देवनागरी लिपी व भाषाशुद्धी

१) संस्कृत भाषा व देवनागरी लिपी ही जगातील सर्वात जास्त शास्त्रशुद्ध भाषा व लिपी आहे, असे आपण म्हणतो. यात अभिमानाचा भागही काही असतो, पण आपल्याला त्याबद्दल शास्त्रीय माहिती कमीच असते. विद्वान व जाणकार व्यक्तींकडून ही माहिती मिळाली तर बरेच होईल.

२) इंग्रजी भाषेतील शब्दांना प्रतिशब्द प्रचलित करण्याबद्दल अनेक जणांच्या मनात रास्त शंका असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी या विषयाबद्दलही जाणकारांनी माहिती द्यावी.

दुवे:

Comments

देवनागरी

देवनागरी लिपी ही बरेचसे उच्चार लिहू शकते असे आपण मानतो.. मात्र ही लिपी केवळ भारतीय भाषांतील बरेचसे उच्चार लिहू शकते असे ऐकून आहे. ही लिपी जगात सर्वात शास्त्रशुद्ध आहे का नाहि हे कसे ओळखावे/ठरवावे? की सर्वसमावेशक लिपी जगात नसल्याने त्यातल्यात्यात सर्वसमावेशक अशी देवनागरी आहे?

आपल्याला त्याबद्दल शास्त्रीय माहिती कमीच असते. विद्वान व जाणकार व्यक्तींकडून ही माहिती मिळाली तर बरेच होईल.

+१

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

देवनागरी शास्त्रशुद्धता.

देवनागरी शास्त्रशुद्धता.

'देवनागरी लिपी' ह्या विषयावर आवड आणि छंदापोटी गेली वीस वर्षे मी अभ्यास करतो आहे. अनेक आश्चर्ये दृष्टीला आली आहेत. जागतिक स्तरावरदेखील ही सर्वात शास्त्रशुद्ध लिपी आहे असेच माझेही मत झाले आहे. अधिक माहितीसाठी श्री. नरवणे ह्यांच्या 'भाषा व्यवहार कोषा'तला लिपींबद्दलचा परिच्छेद अभ्यासावा.

हैयो हैयैयो!

थोडेसे कैच्या कै

सर्व ब्राह्मी-जनित लिप्या ढोबळमानाने सारख्याच पद्धतीने ध्वनीचे लिखित चिह्नात रूपांतर करतात.
म्हणजे :
एक-किंवा-अधिक-व्यंजने + एक स्वर = एक अक्षर,
अशी अक्षरे एका ओळीत रचणे,
कागदाची रुंदी संपली की लगोलग खाली दुसरी ओळ सुरू करणे...

कुठलीही ब्राह्मी-जनित लिपी दुसर्‍या कुठल्याही ब्राह्मी जनित लिपीपेक्षा वरचढ कशी असू शकते? त्या सगळ्याच तर एकसारख्या आहेत. (हैयो हैयय्यो हे ब्राह्मी-जनित दोन लिप्या तरी [देवनागरी आणि तमिऴ लिप्या] जाणतात, मग असे प्रतिपादन त्यांनी कसे काय केले असावे? त्यांनी अधिक स्पष्टीकरण द्यावे.)

तुलना करायच्या दोन प्रकारात काही फरक तर हवा, नाही का? आता कोणी ब्राह्मी-जनित लिप्या अरबी-सारख्या लिप्यांपेक्षा, किंवा रोमन-सारख्या लिप्यांपेक्षा, किंवा चिनी लिपीपेक्षा भारी/हलक्या असल्याचे विश्लेषण तरी करू शकते. पण तुलनेचे निकष स्पष्ट हवेत.

चांगला विषय

यात अभिमानाचा भागही काही असतो, पण आपल्याला त्याबद्दल शास्त्रीय माहिती कमीच असते. विद्वान व जाणकार व्यक्तींकडून ही माहिती मिळाली तर बरेच होईल.

हेच म्हणतो. माहिती करून घेयला आवडेल.

व्याख्यांचा अभाव

> १) संस्कृत भाषा व देवनागरी लिपी ही जगातील सर्वात जास्त शास्त्रशुद्ध भाषा व लिपी आहे
"शास्त्रशुद्ध" म्हणजे काय? याची व्याख्या केल्याशिवाय या प्रश्नाचे उत्तर देणे (जाणकारालाही) शक्य नाही. भाषा या मानवीय आविष्कार आहेत. त्या आविष्कृत होताना कुठलाही (त्याआधी अस्तित्वात असलेला) शास्त्रीय निकष वापरला जात नाही. काही जाणकार भाषेचा अभ्यास करतात खरा - पण तो भाषा आहे तशी अस्तित्वात आहे, हे लक्षात घेऊन. जर कुठल्या भाषाशास्त्र्याच्या मताने अमुक किंवा तमुक अस्तित्वातली भाषा (उदा : झुलू भाषा, किंवा तिबेटी भाषा) "शास्त्र"शुद्ध नाही असा निर्णय होत असेल, समजा. तर मी खुद्द भाषाशास्त्राचा तो विशिष्ट मतप्रवाह मोडीत काढीन (झुलू किंवा तिबेटी भाषा नव्हे.)
...

लिपीचे दोन (प्रमुख) प्रकार वापरात आहेत. ध्वनि-आश्रित लिपी, आणि अर्थ-आश्रित लिपी. यातली कुठली एक वरचढ आहे, असे सांगता येत नाही.

ध्वनि-आश्रित लिपी:
"सूट" या लिपी-चिह्नाचा उच्चार एकच आहे, पण या उच्चाराचा अर्थ इंग्रजीत "कोट-विजार" किंवा "खटला" असा होतो, मराठीत "किमतीत घट" असा होतो. लिपीतून ध्वनी नीट कळतो पण अर्थ काहीही असू शकतो.

अर्थ-आश्रित लिपी :
"&" या लिपी चिह्नाचा उच्चार इंग्रजीत "अँड", फ्रेंचमध्ये "ए", स्पॅनिशमध्ये "इ", मराठीत "आणि" असा वेगवेगळा होतो. पण सर्व भाषांत अर्थ एकच /आणि/ (समुच्चय) असा होतो. लिपीतून ध्वनी नीट कळत नसला तरीही अर्थ नीट कळतो.

