गहन आणि गुढ

नुकतीच ऋग्वेदातील एक सुंदर ऋचा वाचण्यात आली.

अरुणो मा सकृत् वृक: पथायन्तं ददर्शहि
उज्जिहीते निचाय्या तष्टेव पृष्ठयामयी ।। १-१०५-१८

ऋषी म्हणतात, मी एकदा आपल्या वाटेने जात असताना अरुण रंगाच्या एका लांडग्याने मला पाहिले आणि पोक काढलेल्या सुताराप्रमाणे माझ्यावर अचानक उडी घेतली.

ही ऋचा खरोखरच गुढ आहे. लांडग्याने माणसावर का हल्ला करावा, तो अरुण रंगाचा का असावा, पोक काढलेल्या सुताराप्रमाणे असे का म्हटले असावे?

मी जितका खोलात जाऊन विचार करतो तितके मला त्या ऋचेचे नवे कंगोरे दिसतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

तुमचे विचार

तुमचे विचार काय आहेत? आणि येथे सुतार म्हणजे नक्की काय समजणे अपेक्षीत आहे?





असेच म्हणतो

तुमचे विचार काय आहेत? चर्चेसाठी ते बियाणे ठरेल.

हे म्हणजे,

तुमचे पत्ते दाखवा मग हुकुम सांगतो असे झाले नाही का...

धनंजयराव, अहो, तुम्ही आम्हाला मशाल दाखवायची. ह्या रुपक रुपी कृष्ण विवरातून बाहेर काढायचे.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

छे छे - पत्ते काटायची इच्छा नाही

निचाय्या शब्दाचा एकच-स्पष्ट अन्वय मला लागलेला नाही.

अहम् निचाय्या
वृकः निचाय्या
तष्टा निचाय्या

तीन्ही अन्वय मानल्याने पटण्यासारखे अर्थ लागतात.

उडी मारून झडप घालणारे प्राणी, उडी मारण्यापूर्वी पाठ पोक आल्यासारखी वाकवतात [इंग्रजीत 'क्राउच']. त्यामुळे 'हातात तीक्ष्ण अवजारे असलेला पाठ वाकवलेला कारागीर'='पंजात तीक्ष्ण नखे असलेला पाठ वाकवलेला लांडगा' ही चित्रदर्शी उपमा मानणे मला सहज वाटते. आता तुम्ही हुकमी रूपक सांगणार आहात, ते लांडग्याला आणि कारागिराला दोघांना लागू असेल तर पूर्णोपमा असल्याचा साहित्यिक आनंद मिळेल. निचाय्या चे तीन अन्वय मानल्याने तीन वेगवेगळ्या अर्थच्छटा निघतील - जाणत्याला एकच अन्वय असेल म्हणा - मला वैदिक भाषा येत नसल्यामुळे एखादे स्पष्ट एकार्थी वाक्यही प्रमादाने द्वि-त्रि-अर्थी वाटत असेल.

(ऐतरेयात किंवा सायणाने याचा अर्थ सांगितला आहे काय? पारंपारिक अर्थ मानलाच पाहिजे असे नाही, पण उपलब्ध असल्यास दुर्लक्षही करू नये.)

तुमचे म्हणणे बरोबर आहे

पण मी जे पुस्तक वाचले त्यात लेखक विविक्षितपणे म्हणतो, १) तो लांडगा दबा धरून बसलेला आहे. जणू काही त्या ऋषीची वाटच पाहत आहे. २) सुतार पोक काढून पुढे झुकून रंधा मारीत असतो. एका क्षणी अचानक कळ लागून तो ताठ होतो. त्याच प्रमाणे लांडगा ऋषीला बघताच अचानक ताठ होतो.

तरी प्रश्न उरतातच, लांडगा अरुण रंगाचा का आहे आणि तो ऋषींवर चाल करून का गेला?

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

अरुण रंग

म्हणजे नेमका कोणता रंग? केशरी रंगाची छटा असेल तर त्या रंगाचा लांडगा असणे शक्य आहे परंतु ऋचा रुपकाप्रमाणे वापरली गेल्याचा संशय येतो आहे तेव्हा तुमचे विचार कोणते?

संदर्भ

सदर ऋचेचा संदर्भ कळाला नाही.
म्हणून शोधले तेव्हा ही ऋचा 'त्रिता' नामक ऋषीने 'विश्वदेव' देवतेची करुणा भाकण्यासाठी म्हटल्याचे आढळले.
एकंदरीत त्रिता ऋषी एकदा विहीरीत पडला असता त्याला बाहेर पडता येईना. तेव्हा भयाने व्याकूळ होऊन
त्याने हे करुणा-नवदशक (करुणाष्टकाच्या चालीवर) म्हटले असावे असे दिसते.

पृच्छकाला या ऋचेत काही गूढार्थ दिसला तसा मला दिसत नाही.
(माझे संस्कृतचे ज्ञान पुज्य आहे. (शून्य या अर्थी, पूजनीय नव्हे... ;))
सदर ऋचेतील वृक या शब्दाचा अर्थ चंद्र असाही घेऊन काही वेगळा अर्थ लावला आहे असे आढळले.

