मुशर्रफ यांची गच्छंती आणि त्याचे परिणाम

मुशर्रफ यांनी अखेर राजीनामा दिला आणि पाकिस्तानाच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला असे म्हणावे लागेल. गेली सात-आठ वर्षे त्यांनी पाकिस्तानात निरंकुश सत्ता चालवली. कणखर कमांडोची प्रतिमा असलेल्या मुशर्रफ यांची एक मुत्सद्दी राजकारणी म्हणूनही प्रतिमा बनली होती. मुशर्रफ यांच्या गच्छंतीवर वेगवेगळ्या क्षेत्रातून स्वाभाविकपणे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.

सर्वात लक्षवेधक टिप्पणी एनडीटीव्ही ने केली आहे "It is Musharraf's greatest paradox. He is trusted today by Washington, Beijing and New Delhi but not by his own countrymen." कारगिल प्रकरणामुळे मुशर्रफ यांची प्रतिमा भारतात सुरुवातीला मलिनच होती पण आतापर्यंतचे सर्वात 'सिन्सियर' आणि 'कमिटेड' पाकिस्तानी नेतृत्व असाच मुशर्रफ यांचा उल्लेख विश्लेषक करतात.

  • मुशर्रफ यांच्या जाण्याने भारतावर आणि दक्षिण आशियातील देशांवर काय परिणाम होतील?
  • पाकिस्तानातील अंतर्गत राजकारणाचे काय होईल?
  • मूलतत्त्ववादी पुन्हा डोके वर काढतील का?
  • 'वॉर ऑन टेरर' चे काय होणार?
  • मुशर्रफ यांचे काय होणार?

यावर आणि एकूणच मुशर्रफ यांच्या कारकिर्दीवर कृपया आपली मते/टिप्पणी द्यावीत.

लेखनविषय: दुवे:

Comments

मुशर्रफ

मला काय वाटते ते थोडक्यातः (बाकी येथे वाचा)

मुशर्रफ यांच्या जाण्याने भारतावर आणि दक्षिण आशियातील देशांवर काय परिणाम होतील?
मला नाही वाटत काही होईल. मुशार्रफ जेंव्हा सैन्यदल प्रमुख आणि नंतर राष्ट्राध्यक्ष होते तेंव्हाच जास्त कुरघोडी झाल्या होत्या. कार्गील, कंदहार प्रसंगातून सुटलेले अतिरेकी आणि त्यांना मिळालेला पाकीस्तानातील कथीत आश्रय, काश्मिरमध्ये वाढलेल्या कुरघोड्या वगैरे पहाता त्यांच्या असण्याचा भारताला फायदा झाला असे वाटत नाही. केवळ ९/११ मुळे अमेरिकेने दांडगाई करून "दहशतवाद" ह्या शब्दालापण सहाय्य करणार्‍यांना गुन्हेगार ठरवण्याइतपत परीस्थिती आणली आणि त्यात मुस्लीम राष्ट्रे आणि समुदाय अडकलेला असल्याने त्यांचे चाळे त्यामानाने कमी झाले. पण त्यांचा फायदा अमेरिकेस पण म्हणावा तितका झाला नाही तर नसण्याने तोटा होण्याचा संभव येत नाही.

पाकिस्तानातील अंतर्गत राजकारणाचे काय होईल?
नाही म्हणायला मुशार्रफनी जरा आर्थिक परीस्थिती बदलली. आज काही झाले तरी सामान्य पाकीस्तानी माणसाला कुठेतरी समजू लागले आहे की ६१ वर्षांनी आपण (पाकीस्तानी) कुठे आहोत आणि ते (भारतीय) कुठे आहेत हे. याचा थोडाफार परीणाम स्वतःचे राष्ट्र चांगल्यासाठी बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर चांगले होऊ शकेल. पण त्यासाठी प्रत्येक गोष्टीत भारताला मधे आणणे आणि त्याच्याशी तुलना तेथील बुद्धीवाद्यांना आणि राजकारण्यांना थांबवावी लागेल. तेच कठीण आहे कारण त्याच मुद्यावर त्यांची स्थाने आणि पर्यायाने पाकीस्तान टिकून आहे.

मूलतत्त्ववादी पुन्हा डोके वर काढतील का?
मुलतत्ववादी मुशार्रफच्या काळातपण होते आणि अजूनही रहाणारच. कारण अशंतः वर सांगितले ते आहे. अशंतः शिक्षण आणि अधुनिकीकरणाला असलेला विरोध आणि प्रांतिकतेपोटी असलेला विकासाचा आणि साधनसामुग्रीचा असमतोल हे पण कारण आहे.

