महाराज, बुवा, संत इत्यादी

बुवा, महाराज,स्वामी इत्यादी

मी लहानपणापासून विद्यार्थीच राहिलो.जिथे जिथे जी जी माहिती मिळाली ती ती गोळा करत राहिलो. विज्ञान, साहित्य, धर्म,संगीत.चित्रकला, फ़ोटोग्राफ़ी सर्वात मांजरीच्या पिल्लाप्रमाणॆ ,कुतुहलाने डोकावत राहिलो. जमा काय झाले ते सोडून देऊ, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मार्कंडॆय़ाएवढे आयुष्य मिळाले तरी आपणाला माहित नाही असे बरेच काही राहून जाणार आहे. थोडक्यात,’ ही गोष्ट शक्य नाही, सगळे बुवा भोंदू असतात, हे असेच असते’ अशा प्रकारची विधाने करणे चूक आहे एवढे नक्की पटले. माझ्यापुरते उपनिषदातील पुढील विधान स्विकारणीय आहे. " जो कळले म्हणतो त्याला कळलेले नसते .......... " ही वैयक्तिक माहिती [ज्यात कुणालाच इन्टरेस्ट असावयाचे कारण नाही ] कशाकरिता ? तर, मला आज जे लिहावयाचे आहे त्यावरील प्रतिसादातून मला काही ज्ञान मिळेल, एका निराळ्या विषयावरील अनेकांची मते, अनुभव कळतील एवढीच अपेक्षा. विषय आहे बुवा महाराज,स्वामी इत्यादी.
ऐतिहासिक काळातील संत ज्ञानेश्चर, तुकाराम, कबीर यांचे वाड्मय वाचल्यावर मनाला वाटले की यांनी जे लिहले आहे ते लोककल्याणाकरिताच असावे. यात त्यांचा वैयक्तिक लाभाचा विचार नसावा. त्यांच्या आयुष्यातील चमत्कार सोडूनही ते महान होते.. आजच्या काळातही गोंदिवलेकर महाराज, गाडगे महाराज ही त्या श्रेणीतील माणसे..त्यांच्यावर विश्वास ठेवावयास हरकत नाही. आपल्या तुटपुंज्या ज्ञानावर फ़ार भार देण्याऐवजी हे रास्त.