विसुनानाजी

हे विहिरीत पडणे सुद्धा एक रुपक की काय? कारण विहिरीत पडल्यावर वाचवा, वाचवा असे तो ऋषी ओरडला असता. उगाच प्रार्थना कशाला करत बसला असता?

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

एक दुवा...

या विषयवरील काही मौलिक व काही अवांतर चर्चा येथे वाचता येईल'

धन्यवाद...

तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

आपण दिलेला

दुवा वाचला. ह्या दुव्यावरील सर्व प्रतिक्रिया खिल्ली, उपहास, व्यंग (हास्य म्हणण्याचा धीर होत नाही म्हणून हा शब्द वापरला) इ. स्वरुपाच्या होत्या. टीका करायला हरकत नाही पण ती सकस हवी. ज्या श्लोकाचा अर्थ कळत नाही त्याला मूर्ख ठरविणे हे "कोल्ह्याला द्राक्ष आंबट" ह्या प्रकारात मोडतो. असो. त्या जालस्थळाचे कदाचित् व्यंग हेच वैशिष्ट्य असेल.

पण मी आपले ह्या जालस्थळावरील इतर लेख व प्रतिक्रिया वाचल्या आणि माझा मलाच
धक्का बसला. आपण भारतीय संगीताशी स्वत:ला संबंधित म्हणवता पण भारतीय संगीत
मनाची कवाडे उघडते अशी माझी समजूत आहे. मात्र संस्कृतच्या संदर्भातील आपली आत्ता
पर्यंतची विधाने ही केवळ पूर्वग्रहदूषित, हेटाळणी, उपहास व खिल्ली ह्या स्वरुपाची आहेत.

आपल्याला त्यातच आनंद वाटत असेल तरी त्याला माझी काही हरकत नाही. कारण कोणाला कशात आनंद वाटावा ह्या ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यामुळे आपण स्वत:चेच हसू करून घेत आहोत ह्याचेही भान असू द्यावे.

मुळांत मुद्दा असा आहे की ज्या विषयांत आपल्याला कळत नाही त्यावर सतत बोचरी टीका
करून आपण काय मिळवता? ह्या बाबतीत उस्ताद अमजद अली खान ह्यांची विनम्रता लक्षात घेण्याजोगी आहे. एकदा माझ्या एक परिचित त्यांच्या मागे तंबोरा साथीला बसल्या होत्या. मैफिल संपली आणि उस्ताद अमजद अली खान ह्यांनी कोमल आवाजात विचारले, “क्युं बेटी मैने ठीक बजाया ना?” ज्या विषयात लोक उस्ताद अमजद अली खान ह्यांना गुरु समजतात त्या विषयातील त्यांचा निगर्वीपणा हा कौतुकाचा
विषय आहे (ते स्वत:ला अजुन सुद्धा सरोद वादन क्षेत्रात विद्यार्थी समजतात).

ह्या पार्श्वभूमीवर आपल्या संस्कृत विषयावरील सर्व प्रतिक्रिया हास्यापद ठरतात.

आता माझेच बघा, मला संस्कृत हा विषय सोडला तर इतर विषयात ज्ञान बेताचे आहे म्हणून मी इतरांची मते लक्षात घेतो. उगाच लुडबुड करत नाही. ह्याच काय पण तुम्हाला
इतर कुठल्याही जालस्थळावर मी इतर विषयांत चांगली अथवा वाईट अनावश्यक
टीका करताना दिसणार नाही.

खरेतर तुमचा आणि माझा परिचय नाही त्यामुळे तुमच्यावर ही वैयक्तिक टीका म्हणता
येणार नाही. पण "अति झाले आणि हसू आले" हिच गत झालेली आहे. माकडचेष्टा असलेली सर्कस माणूस १-२ तास बघू शकतो पण त्यालाही एक मर्यादा असते म्हणून हा लेखन प्रपंच.

जरा लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर क्षमा करावी आणि मनात वैयक्तिक स्वरुपात
किल्मिष ठेऊ नये ही प्रार्थना.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

खो खो खो खो

ज्या श्लोकाचा अर्थ कळत नाही त्याला मूर्ख ठरविणे हे "कोल्ह्याला द्राक्ष आंबट" ह्या प्रकारात मोडतो.

अगदी सहमत आहे.


आपल्याला त्यातच आनंद वाटत असेल तरी त्याला माझी काही हरकत नाही. कारण कोणाला कशात आनंद वाटावा ह्या ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यामुळे आपण स्वत:चेच हसू करून घेत आहोत ह्याचेही भान असू द्यावे.

हा हा हा हा

क्या बात है ऋजूशेठ, इतक्या परखड शब्दांमध्ये तुम्ही लिहू शकता हे खरेच वाटले नसते. मान गये!

अजून काही श्लोक येऊ द्यात. प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळलाच पाहिजे असा आमचा आग्रह नाही. मात्र उपक्रमावरील ज्ञानकण वेचण्यास आम्ही नेहमीच तत्पर असतो.

