बदलती मराठी - २

बदलती मराठी या मूळ चर्चेत सुमारे ८०-८५ प्रतिसाद झाल्याने ही वेगळी चर्चा सुरु करत आहे.

मूळ चर्चेचे स्वरुप थोडेसे उपहासात्मक असल्याने सदस्यांनी तिथे थोडी गंमत करून घेतली. ही चर्चा थोड्या गंभीर वळणाने जावी असे वाटते.

मनोगताच्या दिवाळी अंकात बदलत्या मराठीबद्दल आलेला प्रा. प्र. ना. परांजपे यांचा हा लेख मला वाचनीय वाटला होता.

लेखातील काही ठळक मुद्दे असे -

१. विविध वृत्तवाहिन्या, चित्रपट आणि मालिका यांचे सादरकर्ते मुख्यत: इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले तरूण तरूणी आहेत. मराठीला बदलण्यास हे एक कारण आहे. तसेच, श्रोतावर्गही बाहेरील जगात इंग्रजीचाच अधिक वापर करत् असावा.

२. आज भारतात लोकांना किमान तीन भाषा तरी येतात तेव्हा भाषांची सरमिसळ होणे नैसर्गिक आहे. त्यामुळे मराठीला धक्का पोहोचतो असे प्राध्यापकांना वाटत नाही.

३. शुद्धलेखनाला महत्त्व आहे. शुद्धलेखनाचे नियम शून्य असून चालणार नाही.

४. दर दहा वर्षांनी नियमितपणे सरकारी पुस्तके, पत्रके, नियमावली यांत वापरले जाणारे शब्द, शब्दप्रयोग यांचे भाषासमितीकडून मूल्यमापन व्हावे. त्यामुळे व्यवहारात वापरली जाणारी मराठी त्यात दिसेल आणि शासकीय कारभारात वापरली जाणारी मराठी बोजड राहणार नाही.

५. मराठी शब्द वापरायचा हा निश्चय केला म्हणून परभाषेतल्या एखाद्या शब्दाकरता अवघड मराठी शब्द तयार करण्यापेक्षा सोपा प्रतिशब्द शोधणे अथवा त्या शब्दाचे मराठीकरण करून वापरणे याचा प्रचार व्हावा.

६. प्रमाणभाषा आणि बोलीभाषेविषयी बोलताना लेखक म्हणतात, वैचारिक लेखन, ग्रांथिक लेखन हे भविष्यात संदर्भ म्हणून वापरले जाऊ शकते म्हणून हे लेखन प्रमाणभाषेतच व्हावे. प्रमाणभाषा म्हणजे साडेतीन टक्के उच्चभ्रू समाजाची मराठी नाही; तर ती सर्वांना समजेल, सर्वांना समजावे, याकरता असणारी मराठी भाषा आहे.

हे लेखातील काही ठळक मुद्दे. या खेरीजही लेखात अनेक बाबींवर चर्चा झाली आहे. मूळ लेख वाचल्यावर यावर अधिक माहिती मिळू शकेल.

या मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटते? मराठी बदलते आहे हे सत्य आहे. भाषा प्रवाही असते पण म्हणून भाषेने प्रपातासारखे वरुन खाली कोसळावे असे नसावे. मराठीतील परभाषिक शब्द वाढत आहेत हे खरे आणि ते टळणार नाही परंतु एका वाक्यात किती इंग्रजी शब्द असावेत हे कोण ठरवणार?

उदाहरणार्थ -

१. ती निळी प्लेट रिकामी आहे. - ८०% मराठी.
२. ती ब्लू प्लेट रिकामी आहे. - ६०% मराठी.
३. ती ब्लू प्लेट एम्प्टी आहे. - ४०% मराठी.

यांतील पहिले वाक्य मराठी म्हटले तर तिसरे वाक्य कोणत्या भाषेतील आहे हे कसे ठरवायचे? आणि किती परभाषिक शब्द वापरुन मराठी ही मराठीच राहिल हे देखील कसे ठरवायचे?

लेखनविषय: दुवे:

Comments

नियम

मंगेश राजाध्यक्ष यांच्या 'भाषाविवेक' या अप्रतिम पुस्तकात मी एक नियम वाचला होता. मागे मनोगतावर महेश यांनीही हाच निकष सांगितला होता... कोणताही 'बाहेरचा' शब्द 'घरचा' कधी होतो? जेव्हा मराठीचे विभक्तीप्रत्यय, अव्यये, अनेकवचने यांचे नियम तो शब्द निःसंकोचपणे पाळू लागतो तेव्हा. जर असे नियम पाळण्यास त्या शब्दाला काही आडकाठी नसेल तर त्याला मराठी मानण्यास आपणही बिचकू नये.

मला वाटते ललित किंवा कोणत्याही प्रकारच्या साहित्यामध्ये असे तथाकथित परभाषिक शब्द न वापरण्याची सोवळी प्रथा होती. जी कोसला मध्ये नेमाड्यांनी प्रथम मोडीत काढली. (चू.भू.द्या.घ्या.) त्यांनी वापरलेले अनेक शब्द हे बाहेरून आलेले असले तरी ते घरचेच झाले होते. उदा. 'सिगरेटी' हा शब्द घ्या. सिगरेट/सिगारेटचे अनेकवचन शहरी भागात इंग्रजीप्रमाणे सिगरेट्स/सिगारेट्स असे होते मात्र ग्रामीण भागात ते सिगरेटी असे होते. (एकंदर मराठीची प्रवृत्ती समजून तिचा नेमका वापर करण्याची पद्धत गावाकडेच आहे). तीच गोष्ट लायब्री, फायली, टेबले या सर्व शब्दांची.

अर्थात बाहेरून आलेला कोणताही शब्द आपोआप घरचा होणार नाही. त्याला घासूनघासून गुळगुळीत करावे लागेल. वाक्यात वापरताना जाणीवपूर्वक मराठी पद्धतीने वापरावा लागेल. प्लेटभर, प्लेटा (अनेकवचन), प्लेटीत(सप्तमी) असे गावाकडे सर्रास वापरले जाते, त्यामुळे तो मराठी. मात्र शहरात प्लेट्स असे वापरले जाते तेव्हा तो इंग्लिशच.(तीच गोष्ट सी.डी.ची. गावात त्याचे अनेकवचन सीड्या असे होते तर शहरात सीडीज्.)

चू.भू.द्या.घ्या.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हाच नियम

मागे मनोगतावर महेश यांनीही हाच निकष सांगितला होता... कोणताही 'बाहेरचा' शब्द 'घरचा' कधी होतो? जेव्हा मराठीचे विभक्तीप्रत्यय, अव्यये, अनेकवचने यांचे नियम तो शब्द निःसंकोचपणे पाळू लागतो तेव्हा. जर असे नियम पाळण्यास त्या शब्दाला काही आडकाठी नसेल तर त्याला मराठी मानण्यास आपणही बिचकू नये.

खरे आहे. मलाही हा नियम आठवतो आणि त्याच्याशी मी सहमतही आहेच. फाईल या शब्दाच्या बाबतीत हल्लीच मीही तो निनाद यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

परंतु मग,

मी माझ्या खोलीत स्लिपायला जाऊ का?
मी आता स्लिपते आपण उद्या बोलू.
मी लवकरच स्लिपणार आहे.

क्रियापदांच्या आणि सर्वनामांच्या बाबतीत आपण हा नियम लावत नाही असे दिसून येते.

तसा वापर करायला हवा

एक तर परभाषिक शब्द स्वीकारण्याचे कारण त्या शब्दाच्या जवळपासचाही शब्द आपल्या भाषेत नसतो. (किंवा असला तरी तो वापरण्याची लाज वाटते.) मराठीतील बहुतेक क्रियापदे ही माणसे करत असलेल्या सर्व क्रिया दाखवण्यास सक्षम आहेत असे वाटते. मात्र एखादे क्रियापद/क्रिया अशी असेल की जी मराठीत नाहीच, तर ते क्रियापद आयात करायला हरकत नसावी.

