छायाचित्रकला-७

मानवाला आपण पहातो त्याची स्मृती रहावी म्हणून रेखाटन करावे अशी ऊर्मी पुरातन काळापासून होती. ज्यावेळी लिपीच काय भाषासुध्दा निर्माण झाली नव्हती तेव्हा देखील त्याने आपल्या राहत्या गुहेत तो ज्याची शिकार करत होता त्या जनावरांची चित्रे काढली.कालानुसार कलेत सुधारणा होत गेली. पाश्चिमात्य व पौर्वात्य चित्रकला निरनिराळ्या दिशेने विकसित झाल्या. नैसर्गिक रंग व सरस, डिंक यांच्या वापरापासून सुरवात होऊन आज सिन्थेटिक रसायनांचा वापर वाढत आहे. आज भारतात पाश्चिमात्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. शैली कोणतीही असली तरी एक गोष्ट प्रामुख्याने जपली गेली ती ही की प्रत्यक्षात काय दिसते त्यापेक्षा चित्रकाराला काय " भावले " ते महत्वाचे ! फ़ारच थोडे चित्रकार असे निघाले की ज्यांनी चित्रे हुबेहुब काढली. कलाकाराला "आत " काय दिसले ते महत्वाचे. बहुतेक निसर्ग चित्रात झाडाची पाने हिरव्या रंगाचे ठिपके असतात. चित्रकाराला काय पाने दिसत नाहित ? पण त्याला मह्त्वाचे वाटते ते चित्रातील त्या जागेवर असलेल्या रंगाचा सर्व चित्रावर होणारा परिणाम. व्यक्तीचित्र काढताना व्यक्तीमत्व महत्वाचे, भावना महत्वाच्या. हुबेहुब कान किंवा गाल महत्वाचे नाहीत तर व्यक्ती तत्वज्ञ आहे, कलाकार आहे, अधिकारी आहे असे दाखवता येणे ही कलाकाराची कसोटी ! हे परत रेषा व रंग यांनी प्रगट करावयाचे. निळ्या रंगाचा माणूस कोणी पाहिला आहे ? अनेक चित्रकार चेहरा रंगवतांना निळा रंग वापरतात. चित्रे सगळ्यांना काढता येतात, कलाकार " दशसहस्रेषु ". हातात ब्रश व रंग असलेल्या कलाकाराची ही कथा तर हातात फ़क्त एक यांत्रिक डबडे असलेल्या छायाचित्रकाराचे काय विचारता ? सादरीकरण [Documentation] करावयाचे असेल तर छायाचित्रकार नक्कीच आघाडीवर असणार हे उघड आहे पण ज्यावेळी फ़ोटो हा चित्र म्हणून पहावयाचे /काढावयाचे असते तेंव्हा चित्रकारांनी शेकडो वर्षात जमविलेल्या ज्ञानाची ओळख करून घेणे उपयुक्त ठरेल. चित्रकलेचे आचार्य विद्यार्थ्याना जे सांगतात ते आपण किती उपयोगात आणू शकतो ते पाहू.
१] घरात माणसाचा फ़ोटो काढताना खिडकीतून येणारा प्रकाश उत्तम. ती एका कडेला असावी. भरीला[fill] , दुसऱ्या बाजू उजळवण्याकरिता दरवाजा,रेफ़्लेक्टर इत्यादी उपयोगात आणा.
२] कॅमेरा आणि व्यक्तीची उंची समान असावी. वरून किंवा खालून काढलेले फ़ोटो बेकार दिसतात. उदा. कमरेखालील उंचीवर कॅमेरा ठेऊन एक फ़ोटो काढा.किती घाण दिसते कळेल.
३] पर्स्पेक्टिव बरोबर यावे म्हणून फ़ोकल लेन्थ ७० ते ९० वापरा. गरज पडली तर थोडे मागे जा.
४] बऱ्याच वेळी अगदी समोरून काढलेल्या फ़ोटोपेक्षा थोडा बाजूने काढलेला फ़ोटो चांगला दिसतो. कॅमेऱ्याची जागा बदलून बघा.दोन कान, दोन डोळे दिसलेच पहिजेत असा पासपोर्ट फ़ोटो काढणे कमी करा.
