वृक्षांची रंगसंगती

उत्तर अमेरिकेत भ्रमण करतांना फॉल कलर्समध्ये रंगलेल्या वृक्षराजीचे अनुपम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले. मात्र ते पहात असतांना ही किमया कशामुळे आणि कशासाठी घडत असेल याचे कुतूहल राहून राहून वाटतच होते. त्यामागची कारणपरंपरा समजल्यावर कुतूहलाची जागा अचंभ्याने घेतली.

इथे नेमके काय घडते ते समजण्यापूर्वी आपल्याला ठाऊक असलेल्या वनस्पतीशास्त्राची थोडक्यात उजळणी केली तर तुलनेसाठी ते सोपे जाईल. सगळ्या झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुस-या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुध्दा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते.

आपल्याकडे दिसणारे वड, पिंपळ, आंबा, चिंच, बाभूळ, गुलमोहोर आदी मोठे वृक्ष अगदी लहानपणापासून पहाण्यात असतात. त्यातले कांही तर आजोबा, पणजोबांच्या काळातले असतात. म्हणजे त्यांचा बुंधा आणि मुख्य शाखा पूर्वीच्या असतात. फुले आणि फळे तर अगदी अल्पकाल झाडांवर असतात आणि पानेंसुध्दा बदलत राहतात. कांही विशिष्ट ऋतूंमध्ये या झाडांना जोमाने नवी पालवी फुटते आणि कांही काळात त्यांची पिकली पाने जास्त संख्येने गळतात असे दिसले तरी बाराही महिने ही झाडे मुख्यतः हिरवी गार असतात. हा हिरवा रंग पानांमधल्या क्लोरोफिल या रासायनिक तत्वामुळे त्यांना प्राप्त होतो. जमीनीतून मुळांनी शोषलेले पाणी आणि क्षार यांचा हवेमधील कर्बद्विप्राणिल वायूंबरोबर संयोग घडवून आणण्याचे काम हे क्लोरोफिल फोटोसिन्थेसिस या क्रियेमधून करते. यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि यातून अन्न तयार होते. या अन्नावर झाडांची वाढ होते, तसेच हे अन्न खाऊन कीटक, पक्षी आणि शाकाहारी प्राणी जगतात. मांसाहारी प्राण्यांचा उदरनिर्वाह त्यांना खाऊन होतो. हे सारे पशुपक्षी श्वसनक्रियेत हवेतला प्राणवायू घेतात आणि कर्बद्विप्राणिल वायू हवेत सोडतात. अशा प्रकाराने सृष्टीमधील जीवनाचे संपूर्ण चक्र चालत राहते.

ऊष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधाच्या दक्षिणेकडल्या भागांत हे असे युगानुयुगे चालत आलेले आहे, पण त्याहून उत्तरेकडे वेगळ्या प्रकारचे हवामान असते. अमेरिकेच्या उत्तर भागात हिंवाळ्याच्या दिवसात तपमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हांतभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे फोटोसिन्थेसिस ही क्रिया मंदावते. आपल्याकडली बारमाही हिरवी झाडे अशा वातावरणात तग धरू शकणार नाहीत. पण या थंड हवामानात वाढलेल्या वृक्षांच्या जातींनी या संकटावरचा मार्ग शोधून काढला आहे.