'वॉर ऑन टेरर' चे काय होणार?
ते मुशार्रफमुळे चालू नव्हते आणि त्यांची प्रत्यक्ष काहीच मदत झाली नाही. शब्द बापूडे केवळ वारा अशी अवस्था होती. जो पर्यंत अमेरिकेच्या आणि पाश्चात्यांच्या मनात आहे तो पर्यंत 'वॉर ऑन टेरर' चालूच रहाणार. त्या निमित्ताने अतिशय मोक्याच्या जागी त्यांना बस्तान बसवून लक्ष ठेवता येत आहे - एकीकडे पाकीस्तानवर, दुसरीकडे चीन, तिसरीकडे इराण आणि मध्य आशिया - सर्वत्र लक्ष ठेवता येत आहे. कोण जाणे म्हणूनच ओसामा अजून मिळत नसेल :-उद्या मिळाला तर "वॉर ऑन टेरर" संपूनच जाईल की (हे माझे मत नाही पण अशा अर्थाचे मत ऐकले आहे... म्हणले तर लॉजिकल वाटते म्हणले तर इललॉजिकल..)

मुशर्रफ यांचे काय होणार?
काही का होईना... हू केअर्स. तरी देखील - त्यांची मांजरीसारखी निती लक्षात घेतली (उंचावरून खाली पडली तरी मांजर अंग चाटते, आजूबाजूला पहाते, म्यॉंव म्हणून ओरडते आणि चालू लागते - तसेच काहीसे) तर वाटते की आता ते सौदी अरेबियात रहातील. त्यांना कुठलीही निवडणूक लढवण्यापासून पाकीस्तानी संसद बंदी घालतील. कदाचीत ते एखादे पुस्तक लिहून अमेरिकेत प्रकाशीत करतील आणि हळू हळू बॉस्टन मधील आपल्या मुलाला पुढे करू लागतील. (निदान बॉस्टन मधे होता असे ऐकून आहे!)

सुंदर

प्रतिसाद.

धन्यवाद | काही इतर मुद्दे

विकासराव, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

आतापर्यंत मुशर्रफ हे एकच सत्ताकेंद्र चर्चेसाठी होते आता विसंवादी आघाडीमुळे पाकिस्तानातील खरे सत्ताकेंद्र कोणते हे भारताला शोधावे लागेल.

नुकत्याच सत्तेवर आलेल्या या पक्षांना पुढच्या दीर्घकालीन सत्तेच्या आकांक्षेने कट्टर भूमिका घ्यावी लागेल आणि भारताला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.

मुशर्रफ यांचे आतंकवाद विरोधी धोरण काही नसल्यापेक्षा चांगले होते. उदा. लाल मशिदीच्या प्रसंगात आतंकवादाविरुद्ध कारवाई करण्याविषयी कोणताही परकीय (म्हणजे अमेरिकन) दबाव नसताना त्यांनी कारवाई केली. या आणि अश्या इतर प्रसंगातून त्यांनी पाकिस्तानातील मूलतत्त्ववाद्यांचा रोष ओढवून घेतला. (आताच्या सत्ताधार्‍यांना निवडणुकीत मूलतत्त्ववाद्यांची मदत घ्यावी लागलेली असणार आहे. त्यांचा दबाव सरकारवर पडू शकतो.)

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुशर्रफ यांच्यामुळे काही वर्षे पाकिस्तानात राजकीय स्थैर्य होते. आता एकत्र असलेल्या पक्षांमध्ये मुशर्रफ विरोध वगळता काय सामाईक आहे? आता मुशर्रफ गेल्यावर तोही मुद्दा जाऊन मतभेद वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता भारताच्या फायद्याची नाही.

भारत-पाकीस्तान

नुकत्याच सत्तेवर आलेल्या या पक्षांना पुढच्या दीर्घकालीन सत्तेच्या आकांक्षेने कट्टर भूमिका घ्यावी लागेल आणि भारताला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. ...आता मुशर्रफ गेल्यावर तोही मुद्दा जाऊन मतभेद वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता भारताच्या फायद्याची नाही.

नवीनराव वरील मुद्यातील न पटणारी गोष्ट इतकीच आहे की यात आपण भारताला होणारा पाकीस्तान कडून होणारा त्रास/फायदा-तोटा या मुशार्रफच्या असण्या-नसण्यावर अवलंबून ठेवत आहात. वास्तवीक आपल्याला त्रास होत असला अथवा तोटा होत असला तर त्याला पाकीस्तानात कोण आहे या पेक्षा आपण कसे आहोत हे कारण आहे असे वाटत नाही का?

  1. ज्या मुशार्रफने लष्करप्रमुख असताना भारताच्या पंतप्रधानांना पाकीस्तान भेटीत आतंर्राष्ट्रीय पद्धतीप्रमाणे सॅल्यूट जाऊंदेत पण साधे शेकहँड करायला कुरकुर केली आणि त्याच वेळेस कार्गीलमध्ये कुरघोडी पण चालू केल्या.
  2. आपल्याकडील जवानांना - आंर्तराष्ट्रीय कायद्याप्रमाणे फारतर सीमा पार केल्याने युद्ध कैदी असतील, त्यांचे नखे आणि डोळे काढून हाल हाल करून मारले (मला माहीती आहे की मुशार्रफ जातीने तेथे नसेल पण असले प्रकार आदेश असल्याशिवाय होत नाहीत),
  3. ज्या मुशार्रफने आग्र्याला येऊन स्वतःचे शहाणपण दाखवण्याच्या प्रयत्न केला (अर्थात त्याचा उपयोग झाला नाही ही वेगळी बाब, फक्त माध्यमे आणि तथाकथीत निधर्मींकडून थोडे लाड झाले ते सोडून)
  4. ज्या मुशार्रफने मुंबई स्फोटाचा प्रमुख सुत्रधार दाउदला पकडून देण्याचा कधी प्रयत्न केला नाही
  5. ज्या मुशार्रफने एयर इंडीया च्या विमानाला पळवून नेले असताना साधी पाकीस्तानात उतरायला परवानगी दिली नाही, भारतीय विमानांना वरून जायला परवानगी देत नव्हते (गंमत म्हणजे त्याने ऑक्टोबर ९९ मध्ये सत्ता काबीज केली आणि हे प्रकरण डिसेंबर ९९ ला झाले)
  6. ज्या मुशार्रफने नंतर अतिरेकी मसुद पाकीस्तानात असून कधी मिळवून दिला नाही (आणि हो, याच मसूदने महंमद आटाला नंतर १ लाख डॉलर्स पाठवले आणि त्याचा "अल्टीमेट" उपयोग हा अमेरीकेवरील ९/११ च्या हल्ल्यात झाला)
  7. शिवाय त्यांच्या हाताखाली असलेल्या आयएसआय च्या हस्तकांकडून झालेले याच काळातील प्रकार कितीतरी आहेत - गेट वे ऑफ इंडीया, ७/११ ला लोकलमधील, अक्षरधाम, आत्ता झालेले बंगलोर आणि अहमदाबाद मधील बाँबस्फोट आणि सर्वात मोठा कळस म्हणजे संसदेवरील हल्ला...

तर अशा या मुशार्रफच्या असण्याचा भारताला काय फायदा होणार हो? बरं तो गेला तरी असल्या कुरापती पाकीस्तान काढतच रहाणार, अतिरेक्यांना मदत करतच रहाणार - फक्त अमेरिकेच्या दादागिरीमुळे चोरून मारून इतकेच काय ते. ज्या देशाचा जन्मच द्वेषाच्या आधारावर झाला आहे तो अजून काय करणार? मला माहीत आहे की तिथला प्रत्येक माणूस वाईट नाही आणि इथला सज्जन नाही ते. तरी देखील राष्ट्र म्हणून ते कोसळण्याच्या मार्गावर आहे ही वस्तुस्थिती आहे. हे काही मी आनंदाने सांगत नाही कारण स्थिर पाकीस्तान आपल्याला शेजारी म्हणून असणे कधिही गरजेचे आहे. पण स्थिर म्हणजे लाडावलेले नाही आणि आपल्यावर वाट्टेल त्या कुरघोडी त्यांनी करत आणि आपण सहन करत तर अजिबातच नाही. म्हणून सुरवातीस म्हणले की आपण म्हणजे भारत सरकार आणि भारतीय जनता हेच काय ते आपले प्रश्न सोडवणार आहे. मुशार्रफ अथवा त्याच्या अलीकडील/पलीकडील पाकीस्तानी राजकारणि अथवा बुद्धीमंत/विचारवादी सोडवणार नाही आहेत...

...कारण वर सांगितलेल्या प्रत्येक कुरघोडीत जसे मुशार्रफ आणि पाकीस्तानी सरकार प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जबाबदार होते तसेच त्यावर ठोस पावले न उचलणारे आपले सरकार आणि त्याकडे दुर्लक्ष करायला लावणारे आपले बुद्धीवादी पण तितकेच किंबहूना जास्तच जबाबदार होते असे मला वाटते.

ये हुई ना बात

पाकिस्तानात बुद्धिवाद्यांना कोणीही काही भाव देत नाही. म्हणून पाकिस्तानातले सरकार ठोस पावले उचलते, आणि त्यामुळे पाकिस्तानवर कोणाची कुरघोडी होत नाही.

(बाकी बरेचसे मुद्दे पटले असले तरी हे भारतातील बुद्धिवाद्यांवर घसरणे संदर्भहीन वाटले.)

अहो...

बाकी बरेचसे मुद्दे पटले असले तरी हे भारतातील बुद्धिवाद्यांवर घसरणे संदर्भहीन वाटले.)

