हल्लीच निवृत्त झालेल्या पाद्री पियोवासन यांची मुलाखत

मराठी भाषेत आपण हिंदू धर्मातील अंतर्गत संवाद आपण पुष्कळदा वाचतो. अन्य धर्मांच्या लोकांमधील अंतर्गत संवाद मात्र आपल्या वाचनात फारसा येत नाही. वसईच्या सुवार्ता या मराठी मासिकात कॅथोलिकांचा असा संवाद प्रसिद्ध होतो, म्हणा, पण ते संकेतस्थळ किंवा ती पत्रिका माझ्या नेहमीच्या वाचनात नाही. "सुवार्ता" मधील पुढील मुलाखत (जुनी असल्यामुळे संकेतस्थळावर आता दिसत नाही) कोंकणी भाषांतरात मला गोव्याच्या सुनापरांत वर्तमानपत्रात सापडली. (सुनापरांत संकेतस्थळावर केवळ एका महिन्याचा विदाच उपलब्ध असतो - ही मुलाखत आता तिथेही सापडत नाही.) त्या मुलाखतीचे कोंकणीतून मराठीत भाषांतर (म्हणजे द्राविडी प्राणायामच झाला!) येथे देत आहे.

वेगवेगळ्या समाजातील अंतर्गत वाद-विवाद-संवाद हे काही प्रमाणात त्या समाजाच्या मनात खिडकी म्हणून अधिक प्रामाणिक असतात, असे मला वाटते. कुठलाही गटाचा मनुष्य दुसर्‍या गटाने वाचण्याकरिता काही लेखन करतो, तेव्हा कळे-नकळे "प्रवक्त्या"च्या भूमिकेत जातो. त्याच्या बोललेल्या मतांमध्ये एका प्रकारची स्वसंरक्षणात्मक मर्यादा येऊ शकते. म्हणून एका निवृत्त पाद्रीबाबाने अन्य कॅथोलिकांसाठी म्हणून दिलेली ही मुलाखत माहिती म्हणून कॅथोलिक नसलेल्या मराठी वाचकांनाही उपयोगी ठरावी.

- - - - -
धर्मग्राम ही ख्रिस्तसभेची महत्त्वाची चौकट

(फादर व्हिक्टर पियोवासन हे येशुसंघीय [जेझुइट] धर्मगुरू १९५०मध्ये भारतात आले. त्यांना १९५८ मध्ये गुरुपदाची दीक्षा मिळाली. दुसऱ्या विश्व परिषदेच्या शिकवणीबद्दल ते विशेषज्ञ होते, म्हणून त्यांना "चालते-फिरते व्हॅटिकन" म्हणून ओळखत. भारतात साधारण ५८ वर्षे काम केल्यानंतर हल्लीच ८१ वर्ष वय झाल्यावर ते आपल्या मूळ गावाला, इटालीला, परत गेले. जाण्या पूर्वी त्यांनी धर्मगुरू, सुवार्ताप्रचार, आणि संस्कृतीकरण यांबद्दल व्यक्त केलेले विचार.)

मायभूमीला परत जाताना तुम्हाला काय वाटत आहे?
: एक युवा धर्मगुरू म्हणून मी भारतात पाऊल ठेवले, आणि आता वृद्ध होऊन मी येथून जात आहे. माझ्या जीवनातला सर्वोत्तम काळ मी येथे घालवला आहे. मंगळूरच्या सेंट जोसेफ सेमिनरीमध्ये ४९ वर्षे मी ईशज्ञान (थियॉलॉजी) शिकवले. आजपर्यंत एक हजार धर्मगुरू आणि अकरा बिशप हे माझे विद्यार्थी म्हणून चर्चला दिलेत याबद्दल मला खूप आनंद होतो.