हल्ली महाराज,बुवा, स्वामी फ़ारच वाढलेले दिसतात. पूर्वीही असतील पण वर्तमानपत्रे,दूरदर्शन यांच्यातील प्रसिध्दीमुळे हे रोज़च डोळ्यासमोर येऊ लागले आहेत.त्यातील बातम्यांमुळे मनात एक प्रश्नांचे मोहोळ उठले.इतके महाराज, बुवा देशात आहेत
[१] त्यामधील [चांगले-वाईट म्हणत नाही]योग्य-अयोग्य कोण,
२,] त्यांची पात्रता कोणी व कशी ठरवावयाची,
[३] त्यांची अध्यात्मिक पातळी काय असते,
[४] लोक त्यांच्याकडे कशाकरता जातात,
[५] लोकांना त्यांचा फ़ायदा होतो का,
[६] लोक त्यांचासमोर पैसे ठेवत असतील तर लुबाडणे म्हणावे का,
[७] जर सर्वाधिक लोक संसारातील अडचणी सोडवावयाला जात असतील तर महाराजांना समुपदेशक समजावे का,
[८] महाराजांचे महत्वाचे काम तेच असेल तर दहा पैकी फ़क्त दोघांचे प्रश्न सुटले तरी त्यांची उपयुक्तता मानावी की नाही, आणि
[९] या सर्वांना शिव्या घालणाऱ्यांकडे दुसरा पर्याय काय आहे, असे अनेक प्रश्न उभे रहातात.
या सर्वांचा अभ्यास केलेला नसल्याने त्यांची उत्तरेही मिळालेली नाहित. सर्व माहिती, वाचलेली, ऐकलेली. आपण तर एकाही महाराजाकडे गेलो नाही, मग आपण कसे काय ठरवणार की य महाराज, क्ष बुवा किंवा ज्ञ बापू कसे आहेत ? हे ज्ञानही परोक्ष मिळवावे लागणार. कशी मिळेल ही माहिती ?
हा प्रश्न अचानक सुटला.एका नवीन मित्राची ओळख झाली. विज्ञानशाखेचे निवृत्त प्राध्यापक.बऱ्याच सार्वजनीक कार्यात निरलसपणॆ भाग घेणारे. त्यांचा " अशा " लोकांशी बऱ्यापैकी संकर्प. त्यांना सरळ विचारले, " तुम्ही एखादा माणुस अध्यात्मात पुढे गेला आहे, तो महाराज म्हणवून घेण्यास योग्य आहे हे कशावरून ठरवाल ? तुमचा अनुभव काय ? " त्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तर दिले. इतके सरळ, स्वच्छ उत्तर मिळेल याची अपेक्षाच नव्हती. ते म्हणाले " ह्याचे उत्तर तुम्हाला मिळालेला अनुभव व अनुभुती यावरूनच ठरवावे लागेल. अनुभुतीबद्दल सांगणे अनुचित ठरेल, मी माझ्या अनुभवापुरते बोलतो. " तुम्ही कुणाही माणसाकडे गेलात तर काहीही बोलाचाल न होता देखील पहिल्या ५ मिनिटात
१] तुम्हाला त्याच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचे प्रेम दिसले पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले पाहिजे,
२] तुमच्या मनांत शांती दाटून आली पाहिजे,
३] तुम्हाला आंतरिक आनंदाची प्रचिती आली पाहिजे,
असे घडले तर तो " तुमचा " महाराज. तीच व्यक्ति दुसऱ्या माणसाबाबत ’ महाराज ’ असेलच असे नाही. "
संपले ! आता इतरांनी काय लिहले आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. पण तोपर्यंत आपण काय म्हणता ? एखादा माणुस ’ महाराज ’ होण्याकरिता एवढ्या तीन गोष्टी पुरेशा आहेत का ? मला येथे ’महाराज ’ म्हणजे जो लोकांना मार्गदर्शन करू शकेल, जीवनात भेडसावणाऱ्या अडचणींमध्ये दिलासा देऊ शकेल, शास्वत काय आणि अशास्वत काय किंवा उपनिषदांच्या भाषेत
बोलावयाचे म्हणजे श्रेयस काय आणि प्रेयस काय यांतील भेद सर्वसामान्याला कळेल अशा भाषेत सांगू शकेल असा माणूस.मग भले तो तुम्हाला अध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन करणारा असो वा सासंरीक अडचणीत मदत करणारा. तुम्ही तुमची व्याख्या ठरवा. या तीन गोष्टींमधून काय गाळावे,काय मिळवावे ? की मी म्हणतो तसा ’महाराज ’ कोणी नसतोच किंवा समाजाला त्यांची गरजच नाही .नक्की काय ?
समित्पाणी

लेखनविषय: दुवे:

Comments

विवेकवाद

नी र वर्‍हाडपांडे यांच्या विवेकवाद या पुस्तकातील हे प्रकरण पहा.

nr 154
nr 155
nr 156
nr 157
nr 158
nr 159

प्रकाश घाटपांडे

पाच मिनिटांची चाचणी

पाच मिनिटांची ही चाचणी कितपत योग्य आहे याविषयी शंका आहे. अनेक महाराजांच्या आणि संतांच्या (म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वरांसारखे नव्हेत तर आपला शिष्यसंप्रदाय असलेले लोकांच्या व्यावहारिक, पारमार्थिक समस्या सोडवणारे) कथा वाचल्या तर त्यात त्यांनी नव्या भक्तांची प्रथम परीक्षा घेतल्याचे प्रसंग आहेत. किंवा सुरुवातीला तुसडेपणा इ. केल्याची उदाहरणे आहेत त्यामुळे कितीही 'चांगले' (?) महाराज असले तरी पहिल्या पाच मिनिटात त्यांचे पडणारे इंप्रेशन चांगले असणार नाही.

