इंग्लिशमधील लग्नपत्रिका
ही अंमळ विनोदी लग्नपत्रिका पाहा.
आता विनोद सोडून द्या.
काल लोकसत्ता वाचताना उजव्या बाजूला प्रियांका चोप्राचे चित्र दिसले. "हिवाळ्यामध्ये पूर्ण कपडे वगैरे घालून वावरणार असा प्रियांकाने निश्चय केला आहे" अशी बातमी असावी म्हणून मी (किंचित हळहळत) दुर्लक्ष करणार होतो. पण मग नंतर लक्षात आले की अरेच्चा! हा तर लोकसत्ताचा दिवाळी अंक!
अंकातला पहिलाच लेख मिलिंद बोकील यांचा आहे. राजनीती की लोकनीती या लेखात त्यांनी शेवटी एक उत्तम मुद्दा उपस्थित केला आहे. थांबा त्यांच्या शब्दांतच वाचा.
या ओळींतील निरीक्षणाबाबत मी संपूर्ण सहमत आहे.
दोन वर्षांपूर्वी माझ्या कंपनीतील एका मित्राचे लग्न झाले. भर उन्हात नदीकाठाला उठलेल्या पंगती, कडुलिंबाच्या झाडावर लावलेल्या कर्ण्यांमधून वऱ्हाडाच्या नावाने होणारे पुकारे, खंडोबा-यमाई सकट सगळ्या देवांना लग्नापूर्वी आणि लग्नानंतर दोन्ही वेळा घातलेल्या खेपा, आणि लग्नानंतर २००० रूपयांची सुपारी देऊन घातलेला जागरण गोंधळाचा कार्यक्रम अशा यथासांग झालेल्या लग्नाच्या पत्रिकाही त्याने इंग्लिशमधून छापल्या होत्या.
त्याच्याकडे अधिक खोदून चौकशी केली तेव्हा त्याने लग्नपत्रिकांचा कॉम्बो प्लान घेतला होता असे कळले. आम्हाला (म्हणजे कंपनीतल्या मित्रांना - जे सगळे उत्तम मराठी जाणणारे होते! ) वाटलेल्या पत्रिका या इंग्लिशमध्ये (त्यात त्याच्या आजीचा उल्लेख गं.भा. - गंगा भागीरथी हा Gam. Bha. असा होता) आणि बिचाऱ्या एतद्देशीयांना वाटलेल्या मराठीत होत्या असेही कळले.
हा. तर बोकील यांना मांडलेल्या मतांबद्दल उपक्रमींना काय वाटते ?
1. लग्नपत्रिका इंग्लिशमध्ये छापणे ही बौद्धिक गुलामगिरी आहे का ?
2. लग्नपत्रिका इंग्लिशमध्ये छापणे ही सांस्कृतिक शरणागती आहे का ?
विशेष सूचनाः लेखामध्ये बोकील यांनी वापरलेल्या ब्राह्मण या शब्दावरून पराचा कावळा करून चर्चेला जातीय वळण देऊ नये ही विनंती.
Comments
माझा अनुभव
मी आमच्या लग्नात ८०% पत्रिका मराठीमधे आणि २०% पत्रिका इंग्रजीत छापलेल्या होत्या. मी नि माझ्या बायकोने आपापल्या ऑफिसमधील सहकार्यांना आणि अमराठी मित्रांना इंग्रजीत पत्रिका वाटल्या होत्या.
यामुळे मी बौद्धिक गुलामगिरी केली किंवा सांस्कृतिक शरणागती स्वीकारली असे मला वाटले नाही. इंग्रजी पत्रिकेचा मसुदा इंग्रजीत शिकलेल्या माझ्या एका प्राध्यापक मित्राकडून तपासून घेतला होता. अर्थात एक गोष्ट सांगितली पाहिजे की आमची पत्रिका इतकी वैचित्र्यपूर्ण नव्हती. बर्यापैकी परंपरागत मसुदा असणारी पण गुळगुळीत कागदावरची होती.
अर्थात माझ्या लग्नाच्या काळी मराठी साईट्स् नव्हत्या. नाहीतर माझीही पत्रिका इन्टरनेट वर आली असती असे आता वाटते :-)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मिलिंद बोकील यांचे इतर लेखन पाहता त्यांनी कोठे जनरलायझेशन केले आहे असे जाणवत नाही. किंबहुना इंग्लिशमधील शुभेच्छापत्रे होतीच की. (कदाचित शुभेच्छापत्र ही संकल्पनाच इंग्लिश असावी). मात्र बोकील यांना असे का लिहावेसे वाटले असावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
पुण्यात यापुढे गृहप्रवेश,वास्तु-शांती, दुःखद निधन, दशक्रिया विधी वगैरे या पत्रिकाही इंग्लिशमध्ये येतील असे वाटते का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
संकल्पना व भावना
निमंत्रणपत्रिका ही संकल्पना परदेशी आहे की नाही याचा शोध घ्यावा लागेल.
