लायनक्समध्ये मराठीत लेखन करण्यासाठी सोपी पद्धत

खालील लेख हा उबुंटू व तत्सम डेबियन आधारित लायनक्स फ्लेवरसाठी लिहिला आहे. मात्र थोडे बदल करुन या सूचना इतर फ्लेवरांसाठीही चालाव्यात.

अनेक मराठी सायटींवर मराठी टायपिंगची सोय उपलब्ध आहे. मात्र ही सोय इतर ठिकाणी (उदा. गूगल टॉक, इमेल, ब्लॉग वगैरे) वापरणे हे गैरसोयीचे आहे. या ठिकाणी मराठी टायपून पाठवायचे असेल तर गमभन किंवा तत्सम खिडकीत टायपिंग करावे लागते व नंतर तेथून उचलून घ्यावे लागते. जे गूगलटॉक वगैरेसाठी फारच उपद्व्यापी आहे. शिवाय गमभनमध्ये ऑटो सेवसारखी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे एकदा गमभन लटकले किंवा फायरफॉक्स लटकले किंवा दुसरी काही अडचण आली तर लिहिलेले सगळे पाण्यात जाते. याउलट इमेल/ब्लॉगमध्ये देण्यात येणारी ऑटो सेवची सोय वापरण्यासाठी त्याच खिडकीत मराठी टायपिंग करणे फार उपयुक्त आहे.

विंडोज वापरकर्त्यांना मराठी सायटींव्यतिरिक्त इतर ठिकाणी टायपिंग करण्यासाठी बरहा उपलब्ध आहे. मात्र लायनक्स वापरकर्त्यांना ती सोय नाही. मात्र त्याऐवजी लायनक्स वापरकर्त्यांना खालील पर्याय उपलब्ध आहेत.

१. लायनक्सने दिलेला देवनागरी कीबोर्ड वापरणे
२. बोलनागरी
३. एससीआयएम (स्मार्ट कॉमन इनपुट मेथड)

हे तिन्ही प्रकार फोनेटिक टायपिंगची सोय देतात. मात्र १ आणि २ मधले फोनेटिक टायपिंग हे बरहा/गमभनपेक्षा बरेच वेगळे आहे. त्यामुळे मराठी सायटींवरील किंवा बरहामधील टायपिंगची सवय असेल तर १ आणि २ वापरणे त्रासदायक वाटेल.

मात्र एससीआयएम हा साधा-सोपा-सुबक-ठेंगणा असा एक मस्त प्रकार आहे. लायनक्समध्ये देवनागरी टायपिंगसाठी यापेक्षा दुसरा सोयीस्कर मार्ग मला सापडला नाही.

एससीआयएम-देवनागरीसाठीच्या पूर्ण सूचना मात्र इंटरनेटवर लवकर मिळत नाहीत. ज्या मिळतात त्या बऱ्यापैकी अपुऱ्या आहेत त्यामुळे एससीआयएम टाकूनसुद्धा हवा तो कळफलक न दिसणे वगैरे अडचणी येतात. मराठी टायपिंग ही अनेकांची गरज झाली आहे त्यामुळे मराठी टायपिंग न येणे हे लायनक्सपासून घटस्फोट घेण्यासाठीचे महत्त्वाचे कारण ठरु शकते.

मात्र खालील पायऱ्या वापरल्या तर देवनागरीसाठी इनस्क्रिप्ट व फोनेटिक कीबोर्ड खात्रीने उपलब्ध होतील.

१. सिस्टम->ऍडमिनिस्ट्रेशन->सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमध्ये जा.
२. तुमचा पासवर्ड द्या.
३. सर्च वर क्लिक करा व तिथे scim असे टाईप करा.
४. शोधून आलेल्यांपैकी खालील पॅकेजे निवडाः
scim, scim-m17n, scim-gtk2-immodule, im-switch, libscim8c2a, scim-modules-socket, scim-modules-table, scim-qtimm, scim-tables-additional
५. आता पुन्हा सर्च वर क्लिक करा व तिथे m17n टाईप करा.
६. शोधून आलेल्यांपैकी खालील पॅकेजे निवडा.
m17n-db, libm17n-0
७. आता पुन्हा सर्चवर क्लिक करा व तिथे marathi टाईप करा. त्यातून मराठीसाठी खालील पॅकेजे निवडा
language-support-fonts-mr, language-support-mr, language-support-writing-mr, ttf-devanagari-fonts,
८ आता ऍप्लाय वर क्लिक करा.

