मतदान "टेलीलोकशाही"तील

दैनिक सकाळ दि. ७ जाने २००८ मधील "सारांश" मधिल विश्राम ढोले यांचा हा लेख. मला ख-या अर्थाने "माध्यमवेध" वाटतो. लेखकाचा परिचय मी इथे आत्ता जाणिवपुर्वक करुन देत नाही ,कारण त्यांची ओळख ही स्वयंभू आपल्या लेखनातुन मिळते.आपल्याला काय वाटतं? हे महत्वाच.

मतदान "टेलिलोकशाही'तील

हा लेख वाचेपर्यंत महाराष्ट्राचा नवा महागायक किंवा महागायिका कोण, या लाख मोलाच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळालेले असेल. गेले काही आठवडे महाराष्ट्रातील तमाम संगीत आणि टीव्हीप्रेमी जनतेला या निवडीबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. कोण जिंकणार... पुण्याची सायली, नागपूरचा अनिरुद्ध की (अमरावतीची) वैशाली, यावर घराघरात चर्चा झडत होत्या. ....
रस्त्यांवर मतांचा जोगवा मागणारे होर्डिंग दिसत होते... मते दिली जात होती आणि मुख्य म्हणजे मते ("एशेमेश'द्वारे) पाठविली जात होती. गुजरातमध्ये मोदी जिंकणार की कॉंग्रेस आणि विलासराव पदावर राहणार की जाणार, या दोन प्रश्‍नांचा थोडासा अपवाद वगळता गेले एक दोन-महिने मराठी समूहमनाला महाविजेता कोण ठरणार, यापेक्षा लाखमोलाचा प्रश्‍न पडला नसावा.

बाकी आपल्या लोकसभा-विधानसभावाल्या निवडणुका आणि या टीव्हीवरच्या निवडणुका यांच्यात तसे बरेच साम्य आहे. उदाहरणार्थ, मतदारांना आवाहन कसे करावे, त्यासाठी स्वतःची कशी प्रतिमा उभी करावी, यांबाबत विविध स्पर्धांमधील टेलिउमेदवारांनी आपल्या लोकशाहीवाल्या नेत्यांचाच कित्ता गिरविला आहे. नुसत्या गुणवत्तेवर भारतात मते मिळत नाहीत... त्याला विविध अस्मितांची जोड द्यावी लागते, हा धडा त्यांना इतक्‍या साऱ्या निवडणुकांमधून चांगलाच माहीत झाला आहे. त्यामुळे "पुण्याचे पाणी आहेच तसे' आणि "नागपूरचा नूर आला बे' अशा अस्मितादर्शक घोषणांची या टेलिनिवडणुकांमध्येही रेलचेल दिसून येते. प्रादेशिक, स्थानिक, धार्मिक (किंवा अन्य) अस्मितांचा "एमएमएस' मतदानासाठी वापर करण्याची पद्धत आता अशा बहुतेक टेलिनिवडणुकांमध्ये रूढ झाली आहे... आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला चांगले यशही येते, असे दिसून आले आहे. आपल्या राज्याचा- गावाचा अमकातमका स्पर्धक मागे पडत आहे... त्याला "एसएमएस'ची गरज आहे, असे आवाहन करताच मतांचा पाऊस पडला असल्याची उदाहरणे कोल्हापूर ते काश्‍मीर (व्हाया आसाम-पश्‍चिम बंगाल-नेपाळ) बघायला मिळतात. अशा प्रादेशिक स्थानिक अस्मितांमुळे गुणवान स्पर्धकांवर अन्याय होऊ शकतो... नव्हे; अनेकदा होतोही. हिंदी "सारेगामापा'च्या एका कार्यक्रमामध्ये तर (नेहमीप्रमाणे) चिडलेल्या हिमेशभाई रेशमियाने सूचना केली- स्पर्धकाच्या राज्यातून आलेले एसएमएस त्याच्या खात्यात जमा करू नये. हिमेशभाईची सूचना तशी (फॉर ए चेंज) विचार करण्यासारखी होती; पण दिलेल्या मतांचा टेलिनिवडणुकांमध्येही असा अनादर करता येत नसतो, हिमेसभाई...