आपला,
(चाहता) आजानुकर्ण

अवांतर

इतक्या परखड शब्दांमध्ये तुम्ही लिहू शकता हे खरेच वाटले नसते.

असे काही लिहिताना मनाला क्लेश होतात. दु:ख वाटते एखाद्याच्या वैगुण्याचा जाहिर पंचनामा करण्याची वेळ यावी ह्याचे.

अश्यांना पाहिल्यावर पुलंना अंतुशेटला पाहिल्यावर जो प्रश्न पडला तोच मला पडतो. ह्यांची नक्की श्रद्धास्थाने कोणती? त्यांना भारतीय संगीताचे पाईक म्हणावे तर तो भारतीय संगीताचा व त्यातील विनम्र व गुणग्राही अश्या उस्ताद अमजद अली खान, पं. शिवकुमार शर्मा, पं. भीमसेन जोशी, मान्या सुब्बालक्ष्मी, हिराबाई बडोदेकर यांच्या सारख्या दिग्गजांचा घोर अवमान. स्वत:चे कोणते अपयश झाकण्यासाठी हे लोक अंतुशेटसारखे सदैव तिरकस बोलतात?

मला तर वाटते, अखंड द्वेष आणि तिरस्कार युक्त अश्या ह्या प्रवृत्तींपासून सर्वांनीच दूर राहायला हवे. परमेश्वरा, ह्या अंध:कारातून आम्हाला प्रकाशाकडे ने.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

धन्यवाद, :)

दु:ख वाटते एखाद्याच्या वैगुण्याचा जाहिर पंचनामा करण्याची वेळ यावी ह्याचे.

आपल्याला दु:ख वाटले असेल परंतु आमचा जाहीर पंचनामा करून आमच्या वैगुण्याचे माप आमच्या पदरात घातल्याबद्दल आम्ही खरे तर आपल्याला धन्यवादच देतो! :)

फरक फक्त इतकाच की या सदरात किंवा दिलेल्या दुव्यात मी कुठेही व्यक्तिश: आपल्याबद्दल कुठलीच टिकाटिप्पणी केलेली नाही. जी काही टिकाटिप्पणी झाली आहे ती या लेखातल्या ऋषी आणि लांडग्याच्या गोष्टीच्या संदर्भात आहे.

असे असतांना आपण मात्र आमच्यावर व्यक्तिगत स्वरुपाची जी काही स्तुतिसुमने उधळली आहेत त्याबद्दल आम्ही आपले आभारीच राहू! :)

असो,

आता आपल्याच शब्दात निरोप घेतो आणि आपल्या दीर्घ प्रतिसादाबद्दल पुनश्च एकदा आपले आभार मानतो...

आपला,
(मनाची कवाडे बंद असलेला, आणि हास्यास्पद माकडचेष्टा करणारा एक असंस्कृत अंतुबर्वा!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

उकल

उपक्रमावरील ज्ञानकण वेचण्यास आम्ही नेहमीच तत्पर असतो.

सर्व प्रथम अभिनंदन.

हा श्लोक म्हटले तर अगदी सोपा आहे.

समजा, ते ऋषी आपणच आहात. आपण नेहेमीच्या वाटेने जात आहात. दोन - तीन
शक्यता १) रुळलेल्या वाटेने जाणे २) वाट चुकणे. तंद्रीत भरकटत जाणे. ३) मुद्दाम अप्रचलित वाट चोखाळणे.

लांडगा हल्ला करणे हे रुपक - हल्ला कोण करतो तर शत्रु.
हा शत्रु जसा बाह्य असू शकतो तसा अंतर्गत सुद्धा असू शकतो. कोण असू शकेल हा दबा धरून बसलेला शत्रु?

लांडग्याचा रंग - अरुणी.

अरुण म्हणजे सूर्याचा सारथी. उगवत्या सूर्याला सुद्धा अरुण म्हणतात (आठवा : अरुण उगवला, प्रभात झाली उठ महागणपति) त्यावेळी आकाशाचा रंग लालसर, पिंगट असतो.

असा हा अरुणी लांडगा आपल्याला गवतात ओळखू येणे कठिण. तो दबा धरून बसतो.
सावज टप्प्यात आलेले दिसले की तो चोर पावलाने येऊन भक्ष्यावर उडी मारतो.

असा विचार करीत गेले की उत्तरे पटकन सापडतील.

(सध्या वृक = चंद्र ह्या दृष्टीने पण विचार चालू केला आहे.)

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

वृक = चंद्र

वृक = चंद्र असे असेल तर् वृकोदर या गणपतीच्या नावाचा अर्थ, चंद्राला गिळणारा असा का?

रुपकाचा अर्थ पटण्यासारखा आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वृकोदर हे गणपतीचे नाव?

वृकोदर हे गणपतीचे नाव कधी झाले? कारण वृकोदर नावाला गणपती अजिबात साजेसा नाही. गणपती खादाड असावा पण त्याचे पोट अंमळ सुटलेले ;-) नाही का?