शुद्ध ध्वनि-आश्रित लिपी म्हणजे आंतरराष्ट्रीय फोनेटिक लिपी, शुद्ध अर्थ-आश्रित लिपी म्हणजे वाहातुक चिह्नांची लिपी. "शुद्ध" असणे म्हणजे सोयिस्कर असणे मुळीच नव्हे! जवळजवळ ध्वनि-आश्रित लिपी म्हणजे संस्कृतसाठी देवनागरी, जवळजवळ अर्थ-आश्रित म्हणजे चिनी लिपी. पण दोन्हींमध्ये सोयीसाठी थोड्या प्रमाणात अर्थ-आश्रय, किंवा ध्वनि-आश्रय मिसळलेला आहे. सोय ही महत्त्वाची असल्यामुळे "शुद्ध"तेचे स्तोम अनाठायी आहे.

> २) इंग्रजी भाषेतील शब्दांना प्रतिशब्द प्रचलित करण्याबद्दल अनेक जणांच्या मनात रास्त शंका असतात.
चांगला चर्चाप्रस्ताव. रास्त शंकांची उदाहरणे द्याल काय? म्हणजे जाणकारांच्या उत्तरांना समजून घेताना प्रश्न समजण्याचाही मला आधार मिळेल.

लिपीची मर्यादा

>लिपीतून ध्वनी नीट कळतो पण अर्थ काहीही असू शकतो. <
आपला प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडला. पण देवनागरीच्या बाबतीत वर उधृत वाक्य तितकेसे खरे उतरत नाही. जसे ज, च या अक्षरांचेनिराळे उच्चार. तसेच उदा. पूर्वीच्या काळी जाते हा शब्द कसा उच्चारत (ज जन्मातला की जातीतला) ते आज ती लिपी वाचताना कळत नाही. आज आपण जसा उच्चार प्रमाण मानतो तसा उच्चार जून्या काळातल्या शब्दांचा करतो.

लिपी ही कमी प्रवाही असते आणि भाषेतले ध्वनी जास्त प्रवाही असतात. त्यामुळे आज देवनागरी किती चांगली वाटली तरी ती जुन्या काळातले माहिती नसलेले उच्चार सांगत नाही आणी याच न्यायाने ती आजचे उच्चार उद्याच्या पिढीला सांगणार नाही. लिपीची ही मर्यादा आहे.

या आणि तत्सम विषयावर श्री. ना. गो. कालेलकर यांनी छान उहापोह केला आहे. त्यांची पुस्तके वाचनीय आहेत.

--लिखाळ.

बरोबर् - देवनागरी शुद्ध ध्वनि-आश्रित नाही

पण वाचायच्या सोयीसाठी "सूट" आणि "&" या सामान्य चिह्नांची उदाहरणे दिली आहेत.

शुद्ध ध्वनि-आश्रित, आणि शुद्ध अर्थ-आश्रित लिप्यांची उदाहरणे त्यानंतर खाली दिली आहेत (आंतरराष्ट्रीय फोनेटिक लिपी, आणि वाहातुक नियंत्रणाची चिह्ने.)

देवनागरी लिपीचा वापर बहुधा ध्वनि-आश्रित, पण काही थोड्या प्रमाणात अर्थ-आश्रित सरमिसळ असाच आहे. त्याच प्रमाणे चिनी लिपीचा वापर बहुधा अर्थ-आश्रित, पण काही थोड्या प्रमाणात ध्वनि-आश्रित सरमिसळ असाच आहे.

(अवांतर : मराठीतील च/ज/झ यांच्या पर्यायी उच्चाराबद्दलचे नियम येथे दिले आहेत. पण तरी तुम्हाला म्हणायचे आहे ते स्पष्ट आहे, आणि समजले. :-) )

संस्कृत चजझ आणि मराठी च़ज़झ़

पहिला नियम: संस्कृत शब्द असेल तर चजझ चे उच्चार च्यज्यझ्य सारखे करायचे. मराठी असेल तर च़ज़झ़. चोरसारखा एखाददुसरा अपवाद. चार(=४) हा संस्कृत आहे म्हणून उच्चार च्यार. 'पैसे चार' या वाक्यातला चार मराठी म्हणून त्यातल्या 'च 'चा उच्चार च़. चहा आणि च़हाटळ मधले च वेगळे. कारण चहा हा परकीय शब्द जसाच्या तसा उचलेला. च़ज़झ़च्या बाराखडीत इकार ऐकार नाहीतच़. त्यामुळे फारसा घोटाळा होत नाही.. उच्चारकोशात व्यवस्थित नुक्ता लावून दाखविले की संभ्रम रहात नाही. रोजच्या व्यवहारात नुक्त्याची गरज़ नाही.
इंग्रजीत सी चे उच्चार स आणि क होतात, सी, एस्‌, डबल एस्‌, आणि एस्‌सी यातले प्रत्येकाचा उच्चार स किंवा श होऊ शकतो, एस्‌चा उच्चार झेड् सारखा झ़ असाही होतो. इतके अनेक दोष ज्या इंग्रजीच्या रोमन लिपीत आहेत, त्या मानाने देवनागरी लिपीतले दोष कितीतरी कमी आहेत. माणसांच्या आणि प्राण्यांच्या मुखातून बाहेर पडणारे तसेच निसर्गातल्या प्रत्येक वस्तूंपासून निर्माण होणारे सर्व उच्चार दाखवणारी लिपी अजून जन्मायची आहे. आय्‌पीए देखील तसे असल्याचा दावा करत नाही.--वाचक्‍नवी

परकीय शब्द

त्यातल्या 'च 'चा उच्चार च़. चहा आणि च़हाटळ मधले च वेगळे. कारण चहा हा परकीय शब्द जसाच्या तसा उचलेला.

हा निकष थोडा बरोबर वाटत नाही. कारण आमचा मुलगा मधील च आमच़ी मुलगी असा होतो.
आमचा आणि आमच़ी हे शब्द तर ह्याच मातीतले आहेत. हे झाले मराठीतील पण हिंदी मध्ये सुद्धा उच्चार घोटाळा आहे. इथे सर्वजण ज्ञान = ग्यान, पृथ्वी = प्रिथ्वी असे उच्चार करतात.

मात्र सगळ्यात गंमत संस्कृत ह्या शब्दाविषयी आहे. हा शब्द मी स्यान्सक्रित, सम्सक्रित, सन्सकृत, सम्सक्रिता, सन्सक्रित, समस्कृता आणि सम्सकृत असे अनेक प्रकारे ऐकलेले आहेत आणि प्रत्यक्ष संस्कृत बोलण्यावर तर अनेक बोलीभाषांचा पगडा आढळतो. अनेक कच्छी बांधव, दाक्षिणात्य बांधव आपापल्या बोलीभाषेप्रमाणे संस्कृत बोलतात हे मी स्वत: ऐकलेले आहे. त्यामुळे संस्कृत भाषा कितपत फॉनेटिक हा पण एक प्रश्नच आहे.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

अधिक वर्गिकरण

धनंजय यांनी लिपींचे ध्वनी-आश्रित आणि अर्थ-आश्रित असे वर्गीकरण केले आहे. ते योग्य वाटते. मला चिनी लिपी विषयी फारशी जाणकारी नाही, तेव्हा चिनी लिपीचा समावेश अर्थ-आश्रित मध्ये का केला गेला हे कळले तर बरे होईल्.

तथापि, ध्वनी-आश्रित लिपींचे पुढे अजून थोडे वर्गीकरण करता येईल काय?

देवनागरी (आणि त्याचे उपप्रकार जसे की गुजराथी, बंगाली इ.) आणि रोमन (आणि त्याचे उपप्रकार फ्रेंच, जर्मन इ) ह्या दोन प्रमुख लिपींचा विचार करता एक् गोष्ट लक्षात येते. ती ही की, देवनागरी लिपी ही संपूर्ण उच्चार एका चिन्हात दर्शविते (syllable based).

या उलट, रोमन लिपी ह्या उच्चाराचे अधिक प्रुथ:करण करते. ज्यामुळे एका उच्चारासाठी (syllable) दोन-तीन वा क्वचित चार चिन्हे लागतात.

ह्यामुळे रोमन लिपीत स्पेलींगचा गोंधळ थोडा वाढतो हे खरे असले तरी, ती अधिक flexible होते असे माझे मत आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ध्वनि-आश्रित लिपींचे तिहेरी (किंवा चौपदरी) वर्गीकरण

१. अब्ज्द : केवळ व्यंजने लिहिणार्‍या लिप्या (उदाहरणे: सामान्यपणे अरबी, हिब्रू लिप्या, इजिप्तमधली प्राचीन हिएरोग्लिफिक [कधीकधी])
२. अबुजिदा : व्यंजनांवर स्वरांची चिह्ने अपरिहार्य असलेल्या लिप्या (ब्राह्मी-उद्भव लिप्या - देवनागरी*, तमिळ, थाई वगैरे). पण कुठल्याही व्यंजनाबरोबर वापरायची स्वराची चिह्ने तीच असतात. म्हणजे क्+ई = की; त्+ई=ती, दोन्हीसाठी "वेलांटी" हेच स्वरचिह्न व्यंजनाला जोडले जाते.
२अ. व्यंजनापाशी स्वराचे चिह्न जोडायचा पर्याय लेखकाला दिला जातो - वाटल्यास लिहा, वाटल्यास न लिहा. (उदाहरणे: अरबी, हिब्रू)
३. सिलॅबिक लिप्या : काही व्यंजने आणि एकच स्वर मिळून जो ध्वनिसमूह होतो, त्याला "सिलॅबल" म्हणतात - यात व्यंजने स्वराच्या आधी तशीच नंतरही येऊ शकतात. (उदाहरणे: जपानीमधील हिराकाना आणि काताकाना, परदेशी शब्दांसाठी वापरली जाते तेव्हा चिनी लिपी) यात प्रत्येक "सिलॅबल"साठी एक चिह्न शिकवले जाते.
हिराकाना : の नो, ね ने, へ हे - व्यंजन आणि स्वर मिळून एकच चिह्न होते. "नो" आणि "ने" यांच्यात व्यंजन "न्" समान असले, तरीही चिह्नात काहीच साम्य नाही, "ने" आणि "हे" मध्ये स्वर समान असला तरीही चिह्नात काहीत साम्य नाही.
४. आल्फाबेट लिप्या : स्वर आणि व्यंजनांसाठी वेगवेगळी चिह्ने असतात, ती एकापुढे एक क्रमाने लिहितात. (उदा : रोमन लिपी)

-----------------------------------------
*देवनागरीमधले "अक्षर" म्हणजे "सिलॅबल" नव्हे. "सिलॅबल"च्या जवळात जवळ येणारी संस्कृतोद्भव भाषांतली कल्पना म्हणजे "एकाच्". या कल्पनेचा संस्कृत व्याकरणात उपयोग नगण्य आहे. बहुधा मराठीत "सिलॅबल" ही कल्पनाच अनावश्यक आहे (=अस्तित्वात नाही.) देवनागरीत छापायच्या एका खिळ्यावर बसणारे चिह्न एक (किंवा अनेक) व्यंजने + एक शेवटचा स्वर (पुढे काही नाही, असल्याच छपाईच्या पुढच्या खिळ्यावर जाते.) हस्तलिखितातही हे चिह्न (="अक्षर") साधारणपणे एका-आकारमानाच्या चौकोनी घरांत बसवतात.
उदा : सा||क्षा||त्का||र
येथे "त्" आदल्या "साक्षात्" मधला आहे, तरी "त्का" असे एकत्र लिहिले जाते. तरी "त्का" हे "सिलॅबल" नाही.
धि||क्का||र (मराठी शब्द) मध्ये तीन अक्षरे लिहिली जातात, पण दोनच "सिलॅबल" आहेत - "धिक्" आणि "कार". म्हणून देवनागरीला "सिलॅबिक" न म्हणता "अबुजिदा" म्हणणे अधिक नेमके.
-----------------------------------------
कुठलीही भाषा यापैकी कुठल्याही प्रकारच्या लिपीत लिहिली जाऊ शकते. अमुक भाषेची अमुक लिपी आणि तमुक भाषेची तमुक लिपी, हा ऐतिहासिक अपघात आहे. नाहीतर "थाई"सारख्या स्वर-चढ-उताराच्या भाषेला देवनागरीची चुलतबहीण थाई लिपी कशी चिकटली? (भारताशी सान्निध्यामुळे चिकटली. लिपीत स्वर चढ-उतारासाठी काहीच चिह्न नाही, तरी लहानपणापासून शब्द ओळखीचे असल्यामुळे थाई लोकांना त्याची विशेष गैरसोय वाटत नाही.) पंजाबी भाषा कोणी नागरीत लिहील, कोणी गुरुमुखीत, कोणी उर्दूत - केवळ कुठल्या प्रांतात जन्मला, कुठल्या शाळेत गेला त्या योगायोगाने.

असो. मूळ चर्चाप्रस्तावकाराला "शास्त्र"शुद्ध म्हणजे काय अभिप्रेत होते, ते त्यांनी लिहावे. नाहीतर हे लिप्यांचे वर्गीकरण वगैरे माझे पाल्हाळ चर्चाविषयाला अवांतर आहे.

वाटल्यास मानावे

सिलॅबलची व्याख्या काय?

समजा
- (एक-किंवा-अनेक व्यंजने+एक शेवटचा स्वर)=सिलॅबल अशी व्याख्या आपण मान्य केली, आणि
- स्वरचिह्ने (म्हणजे काना, वेलांट्या, उकार, मात्रा) ही व्यंजनांना चिकटवलेली तीच-ती चिह्ने नाहीत असे मानले,
तर देवनागरीतली चिह्ने सिलॅबिक आहेत असे मानता येईल. (प्रत्येक सिलॅबलसाठी स्वतंत्र चिह्न)

पण सिलॅबलची अशी नवी व्याख्या करून काय साध्य होणार आहे? भाषा ही प्रथम ध्वनि-माध्यम आहे. भाषांमध्ये ध्वनींचे "क्वार्क्स" आहेत वर्ण, "अणू" आहेत सिलॅबल्स, "रेणू" आहेत मॉर्फीम, "कण" आहेत पदे, "पिंड" आहे वाक्य. लेखन हे त्या मानाने कृत्रिम. केवळ लिपीमध्ये समान आकारमानाच्या चौकटीत बसवण्यासाठी या नव्या सिलॅबलच्या व्याखेने जो फायदा होईल, त्यापेक्षा उच्चारशास्त्रातील सिलॅबल त्यागून तोटा अधिक होईल. (आणि कुठलेच "सिलॅबल" न त्यागल्यास दोन्ही कल्पनांचा घोटाळा मात्र होईल.)

देवनागरीत व्यंजनाच्या चिह्नाला जोडली जाणारी तीच-तीच स्वरचिह्ने आहेत, केवळ तिला "सिलॅबिक" लिप्यांमध्ये गणण्यासाठी त्या उप-चिह्नांच्या साम्याकडे डोळेझाक करण्यात तोटाच आहे.

स्वरचिह्ने (म्हणजे काना, वेलांट्या, उकार, मात्रा) यांना काही अस्तित्व आहे, आणि ती मूळ व्यंजनचिह्नाला चिकटतात, असे मानण्यात सुटसुटीतपणा आहे. देवनागरी-वगैरे लिप्या या रोमनच्या जवळ जातात.
Y knw tht y cn rd ths sntnc wtht vwls!
आता हे वाचावे :
You know that you can read this sentence with vowels As little signs stuck to the consonants.
आता देवनागरी मुळात आल्फाबेटिकच्या जवळ गेलेली दिसते :
...

देवनागरी/ब्राह्मी आणि अन्य फिनीशियन लिप्यांचा स्रोत एक. हिराकाना-काताकाना हा प्रकार वेगळा. त्यांची मूळ स्फूर्ती चिनी लिपी, आणि त्या कल्पनेला ध्वनि-आश्रित करणे.

आता माझ्या मते ध्वनि-आश्रित लिप्यांचे वर्गीकरण असे केले तर चालेल :

प्रकार १ : "वर्ण"-आश्रित स्वर/व्यंजने यांच्यासाठी चिह्ने/उपचिह्ने असलेल्या लिप्या
उपप्रकार १ : स्वर आणि व्यंजन चिह्ने समान आकाराची, एकापाठोपाठ एक लिहिणे - उदा : रोमन
उपप्रकार २ : स्वरचिह्न आकाराने छोटे, आणि व्यंजनाच्या वर-खाली लिहिणे (उदा : अरबी, देवनागरी)

प्रकार २ : वर्ण-समूहासाठी (सिलॅबल) स्वतंत्र चिह्न, त्यात "वर्ण"=स्वर, व्यंजन यांच्यासाठी चिह्न-उपचिह्न ओळखता येत नाही.
उदा : हिराकाना काताकाना इत्यादि.

मला वाटते की देवनागरीला सिलॅबिक मानून प्रकार २चा उपप्रकार केल्यास इतिहासाशी तफावत येते, आणि वर्गीकरण बोजडही होते.

रोमन लिपी

रोमन लिपी युरोपातल्या सर्व भाषांतील शब्दांचे उच्चार समर्थपणे दाखवू शकते, आणि देवनागरी भारतीय भाषांमधील. त्यामुळे दोघांची तुलना करणे गैर आहे. अक्षरे एकमेकांना न जोडता आणि वर खाली न जाता सलगपणे लिहून सर्व उच्चार व्यक्त करता येणे हा रोमन लिपीचा फार मोठा गुण आहे. स्पेलिंगची अडचण फारच किरकोळ आहे, फायदे अनेक आहेत. त्यामुळेच भारतीय भाषादेखील रोमन लिपीत लिहाव्यात अशी सूचना अनेक विचारवंतांनी वेळोवेळी केली आहे. आत्ता ह्या घडीला हा मजकूर मी रोमन कळफलकावरून सहजगत्या टंकित करीत आहे, यावरून रोमन लिपीचे सर्वगामित्व लक्षात येईल.

नेमके कसे?

रोमन लिपी युरोपातल्या सर्व भाषांतील शब्दांचे उच्चार समर्थपणे दाखवू शकते,

this धिस, these दिज आणि thing थिंग यांतील वेगळे उच्चार कसे समजतात? जरा आणखी विस्तृत सांगावे.

रोमन लिपी, इंग्रजी लिपी नव्हे.

>>रोमन लिपी युरोपातल्या सर्व भाषांतील शब्दांचे उच्चार समर्थपणे दाखवू शकते.<< रोमन लिपी म्हणजे २६ अक्षरांची इंग्रजी लिपी नव्हे. रोमन लिपी हा शब्द मी युरोपातल्या (रशियन सोडून) भाषांसाठी ज्या ज्या लिप्या वापरतात त्या सर्वांसाठी वापरला होता. आता मराठी लिपी आणि हिंदी लिपी या दोघांना ढोबळ मानाने(लूजली) देवनागरी म्हणत असले तरी त्या लिप्या सर्वतोपरी एक नाहीत. हिंदी लिपीतली 'अ, झ, छ, ढ, ण,ल, श, क्ष, ह' ही मुळची अक्षरे मराठी अक्षरांपेक्षा वेगळी होती. हिंदी अक्षरे लिहिताना अगोदर शिरोरेषा लिहिली जाते आणि नंतर अक्षर. त्यामुळे अक्षरे मराठी अक्षरांपेक्षा वेगळी दिसतात. हिंदीत भ, ध, आणि थ ला गाठ नसते. शब्द संपतो तिथे शिरोरेषा संपते. मराठीत ती थोडी पुढे डोकावते. हिंदी अक्षरे चौरस असतात, मराठी लांबट चौकोनासारखी. मराठीत ळ आहे हिंदीत नाही, हिंदीत नुक्ताधारी अक्षरे आहेत, मराठीत नाहीत. तरी दोन्ही लिप्या देवनागरीच.
तसेच फ़्रेन्च, स्वीडिश किंवा इतर युरोपीय भाषांसाठी किरकोळ बदल केलेल्या रोमन लिपीला आपण रोमनच म्हणतो. त्या अर्थाने मी 'रोमन लिपी युरोपातल्या सर्व भाषांचे उच्चार समर्थपणे दाखवू शकते'असे म्हटले होते.

इंग्रजीत ध नसावा.

मराठी च चे उच्चार जसे च़ आणि च असे दोन्ही होतात, तसेच इंग्रजीत 'टीएच्‌'चे द आणि थ होतात. मराठीतला च जसा चार(=४) आणि चोर हे उच्चार समर्थपणे दाखवतो, तसेच इंग्रजीतला टीएच्‌ दिस्‌, दीज़्‌‌ आणि थिंग्‌. शब्द वाचताना अक्षरे वाचायची नसतात. त्या अक्षरांच्या समूहाचे जे चित्र बनते ते वाचायचे असते. त्यामुळे दिस्‌, दीज़्‌ आणि थिंग वाचताना कुठलीही अडचण पडत नाही.

बरोबर

या this, that शब्दांच्या सुरुवातीचे व्यंजन उच्चारायला एकसारखे आहे. इंग्रजी भाषक लोक याचा इंग्रजीतला एक खास (दन्त्य-घोष-उष्मन् असा) उच्चार करतात. या उच्चाराचे साम्य स्, ज़्, द् या मराठी वर्णांशी आहे.

वेगळ्या भाषेचे मूलभाषक इंग्रजी बोलताना या खास इंग्रजी वर्णाचा उच्चार आपल्या भाषेत जवळातजवळ जे काय आहे, तसा करतात. चिनी लोक "this=सिस्", फ्रेंच लोक "this=ज़िस्", वगैरे.

काही भारतीय भाषक this, that दोन्हींमध्ये उच्चार 'द' (दिस्, दॅट्) असा करतात (उदा मूळ कन्नड बोलणारे लोक), तर काही अन्य भारतीय भाषक त्या दोन्हींचा उच्चार 'ध' (धिस्, धॅट्) असा करतात (उदा मूळ गुजराती भाषक). मूळ मराठी भाषक मात्र उच्चार मात्र वेगवेगळा (धिस्, दॅट्) असा का करतात, हे कोडेच आहे.

ध नाही हे खरे

शाळांत शिकवल्या प्रमाणे

this - द्+हीस
that - दॅट

car - क्+हार

याचाच उच्चार अनेक भारतीय अमेरिकन ऍक्सेंटमध्ये खार असा करतात. :-)

असे असले तरी धिस आणि दॅट यांच्या उच्चारांत नेमका वेगळेपणा आहे तो टी एच दाखवत नाही.

देवनागरी शास्त्रशुद्ध?

>>टी-एच चा इंग्रजीतील उच्चार द, ध अथवा थ नाही. ही भारतीय/मराठी अप्रॉक्झिमेशन्स आहेत. टी-एच चे इंग्रजीतील मूळ उच्चार मराठीत किंवा बहुधा कोणत्याही भारतीय भाषेत नाहीत, आणि म्हणूनच देवनागरीत त्यांच्यासाठी चिन्हेही नाहीत.<<
हे मान्य करायलाच हवे. त्यामुळेच दिस्‌ आणि थिंक्‌ असे मराठीत लिहिले तरी त्यांचा उच्चार जमत असेल तर जरूर इंग्रजी पद्धतीने करावा. हा उच्चार न समजल्याने मराठी माणसांना त्या शब्दांचा अर्थ समजणार नाही हा धोका पत्करायला मात्र लागेल.

ट चा उच्चार ट आणि त यांच्या दरम्यानचा होतो, आणि शब्दारंभी आला तर 'ठ' जवळपासचा होतो, हे निरीक्षण आहेच . इंग्रजी ठॉ‌क्‌ हा उच्चार मराठी टॉक्‌ असाच लिहावा लागतो. त्याला आपला नाईलाज आहे. भारतीय भाषांतलेदेखील सर्व उच्चार मराठीत लिहिता येतातच असे नाही. तमिळ किंवा मलयाळम मधला जास्तीचा ळ मराठीत ळ्ह किंवा ऴ असा दाखवतात,आणि कानडी-तेलुगूमधले दीर्घ ए-ओ, एऽ आणि ओऽ असे. हिंदीतली जास्तीची क़, ख़, ग़, ज़, ड़, ढ़, आणि फ़ , आणि नेपाळीतला ऱ ही अक्षरे नुक्त्याने दाखवता येतात. कॅ आणि कॉ दाखवायची सोय फक्त मराठी, मलयालम आणि सिंहली याच भारतीय भाषात दिसते आहे. हिंदीने हल्लीहल्ली ऑ वापरायला सुरुवात केली आहे. तरीसुद्धा बॅंक शब्द मराठीसारखा लिहिला तर त्याचा उच्चार बऽङ्‌क असा होईल म्हणून तो बैंक असाच लिहावा लागतो.
इतके असून मराठीतले सर्व उच्चार लिपीत दाखवता येतातच असे नाही. डावा आणि वाड़ा या दोन शब्दातल्या ड चा उच्चार वेगळा आहे, हे लक्षात घ्यावे. इतकेच काय पण मराठीतही 'क'चे विविध उच्चार होतात. कॉट आणि कोण मधला मृदुतालव्य क , कण आणि कान मधला कण्ठ्य किंवा मध्य तालव्य क, कीड आणि केस मधला पूर्वतालव्य क, आणि शेवटचा स्फोटक कण्ठ्य क. हे सर्व क आपण एकाच चिन्हाने दाखवतो. त्यामुळे देवनागरी लिपी ही शास्त्रशुद्ध(?) लिपी आहे आणि तिच्यात भारतीय भाषांतले सर्व उच्चार लिहिता येतात, असे म्हणण्यात काहीच तथ्य नाही.--वाचक्‍नवी