That guy impressed me and I am not easily impressed. Wow. A *blue car*.
-Homer Simpson

माझी उत्तरे

प्रकाश घाटपांड्यांचे स्कॅन नेहमीप्रमाणेच उत्तम. असे तय्यार कसे असते ते मात्र कळत नाही. ;-)

[१] त्यामधील [चांगले-वाईट म्हणत नाही]योग्य-अयोग्य कोण,
योग्य-अयोग्य या सापेक्षतावादी कल्पना आहेत. ज्याला जे योग्य, हिताचे, फायद्याचे वाटते तो त्या व्यक्तिला आपला गुरू बनवतो.

[२] त्यांची पात्रता कोणी व कशी ठरवावयाची,
उत्तर वरीलप्रमाणे. पात्रता ही आपल्या हिता, फायद्यानुसार ठरवली जाते.

[३] त्यांची अध्यात्मिक पातळी काय असते,
अध्यात्मिक पातळी असणे म्हणजे काय हेच मला माहित नाही त्यामुळे हे उत्तर देण्यास असमर्थ आहे.

[४] लोक त्यांच्याकडे कशाकरता जातात,
आपल्या देशात समुपदेशनाला महत्त्व प्राप्त झालेले नाही म्हणून.

[५] लोकांना त्यांचा फ़ायदा होतो का,
असे त्यांना वाटते म्हणूनच जात असावेत. चमत्कार घडून फायदे होत नाहीत असे वाटते पण आपले काम झाले तर श्रेय गुरूला नक्कीच जात असावे.

[६] लोक त्यांचासमोर पैसे ठेवत असतील तर लुबाडणे म्हणावे का,
हो. पैसे हे चलन आहे. विनिमयाची गोष्ट. जितके पैसे देऊ तितका त्याचा मोबदला मिळायला हवा. तो जर मिळत नसेल तर मला हे लुबाडणे वाटते.

[७] जर सर्वाधिक लोक संसारातील अडचणी सोडवावयाला जात असतील तर महाराजांना समुपदेशक समजावे का,
समुपदेशक आपल्या प्रत्येक क्लायंट बरोबर वेळ निश्चित करून त्याच्या अडचणी समजावून घेऊन, नोंदी करून, तो विदा भविष्यात वापरून, क्लायंटच्या अडी-अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला अशी वागणूक देत असतील तर अवश्य त्यांना समुपदेशक समजावे.

[८] महाराजांचे महत्वाचे काम तेच असेल तर दहा पैकी फ़क्त दोघांचे प्रश्न सुटले तरी त्यांची उपयुक्तता मानावी की नाही, आणि
पुन्हा उपयुक्तता ही सापेक्ष आहे. समुपदेशकही पैकीच्या पैकी क्लायंट्सचे प्रश्न सोडवू शकत नाही परंतु प्रत्येक क्लायंटकडे दिलेला वेळ पाहता तो अधिकांचे प्रश्न सोडवत असावा असे मानण्यास जागा आहे.

[९] या सर्वांना शिव्या घालणाऱ्यांकडे दुसरा पर्याय काय आहे, असे अनेक प्रश्न उभे रहातात.
हो, त्यांच्याकडे न जाता आपल्याकडील आणि आपल्या माणसांकडील सारासार बुद्धीचा वापर करून प्रश्नांवर तोडगे काढण्याचा.

मला काय वाटते...

सर्व प्रथम चर्चेच्या विषयाप्रमाणेच घाटपांडेसाहेबांनी चिकटवलेला लेख छानच आहे!

[१] त्यामधील [चांगले-वाईट म्हणत नाही]योग्य-अयोग्य कोण,
प्रियालीने म्हणल्याप्रमाणे हे सापेक्ष आहे. मला वाटते - ज्याला भेटल्यावर आपल्याला आनंद होऊ शकतो, कुठलीतरी मानसीक शांतता मिळाली असे "वाटू" शकते आणि जो आपल्याला लुबाडत नाही आहे (आणि हे ज्याचे त्याला समजायला हवे!) तो योग्य.