वृकोदर म्हणजे भीम कारण भीमाची भूक ही लांडग्यासारखी परंतु पोट अगदी सपाट. भीम भरपूर खाऊन, भरपूर व्यायाम करून सशक्त आणि आरोग्यवान असल्याचे सुचवणारे नाव म्हणजे वृकोदर. उदाहरणादाखल, नेटावरील एक लांडग्याचे स्केच बघा म्हणजे खात्री होईल.

सहमत

वृकोदर हे भीमाचे नाव म्हणून वाचले आहे.

बाकी वेदांतील पुष्कळश्या ऋचा ह्या आपल्या मराठीतील ओव्या, लोकगीतांप्रमाणे आहेत. संस्कृत म्हटले की त्यात गहन अर्थ असलाच पाहिजे असा हट्ट नसावा.

किंवा

लोकगीतांमध्ये कधीकधी गहन आणि गूढ अर्थ असेल, याबाबत मन उघडे असावे :-)

गहन आणि गूढ अर्थ लागल्याशिवायही दुर्बोध लोकगीतांचा आस्वाद घेता येतो, याबाबत सहमत.

धन्यवाद.

बाकी वेदांतील पुष्कळश्या ऋचा ह्या आपल्या मराठीतील ओव्या, लोकगीतांप्रमाणे आहेत. संस्कृत म्हटले की त्यात गहन अर्थ असलाच पाहिजे असा हट्ट नसावा.

ऋचा ह्या स्त्रोत्र, सूक्ताप्रमाणेच काहीतरी धार्मिक रीतीरीवाजांचा भाग आहे असा माझा समज होता. तुमच्या वाक्यामुळे हा गैरसमज दूर झाला.

आभारी आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अनेक एकत्र बांधलेल्या ऋचा म्हणजे सूक्त

ऋचा ह्या स्तोत्र, सूक्ताप्रमाणेच काहीतरी धार्मिक रीतीरीवाजांचा भाग आहे...

सूक्तातले प्रत्येक "कडवे" म्हणजे ऋचा.

काही ऋचा वेगळ्या काढून विशिष्ट धार्मिक विधींमध्ये म्हटल्या जातात खर्‍या. काही सूक्ते कुठल्याही धार्मिक विधीत म्हटली जात नसावीत.

वेद म्हणजे "त्या" काळातले संकलित साहित्य आहे. त्यामुळे त्यात कर्मकांडास उपयोगी आणि अन्य असे सर्वच साहित्य वेदाच्या अंतर्गत येते.

बरेचसे लोकसाहित्य (संस्कृत-बिगर भाषांतलेही) कर्मकांडासाठी वापरत असावेत. उदाहरणार्थ दृष्ट काढतानाचा मराठी "इडापिडा टळो" हा मंत्र. किंवा "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" हा मराठी मंत्र फक्त विशिष्ट काळातल्या गणेशपूजेच्याच वेळी वापरतात. या मंत्रांच्या बाबतीतही (वेदांसारखेच) फारफार कमी पाठभेद दिसून येतात.

लोकसाहित्य आणि कर्मकांडसाहित्य यांच्यामध्ये वाटावे तितकी स्पष्ट सीमारेषा नाही.


यम आणि यमीचा संवाद (भाऊ-बहिणींनी शरीरसंबंध ठेवावा की नाही याबद्दल [काही प्रमाणात शृंगारिक] ऊहापोह) हा कुठल्या धार्मिक विधीत वापरतात ठाऊक नाही.
ऊर्वशी आणि पुरुरव्यांच्या मधला संवाद हा कुठल्यातरी विधीसाठी वापरत असावेत (कारण त्या दुर्बोध संवादाचे मागचे-पुढचे कथासूत्र ब्राह्मण-ग्रंथांत आलेले आहे). पण हल्लीच्या कुठल्या विधीत वापरत नाहीत. त्या कथानकावर लिहिलेले कालिदासाचे पूर्णपणे ललित नाटकच त्या मानाने अधिक प्रसिद्ध आहे.

पुन्हा एकदा आभारी

हिरण्यगर्भां हरिणीं सुवर्णरजततस्मजाम् चन्द्राम् हिरण्मयीम् लक्ष्मीं जातवेदो मम आवह असे काहीसे कुठेतरी शिबीरात शिकलो होतो. श्रीसूक्त की पुरुषसूक्त? पण आता त्या प्रत्येक ओळीला ऋचा म्हणतात हे पहिल्यांदा कळले.

यम आणि यमीची एकच गोष्ट माहिती आहे. ती दिवाळीची. ही दुसरी कोणती गोष्ट काढलीत?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

नावाबद्दल माझा गैरसमज दूर झाला आहे.

जय भीम!

आपला,
(आभारी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वृकोदरासंदर्भात

भीमाचे नाव वृकोदर आहे याची खात्री खालील श्लोकावरूनही पटते.

पांचजन्यं हृषिकेशो देवदत्तम् धनंजयः
पौण्ढ्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः

मात्र वृक = चंद्र या दृष्टीने विचार कसा काय होऊ शकतो? वृक = चंद्र असाही अर्थ आहे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझ्याकडच्या

वृक = चंद्र या दृष्टीने विचार कसा काय होऊ शकतो? वृक = चंद्र असाही अर्थ आहे का?