५] लक्ष वेधून घेणाऱ्या अवांतर फ़ालतूक गोष्टी काढून टाका. शक्य नसेल तर पोस्ट प्रोसेसिंगमध्ये त्या गोष्टी नाहिश्या करा.
६] पार्लरमध्ये जाऊन केलेला मेक-अप पाहिजेच असे नसले तरी नीटनेटकेपणाचा आग्रह धरा. कपाळावरील व नाकावरील तेलकटपणामुळॆ चकचकीत स्पॉट येत नाहीत ना बघा.
७] टक्कल असेल तर कॅमेरा थोडा खाली घ्या.१-२ इन्च उंची कमी केलीत तरी फ़रक पडतो.
८] नाक रुंद असेल तर मान थोडी वळवावयास सांगा.
९]चेहऱ्यातील सर्वात महत्वाचा भाग डोळा. फ़ोटो काढताना मुद्दाम लक्ष द्यावे. कोठे पहावे, कसे पहावे याबद्दल सुचना करा.
१०] ताठ बसावयास/उभे रहाण्यास सांगा.
आता घराबाहेरचे फ़ोटो.
१] निसर्ग चित्रे काढताना वाईड लेन्स वापरणॆ उपयोगी पडते. पाहिजे तर नंतर क्रॉप करा/ एन्लार्ज करा.
२] इमारती,झाडे, धबधबे पळून जात नाहित. जागा बदलून,बाजूला,मागे पुढे सरकून, फ़ोकल लेन्थ बदलून व्हु-फ़ाइंडरमध्ये काय दिसते ते काळजीपूर्वक अभ्यासा. साध्या डोळ्याना दिसणारे आणि व्हू-फ़ाइंडरमध्ये दिसणारे यात फ़रक असतो.
३] पॅनॉरॉमिक व्हू ३५ च्या वाईड लेन्सनेही मिळत नाही. त्याकरिता थोडे वळत-वळत ३-४ फ़ोटो काढावे लागतात. तेही शिकून घ्या.
४] क्षितिज आडवे [horizontal] येईल असा कॅमेरा धरा. उभ्या वस्तू आपोआप बरोबर येतात.
५] उंच वास्तूचा फ़ोटो काढताना शेजारी एखादी व्यक्ती असेल तर उंचीचा अंदाज येतो. याचा विचार पुढच्या लेखात आहे.
६] निसर्ग आणि व्यक्ती दोघेही फ़ोटोत असतील तर महत्वाचे कोण त्याचा आधीच विचार करा.
७] झाडे, इमारती पळत नाहित, पण सुर्य सारखाच जागा बदलत असतो. त्याचा प्रकाश बदलतो, सावल्या आपल्या जागा बदलतात. थोडेसे ढग बराच फ़रक पाडू शकतात. सर्व
शक्यतांचा विचार करा.
८] जेंव्हा फ़ोटोत जमीन/पाणी व आभाळही असेल तेंव्हा क्षितीजाची रेष फ़ोटोच्या मध्यावर येणार नाही याची काळजी घ्या.ज्याला महत्व द्यावयाचे त्याला जास्त जागा द्या.
९] आपण खिडकीतून जास्त वेळेला बाहेर बघतो.त्यामुळे नकळत चौकटीची सवय झालेली असते. बाहेर फ़ोटो काढताना खिडकी नसली तरी एखाद्या झाडाचा बुंधा व आडवी फ़ांदी फ़ोटोत घ्या. यांचा चौकटीसारखा उपयोग करता येतो.यामुळे 3D चा आभास निर्माण होतो.
१०] निसर्ग चित्रात लांबवरचे फ़ोटो घेताना दोन घ्या. पहिल्यात सगळे शार्प येईल असे बघा व दुसऱ्यात जवळच्या वस्तूवर फ़ोकसिंग करून मागच्या मुद्दाम अस्पष्ट करा. मग निवड करा.
चित्रकार दुसऱ्या पध्दतीचा वापर करतात. तुम्हाला काय आवडते ते तुम्हीच ठरवा.
११] काही वेळा तांत्रिक गोष्टींमध्येच वेळ जातो आणि ’ निसटून जाई संधीचा क्षण ’ अशी पाळी येते. असे वाटले तर पहिल्यांदी फ़टाफ़ट फ़ोटो काढा.तंत्रशुध्द फ़ोटो शक्य असेल तर नंतर.
बऱ्याच गोष्टी सांगावयाच्या राहिल्यात, पण केंव्हा तरी थांबावयास पाहिजेच ना. काही शंका असल्या वा माहिती पाहिजे असेल तर अवष्य विचारा.