या विद्यार्थ्यांनी भारतीय चर्चमध्ये केलेल्या कार्याविषयी तुम्हाला कितपत समाधान वाटते?
: त्यांना शिकवले याबद्दल मला आनंद आहे. पण त्यांच्या कार्याविषयी मला समाधान वाटत नाही. धर्मगुरूंचे आकड्यांतले मोठे प्रमाण हे ख्रिस्तसभेचे एक मोठे दुखणे आहे. धर्मगुरू खूप आहेत, पण संस्था थोड्याच आहेत, यामुळे चर्चचा विकास खुंटलेला आहे. मॅनेजर, डायरेक्टर, संघटक, या अशा कामांत आपण गढून गेलो असल्या कारणाने, आपण सर्वप्रथम पालक आहोत, मिशनरी आहोत, याचा खूपशा धर्मगुरूंना विसर पडला आहे. चर्चमधल्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना आपले वर्चस्व हवे. भारतात हजारो धर्मगुरू आहेत, पण ते आपल्या पालक-कर्तव्याला न्याय देतात, असे कोणी म्हणू शकते का? भारतीय ख्रिस्तसभा ही एक राजकीय संघटना झाली आहे, आणि तिथे प्रत्येक गोष्ट सत्ता आणि अधिकाराच्या तागडीत मोजतात, असे मी म्हणतो. चर्च बांधणे चालू आहे, कित्येक संघटनांचे पीक येत आहे, धर्मप्रांतांचा आकडा वाढत जातो, तशी धर्मगुरूंच्या आणि बिशपच्या संख्येत वाढ होत चालली आहे. मात्र त्या प्रमाणात भारतीय ख्रिस्तसंस्थेचा विकास होताना दिसत नाही. हजारोंनी भारतीय धर्मगुरूंपेक्षा मूठभर विदेशी धर्मगुरूंनी अधिक लोकांना ख्रिस्ताकडे आणले आहे.

भारतीय धर्मगुरूंना तुम्ही इतके कमी लेखता?
: नाही. मी नेहमीच समीक्षकाच्या नजरेने बघतो. माझ्या विषयी त्यांचा कुठलाही गैरसमज होणार नाही. त्यांनी त्यांच्या अंगात मिशनरी वृत्ती बाळगायला पाहिजे. अधिक नम्रपणे वागले पाहिजे, अधिक आध्यात्मिक झाले पाहिजे, ख्रिस्ताचे खरे साक्षीदार आणि अधिक ख्रिस्तप्रेमी झाले पाहिजे, असा इतकाच माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. सगळ्या भारतीय धर्मगुरू आणि बिशपांपेक्षा मदर तेरेसांनी अधिक लोकांपर्यंत सुवार्ता पोचवली. तिने देवळांमध्ये प्रवचने देऊन सुवार्ता पोचवली नाही. तिने गरिबांची सेवा करून, त्यांच्यावर प्रेम करून ख्रिस्ताच्या वैयक्तिक अनुभवाची साक्ष समजावून दिली. धर्मगुरूने हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. प्रत्येक धर्मगुरू जर मदर तेरेसा झाला, तर भारतीय चर्चचा खराच विकास होईल, आणि माझी टीकाही बंद होईल.

आजच्या काळात धर्मांतराला हिंसक विरोध होतो, तो लक्षात घेऊनही तुम्ही अधिक धर्मांतराची अपेक्षा करत आहात काय?
: ख्रिस्ती धर्मीयांचा आकडा वाढवायची मला आवड नाही. बाप्तिस्मा देऊन ख्रिस्ती लोकांचा आकडा वाढवायचा, याला मी धर्मांतर म्हणत नाही. सुवार्ता प्रसार म्हणजे ख्रिस्ताची शुभवार्ता लोकांपर्यंत पोचवायची. वैयक्तिक साक्षीतून हे काम अधिक परिणामकारक करता येते. मदर तेरेसाने एकाही माणसाला बाप्तिस्मा दिला नाही. पण लाखो लोकांपर्यांत सुवार्ता पोचवली. भारतात सुवार्ता प्रसारासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. आमचे जगणे, प्रेम करणे, सेवा करणे, आणि शत्रुला माफ करणे, याच्यातून आम्ही ख्रिस्तराज्याची घोषणा करू शकतो. ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला नाही, आणि तरीही ते ख्रिस्ताला मानतात, ते ख्रिस्तीच आहेत.

याचा अर्थ, मुळातच सेमिनरीत दिलेल्या शिक्षणात त्रुटी आहेत, असा आहे काय?
: होय. मलाही तसेच वाटते. धर्मगुरूंच्या मिशनरी जडणघडणीविषयी गेल्या दशकात खूपच गप्पा झाल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. अशा जडणघडणीविषयी सेमिनरियन्स सुद्धा हुरूप दाखवत नाहीत. अन्य भारतीय युनिव्हर्सिटींसारखा सेमिनरीतल्याच जडणघणीवर अधिक भर दिला जातो. येथे हरेक गोष्ट एका आखीव चौकटीत बांधतात. म्हणूनच सेमिनरीतून बाहेर पडलेला धर्मगुरू या चौकटीच्या बाहेर पडायला बघत नाही. फक्त रविवारच्या मासपुरती लोकांना मदत करायची एवढेच सेमिनरियन्सचे काम नसले पाहिजे. गावांना भेट द्यायची, गरिबांच्या सहवासात राहायचे, समाजसेवा करायची, आणि लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, हे गरजेचे आहे. आमच्या सेमिनरी जीवनात या गोष्टी अजून दिसून येत नाहीत.