एससीआयएमची सर्व पॅकेजे इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही एससीआयएम वापरु शकता. एससीआयएम चालू करण्यासाठी सिस्टम->प्रेफरन्सेस मध्ये एससीआयएम इनपुट मेथड सेटप मिळेल. त्यात IMEngine मधील Global Setup मध्ये हिंदीमध्ये जा. तेथे hi-trans, Inscript आणि Phonetic मिळेल. त्यापैकी hi-trans निवडल्यास ते गमभन/बरहा प्रमाणे फोनेटिक टायपिंगसाठी वापरता येईल.

एससीआयएम चालू होते तेव्हा टास्कबारवर छोटे टाईपरायटरचे चित्र दिसते.

एससीआयएम वापरून इंग्लिश टायपिंगही करता येते त्यामुळे प्रत्येक वेळी मराठी टायपिंग करण्यासाठी एससीआयएम चालू करण्याची गरज नाही. एससीआयएम कायम चालू ठेवता येते. सिस्टम चालू होताना एससीआयएम आपोआप चालू होण्यासाठी
सिस्टम->प्रेफरन्सेस->सेशन्स उघडा. त्यात स्टार्टप प्रोग्रॅममध्ये scim-d या कमांडसाठी नवा प्रोग्रॅम टाका. आता प्रत्येकवेळी उबुंटू चालू कराल तेव्हा एससीआयएम आपोआप चालू होईल.

एससीआयएम बरोबर थोडे खेळा. त्यात तुम्हाला इंग्लिश-मराठी बदलण्यासाठी ctrl+space किंवा ज्या आवडतील त्या जोड्या ठरवता येतील.

काही अडचणी आल्यास विचारा.

एन्जॉय.

Comments

प्रयोग

प्रयोग करुन बघतो. पण असे नाही का वाटत कि लिनक्समध्ये बरहा अथवा इंडिक आयएमई सारखे एखादे मराठी टंकक बनवणे हि गरज/संधी आहे? कोणी तंत्रज्ञ मनावर घेतील काय?

अगदी हेच

पण असे नाही का वाटत कि लिनक्समध्ये बरहा अथवा इंडिक आयएमई सारखे एखादे मराठी टंकक बनवणे हि गरज/संधी आहे? कोणी तंत्रज्ञ मनावर घेतील काय?

अगदी हेच माझ्या मनी आले होते!
पुर्ण सहमत...

मला संगणकातले काही कळत नाही नाहीतर मीच बनवले असते.

आपला
गुंडोपंत

प्रयत्न

मला सुद्धा फारसे नाही कळत. पण हे नक्की कळते की एकत्रित प्रयत्न केल्यास असे करणे फारसे अवघड नाही. तसे ही फायरफॉक्समध्ये सुद्धा एक प्लगीन आहे ज्याने मराठी टंकता येते. पण अजानुकर्ण म्हणतो तसे याला मर्यादा येतात.
लिपिकार हे एक ऍड ऑन सुद्धा वापरायचा प्रयत्न केला. पण गमभन इतके वापरायला चांगले कोणतेच वाटले नाही. गमभनमध्ये सुधारणा करुन ते लिनक्ससाठी तयार करता आले तर सर्वोत्तम.

छान

लेख छान आहे.
आवडला. पायरी पायरीने हे नक्की करता येईल असे वाटले (आता उबंटु टाकूनच पाहतो माझ्या संगणका वर.
अडलो तर मदत करशील ना?)

एससीआयएम-देवनागरीसाठीच्या पूर्ण सूचना मात्र इंटरनेटवर लवकर मिळत नाहीत. ज्या मिळतात त्या बऱ्यापैकी अपुऱ्या आहेत

हे वाचून वाईट वाटले.
हा लेख मराठी विकिवरही टाकता येईल का?

आपला
गुंडोपंत

येस्स

एससीआयएम-देवनागरीसाठीच्या पूर्ण सूचना मात्र इंटरनेटवर लवकर मिळत नाहीत. ज्या मिळतात त्या बऱ्यापैकी अपुऱ्या आहेत

याचे कारण हेच की देवनागरीचे वापरकर्ते लायनक्स जास्त वापरत नाहीत, किंवा वापरु इच्छित नाहीत.