मला आता अशी कोणतीही क्रिया आठवत नाही जिच्यासाठी मराठीत क्रियापद नाही. (उदा. Logging out, सारख्या क्रियेसाठी जाण्याची नोंद किवा लॉग आऊट करणे हे शब्दप्रयोग वापरले जातात.)

राधिका, धनंजय, वाचक्नवी, टग्या वगैरे भाषिक तज्ज्ञ लोकांनी जरा आपली मते सांगावीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तज्ज्ञ

कृपया 'तज्ज्ञ' वगैरे शब्द इतके स्वस्त करू नयेत, ही विनंती.

तज्ज्ञ हा शब्द ऑब्जेक्टिवली* घ्यावा सबजेक्टिवली नको.

*इथल्या सदस्यांमध्ये मला जे वाटले ते


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

कोणताही 'बाहेरचा' शब्द 'घरचा' कधी होतो? जेव्हा मराठीचे विभक्तीप्रत्यय, अव्यये, अनेकवचने यांचे नियम तो शब्द निःसंकोचपणे पाळू लागतो तेव्हा. जर असे नियम पाळण्यास त्या शब्दाला काही आडकाठी नसेल तर त्याला मराठी मानण्यास आपणही बिचकू नये.

अगदी बरोबर..सहमत.. मागे वाचक्नवी/यनावाला (नक्की आठवत नाहि) यांनीही असेच सांगितले होते आणि ते मलाहि पटले होते/पटते..

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

मर्ढेकर

मला वाटते ललित किंवा कोणत्याही प्रकारच्या साहित्यामध्ये असे तथाकथित परभाषिक शब्द न वापरण्याची सोवळी प्रथा होती. जी कोसला मध्ये नेमाड्यांनी प्रथम मोडीत काढली. (चू.भू.द्या.घ्या.)

मर्ढेकरांच्या कविता चाळीसच्या दशकामधल्या. त्यांनी परभाषिक शब्दच आणले नाहीत तर , भाषेची बर्‍यापैकी मोडातोड केली. त्यांच्या काव्यात "पिपात न्हाणारे " उंदीर "बेकेलाईटी , बेकेलाईटी" असतात. "मोटारीचे " मनोगत "क्लिन्न" असते. "क्लिन्न" शब्दात "खिन्न" आणि "क्न्लीनर"चे मिश्रण आहे असे मी कुठेसे वाचले होते.

सर्वे जन्तु रुटिनाः | सर्वे जन्तु निराशयाः |
सर्वे छिद्राणि पंचन्तु | मा कश्चित् दुःख लॉग् भरेत् ||

डोळे हे फिल्मि गडे, खोकुनि मज पहुं नका !
काढूं मी दळणा कशि, निवडुं सख्या, आणि मका !

यासारख्या अनेकानेक ओळींमुळे मर्ढेकरांवर भीषण टीका झाली. या टीकेमधे आशयाबरोबरच भाषेच्याही "अमंगल" अशा विरूपिकरणाचा आरोपांचा भाग होता.

तेव्हा , नेमाड्यांच्या बाबतीतल्या परकी शब्दांच्या आयातीचे श्रेय कमीत कमी दोन दशके मागे जाते.

होय

माझ्याकडे मर्ढेकरांच्या कवितेचे पुस्तक आहे. त्यातून मी हे लिहीलेले आहे. सर्व ओळी मर्ढेकरांच्या आहेत.

"डोळे हे फिल्मि गडे" हे अर्थातच त्याकाळातील प्रसिद्ध गीताचे मर्ढेकरांनी केलेले विडंबन आहे. माझ्या पोस्टमधील निर्देश त्यातील "फिल्मी" या परकी शब्दाबद्दल होता.

पुन्हा, मूळ कविता वाचलेली नाही, पण (ऐकीव माहितीप्रमाणे) "पिपात न्हाणारे" की "पिपात मेलेले"? "पिपात मेले ओल्या उंदिर" अशी कविता असल्याचे ऐकलेले आहे. पूर्ण कविता वाचलेली नाही. कदाचित पिप (= पिंप) ओले असल्यामुळे त्यात न्हायल्याचा उल्लेख असेलही कवितेत पुढेमागे - कदाचित न्हातान्हाता कोणीतरी पाणी भरण्यासाठी वरून नळ सोडल्यामुळे मेलेही असतील - कल्पना नाही.

"पिपात मेले ओल्या उंदीर " अशी कवितेची सुरवात आहे. "पिपात उंदीर न्हाले , न्हाले" अशी एक ओळ मधे येते.

बहुधा भा.रा.तांब्यांची कविता...

डोळे हे ज़ुल्मि गडे रोखुनी मज़ पाहुं नका । जादुगिरी यांत पुरी ????? ॥
घालूं कशी कशिदा मी । होति किती बाई चुका ॥ ?????? । येथ उभे राहुं नका ॥
खळखळ किती होय मनीं । हसतिल मज सर्वजणीं ॥ येतिल त्या संधि बघुनिं । आग उगा लावुं नका ॥
डोळे हे जुल्मि गडे......
'पिपांत मेले ओल्या उंदिर' ही नवकाव्याची सुरुवात. अत्र्यांच्या भाषेत "याच ओल्या उंदरांवर बसून मराठीत नवकविता आली."
--वाचक्‍नवी

पिपांत मेले ओल्या उंदिर

पिपांत मेले ओल्या उंदिर
पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

एका अनुदिनीवरून कविता उतरवली आहे. त्याचा दुवा वर दिला आहेच.
अधोरेखित शब्द वरील चर्चेत आले आहेत.

पाण्याच्या पिंपात आपोआप पडून उंदिर मेलेले दिसतात.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.
या मला आवडणार्‍या ओळी आहेत.
-- (गटांगळ्या खाणारा) लिखाळ.

वर मुक्तसुनित यांनी क्लिन्न या शब्दाचा उल्लेख केला आहे. सहज शोधता ती कविता मिळाली म्हणून देत आहे.

क्लिन्न मनोगत मोटारींचें
कुशींत शिरलें काळोखाच्या;
नालबंद अन् घोड्याची ये
टाप समेवर जिवंततेच्या.

एकच कडवे येथे देतो..बाकिची कविता दुव्यावर आहेच.
प्रतिसाद अवांतर झाला आहे बहुधा पण कवितेचे दुवे दिल्या शिवाय राहावले नाही.
-- लिखाळ.

अवांतर : युरेका

सदर चर्चेत पूर्णपणे अवांतर : (उडवल्यास हरकत नाही. पेक्षा मर्ढेकरांवर एखादा लेख/चर्चाप्रस्ताव नंदन यांनी टाकला तर उत्तम! हा प्रतिसाद तिकडे वर्ग करावा.)

ओल्या पिपात मेलेले उंदिर ही काव्यकल्पना सर्वसाधारण मुंबईकर अथवा तत्सम चाकरमानी संध्याकाळी थकूनभागून घरी येतात त्यानंतरची त्यांची स्थिती वर्णन करते....(रिकामी जागा भरा)
पिप आणि उंदिर ही स्त्री-पुरुष शरीराच्या गुप्तांगांची प्रतिके आहेत असे वाचलेले आहे आणि त्या अनुषंगाने 'मेले पिपात ओल्या उंदिर' समजते.

.... मर्ढेकरांच्या कविता दुर्बोध वाटल्या तरी युरेका झाल्यावर थक्क करतात हा अनुभव आहे. उपक्रम सदस्यांनी वाचल्या असतीलच!
नसतील तर 'समग्र मर्ढेकर' जरूर वाचावे.

पटण्यासारखा निकष

जेव्हा मराठीचे विभक्तीप्रत्यय, अव्यये, अनेकवचने यांचे नियम तो शब्द निःसंकोचपणे पाळू लागतो तेव्हा. जर असे नियम पाळण्यास त्या शब्दाला काही आडकाठी नसेल तर त्याला मराठी मानण्यास आपणही बिचकू नये.