[२] त्यांची पात्रता कोणी व कशी ठरवावयाची,
पात्रता ही परत सापेक्षच आहे. एखाद्याला डोक्यातून घड्याळ काढून दिले तर महान वाटेल, एखाद्याला आयुष्य आधी भोग हे अतिस्पष्ट शब्दात सांगणारा योग्य वाटेल, कुणाला आंजारणारा/गोंजारणारा योग्य वाटेल - मला वाटते ते ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर आणि मानसिक जडणघडणीवर अवलंबून असते. (जसा स्वभाव जो ज्याचा, श्रद्धा त्याची तशी असे, श्रद्धेचा घडला जीव, जशी श्रद्धा तसाची तो || गिताई||)

पात्रता कोणी ठरवायची यावरून एक ऐकीव प्रसंग आठवला. गाडगे महाराजांचे कार्य आणि नाव नुकतेच जगापुढे येऊ लागले होते. त्यांचे साधू पुरूषासाठी असमान्य वर्तन ऐकून आणि ज्या प्रकारे लोकं त्यांच्या पाठी जात आहेत, हे पाहून आचार्य अत्र्यांना ते सारे थोतांड वाटले. त्यांनी अत्रे शैलीत गाडगे महाराजांवर टिका करणारा लेख लिहीला. पण नंतर त्यांची आणि गाडगे महाराजांची भेट झाली. त्यांना भेटल्यावर अत्र्यांनी लगेच लेख लिहीला, "आम्ही चुकलो!" अत्र्यांना बुवाबाजीचा राग असल्याने त्यांच्या हातून ही चूक घडली असावी. त्यांचा बुवाबाजीवरील "महाराष्ट्रातील भयानक बुवा!" म्हणून एक लेख मजेशीर आणि वाचनीय आहे. तो मी नव्हेच मधे त्यांनी ते पात्र अशंतः उभे केले आहे.
[३] त्यांची अध्यात्मिक पातळी काय असते,
हे म्हणजे स्वतः एस एस सी नाही आणि पिएचडीचा प्रबंध योग्य का नाही ह्यावर बोलण्यातला प्रकार आहे. (अर्थात सन्मान्य अपवाद सोडून ज्यांच्या कामावर लोकं पिएचडी करतात!).
[४] लोक त्यांच्याकडे कशाकरता जातात,
ह्या प्रश्नाचे साधे आणि सरळ उत्तर असे आहे की लोकं सायकॅट्रीस्ट/मानसोपचार तज्ञाकडे का जातात? अमेरिकेत तर हे प्रमाण जास्त आहे असे मला वाटते. (चू. भू. द्या.घ्या.) प्रत्येकाला कुठेतरी जाऊन मन मोकळे करायचे असते अथवा आपल्या वागण्याला अर्थ लावून अथवा अर्थाप्रमाणे वागणे बदलायचे असते. साध्या इंग्रजी भाषेत "काउन्सेलींग".
[५] लोकांना त्यांचा फ़ायदा होतो का,
वर म्हणल्याप्रमाणे "काउन्सेलींग"म्हणून पाहीले तर लक्षात येईल की त्याचा फायदा (जर तो बुवा/महाराज चांगला असेल तर्) होऊ शकेल त्यात आश्चर्य काहीच नाही. ख्रिश्चन धर्मात असे पाद्र्याला जाऊन व्यक्तिगत भेटणे अथवा तोंड न दाखवता एखाद्या गोष्टीचे "कन्फेशन" करणे हे आहेच. त्यातीलच हा प्रकार आहे. सामान्य माणूस अध्यात्मासाठी वगैरे काही जात नाही त्याला मन:शांती आणि वागण्याला जस्टीफिकेशन मिळण्यासाठी जातो - जरी तसे स्पष्टपणे डोक्यात वाटत नसले तरी.
[६] लोक त्यांचासमोर पैसे ठेवत असतील तर लुबाडणे म्हणावे का,
पैसे ठेवले तर लुबाडणूक कशी? ते मागत असतील ते पण काही तरी भय उत्पन्न करून तर ती लुबाडणूक ठरेल.

[७] जर सर्वाधिक लोक संसारातील अडचणी सोडवावयाला जात असतील तर महाराजांना समुपदेशक समजावे का,
तसेच काहीसे... वर आधी म्हणले आहेच.

