युआन झॅंग ... चीनचा " आद्य शंकराचार्य़ "

युआन झॅंग ..चीनचा आद्य शंकराचार्य

कोण हा युआन आणि तो आणि शंकराचार्य़ांमध्ये काय साम्य मला दिसले ?
आद्य शंकराचार्य़ म्हटले की समोर येते
[१] त्यांची लहानपणापासून दिसून येणारी कुशाग्र व प्रखर बुद्धिमत्ता. उपनयन होता होताच या बालकाने संस्कृतवर प्रभुत्व व दर्शनांसारख्या अवघड विषयांतही सहज प्राविण्य.मिळवले होते.
[२] बालवयापासूनच संसाराविषयी अनासक्ती व धर्मविषयक ओढ.
[३] ज्ञान मिळवण्यासाठी घर सोडून दूर जाण्याची तयारी.
[४] मिळालेल्या ज्ञानाचा लोकांना उपयोग व्हावा ही तीव्र इच्छा.
[५] आपले अवतार कार्य संपले असे वाटल्या बरोबर उभारलेल्या सर्व गोष्टींचा त्याग करण्याची तयारी.

हे सर्व जसेच्या तसे युआनच्या बाबतीतही आढळून येते.

युआन ज्वॅंगचा [ चीनी उच्चार नक्की काय करावा कळत नाही. आपण यापुढे युआनच म्हणू.] जन्म ६०२.. मृत्यू ६६४. आजोबा, वडील व मोठा भाऊ बौद्ध धर्माचे उपासक व कफ़्युसिअस विचाराचे अभ्यासू. प्रखर बुद्धिमत्तेच्या युआनने लहानपणापासून महायान पंथाच्या अभ्यासाला सुरवात केली. प्रथम मोठ्या भावाकडे शिक्षण . अभिधर्मकोशाचा अभ्यास झाल्यावर १३ व्या वर्षीच भिक्कू झाला. २० व्या वर्षी पूर्ण दिक्षा घेतली. महायान पंथाचे विचार व प्रत्यक्ष आचरण यांतील तफ़ावतीमुळे अस्वस्थ होऊन त्याने ठरविले की खरे काय ते कळावयास पाहिजे असेल तर बुद्ध धर्माचा उगम जेथे झाला त्या हिंदुस्थानात जाऊनच अभ्यास करावयास पाहिजे. चीनहून हिंदुस्थानाचा हजारो किलोमीटरचा प्रवास करावयाचा तर वाटेतील देशांमधील भाषा व विषेशत: संस्कृत यावयालाच पाहिजे. वर्षभरात त्यात पारंगत होऊन आता प्रस्थान ठेवावयाचे ठरवले तर एक मोठी अडचण उभी राहिली. चीनमध्ये त्यावेळी यादवीची धामधूम होती व प्रवासाकरिता सम्राटाची परवांगी लागत असे ; ती काही मिळेना. तेंव्हा दिवसा लपून छपून व रात्री प्रवास करून त्याने सीमा गाठली. नंतर गोबीचे वाळवंट पार करून हमी, तुर्फ़ान, थाकी, कुचा, आक्सू, बैदल खिंड असा हलीच्या किर्झिगिस्थानापर्य़ंतचा प्रवास केला. पुढे ताष्कंद ,उझेबिस्थानाची राजधानी समरकंद; मग पामीरच्या पठारावरूनअमू, दर्य़ा,बाल्ख[ अफ़गाणिस्थानात]. तेथे त्याला मिळालेल्या ग्रंथाचा अभ्यास [पुढे चीनी भाषेत भाषांतरही] बानियन येथील बुद्धाच्या मुर्ती [तालिबानांनी त्यांची मोडतोड केली !]पाहून नंतर कापिसी येथे प्रयाण. तेथे त्यला प्रथम हिन्दू व जैन भेटले.हा प्राचिन गांधार देश. पुढे खैबर खिंडीतून तो पेशावरला आला.
कनिष्कांनी तेथे १४०० मठ स्थापले होते व त्यांत १८००० भिक्षू रहात होते. येथून युआनच्या अभ्यासाला सुरवात झाली. नंतर सिन्धू ओलांडून तो तक्षशीला येथे आला व तेथून काश्मीरला गेला. तेथे त्याने २ वर्षे काढली.नंतर फ़िरोझपुर, जालंदर,बैरट,मथुरा मतिपुर, सांकसी, कन्याकुब्ज[ कनोज], अयोध्या, कौसंबी,स्त्रवसीहून दक्षिण नेपाळच्या तराई भागातून ६३७ साली कुशीनगर[ बुद्धाचा मृत्यू] , सारनाथ, वाराणशी, पाटलिपुत्र[पाटणा], बुद्धगया व त्या नंतर नालंदा येथे दोन वर्षे मुक्काम.नालंदा येथे योगकार पंथाचा अभ्यास करून तो प्रागज्योतिषपुर [ गुहावटी]ला गेला.तेथील राजा बुद्ध धर्माचा होता. त्याच्या बरोबर तो हर्षाच्या कनोजमधील धर्मा परिषदेला हजर रहाण्यासाठी हर्षाकडे परत आला.तेथून तो दक्षिण हिन्दुस्तानात शिरला. आन्ध्रमधील अमरावती व नागार्जूनसागर येथे गेला व तेथून कांचीला गेला.दक्षिण हिन्दुस्थानातील ही तीन प्रमुख बौद्ध अभ्यासाची नगरे. ६४६ ला चीनला परत.
आपल्या १७ वर्षांच्या या दीर्घ प्रवासात त्याने बुद्ध धर्माचा अभ्यास केला,धर्म परिषदांमध्ये भाग घेतला, प्रवचने दिली, महत्वाचे म्हणजे शब्दश ; शेकडो ग्रंथ गोळा करून चीनमध्ये नेले व पुढे त्यांचे भाषांतर केले. चीनमध्ये जनतेने व बादशहाने त्याचे प्रचंड स्वागत केले. त्याने पुढच्या आयुष्यात आपण व आपल्या शिष्यांच्या मदतीने नेलेल्या ग्रंथांची भाषांतरे केली. व नंतर मठाधिपती वगैरे व्हावयाचे नाकारून एक सामान्य भिक्षू म्हणून देह ठेवला.
आता आपणलाही युआन व आद्य शंकराचार्य़ यांच्यातील विलक्षण साम्य पटले असेल.
युआनच्या प्रवासाची कल्पना यावी म्हणून एक नकाशा देण्याची इच्छा होती .चीन, गोबीचे वाळवन्ट, किर्झगिस्तान अफ़गाणिस्तान, काश्मिर,येथपर्य़ंतचा प्रवास किती दीर्घ आहे याची कल्पना करता येईल. हिन्दुस्तानातील शहरे आपणास माहित आहेतच. ७ व्या शतकात पायी प्रवास करावयाचा आहे हे लक्षात घेतले म्हणजे युआनच्या ज्ञान लालसेची कल्पना येऊ शकेल.
इतिहास समुदायाच्या एखाद्या सदस्याने जरा वेळ काढून जर युआनच्या प्रवासाचा संपूर्ण नकाशा दिला तर सर्वानाच उपयोगी होईल.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त