हा निकष मला पटतो.
अनेकवचनासाठी "स" प्रत्यय (इंग्रजीतून आलेल्या "तत्सम" शब्दांसाठी) आतापर्यंत मराठी झाला आहे की नाही, हे मात्र मला माहीत नाही. मराठीच्या इतिहासात दुसर्‍या भाषेतील तत्सम शब्दांबरोबर त्यांची बहुवचनेही तत्सम येण्याची प्रथा पूर्वी नव्हती. उदा : "खबर" शब्दाचे बहुवचन "अख्बार" मात्र मराठीत आले नव्हे.

इतकेच काय, एखाद्या वेळी दुसर्‍या भाषेतला अनेकवचनी शब्द मराठीत आला तो मराठीतले एकवचन म्हणून (अर्थातच अशा परिस्थितीत शब्दार्थ थोडा तरी बदलणारच, "तत्सम" नाही राहाणार). उदा : "अवलाद", "जाहिरात" (मराठीत एकवचनी शब्द)

हे अर्थातच संस्कृत तत्सम शब्दांबाबतही तितकेच खरे आहे.
"सूत्र" हा संस्कृत शब्द दोनदा मराठीत आला आहे : तद्भव "सूत" आणि तत्सम "सूत्र" असा. दोन्हीच्या बाबतीत अनेकवचने मराठी प्रत्ययांनी होतात, संस्कृत प्रत्ययांनी नव्हे - सुते, सूत्रे.

एवढेच बघितले, तर मराठीला अनेकवचनी तत्सम शब्द आवडत नाहीत असे भासू शकते. पण असे कुठलेच नियम सदासर्वकाळसाठी नसतात. अन्य भाषांचे उदाहरण बघता कधीकधी तत्सम अनेकवचने स्वीकारलेली दिसतात. इंग्रजीतली उदाहरणे सर्वांनाच माहीत असतील. cactus-cacti (Latin), stigma-stigmata (Greek), वगैरे, खूपच! पण भारतातल्याच हिंदी/हिंदुस्तानी भाषेत अरबी/फारसी तत्सम शब्द मुळात अनेकवचनी असल्यास अनेकवचनीच वापरतात. उदा : "कागज़ात". असाच प्रकार मराठीत कालप्रवाहाप्रमाणे झाल्यास होऊ शकतो.

हा प्रकार हल्ली मराठीत झाला आहे काय? हा प्रश्न कठिण आहे. मराठी स्वभाषा म्हणून बोलणार्‍या सभ्य समाजात कसे बोलले जाते? अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर राहिल्यामुळे याबाबतीत मला ताजे काही सांगता येत नाही. "डॉक्टर्सना बोलवा"असे म्हणणारी एक नर्सबाई आमच्या इस्पितळात होती, बहुतेक लोक मात्र "डॉक्टरांना बोलवा" असे म्हणत. प्रत्यय लावत असल्यामुळे नर्सबाईंच्या बोलण्यातला "डॉक्टर्स" शब्द वरील निकषाने "मराठी" होतो. कदाचित या नियमाच्या बाबतीत हा मराठीतला संक्रमणाचा काळ आहे.

खरे म्हणजे "सभ्य समाज" म्हणजे नेमके कोण? या बाबतीत हा संक्रमणाचा काळ असू शकेल. (शास्त्राच्या दृष्टीने "सभ्य समाजाचा" जो प्रवाह, तो "मराठी भाषेचा प्रवाहीपणा".) या प्रश्नाचे जे काही उत्तर कालांतराने येईल ते आपल्या लोकशाही विचारसरणीला आणि नीतिमत्तेला साजेसे येईल अशी आपण आशा करू शकतो, प्रयत्न करू शकतो. पण तो विषय चर्चेसाठी अवांतर आहे.

("तज्ज्ञ" उपाधीच्या बाबतीत टग्या यांच्याशी सहमत.)

परकी शब्दांची आयात : काही इतर साहित्यिक

मर्ढेकरांपेक्षाही थोड्या मागच्या काळातले एक ठळक कवी , ज्यांच्या साहित्यातून परकी शब्दांची आयात प्रचंड प्रमाणात झाली (आणि ज्यामुळे पुढे अत्र्यांनी त्यांच्या कवितांचे जोरदार विडंबन केले) ते म्हणजे माधव ज्युलियन. त्यांच्या "गज्जलांजली"मुळे फार्सी शब्दांची ओळख मराठी वाचकाला झाली. माझ्या अंधुक स्मृतीप्रमाणे , त्यांचा काळ म्हणजे महायुद्धाच्या आधीचा.

याच काळातल्या , ना सी फडक्यांच्या काहीकाही कादंबर्‍यांमधेही उर्दू शब्दांचा मोठा प्रभाव जाणवतो. हेही "मर्ढेकरी" क्रांतीच्या आधीचेच.

परकी शब्द आणि मर्ढेकर : थोडी गंमत !

ही चारच ओळींची कविता ! त्यातील इंग्रजी शब्द नेमक्या भावना व्यक्त करायला घातलेत :-)

"माझे हे पति, मित्र हे;" परिचया देई करूनी वधू
हस्तांदोलन हो, सगर्व पतिच्या आनंद राजें मुखीं.
मित्राच्या हृदयातुनी परि स्मृती ज्या दाविती वाकुल्या
एकेक स्मृति त्यातलि पति-मुखा "Oh, hell" म्हणाया पुरे

इंग्रजी आणि मराठी

इंग्रजी शब्द मराठीत रूढ कसे होतात?
१. त्या शब्दाने व्यक्त होणारी संकल्पना मराठी संस्कृतीत नसते. उदाहरण: रेल्वे स्टेशन, रेल्वे सायडिंग वगैरे रेल्वेसंबंधी शब्द. आपल्याकडे आगगाडी, डबा, रूळ , लोहमार्ग असलेच थोडेफार नवीन शब्द तयार झाले. तसाच आगबोटच्या धर्तीवर आगगाडी झाला.
अनेकदा मराठीत येणारे शब्द अर्थ बदलून येतात. इंग्रजी बोट म्हणजे मराठीतली होडी. पण बोट हा मराठी शब्द इंग्रजी 'शिप'साठी वापरला जातो. जहाज शब्द होता, पण तो शिडाच्या जहाजांपुरता मर्यादित राहिला.
२. इंग्रजी शब्दात उच्चारायला अवघड अशी जोडाक्षरे असली तर मराठीकरणात ती सोपी होतात. 'स्ट'चा ष्ट किंवा स्त. पोस्टमास्टर पोष्टमास्तर होतो.(गुजराथीत प्रोग्रॅम ला पोग्राम म्हणतात आणि तसेच लिहितातही.)
३.'न'चा 'ण'. उदा: मटन-बटनचे मटण, बटण. पेटन्ट चे पेटंट(=पेटण्ट). शेवटच्या अ चा आ, इअ चा या होतो. इन्डिअ चा इंडिया. तसेच मलेशिया वगैरे. शेवटचा हलन्त पूर्ण अकार होतो. उपान्त्य स्वर र्‍हस्वाचा दीर्घ होतो. उदा. लेडिज्‌ चे लेडीज होते. लेडीज हा शब्द स्त्रियांसाठीचे या शब्दापेक्षा उच्चारायला सोपा आहे. तसा सर्वसाधारण स्त्रियांसाठी महिला हा शब्द आहे. त्यामुळे लेडीज म्हणजे खास महिला. नुसते महिला म्हणण्यात ती खासपणाची छटा येत नाही. तसाच प्रकार ब्रेड आणि पावमध्ये आहे.
४. अनेक इंग्रजी शब्दांसाठी बनवलेले शब्द फक्त लिखाणापुरते मर्यादित राहतात, बोलताना उच्चारायला फारसे अवघड नसलेले इंग्रजी शब्दच वापरले जातात. उदा. मुख्याध्यापक, महाविद्यालय, प्रशाला, न्यायालय, संघनायक, अग्निबाण वगैरे.
५. अनेक मराठी शब्द सोपे असूनही (इंग्रजी शब्द फारसे अवघड नसल्याने) प्रचारात येत नाहीत. डेपोसाठी आगार सोपा असूनही फार रूढ नाही. मूळची देशी कल्पना असलेला मिठागार(सॉल्टपॅन) मात्र बदलला गेला नाही. तसेच रेडियो, फोनो, टेप रेकॉर्डर वगैरेंसाठी बनवलेले शब्द सोपे नसल्याने रूढ झाले नाहीत.