या वृक्षांना वसंत ऋतूमध्ये पानाफुलांचा बहर येतो. इथल्या उन्हाळ्यातले मोठे दिवस, त्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे त्यांचा सदुपयोग करून ही झाडे
झपाट्याने वाढतात, तसेच अन्न तयार करण्याचा कारखाना जोरात चालवून त्याचा भरपूर साठा जमवून ठेवतात. कडक थंडीत आणि अंधारात फोटोसिन्थेसिस होत नसल्यामुळे पानांचा
फारसा उपयोग नसतो, त्याशिवाय त्यांचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्यातून जास्त बाष्पीभवन होते, त्यावर जास्त बर्फ सांचून त्याचा भार वृक्षाला सोसावा लागतो असे तोटेच असतात. हे
टाळण्यासाठी हे वृक्ष आधीपासूनच तयारीला लागतात.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हे वृक्ष आपली वाढ थांबवतात आणि त्यांच्या पानांमधल्या क्लोरोफिलचे विघटन होणे सुरू होते, तसेच पानांमधले रस झाडाच्या आंतल्या बाजूला शोषले जाऊ
लागतात. ते फांद्या आणि खोडांमधून अखेर मुळांपर्यंत जाऊन पोचतात आणि सुरक्षितपणे साठवले जातात. झाडांना थंडीत न गोठण्यासाठी यांचा उपयोग होतो. पण यामुळे मरगळ येऊन ती पाने सुकायला लागतात आणि गळून पडतात. पाने नसल्यामुळे झाडांचे श्वसन जवळ जवळ बंद होते आणि मुळांकडून पाण्याचा पुरवठा थांबल्यामुळे रसांचे अभिसरण होऊ शकत नाही. त्यापूर्वीच ही झाडे झोपेच्या पलीकडल्या डॉर्मंट स्थितीत जातात. आपल्याकडचे योगीराज सर्व शारीरिक क्रिया अतिमंद करून वर्षानुवर्षे ध्यानस्थ राहात असत असे म्हणतात. ही झाडेसुध्दा दोन तीन महिने ध्यानावस्थेत काढून स्प्रिंग येताच खडबडून जागी होतात.

पानांमध्ये हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलखेरीज कॅरोटिनाइड्स, क्झँथोफिल, अँथोसायनिन यासारखी पिवळ्या आणि तांबड्या रंगांची रसायनेसुध्दा असतात. एरवी क्लोरोफिलचे प्रमाण जास्त
असल्यामुळे हे इतर रंग झाकले जातात. जेंव्हा क्लोरोफिल नष्ट होते तेंव्हा इतर द्रव्यांचे रंग दिसायला लागतात. कांही झाडे फॉलच्या काळात लाल रंगाचे अँथोसायनिन तयारही करतात. या द्रव्यांमुळे निर्माण होणारे रंग एकमेकात मिसळून त्यांच्या प्रमाणानुसार रंगांच्या वेगवेगळ्या असंख्य छटा तयार होतात. मात्र ही झाडे कोणालाही आकर्षित करण्यासाठी हे रंग धारण करत नाहीत. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांची जी धडपड चाललेली असते त्यात ते बायप्रॉडक्ट्स तयार होतात. हे सगळे पाहता झाडांना फक्त जीव असतो एवढेच नसून त्यांना बुध्दी, विचारशक्ती आणि दूरदृष्टीसुध्दा असते की काय असे वाटायला लागते.

लेखनविषय: दुवे:

Comments

माहितीपूर्ण आणि मनोरंजक

समतोल चांगला साधला आहे. अभिनंदन.

रंगीबेरंगी झाडे बघून डोळे सुखावतात.

काही तपशील ठीक नसावेत, किंवा विस्तारभयास्तव दिले नसावेत. रंजकतेमुळे कुतूहल वाढेल, आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी वाचक स्वतःहून तपशीलवार माहिती मिळवतील.

कोणते तपशील?

काही तपशील ठीक नसावेत, किंवा विस्तारभयास्तव दिले नसावेत

थोडी उत्सुकता आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान

लेख आवडला. जसे वाईट आर्थिक परिस्थितीत माणसे खर्चाला आवर घालतात तसेच झाडांच्या थंडीत सुरू होणार्‍या पानगळीकडे बघून वाटते.

सुरेख लेख

धनंजय म्हणतात तसे माहीतीपुर्ण तसेच मनोरंजक.

ह्या लेखात एक दोन छायाचित्र दिली असती तर क्या कहने!

असेच...

म्हणतो. माहितीपूर्ण आणि रंजक. चित्रांनी भर पडली असती.

-सौरभ.

छान

घारे सर,
लेख छान झाला आहे.

पुढील लेखांची वाट पाहत आहे. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच म्हणतो

पुर्णपणे पानगळ झाल्यावरचे वातावरण खुप उदास वाटते.
लेख मस्तच झाला आहे. बहर ते पानगळ अशी चित्रे असती तर आणखीन मजा आली असती.





उत्तम

लेख, अतिशय आवडला. धनंजय म्हणतात तसे रंजक आणि माहितीपूर्ण.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

उत्तम लेख

हे सगळे पाहता झाडांना फक्त जीव असतो एवढेच नसून त्यांना बुध्दी, विचारशक्ती आणि दूरदृष्टीसुध्दा असते की काय असे वाटायला लागते.