अवांतर होणे टाळण्यासाठी इतकेच येथे सर्वांसाठी म्हणतो की : मी जेंव्हा बुद्धीवादीं ना नावे ठेवतो तेंव्हा मी बुद्धीवादाच्या आणि सरसकट सर्वच बुद्धीवाद्यांच्या विरोधात नाही. अगदी कुणाशी पटले नाही तरी मी ते शतृत्व समजत नाही काही... पण जेथे जेथे तथाकथीत निधर्मीपणा हा बुद्धीवादाचे वेष्ठण (रॅप करून) करून दिला जातो त्या संदर्भात म्हणत आहे.

भाकित

मुशर्रफ यांच्यामुळे काही वर्षे पाकिस्तानात राजकीय स्थैर्य होते. आता एकत्र असलेल्या पक्षांमध्ये मुशर्रफ विरोध वगळता काय सामाईक आहे? आता मुशर्रफ गेल्यावर तोही मुद्दा जाऊन मतभेद वाढण्याची शक्यता आहे.

हे भाकित इतक्या लवकर खरे होईल असे वाटले नव्हते. पाकिस्तानातील राजकीय युती मुशर्रफ यांना हटवण्याचा एकच निर्णय घेऊन संपुष्टात आली आहे.

दुटप्पी मुशर्रफ

अमेरिकेच्या इस्लामी दहशतवाद्यांविरोधी लढ्यात मुशर्रफ एकीकडे अमेरिकेशी सहकार्य करण्याचे नाटक करीत होते तर आतून दहशतवाद्यांना मदत करीत होते. या दुटप्पीपणाचे वर्णन आजच्या 'टाइम्स् ऑफ् इंडिया'तील सी. उदय भास्कर यांच्या Too Early to celebrate या लेखांत "Running with the jihadi hare and hunting with the American hound" असे केले आहे.
(जिहादी सशाबरोबर धावणे व अमेरिकी शिकारी कुत्र्याबरोबर जिहादी सशाचा पाठलाग करणे ही मुशर्रफ यांची चलाखी होती.)

लेख मिळाला

तुम्ही दिलेला लेख मिळाला. http://timesofindia.indiatimes.com/Editorial/Too_Early_To_Celebrate/arti... वाचून पाहतो.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत :
इफ ही इज सो स्मार्ट , हाउ कम ही इज डेड?
हाउ इज एज्युकेशन सपोस्ड टू मेक मी फील स्मार्टर? बिसाइड्स एव्हरीटाइम आय लर्न समथिंग न्यू , इट पुशेस सम ओल्ड स्टफ आउट ऑफ माय ब्रेन.
- होमर सिम्पसन

उत्तरे

मुशर्रफ यांच्या जाण्याने भारतावर आणि दक्षिण आशियातील देशांवर काय परिणाम होतील?
भारतावर फार काही परिणाम होईल असे वाटत नाही. तसे ही सोनिया गांधी, भुट्टो परिवाराला चीनमध्ये भेटल्या आहेत. त्यामुळे जे काही होणार आहे त्याची पुर्व कल्पना भारताला आहे असे म्हणायला काही हरकत नाही. तसेही भारतीय राजकारण्यांवर कशाचे काही परिणाम होतात का?

पाकिस्तानातील अंतर्गत राजकारणाचे काय होईल?
ते ही नेहमीचेच राजकारण करतील. आत्ताच बरोबर काश्मीरमध्ये अशांतता सुरु आहे. सर्वसामान्य पाकिस्तानी लोकांचे लक्ष तिकडे वळवण्या एवढे तिकडचे राजकारणी तयारीचे आहेत. शेवटी ते ही आपल्याच राजकारण्यांच्या मातीतले आहेत ना?

मूलतत्त्ववादी पुन्हा डोके वर काढतील का?
मग आत्ता त्यांचे डोके कुठे आहे?

वॉर ऑन टेरर' चे काय होणार?
त्याचे काय होणार हे अमेरिकेतले राजकारणी ठरवतात. आपण काय बोलणार?

मुशर्रफ यांचे काय होणार?
ते ही ठरलेले असेल, जगायचे असेल तर राजीनामा द्या. हे ऐकुनच त्यांनी राजीनामा दिला असेल. तरीसुद्धा काही दिवसात कै. मुशर्रफ असे वाचावे लागल्यास नवल वाटणार नाही.

बाकी पाकिस्तानात असे होते तेंव्हा भारतीय लोकशाही परिपक्व आहे याचा ढोल बडवला जातो. पण लोकशाहीच्या नावाखाली आपल्याकडे गांधीशाही चालते हे सत्य आहे.





मुशर्रफ यांचे काय होणार?

काही दिवसात कै. मुशर्रफ असे वाचावे लागल्यास नवल वाटणार नाही.

कै. पेक्षा पै. जास्त समर्पक वाटते.

 
^ वर