शिवाय लायनक्सच्या प्रत्येक फ्लेवरमध्ये अनेकदा वेगवेगळी पॅकेजे किंवा तेच पॅकेज वेगळ्या नावाने असल्याने नवशिक्यांचा गोंधळ उडू शकतो.

उदा. जीनोममध्ये एससीआयएम तर केडीई मध्ये एसकेआयएम. दोन्हींचा ब्याकएन्ड सारखाच आहे मात्र खिडक्या व्यवस्थित दिसण्यासाठी योग्य त्या लायब्र्या मशीनवर असणे आवश्यक आहे.

तुम्ही लाईव सीडी वापरून उबुंटू थोडे दिवस वापरुन पाहा कसे वाटते ते. नंतर विंडोजवर एक ऍप्लिकेशन म्हणून टाकून पाहा आणि वापरा. नंतर संपूर्ण आणि एकमेव ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वापरायला सुरुवात करा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच म्हणतो

तुम्ही लाईव सीडी वापरून उबुंटू थोडे दिवस वापरुन पाहा कसे वाटते ते. नंतर विंडोजवर एक ऍप्लिकेशन म्हणून टाकून पाहा आणि वापरा. नंतर संपूर्ण आणि एकमेव ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वापरायला सुरुवात करा.

असेच म्हणतो. अजानुकर्णा, यावर एक मार्गदर्शक लेख लिहिलास तर सर्वांचेच भले होईल. थोडक्यात

  1. लाईव सीडी वापरून उबुंटू थोडे दिवस वापरुन पाहा
  2. नंतर विंडोजवर एक ऍप्लिकेशन म्हणून टाकून पाहा आणि वापरा.
  3. नंतर संपूर्ण आणि एकमेव ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वापरायला सुरुवात करा.

या तीन पायर्‍यांनी उबंटुला आपलेसे करताना काय काय मर्यादा येतात आणि त्या दुर कशा कराव्यात याची मदत समजण्या योग्य भाषेत आणि मराठीत मिळाली तर लोकांना खिडक्यांचा लवकरच उबग येऊन उबंटु जास्त वापरले जाईल.

+१

सहमत.

एक नवा लेख किंवा यापुर्वी या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या प्रतिसादांचे एकत्रीकरण करुन लिनक्स प्रणाली व इतर उपयुक्त सॉफ्टवेयर जसे मेडीया प्लेयर, फायरफॉक्स, चॅट, वरील मराठीकरण इ. असलेला एक संगणक कसा करावा यावर एक उपयुक्त लेख नक्की येउ दे.

एससीआयएम

लायनक्समध्ये बरहा/इंडिक आयएमईची गरज नाही. एससीआयएम हे हरहुन्नरी ऍप्लिकेशन आहे. बरहा/इंडिक आयएमई/गमभन यांचा किंवा तुमचा स्वतःचा कीबोर्ड लेआऊट तसाच्या तसा एससीआयएम मध्ये वापरणे शक्य आहे.

एससीआयएमसाठी लेआऊट तयार करण्याची पद्धत थोडी किचकट आहे आणि तिथे वी आय वगैरे कुप्रसिद्ध (माझ्या सर्वात आवडत्या) एडिटरचा वापर अपेक्षित आहे. बऱ्यापैकी वापरण्यासाठी तो शिकावा लागेल. मात्र हे सर्व करण्याची आवश्यकता नाही

मात्र वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे पायऱ्या पार पाडल्या की अगदी बरहा इतकेच सोप्या प्रकारे मराठी टायपिंग करता येते.

अवांतरः
फाफॉच्या इंडिक इनपुट प्लगिनमध्ये - फोनेटिक प्रकारात - एक दोन दोष आहेत ज्यामुळे तो वापरणे किचकट आहे. मात्र इनस्क्रिप्ट टायपिंग तिथेही सुरेख जमते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उपयुक्त

लिनक्समध्ये देवनागरीबद्दल मदत बरीच दुर्मिळ आहे. उपयुक्त लेख. वापरून बघतो.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

नोपिक्स लाईव्ह सिडी

नोपिक्स लाईव्ह सिडी वापरून आपण मराठीत सहजपणे टाईप करू शकतो. नवीन लोकांनी प्रथम हा पर्याय वापरून पहावा. अधिक माहिती ....

http://tinyurl.com/8w9vgg

 
^ वर