संस्कृतीकरणाच्या अभावामुळे सुवार्ता प्रसाराचे काम प्रभावीपणाने होत नाही, असे आहे काय?
: आज संस्कृतीकरण कुठे आहे? आणि या बाबतीत जे काही प्रयत्न झालेले आहेत, त्यांचा पाठपुरावा किती जण करतात? आणि जे काम झाले आहे, ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलेच नाही, असे माझे मत आहे. संस्कृतीकरण हे लोकांच्या वरून धोपटण्यापेक्षा ते लोकांना मधून आले पाहिजे. ख्रिस्तसभेत त्याचा विकास अगदी तळागाळातून आणि सोपेपणाने होण्यासाठी मदत केली पाहिजे.

भारतीय ख्रिस्तसभेला जो एक पाश्चात्त्य तोंडावळा मिळाला आहे, तो पाश्चिमात्त्य मिशनरींमुळे आहे की काय?
: बऱ्याच प्रमाणात होय. आम्ही एका वेगळ्या वातावरणातून येथे आलो, आणि कलत-नकळत आमची संस्कृती इथल्या ख्रिस्ती लोकांवर लादण्याची चूक आमच्या हातून घडली आहे. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज भारतीय ख्रिस्तसभा ही स्थानीय लोकांच्या हातात आहे, त्यामुले बदल अपरिहार्य आहे.

भारतीय चर्चपुढे कुठली आह्वाने आहेत?
: भारतातील लोकांमध्ये असलेली प्रचंड क्षमता आपण मान्य केलेली नाही, हे तर आहेच. पण संसाधनांचा वापरही केलेला नाही. त्यामुळे भारतीय ख्रिस्तसभा खुंटल्यासारखी झालेली आहे. सुवार्ता प्रसारात सर्वसामान्य माणसाला आपलेसे केल्याशिवाय चर्चचा विकास होणार नाही. बायकांपेक्षा आम्ही मोठे असल्याची भावना यापुढेही बाळगत राहिलो, तर भारतीय ख्रिस्तसभा विकसित होणार नाही. विविध विधींच्या नावाखाली आपण आपसातच भांडत राहिलो, तरीसुद्धा भारतीय ख्रिस्तसभा विकसित होणार नाही. सत्तेसाठी भांडणे, पुरुषी वर्चस्व, आणि वैयक्तिक मोठेपणासाठी झालेली भांडणे बघून माझ्या मनात खरे दुःख होते.
आता बघा, भारतीय ख्रिस्तसभेत ९०%पेक्षा अधिक काम सिस्टरी करतात. पण आपण त्यांचे ऋण मान्य करतो का? सिस्टरी एखादी इंग्रजी माध्यमातली शाळा सुरू करतात. आणि ती शाळा बऱ्या प्रकारे चालू लागली, की बिशप ती आपल्या हक्काखाली घेतात. आणि जर त्यांच्या विभागात इंग्रजी माध्यमाची शाळा असेल, तर सिस्टरींना दुसरी शाळा उघडू मात्र देत नाहीत. हे योग्य आहे का? आपल्या चमूतल्या लोकांच्या आध्यात्मिक जडणघडणीपेक्षा ह्या लोकांना विभागाच्या प्रशासनाची अधिक चिंता आहे.

आता भारत सोडून जाताना तुम्ही भारतातल्या चर्चसाठी काय संदेश द्याल?
: सर्वसामान्य माणसाचे महत्त्व ओळखा. प्रेम, सेवा, क्षमा, आणि भागीदारी, या तत्त्वांवर आधारित ख्रिस्ती समाजाच्या इमारतीची बांधणी करण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. वेगवेगळ्या ख्रिस्ती संस्थांच्या आणि सत्ताकेंद्रांच्या चाव्या त्यांच्याकडे सोपवा, आणि त्या संस्थांच्या प्रशासनात त्यांनाही भागीदार बनवा. त्यांना बाहेर ठेवून दुभावाच्या नजरेने बघू नका. तिथे चुकलात, तर ख्रिस्तसभा कोसळून पडेल. ख्रिस्तसभा ही सर्वसामान्य माणसांसाठी नसून, तेच ख्रिस्तसभा आहेत. धर्मग्राम ही ख्रिस्तसभेची सर्वात महत्त्वाची चौकट आहे. धर्मप्रांत किंवा सरधर्मप्रांत तितक्याच महत्त्वाचे नाहीत. म्हणूनच भारतीय ख्रिस्तसभेची धर्मग्रामापासून वाढ व्हायला पाहिजे, आणि त्याचकरिता सर्वसामान्य माणसांच्या हातात नेतृत्वाची धुरी द्यायला पाहिजे.

