बदलती मराठी - २

बदलती मराठी या मूळ चर्चेत सुमारे ८०-८५ प्रतिसाद झाल्याने ही वेगळी चर्चा सुरु करत आहे.

मूळ चर्चेचे स्वरुप थोडेसे उपहासात्मक असल्याने सदस्यांनी तिथे थोडी गंमत करून घेतली. ही चर्चा थोड्या गंभीर वळणाने जावी असे वाटते.

मनोगताच्या दिवाळी अंकात बदलत्या मराठीबद्दल आलेला प्रा. प्र. ना. परांजपे यांचा हा लेख मला वाचनीय वाटला होता.

लेखातील काही ठळक मुद्दे असे -

१. विविध वृत्तवाहिन्या, चित्रपट आणि मालिका यांचे सादरकर्ते मुख्यत: इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले तरूण तरूणी आहेत. मराठीला बदलण्यास हे एक कारण आहे. तसेच, श्रोतावर्गही बाहेरील जगात इंग्रजीचाच अधिक वापर करत् असावा.

२. आज भारतात लोकांना किमान तीन भाषा तरी येतात तेव्हा भाषांची सरमिसळ होणे नैसर्गिक आहे. त्यामुळे मराठीला धक्का पोहोचतो असे प्राध्यापकांना वाटत नाही.

३. शुद्धलेखनाला महत्त्व आहे. शुद्धलेखनाचे नियम शून्य असून चालणार नाही.

४. दर दहा वर्षांनी नियमितपणे सरकारी पुस्तके, पत्रके, नियमावली यांत वापरले जाणारे शब्द, शब्दप्रयोग यांचे भाषासमितीकडून मूल्यमापन व्हावे. त्यामुळे व्यवहारात वापरली जाणारी मराठी त्यात दिसेल आणि शासकीय कारभारात वापरली जाणारी मराठी बोजड राहणार नाही.

५. मराठी शब्द वापरायचा हा निश्चय केला म्हणून परभाषेतल्या एखाद्या शब्दाकरता अवघड मराठी शब्द तयार करण्यापेक्षा सोपा प्रतिशब्द शोधणे अथवा त्या शब्दाचे मराठीकरण करून वापरणे याचा प्रचार व्हावा.

६. प्रमाणभाषा आणि बोलीभाषेविषयी बोलताना लेखक म्हणतात, वैचारिक लेखन, ग्रांथिक लेखन हे भविष्यात संदर्भ म्हणून वापरले जाऊ शकते म्हणून हे लेखन प्रमाणभाषेतच व्हावे. प्रमाणभाषा म्हणजे साडेतीन टक्के उच्चभ्रू समाजाची मराठी नाही; तर ती सर्वांना समजेल, सर्वांना समजावे, याकरता असणारी मराठी भाषा आहे.

हे लेखातील काही ठळक मुद्दे. या खेरीजही लेखात अनेक बाबींवर चर्चा झाली आहे. मूळ लेख वाचल्यावर यावर अधिक माहिती मिळू शकेल.

या मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटते? मराठी बदलते आहे हे सत्य आहे. भाषा प्रवाही असते पण म्हणून भाषेने प्रपातासारखे वरुन खाली कोसळावे असे नसावे. मराठीतील परभाषिक शब्द वाढत आहेत हे खरे आणि ते टळणार नाही परंतु एका वाक्यात किती इंग्रजी शब्द असावेत हे कोण ठरवणार?

उदाहरणार्थ -

१. ती निळी प्लेट रिकामी आहे. - ८०% मराठी.
२. ती ब्लू प्लेट रिकामी आहे. - ६०% मराठी.
३. ती ब्लू प्लेट एम्प्टी आहे. - ४०% मराठी.

यांतील पहिले वाक्य मराठी म्हटले तर तिसरे वाक्य कोणत्या भाषेतील आहे हे कसे ठरवायचे? आणि किती परभाषिक शब्द वापरुन मराठी ही मराठीच राहिल हे देखील कसे ठरवायचे?

लेखनविषय: दुवे:

Comments

अगदी!

जे जास्तीत जास्त लोकांना आवडेल, रुचेल, पचेल तेच चालणार.

अगदी योग्य! आणि याचबरोबर, जास्त लोक हे आता इंग्रजी माध्यमातून शिकलेले किंवा घराबाहेर इंग्रजीचा सातत्याने वापर करणारे आहेत हे सत्य आहे.

तसेही जग आता ज्या झपाट्याने बदलत आहे, जागतिकिकरण वगैरे मोठमोठ्या संज्ञाही येथे वापरता येतील त्यात झपाट्याने मराठीत होणारे बदल आपल्याला पचनी पडणे कठिण आहे हे सत्य असले तरी ते स्वीकारायलाच हवे.

जे मराठी शब्द वापरात आहेत त्यांच्याऐवजी उगीचच इंग्रजी शब्द न वापरण्याची काळजी आपण घेऊ शकतो.
याच बरोबर, जर समोरचा चुकीचा शब्द बोलत असेल (जसे सौरभ यांनी सांगितल्याप्रमाणे वागवं.) तर त्याला निदान तो शब्द बोलण्याची उर्मी तरी आहे असा विचार करून त्याला न दुखावता सुधारणे हे तर आपण निश्चितच करू शकतो.

राजेंद्र यांनी

दिलेले दुवे नेहमीप्रमाणे जोरात...:-)
धन्यवाद.

(आता बरं वाटत असलेला) सौरभ.

==============

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

 
^ वर