छान माहिती वाचायला मिळाली. मला स्वतःला साम्य वगैरे शोधणे जमेल असे वाटत नाही :). पण हे दोघे असामान्य होते हे मात्र नक्की. हे दोघे, तसेच आर्य चाणक्य हे समाजाप्रती कर्तव्याच्यी ध्येयाने पेटलेले निखारे वाटतात. आपल्या उर्जेचा त्यांनी इतरांसाठी एवढा उपयोग करु दिला आहे की त्यांना पुर्णपणे समजुन घेणे हे आपल्या सारख्या सामान्यांचे काम नाही असे वाटते.
आजच्या भारताला अश्या लोकांची गरज आहे. असेच लेख अजुन येऊ देत.

प्रश्नः युआनने नक्की कोणते ग्रंथ नेले असावेत? धर्मग्रंथ हे फक्त धर्माची शिकवण देणारे होते की समाजजीवनाची सुत्रे सांगणारे मार्गदर्शक?

सदर माहिती -

सदर माहितीपूर्ण लेख इंग्रजी भाषेत विकी-इंग्रजीवर उपलब्ध आहे.
मराठी वाचकांसाठी विकी-मराठीवर हाच लेख चढवता येईल.

युआन झॅंग? = ष्वान झांग!
अमू, दर्य़ा ? = अमु दर्या! (स्वल्पविराम नको)
बानियन? = बामियान!
स्त्रवसी ? = श्रावस्ती !

ष्वान झांगच्या यात्रेचा नकाशा -

अरे वा!

इतिहास समुदायाच्या एखाद्या सदस्याने जरा वेळ काढून जर युआनच्या प्रवासाचा संपूर्ण नकाशा दिला तर सर्वानाच उपयोगी होईल.

अरे वा नकाशा तयार! अशा वाटाड्या शिवाय लेख अपुराच वाटला असता! धन्यवाद विसुनाना
प्रकाश घाटपांडे

नावाचा उच्चार

"युआन झॅंग? "

Xuan Zang चा बरोबर उच्चार : शुआन चांग (हा 'च' 'चांदण्या'तला, 'चंद्रा'तील नव्हे).