(मूळ "सुवार्ता" मधून - सुनापरांत ५ ऑक्टोबर २००८ मध्ये ही मुलाखत प्रसिद्ध झाली.)
- - - -

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म्म

मुलाखत वाचली. वाचल्यावरचे माझे मत तरी असे झाले की ख्रिश्चनांना जसा प्रसार अपेक्षीत होता तो झाला नाही. माझ्या मते तो होणार सुद्धा नाही. मुळातच ही धर्मांतरे न्युनगंडापोटी अथवा लालुच दाखवुन झाली आहेत. त्याचे परिणाम फारसे चांगले असतील असे वाटत नाही. धर्म बदलुन मानसिकता बदलत नाही. सदर धर्मगुरु/प्रसारक ज्याला स्वतःची टिका म्हणतो ती मला टिका वाटत नाही तर अपयशाची कबुली वाटते.
समाजाचे भले करण्यासाठी धर्माच्या शिकवणीची गरज भारतात आहे का? जर भारत धर्मनिरपेक्ष आहे तर नाही. पण एखाद्या राष्ट्राला धर्माची शिकवण हवी असे मला वाटते.
ख्रिस्ती समाज/धर्मगुरु/संस्थांमध्ये पुरुषी वर्चस्वाचे दुखणे सांगितले आहे ते भारता पुरते मर्यादित असावे असे वाटत नाही. व्हॅटिकनची सुत्रे किती स्त्रियांनी सांभाळली आहेत अथवा सांभाळायला दिली आहेत? याचे उत्तर सुद्धा अपेक्षीत आहे.

बरेच लिहावे वाटते, पण भारतभुमीत येऊन लोकांची दिशाभुल करुन बाटवणे आणि त्या कामाला येशुच्या जवळ नेण्याचा मुलामा लावणे हे पटत नाही. अनेक मिशनर्‍या शैक्षणीक संस्था उभ्या करण्याचे काम करतात. पण आजवर तेथे भारतातल्या सर्वधर्म समभावाची शिकवण दिलेली ऐकीवात नाही. या उलट हिंदू संचलीत शाळांमध्ये हे नक्कीच दिसुन येईल. ते ही गरज नसताना. असो.





बाह्य प्रवक्ता/अंतर्गत विवादचर्चा यांत फरक

तुम्ही विचारलेले काही प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. तरी बाह्य प्रवक्ता आणि अंतर्गत विवादचर्चा करणारा यांच्यात फरक ओळखावा.

उदाहरणार्थ व्हॅटिकनमध्येसुद्धा स्त्रियांना कमी किंमत का आहे याचे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे. त्रयस्थाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे, खरे. पण हे पाद्री त्रयस्थाला मुलाखत देत नसून भारतातील एका कॅथोलिक पत्रिकेला मुलाखत देत आहेत.

मला वाटते कुठल्या गटातील अंतर्गत विवाद वाचताना, आणि त्या गटाच्या प्रवक्त्याचे लेखन वाचताना, या दोन्ही प्रसंगांत वाचकाने वेगवेगळ्या प्रकारचा समीक्षक दृष्टिकोन घ्यावा. असे केल्यास माहिती मिळवण्याच्या बाबतीत जास्तीतजास्त फायदा करून घेता येतो.

परदेशी वर्तमानपत्रातील संपादकीये तुम्ही वाचत असाल. तेव्हाही तुम्ही अशाच प्रकारे वेगळ्या दृष्टीने वाचन करत असाल. तुम्हाला नेमके कुतूहल असलेल्या प्रश्नाबाबत त्यांना मुळीच भाष्य करायचे नसेल. अशा परिस्थितीत "त्यांना अमुक समस्या निर्वाणीची वाटते, तमुक प्रश्नात त्यांना रसही नाही" ही माहिती सुद्धा फार उपयोगाची असते.

