना करताना अधिक लिहीता येईल - विशेष करून युद्धाच्या जगात पत्रकारीतेला कसे सैन्यदलाबरोबर बांधून (एम्बेड) करून नेले जाते आणि तरीपण त्यांना किती स्वातंत्र्य असू शकते याबद्दल तसेच ते, ते स्वातंत्र्य कसे जबाबदारीने पाळतात याबद्दल ही...
बाकी स्वातंत्र्य आणि जबाबदारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहे. नाणे लोकशाही म्हणा. एक बाजू नसली अथवा नीट नसली तर नाणे खोटेच...
सेन्सॉरशिप आणि "संकट"कालीन निर्बंध
लेख आवडला. वाहिन्यांच्या "आपद्धर्मा"बद्दलच्या कायद्याबद्दलच्या दोन्ही (खरे तर अनेक ) बाजू चांगल्या मांडल्यात. वर विकासरावांचेही विश्लेषण आवडले.
जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती समोर येते की ज्यात दोन्ही बाजूंमधे काही नाजूक जागा आहेत , परस्परविरोधी अशा दोन्ही बाजूंमधे सत्याची , न्यायाची भूमिका आहे तेव्हा गोंधळ होतोच. व्यक्तिशः मला (आजच्या घडीला ) असे वाटते की, शेवटी पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक माध्यमे या गोष्टी लोकशाही अर्थपूर्ण रीतीने चालवायला अत्यावश्यक बाबी आहेत. आपद्धर्म संबंधी निर्बंधाखाली त्यावर सेन्सॉरशिपची कुर्हाड कोसळणार असेल तर त्याचे लोकहिताच्या दृष्टिने होणारे नुकसान फार मोठे आहे. त्यामानाने बरखा दत्त आणि इतर प्रभृतींच्या दहशतकालीन वर्तनाने होणारे दुष्परिणाम इतके मोठे नाहीत असे वाटते. पत्रकारांनी सगळ्या गोष्टींचा अतिरेक केला , यात त्यांच्या संवेदनशीलतेचा अभाव जाणवला हे मान्य. मात्र त्यांच्या वर्तनाने राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला हे मला अमान्य आहे. २४/७ अशा प्रक्षेपणामुळे सरकारच्या चड्ड्या सुटल्या , या परिस्थितीत पोलीस कसे "सिटीन्ग् डक्स्" आहेत , शिवराज पाटील यांसारख्यांचे वर्तन कसे होते, रम गोपाल वर्माने याचा गिधाडासारखा वापर कसा केला , देशमुखांनी कसा होऊ दिला कोण कसे वागले याचे इत्थंभूत दर्शन घडले. जी सत्ये १० वर्षांपूर्वी समोर आली नसती ती ढळढळीतपणे आली. काय वाईट आहे यात ? सत्य काय आहे हे लोकांपर्यंत पोचविणे हे काम उत्तम वठले असे मला वाटते. आपद्धर्माच्या नावाखाली निर्बंध आणणे या गोष्टीला , १९७५ च्या घटनांचा वास आहे असे मला स्पष्टपणे वाटते. असे वाटण्यात माझा समतोल ढळला असे कुणी म्हणेल. पण पत्रकारिता , इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्यावर कुठल्याहि निमित्ताने बंधने आणणे याच्या वार्ता सुरू झाल्या की मला अस्वस्थ वाटू लागते खरे.
अवांतर : नेहमीप्रमाणे , आपले केंद्रसरकार पत्रकारांच्याही लॉबिंगला दबले. या घटनेतली विसंगती जाणवून मला थोडे हसू आले.
लेख आवडला
मुळ लेख आणि विकासरावांचा, मुक्तरावांचा प्रतिसाद असे दोन्हि आवडले.
आपल्या वृत्तपत्रांची/चॅनेलांची वार्तांकनाची पद्धत चुकीची वाटली तरी त्याने सध्या जनसामान्यांमधे दिसणारा आवश्यक असा असंतोष तयार झाला आहे हे निर्विवाद!
या बाबतीत माझे पुर्वीचे मत अजूनहि बदलेले नाहि. अश्या काहि अपवादात्मक युद्धजन्य प्रसंगी "थेट" प्रक्षेपणाला बंदी असावी. मात्र चित्रीकरणाला तसेच केलेले चित्रीकरण काहि वेळाने प्रक्षेपित करण्यास सहज बंदीं घालणे शक्य नसावे.
अशी बंदी घालता येणे फक्त संसदेतील दोन्हि सभागृहांच्या २/३ बहुमताच्या अखत्यारीत करणे वगैरे उपाय करता येतील असे वाटते.
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
नियंत्रण
प्रतिसाद फार उशीरा देत आहे. क्षमस्व.
कोणत्याही प्रकारे प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणले जाणे हे अयोग्यच आहे.
परंतु दुसर्या बाजूने विचार करणेही आवश्यक वाटते. जेव्हा जेव्हा अशा नियंत्रणाचा मुद्दा पुढे येतो, त्यावेळी माध्यमांकडून आणि स्वातंत्र्यवाद्यांकडून आमचे नियंत्रण आम्हाला स्वतःलाच करू द्या असा आग्रह धरला जातो. असे स्वनियंत्रण करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. परंतु प्रत्यक्षात हे सरकारी नियंत्रणाचे 'संकट' टळले की त्यादृष्टीने कोणतीही हालचाल या माध्यमांकडून केली जात नाही. पुन्हा संकट आले की तोच मुद्दा मांडला जातो.
हे वर्षानुवर्ष चालू राहते.