छान

छान प्रतिसाद.

मला यासंबंधी मागे एकदा सर्किट यांनी इंग्रजी शब्दांसाठी सोपे मराठी शब्द कसे तयार करावेत, पर्यायी शब्द हा जास्तीत जास्त किती अक्षरी शब्द असावा, कुठचा पर्यायी शब्द रूळू शकेल आणि कुठचा नाही यावरून एक चांगली चर्चा सुरू केली होती ते आठवते. (यात एकाच अर्थाच्या इंग्रजी आणि मराठी शब्दोच्चारांची तुलना अपरिहार्य होती).

हो

हाच. धन्यवाद.
अशा शब्दांना गुणांक देण्याच्या पद्धतीवरही विचार व्हावा असे वाटते. यावरून कदाचित नवा धागा सुरू करणे इष्ट ठरेल.

सर्किट यांच्या लेखात वर्णन केलेल्या पद्धतीप्रमाणे काँप्युटर या शब्दांचे गुणांक संगणकापेक्षा अधिक आहेत. (५.६२५ आणि ४.२५). पण आताच इथल्या एका प्रतिसादात संगणक /काँप्युटर च्या वापरावरून लिहीलेले पाहिले. यामुळे असे वाटते की नवीन शब्दांना प्रतिशब्द चटकन तयार न झाल्याने/प्रचलित न झाल्याने कदाचित काही इंग्रजी शब्द रूळून जात असतील. असे सातत्याने मटाप्रमाणे होत राहिले तर भाषेचे स्वरूप नक्की बदलून जाईल. आणि ते होणे योग्य वाटत नाही. (माझेही एक मत).

विभक्ती प्रत्यय न लागूनही स्वीकारलेले शब्द

मराठीचे विभक्तीप्रत्यय, अव्यये, अनेकवचने यांचे नियम तो शब्द निःसंकोचपणे पाळू लागतो तेव्हा.

मराठीने स्वीकारलेले तरीही विभक्ती प्रत्यय लावून न बदललेले शब्द आठवतात का?

उदा. बस हा शब्द -

बसने गेले येथे बदलतो पण सहसा बशीत बसलो, बशी उभ्या होत्या, बशीतून उतरलो असा वापरला जात नाही.

बसमध्ये चढले, बसमधून उतरले असे वापरले जाते. म्हणजे हा शब्द आपण पूर्णतः स्वीकारलेला नाही असे म्हणायचे का? कारण बसला प्रतिशब्द शोधताना तो बससारखाच सोपा असला तर कदाचित रुळेल अन्यथा रुळण्याची शक्यता कमी वाटते.

असे सर्रास वापरले जाणारे पण न रुळलेले आणखी कोणते शब्द असावेत?

"डॉक्टर्सना बोलवा"असे म्हणणारी एक नर्सबाई आमच्या इस्पितळात होती, बहुतेक लोक मात्र "डॉक्टरांना बोलवा" असे म्हणत.

स लावून अनेकवचन करायचे झाले तर "बसेस उभ्या होत्या" असे ऐकलेले आहे. डॉक्टरांना बोलवा हे मराठीत आदरार्थीही होऊ शकेल. त्यामुळे येथे एका डॉक्टरला बोलवा की अनेक डॉक्टरांना बोलवा हे सांगितले आहे का हे कळत नाही.

इंग्रजीतून मराठीत रुळणारे शब्द एवढीच चर्चा नको तर त्यापुढे जाऊन जर शब्द रुळणार असतील आणि ते रुळवणे सहज होत असेल तर प्रतिशब्द शोधावेत का? शोधल्यास त्यांचा निकष कसा ठरवावा?

सर्वेक्षणाचा मुद्दा

"स"कारांत बहुवचने होतात का, कोण करते, हा सर्वेक्षणाचा मुद्दा आहे. (सिद्धांताचा नव्हे, या अर्थी.)
"बसेस"/"बशी" पैकी पर्याय दोन्ही वापरले जातात का, विशिष्ट समाजातले लोक पहिला किंवा दुसरा पर्याय वापरतात का? हा सुद्धा सर्वेक्षणाचा मुद्दा आहे, सिद्धांताचा नव्हे.

आदरार्थी आणि अनेकार्थी अनेकवचनांचा मुद्दा फार चांगला आहे. त्याबद्दल अभ्यास व्हायला हवा.

(आमच्या त्या नर्सबाई आदरार्थी आणि अनेकार्थी दोन्ही प्रकारे "डॉक्टर्स" वापरत. त्यांच्या आदरार्थी वापराबद्दल आम्हा ट्रेनी लोकांत थोडी खिल्ली उडे - खिल्ली म्हणजे एका प्रकारचे सर्वेक्षणच! पण अनेकार्थी "डॉक्टर्स" या वापराबाबत तितके विचित्र वाटत नसे.)

नवर्‍याच्याच नाही तर..

नवर्‍याच्याच नाही तर सासरच्या सगळ्याच जणांचा आदरार्थी उल्लेख करण्याची भारतीय संस्कृती आहे. सासरच्या मांजराला "अहो शुक्‌" व कुत्र्याला "अहो हाड्‌" म्हणायचे असते. लहान वयाच्या दीराला "अहो भावोजी, Xगण धुवायला चला" म्हणायची प्रथा होती.
अजूनही असावी.
आदर दाखवण्यासाठी नावानंतर राव, साहेब, पंत, अण्णा, अप्पा, काका, ताई, माई, बाई, काकू, आजी वगैरे शब्द वापरणे फार सोयीचे असते. डॉक्टरांना म्हणण्यापेक्षा डॉक्टरसाहेबांना म्हटल्याने हा उल्लेख एकाच डॉक्टरांचा आहे हे स्पष्ट होते. हल्लीहल्ली, राजकीय पुढार्‍यांच्या नावाआधी मा. आणि नंतर जी लावायची घाणेरडी प्रथा मराठीत सुरू झाली आहे. यालाच हांजीहांजी करणे म्हणतात. एका हिंदी दूरदर्शनवाहिनीवर शिवाजीला 'शिवाजीजी' म्हटल्याचे मला आठवते.स्त्रीच्या आकारान्त नावानंतर जी लावून तिला आपण नसली तरी आजी बनवतो हे कुणी लक्षात घेत नाही.
लता मंगेशकरांचा उल्लेख लताबाई केल्यावर एका हिंदी भाषकाने भुवया चढवल्या होत्या. त्याच्या मते 'बाई' म्हणजे मोलकरीण. मराठीत, मोलकरणीलाही शाळेतल्या शिक्षिकेप्रमाणे आदरार्थी बाई म्हणतात हे त्याचा गावीही नव्हते. तसाच एक शब्द म्हणजे बाळ. हा लहान मुलांसाठीही चालतो आणि नावात मुळात असेल तर मोठ्यांसाठीही. बाळ ठाकरे, बाळ गंगाधर टिळक, बाळ कोल्हटकर अशी अनेक उदाहरणे देता येतील. 'सहारा' या हिंदी वाहिनीवर एकाने ठाकर्‍यांचा उल्लेख बाळ ठाकरे असा केल्याबरोबर आर के बजाज यांनी त्याला बालासाहेब म्हणायला लावले. हिंदी-मराठीत आदराच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात.
बाप हा शब्द वडील या शब्दाचे एकवचन आहे असे समजायला काहीच हरकत नाही. आमचे बाप/पिते होत नाही आणि आमचा वडील.. --वाचक्‍नवी

अहो हाड्‌ ?

