७०० बिलीयन डॉलर्सचा प्रश्न

ह्या चर्चेचा उद्देश जगाला कृष्णधवल माध्यमातून पहाण्याचा नाही आहे. पण बर्‍याचदा जगातील आणि स्थानीक व्यवस्थांचा विचार करताना समाज अथवा समाजातील अग्रणी तसे पाहतात म्हणून हा चर्चाप्रपंच.

तर बिघडलेली अमेरिकन अर्थव्यवस्था आणि पर्यायाने त्याचे होणारे जगावरील परीणाम हे आता सर्वश्रुत आहेत. आधी गॄहकर्जातील गोंधळामुळे बेअर स्टर्न, मग फॅनी मे आणि फ्रेडी मॅक, त्याच्यापाठोपाठ लेहमन ब्रदर्सची दिवाळखोरी आणि काल जाहीर केल्याप्रमाणे गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनले या दोन गुंतवणूक उद्योगातील दिग्गजांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांचे बदलत असलेले मॉडेल - असे सातत्याने कालच्यापेक्षा आज जास्त असे प्रश्न जगाच्या पुढे येत आहेत. अर्थात हे प्रश्न आत्ता तयार झालेले नाहीत पण ते आत्ता समजायला लागले. (हेन्री पॉल्सन या गोल्डमन सॅक्सच्या सर्वेसर्वा सीईओने असे मोठे भांडवलदारी क्षेत्र अचानक सोडून त्यामानाने कमी पगाराचे अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरीचे पद दिड एक वर्षांपूर्वी का घेतले असेल ते आता कळते. - रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा!)

तर या प्रत्येक प्रश्नाच्यावेळेस अमेरिकन सरकार तत्परतेने अर्थव्यवस्था सावरायच्या निमित्ताने पुढे आले आणि करदात्यांचे (ज्यात येथे सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वच येतात) पैसे या खाजगी उद्योगांना वापरायला घेतले. डाउजोन इंडस्ट्रीयल ऍव्हरेजला सरकार मदत करत आहे कळल्यावर दिलासा मिळाला आणि परत काही अंशी मुसंडी मारली. त्यातच भर म्हणून वर उल्लेखलेल्या हेन्री पॉलसनने आता काँग्रेसकडे ७०० बिलीयन्स डॉलर्स (७ वर ११ पुज्ये) मागितले आहेत. का तर या खाजगी भांडवलांना परत वर आणून अर्थव्यवस्था वर आणायला.

आता माझा प्रश्न एकदम वेगळा आहे. वरील जे काही झाले त्याचे विश्लेषण कराच पण त्याहूनही एक गंभिर प्रश्न मला स्वानुभवाने आणि जवळून बरेच काही खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करत असल्याने/केल्याने पडत आहे. तो प्रश्न अमेरिका असो अथवा भारत अथवा अजून कुठली लोकशाही, थोड्याफार फरकाने तसाच असेल:

कायम सरकार आणि सरकारी याला खाजगी उद्योग तुच्छ लेखतात, अमेरिकेतील सामान्य माणूस पण "आय पे टॅक्सेस" असे सरकार कडून कुठल्याही सेवा फुकट उकळायला म्हणून बोलतो. खाजगी उद्योगातील तर काय, एखादा एमबीए असला तर संपलेच - ज्ञानीयांचा राजा गुरू महाराज! जणू काही त्यांना सगळे ज्ञान आहेच. भ्रष्टाचार हा सरकारच करते (हे विशेष करून भारतासाठी, अमेरिकेत हा प्रकार येथील शिक्षा आणि एकंदरीतच कामाच्या नितिमत्तेमुळे असला तरी कमी आहे).

तर मग आता इतके जर सरकार वाईट, तर त्यावर इतके अवलंबित्व ते का? आता कॉर्पोरेट सेक्टरमधे भ्रष्टाचार आहे असे सरळ का कोणी म्हणत नाही? आता यांच्या अनुभवाबद्दल आणि ज्ञानाबद्दल वाभाडे म्हणून कोणी काढताना का दिसत नाहीत?