संस्कृत शब्दकोशात वृक म्हणजे कोल्हा किंवा लांडगा असाच अर्थ दिला आहे.

मात्र विसुनानाजींच्या प्रतिक्रियेत "वृकचा अर्थ चंद्र असाही एका लेखकाने
लिहिल्याचे" लिहिले गेले आहे. म्हणून त्या दृष्टीने विचार चालू आहे असे म्हटले.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

काही शब्दार्थ्!

ऋजु, हे सुभाषित जरा वेगळ्या क्रमाने लावले तर..?
म्हणजे अरुणो मा चा अर्थ 'अरूण अशा रंगाचा मी एकदा वाटेने चाललो असताना वगैरे वगैरे.... असा अर्थही घेता येऊ शकेल का? तो घेतला तर एकदम सोपे होउन जाईल बहुतेक!

आणि 'निचाय्या तष्टेव पृष्ठयामयी' याचा विग्रह काय होतो? (संस्कृत विग्रह करुन बरेच दिवस झाले. :-)

तोपर्यंत गोंधळ वाढवण्यासाठी हे काही शब्दार्थ देतो.

उज्जिहान (वि.) = वर येणारा, उदय पावणारा
वृकः = लांडगा, तरस, कोल्हा, कावळा, घुबड, उंदीर, क्षत्रिय!

अरुण
(वि.)=तांबूस, पिंगट धुरकट
(पु.)= तांबडा रंग,पहाटेचा तांबूस प्रकाश, सूर्यसारथी( तुम्ही सांगितल्याप्रमाणे), सूर्य ,रक्तपिती (बहुधा जळू!), तांबडी कण्हेर,हिमालयाचे शिखर, माघ महिन्यातील सूर्य
(नपु.)= तांबडा रंग, सोने , केशर
(घरातल्या शब्दकोशाचा वापर तरी झाला. :-)

बाकी वरचा 'तो' प्रकारही वाचला आणि कर्णांच्या 'उपक्रमावरील ज्ञानकण वेचण्यास आम्ही नेहमीच तत्पर असतो.' या वाक्याशी १००% सहमत!

-सौरभदा
============

Artificial Intelligence is no match for Natural Stupidity! ;-)

शब्दार्थाच्या पलिकडले महत्त्वाचे -

वृक या शब्दाचा अर्थ चंद्र असा घेऊन अर्थ काढल्याचा संदर्भ वर दिला होता. पण का कुणास ठाऊक तो दुवा आता उघडत नाही. असो.

पण त्याच्याही पलिकडे -
ही ऋचा फारच महत्त्वाची दिसते. विहीरीत पडलेला त्रिता ही अशी एक मिथक कथा आहे जी अवेस्ता आणि मुस्लिम लोककथांमध्येही आढळते.
शोध आणि वाचन सुरू आहे.

उत्तम माहिती

धन्यवाद.

(टंकनसुधार सुचवतो: "ही ऋचा फारच महत्त्वाची दिसते." बदलून "हे सूक्त फारच महत्त्वाचे दिसते." विहिरीत पडलेल्याचा थेट उल्लेख असलेली ऋचा या ऋचेच्या आदली आहे.)

बरोबर

मलाही सूक्तच म्हणायचे आहे.
धन्यवाद...

सूक्त आणि ऋचा

स्तोत्र, सूक्त, ऋचा यांमध्ये नक्की काय फरक आहे?

आपला,
(तौलनिक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ह्या ऋचेचा मान्य लेखकाने दिलेला आणि मला पटलेला एक अर्थ

ह्या ऋचेचा अनेक अर्थ असू शकतात असे मानण्यास प्रत्यवाय नाही. गुंडोपंत हरिभक्त ह्यांचा अर्थ मला अधिक भावला. तोच इथे देत आहे.

प्राचीन काळातील ह्या ऋषींची सर्व धडपड आत्मोन्नतिची आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे जायची आहे.

तर हे ऋषी म्हणतात, देवा, मी आपल्या वाटेने जात होतो. तो अरुण रंगाचा लांडगा मला दिसला नाही. तो तर दबा धरून बसला होता आणि मला पाहताच अचानक ताठ झाला आणि माझ्या अंगावर उडी घेतली. ह्यातून ऋषी दर्शवितात की मी निर्दोष आहे.

मग प्रश्न उरतो, लांडग्याविषयीचे हे गार्‍हाणे ऋषीने देवापुढे का मांडावे? वृक म्हणजे लांडगा तसेच वृक म्हणजे वक्रता सुद्धा. वृक हे वक्रबुद्धि, दुर्बुद्धिचे प्रतिक आहे. ती माणसाला बेसावध असताना कशी पछाडते ते उठावदारपणे दर्शविले आहे.

ऋषी म्हणतो, मी उत्तम बनण्याचा, सच्चरित्र व्यक्ती म्हणून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पण षड् रिपु दबाच धरून बसलेले आहेत (७-८६-६). तेव्हा हे देवांनो, माझ्यातील सद्बुद्धिचे रक्षण करा. आम्हाला सत्य आणि ऋताच्या मार्गाने न्या.