सासरच्या कुत्र्यालाही अहो म्हणायचे असते. त्यावरून माझी आजी सांगायची ते आठवतंय.
एक सासुरवाशीण सकाळी अंगणात सडा घालताना तिथे असलेल्या कुत्र्याला म्हणते. :
अहो हाडा
मी घालते सडा
उडेल शिंतोडा
भुंकाल तडातडा
( तडातडा भुंकणे हे काही बरोबर नाही पण यमकासाठी!)

सकारान्त स्त्रीलिंगी नावे.

अर्थाबाबत फारसा गैरसमज होणार नसेल तर, सकारान्त स्त्रीलिंगी नावांची अनेकवचने होतात. घूस-घुशी, रास-राशी, चुरस-चुरशी, वगैरे. परंतु आस, कास, बारस, तेरस, बस यांची अनुक्रमे आशी, काशी, बारशी , तेरशी आणि बशी होत नाहीत. --वाचक्‍नवी

रुळणारे शब्द

>>इंग्रजीतून मराठीत रुळणारे शब्द एवढीच चर्चा नको तर त्यापुढे जाऊन जर शब्द रुळणार असतील आणि ते रुळवणे सहज होत असेल तर प्रतिशब्द शोधावेत का? शोधल्यास त्यांचा निकष कसा ठरवावा?<< उच्चारायला, लिहायला, लक्षात रहायला सोपे, सोपी जोडाक्षरे असलेले, सहज रुळणारे परभाषिक शब्द रूढ होऊ पाहात असतील तर जरूर होऊ द्यावेत, त्यांच्यासाठी क्लिष्ट प्रतिशब्द अजिबात शोधू नयेत. अनेक वर्षे फक्त बोलताना वापरून नंतर पुरेसे रुळल्यानंतर त्यांचे मराठीकरण होऊन ते आपोआप लेखी भाषेत येतील. त्यासाठी खास प्रयत्न करू नयेत. मराठी लेखी शब्द क्लिष्ट असले तरी चालवून घ्यावेत. तांत्रिक पारिभाषिक शब्द क्लिष्ट असणारच. त्यांना स्वीकारण्य़ाची तयारी ठेवावी.
फक्त इंग्रजी नामे, विशेषणे वगैरे मराठीत बोलताना जशीच्या तशी वापरली जातात, क्रियापदे नाहीत. त्यामुळे क्रियापदे रूढ करण्याचा अजिबात प्रयत्‍न करू नये. तसे केले तर भाषा विद्रूप होईल.--वाचक्‍नवी

बस हा शब्द

खरे म्हणजे सहसा बस हाच शब्द मी शहरात आल्यावर ऐकला. (त्याआधी सुमारे १७ वर्षे फक्त वाचला होता, बसस्थानक वगैरे) मात्र बशीत बसलो, बशी उभ्या होत्या, बशीतून उतरलो असे वापरायला हरकत नसावी.

बससाठी आमच्याकडे वापरात असलेले शब्द म्हणजे यष्टी* (किंवा गाडी). यष्ट्या, यष्टीत, यष्टीतून वगैरे शब्दप्रयोग सर्रास चालायचे.

(त्याचा दुष्परिणाम असा की, यष्टीरक्षक हा कंडक्टरसाठीचा मराठी शब्द आहे आणि यष्टीचीत म्हणजे बशीने केलेला ऍक्सीडेंट/आक्शिडन/अपघात असे समजत होतो.)

असो.

आपला,
(चेंडूफळीपटू) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बशीत

त्याचा दुष्परिणाम असा की, यष्टीरक्षक हा कंडक्टरसाठीचा मराठी शब्द आहे आणि यष्टीचीत म्हणजे बशीने केलेला ऍक्सीडेंट/आक्शिडन/अपघात असे समजत होतो.

आणि चहा बशीत ओतला म्हणजे कुणीतरी (येड्याने) चहा बसमध्ये सांडला असे समजत होतात का? :)

चालायचेच

ते बशीवर अवलंबून आहे. ती खाली असेल तर बशीमध्ये सांडायला हरकत नसावी.

आपला,
(द्वयर्थी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गाडी - ट्रेन, यष्टी, बस, कार, ट्रक, टेंपो

गाडी हा एकच शब्द आपण सर्वत्र वापरून ट्रेन, यष्टी, बस, कार, ट्रक, टेंपो यांच्यावर अपरिमित अत्याचार करतो असे मला वाटते.

यष्टीरक्षक हा कंडक्टरसाठीचा मराठी शब्द आहे आणि यष्टीचीत म्हणजे बशीने केलेला ऍक्सीडेंट/आक्शिडन/अपघात असे समजत होतो.

हाहाहा!! यष्टी ही सार्वजनिक मालमत्ता असून यष्टीरक्षण ही सामाजिक जबाबदारी आहे.

गाडी

गाडी हा एकच शब्द आपण सर्वत्र वापरून ट्रेन, यष्टी, बस, कार यांच्यावर अपरिमित अत्याचार करतो असे मला वाटते.

आणि सर्व प्रकारच्या दुचाक्या देखिल. फक्त तीनचाकी रिक्षाला (१००% मराठीत रुळलेला शब्द, प्रतिशब्द सुचवुन दाखवा) मात्र गाडीह्या संबोधनापासुन सूट मिळाली आहे असे वाटते.

रिक्षा

'रिक्षा' जपानी आहे हे या प्रतिसादाने चाळवलेल्या उत्सुकतेमुळे कळले. धन्यवाद.

ट्याक्सी

रिक्षाप्रमाणेच सवलत मिळालेला शब्द म्हणजे ट्याक्सी. (अनेकवचन ट्याक्स्या)

आपला,
(ट्याक्सीवाला) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हं?

जर दुसर्‍या भाषेतले शब्द मराठीत येणार असतील आणि वापरले जाणार असतील तर मग

भांडं खाली आहे किंवा
ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली किंवा
कम्प्युटरच्या हार्ड डिस्कवर पार्टिशन करून तिला होम ड्राईव्ह असे म्हणू

यासाठी प्रतिशब्द शोधण्याची गरज कोणती?

याला मराठीच म्हटले तर प्रमाणभाषा, बोलीभाषा, भाषेवरील परकीय अत्याचार, प्रतिशब्द शोधा, भाषेचे प्रमाणिकरण करा या सर्वांना डच्चू देता येईल.

-राजीव

स्कोप

त्यामुळे भाषेचे प्रमाणीकरण हे गरजेचेच आहे, फक्त त्यामागची गरज आणि तिचा स्कोप (मराठी?) बोलीभाषेपेक्षा थोडा वेगळा आहे, एवढेच.

स्कोप म्हणजे विस्तार इथे बरोबर बसेल.

संगणक हा शब्द मी फक्त वाचतो, बोलत कधीही नाही. असे अनेक शब्द आहेत जे मी कधीही बोललो नाही आणि बोलणार नाही. फक्त वाचतो.

माझ्याशी संपर्क साधा असे मी आतापर्यंत कोणालाही म्हटलेले नाही.

मला काँटॅक्ट कर असे नेहमी म्हणतो.

माझ्या शत्रूंना मी सहसा हाताळू शकतो, पण हे परमेश्वरा, माझ्या मित्रांपासून मला वाचव!

लाखाची गोष्ट.

- राजीव

असे असावे

मात्र प्रमाणभाषेचे मूळ बोलीभाषेत असावे, आणि प्रमाणभाषेने बोलीभाषेपासून फार फारकत घेऊ नये, असेही वाटते.

प्रमाणभाषेचे मूळ बोलीभाषेतच असते आणि प्रमाणभाषेने बोलीभाषेपासून कधीच फारकत घेतलेली नसते. भाषेचे प्रमाणिकरण, शुद्धलेखन, शुद्धशब्द, अशा गोष्टींमुळे भाषेच्या व्यवहाराला मर्यादा येऊ शकतात तेव्हा भाषेत येणार्‍या शब्दांना आहे तसे स्वीकारावे त्यात योग्य बदल भाषा व्यवहारात हळू-हळू होत असतात, तेव्हा नवीन शब्दांना स्वीकारतांना मराठी भाषेची हानी होते, असा विचार नवे शब्द स्वीकारतांना करु नये असे वाटते.