भारतात तर भूजच्या भूकंपानंतर एक ऐकीव गोष्ट - तेथे सरकारी इमारती फक्त पडल्या नाहीत... कारण त्यांनी बिल्डींग कोडप्रमाणे बांधल्या होत्या! (भ्रष्टाचार पैशात झाला नसेल असे नाही). म्हणजे खाजगी उद्योग नक्की काय करतात? ते खरेच पैसा/संपत्ती निर्माण करतात का फक्त इतरांची हडपतात?

बरं असे असले की भांडवलशाही वाईट तर कम्युनिझमने काय दिवे लावले आणि किती वाईट प्रकार आहे ते सांगायला लेखमाला लिहावी लागेल...

तर मग या सार्‍याला उत्तर काय? भारताने (आणि अगदी अमेरिकेसकट जगाने देखील) नक्की कसे पुढे जावे, समाजव्यवस्था काय असली तर ती योग्य? भारताने आणि भारतीयांनी इतरांचा अनुनय करावा का? (तो ही अंध) . ते करत नसले तर भारताला कमी समजावे का?

मला लहान पणी वाचलेली एक गोष्ट आठवते: एका मुलाचे नाव ठणठणपाळ असते. त्याला ते आवडत नाही तेंव्हा त्याचे वडील म्हणतात की बाहेर जाऊन तुला जे नाव तुला योग्य आहे असे वाटते ते मला येऊन सांग, आपण बदलू... तो मुलगा बाहेर जातो आणि त्याला दिसलेल्या चार व्यक्ती, त्यांची नावे आणि अवस्था पाहून तो घरी येतो आणि म्हणतो:

लक्ष्मी वेचते गोवरी
भिक मागतो धनपाल
अमरसिंह तो मर गया
सबसे अच्छा ठणठणपाळ!

तुम्हाला काय वाटते? :-)

Comments

चोरांचा बाजार...

श्री.विकास यांनी उपस्थित केलेले प्रश्न सर्वमान्य आहेतच.

खासगी क्षेत्रे आणि सरकारी कारभार यांचा गुलदस्त्यातला व्यवहार (हँड इन् ग्लोव्ह) फार मोठ्या प्रमाणावर चालतो. एकाला झाकावे आणि दुसर्‍याला काढावे. मोठमोठ्या आर्थिक संस्था, बँका, खासगी उद्योग आणि खासगी उद्योगाकडून काम करून घेणारे सरकारी अधिकारी, नेते यांचे एक मोठे काळे साम्राज्य (कार्टेल) जग चालवत आहे.
त्यात जे अधिकाराच्या पदावर आहेत असे सर्व व्यक्तीशः गुंतलेले असतात.
लीहमन ब्रदर्स काय किंवा इतर ज्यूनियंत्रित आर्थिक संस्था आजवर नेहमीच पैसा मिळवण्यासाठी भानगडी करत आलेल्या आहेत. आज एम्.बी.ए. केलेले सूटेड-बूटेड क्लर्क या संस्थात दिसत असले तरी त्यांच्या इतिहासात डोकावले तर थोर थैलीतली नाणी वाजवत "आणि ही रे.." म्हणणारे सावकार, काळीज कापून मागणारा शायलॉक आणि जेपी मॉर्गन यांच्यात काहीच फरक नाही.
आपण केलेली कृष्णकृत्ये लपवण्यासाठी नेतेमंडळींची तोंडे तोबर्‍याने भरून टाकणे त्यांना चांगले जमते.

कम्युनिझम मध्ये तर खुल्लमखुला राज्यकर्तेच चोर असतात.
जोवर तिजोरीच्या किल्ल्याच चोरांच्या ताब्यात आहेत तोवर हे असेच चालणार. भांडवलशाहीत चोर सावाचा आव आणतात इतकेच.
प्रकरण अंगलट आले की "समाजाच्या हितासाठी" या चोरांच्या उलट्या पाट्या विकत घ्यायला सरकार तय्यार.
हपापाचा माल गपापा...

"कार्लाईल ग्रूप" ,"इराकी तेल टोकन" अशा भानगडी नेहमीच चव्हाट्यावर येतात आणि विसरल्या जातात.
आपल्याकडे कित्येक खासगी/सहकारी संस्था काढून त्या बंद पाडून गबर (अब्जाधीश) झालेले नेते गावोगावी दिसतात.