विसुनानांनी मागे एकदा विहिरीत पडलेल्या ऋषीचा उल्लेख केला आहे, जो ही आणि इतर ऋचा रचतो. ऋषी हे तर सिद्ध पुरुष. मग अशी कोणती विहिर असेल ज्यातून त्यांना बाहेर पडायला कष्ट होत असतील.

तर ही विहिर आहे अज्ञानाची, असत्याची, अंध:काराची. ऋषी वेळोवेळी एकच म्हणतात, आम्हाला ह्या अंध:कारातून वर काढा आणि सत्याचा प्रकाश दाखवा.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

अजुन एक

ऋषी वेळोवेळी एकच म्हणतात, आम्हाला ह्या अंध:कारातून वर काढा आणि सत्याचा प्रकाश दाखवा.

ईशावास्य उपनिषदांत एक सुंदर प्रार्थना आहे –
"हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्‌ |
तत्‌ त्वम्‌ पूषन्‌ अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये ||"

"हे सूर्या, माझ्या मनांतील सत्याचे स्वरूप सोन्याच्या आवरणाने झाकले गेले आहे. ते आवरण तू दूर सार आणि मला सत्यधर्माचे दर्शन घडू दे".

हे सोन्याचे आवरण म्हणजे षड्रिपु पैकी मोह होय.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

सुरापान ?

सुरापान हा मनुष्याचा पुरातन टाईम पास आहे.
त्या नंतर् , अरूण रंगाचे कोल्हे, मरून रंगाचे पारीजातक, सर्व काही दिसणे शक्य आहे !!
नदीचे मुळ आणि गालीब चे गाल्गुच्चे शोधु नये हेच् खरे ! मजा घ्यावी यातच् खरी मजा आहे !!

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

वेदांतील ऋचा रहस्यमयच वाटतात -

ऋषी वेळोवेळी एकच म्हणतात, आम्हाला ह्या अंध:कारातून वर काढा आणि सत्याचा प्रकाश दाखवा.

रूग्वेदांतील बहुतेक ऋचा अशाच प्रकारच्या प्रार्थनांनी युक्त आहेत असे भासते खरे.

प्रश्नकर्त्याने ह्या ऋचेचा चवथा चरण - जे ह्या (१.१०५) संपूर्ण सूक्ताचे पालुपद आहे (शेवटची १९ वी ऋचा सोडून), ते का गाळले ते समजत नाही. ह्या पालुपदाशिवाय ऋचाही अर्थाविषयी अपूर्ण वाटते.
श्री देवधरांनी पालुपदाचा अर्थ - आपण माझी प्रार्थना श्रवण करा ; सर्व देवांनी माझी प्रार्थना श्रवण करावी - असा केलेला आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांनी वृकः चा अर्थ - शांति आदि गुणांनी युक्त चंद्रासमान विद्वान - असा केलेला आहे. तसेच वित्तम् चा अर्थ 'जाणा, समजून घ्या' असा केलेला आहे. हे सूक्तच 'विश्वेदेव सूक्त' आहे. आणि बहुतेक ऋचा उपमा रूपके, अलंकारांनी युक्त असतात आणि म्हणून गूढ असतात, असे वाटते.
मला भावलेला अर्थ :- सूक्ताच्या इतर ऋचांत अग्नि, वरुण इत्यादिंनाही निरनिराळ्या रूपकांद्वारे हीच प्रार्थना आहे. अरुण, ब्रह्म इ. ने द्युलोक व अग्नि, रोदसी इ. ने भूलोक निर्देशित करून ही प्रार्थना केली आहे. 'पृष्टि आमयी तष्टा इव' काम (अभ्यास, उपासना) करून करून पाठीत कळा येत असलेल्या (अती वृद्ध) विद्वानाप्रमाणे अशा सूर्याने (प्रकाश, तैजस, विद्या) माझ्याकडे हळू हळू चाल केली. तसेच ह्या आधीच्या (१७ व्या) सूक्तात त्रित् विहीरीत (कूप) पडला म्हणजे अद्न्यानरूपी अंधकारमय कूपात पडला. त्याने हाक मारली ती 'विद्या' प्रदान करण्यासठी. आणि ती हाक बृहस्पतीने ऐकली. (म्हणजे ऐकून त्यावर कृपा केली). आणि उठसूठ बृहस्पती जर विहिरीत, विवरात, खड्ड्यात पडलेल्या माणसाकरता धावून यायला लागला (भौतिक, संसारिक प्रश्नांसाठी यायला लागला) तर ? कठीण आहे त्याच. मला तरी पचत नाही.
ऋचा लोकगीताप्रमाणे आहेत ह्याच्या पुष्ट्यर्थ काही संदर्भ मिळाले तर बरे होईल. वेद म्हणजे श्रृतींचा समूह. म्हणून त्याला संहिता म्हणतात. आणि त्या प्रद्न्यावंत ऋषिंना श्रृत झाल्या म्हणून श्रृति; आणि म्हणून त्या मानवनिर्मित नव्हेत असे परंपरेने म्हणतात. श्री व्यासांनी केले ते फक्त संपादन. श्रीव्यासांचे एकूण कार्य पाहता (व्यास ही एक पदवी असून व्यासही अनेक होते असे गृहीत धरले तरी) ते लोकगीते आणि कविता संग्रहांचे संपादन करतील असे वाटत नाही. श्रृति ज्या काळात श्रृत झाल्या त्या युगात 'हंस' हा एकच वर्ण होता. पाच सात हजार वर्षापूर्वीच्या भगवद् गीतेच्या श्लोकांचा कितीतरी विद्वान कितीतरी अर्थ काढतात. त्यातही मुख्य शिकवण काय आहे ह्यातही केवल अद्वैत , विशिष्ठ अद्वैत, शुद्ध अद्वैत, द्वैत, द्वैत-अद्वैत असे भेद दिसतात. गीतेवर निदान १९ भाष्ये आहेत. भागवतावरही ५-६ भाष्ये आहेत. पण वेदांवर एकच - सायणाचार्य. वेदांचा खोल अभ्यास करणारे गीता भावतापेक्षा कमीच. त्यातही जे काही अर्थ प्रवाह आहेत तेही सायणाचार्यांच्या भाष्यावरून. मग ऋचांचा अर्थ गूढ असण्याचीच जास्त शक्यता असणे ह्यात नवल नाही असे वाटते.