डिस्क्लेमर: प्रत्येकाला एकएक असते. हे माझे एक. ;)

-दिलीप बिरुटे

दोनदा प्रतिसाद तरी लिहून घेतो

दिवाळी अंकात बदलत्या मराठीबद्दल आलेला प्रा. प्र. ना. परांजपे यांचा हा लेख मला वाचनीय वाटला होता.

प्रा. परांजपे यांना प्रश्न चांगले विचारले आहेत. मात्र शुद्धलेखनाशिवाय पर्याय नाहीच हेच या मुलाखतीचे तात्पर्य असल्यामुळे त्या मुलाखतीचे फक्त प्रश्न वाचावेत, मला नववा प्रश्न आवड्ला..उत्तरात मात्र प्रमाणभाषेची टीमकी वाजत राहते, त्यांची संपुर्ण उत्तरे ही शुद्धचिकित्सेतून काढली सारखी वाटतात.


डिस्क्लेमर: प्रत्येकाला एकएक असते. हे माझे एक. ;)

-दिलीप बिरुटे

हा प्रतिसाद

हा प्रतिसाद दिवाळी अंकात लिहायचा होता की या चर्चेत? :)





रुळलेले शब्द

"ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली" हा शब्दप्रयोग शहरी समाजात तरी रुळला असावा, म्हणून मराठी मानायला हरकत नसावी.
("कंप्यूटर"ला मराठीत "संगणक" हा शब्द आहे, पण तो काही खरा नाही - ओढूनताणून आणलेला आहे. किती जण तो सामान्यपणे वापरतात? त्यामुळे "कंप्यूटर"च्या वापराला "'कंप्यूटर'चा मराठी उच्चार 'काँप्यूटर' असा आहे" एवढा एकच [मामुली] आक्षेप घेता येईल
.)
'ट्रेन प्लॅटफ़ॉर्मला लागली', किंवा 'काँप्यूटर' हे प्रयोग जोपर्यंत फक्त बोलीभाषेत आहेत, तोपर्य़ंत त्यांना रूढ म्हणता येणार नाही. जेव्हा लेखी भाषेच हेच आणि असेच प्रयोग होतील तेव्हाच त्यांना रूढ म्हणता येईल.
हार्ड डिस्क वगैरे शब्द लेखी भाषेत असेच लिहिले जातात तेव्हा त्यांना रूढ म्हणायला हरकत नाही.
मात्र प्रमाणभाषेचे मूळ बोलीभाषेत असावे, आणि प्रमाणभाषेने बोलीभाषेपासून फार फारकत घेऊ नये, असेही वाटते. फक्त कुठली बोलीभाषा हे ठरवावे लागेल. अगदी माफक अंदाजाप्रमाणे मराठीच्या सुमारे १५० बोलीभाषा असाव्यात. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाला १४४ चौरस कोसांनी भागितल्यावर, मला वाटते याहून मोठा आकडा येईल.---वाचक्‍नवी

अनेक वचने

आयात शब्दांची अनेक वचने मराठीचे नियम न लावता केली तरी चालावीत असे वाटते. जर एखादा शब्दच आयात झाला आहे तर त्याचे अनेकवचन सुद्धा चालावे. डॉक्टरांना बोलवा तसेच डॉक्टर्सना बोलवा दोन्ही बरोबर म्हणायला हवे. तसेच हार्ड डिस्क्स /डीस्का चालायला हवे. बस कदाचित अपवाद ठरावा कारण बशी म्हटले तर कपबशी आठवते. (येथे सुद्धा कपबशीतला कप आयात आहे. अनेकजण कपाचे अनेकवचन कपं अथवा कप्स असे करताना आढळतात.) कपसाठी मराठी शब्द आहे का?

काही शब्द चुकीच्या प्रकारे वापरले जातात. ग्लास हा त्या पैकी एक. अगदी पाण्याचा स्टीलचा पेला मागताना सुद्धा जरा ग्लास दे :) म्हटले जाते. फुलपात्र हा शब्द नामशेष होत आहे असे जाणवते आहे. तसेच तांब्या (उपक्रमावरचा ऐतिहासिक शब्द) भांडे मात्र वापरला जातो.





कप,फुलपात्र वगैरे

कपचे अनेकवचन कप असेच होते. कुणी कप्स म्हटल्याचे स्मरत नाही. कप हा मराठी शब्द आहे कारण याचे सामान्य रूप कपा- असे होते. चहाच्या कपाला चहाचा पेला किंवा प्याला असे सहजपणे बोलले-लिहिले जाते. फुलपात्र हे विशिष्ट आकाराचे मराठी भांडे आहे. त्याला इंग्रजी-हिंदी प्रतिशब्द नाहीत. तांब्या, गडू, कळशी, पातेले, सतेले, तरसाळे यांनाही अचूक इंग्रजी शब्द नाहीत.
पाणी पिण्याच्या उभ्या भांड्याला मराठीत ग्लास म्हणतात. अर्थात, ग्लासचे प्रत्ययापूर्वी सामान्यरूप होते. टम्बलर असे आपण म्हणू शकत नाही कारण तो टमरेलसाठी वापरायचा इंग्रजी शब्द आहे असे समजले जाईल. (इंग्रजीत टंब्रेल किंवा टंब्रिल असे शब्द आहेत. त्यांचा अर्थ बैलगाडीसारखी तिरपी करता येण्यासारखी गाडी असा आहे, त्यांचा मराठी टमरेलशी संबंध नाही.)--वाचक्‍नवी

नाही

अनेकवचने आयात करू नयेत असे माझे मत आहे. मराठीतले बहुतेक नियम हे मराठीसाठी पुरेसे आहेत. (ससा चे स्त्रीलिंग काय किंवा पालीचे पुल्लिंग काय वगैरे पुल विनोद वगळता.)

इंग्लिशमध्येही बाहेरून आलेल्या शब्दांना शक्य तितके इंग्लिश व्याकरणानुसारच चालवले जाते. उदा. लाडूचे अनेकवचन इंग्लिशमध्ये लाडूज् असे होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

म्यान

इफ वन टेक्स अ मॅन आउट ऑफ ४११०३०, देन ही गेट्स इण्टु ४११०५२.

अच्छा म्हणजे 'एक म्यान आणि दोन तलवारी' असे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रश्न

पण एवढे करूनही इंग्रजी मेलेली नाही, मरू घातलेलीही नाही; चांगली भरभक्कम आहे. का? बिकॉज़, दे (द अँग्लो-अमेरिकन्स) हॅव बेटर थिंग्ज़ टू डू दॅन टू वरी अबाउट द फ्यूचर ऑफ ऑर टू लॅमेंट अबाउट द इमिनंट डेथ ऑफ देअर ओन लँग्विज. (इट्स द इकॉनॉमी, स्टुपिड!)

भाषेच्या अस्तित्त्वाचा प्रश्न "संपत्तीच्या निर्मितीशी" (जनरेशन ऑफ वेल्थ) कितपत जोडता येईल याचाही आपण थोडा विचार करू शकतो. गुजराथीचे उदाहरण घेतले (किंवा मारवाडी लोकांची भाषा राजस्थानी असे मानले तर त्या भाषेचे उदाहरण घेतले) तर आपल्याला अपेक्षित ते उत्तर सापडणार नाही. गुजराथी/मारवाडी भाषेचा प्रवाह कितपत जोमदार आहे; या भाषेला स्वतःचे स्वयंपूर्ण अस्तित्व आहे का ही भाषा इंग्रजी-हिंदीचीच दासी आहे यावर मी केवळ मी अंदाजच बांधू शकतो; माझा काही या क्षेत्रात अधिकार नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे , भारतातल्या इतर भाषांप्रमाणे, गुजराथीलाही "इंग्रजी-हिंदीचीच दासी " बनण्याचे दुर्दैव ओढवलेले असावे. (चूभूद्याघ्या). याउलट, तमिळ भाषेतल्या गेल्या पन्नासेक वर्षातल्या द्रविडी चळवळींमुळे त्या भाषेला (विद्वेषी स्वरुपाचे का होईना ) पण एक स्वयंपूर्ण स्थान आहे हे मान्य करावे लागते.