[८] महाराजांचे महत्वाचे काम तेच असेल तर दहा पैकी फ़क्त दोघांचे प्रश्न सुटले तरी त्यांची उपयुक्तता मानावी की नाही,
एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाऊन जर कुणाला बरे वाटले आणि कुणाला नाही वाटले तर त्यातील जो काही फरक आहे इतकाच येथे वाटतो. "ऍनलाईझ् धिस" या विनोदी चित्रपटात, बिली क्रीस्टल हा मानसोपचार तज्ञ असतो. पण नवर्‍या बायकोच्या तंट्यांत एकमेकांशी प्रेमाने वागा आणि मग आपली पुढची अपाँइंटमेंट पुढच्या आठवड्यात असे सांगतो. दोघेही खूष होऊन बाहेर जातात. आता याला फसवणूक म्हणायची का "रिझल्ट ओरीयंटेड ट्रीटमेंट" म्हणायची हा ज्याचा त्याचा प्रश्न!

[९] या सर्वांना शिव्या घालणाऱ्यांकडे दुसरा पर्याय काय आहे, असे अनेक प्रश्न उभे रहातात.
एखादा महाराज/साधू/बुवा जर फसवत नसेल, पैसे उकळत नसेल, नको ते धंदे करत नसेल पण एकंदरीत चांगले वागा असा उपदेश त्याला अध्यात्मिक झालर लावून करत असेल तर काय फरक पडतो! त्याला शिव्या देण्याचे कारण नाही. प्रत्येक व्यक्ती कुठे न कुठे तरी कधी ना कधी तरी स्वतःला एकटे समजू शकते. त्यावेळेस जर त्या एकटेपणाला काय पर्याय शोधायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यात अध्यात्म येऊ शकते, कोणी घरातील अथवा मैत्रीतील अधिकारी व्यक्ती येऊ शकेल, कधी नुसतेच कुठले तरी पुस्तक असू शकेल वगैरे...

उ.दा. वरील, [९] संदर्भात

विनोबांनी गीताईच्या सुरवातीस म्हणले आहे ते त्यांना लागू आहे - गीताई माउली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी ||

अथवा

तुम्ही सुरवातीस उल्लेखलेल्या गोंदवलेकर महाराजांचे एक (त्यांच्या एका छोट्या पुस्तकात) वाचलेले वाक्य आठवले ज्यात कोणिही बसू शकते आणि स्वतःस पर्याय तयार करू शकते : आयत्या वेळेस आठवते, ती खरी साधना, प्रत्येकाची साधना वेगळी असते आणि शेवटी तिचाच त्याला उपयोग होतो...

लोक त्यांच्याकडे कशाकरता जातात ????????