सम्राट हर्षवर्धन

मला वाटते इतिहासाच्या पुस्तकात जेव्हा सम्राट हर्षवर्धनाबद्दल शिकवले जाई तेव्हा ह्युआन त्सांग किंवा तत्सम उच्चाराच्या चीनी विद्वानाचा उल्लेख येई तोच हा. अर्थात, तो ही उच्चार चुकीचाच होता.

या विद्वानाच्या नोंदींवरून हर्षवर्धनाचे साम्राज्य किती संपन्न होते त्याचा अंदाज येतो. हर्षवर्धनाची आणि त्याच्या बहिणीची राज्यश्रीची कथा बहुतेक सर्वांना ठाऊक असावी. राज्यश्रीने नंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि तिच्यानंतर हर्षाने तो स्वीकारला. हिंदू, जैन, बौद्ध धर्मांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोण सरळ आणि स्वच्छ होता. त्याच्या राज्यात अनेक धर्मांच्या वादविवाद चर्चा चालत. याचे वर्णनही शुआन चांग (प्रदीप यांचा उच्चार पकडून) केले आहे.

इतिहासाच्या पुस्तकात

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात चिनी प्रवासी हुआन त्सांग याने महाराष्ट्राबद्दल केलेल्या लेखनाचा एक उल्लेख होता. तो प्रवासी हाच का?

छोटासा लेख आवडला. शरदराव आणि विसुनानांचेही आभार.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हाच, हाच!

ह्युआन त्सांग तोच हा - ष्वान झांग! ओठांचा मोदक आणि कडबोळे असे दोन्ही करत करत उच्चार करा. ;)

हो हो

वर विसुनानांनी दिलेल्या नकाशात खालच्या उजव्या कोपर्‍यातले चित्र पाहिल्यावर तो हाच असे वाटते. मला इतिहासाच्या पुस्तकातले चित्र आठवले.

माहिती, नकाशाबद्दल

शरद व विसुनाना यांचे आभार.

उच्चार प्रदीप यांचाच (मांदारिन चिनीच्या) सर्वात जवळ असावा असे वाटते.

**चिनी भाषा (मांदारीन) रोमन "प्हीनयीन" लिपीत पद्धतीत लिहितात, तेव्हा Sh हा ष् च्या जवळ, X हा श् च्या जवळ, आणि Z हा च़ आणि ज़ यांच्या मधल्या उच्चारांच्या ध्वनींसाठी वापरतात. अर्थात Sh साठी जिभेचे कडबोळे करावे लागते, ते जुन्या मराठीतल्या ष-सारखे.**

जगप्रवासी म्हणून हा विद्वान असामान्य आहे, अचाट आहे. हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यासक, शिक्षक तर होताच - पण शंकराचार्यांसारखा नव्या तत्त्वज्ञानाचा प्रणेताही होता का? याबद्दल कुतूहल वाटते.

नवे?

माहितीपूर्ण लेख.
त्याच्या बरोबर तो हर्षाच्या कनोजमधील धर्मा परिषदेला हजर रहाण्यासाठी हर्षाकडे परत आला.
शुआन चांग २००८ मध्ये परिषदेला गेल्याप्रमाणे भास झाला. :)

शंकराचार्यांसारखा नव्या तत्त्वज्ञानाचा प्रणेताही होता का?

शंकराचार्यांचे तत्वज्ञान नवीन होते का जुन्यावरच आधारित होते?

हा प्रश्न धनंजयांना, केवळ माहिती हवी म्हणून. उत्तराची घाई नाही.

नवे तत्त्वज्ञान

इथे नवी सर्वसमावेशक प्रणाली, असे म्हणायचे आहे. म्हणजे षड्दर्शने एकमेकांपेक्षा वेगळी असतील तितके नवीन. तितपत (म्हणजे खूपच वेगळी) नवीन प्रणाली.

"नव्या दर्शनाचा प्रणेता" म्हटले तर संस्कृत भाषेची या संदर्भात ओळख असलेला लगेच समजेल - षड्दर्शनांपैकी प्रत्येक एके काळी "नवीन" होते, त्यांचा कोणी प्रणेता होता, वगैरे. "दर्शन" या संस्कृत शब्दासाठी मराठीत "तत्त्वज्ञान" असा सामान्य प्रतिशब्द वापरलेला दिसतो - म्हणजे "प्लेटोचे तत्त्वज्ञान", "ऍरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान" वगैरे. कणादाचे, शंकराचार्यांचे "दर्शन" शब्द असा मराठीत फारसा वापलेला दिसत नाही. ("जगन्नाथपुरीला जाऊन शंकराचार्यांचे डोळे भरून दर्शन घेतले" अशा अर्थाने शब्दाचा उपयोग अधिक प्रचलित आहे.)

