संगणकीय मराठीकरण - प्रमाणीकरणाची गरज

संगणकिय जगतात संगणक वापरणार्‍यांसाठी मराठी भाषा हा प्रकार बर्‍यापैकी मागे आहे. अर्थात नवे नवे प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. पण मराठीकरण केले जाते म्हणजे नक्की काय केले जाते हे समजणे मला तरी गरजेचे वाटते. संगणकाशी संबंधीत काही शब्द असे आहेत की जे आता भाषांतरीत केले तर समजायला जास्त अवघड जातील. मला असे वाटते की सोयिस्कर मराठीकरण व्हायला हवे. जसे की पेस्ट साठी डकवा हा शब्द पटकन पटतो. पण जर टुल्स या शब्दाला मराठी शब्द सुचवायला गेलो तर पटकन सुचत नाही. काही काळापुर्वी मराठी फायरफॉक्स वापरायचा प्रयत्न केला पण तो प्रयोग जरा जडच गेला. मला वाटत की सामान्य वापरकर्त्याला जवळचे वाटतील असे शब्द असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटते?

एक उदाहरण द्यायचे झाले तर, हे पहा:

Save - जतन (सेव्ह). कंसात आंग्ल उच्चार मराठीमध्ये दिल्यास जास्त स्योयिस्कर पडेल असे वाटते. तुमची मते काय आहेत?

उगाच फक्त सगळं काही मराठीमध्ये आहे या हट्टासाठी भाषांतर/मराठीकरण नको. लिप्यंतर ठिक आहे. किंवा मी म्हटल्या प्रमाणे सोयिस्कर भाषांतर. या बरोबरच जेंव्हा आपण सर्वमान्य भाषेसाठी काही करतो तेंव्हा त्याचे प्रामाणीकरण गरजेचे आहे. थोडक्यात सगळ्यांची भाषा एकच हवी.

आता, लॉग ऑउट ला जाण्याची नोंद योग्य की गमन? काही तरी सर्वमान्य शब्द हवा. मला स्वतःला जाण्याची नोंद बरोबर वाटतो. गमन म्हटले की त्या आधी एखादा शब्द असल्यासारखे वाटते. :) . असो. सांगायचा मुद्दा एवढाच की तांत्रिक गोष्टींमध्ये मराठी वापरताना त्याचे प्रामाणीकरण गरजेचे आहे.

तसेच मी वर दिलेल्या उदाहरणा प्रमाणे भाषांतर केल्यास मराठी प्रतिशब्दांचा प्रसार/प्रचार होण्यास मदत होईल. जसे,
Blog - अनुदिनी (ब्लॉग)
Paste - डकवा (पेस्ट)

अवांतरः मला वाटतं की तमिळ आणि बंगाली भाषा यामध्ये पुढे आहेत. त्यांनी काय केले आहे?

Comments

खरे आहे.

आमच्या पुस्तकविश्वावर जाण्याच्या नोंदी गमन असा शब्द वापरला आहे. एकदा एका प्रकाशकाला हे दाखवतांना गमन म्हणजे काय हेच त्याला समजेना. मी चाणक्यांच्या मुद्द्याशी १०० % सहमत आहे. भाषेचा बागलबुवा अश्या क्लिष्ठ शब्दांनीच निर्माण होत असतो.

सहज आणि सोपे असेच शब्द वापरले गेले पाहिजे.

प्रमाणीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चाणक्य यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांशी मी सहमत आहे.संगणकीय क्षेत्रात मराठीच्या वापरासाठी प्रमाणीकरण हवेच.तसेच प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी मराठी/संस्कृत प्रतिशब्द हवाच असा अट्टहास नको.जे सोपे,सोईचे असेल ते करावे.('गमन' शब्द क्लिष्ट आहे हे मात्र मला मान्य नाही.ते असो.) पण या प्रमाणीकरणाच्या संदर्भात पुढाकार कोणी घ्यावा हा प्रश्न आहे.मला वाटते श्री.शैलेश यांनी तसेच आणखी कांही जणांनी अशा संज्ञांची यादी केली आहे.ते पायाभूत धरून, त्यांत आवश्यक ते बदल करून एक सर्वमान्य यादी तयार करावी.तेच शब्द प्रमाण मानावे आणि वापरावे.
..पण संगणक क्षेत्रात मराठीच्या वापराची खरी समस्या वेगळीच आहे.त्याविषयी पुढच्या प्रतिसादात.

सहमत

अट्टाहासाच्या मुद्या बद्दल संमत. गमन हा शब्द क्लिष्ट नक्कीच नाही. लॉग आऊट ला तो योग्य वाटत नाही. जाण्याची नोंद जास्त योग्य वाटतो. असे बरेच मुद्दे आहेत. तुमच्या पुढच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. :)

मीसुद्धा!