१. शहरात एखाद्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणीतरी सांगावा लागतो. त्याचप्रमाणे ईश्‍वराचा पत्ता गुरुच सांगू शकतात.
२. स्वत:ला पोहता येत नसेल, तर नदीपार होण्यासाठी भोपळयाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे संसारसागर तरून जाण्यासाठी गुरुरूपी भोपळयाची आवश्यकता असते.
३. शिष्याला स्वत:च्या प्रयत्‍नांनी आपली उन्नती करून घेता येत नाही, असे नाही; पण चांगल्या गुरूंच्या उपदेशाने व मार्गदर्शनाने शिष्याचा आत्मोन्नतीचा मार्ग सुगम होतो. एक आगबोट एके ठिकाणी ४ तासांत जाऊन पोहोचत असेल, तर तिच्यामागे तिला दोरीने बांधलेली होडी चारच तासांत त्या स्थळी पोहोचते; पण ती होडी आगबोटीपासून वेगळी केली आणि एकटीच चालवण्यात आली, तर ती त्या ठिकाणी जाण्यास तिला १२ तास लागतील. आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात आपण स्वत:च प्रयत्‍न करू लागलो, तर आपल्यातील दोषांमुळे व चुकांमुळे आपली उन्नती होण्यास फार काळ लागतो; पण योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने १२ तासांचा मार्ग ४ तासांत आक्रमिता येतो. थोडक्यात म्हणजे `महाजनो येन गत: स पंथा: ।' (मोठी मोणसे ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने जावे.) या न्यायाने गुरूंकडे जावे.
४. ईश्‍वराकडे जाण्याचा मार्ग गुरूच सांगू शकतात
अ. आपल्या एका मित्राला भेटायला आपण त्याच्या गावात आलो; पण त्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणाला तरी विचारावा लागतो. त्याचा पत्ता कळल्यावर आपण ते ठिकाण शोधू शकतो. त्याचप्रमाणे `मी'चा म्हणजे आत्मारामाचा पत्ता गुरुच सांगू शकतात.
आ. आपण वाळवंटात वाट चुकल्यावर आपल्याला मार्गदर्शक वाटाड्या मिळाला नाही, तर इकडून तिकडे व तिकडून इकडे, असे भटकून आपण दमून जाऊ. अन्न-पाणी न मिळाल्याने आपण मरून जाऊ. त्याचप्रमाणे मार्गदर्शक गुरु भेटले नाहीत, तर आपल्यातील दोष आणि आपल्या हातून होणार्‍या चुका यांमुळे आपल्याला ८४ लक्ष योनींतून भटकत रहावे लागेल.
इ.
आपण मित्राला दूरध्वनी केला व तो लागला नाही, तर दूरध्वनीचालक आपल्याला दूरध्वनी लावून देतो. त्याचप्रमाणे आपला संपर्क देवाशी होत नसला, तर गुरु मधल्या अडचणी दूर करून आपला संपर्क देवाशी करून देतात. अडचणी कोणत्या ? आई-वडील, बंधू-भगिनी, पत्‍नी, संपत्ती या गोष्टी म्हणजे आपण व ईश्‍वर या मध्ये मायावी पडदाच आहे. या मोहपाशातून गुरु आपणास सोडवून देवाचे दर्शन घडवतात.
`जिज्ञासु : परमेश्‍वर व मी यांच्या ओळख-संबंधांत हा त्रयस्थ दलाल गुरु कशाला पाहिजे ?
प.पू. महाराज : हे पहा, साध्या व्यावहारिक गोष्टीतदेखील, ``हा रस्ता कोठे जातो ?'' यालादेखील मार्गदर्शकाची जरूरी लागते. व्यावहारिक शिक्षण देण्याच्या बाबतीतसुद्धा गुरुजींची जरूरी लागते. कोणीतरी उजेड दाखवावा लागतो. हीच गोष्ट परमेश्‍वराची ओळख करून देण्याच्या बाबतीत आहे.'

- आत्मप्रभा (ब्रह्मीभूत श्री गजानन महाराज, नाशिक यांचे पारमार्थिक विचार. पृष्ठ ५७)

गुरुपरीक्षा

या सर्व महाराजांची आणि मांची नोंदणी करावी. ते जी साधना करीत असतील ती केवळ स्वत:च्या तथाकथित उन्‍नती आणि मुक्तीसाठी की तिचा उपयोग ते इतरांसाठी करतात याची नोंद असावी. हे गुरू बोलतात, लिहितात की यांचा सर्व कारभार खुणांनी चालतो हेही नोंदवावे. यांच्याकडे येणार्‍या भक्तजनांच्या सामाजिक स्तराची, शैक्षणिक व आर्थिक पातळीची माहिती घ्यावी. यांनी दिलेल्या व्याख्यानांवर त्यांच्याशी चर्चा करून शंकांचे निरसन करता येते की नाही तेही पहावे. नुसतेच एकतर्फी प्रवचन असेल तर त्याचीही नोंद घ्यावी. हे जर कुणाचे प्रश्न सोडवत असतील तर ते प्रश्न आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक की मानसिक असतात हे जरूर पहावे. १०० पैकी ३५ लोकांचे प्रश्न हे सोडवू शकत असतील तर त्यांना गुरू म्हणून मान्यता मिळावी. यांना कार्यालय उघडायला, शुल्क गोळा करायला परवानगी आणि समुपदेशन करायचा परवाना द्यावा.
सरकारने किंवा एखाद्या बिनसरकारी संस्थेने हे काम करावे. जोपर्यंत ते होत नाहीत तोपर्यंत महाराजांच्या भेटीला जाणार्‍या व्यक्तींनी वरील मुद्दे विचारात घेऊन महाराजांना गुरुपदी बसवावायचे की नाही ते ठरवावे. नुसतेच डोळ्यांत पाहून काही समजत नसते.--वाचक्‍नवी

 
^ वर