दिलिप कुलकर्णी यांच्या 'निसर्गायण' या पुस्तकामध्ये अशाच संदर्भात एका गुलाबाच्या झाडाने त्याची जोपासना करणार्‍या व्यक्तिने संरक्षण करण्याचे आश्वासन दिल्यावर स्वतःहून् काटे गाळल्याचे (म्हणजे काही दिवसांनी त्या झाडाला नवीन काटे आले नाही) उदाहरण वाचल्याचे आठवते.

बाकी लेख छानच् झाला आहे!

जयेश

रोचक

दिलिप कुलकर्णी यांच्या 'निसर्गायण' या पुस्तकामध्ये अशाच संदर्भात एका गुलाबाच्या झाडाने त्याची जोपासना करणार्‍या व्यक्तिने संरक्षण करण्याचे आश्वासन दिल्यावर स्वतःहून् काटे गाळल्याचे (म्हणजे काही दिवसांनी त्या झाडाला नवीन काटे आले नाही) उदाहरण वाचल्याचे आठवते.

हे उदाहरण फारच रोचक आहे. याबद्दल आणखी वाचायला आवडेल. इथे लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधली चालणारी-बोलणारी झाडे आठवली.

----

वाह!

लेख आवडला, फॉलचे कलर डोळ्यासमोर आहेतच- आता हा लेखही आठवेल.

अवांतरः

दिलिप कुलकर्णी यांच्या 'निसर्गायण' या पुस्तकामध्ये अशाच संदर्भात एका गुलाबाच्या झाडाने त्याची जोपासना करणार्‍या व्यक्तिने संरक्षण करण्याचे आश्वासन दिल्यावर स्वतःहून् काटे गाळल्याचे (म्हणजे काही दिवसांनी त्या झाडाला नवीन काटे आले नाही) उदाहरण वाचल्याचे आठवते.

हे मस्तच. गुलाबाची झाडे काट्यांची असली तरी अतिशय सुस्वभावी आणि मनमिळाऊ असतात असं मलाही वाटतं. एखादं मरणारं गुलाबाचं रोपटं जरी लावलं तरी ते फारशा काळजीशिवाय लगेच टवटवीत होते. अशी ४ रोपटी आम्ही कचर्‍याच्या भावाला आणली होती. जगतील की नाही अशी शंका होती पण ती सरसर जॅक अँड द बीन स्टॉकमधल्या झाडासारखी वाढून अल्पावधीत रुळली. त्यांच्या माहितीत त्यांच्या आकाराबद्दल फारसे नव्हते पण अक्षरशः कमळाएवढी मोठी फुले येऊ लागली.

किंचित बावल्यावर खालील फोटो काढला आहे.

DSC02006

उत्तम

उत्तम लेख. वरील प्रतिसादांशी सहमत आहे.

----

असेच म्हणतो

असेच म्हणतो..छान लेख सर्वांशी सहमत!

आवडला

लेख आवडला...

आपला
गुंडोपंत

उत्तम लेख

घारे साहेब माहिती आवडली.
इथे जपानमध्ये पानगळीला 'कोयो' म्हणतात.
ही पानगळ उत्तरेकडे चालु होउन दक्षिणेकडे सरकते. लोक उत्साहाने ही पानगळ बघायला जातात.
हा पानगळीचा एक फोटो (आंतरजालावरुन् आभार्)

अप्रतिम छायाचित्र

अनिकेत यांनी रंगगळतीचे अप्रतिम छायाचित्र पाठवले आहे. धन्यवाद. मला प्रोत्साहन देणारे प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार.

भारी लेख

आवडला.

सर

घारे साहेब,
इतके छान लिहिता तुम्ही.
लेख आवडलाच.
त्याच सोबत अजून वाचू म्हणून शोधायला गेलो तर सगळे इंग्रजीतून् हो...
कसे करावे बरं?

हेवनस्पतीशास्त्र पान चक्क रिकामे आहे हो...

किमान हाच लेख तरी तेथे लावता येइल का?

आपला
गुंडोपंत
आपण मराठीत ज्ञान आणले नाही तर इतर कुणीच ते आणणार नाहिये!

 
^ वर