एकोहम् -

लोकसाहित्य म्हणजे काय?

श्रीव्यासांचे एकूण कार्य पाहता (व्यास ही एक पदवी असून व्यासही अनेक होते असे गृहीत धरले तरी) ते लोकगीते आणि कविता संग्रहांचे संपादन करतील असे वाटत नाही.

व्यासांनी सूताने सांगितलेल्या ऐकीव श्लोकबद्ध (गेय) कथा संकलित केल्या, त्यामुळे व्यास लोकगीते संकलित करणार नाहीत असे म्हणणे आश्चर्यकारक वाटते.

कदाचित लोकसाहित्य म्हणजे फक्त हिणकस साहित्य असे तुम्हाला म्हणायचे असेल. (माझ्या मते नाही - लोकसाहित्य उत्कृष्ट दर्जाचे असण्यास काहीच हरकत नाही. कवीचे नावगाव विसरून गेल्यानंतरही टिकणारे="ऐकू येणारे" श्रुत साहित्य फार वरच्या दर्जाचे असावेच लागते.) पण तुमची जर लोकसाहित्य="हिणकस" अशी व्याख्या असेल तर वेद हिणकस नाहीत, हे अर्थातच स्पष्ट आहे.

व्याख्या जुळल्याशिवाय संदर्भ जुळणे केवळ अशक्य आहे.

एक विनम्र सूचना -

अद्न्यान -

इथे ज्ञ कसा टंकतात ते माहित नाही कारण मी इतर ठिकाणी टंकित करून इथे तो मजकुर डकवतो. पण ज्ञ ची फोड ज् + ञ असल्याने तसा प्रयत्न करून पहावा.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

ज्ञ टंकणे

ज्ञ टंकण्यासाठी jYa वापरा.





लोकसाहित्य श्रृति नव्हे -

विषयांतर होत आहे ह्याबद्दल खेद आहे, क्षमस्व. पण मला माझी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक वाटते -

लोकसाहित्य म्हणजे हिणकस साहित्य असे मी सूचित केलेले नाही. लोकगीते ही रंजनाच्या आधारे एक message सूचित करणारी संस्था आहे ( पोवाडा ह्या प्रकाराप्रमाणे) हे मीही जाणतो. त्यातही क्वचित् गूढता असतेच. पण म्हणून त्याला 'श्रृति' हे संबोधन वापरता येणार नाही. माझ्या दृष्टीने वासना उद्दीपीत करण्याच्या विकृत हेतूने निर्मिलेले, मजा घ्यावी ह्या हेतूने अकारण अफवा पसरविणे, जनमानसात क्षोभ उत्पन्न होईल अशा प्रकारचे साहित्य - म्हणजे हिणकस साहित्य.

व्यासांनी सूताने सांगितलेल्या ऐकीव श्लोकबद्ध (गेय) कथा संकलित केल्या, त्यामुळे व्यास लोकगीते संकलित करणार नाहीत असे म्हणणे आश्चर्यकारक वाटते.