म्हणजे याचे एक उत्तर असे निघू शकते की : केवळ पैशाने भाषेचा प्रश्न सुटणारा नाही. मराठीपुरते बोलायचे तर व्यापक चळवळीला पर्याय नाही आणि किमान काही दशके सगळ्या गोष्टी रुजायला वेळ लागेल. एका रात्रीत कसलाही चमत्कार होणे नाही.

गुजराथी

माझा काही या क्षेत्रात अधिकार नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे , भारतातल्या इतर भाषांप्रमाणे, गुजराथीलाही "इंग्रजी-हिंदीचीच दासी " बनण्याचे दुर्दैव ओढवलेले असावे.

मुळीच नाही. सरस्वती लक्ष्मीची दासी असते. तीच गत गुजरातीची (गुजराथ मध्ये आहे.) इंग्रजीला काडीची किंमत नाही. सर्वत्र-सर्रास (कॉल सेंटर्स, मॉल्स, फूडकोर्ट्स..) गुजराथीच चालते.इथे इंग्रजीवर गुजराथीचे आक्रमण आहे. हिंदीवरही आहे.

साहित्याबद्दल माहिती नाही, पण गुजराथमध्ये गुजरातीचे मरण दूरच पण इंग्रजी/हिंदी मात्र धोक्यात आहे. (यात काही गैर आहे असे नाही.)

नवीन इंग्रजी शब्द...

मराठीत आले तर ठीक आहे. पण मराठीत एखाद्या गोष्टीसाठी एखादा समर्पक शब्द असताना त्याऐवजी बोलण्यात इंग्रजी शब्दांचा वापर का करावा?
मराठीतल्या आजकालच्या सर्व कार्यक्रमात हे असलं, इंग्रजीचा भडिमार असलेलं मराठी बोलायची टूम (फ्याशन) निघाली आहे.
छाप (इम्प्रेशन) पाडण्यासाठी असं बोललं जातं का? त्याने इंम्प्रेशन पडतं का? की असं बोलून आपण काही विचित्र करत आहोत असं कुणाला वाटेनासंच झालं आहे?
आयटीच्या हापिसांमध्येही असं बोलणारे अनेक जण आहेत, मात्र एखाद्या प्रोजेक्टच्या सादरीकरणावेळी पूर्ण इंग्रजी भाषेत बोलायचं म्हटलं की यांचं ततपप व्हायला लागतं असं माझ्या भावाचं निरीक्षण आहे. असल्या एक ना धड भाराभर चिंध्या काय उपयोगाच्या?
इंग्रजी शाळातून शिकणार्‍यांचं मराठी तर कल्पना करण्याच्या पलीकडे गेलं आहे. माझ्या एका इंग्रजी माध्यमातून कॉलेजपर्यंत शिक्षण घेतलेल्या बहिणीला काही मराठी आकडेच कळत नाहीत. इंग्रजीत सांगावे लागतात. फेसबुकवर मित्र मैत्रिणींचं कुठं काय चाललं आहे हे तिला पाहता येतं पण रोजच्या बोलण्यातलं साधं मराठी सोडलं तर बर्‍याच शब्दांचे अर्थ माहित नसतात. बसमध्ये पायावर पाय पडला तर 'लोकं इतकं पायावर स्टँप करतात ना!' असं ती म्हणते.
अजून दुसरा एक मित्र गप्पा मारताना 'असं म्हटलं तर वागवं होणार नाही' हे वाक्य बोलून गेला. वावग्याची तर त्याने वाट लावलीच पण तुम्ही तुमच्या मित्राशी गप्पा मारताना ही असली वाक्यं वापराल का?
आपल्या मराठी भाषेसाठी आता खरंच कुठेतरी काहीतरी करायची खूप गरज आहे. पण काय करता येईल? कोणते उपाय योजता येतील? :-(

(खिन्न)सौरभ.

=============

या असल्या लोकांनी त्यांच्या कातड्याचा डफ करुन त्यावर धेडगुजरी मराठी बोलावी. एरव्ही 'शुद्ध मराठी' हे ठीक आहे.

याचे कारण

मराठीत एखाद्या गोष्टीसाठी एखादा समर्पक शब्द असताना त्याऐवजी बोलण्यात इंग्रजी शब्दांचा वापर का करावा?

याचे कारण चर्चेच्या सुरुवातीला आले आहे तसेच आहे. इथे फक्त वृत्तनिवेदक, कलाकार इ. इंग्रजी माध्यमातील नसून श्रोतावर्गही इंग्रजी माध्यमातीलच आहे. इतकेच नव्हे तर पालकही आता इंग्रजी माध्यमातील आहेत.

एक अनुभव सांगायचा झाला तर -

हल्लीच एक नाटुकली सादर करायची होती. यात चाळीशीच्या माणसांना सलग २-३ मराठी वाक्ये बोलता येत नाहीत असा अनुभव आला. (अर्थात, ही गोष्ट अमेरिकेतली आहे आणि सर्वांचेच असे होते असे म्हणता येणार नाही. हे एक प्रातिनिधिक उदाहरण मानावे)
त्यांच्या मुलांकडून एका सलग मराठी वाक्याची अपेक्षा करणं हे देखील खूप होईल. तरीही, या सर्व व्यक्ती घरात मराठीत बोलतात. ते बोलताना त्यांचे मराठीविषयी प्रेमही जाणवते. परंतु, इंग्रजी मिश्रित मराठी हीच त्यांची बोलीभाषा झाली आहे. या व्यक्तींना नाटुकलीत इंग्रजी शब्द पेरुन मराठी वाक्ये दिली असता, ते सहज संवादफेक करू लागले.

समर्पक शब्द हे बर्‍याचजणांकरता केवळ आता पुस्तकात राहीले आहेत. त्यासाठी इंग्रजी शब्द अधिक प्रचलीत झाले आहेत कारण घराबाहेर तेच वापरात येतात आणि सर्वसामान्य माणसाचा अधिक वेळ हा घराबाहेर जातो. जसे, पँट शर्ट हा परदेशी पोषाख आणि कुडता धोतर हे देशी पण म्हणून आजकाल घरी येऊन धोतर नेसताना कोणी दिसत नाही तसेच. जे सुटसुटीत आहे, सर्वत्र वापरले जाते, सर्वांना चटकन समजते असे शब्द बोलणे लोकांना सोयिस्कर होते.

थांबणार कुठे?


जे सुटसुटीत आहे, सर्वत्र वापरले जाते, सर्वांना चटकन समजते असे शब्द बोलणे लोकांना सोयिस्कर होते.

ह्यातच तर खरी मेख आहे. जे सोयिस्कर पडतं ते अंगीकारणं तर आपण उलटवू शकत नाही.
पण मग मराठीतलं इंग्रजीचं प्रमाण जाऊन थांबणार तरी कुठे? काही वर्षात नुसती क्रियापदंच मराठी राहतील.
शेवटी जे काही करायचं ते मराठी लोकांना, त्यातल्या त्यात पालकांनाच करावं लागणार आहे.
एक प्रश्नः
येत्या पन्नास वर्षात इंग्रजीने गिळलेल्या भाषांमध्ये मराठी असेल की नसेल? ह्यावर इथल्या सदस्यांमध्ये मतदान घ्यायला हवं.

(अजूनच खिन्न) सौरभ.

=============

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

न सुटणारा प्रश्न

मग मराठीतलं इंग्रजीचं प्रमाण जाऊन थांबणार तरी कुठे? काही वर्षात नुसती क्रियापदंच मराठी राहतील.