[ फ़ोटो काढताना बऱ्याच लोकांना ’टेन्शन’ येते. ब्रॅकेटिंग उपयोगी पडते. किंवा आपणच चुकलो आहोत असा आव आणून लगेच दुसरा फ़ोटो काढा. निदान नंतरचा चांगले येणे शक्य .]

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त सूचना

नोंद करून ठेवण्यालायक! धन्यवाद.

एक शंका :

३] पर्स्पेक्टिव बरोबर यावे म्हणून फ़ोकल लेन्थ ७० ते ९० वापरा. गरज पडली तर थोडे मागे जा.

मी फार पूर्वी वाचले होते की चेहर्‍याच्या योग्य पर्स्पेक्टिव्ह योग्य येण्यासाठी फोकल लेन्ग्थ १३५च्या आसपास वापरा...

वेगवेगळ्या फोकल लेन्ग्थ्ने चेहरा काढून प्रयोग केलाच पाहिजे आता...

उपयुक्त

अतिशय उपयुक्त सुचना आहेत. लहान लहान गोष्टींचाही फोटोवर कसा परिणाम् होतो ते समजले.

५] उंच वास्तूचा फ़ोटो काढताना शेजारी एखादी व्यक्ती असेल तर उंचीचा अंदाज येतो. याचा विचार पुढच्या लेखात आहे.

दरीचा फोटो काढताना फोटोत खोली येत नाही, त्यासाठी काय करावे?

जबरदस्त

मस्तच सुचना आहेत. नक्कीच उपयोग होईल.





अनेक आभार

अप्रतिम सुचना.. अशाच टीपांची वाट पाहत होतो :)
अनेक आभार..
-ऋषिकेश

धन्यवाद...

उत्तम माहितीबद्दल धन्यवाद.

२] इमारती,झाडे, धबधबे पळून जात नाहित. :-)

३] पॅनॉरॉमिक व्हू ३५ च्या वाईड लेन्सनेही मिळत नाही. त्याकरिता थोडे वळत-वळत ३-४ फ़ोटो काढावे लागतात. तेही शिकून घ्या.
मी असे काही फोटो पॅनोरॅमिक मोड मध्ये कॅनन एस टू आय एस कॅमेर्‍याने काढले होते. नंतर सॉफ्टवेअर वापरुन ते जोडले असता सगळ्या फोटोंची खूपच
बारीक पट्टी तयार झाली. पूर्ण् मोठा फोटो दिसण्यासाठी काय करावे?

ब्रॅकेटिंग बद्दलही अजून माहिती हवी आहे.

सौरभदा-

आभारी आहे.

बर्‍याच टीपा नवीन होत्या. काही न वापरल्याने विस्मृतीत गेल्या होत्या.

उपक्रमावर आपण आल्यामुळे आमच्या फोटोग्राफीच्या ज्ञानात वेगाने भर पडत आहे. हे सर्व आत्मसात करण्याची आणि वापरण्याची क्षमता देव देवो. :-)

अनेक धन्यवाद.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

सुंदर

सुंदर लेख. लेखमालाही अत्यंत माहितीपूर्ण आहे.

कॅमेरा आणि व्यक्तीची उंची समान असावी. वरून किंवा खालून काढलेले फ़ोटो बेकार दिसतात. उदा. कमरेखालील उंचीवर कॅमेरा ठेऊन एक फ़ोटो काढा.किती घाण दिसते कळेल.
हे कुणीतरी रामूला सांगायला हवे. भूत चित्रपटात बहुतेक वेळा क्यामेरा गुढघ्याच्या वर किंवा छतावर. अर्थात यात काही कलात्मक दृष्टीकोन असल्यास कल्पना नाही.

बाकी रामूचे क्यामेरा अँगल हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

----

१३५ एमेम लेन्स

शरद
श्री.धनंजय म्हणतात त्याप्रमाणे १३५ची लेन्स चेहऱ्याचा फ़ोटो काढताना वापरतात. पण पोर्ट्रेट्मध्ये व्यक्तीचा फ़ोटो
काढावयाचा असतो, त्यावेळी १३५ एमेम लेन्स वापरावयास जास्त मागे जावे लागेल.दुसरे ज्या व्यक्तीचे नाक जास्त
लांब असेल, त्याचा फ़ोटो काढताना १३५ एमेम लेन्स वापरावी नाहीतर ९० च्या आसपास. बहुतेक फ़ोटोग्राफ़र व निकॉन
९० च सुचवतात.
शरद

माझ्या आवडी...