मात्र श्री. बोकील यांची मते कधीही अतिरेकी किंवा फॅनॅटिक नसतात हे मुद्दाम नमूद करतो. (उदा.वर दिलेल्या छोट्या उताऱ्यातही मुलांनी इंग्लिशमाध्यमात शिकण्याच्या अपरिहार्यतेचा त्यांनी उल्लेख केला आहे.)
त्यांनी लिहिलेले बहुतेक सर्व लेखन मी वाचलेले आहे. त्यांची मते ही अभ्यासावर आधारित असतात-अभिनिवेशावर नाही याची खात्री बाळगा
जर लग्नाला येणारे उदा. ९५ टक्के लोक आपल्याच जातीचे-भाषेचे असतील तर मग लग्नपत्रिका इंग्लिशमध्ये छापण्यामागचे कारण काय असावे? मराठी पत्रिकांची लाज वाटणे? की मराठीत पत्रिका छापल्याने आपण मागास वाटू याची लाज वाटणे?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
टक्केवारी
सरसकट सर्वच लग्नांमधे ९५% लोक आपल्याच जातीचे असतात असे विधान चुकीचे वाटते. मी कॉलेजला गेल्यापासून प्रत्येक वर्षी किमान एक अशा सुमारे १०-१२ लग्नाला गेलो असेन. ही लग्ने मुंबई पुण्यातली होती. माझ्या या १० लग्नांच्या सॅम्पल वरून मी हे निश्चित सांगतो की, लग्नाला येणार्या लोकांमधे इतर जातीचे , इतर भाषा बोलणारे , क्वचित इतर धर्माचे मिळून येणार्या लोकांची संख्या ५ टक्क्यांपेक्षा निश्चित जास्त होती. हे "इतर" लोक मुख्यतः कॉलेजमधील मित्र/मैत्रिणी , नोकरीतील सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय होत.
५% तरी जोडभाषेत छापल्यास हरकत नाही
असे असल्यास ५% तरी जोडभाषेत छापल्यास हरकत नाही. आमंत्रिताला माहिती सहज कळावी, अशा प्रकारे पत्रिका छापाव्यात असे मला वाटते. आमंत्रित व्यक्ती गोंधळून न यावी, अथवा "इतकी वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी का शिकला नाहीस गधड्या" असे सांगायची हीच वेळ योग्य असली, तर मात्र या ५% लोकांना मराठीतूनच पत्रिका द्यावी.
(तुमच्या कार्यालयातील मित्राने मराठी दोस्तांना मराठी पत्रिका द्यायला हवी होती याबाबत सहमत. काँबो प्लॅनमध्ये मराठी पत्रिकाही त्याच्याकडे छापून उपलब्ध होत्या.)
पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या "नारायण" या व्यक्तिचित्रात असा उल्लेख आहे की काही लोक इंग्रजीतही पत्रिका छापत. (नारायण या मुद्द्याला का विरोध करतो, पण देशाभिमानामुळे नव्हे तर इंग्रजी-द्वेषामुळे, असा मजेदार तपशील आहे.) हे व्यक्तिचित्र कमीतकमी ४०-५० वर्षांपूर्वी लिहिले गेले असावे. त्या काळातही सोयीसाठी अनेक भाषांत पत्रिका छापत असावेत असा माझा कयास आहे.
पत्रिका वगैरे
सर्वप्रथमः आमच्या लग्नाच्या पत्रिका देखील वर मुक्तसुनीतने म्हणल्याप्रमाणे ८०-२० होत्या... कॉम्बो म्हणून नाही तर व्यावहारीक गरज म्हणून. त्यात ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठींना इंग्रजी पत्रिका दिल्या होत्या. त्यात मराठीचा (आंधळा) अभिमान वगैरे जसा हेतू नव्हता तसेच इंगजीचा अतिरीक्त वापर त्याचे अतिरीक्त सुप्त आकर्षण नसल्याने तसेच त्यासंदर्भातील न्युनगंड नसल्याने झाला नाही असे म्हणावेसे वाटते. अर्थात हे वैयक्तिक झाले. जर कोणी इंग्रजीच पत्रिका काढल्या तर त्याला बौद्धिक गुलामगिरी अथवा सांस्कृतिक शरणागती म्हणणार नाही बर्याचदा त्यात न्यूनगंड जरी असला तरी.