(मुलाखतीत उल्लेखलेली दुसरी व्हॅटिकन परिषद : या परिषदेत स्त्रियांचे स्थान वाढवावे अशा प्रकारचा निष्कर्ष जागतिक स्तरावर झाला. ही परिषद भारताबद्दल नव्हती. या परिषदेच्या सूचनेच्या बाजूने आणि विरोधाने कॅथोलिक लोकांत कडाडून भांडणारे गट आहेत. सुधारणावादी विरुद्ध स्थिती-हीच-पवित्रवादी गट हे आपल्याला वेगवेगळ्या धर्मात दिसतात, त्यामुळे हे काही खास नाही. तरी हे पाद्रीबाबा त्या परिषदेच्या बाजूने होते असे प्रास्ताविकात असल्यामुळे जागतिक कॅथोलिक पंथात काय सुधारणा व्हाव्यात, त्याबद्दल त्यांच्या मताची आपल्याला बर्‍यापैकी कल्पना येते. प्रश्न भारतातील धर्मसंस्थेतील राजकारणाबद्दल आहे, तर या पाद्रींच्या मते जागतिक स्तरावर बदल झाला-न-झाला तरी भारतात बदल होणे शक्य आहे, पण तो झाला नाही म्हणून त्यांना असमाधान आहे... वगैरे, त्यांच्या म्हणण्याचा असा काही अर्थ मी लावतो. तसा अर्थ काढा किंवा न काढा - काही का असेना, तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळेलच अशी अपेक्षा केल्यास, जी काही माहीती मिळू शकेल त्याच्याबाबत दुर्लक्ष होऊ लागेल.)

इंटरेस्टींग् आहे

अंतर्गत राजकारण कुठे चुकत नाही. :-)

अवांतर - बाकी हे रेसेशनप्रुफ धंदे मस्तच असतात. जेव्हा कधी अश्या चर्च [किंवा हिंदु मठ] मधे जायची वेळ आली तेव्हा त्या धर्मगुरुंना मिळणारा पगार [मिलियन्स डॉलर्स्] राहणीमान उच्चभ्रु वस्तीमधील घरे पाहीली की देवाची सेवा करण्यात मेवा आहे यावर विश्वास बसतो.

चांगली मुलाखत

मुलाखत आवडली.

ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला नाही, आणि तरीही ते ख्रिस्ताला मानतात, ते ख्रिस्तीच आहेत. ही भूमिका फार आनंददायी आहे. ख्रिस्ताची शिकवण (शेजाऱ्यावर प्रेम करा वगैरे व इतर आणखी) आचरणात आणण्यासाठी धर्मांतर करण्याची गरज नाही हे स्वतः धर्मगुरुंनी सांगावे हे उत्तम.

भूतकाळात झालेली धर्मांतरे ही पैशाच्या अमिषाने किंवा हिंदू समाजव्यवस्थेत योग्य स्थान नाकारल्यामुळे झालेली आहेत. मात्र तरीही अमेरिकेतील ख्रिश्चन आणि भारतातील धर्मांतरित ख्रिश्चन यात फार फरक आहे हे स्पष्ट दिसते.

मिशनरी शाळांनी केलेली शिक्षणाची व समाजसेवेची कामे अपूर्व अशी आहेत. (इतर धर्मीयांचे याबाबतीत कोणी हात बांधलेले नव्हते.)

आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्व देव नमस्कारः केशवम् प्रति गच्छति असे म्हटल्याप्रमाणे येशूला जरी नमस्कार केला (किंवा येशूच्या आकाशातल्या बापाला) तरी तो केशवाकडेच जाईल. :))


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ही मुलाखत येथे दिल्याबद्दल धन्यवाद. सुवार्ता/सुनापरांत यांच्या संकेतस्थळांचे दुवे आहेत का?

+१

मिशनरी शाळांनी केलेली शिक्षणाची व समाजसेवेची कामे अपूर्व अशी आहेत. (इतर धर्मीयांचे याबाबतीत कोणी हात बांधलेले नव्हते.)
आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्व देव नमस्कारः केशवम् प्रति गच्छति

अतिशय छान!