भारतातली कित्येक दर्शने वेदप्रामाण्य मानतात, आणि उपनिषदांतले शब्द थोडेफार-प्रमाण मानतात. पण वेगवेगळ्या दर्शनांची स्पष्टीकरणे, "जग कसे आहे" याबाबतचे विचार इतके कमालीचे वेगळे आहेत, की वेदांचे वेगवेगळ्या प्रकारे लावलेले अर्थ एकमेकांना खंडन करणारे असतात. हे त्या-त्या दर्शनांचे प्रणेते पुन्हापुन्हा मान्य करतात. (हे खंडन करणारे वाद केवळ आत्मप्रौढीची भांडाभांडी नसून तथ्यात्मक, एकमेकांना पटवायची प्रामाणिक खटपट आहेत.)

(तेच वेद वाचून) पूर्वी कोणाला सुचले नव्हते, असे वेगळे, "जग कसे आहे"बद्दल विचार सांगणार्‍याला मी नवे तत्त्वज्ञानाचा प्रणेता म्हटलेले आहे.

उच्चार

मी लिहीलेला बरोबर आहे .मी चीनमधे रहातो, हे उच्चार सदैव कानी पडत असतात, बोतुंग्वा (Putonghua अथवा मॅंडरीन) शी माझी नावांचे शब्दोच्चार बरोबर करण्याइतपत जवळून ओळ्ख आहे.

ही नावे ज्या पद्धतीने रोमन लिपीत लिहीली जातात त्यास पिनयिन असे संबोधले जाते. ही आता प्रमाणित व प्रचलित पद्धति आहे. ही पद्धति चीनने अवलंबण्याअगोदर दुसरी जी पद्धति वापरात होती (मला वाटते तिला यंगची पद्धति (Young's method)असे काहीतरी नाव होते, आता नक्की आठवत नाही), तीत चांदण्यातील 'च' चा उच्च्च्रार दर्शवण्यासाठी ts हे वापरण्यात येई. त्यामुळे 'चांग'चे tsang झाले, व आपण त्यास त्सांग असे म्हणू लागलो.

धन्यवाद

प्रथम सर्वश्री विसुभाऊ,प्रदीप आदींचे आभार मानतो.त्यांनी पुरवलेल्या नकाशामुळे व चिनी उच्चारांमुळे फ़ार फ़ायदा झाला. माझ्या लेखातील माहिती सर्वाना सर्वत्र सुलभतेने मिळू शकते. मात्र ही माहिती देतांना माझा उद्देश सर्वांना ज्ञात असलेल्या प्रवाशाची ओळख करून देणे हा नव्हताच. अनेकांनी लिहल्याप्रमाणे बरीचशी माहिती शालेय अभ्यास पुस्तकांमध्ये आहेच. मला आढळ्लेले चांग व शंकराचार्य़ यांच्यामधील साम्य हा खरा लेखाचा हेतू. हे साम्यही मी दिलेल्या पाच मुद्द्यांपुरतेच मर्य़ादित होते. खरे म्हणजे चांगसारखे इतर अभ्यासकही उपक्रमचे अभ्यासू लेखक सर्वांना ज्ञात करून देतील अशी मला अपेक्षा होती. श्री.विसूभाऊ वा आचार्य़ धनंजय याना हे सहज शक्य आहे.प्रियाली ताईंना युरोपमध्ये अशी रत्ने सापडणार नाहित असे कसे म्हणता येईल ? त्यांनी थोडा वेळ काढावा ही आग्रहाची विनंती.
आता शंकराचार्य़ांसारखे नवीन तत्वज्ञान चांगने निर्मिले कां ? मला माहित नाही. त्याने एक पंथ सुरु केला पण तो अल्पजीवी ठरला एव्हढीच माहिती मिळते.इतर यांत भर घालू शकतील. मला स्वत;ला श्री. आद्य शंकराचार्य़ यांनी नविन तत्वज्ञान मांडले असे वाटत नाही. चित्रा यांनी सुचवल्याप्रमाणे आ. धनंजय यानी जरूर मार्गदर्शन करावे.पूर्वपक्ष म्हणून मी माझे मत एका[नविन]लेखात मांडतो [अथ तो धर्मजिज्ञासा !}
शरद

.

शरदरावांनी दिलेली माहिती आणि प्रतिसादांत झालेली चर्चा फारच छान आहे.
युआन श्वांग बद्दल इतिहासाच्या पुस्तकात जे होते तेव्हडेच माहित होते. त्यात मराठी लोक सारखे भांडल्यासारखे बोलतात आणि माझे-तुझे करतात असे काहिसे त्याचे मत असलेले अंधूक स्मरते.
--लिखाळ.

+१

शरदरावांनी दिलेली माहिती आणि प्रतिसादांत झालेली चर्चा फारच छान आहे.

+१

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर