उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
तुझ्या माझ्यात?
नवीन
October 8, 2008 - 3:59 pm
तुझे, माझे मधील झ् चा उच्चार झर्यातल्या झ सारखा आहे की झलकमधल्या झ सारखा आहे? हे शब्द जेव्हा तुझ्या, माझ्या असा वापरतात तेव्हा त्याचा उच्चार झलकसारखाच होतो असे दिसते. तसेच 'चे' उदा. हाताचे चा उच्चार चमच्यातल्या च सारखा आहे की चंद्रातल्या च सारखा आहे? हे शब्द जेव्हा हाताच्या सारखे वापरले जातात तेव्हा च चा उच्चार चंद्रातल्या च सारखाच होतो असे दिसते. याबद्दल आपल्याला काय वाटते?
दुवे:
Comments
दंततालव्य/तालव्य उच्चार
याबाबत माझे (स्वतंत्र) असे कुठलेच मत नाही.
मराठीत दोन वेगवेगळ्या उच्चारांना फार जवळचे समजले जाते.
च/च़
छ/(० - मराठीत जोडवर्ण नाही)
ज/ज़
झ/झ़
पैकी प्रथम वर्णांना तालव्य (ता.) म्हणतात, तर जोडीतील दुसर्या वर्णाला दंततालव्य (दं.ता.).
अवांतर : हे दोन भिन्न वर्णप्रकार एकसारखे मानण्यासाठी काही ऐतिहासिक कारण असावे, त्याहून अधिक कारण व्याकरणाच्या दृष्टीने देणे गरजेचे नाही. उदाहरणार्थ : मराठीत ल/ळ अशी एक वर्ण-जोडी उच्चाराने अगदी निकट समजली जाते (बाल/बाळ, माला/माळा), वैदिक भाषेत ड/ळ अशी वर्ण-जोडी उच्चाराने अगदी निकट समजली जाते (ईडे/ईळे, एकराडिति/एकराळिति). मराठी व्याकरण शिकताना मराठी जोडी विशेष साम्याची मानली जावी (ल/ळ), वैदिक व्याकरण शिकताना वैदिक जोडी विशेष साम्याची मानली जावी (ड/ळ). त्यामुळे ज/ज़ ही मराठीत जोडी मानली जाते, इंग्रजीत मात्र j/z अत्यंत भिन्न वर्ण मानले जातात, याची कारणमीमांसा या ठिकाणी मला अप्रस्तुत वाटते. मराठी व्याकरणाच्या चर्चेत ज/ज़ यांच्यात मराठीत उच्चारसाम्य आहे, असे "निरीक्षणाने" मान्य करावे.
सामान्य नियम :
संस्कृत तत्सम शब्द : नेहमीच तालव्य उच्चारावेत.
उदा ('च'/'ज'च्या बाराखडीत) :
चमत्कार, चातक, चित्त, प्राचीन, प्रचुर, चूर्ण, चेतना, चैतन्य, प्रचोदन, चौर्य
जरासंध, जातक, जित, जीव, ...
मराठीत रुळलेले शब्द :
छ : नेहमीच तालव्य : छडी, छाटणे, छिथू/छीथू, छूट, छोकरी.
च, ज, झ : पुढे इ, ई, ए, ऐ, य् असले तर तालव्य, नाहीतर दंततालव्य
तालव्य :
चिरणे, चीड, चेटूक, चैन, तिच्या
जिरणे, जीभ, जेवण, जैत, भोज्या
झिरपणे, झीट, झेंडू, ..., तुझ्या
दंततालव्य (च़, ज़, झ़, असा) :
खच (उच्चार : खच्), चमचा, चाफा, चुडा, चूक, चोर (!दिसायला संस्कृत तरी मराठीत रुळलेला), चौक
आज (उच्चार : आज्), जरासा, जाड, जुटणे, जू, जोर, (?जौ- उदाहरण सुचत नाही)
या मराठी-रुळलेल्या शब्दांच्या उच्चार-नियमाला फार म्हणजे फारच थोडे अपवाद आहेत. पण काही अपवाद अगदीच रोजवापरातले आहेत.
चार (४ हा आकडा) वरील नियमाप्रमाणे च़ तरी उच्चारायला तालव्य च
त्याचे: वरील नियमाप्रमाणे तालव्य च तरी उच्चारायला च़
फारसी, इंग्रजीमधून आलेले शब्द मराठीत किती रुळले आहेत, त्यावर उच्चार अवलंबून आहे.
जहाज - रुळलेला शब्द - उच्चार वरील नियमाप्रमाणे (ज़हाज़ असा, मुळात फारसीमध्ये जहाज़)
जिल्हा - रुळलेला शब्द - उच्चार वरील नियमाप्रमाणे (तालव्य जिल्हा असा, मुळात ज़िला असा)
***चो* (शिवी), जेल, वगैरे शब्द मराठीत पूर्ण मराठीमय झालेले नाहीत. उच्चार मूळ भाषेतल्या सारखेच.
मराठीत नुक्ते (च़, ज़, वगैरे) वापरायचे, किंवा नियम मोडतो तिकडे "च्य" वापरायचा - च्यार (४ हा आकडा), असा विचार काही लोकांनी केला आहे. पण त्या कल्पना लोकांनी स्वीकारल्या नाहीत.
लिपी ही सोयीसाठी असते, ती पूर्णपणे असंदिग्ध असलीच पाहिजे असे नाही. मराठीत उच्चारताना पुष्कळ अधिक स्वर असूनही, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ - ८ लिखित चिह्नांनी आपण काम भागवतो. त्यामुळे आहे त्या लेखनात बदल केलाच पाहिजे, किंवा करायलाच नको - माझे कुठलेच ठाम मत नाही.
+१
+१
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
शुद्धिपत्र
***चो* (शिवी), जेल, वगैरे शब्द मराठीत पूर्ण मराठीमय झालेले नाहीत. उच्चार मूळ भाषेतल्या सारखेच.
पुढीलप्रमाणे वाचावे :
***चो* (शिवी), जोक (विनोद), वगैरे शब्द मराठीत पूर्ण मराठीमय झालेले नाहीत. उच्चार मूळ भाषेतल्या सारखेच.