'गमन'सारखा सोपा आणि प्रचलित शब्द (पुनरागमन, आवागमन, निर्गमन) प्रकाशकाला समजत नसेल तर त्याने आपल्या धंद्यातून गमन करावे हेच उत्तम. प्रत्येक इंग्रजी शब्दाला एकशब्दीय पर्याय शोधायचा अट्टहास का करावा? सेव्हसाठी जतन करा हा प्रयोग आधीच अनेक संकेतस्थळांवर अस्तित्वात आहे. गमनपेक्षा जाण्याची नोंद नक्कीच चांगला.

शब्दवाटिका मिळाली तर बरे होईल.

चाणक्यपंत,

इंग्रजी शब्द की ज्यांना मराठी प्रतिशब्द नाहीत आणि दुसरे मराठी शब्द ओढुन ताणून आणलेले आहेत / क्लिष्ट आहेत अशी यादी देता आली तर बरे होईल.

शब्दवाटिका निर्माण करता येईल.

द्वारकानाथ

प्रकल्प

या सर्व गोष्टींकरिता एक प्रकल्प राबवावा लागेल. ज्यांना यासाठी योगदान द्यावसे वाटते त्यांनी येथे लिहावे अथव व्य.नि. ने माझ्याशी संपर्क करावा.

मी माझ्या

Blog - अनुदिनी (ब्लॉग)
Paste - डकवा (पेस्ट)

"माझी मनीमाऊ" लेखावरील प्रतिसादात विभेदन (रिझोल्युशन) असे पूर्वीच लिहिले आहे. असेच लिहिले तर अनवट मराठी संज्ञा लोकांमध्ये नक्की रुजतील.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

मदत

मी हल्ली लोकायत वर इंग्रजी संज्ञांचे मराठी प्रतिशब्द देत आहे. माझ्या अनुवादाच्या व्यवसायात मी रोजच हे काम करते. चाणक्य व कलंत्रीकाका ह्यांना पण मी नक्की मदत करेन.

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

प्रमाणीकरण

प्रमाणीकरण हा सर्वसंमतीचा भाग आहे. मी येथे फक्त विचार मांडत आहे. :)

भाषाइंडिया

जे शब्द मायक्रोसॉफ्ट मुळे प्रचारात आले त्याचे प्रतिशब्द ही त्यांच्याच प्रकल्पा वाटे निश्चित झालेले बरे. अशाच प्रकारचे अनेक प्रकल्प चालू आहेत (शब्दभांडार, मनोगतावरचे प्रतिशब्द, विकी).

शासनदरबारी यासाठी खाते देखील आहे (तांत्रिक भाषांचे स्थानिक भाषातील पर्याय.) काही शब्दकोष देखील उपलब्ध आहेत.

हे सारे असताना यांचे प्रमाणीकरण पुरेसे ठरावे. जे शासनाकडून अथवा मायक्रोसॉफ्टच्या नवनव्या आवृत्तीं मधून होईलच.

तिथेही योगदान करण्याची सोय असल्याने हे प्रमाणीकरण अडचणीचे ठरू नये.

माहिती

माहिती बद्दल धन्यवाद. असे असेल तर सगळ्यांनी वेगळी चुल मांडण्याची गरजच नाही. पण प्रमाणीकरण सर्वांपर्यंत पोहोचले नाही हे सत्य आहे. तसेच एकाच इंग्रजी शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द वापरात आहेत.
तंत्रज्ञान तळागाळा पर्यंत पोहोचवायचे असेल तर सगळ्यांची भाषा एकच असणे गरजेचे आहे. नाहीतर मी येथे सांगतो आहे की जाण्याची नोंद वर टिचकी मारा आणि वापरकर्ता जाण्याची नोंद शोधत बसला आहे. अशी अवस्था व्हायची. किंवा तुझे नाव बदलण्यासाठी माझे सदस्यत्व येथे जा असे सांगितले तर ते मिळणार नाही कारण माझ्या संकेतस्थळावर खाते आहे. सदस्यत्व नाही. पासवर्डसाठी एकिकडे परवलीचा शब्द आहे तर एकीकडे कूटशब्द. अशा प्रकारांनी गोंधळात भर जास्तच. थोडक्यात काय? मी ज्याला तो म्हणतो त्याला सगळ्यांनी तो म्हणणे गरजेचे आहे. नाहितर काहि जण ती म्हणायचे काहीजण तो. :)
उदाहरणाबद्दल गैरसमज नसावा :)

आपण

मराठीत आगमन हा शब्द जास्त वापरतो त्यामानाने गमन हा शब्द फारसा प्रचलित नाही हे खरे. त्यामुळे जाण्याची नोंद जास्त रुळेल असे वाटते. (इथे हिंदी पट्ट्यात निर्गमन हा शब्द सर्रास वापरला जातो.)

"इथून निघा" हा पण पर्याय चालेल का? की तो जास्त उद्धट वाटतो?

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

 
^ वर