नुकतेच वाचले की

युरोपीयन युनियन लवकरच इंग्रजी भाषेच्या लिखाणपद्धतीत बदल करून नव्या प्रकारची इंग्रजी लिखित भाषा वापरणार आहे. जी उच्चार सुसंगत असेल.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

वर खाली न जाण्याचा पर्याय

अक्षरे एकमेकांना न जोडता आणि वर खाली न जाता सलगपणे लिहून सर्व उच्चार व्यक्त करता येणे हा रोमन लिपीचा फार मोठा गुण आहे.
म्हणजे असे की, अक्षरे न जोडताही लिहिता येते. कॅपिटल अक्षरे लिहिताना वर खाली जावे लागत नाही आणि कटिंग दि टीज्‌ आणि डॉटिंग दि आय्ज़्‌ देखील करावे लागत नाही. म्हणजे पर्याय आहे. देवनागरीसाठी असा पर्याय नाही.
याला उदाहरण तमिळ भाषेचे देता येईल. तमिळ ची मूळ भाषा ग्रंथभाषा. ही लिहिता बोलताना एकही संस्कृत शब्द वापरायची गरज पडत नाही. आधुनिक तमिळमध्ये संस्कृत किंवा संस्कृतोद्भव शब्द अनेक. म्हणजे हल्लीच्या तमिळला पर्याय आहे, तसेच इंग्रजी लिपीचे.--वाचक्‍नवी

भाषाशुद्धी

२) इंग्रजी भाषेतील शब्दांना प्रतिशब्द प्रचलित करण्याबद्दल अनेक जणांच्या मनात रास्त शंका असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी या विषयाबद्दलही जाणकारांनी माहिती द्यावी.

हा तसा जुना विषय आहे आणि यावर बरेचदा चर्चा झाली आहे. या संदर्भात एक अभूतपूर्व प्रकार इथे नमूद करावासा वाटतो. अवांतर/विषयांतर वाटल्यास क्षमस्व.
मराठीत इंग्रजी शब्द असावेत/नसावेत, प्रतिशब्द कसे असावेत याबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते असतात. पण नुकताच एका अनुदिनीत एक वेगळाच प्रकार पाहिला आणि मती कुंठित झाली. काही नमुने..

- तुम्हाला टेलतो
- मी अन्सरलो
- मी टॉकत होतो
- मी रिटर्नलो
- मी स्लीपलो

या प्रकाराला काय म्हणावे कळत नाही. हे मराठी नक्कीच नाही आणि इंग्रजीही नाही. आणि वाचताना अंगावर पाल पडल्यासारखे वाटते. हे लोकप्रिय होऊ नये अशी आशा करतो.

----

घाबरीफाईड

असे प्रकार आम्ही शाळेत करत असू आणि अनेक एबीसीडी पोरे असे शब्दप्रयोग करताना ऐकले आहे. तेव्हा, भविष्यात असा प्रकार प्रचलित झाला तर नवल वाटायला नको. ;-)

थरथरायटिस

हा हा हा.. आम्ही सुद्धा शाळेत नव्याने इंग्रजी शब्द कानावर पडायला लागल्यावर असेच काहीसे बोलायचे. थरथरायटिस, लटपटायटिस असे काही नवे आजार अथवा स्थिती सुद्धा असायच्या :)
जर्मन शिकायला लागल्यावर आपोआपच अनेकदा मराठी ऐवजी नुकताच घोकलेला जर्मन शब्द तोंडात येतो आणि मी बोलतोच्या ऐवजी मी श्प्रेशतो असे म्हणून सर्व जण हसतात.
पण या तर्‍हेची भाषा लहान समुहापुरतीच मर्यादित राहते. हास्यविनोदापुरताच त्याला अर्थ असतो. (म्हणजे तेवढेच महत्व त्याला रहावे. आता अशी भाषा वृत्तपत्रातून अधुनिक भाषा म्हणून वापरु लागले तर परिस्थिती चिंताजनक असेल :) )
--लिखाळ.

थरथरायटिस

चुकून दोनदा आला...

का बरे


, 'ईक्वेशने सायमल्टेनियसपणे सॉलवण्या'ची गरज नव्हती. मी 'उत्तर देऊ' शकत असताना किंवा फार फार तर 'आन्सर करू' शकत असताना 'आन्सरण्या'ची काहीच गरज नाही.

असे का बरे. जर 'पेन' चे अनेकवचन पेने होते. ('टेबल'चे टेबले, 'सिगरेट'चे सिगरेटी. 'सी.डी.' चे सीड्या, 'व्हॉल्युम'चे व्हालमे) तर आन्सरणे हा शब्दप्रयोग हास्यास्पद का?

उदा. या काव्यपंक्ती पाहा.

भरली बघून ताटे मी हंगरून गेलो
गोडीत पिंड उष्टे मी लंगरून गेलो
-महेशराव

दुवा: http://www.manogat.com/node/13603

शंका कुणा न आली की आत काय आहे
ग्लासास स्टिलच्या या मी ड्रिंकरून गेलो!

काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरी
लुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो

- केशवराव

दुवा: http://www.manogat.com/node/13616

केशवरावांच्या कवितेतील ओळी या हास्योत्पादक असल्या तरी हास्यास्पद नक्कीच नाहीत. महेशरावांनी तर (नेहमीप्रमाणे) गांभार्यपूर्वक लिहिलेल्या आहेत.

हास्यास्पद(?)

केशवरावांच्या कवितेतील ओळी या हास्योत्पादक असल्या तरी हास्यास्पद नक्कीच नाहीत. महेशरावांनी तर (नेहमीप्रमाणे) गांभार्यपूर्वक लिहिलेल्या आहेत.

गझल आणि विडंबनातील तसे काही हास्यास्पद नाही, दोन्ही चांगले आहेत. तरी हंगरून किंचीत हास्यास्पद वाटले. महेशरावांच्या गझलेला आलेले प्रतिसाद मात्र बर्‍यापैकी गंभीर वाटले.

तसेही, कवींना जगाचे नियम लावू नये...त्यांच्याकडे विशेष परवानापत्र असल्याने त्यांना सर्व माफ करावे लागते. ;-)

हास्यास्पद नाही पण अनोळखी

माझे संस्कृताचे ज्ञान यथातथाच आहे पण हास्य वरून आलेले हसणे, कृत्य/कृत्वा वरून आलेले करणे, ब्रूयात वरून आलेले ब्र ही क्रियापदेही अशीच बिचकत बिचकत आली असावीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

..