हाच तर मोठा प्रश्न आहे जो मूळ चर्चेत टाकला आहे. साधारणतः, क्रियापदे आणि सर्वनामे मराठी राहतात आणि बाकी सर्व इंग्रजी होत जाते.

१. ती निळी प्लेट रिकामी आहे. - ८०% मराठी.
२. ती ब्लू प्लेट रिकामी आहे. - ६०% मराठी.
३. ती ब्लू प्लेट एम्प्टी आहे. - ४०% मराठी.

जर वाक्य १ हे मराठी आणि वाक्य ३ हे ही मराठीच असेल तर मग आपण खट्टू होण्याचा आणि खिन्न होण्याचा प्रश्नच कुठे येतो? सर्व काही आलबेल आहे असं म्हणावं का? (इथे एक कपाळावर हात मारणारा किंवा चक्रावलेला स्मायली हवा होता.) कारण हे सर्व थांबतच नाही.

आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने, येथे हे देखील लक्षात घ्यायला हवे की लोकांना मराठी भाषेकडे आकर्षित करायचे असेल तर ते काय वाचतात याचा अर्थ त्यांना सहज लागायला हवा. जर प्रथम वाचनातच दुर्बोध असे सर्व नजरेस येऊ लागले तर लोक दुर्लक्ष करतील कारण पुन्हा लोकांकडे अधिक पर्याय उपलब्ध आहेत. जसे, इंग्रजी आणि हिंदी.

आपण मग खिन्न होऊन (आपण म्हणजे तुम्ही आम्ही सर्व) प्रतिशब्द शोधतो. उदा. डेटा या शब्दासाठी विदा हा शब्द. परंतु हा शब्द मान्यताप्राप्त नाही. संकेतस्थळांवर वापरण्याइतकाच सिमीत राहतो. म्हणजे इतरजनांना हा प्रतिशब्द आहे किंवा असावा/नसावा याचे कसलेही सोयरसुतक नाही. तर मग प्रतिशब्द शोधून भाषा वाढणार की हे असे शब्द घुसवून भाषा जगणार हे कळत नाही.

आता याला मराठीचा संक्रमण काळ म्हणावा की मराठी धेडगुजरी होत चालली आहे असं म्हणावं तेही कळेनासं झालं आहे.

(कन्फुज्ड) प्रियाली

निस्सारण

'स्मायली'साठी 'हसमुख' कसा वाटतो? ;-)

काढून टाकासाठी निस्सारण वाटतो तसाच. ;-) ह. घ्या.

मराठी असेल -

पन्नास वर्षांनंतर मराठी भाषा असेल पण चर्चेच्या ओघात स्पष्ट होत असल्याप्रमाणे मराठीकरण झालेल्या इंग्रजी शब्दांचा भरणा ५०% पर्यंत वाढलेला असेल आणि त्यालाच सर्वसामान्य माणूस मराठी शद्ब समजेल.
अशा शब्दांची वापरातली उदाहरणे आहेतच. इतकेच काय पण ते (इंग्रजी-मराठी) शब्द न वापरता कोणी तथाकथित शुद्ध मराठी भाषा बोलू लागला तर तो 'उच्चभ्रू' आहे असा सर्वसाधारण समज होतो. ("सौताला काय झंटलमन समजतो का काय त्यो?")

महाराष्ट्राच्या खेडोपाडी ड्यान्स, कँप्युटर, कंप्लेन (कंप्लेंट), क्वाट्टर, (हाप, फुल ;)), जंक्शान (फसकलास अशा वेगळ्या अर्थाने), डेरिंग, शॉर्ट (शॉर्टसर्किट या अर्थी), ग्येटर, गेम करणे, टेन्सन, मम्मी, ड्याडी इ.इ.इ. अनेक शब्द सर्रास ऐकू येतात. किंबहुना या शब्दांविना बोललेली मराठी भाषा ही मराठी नव्हेच असे वाटावे.

मराठीचे बदलते स्वरूप ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला केवळ इंग्रजी माध्यमातून शिकलेली मंडळी कारण आहेत असे नाही तर 'मराठी'च्या भवितव्याबद्द्लची अनस्था सर्वच स्तरात वाढत आहे. केवळ 'मराठीतून बोला' हा अट्टाहास पुरेसा नाही. मराठी वाचा, मराठी समजा, शद्बसंग्रह वाढवा अशा अनेक चळवळी कराव्या लागतील.

आपण व्यक्तिगत आयुष्यात फारफार तर मराठीला आजच्या स्वरुपात रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु बदलत्या जीवनमानाचा रेटा वेगेवेगळ्या स्तरांवर मराठी भाषेलाही बदलायला भाग पाडणार हे नक्की.

आवडला..

प्रतिसाद. एकदम टग्या ष्टाईल. पण शेवटी डिस्क्लेमर (मराठीत खुलासा ) नसल्याने चुकल्या चुकल्यासारखे वाटले. ;-)

-सौरभ.

=============

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

दहा वर्ष आणि सरकारी समित्या

दर दहा वर्षांनी नियमितपणे सरकारी पुस्तके, पत्रके, नियमावली यांत वापरले जाणारे शब्द, शब्दप्रयोग यांचे भाषासमितीकडून मूल्यमापन व्हावे. त्यामुळे व्यवहारात वापरली जाणारी मराठी त्यात दिसेल आणि शासकीय कारभारात वापरली जाणारी मराठी बोजड राहणार नाही.

मराठीने सरकारी भाषासमित्यांवर, सरकारी अनुदानावर का बरे अवलंबून राहावे? माझ्यामते भाषेत होणार्‍या बदलांची नोंद घ्यायला खरेतर मराठी शब्दकोशही (डिक्शनर्‍या) पुरेसे आहेत. आणि दहा वर्षांचा कालावधी खूप झाला. ऑक्सफर्डच्या इंग्रजी शब्दकोशाचे ज्या सातत्याने अद्ययावतीकरण होत असते तसे व्हायला हवे. मराठी शब्दकोश प्रकाशित करणार्‍या संस्थाना हे शक्य नाही. कारण असे अद्ययावतीकरण, तेही अल्पावधीत करायचे असल्यास, तज्ज्ञांचा ताफा नेमायला हवा. ह्या ताफ्याच्या दिमतीला मदतनिसांचा ताफा हवा. ह्यासाठी मराठी शब्दकोशांचा खप वाढायला हवा. मराठी लिहू, वाचू शकणार्‍या प्रत्येकाने किमान एकतरी चांगला मराठी शब्दकोश जवळ बाळगायला हवा.

माझे दोन पैसे

प्रियाली, धनंजय, टग्या या सर्वांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. क्रियापदांचे (कैच्या कै) इंग्रजीकरण होऊ नये असे वाटते पण नवीन शब्दासांठी परकीय शब्द घ्यायला काय हरकत आहे? इथे साहेबाचे अनुकरण करायला हरकत नसावी. इंग्रज लोक शब्द नसेल तर कुठल्याही भाषेतील शब्द आयात करायला मागेपुढे पहात नाहीत. देजावू, रॉदेवू (फ्रेंच); हाराकिरी (जपानी); पक्का(हिंदी); कर्मा (संस्कृत). यापैकी कर्मा बराच लोकप्रियही आहे.

मुद्दाम तयार केलेले बरेच प्रतिशब्द वापरताना भाषेला कृत्रिमपणा येतो असे वाटते. कार्यालय, उपहारगृह, वरिष्ठ, दूरध्वनी, संगणक हे प्रतिशब्द म्हणून चांगले आहेत पण रोज बोलताना ते वापरले तर बातम्या ऐकल्यासारखे वाटते.
भाषा सतत बदलत असते. आणि भाषेच्या उत्क्रांतीमध्ये लोकशाही सर्वात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणूनच प्रत्येक भाषेत नियमांइतके किंवा जास्त अपवाद असतात. (यू वेअर कशाला? खरे तर यू वॉज हवे इ.) त्यामुळे जे जास्तीत जास्त लोकांना आवडेल, रुचेल, पचेल तेच चालणार.

----

 
^ वर