छायाचित्रकला-२

भाग-२

आज आपण दुसऱ्या भागास सुरवात शटर स्पीडने करू. प्रकाश नियंत्रीत करावयास शटर [पडदा] असतो. भिंगातून येणारा प्रकाश हा थोडा वेळ फ़िल्मवर पडू देतो. शटरचे निरनिराळे प्रकार असले तरी त्याना मह्त्व नाही. मह्त्व वेळेला.हा स्पीड सर्वसाधारणत: २,१,१/२, १/४, १/८, १/१५/ १/३०, १/६०, १/१२५, १/५०० ...सेकंद असा असतो. म्हणजे प्रत्येकवेळी
निम्मा निम्मा होत जाणारा.अपर्चरसारखाच. फ़िल्मवर पडणारा एकूण प्रकाश हा या दोहोंवर अवलंबून असतो.आता एक सारिणी करू.
ऍपर्चर क्षेत्रफ़ळ स्पीड गुणाकार

१.४ १/ २ १/२५० १/५००
२ १/ ४ १/१२५ १/५००
२.८ १/ ८ १/६० १/४८०
४ १/१६ १/३० १/४८०
५.६ १/३२ १/१५ १/४८०
८ १/६४ १/८ १/५१२
याचा अर्थ असा की एकच एक्स्पोजर [येथे १/५०० ] आपण निरनिराळ्या ऍपर्चर-स्पीड्च्या मदतीने मिळवू शकतो. याचा फ़ायदा असा की आपणास हवा तो स्पीड निवडण्याची मुभा मिळाली; फ़क्त त्याप्रमाणे ऍपर्चर बदलेले की झाले. किंवा उलटे. अपर्चर निवडा,योग्य तो स्पीड ऍडजस्ट करा म्हणजे झाले. आणखी एक सोय ... असलेला [available] प्रकाश पसंत नसेल
तो कमी जास्त करावयास दोन एक्के हातात आले. इथेच priorities विचार करू.तुम्ही कशाला प्राधान्य देता त्याला priority म्हणतात.सर्वसाधारणपणे चार priority प्रत्येक कॅमेऱ्यात असतात. श्री.महाजन यांनी त्या दिल्या आहेतच.
Manual..[M] ..... यात तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. पाहिजे तो ऍपर्चर व पाहिजे तो स्पीड. हा पर्याय शक्यतो नवीन माणसाने हाताळू नये.[नवीन म्हणजे पहिली १-२ वर्षे] हल्ली एलेक्ट्रोनिक्स इतके पुढे गेले आहे की प्रकाश मोजण्याचे काम कॅमेऱ्यावर सोडून देणे उत्तम. आमच्यावेळी, जेंव्हा फ़िल्मकरता पैसे मोजावे लागत तेंव्हा ही चैनीची गोष्ट होती. डिजिटलमध्ये पैसा खर्च होत नाही म्हणून प्रयोग करावयास हरकत नाही. शक्य असेल तर, प्रथम कॅमेऱ्याला निवड करू दे, फ़ोटो काढा व मग आपल्याला योग्य वाटेल ते कॉंबिनेशन निवडून फ़ोटो काढा. दुसऱ्यात काय चुकले आहे ते कळेल.चूका डिलिट [मराठी शब्द ?] करा. हळू हळू सुधारणा होइल. आनंद देणारा कष्टप्रद मार्ग.

Programme [P] .... सर्व निवड कॅमेरा करतो. ९९% वेळी फ़ोटो छान येतो. स्वनिर्मितीचा आनंद शून्य. तुमचा भारी कॅमेरा लहान मुलांचा Aim & Shoot कॅमेरा होतो.[हा पर्याय बायकोच्या/ मैत्रीणीच्या हातात कॅमेरा देताना सर्वोत्तम!] माझा [फ़ुकटचा] सल्ला. महत्वाचे फ़ोटो P वर काढा. नंतर ते लगेच A किंवा S वर काढा. नको असलेले खोडून टाका. नंतर
हळहळ वाटणार नाही !
Shutter [S]...... शटर प्रायॉरिटी मध्ये तुम्ही स्पीड निवडता.उदा. धावती गाडी, धबधब्यातून पडणारे पाणी या सारखे फ़ोटो काढताना, कमितकमी स्पीड पाहिजे .१/५०० किंवा त्याहून कमी. तेंव्हा कॅमेऱ्याने स्पीड ठरवण्याऐवजी तुम्हीच निर्णय घ्या व कॅमेऱ्याला अपर्चर ठरवू द्या. candid photo काढताना कमितकमी स्पीड जास्त चांगला फ़ोटो
देण्याची शक्यता अधीक. स्टॅंड न वापरता, हातात कॅमेरा घेऊन, आपण फ़ोटो काढतो, तेंव्हा हलण्याची शक्यता वाढते; अशा वेळीही स्पीड कमितकमी ठेवणे योग्य ठरते. थोडक्यात ह्या पर्यायाचा अभ्यास करणे फ़ायदेशीर.
Aperture[A] .... इथे अपर्चर आपण ठरवतो व कॅमेरा स्पीड. हा पर्याय वापरण्याचे कारण यात तुम्ही Depth of field नियंत्रीत करू शकता. वर जरी म्हटले असले की एका EV ला A/S निरनिराळे पर्याय असतात, तरी हा एक महत्वाचा फ़रक त्यांमध्ये असतो. प्रथम DoF म्हणजे काय ते पाहू.
पहिल्या भागात ab चे प्रतिबिंब cd येथे मिळते हे आपण पाहिले. cd येथे ते sharp आहे. ab च्या जरा मागे-पुढे असलेल्याचे काय ? ते तेवढे sharp असणार नाहीच. पण किती हललेले असेल ? येथे आपल्या डोळ्याचा संबंध येतो. किती अंतरावरील फ़रक लक्षात येतो याला मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या आतील फ़रक आपणास कळतच नाही. ते sharp नसले तरी
sharp च वाटते.म्हणजे ab च्या जरा पुढे व थोडे मागे असलेल्या वस्तूचीही प्रतिमा स्पष्टच वाटते. हे ab च्या मागचे पुढचे अंतर जातील वस्तूंचे छायाचित्र आपणास रेखीव भासते, त्या अंतराला Depth of Field म्हणतात. हे अंतर ab च्या पुढे जेवढे असते त्याच्या तुलनेने मागे जास्त असते. DoF अपर्चरवर अवलंबून असते. जेवढा अपर्चर नंबर लहान तेवडे DoF कमी.
अपर्चर २ ठेवण्याऐवजी ८ ठेवले तर DoF जास्त मिळेल. DoF अंतरावरही अवलंबून असते. जास्त अंतर, जास्त DoF. जवळचे फ़ोटो घेताना जास्त काळजी घ्यावी.DoF भिंगाच्या फ़ोकल लेन्थवरही ठरते. जास्त फ़ोकल लेन्थ, कमी DoF. ३५ एमेम च्या भिंगाने १०५ एमेमच्या भिंगापेक्षा जास्त DoF.भरपूर गोंधळ झाला ? थोडे सोपे करू.
DoF वाढवण्याकरिता...
१] अपर्चर नंबर वाढवा......२ ऐवजी ८
२] जास्त अंतर उत्तम.... ५ फ़ूटाऐवजी १० फ़ूट
३] कमी फ़ोकल लेन्थची लेन्स .... १०५ एमेम ऐवजी ३५ एमेम.
पूर्वी SLR lens वर DoF च्या खूणा असावयाव्या.तुम्ही फ़ोकस केले की किती DoF आहे हे लेन्सवरच दिसावयाचे. डिजिटलवर ही सुविधा नाही.[DoF वर एक संपूर्ण लेख लिहावा का?]
आज एवढे पुरे. पहिल्या लेखाच्या प्रतिसादांच्यावेळीच समजले की मदत करावयास तज्ञ मंडळी आहेत. दिलासा मिळतो!सर्वांचे मन;पूर्वक आभार.
समित्पाणी

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रयत्न

समजुन घेण्याचा प्रयत्न करतो आहे :). शरदजी, एखादी कार्यशाळा घेण्याबद्दल काय मत? म्हणजे, तुम्ही काही ठराविक सेटिंग करून चित्र काढायला सांगा बाकी मग सदस्य आपापली चित्रे येथे चढवतील. अथवा, आपल्या समुदायाच्या गुगल कट्ट्यावर चढवता येतील का ते पाहू. :) अर्थात बाकी सर्वजण काय म्हणतात ते पाहणे गरजेचे आहेच. :)
मला वाटतं की कार्यशाळेमुळे बरेच उत्साही नवीन कला लवकर आत्मसात करतील.





हेच म्हणतो...

कार्यशाळा - जरूर. अशी कार्यशाळा व त्यातुन शिकणे हे फारच फायदेशीर असेल असे वाटते.
गुगल कट्ट्यावर १० एमबी पर्यंतची एक असे १०० एमबी पर्यंत छायाचित्रे चढवता येतील असे वाटते. तसेच जर एखादा सगळ्यांचा मिळुन एक पिकासा फोटोसंच केला गेला तरीही चालेल.

-
ध्रुव

फोकसच्या अंतराच्या मर्यादा

माहिती आनंदाने वाचतो आहे.

> [DoF वर एक संपूर्ण लेख लिहावा का?]
माझी फर्माईश - होय!!!

लिहावाच

[DoF वर एक संपूर्ण लेख लिहावा का?]

होय ही संकल्पना सुस्पष्ट होणे गरजेचे आहे.
प्रकाश घाटपांडे

सहमत

DoF वर एक संपूर्ण लेख लिहावा का?
हो लिहाच :) फारच उत्तम होईल.

-
ध्रुव

चांगली लेखमाला.. पण....

लेखमाला स्त्युत्य आहे. परंतू काहि भागात विस्कळीत वाटला. राग मानु नये परंतु स्प्ष्ट सांगायचे तर हा लेख माझ्या सारख्या नवख्याला (किंवा कदाचित फक्त मलाच) फारसा कळला नाहि.
१. लेखकाकडे खूप खूप सांगण्यासारखे आहे परंतू विस्तारभयाने अनेक मुद्द्यांना केवळ ओझरता स्पर्श होतो आहे असे वाटले. प्रत्येक मुद्द्यावर लिहिताना काहि प्रमाणात मर्यादा असल्या तरी कृपया अधिक विस्तृत वाचायला आवडेल.
२. कृपया एकदम मोडमधे शिरण्या आधी फार प्राथमिक माहिती वाचायला आवडेल असे वाटते. वरील माहिती ज्यांना छायाचित्रकलेत काहिशी गती आहे त्यांच्याकरता वाटली. परंतू माझ्यासारख्या नवशिक्यांना जड आहे. लेख सगळ्यांना सोयिस्कर व्हावा यासाठी काहि गृहपाठ देता येईल. तो करून मगच हा लेख वाचावा असे सांगावे.
३. सध्या लेखांत उदाहरणांची नितांत आवश्यकता आहे. त्यांचा सढळहस्ते वापर करावा ही विनंती. उदा. धावती गाडी, धबधब्यातून पडणारे पाणी , हातात धरून फोटो काढताना कमी स्पीड ठेवावा हे कळले. परंतू जास्त कधी ठेवावा हे कळले नाहि. Aperture काहि विशिष्ट प्रकारचे फोटो काढताना वापरावे का ते तुमच्या मर्जीवर आणि अनुभवावर अवलंबून आहे? मी गृहपाठ म्हणतो आहे ते या साठी. उदा गृहपाठात पुढील प्रश्नांची उत्तरे मागवता येतीलः
अ. धावत्या गाडीचा फोटो दुसर्‍या धावत्या गाडीतून घ्यायचा आहे तर शटर स्पीड काय ठेवाल? व का?
ब. उडता पक्षी, उडते फुलपाखरू आणि चालते बदक यांचा फोटो काढताना काय स्पीड ठेवाल? व का?

आपण अतिशय कष्ट घेऊन ही लेखमाला लिहित आहात तेव्हा त्यात माझ्यासारख्यांच्या दृष्टीने काय सुधारणा अपेक्षित आहेत हे सांगितले. तुमचा टारगेट ऑडीयन्सने जर काहि पुर्वाभ्यास करून येणे गरजेचे असेल तर कृपया कळवा.

वरील प्रतिसाद केवळ धन हेतूने लिहिला आहे याची कृपया नोंद घ्यावी
लेखमालेस अनेक शुभेच्छा! आणि धन्यु! :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

कोष्टक

DoF वाढवण्याकरिता...
१] अपर्चर नंबर वाढवा......२ ऐवजी ८
२] जास्त अंतर उत्तम.... ५ फ़ूटाऐवजी १० फ़ूट
३] कमी फ़ोकल लेन्थची लेन्स .... १०५ एमेम ऐवजी ३५ एमेम.

याचं खरंतर एक कोष्टक तयार करू शकतो आपण. म्हणजे ऍपर्चर वाढलं की काय काय कमी जास्त होईल. वगैरे. मी प्रयत्न करतो...असं काही बनवण्याचा.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

समुदायांतर्गत

हा लेख समुदायांतर्गत टाकता येईल काय?





 
^ वर