>ही क्रियापदेही अशीच बिचकत बिचकत आली असावीत. <
बरोबर आहे.

वरिल क्रियापदांच्या बाबतीत जो प्रश्न आहे तोच प्रश्न इंग्रजी शब्दांचा भरणा वाढत जात आहे त्याबाबतीत आहे. भाषाशुद्धी जपताना ते शब्द स्विकारावेत की नाकारावेत हे कळत नाही. संस्कृत अथवा इतर भारतीय भाषांतून येणारे शब्द पटकन स्विकारले जातात तसे इंग्रजीतले नाहित.
या स्विकारामुळे भाषा धेडगुजरी होते की विकसित होते यावर माझे स्पष्ट मत बनलेले नाही.
--लिखाळ.

सहमत

जे नैसर्गिकरीत्या, हळूहळू येतील, ते टिकतील, रुळतील. जे ओढूनताणून, टनाच्या भावाने लादले जातील, ते टिकणार नाहीत. समाजमान्यता / समाजाचा स्वेच्छेने स्वीकार हा महत्त्वाचा मुद्दा.

सहमत आहे. इंग्रजी शब्द फार झाले म्हणून रूळलेल्या शब्दांना काढण्यात काही अर्थ नाही. किंबहुना ते शक्य नाही. याची एक कसोटी म्हणजे तीव्र भावना व्यक्त करायच्या असल्या तर आपल्याला नैसर्गिकरीत्या कोणते शब्द सुचतात?

" $%##$! परत डेडलाइन चुकली. आता हापिसात गेल्यावर बॉस बोकांडी बसणार!"
की
"हाय रे दैवा!(:-) ) परत अंतिम तारीख चुकली. आता कार्यालयात गेल्यावर वरिष्टांची बोलणी खावी लागणार!"

"कोपर्‍यावरच्या हाटेलातली एक प्लेट भजी आणि चहा! सोबत पाऊस असेल तर दुधात साखर!"
की
"कोपर्‍यावरच्या उपाहारगृहामधली एक बशी/थाळी (?) भजी आणि चहा! सोबत पाऊस असेल तर दुधात साखर!"

----

आणखी...

१. कारमध्ये बसले, कार लॉक केली, गिअर टाकला आणि ऍक्सलेरेटरवर पाय दाबला.
२. कार्टमध्ये बॉक्सेस ठेवले आणि ढकलत तिला काउंटरपाशी आणलं.
३. कार्पेटवरची धूळ वॅक्युम क्लीनरने साफ केली.
४. केसांना शॅम्पू लावला आणि लक्षात आलं की कंडिशनर संपलं आहे.
५. बसमध्ये चढले, कंडक्टरकडून तिकिट घेतलं. चार स्टॉप गेल्यावर कॉलेज आलं.

करा मराठी, माझा उत्साह संपला...

संस्कृत आणि लॅटिन

संस्कृत अथवा इतर भारतीय भाषांतून येणारे शब्द पटकन स्विकारले जातात तसे इंग्रजीतले नाहित.

हम्म! संस्कृत आणि लॅटिन या भाषा भगिनी आहेत त्यामुळे इंग्रजी शब्द स्वीकारल्याने भाषा लयाला जाईल का विकसीत होईल ते कसे ठरवायचे?

परंतु नेहमीच्या वापरातले शब्द विसरून नवे शब्द घुसडण्याची गरज नसावी असे वाटते.

म्हणजेच जुना शब्द नसेलच तर नवा शब्द आहे तसा स्वीकारला तरी माझी व्यक्तिशः फारशी हरकत नाही. जुना शब्द असेल तर नवा शब्द इतर कोणत्याही भाषेतून स्वीकारायची गरज कळत नाही. तसेही काढून टाका, नष्ट करा, खोडा वगैरे सारख्या साध्या शब्दांसाठी नि:सारण असा शब्द बघून कसेसेच होते. ;-)

द्या टाळी

मला तर 'निस्सारण' हा शब्द वाचल्यावर शाळेत जीवशास्त्राच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात वाचलेला 'मलनिस्सारण' हाच शब्द आठवतो.

टगवंतराव, द्या टाळी. !


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आणखी काही

बस, स्कूटर, गॅस, पेन (झरणी असा शब्द ऐकला होता), बॉलपेन, पेन्सिल असे अनेक सहजी स्वीकारलेले शब्द आहेतच.

आव्हान :)

संस्कृतमधुन येणारे शब्द लवकर रुळतात असे निरिक्षण म्हणून लिहिले. ते रुळावेत की नाहित याबद्दल मतप्रदर्शन नव्हते.
ते निरिक्षण चुकीचे सुद्धा असु शकते.

ब्रेड साठी पाव हा ब्रेड पेक्षा जास्त रुळलेला इंग्रजी नसलेला शब्द आहे. संस्कृत शब्द बनवावाच असे माझे मत नाहिच हे मी वर लिहिले आहेच.

अवांतर : ट्रक हाच मुळात संस्कृत शब्द वाटतो.. ट्रकं करोति खरखरम् । पंगुं लघयते गिरीम । :) (संस्कृत प्रेमींनी, ट्रक प्रेमींनी आणि ट्रेकिंग करणार्‍यांनी ह घ्या)
-- लिखाळ.

पाव

पाव हा इंग्रजी शब्द नाही हे नक्की. ज्याअर्थी त्याचे सामान्यरूप होते त्याअर्थी तो शब्द मराठीच. हल्ली मुंबई-पुण्यात पाव आणि ब्रेड हे शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरतात. इतर महाराष्ट्रातही असावेत. पावभाजीला लागतो तो पाव. त्याच्या लाद्या असतात. एका लादीत ६ ते १२ पाव असतात. आणि सॅन्डविचसाठी वापरतात तो ब्रेड. हे शब्द इतके रूढ झाले आहेत की, ' ब्रेड आणू की पाव 'असे विचारून नवरे घराबाहेर पडतात. लोणी(मख्खन) आणि बटर(मस्का)मध्ये असाच फरक आहे. याशिवाय बनपाव, बुरून आणि बटर हेही पावांचे प्रकार आहेत. --वाचक्‍नवी

ब्र?

