छायाचित्रकला-५

मीटरिंग
लेन्समधून फ़िल्मवर पडणारा सर्व प्रकाश मोजण्याचे काम सेन्सर करतो.व त्याप्रमाणे स्पीड व ऍपर्चर किती असावे ते ठरवतो. अशावेळी संपूर्ण प्रकाश भागिले संपूर्ण आकारमान असा हिशोब केला जातो.[मल्टिपल मीटरिंग] आणि काही वेळी हा चूकीचा ठरतो. उदा. खोलीतून खिडकीजवळून काढलेला बाहेरचा फ़ोटो.खिडकीतून येणारा प्रकाश इतका जास्त असतो की त्याच्या हिशोबाने काढलेल्या सरासरीमुळे खोलीतला सर्व भाग काळपट होतो. किंवा झाडाच्या सावलीतल्या माणसाचा फ़ोटो काढताना बाहेरच्या रखरखीत उन्हामुळे सेन्सर फ़सतो व चेहरा काळपट येतो.हे सुधारण्याकरिता मीटरिंगमध्ये निरनिराळे फ़रक करण्यात आले. ’ सेंटर मीटरिंग,स्पॉट मीटरिंग ’ वगैरे.सेंटर मीटरिंगची कल्पना अशी की साधारणत : चित्रातील महत्वाचा भाग मध्यभागी असतो, तेथील मोजमाप बरोबर करावयाचे व कडेचे थोडे कमी-जास्त झाले तरी चालवून घ्यावयाचे.
स्पॉट मीटरिंगमध्ये तुम्ही कोणता भाग महत्वाचा ते ठरवता,सेन्सर त्या भागातल्या प्रकाशाप्रमाणे मोजमाप घेतो. मगाचचे उदाहरण घेतले तर सावलीतल्या माणूस बरोबर एक्स्पोज करता येईल.[त्यामुळे झाडाबाहेरची जमीन, आकाश वगैरे थोडे जास्त एक्स्पोज होईल.] पण आपले काम होते. माणूस महत्वाचा.सगळ्या कॅमेऱ्यांमध्ये एवढ्या सोयी असतातच. काहींमध्ये अधिक.मॅन्युअल्मध्ये जास्त माहिती दिलेली असेल. इथेही सरावाचा फ़ायदा होतो. वेळ असेल तेंव्हा , bracketing च्या वेळी सांगितल्याप्रमाणे
मीटरिंग बदलून फ़ोटो काढावेत व काय फ़रक पडतो त्याचा अभ्यास करावा. हळूहळू व्ह्यू फ़ाईंडरमधे पाहिल्याबरोबर लक्षात येते की कोणते मीटरिंग वापरावे. व्यक्तीचित्रे काढतांना सावलीच्या बाजूकडे विशेष ध्यान द्यावे. "प्रकाशयोजना"वर लिहताना यावर जास्त जोर देईनच.

ISO किंवा Sensitivity
फ़िल्मच्या संबंधात आपण ISO ची माहिती घेतली होती.प्रकाशाचा फ़िल्मवर होणारा परिणाम मोजण्याचा निर्देशांक म्हणजे ISO. याचे ६४/८०/१००/२००/४००/८०० इत्यादी प्रकार. यातील निरनिराळे प्रकार केंव्हा वापरावयाचे व त्यांचे फ़ायदे-तोटे बघताना
कमी क्रमांक......जास्त प्रकाशाची गरज .... कमी ग्रेन्स .....मोठी एन्लार्जमे सोपी
जास्त क्रमांक ... कमी प्रकाश चालतो..... जास्त " ..... " " अवघड
नेहमीच्या वापराला १००वा२००, कमी उजेडात ४००, असा ठोकताळा पाहिला.
डिजिटल फ़ोटोग्राफ़ीत सर्व साधारण हे नियम पाळावेत पण काही महत्वाचे फ़रकही लक्षात ठेवावेत.
१] पूर्वी ISO बदलावयाचा म्हणजे फ़िल्मच बदलणॆ किंवा special processing, डिजिटलमध्ये प्रत्येक फ़ोटोकरिता ISO बदलता येतो, विनासायास.उजेड कमी आहे असे वाटले तर १/३० सेक. स्पीड ठेवण्या ऐवजी ISO बदला.१०० ऐवजी खुशाल २०० किंवा ४०० करा. आपल्याला पाहिजे तो स्पीड किंवा ऍपर्चर येण्याकरिता ४०० पर्यंतचा कोणताही ISO निवडण्यास हरकत नाही. याचे कारण असे की फ़िल्मसारखे इथे आकार वाढवावयास अडचण येत नाही.आपणास साधारणत: १०"X१२" पेक्षा मोठा फ़ोटो लागत
नाही.तेवढे एन्लार्जमेन्ट आरामात मिळते.
२] फ़िल्मवर ग्रेन्सचा त्रास व्हावयाचा. फ़ोटो रफ़ दिसावयाचा. डिजिटलमध्ये याचा समांतर भाग म्हणजे Noise. म्हणजे काय ? प्रकाशाचे किरण ccd वर पडले की ते सिग्नल पाठवतात. त्यांनी आपणाला चित्र मिळते. ISO वाढवला की या सिग्नल्सबरोबर नको असलेले फ़ालतू सिग्नल्सही तयार होतात.त्यांच्यामुळे नसलेले रंगही चित्रात येतात. पण गंमत म्हणजे हे जास्तकरून चित्राच्या DARK भागातच येतात.उदा. तुम्हाला काळ्या रंगात थोडासा निळसर रंग दिसण्याची शक्यता असते. नेहमी होईलच असे नाही. आणि
सगळ्याना तो दिसेलच असेही नाही. उपक्रमवरील एका छायाचित्रावरील टीकेत दोघांची निरनिराळी मतेही दिसली.यात चूक-बरोबर असे काही नसते. आपल्याला आवडते ते खरे. हललेल्या चित्रापेक्षा थोडासा नॉइज परवडला.
३] माझ्या कॅमेऱ्यात १२०० ते पार ३२०० पर्यंत ISO सेटिंग करता येते.जे वापरताच येणार नाही असे कोण कशाला तयार करेल ? गरज पडली तर पोस्ट प्रोसेसिंगमध्ये नॉइज कमी करता येतो.