त्यामुळे जागतिक स्तरावर काय किंवा अगदी लहान खेड्यात काय? दोन्हीकडे तीच परिस्थिती आहे.

***
सबसे अच्छा ठणठणपाळ! ऐवजी -
दुनिया चोरांचा बाजार... झांजिबार...असे बरळावेसे वाटते.
असो.
***

ग्रेशम साहेबांचा विजय असो !

"ब्याड मनी ड्राईव्ज गुडमनी आऊट!"-- इती सुप्रसीद्ध् म्यानेजमेंट गुरू, ग्रेशम साहेब.
पहा :ग्रेशम चा नियम
जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

भ्रष्टाचार?

बाकी सर्व पटले, पण हे जे काही झाले (चालले) आहे, त्यामागे भ्रष्टाचार नाही, तर आंधळी व अनिर्बंध हाव आहे. सगळ्या इन्वेस्टमेंट बॅंकांच्या व्यवहारांवर जवळजवळ कसलेच निर्बध नव्हते. कमोडिटिज चे मार्केटही (विशेषतः) अमेरिकेतील असेच अनिर्बंध मोकाट सुटले आहे. तेल व धान्यांची बेसुमार भाववाढ ही त्यामुळेच आहे, लवकरच त्या मार्केटांवरही निर्बंध घालावे लागणार आहेत, असे दिसते.

"रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा!" - हे आवडले

भ्रष्ट्राचार म्हणले कारण

त्यामागे भ्रष्टाचार नाही, तर आंधळी व अनिर्बंध हाव आहे.

आंधळी व अनिर्बंध हाव आहेच आहे. मी लाच हा शब्द वापरला नव्हता. (तो पण भाग बाहेर आला तर आश्चर्य वाटायला नको. राजकारणी-भांडवलदारांचे साटेलोटे, तसेच धंद्याधंद्यातील - तेरी भी चूप और मेरी भी चूप!) भ्रष्टाचार म्हणायचे कारण इतकेच की हे सर्व पैसे करत असताना वस्तुस्थिती लपवली जात होती.

हर्षद मेहता अथवा केतन पारेख यांनी जे काही मुंबई शेअर बाजारात केले ती हाव जशी होती तसाच तो भ्रष्टाचारपण होता असे मला वाटते. त्याच अर्थाने येथे पण झाले आहे. ऐपत नसलेल्यांना खोटे क्रेडीट निर्माण करून गृहकर्ज देयचे इथपासून जी ही शृंखला चालू होती, त्याची सर्व अर्थउद्योगांना जाणीव होती. सरकारी कायदेशीर निर्बंध नसणे याचा त्यांनी फायदा घेतला पण तो घेताना अनेक नियमांकडे डोळेझाकही केली.

कुठेतरी भारताबद्दल हे लिहीताना विचार आले त्यातून एक बरे वाटत आहे (क्षीण असले तरी...) - मान्य आहे हर्षद मेहता आणि केतन पारेख सारख्यांनी व्यवस्थेचा फायदा घेतला, लुबाडले, पण सरते शेवटी त्यांना पकडण्यात पण आले आणि ह्.मे.च्या बाबतीत तर काय, त्याला ते उपभोगता पण आले नाही... पण येथे (वॉलस्ट्रीटवर) असे काही होईल असे वाटत नाही - एकामेका साह्य करू हे व्यवस्थित चालू राहील.

खासगी सरकार

चांगला विषय मांडला आहे. बरेच मुद्दे वरच्या प्रतिसादांमध्ये आले आहेतच. पण राहून राहून प्रश्न पडतो की खासगी आणि सरकारी यात फरक काय? शेवटी या खासगीची कल्पना म्हणा अथवा यातले मोठे खेळाडू म्हणा सरकार सोबत लागे बांधे असलेलेच असतात. एकीकडे सरकार लुटत असतेच. मग हे खासगी लोकं स्वतः आधी स्वतःला डुबवल्याचा आव आणतात आणि मग त्यांना वर आणायच्या निमित्ताने सरकार आणखीन लुबाडते. सर्व ठिकाणी भरडला जातो तो सर्वसामान्य माणूसच.
सर्वसामान्य माणसाने सतर्क आणि संघटीत राहणे हेच योग्य.