मुलाखतीचे कष्टपूर्वक भाषांतर करून ती इथे दिल्याबद्दल धन्यवाद. ख्रिस्ती धर्म भारतात वाढला तो मिशनर्‍यांमुळे. आता मिशनरीवृत्ती कमी झाली आहे हे आपल्याला जाणवतेच. तरीसुद्धा फक्त दरिद्री आणि पददलित लोकच ख्रिस्ती का होतात आणि सुखवस्तू लोक का होत नाहीत याचे उत्तर शोधले की धर्मप्रसाराच्या मर्यादा समजतात. आंबेडकरांनी कवटाळलेला बौद्ध धर्म तथाकथित दलितजन सोडून किती लोकांनी आपणहून स्वीकारला ?--वाचक्‍नवी

धन्यवाद

मुलाखत इथे दिल्याबद्दल अनेक आभार. गेल्या वर्षी दर रविवारी माझ्या घरी चर्चमधील दोन सदस्य येऊन मला ख्रिस्ती धर्माची महती पटवून द्यायचा प्रयत्न करत असत. त्यांचे विचार आणि फादर पियोवासन यांचे विचार यात खूपच फरक जाणवला. सहसा धर्मांच्या नावाखाली केल्या जाणार्‍या गोष्टी पाहून कुठलाच धर्म नकोसा वाटतो, पण असे विचार असतील तर सर्व धर्म शेवटी माणुसकी शिकवतात हा बरेचदा बोलला जाणारा पण क्वचित आचरणात येणारा विचार खरा आहे असे वाटायला लागते.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

खंत

मॅनेजर, डायरेक्टर, संघटक, या अशा कामांत आपण गढून गेलो असल्या कारणाने, आपण सर्वप्रथम पालक आहोत, मिशनरी आहोत, याचा खूपशा धर्मगुरूंना विसर पडला आहे. चर्चमधल्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना आपले वर्चस्व हवे.

फादर पियोवासन यांनी व्यक्त केलेली ही खंत बहुतांश चांगल्या कार्यांना लागू होईल असे वाटते. कमीअधिक प्रमाणात रामकृष्ण मठात किंवा विवेकानंद केंद्रात आयुष्य झोकून दिलेला धर्मगुरू असेच असमाधान व्यक्त करेल. भारताबाहेरील देशांतही समाजकार्य करू पाहणार्‍या संघटनांच्या जुन्या पाईकांना हीच चिंता वाटेल.

त्यातही चर्चचा (व्हॅटिकन एम्पाअर) राजकारणासाठी आणि साम्राज्यविस्तारासाठी वापर अनेक युरोपीअन सत्तांनी शतकानुशतके केलेला आहे. चर्चसंस्थेचा कारभार आतल्या अंगाने पियोवासन पाहिला आहे... त्यानंतर समीक्षकाच्या भूमिकेत राहून मांडलेली निरिक्षणांतून बहुतेक समाजसेवी संस्थेतील मंडळींना काहीतरी आपल्याच मनातील बोलल्यासारखे जाणवेल.

मुलाखतीबद्दल धन्यवाद धनंजय!

- एकलव्य

चांगली मुलाखत

मुलाखतकाराने पाद्री पियोवासन यांना चांगले बोलके केले आहे असे दिसते. त्यांचे विचार समजून घ्यायला आवडले. कुठच्याही धर्माला नावे न ठेवता ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यावर असलेला पाद्री पियोवासन यांचा भर हा थेट असा वाटला. श्री. गिरीश प्रभुणे यांच्या एका पुस्तकात असाच एक प्रसंग पारधी समाजाबद्दल सांगितला आहे. पारधी समाज हा अत्यंत गरीब, अशिक्षित आणि खर्‍याखोट्या चोरीमारीच्या आरोपांनी ग्रस्त होऊन पोलिसांच्या धास्तीत राहणारा. यातील एका युवकाबद्दल ते सांगतात की त्याला प्रेमाचा पहिला ओलावा देणारे, त्याच्या दु:खाबद्दल पहिली जाणीव दाखवणारे लोक हे ख्रिस्ती मिशनरी होते.

हिंदू धर्माने आपल्यातील अनिष्ट रूढींना अजूनही जपून किंवा गोंजारीत ठेवले आहे ते जोवर संपत नाही तोवर इतर धर्मप्रसार चालूच राहणार. धर्मप्रसार हा राजकिय हेतूंनी अनेकदा प्रेरित असतो. ख्रिस्ती धर्मप्रसार या कल्पनेला माझा तत्वतः विरोध असला तरी तसे होणे टळणार नाही हे दिसते आहे.

उत्तम प्रतिसाद

प्रतिसाद आवडला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

प्रतिसादाशी सहमत.निधर्मीवादाचा 'धर्म'प्रसार असाच झाला तर बरे! शेवटी सगळे धर्म उदात्तच बोलतात.
प्रकाश घाटपांडे

बाप्तिस्मा

मुलाखत आवडली.

ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला नाही, आणि तरीही ते ख्रिस्ताला मानतात, ते ख्रिस्तीच आहेत.

हिंदु धर्माबद्दलही मला असेच वाटते आणि हिंदू धर्मात (धर्म मानला तर) बाप्तिस्माही घ्यावा लागत नाही. :-)

एक प्रामाणिक प्रश्नः मदर तेरेसांबद्दल अनेकदा आक्षेप घेणारे लोक पाहिले आहेत (ते सनातनधर्मी असतील तर कल्पना नाही) पण त्यांनी बाप्तिस्मा केले किंवा नाही केले यांत कितपत तथ्य आहे हे कोणी सांगू शकेल काय?

वेगळे मत

मुलाखत वाचून नक्की काय मत द्यावे ते कळत नाही. अंतर्गत राजकारण तर प्रत्येक मठात होतेच. परंतु ते राजकारण सुरू असता मठाचे मूलभूत कार्य नीट सुरू असले की झाले!

भारतात ख्रिस्ताचा संदेश (शुभ वार्ता) पोचवून ख्रिस्तराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्णपणे सत्यात उतरले नाही तरी बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाले आहे असे मानण्यास जागा आहे.
महाराष्ट्राच्या आदिवासी भागांबद्दल फारशी माहिती नाही परंतु आंध्र प्रदेशात तरी (परवाच केलेल्या प्रवासात प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे) खेडोपाडी नवी चर्चेस आणि डॉन बॉस्को, सेंट मेरी नावाच्या शाळा पसरल्या आहेत. गुंटूर-प्रकासम जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर 'त्सुनामी'नंतर मदत कार्याच्या निमित्ताने येशूचा संदेश कोळ्यांच्या प्रत्येक वस्तीत पसरला आहे. किंबहुना भारताचा पूर्व समुद्रकिनारा ख्रिस्ती वस्त्यांनी व्यापलेला आहे.
वारंगल जिल्ह्यात पाकाल सरोवराच्या आसपासच्या घनदाट अरण्यात लहान-लहान वस्त्यातल्या जॉन-पीटर-मेरी नावाच्या आदिवासी व्यक्ती दर रविवारी प्रशस्त चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात. येशू हा शंकर-विष्णु - कृष्ण यांसारखाच देव आहे आणि मदर मेरी म्हणजे मरीआई/मरगम्मा सारखी देवी आहे अशी त्यांची समजूत असते. स्वतः मुख्यमंत्री वाय.एस्. राजशेखर रेड्डी हे ख्रिश्चन आहेत तरीही त्यांना तिरुपतीला श्रीनिवासाचे दर्शन अग्रहक्काने मिळते.
अशा रितीने तथाकथीत अंतर्गत लाथाळ्या सुरू असतानाही मूळ ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम बिनबोभाट अखंड सुरू आहे आणि त्याला अपेक्षित फळही येत आहे हे दिसून येते.

याला काय म्हणावे? आपण हिंदू आहोत याचा विरोध करावा काय? की धर्मनिरपेक्ष मताला मान्यता देवून त्याचा पुरस्कार करावा? की ख्रिस्ती धर्मप्रसारकांप्रमाणे हिंदू धर्माचे कार्यकर्ते समाजसेवेचे व्रत का अंगिकारत नाहीत म्हणून खेद व्यक्त करावा? की आपल्याला त्याने काहीच फरक पडत नाही तेव्हा स्वस्थ रहावे? असे प्रश्न उभे राहतात.

लेखक म्हणतात -वेगवेगळ्या समाजातील अंतर्गत वाद-विवाद-संवाद हे काही प्रमाणात त्या समाजाच्या मनात खिडकी म्हणून अधिक प्रामाणिक असतात, असे मला वाटते. कुठलाही गटाचा मनुष्य दुसर्‍या गटाने वाचण्याकरिता काही लेखन करतो, तेव्हा कळे-नकळे "प्रवक्त्या"च्या भूमिकेत जातो. त्याच्या बोललेल्या मतांमध्ये एका प्रकारची स्वसंरक्षणात्मक मर्यादा येऊ शकते.
-कदाचित फादर व्हिक्टर पियोवासन यांना सध्या भारतात आलेले यशही पुरेसे वाटत नाही आणि म्हणूनच"भारतात सुवार्ता प्रसारासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. आमचे जगणे, प्रेम करणे, सेवा करणे, आणि शत्रुला माफ करणे, याच्यातून आम्ही ख्रिस्तराज्याची घोषणा करू शकतो. "असे म्हणताना दुसरीकडे बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चनांची संख्या वाढवणे यावर विश्वास नाही असे म्हणणे हे धूळफेक करणारे विधान त्यांनी केल्यासारखे वाटते. अधोरेखित शब्दांचा नक्की अर्थ त्यांना काय अभिप्रेत आहे ते स्पष्ट होत नाही.
ही मुलाखत 'इतर'धर्मीयसुद्धा वाचणार हे लक्षात ठेऊनच पाद्रीसाहेबांनी अशी उलटसुलट विधाने केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सहमत आहे