आता शुभेच्छापत्रांसंदर्भातः मला चांगले आठवतेय की लहानपणी आम्ही दिवाळीच्या वेळेस पोस्टकार्डावर मराठीत लिहून, चित्र काढून पाठवायचो. इंग्रजी शुभेच्छापत्रे पाठवल्याचे आठवत नाही, इ-मेल्स मात्र (हॅपी दिवाली) अनेकदा पाठवल्यात (अथवा इकडून तिकडे सरकवल्यात). आता शुभेच्छा देतो कार्डवगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाही. लहान मुलांच्या वाढदिवसासाठी पण एक छान चालीतील संस्कृत अर्थपूर्ण काव्य चिन्मय मिशनच्या स्वामी तेजोमयानंदानी केले आहे आणि येथे अनेकांना "हॅपी बर्थडे टू यू" बरोबर ते पण म्हणताना ऐकले आहे.
बोकीलांच्या लेखातील एक गोष्ट मला खटकली ती म्हणजे परत उगाच मधे जात आणणे. येथे या बाबतचे माझे विचार माहीत असल्याने त्याबद्दल मी पुनरुक्ती करण्याचे टाळतो, पण इतकेच म्हणायचे आहे, की जर भारतातील हिंदू समाजासंदर्भात जातीवरूनच बोलयचे असेल तर ते ऐतिहासीक चर्चेत समजू शकेल पण वर्तमानकाळात जेंव्हा जातपात न पाळण्याबद्दल प्रोत्साहन देण्याऐवजी असले काही कुठल्याही जातीवरून लिहीले गेले तर ती अधुनिकरीत्या बोकीलांसारख्यांची संस्कृतीतील चुकीच्या रुढींच्या समोरील शरणागती अथवा बौद्धीक नसली तरी मानसीक गुलामगिरी ठरते असे वाटते.
आवडली बॉ!
मला तर पहिली पत्रिका जाम आवडली बॉ!
बाकी पत्रिका छापा/छापू नका/ मराठीत छापा/इंग्रजीत छापा अगदी संस्कृतमधे छापलीत तरी उत्तम.. फक्त जेवणाचा मेनू मस्त असला पाहिजे ;)
ऋषिकेश
--------------------------
उदरभरण आहे जाणिजे लग्नकर्म
वैचारिक दिवाळखोरी
लग्न-समारंभ यासाठी काय करावे हा प्रत्येकाच्या आवडीचा, कुवतीचा प्रश्न आहे. कदाचित भविष्याचा विचार केला असावा. भविष्यात मराठी वाचता येणारे नसतील तर? अथवा ज्यांचे लग्न झाले त्यांच्या मुलांच्या लग्नाच्यावेळी आमच्या लग्नाची पत्रिकअ अस दाखवलं तर मराठीची अवस्था फार चांगली असणार नाही या विचारांनी आत्ताच इंग्रजी पत्रिका छापायची इच्छा. दुरदृष्टी काय वाईट? :)
बोकिलांचे मुद्दे बरोबर असतील सुद्धा आणि तुझे आवाहन सुद्धा योग्य आहे. पण कदाचित ज्या बोकिलांना तु प्रमाणपत्र देतो आहेस त्यांना जात काढायला नको हे कळायला नको?
पत्रिका इंग्रजीमध्ये काढल्याने अथवा न काढल्याने फारसा फरक पडत नाही असे मला वाटते. वर इथल्या मिलिंदांनी जे मत मांडले आहे त्याच्याशी मी सहमत आहे.
जुन्या परंपरांना न सोडता नव्याला जवळ करायचा अट्टाहास, तो सुद्धा लग्ना सारख्या पारंपारीक गोष्टीत, हे देखील एक कारण असु शकेल. तसे म्हणायचे झाले तर आयडिया सेल्युलरने जी जाहिरात केली आहे कि आजोबा म्हणतात थँक्यु गॉड... वगैरे ते तरी कितपत बरोबर आहे. हि देखील सांस्कृतीक दिवाळखोरी नाही का? शिक्षणाचाच प्रसार करायचा तर आकडेमोड करताना दाखवा ना? थँक्यु गॉड... वगैरे कशाला? त्यावेळी बोकिल आणि तत्सम लेखक कुठे जातात? येथे सॉफेस्टिकेटेड शरणागती चालते. पण एखाद्या बदलत्या गोष्टी विषयी झोडपुन काढायचे असेल तर हल्ली सर्वांचे सावज एकच असते - सुशिक्षीत मध्यमवर्ग. कारण संस्कृती जपण्याचे कर्तव्य याच लोकांचे आहे हा सगळ्याचा समज (कि गैरसमज) आहे.