समाजव्यवस्था कशी असावी

कळीचा प्रश्न विचारलात. याचे एक उत्तर मिळणार नाही. पण पूर्वी झालेल्या प्रयोगांपैकी कुठलीच नाही असे "नेति, नेति" उत्तर मिळेल. म्हणूनच विचारवंतांसाठी, राज्यकर्त्यांसाठी, आणि लोकांना भारवून टाकू शकतात त्या नेत्यांसाठी हा काळ मोठा क्लेशदायक/उत्साहवर्धक ठरावा.

बहुधा बाजारपेठेचा उपयोग करणारीच कुठलीशी समाजव्यवस्था होऊ घातली आहे. यात राज्यकर्तेही असतील - गेल्या शतकांत वेगवेगळ्या देशांत संघटित झालेली सैन्ये आपोआप विघटित होणार नाहीत, आणि ती सैन्ये चालवणारी व्यवस्था "राज्य"च म्हणावी.

अनेक देशांत लोकशाहीचा काही प्रकार चालू राहील असे वाटते. सिद्धांतपातळीवर तरी आपण सबल आहोत, अशा जाणिवेची चटक लोकांना लागलेली आहे. ते सबलीकरण किती आभासी? किती तथ्यात्मक? हे नव्या राज्यव्यवस्था ठरवतील. (किंवा सबल लोक ठरवतील अशी आशा करू शकतो.)

अवांतर : "... आंधळी व अनिर्बंध हाव आहे."
या वाक्याचा अर्थ लागला नाही. आपला फायदा बघून घ्यावा, असा विचार तर सर्वच करतात. त्याची कितपत राशी निर्बंधांच्या पलीकडे आहे हे कसे ठरवणार? सतारीची तार तटकन तुटल्यानंतर कोणीही सांगेल की खुंटा खूपच - अनिर्बंध - पिळला. (हाइंडसाईट २०-२०). दोष देताना हे सांगावे लागते की वादकाला आधीच माहिती असायला हवे होते की "अमुक अमुकपेक्षा तारस्वरात श्रुती लावता येत नाही". नेमका किती फायदा घेतल्यावर दलालांनी "धालो" म्हणायला हवे होते असे आपल्याला वाटते? डोळस हाव म्हणजे कशी असायला हवी होती? या हुंड्यांची (म्हणजे मॉर्ट्गेज बॅक्ड सेक्युरिटी, केडिट डिफॉल्ट स्वॉप, वगैरेंची) किंमत कशी निश्चित करायची याबद्दल डोळस विचार करण्यासाठी सुयोग्य विदा कुठे उपलब्ध होता?

एमबीए

आता कॉर्पोरेट सेक्टरमधे भ्रष्टाचार आहे असे सरळ का कोणी म्हणत नाही? आता यांच्या अनुभवाबद्दल आणि ज्ञानाबद्दल वाभाडे म्हणून कोणी काढताना का दिसत नाहीत?

अमेरिकेतील सध्याची परिस्थिती ही मुक्त भांडवलशाहीचा मार्ग कोठे नेऊ शकतो याची जाणीव करून देणारा धोक्याचा इशारा आहे.
या भांडवलशाहीचे प्रसारक एमबीए, "जे जे प्रायव्हेट, ते ते करेक्ट, ग्रेट ही ते ते" ही विचारसरणी जनसामान्यांवर बिंबवण्यात झटत आहेत.
या एमबीएं वर कोणाचाच अंकुश नाही. जसे डॉक्टर, वकील, लेखा परीक्षक यांसारख्या व्यवसायिकांच्यावर त्यांच्या शिखर संस्थांचा अंकुश असतो व समाज विघातक वा अनैतिक व्यवसाय करणार्‍याची व्यावसायिक मान्यता रद्द करू शकतात, तशी या व्यवसाय गुरूंना भीती नसते. अशा भ्रष्ट एमबीए ची मान्यता रद्द करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी एका एमबीए नेच केली आहे.

मलातरी तत्व म्हणून, सहकार आधारीत अर्थ व्यवस्थेचे मॉडेल भारतात असावे असे वाटते.

 
^ वर