कोल्हापुरातील विश्वशांती यज्ञाच्या संयोजकांना अटक

कोल्हापूर येथे २ ते १३ नोव्हेंबर दरम्यान विश्वशांती यज्ञ पार पडला. विश्वशांती यज्ञाच्या नावाखाली काढलेले हे धर्माचे दुकान तोट्यात गेले आहे.

या यज्ञाचे संयोजक उत्तर प्रदेशातील कोणी शुक्ल नामक महाराज होते. बहुतेक परप्रांतीय पुजारी, देणगीदार व त्यांचे काही स्थानिक हस्तक पुजारी वगैरे संयोजक होते. सव्वादोन कोटी रूपयांचा खर्च, लाखो रूपयांचे खाद्यपदार्थ यज्ञात जाळणे वगैरे कारणांवरून यज्ञाला आधीपासूनच विरोध होत होता. तथाकथित हिंदुत्ववादी, स्वतःला 'पुढारी' म्हणवणारे मध्यस्थ यांची 'शांती' करण्यात संयोजकांचा बराच खर्च झाला. व्यापक जनजागृती झाल्यामुळे बहुसंख्यांनी यज्ञाकडे पाठ फिरवली. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले. (धंदा बसला).

संस्थेचा खोटा रजिस्ट्रेशन नंबर छापलेल्या देणगी पावत्या सर्रास वापरल्या गेल्या. एकाच नंबरच्या पावत्या वेगवेगळ्या लोकांना देऊन पैसे घेतले. या बेहिशोबी प्रकाराची धर्मादाय आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून सर्वच हिशोबाची सखोल चौकशी सुरू आहे.

त्यातच रीतसर परवानगी नसताना महापालिकेच्या क्रीडांगणाचा ३ आठवडे अनाधिकृत ताबा घेणे, मैदानाची नासधूस करणे, जिल्हा प्रशासन व पोलिसांना अंधारात ठेवणे, त्यांनी विचारणा करूनही प्रतिसाद न देणे, सतत स्पीकर्सवरून ठणाणा करून रहिवासी व आजूबाजूच्या अनेक शाळा, महाविद्यालयांना त्रास देणे वगैरे प्रकार उद्दामपणे केले गेले. यज्ञाच्या ठिकाणी छत्र चामरे वगैरे थाट व चेल्यांचा लवाजमा घेऊन (सर्वसंगपरित्याग केलेले) कोणी साधूमहाराज हिंडत होते. आर्थिक गणित चुकल्याने दक्षिणेच्या दरात तडजोड सुरू झाली. ५१ हजारांपासून अक्षरशः २ रुपयांपर्यंत घसरण झाली. 'ब्राह्मण भोजन, भू-देव, दान, संतुष्टी, पुण्यकर्म' वगैरे शब्द पुन्हा पुन्हा वापरून भक्तांना खेचणे चालू होते. थोडक्यात धर्माच्या नावावर सगळा बाजार मांडला होता.

शेवटच्या (बाराव्या) दिवशी आचारी व संयोजकांत बिदागीवरून जुंपली. हा प्रकार भाविकांसमोरच चालू होता. प्रमुख पुरोहितांपैकी बहुतेक परप्रांतीय पंड्ये होते. त्यातच एकाला ठरवलेली दक्षिणा न मिळाल्याने त्याने शेवटच्या दिवशी जाहीर ठणाणा केला. आसपासच्या स्थानिकांनी त्याला प्रवास व वाटखर्चासाठी हजार रूपये जमवून दिले. तर हा पठ्ठ्या भटजी त्या पैशांची दारू पिऊन आला. यज्ञस्थळी, जिथे त्याने मंत्रपठण केले होते तिथेच त्याने अंगावरचे कपडे काढून नग्नावस्थेत दंगा सुरू केला. सहनशीलता संपून स्थानिक रहिवाशांनी त्याला आधी कपडे चढवले व नंतर मार दिला.

इतका सगळा प्रकार होईपर्यंत मैदानाची मालक महापालिका, प्रशासन व पोलिस ढिम्म होते. 'आम्ही भारतीय लोक आंदोलन', विविध पुरोगामी संघटना व हिंदू एकता संघटनेतील वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे नेते यांनी सातत्याने व शांततेने जनजागृती केली होती. त्यामुळे जनतेवर यज्ञाचा प्रभाव पडला नाही. हिंदुत्ववाद्यांनी भांडवल करू नये म्हणून यज्ञ प्रत्यक्ष बंद पाडला नाही एवढेच.

आता पोलिसांनी संयोजकांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. सर्वांना अटक झाली असून कोर्टापुढे हजर केले गेले आहे.

तात्पर्य, शाहूनगरी कोल्हापुरात असली सनातनी विषवल्ली रूजवणे सोपे नाही हे पुन्हा सिद्ध झाले.