’पुराण' ह्या शब्दाचा एक अर्थ आहे पुरातन, जुना इतिहास. पुराणेदेखील व्यासांनी संकलीतच केली. निर्माण केली वा रचली नाहीत. आणि सूताकडून ऐकीव तर मुळीच नाहीत. ह्या ऐकीव कथा असत्या तर त्यांचे ज्ञानेश्वर महाराज 'अष्टादश पुराणे । तीची मणिभूषणे ॥' तसेच तुकोबाराय 'पुराणांचा इतिहास । गोड रस सेविला ॥' अशा शब्दात कौतुक करतील असे वाटत नाही. सर्वच्या सर्व पुराणे विष्णु, शंकर वा ब्रह्मदेव यांच्याकडून परंपरेने एकाने दुसर्‍याला अशा साखळीने व्यासांपर्यंत आलेली आहेत. (आणि तसे पुराणांतून उल्लेख आहेत). रोमहर्षण सूत हा व्यासांचा प्रख्यात शिष्य होता. सर्व पुराणे व्यासांकडून सूतास आली. 'प्राप्य व्यासात् पुराणानि सुतो वै रोमहर्षणः ।' (अग्निपुराण २७१) ; 'प्रख्यातो व्यासशिष्योभूत् सूतो वै रोमहर्षणः । पुराणसंहितां तस्मै ददौ व्यासो महामुनिः ॥' (विष्णु ३-६-६). इथेही 'पुराणसंहिता' म्हटले आहे. व्यासांनी वेद प्रसाराचे कार्य सुमंतु, जैमिनी वगैरेंना वाटून रोमहर्षणाकडे पुराणप्रसाराचे कार्य सोपवले. कारण त्याच्याकडे शुचि, रागद्वेष विहीन, निःस्वार्थी, वक्ता, साहित्य व शास्त्र यांत निपुणता, संगीत जाणणारा, मधुर कंठ असलेला, सर्गविसर्गादि जाणणारा हे सर्व गुण होते. अर्थात् आपल्यापर्यंत पोचलेल्या पुराणांतून बराच भाग प्रक्षिप्त आहे असेही काही पूर्वासुरींचे म्हणणे आहेच. इतिहास म्हणजे घडलेल्या वृत्ताचे चित्रण लोकांपुढे ठेवणे, त्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी न देणे हे तत्त्व वेदव्यासांनी मोठ्या कसोशीने पाळले ह्याबद्दल मतभेद आढळत नाहीत. कोणत्याही पात्राला अकारण धीरोदात्त स्वरूप दिले असे आक्षेप कुठे दिसत नाहीत. व्यासांनी स्वतंत्र रचलेले ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्र, पातंजल योगसूत्र भाष्य वगैरे. त्यांनी लोकगीते संकलित केली नाहीत हे माझे मत.

मला म्हणायचे होते ते ऋचा गूढ का असाव्यात ह्यासंबंधात. ज्यांचा अर्थ लावण्याकरिता शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त इत्यादि शास्त्रे निर्माण व्हावीत ती ऋचा/सूक्ते गूढ वाटली असावीत म्हणून. लोकगीते अर्थवाही आहेत, पण त्यांची बरोबरी वेदसूक्तांशी करता येणार नाही. गायत्री मंत्र, पुरुषसूक्त, रुद्रसूक्त, गीत रामायण, तुलसी रामायण, भावगीते, अभंग हे सर्वच ’श्रृति' म्हणायचे तर 'कजरा रे, कजरा रे' देखील श्रृतीच म्हणावे लागेल.

एकोहम्

शुद्धिपत्र

एकोहम् महोदय,
ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन अणि अमिताभ बच्चनचे, शंकर-एहसान-लॉय यांनी संगीत दिलेले गीत 'कजरा रे कजरा रे' (संस्कृतः कज्जलम् रे कज्जलम् रे) असे नसून 'कजरारे कजरारे' (संस्कृतः कज्जलिते कज्जलिते) असे आहे.
कजरारे कजरारे तेरे प्यारे प्यारे नयना....हिन्दी
कज्जलिते कज्जलिते तव सुन्दरप्रेमलनयने ! ....संस्कृत

वृक: चा अर्थ...

शब्दकोशात जो मिळतो तो 'लांडगा, तरस, कोल्हा, कावळा, घुबड, उंदीर, अनेकांचे मिश्रण, क्षत्रिय' आदी दाखवितो. या अर्थी वृकः पदाचा विचार करता, तसेच 'निचाय्य' म्हणजे 'संचय' हा अर्थ लक्षात घेतल्यास 'अभद्र पशूंचा कळप' असा अर्थ घेता येईल. मग ऋचेतील पदांचा अन्वय ' उज्जीहिते अरुणो पथायन्तं तष्टेव पृष्ठयामयी वृक: निचाय्यां मा सकृत् ददर्शहि' असा घेऊन 'हे उदयाचली येणार्‍या अरुणा, मार्गावर आलेल्यांना (आम्हाला त्या) कुबड्या पाठीच्या अभद्र पशूसमूहाचे दर्शन कधीच होऊ देऊ नकोस्' अशा प्रकारे अपशकुनापासून दूर् ठेवण्यासाठी अरुणाची केलेली ही प्रार्थना असावी, असा घेता येईल. (अरुण हा गरुडाचा भाऊ (वैनतेय) असून पायाने पंगु जरी असला तरी तो सूर्याचा सारथी आहे. )
मला संस्कृत येत नाही, पण ऋचेचा दिलेला अर्थ तसेच शब्दकोशात मिळणारे शब्दार्थ पाहायचे आणि मग त्या भांडवलावर स्वतःला पटणारा अर्थ हुडकणे असा कांहीसा प्रयास मी करतो, एव्हढेच. त्यामुळे मी लावलेला अर्थ चुकीचा असणेही शक्य आहे. त्याबद्दल अगोदर क्षमा मागतो.
मुद्गल यशवंत , २७.६.१०

 
^ वर