कुछ मीठा हो जाये!
चर्चेत मत मी देणार नाही. कधी कधी चर्चा करायचा मला खूप कंटाळा येतो. ;-)
पण ढकलपत्रातून ही भन्नाट निमंत्रणपत्रिका मला आली होती. कशी वाटते? आधी फोटू दिसत नव्हते. आता दिसतील बहुतेक.
-सौरभदा.
==================
'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'
मस्त !!
ज्याने कोणी वरील पत्रिका तयार केली आहे, त्या निर्मितीकाराच्या कल्पनाशक्तीला प्रणाम.
मस्त अशी पत्रिका आहे व मुद्देसूद मांडणी आहे.
प्रतिसाद
लग्नपत्रिका कोणत्या भाषेत छापाव्यात हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे हे पूर्णपणे मान्य आहे. मात्र हळुहळु होणाऱ्या या बदलांबाबत आपण निदान चर्चा तरी करू शकतो, यामागचा कार्यकारणभाव समजून घेऊ शकतो यासाठी ही चर्चा करावीशी वाटते.
बोकील यांनी एअरटेलच्या थ्यांक्यू गॉड या जाहिरातीचे कुठे समर्थन केले आहे असे दिसत नाही. त्यामुळे त्यांना ही जाहिरात मान्य असेल किंवा नाही याबाबत आपण फक्त अंदाज बांधू शकतो. (माझ्या मते ती जाहिरात हेदेखील सांस्कृतिक शरणागतीचे उदाहरण आहे.) मात्र अशा प्रत्येक ठिकाणी लेख लिहिणे हे गैरसोयीचे वाटते.
बोकीलांनी मांडलेला मुद्दा असा आहे की जर एखाद्या लग्नाला विशिष्ट मराठी जातीबाहेरचे कोणी येणार नसेल - जे सगळीकडेच होते त्यात काहीही वाईट नाही. - तर त्या लग्नांच्या पत्रिका इंग्लिशमध्ये छापणे ही दिवाळखोरी आहे. जे मला संपूर्ण मान्य आहे. येथे विकास आणि मुक्तसुनीत यांनी त्यांच्या पत्रिकांची आकडेवारी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
मी आजपर्यंत ज्या इंग्लिश पत्रिकांच्या लग्नांना गेलो होतो त्या (आंतरभाषक वगळता इतर) लग्नांमध्ये मला १ टक्क्यांहून अधिक इतर भाषिक दिसलेले नाहीत. (म्हणजे सामान्यतः ५००-६०० लोकांपैकी इतरभाषक लोक ५० पेक्षाही कमी.) मी वर दिलेल्या नदीकाठच्या लग्नात १०००हून अधिक माणसे होती मात्र मला तेथे कोणी इतरभाषक दिसले नाही. (हे सामान्य निरीक्षण आहे. मी तेथे सर्वेक्षण केले नाही)
पुण्याच्या ब्राम्हणांची भाषा ही प्रमाणभाषा म्हणून ओळखली जाते. किंबहुना मराठी समाजाचे सांस्कृतिक नेतृत्त्व त्यांच्याकडे आहे (असे म्हणतात). येथे पुण्याच्या ब्राम्हणांचे त्यांनी दिलेले उदाहरण हे जातीवाचक म्हणून न घेता प्रातिनिधिक म्हणून घ्यावे. मूळ मुद्दा हा बोकील यांनी या लेखात उच्चवर्गीय-उच्चवर्णीय यांच्या भाषाविषयक भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आणि पॉलिटिकली इनकरेक्ट वाटत असले तरी त्यांच्या ह्या निरीक्षणाशी मी सहमत आहे.
मला या सांस्कृतिक दिवाळखोरीवरून कुठेतरी वाचलेले नेमाडे असे मत आठवले. "वेशभूषेतला सर्वात महत्त्वाचा, आकर्षक आणि डौलदार दिसणारा भाग म्हणजे डोक्यावर घालतो तो. आधी कोशा, फेटा, पगडी, टोपी, मुंडासे असे वेगवेगळे प्रकार डोक्यावर घालत. आता संपूर्ण अशिक्षित समाज वगळता फारसे कोणी हे घालत नाही. आपल्याकडच्या उष्ण वातावरणाला सोयीचे धोतर वगैरे कपडे आपण टाकून दिले. उन्हापासून बचाव करणारी डोक्यावरची वस्त्रप्रावरणे सोडून दिली. हे सर्व करण्यामागची कारणे अशी काय असावीत."