White Ballance, Colour Temperatrure वगैरे
फ़ोटो निनिराळ्या वेळी घेतले जातात.सकाळी, दुपारच्या उन्हात, संध्याकाळच्या तांबूस प्र्काशात, फ़्लॅश वापरून, घरात बल्ब किंवा ट्युबच्या प्रकाशात फ़ोटो काढतो तेंव्हा प्रत्येक वेळी प्रकाशाची जात निराळी असते. स्वच्छ पांढरा कागदसुध्दा वेगळ्या वेगळ्या रंगाचा वाटतो. हा रंगातील फ़रक सुधारून घेण्यासाठी कॅमेऱ्यात सोय असते. सर्वसाधारपणे उन्हाची वेळ नेहमी लागणारी धरली जाते व इतर प्रकारांकरता निरनिराळी सेटिंग्ज असतात. उदा. बल्बच्या प्रकाशात काढलेल्या फ़ोटोवर पिवळ्सर झाक येते. ढगाळ वातावरणात किंवा ट्युबलाईटच्या प्रकाशात निळसर झाक येते. योग्य सेटिंग्ज वापरली तर ही झाक टाळता येते.स्वत:च्या कॅमेराचे मॅनुअल वाचा. कलर टेंपरेचर म्हणजे प्रकाशाच्या स्त्रोताचे ऍबसोल्युट टेम्परेचर. काही ठिकाणी याचा उल्लेख असतो. चुकून झाक आलीच तर फ़ोटोशॉपमध्ये ती काढून टाकता येते.
पुढील लेखात "प्रकाशयोजना ".
समित्पाणी

समित्पाणी

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त भाग

सुरेख माहिती.
मॅट्रीक्स, सेंटर व स्पॉट मिटरींग बद्दल अजून काही माहिती, थोडी उदाहरणे सांगू शकाल का?
उदा: १. झुडपात बसलेल्या पक्ष्याचा फोटो काढताना कुठले मिटरींग वापरावे?
२. फुलांचे मॅक्रो फोटो काढताना कुठले बदलावे/बदलावे का?

-
ध्रुव

मीटरींग

मीटरींग बद्दल छान माहिती दिलीत. आपण ज्या वस्तूचा/वास्तूचा/व्यक्तीचा फोटो काढत आहोत त्याच्या मागे जर सूर्य असेल तर कायम घोळ होतो. मी एकदा एकाच ठिकाणी कॅमेरा ठेवून स्पॉट मीटरींग आणि ऑटो असे दोन फोटो काढले. आणि दोन्ही इंपोज केले. त्यामुळे एका फोटोतले सुंदर मंदीर(स्पॉट) आणि दुसर्‍यातले निळे आकाश(ऑटो) एकाच फोटोत आले. (दुर्दैवाने तो फोटो इमेल गर्दीत हरवला :-( )

कलर टेंपरेचर कडे किती लक्ष द्यावे? की आपण लक्ष देऊन काही फायदा होत नाही?

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

उत्तम...

शरदराव, हा लेख छान झाला आहे. बरीच नवीन माहिती सोप्या शब्दात कळाली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता वेगवेगळे मीटरिंग वापरून जरा सराव करावा म्हणतो.

अभिजीत, सूर्य मागे असण्याचा प्रकार माझ्या बाबतीत समुद्रकिनार्‍यावर खूप वेळा होतो. पण तुम्ही दोन्ही छायाचित्रे इंम्पोज केली म्हणजे काय केले? आणि एका फोटोतले सुंदर मंदीर(स्पॉट) आणि दुसर्‍यातले निळे आकाश(ऑटो) एकाच फोटोत आले म्हणजे काय?

-सौरभदा

==============

"If you are patient in one moment of anger, you will escape a hundred days of sorrow."

-- Chinese Proverb

सहमत आहे

लेख आवडला. बरीच माहिती कळत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर