छायाचित्रकला-३

छायाचित्रकला -३
लेखमाला सुरु करतांना मला स्वत:लाच नक्की समजत नव्हते की आपण काय काय माहिती देणार आहोत. ही माहिती श्री धनंजय किंवा कोलबेर यांच्यासारख्या तज्ञाकरिता नव्हतीच. पण नवशिके म्हणजे तरी काय समजायचे ? हल्लीच्या कॅमेऱ्यांमध्ये जे फ़िचर्स आहेत ते माझ्या सुरवातीच्या काळात फ़ार महागड्या कॅमेऱ्यातच असावयाचे व ते आम्ही फ़क्त आशाळभूतपणे मासिकात वाचावयाचो ! दुसरे म्हणजे हल्ली छायाचित्रकलेवरची मासिके सुलभतेने उपलब्ध आहेत, तेवढी तेंव्हा नव्हती. त्यामुळे
आजच्या कलाकारांची गरज नक्की उमगत नव्हती. पण पहिल्या दोन लेखांवरील प्रतिसादांनंतर, विशेषत: श्री.ऋषिकेश यांच्या सांगण्यावरून, थोडीशी दिशा मिळाली. आज पासून प्रत्येकवेळी जरा जास्त खोलात जाऊन लिहावयाचा प्रयत्न करतो. तरीही एक छोटीशी विनंती. आपल्याला एखादी गोष्ट जास्त विस्ताराने पाहिजे असेल तर अवष्य विचारा.
उदा. श्री. ऋषिकेश विचारतात चालत्या गाडीला व उडणाऱ्या बदकाचा फ़ोटो काढतांना काय स्पीड ठेवावा ? तर येथूनच सुरवात करू.
चालत्या गाडीचा फ़ोटो घेतांना वेळ जर १/१०० से. ठेवला तर काय होईल ? शटर उघडा आहे तेवढ्या वेळात गाडी पुढे सरकेल व चित्रात सरकणाऱ्या आडव्या रेषा दिसतील. स्पीड आणखी कमी केला, १/५०० केला, तर पहिल्यापेक्षा सुधारणा होईल हे नक्कीच, पण तुम्हाला पाहिजे तेवढे sharp चित्र मिळेल का ? सांगता येणार नाही. कारण ते गाडीचा वेग व तुमची अपेक्षा यावर अवलंबून आहे. परत एक गोष्ट लक्षात घ्या. एकदम शार्प चित्र आले तर ते धावत्या गाडीचे वाटणारच नाही, उभ्या, स्थिर गाडीचे वाटेल. मग नक्की
काय करावयाचे ? येथे शरदचा उपयोग नाही. पहिल्या लेखात लिहल्याप्रमाणे चित्रकार महत्वाचा. निर्णय तुम्ही आणि तुम्हीच घ्यावयाचा. सुरवात म्हणून १/५०० ने फ़ोटो काढा, बघा,नंतर आपल्या आवडीप्रमाणॆ बदल करा. पूर्वी मला कॅमेऱ्याबरोबर कागद-पेन्सिल ठेवावी लागे. कारण काय गोंधळ घातला होता हे फ़िल्म धूऊन, फ़ोटो हातात पडल्यावरच कळावयाचे. तिथपर्यंत सेटिंग लक्षात रहाणे शक्यच नव्हते. आता सोपे आहे, सर्व माहिती कॅमेऱ्यातच सुरक्षीत रहाते. एक गोष्ट सरळ आहे. गाडीचा फ़ोटो काढताना आणि उडत्या पक्षाचा काढताना, दुसऱ्या फ़ोटोत स्पीड निराळा लागणार. पक्षाचे पंख थोडेसे हलते दिसलेच पाहिजेत, थोडा blurr आवष्यकच. एखादेवेळी १/२५० हा स्पीड योग्य असू शकेल.
येथे Bracketing बद्दल बघू. Bracketing म्हणजे एक फ़ोटो काढून झाल्यावर तोच फ़ोटो परत एक्स्पोजर कमी आणि जास्त करून काढावयाचा. कशाकरिता ? तर हेही शक्य असते की पहिल्या फ़ोटोपेक्षा दुसरा [किंवा तिसरा] फ़ोटो चांगला असेल. हल्ली बरेच कॅमेऱ्यात ही सोय दिलेलीच असते. तुम्ही एकदाच बटण दाबले की तीन [अथवा ५] फ़ोटो एकदमच मिळतात. नको असलेले Delete करा. खर्च काही नाही व आपल्याला शिकावयासही मिळते. मी जोरात शिफ़ारस करतो की ही सवय लावून घ्या. सर्व व्यवसायीक फ़ोटोग्राफ़र हे न चुकता करतातच. फ़ुकटात पदरात पडणारी गोष्ट सोडू नका. [हा उर्दु शायराचा सल्ला]
पॅनिंग हा आणखी उपयोगी पडणारा प्रकार.यात गाडी ज्या बाजूला जात आहे त्या बाजूला कॅमेरा फ़िरवावयाचा. हा ट्रायल ऍंड एररचा प्रकार. काही वेळेला चांगले चित्र मिळते.
साधारणत: स्पीड २ ते १/२००० सेकंद इतका असतो. आपण Fast स्पीडबद्दल बघितले. आता Slow स्पीडबद्दल बघू. साधारणत; १/६० सेकंदापेक्षा हळू स्पीड असेल तर कॅमेरा स्टॅंडवर लावावा. कारण कॅमेरा हलण्याची शक्यता असते. Image Stabiliser असेल तर काळजी नाही. नाहीतर दोन पायांत अंतर ठेऊन, दोनही कोपरे शरीराला चिकटवून उभे रहावे. हात शरीराला टेकलेले असल्याने कमी हलतात. तरीही हलण्याची शक्यता राहतेच. अशावेळी एक उपाय म्हणजे ISO वाढविणॆ. उदा. ISO 100 ने १/१५ स्पीड असेल तर ISO 400 केल्याने तो १/६० होईल. तुम्ही कॅमेऱ्याला फ़सवत आहात. प्रकाश कमीच मिळंणार आहे.पण प्रोसेसिन्ग करताना ती कसर भरून काढणे शक्य आहे. निदान Blur [मराठीत काय ?] नक्कीच कमी असेल. स्टॅंड नसेल तर तुम्ही कॅमेरा एखाद्या स्थिर वस्तूवर ठेऊ शकता. अशावेळी हाताने शटर बटण दाबताना कॅमेरा हलण्याची शक्यता असते. या वेळी Self Timer चा उपयोग करावा. म्हणजे शटर दाबताना कॅमेरा हलला तरी फ़ोटो निघताना तो स्थिर असेल. छायाचित्र चित्रकलेसारखे [Painting] सारखे दिसावे असे वाटत असेल तर [विषेशत: निसर्गचित्र व व्यक्तिचित्र] तर कमी स्पीडचा उपयोग करून घेता येतो. या बाबत आपण पुढे बघणार आहोतच. पण तुम्ही आतापासूनच असे फ़ोटो मुद्दाम काढावयास सुरवात करा. ज्येष्ट चित्रकारांची चित्र काळजीपूर्वक अभ्यासावयास सुरवात केलीत तर ही गोष्ट लक्षात येईल. Deleberate ,controlled blur तुमच्या छायाचित्राला एकदम निराळ्या श्रेणीत नेऊन ठेवेल. स्पीड मधील B व T ही सेटिंग तुम्हाला रात्रीचे फ़ोटो काढावयाकरिता निर्माण केली आहेत.त्याचा उपयोग आपण उपक्रमवरील छायाचित्रात पाहिला आहेच. धूसर वातावरण निर्माण करावयासही आपण त्यांचा उपयोग करू शकतो. आज स्पीडबद्दल एवढी माहिती घेऊन थांबू. तुमच्या य़ा विषयावरील शंकांचे समाधान करून परत DoF कडे वळू. DoF कोष्टके, hyper focal distance वगैरे माहिती त्यात घेऊ.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

वा...

हा लेख नेहमीपेक्षा पटकन समजला. तुम्ही म्हणत आहात तसे प्रयोग करूनच जास्त चांगले शिकता येईल. नाहितर होते काय की जास्त मेगापिस्केलचा कॅमेरा विकत घ्यायचा आणि बटन दाबून फोटो काढत रहायचे या शिवाय काहीच केले जात नाही. (अरेच्चा!! मी नवा विषय दिला वाटतं? - कॅमेरा विकत घेताना!!)





सुरेख माहिती

छान माहिती. सोप्या शब्दांमधील माहिती सगळ्यांनाच पटकन समजते.

ब्रॅकेटींगचा आणखी ही एक उपयोग नक्की करता येतो तो म्हणजे HDR - High Dynamic Range छायाचित्र मिळवायला. असे ३,५,७ वेगवेगळ्या एक्स्पोजरची छायाचित्रे घेतल्यानंतर, फोटोशॉप (किंवा इतरही कुठले सॉफ्ट्वेअर) वापरुन ही सर्व छायाचित्रे एकत्र करुन एक भलतेच नाट्यमय चित्र तयार करता येते. HDR बद्दल इतरत्रही बरीच माहिती मिळेल.

शटर स्पिड बद्दल कुठेतरी वाचले होते, की जर आपण स्टँड न वापरता जास्त फोकल लेंथ ची लेन्स् वापरत असाल तर शटर स्पिड शक्यतो फोकल लेंथच्याहुन थोडा जास्त ठेवावा म्हणजे हात हलल्याने चित्र हलणार नाही (उदा. ३००मिमि ची लेन्स् असेल तर शक्यतो शटर ५०० म्हणजेच १/५०० ठेवावे). हे बरोबर आहे अथवा नाही आणि असेल तर याच्यावर काही माहिती देऊ शकाल का की असे का?

-
ध्रुव

+१

शरद यांचा हा लेखसुद्धा प्रवाही आणि माहितीपूर्ण आहे.

शिवाय ध्रुव यांना धन्यवाद -

शटर स्पिड शक्यतो फोकल लेंथच्याहुन थोडा जास्त ठेवावा म्हणजे हात हलल्याने चित्र हलणार नाही (उदा. ३००मिमि ची लेन्स् असेल तर शक्यतो शटर ५०० म्हणजेच १/५०० ठेवावे).

हा ठोकताळा मला माहीत नव्हता, पण विचार करता एकदम योग्य वाटतो.

ठोकताळा...

कॅमेरा हातात ठेवुन फोटो काढताना हा ठोकताळा उपयोगी आहे. स्टँड अथवा मोनोपॉड वापरणार असाल तर कमी स्पिडही चालेल.
-
ध्रुव

मस्तच

प्रथमतः अशी मस्त लेखमाला सुरु करुन चालु ठेवल्याबद्दल शरद ह्यांचे मनःपुर्वक आभार!

मात्र धृव ह्यांनी केलेल्या विधानाबद्दल जरा संभ्रम!

...जास्त फोकल लेंथ ची लेन्स् वापरत असाल तर शटर स्पिड शक्यतो फोकल लेंथच्याहुन थोडा जास्त ठेवावा .....

मला कोणी जरा हे नीट समजावुन सांगेन का? ..
खरे म्हणजे शटर हे काळाशी संबधित आहे ह्याउलट फोकल लेंथ हे अंतराशी संबधित आहे ह्या दोघांची एकमेकांशी सांगड कशी घातली जाउ शकते? ह्या मागचे लॉजिक काय?

-भालचंद्र!

लॉजिक

खरे म्हणजे शटर हे काळाशी संबधित आहे ह्याउलट फोकल लेंथ हे अंतराशी संबधित आहे ह्या दोघांची एकमेकांशी सांगड कशी घातली जाउ शकते? ह्या मागचे लॉजिक काय?

हे लॉजिक फक्त कॅमेरा हातात धरून फोटो काढण्यापुरते मर्यादित आहे. कॅमेरा तिपाईवर ठेवून काढताना खूपच वेळ शटर उघडे ठेवता येते. त्यातही हे "लॉजिक" म्हणजे ठोकताळा आहे - पूर्ण गणितातले सर्व व्हेरिएबल हाताळलेले नाहीत.

कितीही प्रयत्न केला तरी हात हलतो, किंवा थरथरतोच. त्यामुळे चित्रफितीवर (किंवा डिजिटल सेन्सॉरवर) पडलेले बिंबही शटर उघडे असलेल्या काळात हलते, किंवा थरथरते. जर शटर कमी वेळ (=क्ष सेकंद, याचे बीजगणीत करायचे आहे) उघडे असेल म्हणा, तर हे थरथरणे फितीच्या एक-दोन ऍव्हरेज कणांच्या (कृष्णधवल चित्रफितीत काळा रंग चांदीच्या कणांनी येतो, डिजिटलमध्ये कण=पिक्सेल) आकारमानापेक्षा कमी असेल. तर चित्रफितीवर बिंबाची ती हालचाल झाली काय, न झाली काय फीत डेव्हलप केल्यानंतर (डिजिटल फोटोची फाईल उघडल्यावर) चित्र हललेले असे डोळ्यांना दिसून येणारच नाही. त्यापेक्षा अधिक वेळ शटर उघडे राहिले, तर हात अधिक हलायला वेळ मिळेल, बिंब एक-दोन कणांपेक्षा अधिक हलेल, आणि फीत डेव्हलप केल्यावर सर्व वस्तू "ब्लर" झालेल्या दिसतील.

गणित करण्यासाठी व्हेरिएबल येणेप्रमाणे :
१. फितीवरील कणांचे आकारमान
२. सामान्य मनुष्यांचा हात हलायचा वेग
३. वस्तूचे सामान्य डोळ्यांच्या मानाने मॅग्निफिकेशन (कारण सामान्य डोळ्यांना दिसणार नाही ते तपशील ब्लर झाले तरीही सौंदर्यात फरक पडत नाही) - हे मॅग्निफिकेशन झूमने ठरते.
४. शटर किती वेळ उघडे राहाते तो काळ

पैकी (१) आणि (२) सामान्यपणे बदलत नाहीत असे आपल्याला मानता येते. (पण थंडीत/दमल्यावर हात खूप थरथरतो, तेव्हा हा ठोकताळा चुकेल!) असे असता जितके अधिक मॅग्निफिकेशन तितका कमी वेळ शटर उघडे ठेवावे. इन्व्हर्स प्रोपोर्शन.

शटरचा आकडा सांगताना नेहमी क्ष = १/य असा इन्व्हर्सच सांगतात.

मॅग्निफिकेशन जितके जास्त, तितका 'क्ष' काळ कमी, म्हणजे तितकाच 'य' आकडा अधिक. बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट राहिल्यात, तर हे सिंपल प्रोपोर्शन येते. हे झाले ठोकताळ्याचे लॉजिक. पण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पहिल्यांदा नीट गणित मांडूनच काढावा लागेल.

५० मिमि भिंगाचा कॅमेरा वापरून हे गणित कोणीतरी केले आणि ठोकताळा दिला की १/६० पेक्षा हळू शटर स्पीड वापरू नये.
म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ~१:१ आहे (५० [मिमि]~=६० [१/सेकंद]). त्यामुळे १२० मिमि झूम लेन्स असेल तर १/१२० पेक्षा हळू शटर वापरू नये, इ.इ.

मस्त!

वा! अतिशय सुंदर, समजेल अश्या भाषेत आणि उदाहरणांसहित लिहिलेला लेख! आवडला आणि कळला देखील :)
प्रतिक्रिया पॉझिटीव्हली घेतल्याबद्दल अनेक आभार.

काहि प्रश्नः
१) जर आपण वेगात असु [समजा गाडीत आहोत] व फोटो काढण्याची वस्तु स्थिर असेल व ती स्थिरच येणे गरजेचे असेल तर काय करावे [माझा अंदाजः स्पीड कमीत कमी ठेवावा साधारण १/५०० ते १/१००० बरोबर का?]
२] जर आपण वेगात असु व फोटो काढण्याची वस्तु आपल्याच दिशेने वेगात चालली असेल तर काय करावे? [उदा. चालत्या गाडीतून शेजारी वाहणार्‍या नदीचे छा.चि.]
३] जर आपण वेगात असु व फोटो काढण्याची वस्तु विरुद्ध दिशेने वेगात असेल तर काय करावे? [उदा. चालत्या गाडीतून समोरून येणार्‍या घोडागाडीचे/घोड्याचे छा.चि.]

मी हे प्रश्न मुद्दाम विचारत आहे कारण प्रवासात बर्‍याच गोष्टी/स्थळे दिसतात. पण दरवेळी गाडी थांबवणे जमत नाहि अश्या या प्रश्नांच्या उत्तराचा फायदा होईल

बाकी पुढील लेखाच्या खुप प्रतीक्षेत आणि पुन्हा एकदा आभार


अवांतरः
फ़ुकटात पदरात पडणारी गोष्ट सोडू नका. [हा उर्दु शायराचा सल्ला]

कुठला हो हा शेर? वाचायला आवडेल.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

'फुकट' चा सल्ला

मैंने माना कि कुछ नहीं 'ग़ालिब'
मुफ़्त हाथ आये तो बुरा क्या है

स्पीड

शरद
स्पीड किती ठेवावा
जेंव्हा स्पीड १/५०० पेक्षा कमी असेल तेंव्हा एक्स्पोजर पुरेसा आहे की नाही याकडे लक्ष द्यावयास पाहिजे. डिजिटल कॅमेऱ्यामध्ये ऍपर्चर मर्यादित असतात. उदा. ४-८ या मर्यादेत एफ़/४,१/१००० हे एक्स्पोजर कमी पडावयाची शक्यता आहे. तुम्ही विचारलेल्या तीन गोष्टींपैकी चालू गाडी-स्थिर वस्तु, चालू गाडी-त्याच दिशेत वाहणारी नदी यांचे फ़ोटो येऊ शकतील पण विरुध्द दिशेने येणाऱ्या गाडीचा फ़ोटो येणे अवघड आहे.कारण खरा वेग हा दोन वेगांची बेरिज असेल. याला एक पर्याय अनेक कॅमेऱ्यांमध्ये असतो.
Image Stabiliser .याचा उपयोग केला तर कमी स्पीडलाही शार्प फ़ोटो येतात. खालील फ़ोटो १/१६० से. ला घेतला आहे. थोडा ब्लर यावा म्हणून इतका कमी स्पीड ठेवला आहे.
P1010497
एका चालू रिक्षाचा १/२५० या स्पीडने घेतलेल्या फ़ोटोत ती जागेवर उभी आहे असे वाटते, वरील सर्व चित्रात अंतर हा एक महत्वाचा घटक आहे. अंतर कमी-ब्लर जास्त.
अंतर जास्त-ब्लर कमी.
समित्पाणी

 
^ वर