अंतर्गत राजकारण तर प्रत्येक मठात होतेच.

मठातच नाही तर जिथे चार डोकी एकत्र जमतात तिथे मतभेद, राजकारण इ. होतेच. यात संस्था, पक्ष, कार्यालये, कुटुंब सर्वच सामील आहे.

ही मुलाखत 'इतर'धर्मीयसुद्धा वाचणार हे लक्षात ठेऊनच पाद्रीसाहेबांनी अशी उलटसुलट विधाने केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रसार आणि प्रचारमाध्यमांतून थोड्याफार चढवलेल्या-घडवलेल्या, चकचकीत वेष्टणात बांधलेल्या, साफसफाई केलेल्या घटना नजरेस येतात त्यापैकीच एक अशी मुलाखत वाटली.

इतर धर्मीयांसाठी लेखन

तुमचे म्हणणे खरे आहे. प्रसारमाध्यमात लिहिलेले लेखन कोणीही वाचू शकते हे लेखक जाणतोच.

तरी वेगवेगळ्या मासिकांमध्ये लेख त्या मासिकाच्या बहुसंख्य वाचकांना रस असावा, अशा पद्धतीने लिहिले जातात. धर्मभास्कर मासिकातले लेख आणि सकाळ वर्तमानपत्रात लिहिलेले लेख दोन्ही कोणीही वाचू शकते. पण "धर्मभास्कर" मासिक स्वतःला "सकाळ"इतके सर्वांनी वाचण्यायोग्य करू लागले, तर त्याच्या स्वतःच्या बहुसंख्य वर्गणीदारांकडे दुर्लक्ष होईल.

सर्वच लेखन अशा प्रकारे वाचायचे असते. (लेखकाला बहुसंख्य वाचक कोण याबद्दल अपेक्षा असते, त्यांच्याशी संवाद साधत असताना "बाकी कोणीही वाचू शकेल" या दृष्टीने काही बदल करतो...) पण हा मुद्दा विशेष सांगावा लागला याबद्दल आश्चर्य वाटते.

अन्य गटाच्या लोकांना "नॅरोकास्ट" झालेली प्रकाशने वाचायची, त्यातून अन्य लोकांच्या मनाचा वेध घेण्याची सवय आणि प्राविण्य मराठी वाचकांत (खरे म्हणजे देशातील सर्व लोकांत) वाढीस यावे असे वाटते.

थोडेसे अवांतर : मागे राज ठाकरे बातमीच्या संदर्भात "हिंदी माध्यमांमधली संपादकीये" याविषयी मराठी संकेतस्थळांवर गदारोळ उडाला होता - तेथेसुद्धा "ते संपादक त्यांच्या पैसे टाकून पेपर वाचणार्‍या वर्गाशी संवाद साधू बघत आहेत, तस्मात् त्यांच्या वाचकवर्गाची विचारपद्धती अमुकतमुक आहे" असे तथ्यज्ञानही थोड्या प्रमाणात व्हावे - "ते आपल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत/नाहीत/भलावणी करत आहेत" असाच विचार करून या वाचनसामुग्रीचा सर्वाधिक फायदा करून घेता येत नाही. अशाच प्रकारे हिंदी वाचकांनी "सामन्या"तली संपादकीये वाचावीत.

खूप अवांतर : एखादेवेळेस मात्र काही लोकांना "आपण नॅरोकास्ट करतो आहोत" याचे भान राहात नाहीत. पु. ल. देशपांडे यांच्या "अंतू बरवा" व्यक्तिचित्रात उल्लेख आहे, की रत्नागिरीच्या स्थानिक वर्तमानपत्राने अमेरिकेने आणि रशियेने काय करावे तो सल्ला दिला होता. त्या संपादकाला अमेरिकेचे आणि रशियेचे नेते आपले वर्तमानपत्र वाचत असावेत असा गैरसमज झाला असावा!

 
^ वर