'ब्र' क्रियापद नाही, आणि हा शब्द ब्रूयात्‌ पासून झालेला नसावा. हा ब्रह्म या शब्दाचा अर्धा भाग आहे. पहा:मोल्सवर्थ पान ५९६. --वाचक्‍नवी

इथे पाहा

http://mr.upakram.org/node/543#comment-8017

ब्रु (२उ.प) बोलणे हा संस्कृत धातु आहे. तो ब्रवीमि ब्रूवः ब्रूमः | असा ( परस्मैपदी) चालतो. त्यातील "ब्रवीमि "(वर्त.प्र.पु.ए.व.) चा अर्थ "मी बोलतो/बोलते " असा होतो.
एखाद्या विषयावर चर्चा चालू असता जर कोणला काही मतप्रदर्शन करायचे असेल तर हात वर करून त्याने "ब्रवीमि" असे म्हणायचे.' ब्रूहि'(तू बोल) अशी संमती मिळाल्यावर बोलायचे. पुनःपुन्हा बोलून चर्चेत प्रत्यवाय आणणार्‍याला " "ब्र (ब्रवीमि चे पहिले अक्षर) अपि मा ब्रूहि " असे सांगितले जात असावे. त्याचे मराठीकरण "ब्र सुद्धा उच्चारू नकोस "असे झाले. ब्र हे केवळ अक्षर आहे असे मी म्हणतो ते या अर्थी.
अर्थात ब्र चा अर्थ अवाक्षर, चकारशब्द असा होऊ शकेल आणि तो एकाक्षरी शब्द मानता येईल हे मान्य आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काही शब्द सहज रुळतील, काही नाही रुळणार

क्रेडल मधल्या इन्फंटला बघून तिने एक्स्क्लेम केले - किती लिटल आहेत ना तिचे टोज!
हे शब्द सहज मराठीत रुळणार नाहीत असे माझे मत आहे.

पण :
कॉटवरच्या बेबीला बघून तिने कॉमेंट केली - तिच्या छोटुकल्या बोटांना पिंक नेलपॉलिश लावले तर किती ब्यूटिफुल दिसेल!
हे शब्द बहुधा रुळू शकतील.

इंग्रजीतल्याही शब्दा-शब्दांत फरक असावा...

सहमत आहे

शब्दवापरावर ते रुजतात किंवा नाही ते समजते.
आयटी सारख्या क्षेत्रातले शब्द त्या क्षेत्रात सहतेने रुजतात. पण इतर लोक ते शब्द वापरायला जात नाहीत. उदा. एरर, बग..वगैरे..
एक मजा सांगतो. नोकरी बदल करताना काही लोक आधिच्या ़म्पनित न सांगता अचानक नोकरी सोडून निघून जातात आणि नव्या नोकरीवर रुजू होतात. त्याला ऍबस्कॉन्ड होणे असा शब्द वापरला जातो. हा शब्द इतका अनवट आहे की समान्य इंग्रजी जाणरारे लोक हा शब्द वापरत नाहित. पण माझ्या काही आयटी मधल्या मित्रांच्या तोंडी मी तो शब्द सहज रुळलेला पाहिला आहे.

तुमच्या वरिल उदाहरणात ब्युटिफुल पेक्षा क्युट हा शब्द सध्याची अधुनिक पिढी वापरेल असे वाटते. भाषा वापरताना नेमकी अभिव्यक्ती करण्याचा प्रयास लोक करत नसतात तर मोघम शब्द वापरुन काम रेटत असतात असेच मी अनुभवले आहे.

मी एकदा केंब्रिज मध्ये टॅक्सितून जात असताना टॅक्सिवाला गप्पा मारत होता. सिग्नलला गाडी उभी असताना बाहेर कुणी तरुण मुलगा ऑसम असे म्हणाला आणि टॅक्सिवाला नाराजिने सांगू लागला की 'हा सर्व हॉलिवूडचा परिणाम आहे. हल्लीच्या मुलांना हॉरिबल, सेनसेशनल, इंप्रेसिव असे विविध श्ब्द वापरताच येत नाहित. सगळ्या तर्‍हेच्या उद्गारांना ऑसम म्हणून टाकतात.'
-- (चपखल शब्द वापरण्याची काळजी घेणारा) लिखाळ.

परकीय शब्द मराठीत रुजण्यासाठी...

दुसर्‍या भाषेतील शब्द मराठीत केव्हा रुजतात?
१. ते शब्द ती भाषा ऐकताना पुन्हापुन्हा कानावर पडतात.
२.ते उच्चारायला फारसे कष्ट पडत नाहीत. म्हणजे त्यातली जोडाक्षरे क्लिष्ट नसतात.
३. त्या शब्दाने व्यक्त होणारी संकल्पनाच मराठी संस्कृतीत नसते.
४. त्यांना सोपा मराठी प्रतिशब्द नसतो.
५. किंवा, दुसर्‍या मराठी शब्दात ती अर्थच्छटा आणता येत नाही.
६. तो शब्द नित्य व्यवहारासाठी उपयोगी असतो.
७. त्या शब्दांचे मराठीकरण करणे शक्य असते. वगैरे वगैरे.
श्री. धनंजयांनी वर दिलेली उदाहरणे वरील नियमांना पुष्टी देतात.--वाचक्‍नवी

उलट प्रकार

तुम्ही सगळ्यांनी मराठीवरील इतर भाषांच्या प्रभावाचे उदाहरण दिलेले आहे. मी भारताच्या अमेरिकेवरील प्रभावाचे उदाहरण देतो.
They were laid off last week - गेल्या आठवड्यात त्यांना नोकरीतून हाकलले
They were bangalored last week - गेल्या आठवड्यात तांची नोकरी गेलि कारण त्यांच्या कम्पनीने भारतात आउटसोर्सिंग केले
एखाद्या अमेरिकी कंपनीने भारतात कार्यालय काढून मग अमेरिकेतील स्टाफ कमी केला तर त्याला to lay off 'नोकरीतून काढणे' म्हणत नाहीत तर त्याला to bangalore 'भारतीयांमुळे नोकरी जाणे' असे नवीन क्रियापद वापरतात. 'बेंगळूर' शहराच्या 'भारताची सिलिकॉन व्हॅली' या प्रतिमेमुळे हा शब्दप्रयोग अस्तित्वात आलासे वाटते.

विषयान्तर

आजपर्यन्त मला वाटत होते की विषयान्तर करण्यात माझाच फक्त हातखण्डा आहे, पण मूळ विषय 'देवनागरी लिपि', आणि लिखाळ वाचक्नवी वगैरे मण्डळींचे शवट-शेवटचे प्रतिसाद यांत बर्‍यापैकी विषयान्तर जाणवतेय. :):):)

 
^ वर