कॅमेरा आणि व्यक्तीची उंची समान असावी.

कॅमेरा डोळ्यांच्या पातळीवर असावा. बसलेल्या व्यक्तीचे जवळून फोटो काढताना, लहान मुलांचे फोटो काढताना आणि पाळीव प्राण्याचे फोटो काढताना हे विशेष लक्षात ठेवावे लागते.

लक्ष वेधून घेणाऱ्या अवांतर फ़ालतूक गोष्टी काढून टाका.
हे फार महत्वाचे. कित्येकदा मॉडेल समोरीलय अनावश्यक जमिन (फोर-ग्राऊंड) छायाचित्रात येते. त्यामुळे फोटो पाहणार्‍याचे लक्ष दुभागले जाते. फोटोच्या केंद्रस्थानी व्यक्ती असायला पाहिजे त्या ऐवजी व्यक्ती आणि जमीन येते.

पार्लरमध्ये जाऊन केलेला मेक-अप पाहिजेच असे नसले तरी नीटनेटकेपणाचा आग्रह धरा.
स्वच्छ तोंड धूवून पावडरचा हलका हात पुरेसा होतो. मेक-अप केलातरी चार भींतीत काढावयाच्या फोटोंसाठी हलकासा मेक-अप् आणि बाह्य, उघड्या वातावरणातील फोटोंसाठी जरा गडद मेक-अप् असावा.

चेहऱ्यातील सर्वात महत्वाचा भाग डोळा. फ़ोटो काढताना मुद्दाम लक्ष द्यावे. कोठे पहावे, कसे पहावे याबद्दल सुचना करा.

डोळे जर नॉर्मल आकाराचे असतील तर कॅमेराच्या लेन्सकडे किंवा त्या पातळीत दूर पाहावे. डोळे आकाराने लहान असतील तर
कॅमेरा पातळीच्या एक दीड फूट वर पाहावे. (अशाने पापण्या जास्त उघडून डोळे जरा मोठे वाटतात.) डोळे मोठे असतील तर कॅमेराच्या पातळीच्य एखाद फूट खाली पाहावे (त्यामुळे पापण्या जरा खाली येऊन डोळ्यांचा आकार लहान वाटतो) डोळे मोठे असले तरी कधी कधी आकार फार विलोभनिय असतो. अशा वेळी सरळ लेन्सकडे पाहिल्यास फोटो मध्ये ती विलोभनियता अधोरेखित होते.

निसर्ग आणि व्यक्ती दोघेही फ़ोटोत असतील तर महत्वाचे कोण त्याचा आधीच विचार करा.
अशा चित्रात व्यक्ती देखाव्याकडे पाहात असेल तर जास्त नैसर्गिक वाटते. पण् व्यक्ती चौकटीच्या कोपर्‍यात असावी. जर व्यक्ती कॅमेराकडे तोंड करून असेल तर चौकटीच्या मध्यावर असावी. फोर-ग्राऊंड टाळावे.

आपण खिडकीतून जास्त वेळेला बाहेर बघतो.त्यामुळे नकळत चौकटीची सवय झालेली असते. बाहेर फ़ोटो काढताना खिडकी नसली तरी एखाद्या झाडाचा बुंधा व आडवी फ़ांदी फ़ोटोत घ्या. यांचा चौकटीसारखा उपयोग करता येतो.यामुळे 3D चा आभास निर्माण होतो.

वा! हे मस्त. मला वाटतं, झाडाचा बुंधा चौकटीच्या कोपर्‍यात अर्धवट किंवा फांदी अनाहूतपणे पण सभ्यतेच्या मर्यादेत् चौकटीत डोकावणारी असावी.

विषय जिव्हाळ्याचा आहे. कुठे आगाऊगीरी झाली असेल तर क्षमस्व.

मझ्या आवडी

शरद
पेठकर काकांनी सुन्दर विवरण केले आहे. मी फ़ार थोडक्यात लिहतो ही तक्रार पूर्वापार आहे. अशी सुन्दर टीका [हा शब्द
वाड:मयीन अर्थाने घ्यावा] पहिल्यापासून झाली असती तर सर्वांनाच उपयोगी पडली असती. अजूनही त्यांनी आपल्या
जिव्हाळ्याच्या विषयावर लिहून समुहाच्या सर्वांनाच फ़ायदा करून द्यावा.
समित्पाणी

 
^ वर