नुसत्या अस्मितांनीली भागत नसते... तरुण "एशेमेश' मतदारांना स्पर्धकाचे कूल व्यक्तिमत्त्व भावते... त्यामुळे मग त्यांना कूल दिसण्याचाही सराव करावा लागतो... (चॅनेलवाले घेतात त्याची काळजी)... काहीतरी सहानुभूतीची गोष्ट सांगावी लागते किंवा निर्माण तरी करावी लागते... प्रसंगी नाटकबाजी करावी लागते... निवडणुकीतील उमेदवारांप्रमाणे स्पर्धकही निदान उघडपणे तरी असा धोक्‍याचा मार्ग शक्‍यतो पत्करत नाहीत... ते नम्रतेची, विद्यार्थीपणाची आणि प्रयत्नांची पराकाष्ठाच करीत असतात... संगीताच्या सेवेची ग्वाही देत असतात. मग अशा वेळी कधी कधी हे काम त्यांचे गुरू, घराणे, परीक्षक वगैरे मंडळी करतात... (आठवा हिंदी सारेगामापा किंवा महेश भट, इस्माईल दरबार, भप्पीदा प्रभृती गुरू वा परीक्षक असलेले कार्यक्रम) साम्य इथेही संपत नाही. निवडणूक म्हटली की गैरप्रकार (निदान त्यासंबंधीचे आरोप तरी) आलेच. टेलिनिवडणुकांमध्येही ते आहेतच. उदाहरणे तशी बरीच देता येतील; पण "नच बलिये'तील उमेदवार राखीताई सावंतांनी "स्टार प्लस'वर केलेल्या आरोपांचे उदाहरण ताजे आणि पुरेसे आहेत. "एसएमएस' करण्यासाठीच सिमकार्डे खरेदी करून त्यावरून घाऊक प्रमाणात संदेश पाठविण्याचे प्रकारही निवडणुकांतील "बुथ कॅप्चरिंग'ची आठवण करून देणारे.

अशी साम्यस्थळे खूप शोधता येतील. पण एक साम्यस्थळ जरा निराश करणारे आहे. लोकशाहीतील निवडणुकांमध्ये जिंकणारे उमेदवार मतदारांना नंतर पुढे फारसे कुठे दिसत नाहीत. बहुतेकांना मतदारांसाठी भरीव काही करताही येत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता टेलिनिवडणुकांमधील विजेत्यांच्या बाबतीतही हे लागू होते. गुणवत्ता असून, व्यासपीठ आणि प्रसिद्धी मिळूनही बहुतेकांना पुढे काही करता येत नाही. स्टुडिओच्या झगमगाटातील नियंत्रित, औपचारिक आणि लोकाश्रयी स्पर्धेपेक्षा प्रत्यक्ष जगण्यातले स्पर्धा आणि वास्तव खूप वेगळे, अनियंत्रित, अकल्पित आणि बरेचदा क्रूर असते. तिथे ना "एसएसएस' कामास येतात ना परीक्षकांच्या सूचना, विजेत्यांना हे भान असणे गरजेचे आहे आणि आपण सर्व टेलिमतदारांनाही. अशाच एका टेलिनिवडणुकीत परीक्षक असूनही लालूप्रसाद म्हणाले, "ये टीवीपे भाषण देके और गोल गोल अंग्रेजी बोलके थोडे ही न कोई देसका नेता बनता है...' जगण्यातले इतके रांगडे वास्तव लालूंकडून नाही कळणार तर कोणाकडून?

तरीदेखील अशा टेलिनिवडणुका रात्रीगणिक वाढतच आहेत. गेल्या तीनेक महिन्यांमध्ये प्रमुख हिंदी आणि मराठी वाहिन्यांवरच दहा बारा निवडणुका झाल्यात आणि होताहेत. नेत्यापासून तर गायकापर्यंत, क्रिकेटपटूपासून तर नर्तकापर्यंत आणि हास्यसम्राटांपासून तर कॅम्पस हिरोंपर्यंत अनेक महाविजेत्यांना निवडून देण्याची ऐतिहासिक जबाबदारी एसेमेसधारी मतदारांवर येऊन पडणार आहे. आपल्याला आवडो न आवडो; पण आपल्या साऱ्या सांस्कृतिक जाणिवांचे, आवडीनिवडीचे आणि आविष्कारांचे माध्यमविश्‍वाकडून झपाट्याने साऱ्या गुणादोषांसह लोकशाहीकरण होत आहे; पण लोकशाही मूल्यांपेक्षा या प्रक्रियेचे आर्थिक मूल्यांशी जवळचे नाते आहे. पूर्वीही हे होतेच; पण आता टीव्ही आणि मोबाईलच्या संयोगाने तिला अस्सल भारतीय निवडणुकांचेच स्वरूप आले आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात ही अशी निवडणुककेंद्रित टेलिलोकशाही असावी का, हा खरा प्रश्‍न आहे.

शेवटी लोकशाहीतील निवडणुका आणि टेलिलोकशाहीतील निवडणुकांमधील एक महत्त्वाचा फरक... खऱ्या निवडणुकांमध्ये मतदाराला मत देण्यासाठी पैसे खर्चावे लागत नाही- (उलटपक्षी कधीकधी मतदारांनाच पैसे मिळतात); पण टेलिलोकशाहीमध्ये मात्र मतदानानंतर तुमचाच खिसा हलका होतो. आणि त्यातूनच स्पर्धकांचे, वाहिन्यांचे, जाहिरातदारांचे आणि मुख्य म्हणजे मोबाईल कंपन्यांचे हित साधले जाते. कार्यक्रमांमधून दोन घटका मनोरंजन होते हे खरे. पण टेलिनिवडणुकांमध्ये जब वुई व्होट... आपण सोडून सगळ्यांची मज्जा रे मज्जा होते हे अधिक खरे.
- विश्राम ढोले

 
^ वर