लेखनविषय: दुवे:

Comments

"अरेरे" आणि "बरे झाले"

(या बाबतीत "अन्नाची नासधूस होणार" विरुद्ध "नासधूस होणार म्हणणारे हिंदुत्वविरोधी आहेत" अशी काही परस्पर-असमर्पक, पण हिरिरीच्या प्रतिसादांची चर्चा उपक्रमावर झाल्याचे आठवते.) त्यामुळे लोक मनःशांतीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात त्यांच्यापैकीच ही एक, असे माझे मत झाले होते. अशा बाबतीत किती खर्च वाजवी असतो, याचे गणित कठिण असते - म्हणून मी याच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

असे काही झाल्यामुळे ज्या लोकांना (त्या किमतीत) मनःशांती मिळणार होती, त्यांना ती मिळणार नाही, म्हणून अरेरे! वाईट वाटले.

पैशांची अफरातफर करणार्‍यांचा जर काही प्रमाणात पायबंद झाला असेल, तर बरे झाले.

असेच म्हणतो

पैशाची अफरातफर आणि धर्माचा बाजार मांडणाऱ्यांना पायबंद बसला असेल तर ते बरे झाले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मंत्रोच्चार

वरील प्रत्येक वाक्य मंत्रोच्चाराच्या स्टाईलमध्ये म्हणता येईल असे वाटले :-)

बाकी धनंजयशी सहमत! आधी कधीतरी असाच प्रचंड तुप वापरणारा यज्ञ केल्याचे आठवते...

यज्ञस्थळी, जिथे त्याने मंत्रपठण केले होते तिथेच त्याने अंगावरचे कपडे काढून नग्नावस्थेत दंगा सुरू केला. सहनशीलता संपून स्थानिक रहिवाशांनी त्याला आधी कपडे चढवले व नंतर मार दिला.

कपडे चढवण्याइतकी सहनशीलता दाखवली हेच नवल...

कपडे चढवण्याइतकी सहनशीलता दाखवली हेच नवल...

यज्ञस्थळी, जिथे त्याने मंत्रपठण केले होते तिथेच त्याने अंगावरचे कपडे काढून नग्नावस्थेत दंगा सुरू केला. सहनशीलता संपून स्थानिक रहिवाशांनी त्याला आधी कपडे चढवले व नंतर मार दिला.

साधूने किमान शिष्टाचार सोडला तरी सामान्य नागरीकांना सोडता येत नाही.

नाहीतरी आजकाल साधू साध्वी कसेही वागले तरी त्यांना कायदा लागू होत नाही, त्यामुळे जर त्यांना कायदा दाखवला तर तो समस्त हिंदूधर्मावरचा हल्ला असे काही धर्माच्या ठेकेदारांना वाटते. (हे मूठभर माथेफिरू म्हणजे समस्त हिंदू?)

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
कोल्हापुरी मसाला = नाद खुळा !
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

धर्माचा बाजार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"आम्ही कोल्हापूरी'' यांनी लिहिलेले विश्वशांतियज्ञाचे वृत्तांकन वाचले. त्यांचे तसेच या यज्ञाविरुद्ध अहिंसक पद्धतीने यशस्वी आंदोलन करणार्‍या समस्त कोल्हापूरकरांचे मन:पूर्वक अभिनंदन! त्यांची ही कृती प्रशंसनीय तसेच अनुकरणीय आहे.
या वृत्तांकनात लिहिले आहे:

>**संस्थेचा खोटा रजिस्ट्रेशन नंबर छापलेल्या देणगी पावत्या सर्रास वापरल्या गेल्या. एकाच नंबरच्या पावत्या वेगवेगळ्या लोकांना देऊन पैसे घेतले.
**सतत स्पीकर्सवरून ठणाणा करून रहिवासी व आजूबाजूच्या अनेक शाळा, महाविद्यालयांना त्रास देणे वगैरे प्रकार उद्दामपणे केले गेले. यज्ञाच्या ठिकाणी छत्र चामरे वगैरे थाट व चेल्यांचा लवाजमा घेऊन (सर्वसंगपरित्याग केलेले) कोणी साधूमहाराज हिंडत होते.
**देव, दान, संतुष्टी, पुण्यकर्म' वगैरे शब्द पुन्हा पुन्हा वापरून भक्तांना खेचणे चालू होते. थोडक्यात धर्माच्या नावावर सगळा बाजार मांडला होता.
**..तर हा पठ्ठ्या भटजी त्या पैशांची दारू पिऊन आला. यज्ञस्थळी, जिथे त्याने मंत्रपठण केले होते तिथेच त्याने अंगावरचे कपडे काढून नग्नावस्थेत दंगा सुरू केला.

.......
हे सर्व प्रकार अपवादात्मक नसून अशा कर्मकांडांच्या बाबतीत प्रातिनिधिक आहेत.
'आम्ही कोल्हापुरी' शेवटी लिहितातः
तात्पर्य, शाहूनगरी कोल्हापुरात असली सनातनी विषवल्ली रूजवणे सोपे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.


हा एक आशेचा किरण आहे. देशात सर्वत्र असेच होवो.

 
^ वर