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वेश तसा देश ;-)
यापूर्वी मी आयबीएन लोकमत ही मराठी वृत्तवाहिनी पाहिली नव्हती. तसेही मराठी वृत्तवाहिन्या पाहून अनेक वर्षे झाली. त्यावेळी निवेदिका आणि निवेदक साड्यांत, सलवार कमीज, साध्या बिझनेस शर्टात दिसत. आता सर्वांची "ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो" अशी गत दिसली. (याबाबत नाराजी नाही, पण वेगळं वाटल्याचं जाणवलं.)
असो,
आमच्या लग्नाची पत्रिका - १००% इंग्रजी
लग्नाला आलेले लोक -
मराठी -४५%
दाक्षिणात्य - ४०%
उ. भारतीय - ५%
गुजराथी+पारशी - १०%
शेवटच्या दोन संख्या कमी जास्त भरू शकतील.
पत्रिका छापणे आणि लोकांत वाटणे ही पाश्चिमात्य पद्धत. ती अवलंबली असेल तर इंग्रजी भाषेचे वावडे नको. तसेही, विसा श्टॅम्पिंग, रेजिस्ट्रेशन्स वगैरेंसाठी इंग्रजी कामी येत असावी.
फुकटचा सल्ला: पत्रिकाच काय जन्मदाखलेही इंग्रजीतच बनवा. पुढचे अनेक प्रश्न मिटतात. ;-)
विनोदी
नव्या वृत्तवाहिन्या अंमळ विनोदी आहेत. ते असे कपडे पाहून मला हसायला येते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वाद बोकिलांशी नाही
वाद बोकिलांशी नाही. आणि जाहिरात आयडियाची आहे, एअरटेलची नाही. :) मुद्दा सगळीकडे एकच माप वापरायचा आहे. बदलत्या जमान्यात लग्नांची पद्धत सुद्धा बदलत आहे. असो.
एकिकडे पुण्याच्या ब्राम्हणांच्या मराठीला प्रमाण मराठी का? हा वाद आणि एकिकडे त्यांचेच उदाहरण समाजाचा विरोधाभास वाटतो. तसेच टाईम काय झाला? मला टेम नाही हे बोलणारे एका ठराविक समाजाचे लोक कमी दिसतील.
माझ्या अंदाजा प्रमाणे इंग्रजी लग्न पत्रिका कार्यालयीन वाटपासाठी जास्त बनवल्या जातात. जेवढ्यांना पत्रिका दिल्या तेवढे सगळे आले असे कधिच होत नाही. पण न बोलावण्या ऐवजी आगत्याचे बोलावणे बरोबर आणि आनंददायी सुद्धा. तेंव्हा इंग्रजी पत्रिका या दिवाळखोरी ऐवजी सांस्कृतीक प्रगल्भता म्हणून पहावी. काय माहित उद्या राज ठाकरे फतवा काढतील महाराष्ट्रातल्या सर्व पत्रिका मुद्रकांनी फक्त मराठी पत्रिकाच छापव्यात. :)
वर लिहिल्या प्रमाणे उच्चवर्गीय-वर्णीयांपेक्षा इतरांनी चुकिच्या प्रकारे आंग्ल भाषा अंगिकारल्याने दिवाळखोरी आली आहे असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. बोकिलांचे निरिक्षण तुला योग्य वाटत असले तरी मला त्यामागे फक्त एकाच समाजाचा विचार जाणवतो.
प्रश्न जेंव्हा तत्वांचा येतो म्हणजे वैचारिक/सामाजिक/सांस्कृतिक दिवाळखोरी तेंव्हा एकाच समाजाचे निरिक्षण मांडणे मला तरी पटत नाही. मुद्दा योग्य असला तरी योग्य प्रकारे मांडायला हवा. समाजाचा जेंव्हा विचार होतो त्यावेळी तो सर्वसमावेशक असावा.
असो, हल्ली महाजालावर आकर्षक लग्नप्रत्रिका-संकेतस्थळ तयार करून ते महाजालाशी संपर्क असणार्यांना पाठवता येते. पण हि कल्पना सुद्धा आपली नाही. तसेच त्याचा उपयोग सुद्धा एका ठराविक सामाजिक वर्गापुरता आहे.
एक निरीक्षण / थोडे विषयांतर
आईवडिलांना 'मम्मी पपा' म्हणणार्यांचे प्रमाण उच्चशिक्षितांपेक्षा अल्पशिक्षितांमध्ये अधिक आढळते.
(अमराठी मित्रमंडळींना देण्यासाठी काही पत्रिका तरी इंग्रजीत काढणे आवश्यक असते. )