छायाचित्रकला-६

प्रकाश योजना
छायाचित्रकलेतला सर्वात महत्वाचा भाग छाया-प्रकाश. याचे दोन भाग म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम.
नैसर्गिक प्रकाशात फ़ार फ़रक करणे शक्य नसते. उदा. दुपारचे कडक ऊन. आकाशात सावलीकरता ढग आणणे शक्य नसते. अशा वेळी आपण थोडासच बदल करू शकतो. पण छायाचित्रात त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. दुपारी काढलेल्या फ़ोटोत चेहरा काळपट येतो. फ़्लॅशचा उपयोग रखरखीत उन्हात करावा असे आपल्या मनात येणे अवघड आहे पण इतर भागात फ़रक न पाडता चेहरा उजळ होऊन जातो. भिंतीसमोरील फ़ुलाचा फ़ोटॊ काढताना मागील भिंत भगभगीत दिसते. बरोबर कोणी असेल तर त्याला भिंतीच्या थोड्याशा भागावर सावली करावयास सांगणॆ सोपे आहे. दर वेळी जमेलच असे नाही पण प्रयत्न करून बघावयास हरकत नाही.ल्क्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे फ़ार त्रास न घेता असलेल्या प्रकाशात बदल करणे शक्य आहे का याचा विचार करण्याची सवय लावून घ्यावी. काही दिवस जाणीवपूर्वक काम केले की नंतर ते आपोआपच होऊन जाते.प्रथम घराबाहेरील चित्रणाबद्दल बघू.
१] डिजिटल कॅमेऱ्याला लेन्स हूड लावणे कटकटीचे असते.शक्य असेल तर लेन्सवर ऊन येऊ नये म्हणून कॅमेऱ्यावर सावली पाडावयाचा प्रयत्न करा. फ़्लेअर येत नाही.
२] शक्य असेल तर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत फ़ोटोमध्ये सूर्य येणार नाही याची काळजी घ्या. फ़ोटोतील सर्वच रंग बदलतात. [हा नियम Arctic circle पलीकडे लागू नाही] सूर्य जर डोळ्याला त्रासदायक वाटत असेल तर तो फ़ोटोत न येणेच चांगले. पूर्वी लेन्सच्या पुढे Neutral Density/ Polarising Filter लावता येत. दुपारी ४ वाजता काढलेला फ़ोटो
चांदण्यात काढला आहे असा भास करता येई.[ माफ़ करा, असे उल्लेख आले की नॉस्टेल्जिआ म्हणा आणि दुर्लक्ष करा. अजून काहीजण फ़िल्म कॅमेरा वापरत असतील तर त्याना याचा उपयोग होऊ शकेल व मला खात्री आहे की थोड्या दिवसात या सोयी डिजिटलमध्येही मिळू लागतील.]
३] तुमच्या कॅमेऱ्याला ऍडॅप्टर मिळत असेल तर थोडा खर्च करून घ्याच व जमेल तसतसे फ़िल्टर खरेदी करा. N.D. व Polarising हे पहिले दोन.भगभगीत ऊन कमी करावयास अती फ़ायदेशीर.
४] एक फ़ुल्स्केप पांढरा कागद घडी घालून जवळ ठेवलात तर त्याचा reflector म्हणून उपयोग होतो. सावलीच्या बाजूचा काळेपणा कमी करावयास एवढा कागद पुरेसा होईल.
५] सूर्याकडे [किंवा प्रकाशाकडे] तोंड करून फ़ोटो काढू नये हा जूना नियम मीटरींगच्या सोयींमुळे जवळजवळ बाद झाला आहे..
६] बाह्य चित्रकलेत झूमचा उपयोग अपरिहार्य आहे. वाईड्पासून सुरवात करून टेली पर्यंत झूम करा व नंतरच कुठल्या फ़ोकल लेन्ग्थचा उपयोग करावयाचा ते ठरवा.शंका वाटत असेल तर थोडी वाईड फ़ोकल लेन्ग्थ वापरावी व नंतर crop/enlarge करावे. लक्षात ठेवा : वाईड्ची टेली करता येते,उलटे नाही.हे इथे सांगावयाचे कारण फ़ोकल लेन्थ प्रमाणॆ प्रकाश बदलतो.
७] सिल्हौट फ़ोटोग्राफ़ी तशी कमी उपयोगात आणली जाते.सकाळ-संध्याकाळी निसर्गचित्रे व इमारतींचे फ़ोटो काढताना याकडेही ध्यान द्या. मुद्दाम कमी एक्स्पोझर दिल्याने काय होईल हे फ़ोटो काढून बघा.[ डिलिट लगेचही करता येते.] चार फ़ोटो पहाताना अशी चित्रे जास्त लक्ष खेचून घेतात कारण माणसाचा मेंदू काळ्या रंगातले details मनात शोधू लागतो.
८] सकाळ-संध्याकाळचे रंग एक्स्पोझर १/३ किंवा२/३ ev कमी-जास्त करून बदलता येतात. कसे बदलतात ते स्वत: शोधून बघा. कारण याबद्दल सूत्र नाही.
९] फ़ार ढगाळ वातावरणात फ़्लॅशचा वापर बेशक करा. विशेषत: ५-६ मीटरच्या आतले फ़ोटो काढताना.घराबाहेर, दिवसा फ़्लॅश वापरावयास बंदी नाही.
घरातील फ़ोटो
घरात एखादे कार्य असेल तर अशावेळी आपणास प्रकाश योजनेकरिता वाव नसतो. लुडबुड चालवून घ्रेतात हेच नशिब. पण इतर वेळी प्रकाश योजनेकडे लक्ष देण्यास विसरू नका.
प्रकाश नैसर्गिक आहे, दिव्याचा आहे, ट्युबचा आहे हे फ़ोटो काढण्यापूर्वी बघा. W.B.करता काही बदल करणे गरजेचे आहे का याचा विचार करा.व्यक्तीचित्र [portrait] काढताना शक्य तो नैसर्गिक प्रकाश वापरावा.खिडकीतून येणारा प्रकाश उत्तम. हा थोडासा तिरपा असेल तर छानच. चेहऱ्याची सावलीकडची बाजू काळजीपूर्वक बघावी.वर सांगितल्याप्रमाणे पांढरा कागद
[वा चादर] उपयोगी पडतो. रिफ़्लेक्टर पांढराच पाहिजे असे नाही, प्रकाश कमी करावयास काळाही चालतो. बाहेरून येणारा प्रकाश [ऊन] कमी करण्यास विरविरित पांढरे कापड वापरा.
फ़्लॅशचा उपयोग किमान करावा. प्रकाश कमी असेल स्टॅंड वापरा, तो नसेल तर कॅमेरा स्टूलावर ठेवा व self timer वापरा. फ़्लॅशबद्दल माझी ठाम मते आहेत, ती पुढील लेखात.
समित्पाणी

लेखनविषय: दुवे:

Comments

नेहमी प्रमाणे

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख. :)





फ्लॅशबद्दल चांगली माहिती

मागून उजेड येत असेल (बॅकलिट) अशा फोटोसाठी फ्लॅश अत्यंत उपयोगी असतो - चांगली माहिती दिलीत. रोजच्या छायाचित्रणाकरिता उपयोगी पडेल अशी माहिती आहे.

उत्तम

सिल्हौट फोटोग्राफी हा एक आवडीचा विषय आहे..
आपल्या मुद्देसूद मार्गदर्शनामुळे काही गोष्टी चटकन लक्षात राहत आहेत. जसे की: फ़ोकल लेन्थ प्रमाणॆ प्रकाश बदलतो.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

 
^ वर