भाषा आणि परिभाषा

'विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान' या विषयावर एक लेख मी उपक्रमावर दिला होता. या लेखावर बरेच प्रतिसाद आले. विशेषतः प्रियाली आणि धनंजय यांच्यात झालेल्या संवादातून त्यात मोलाची भर पडली. या प्रतिसादांवर विचार करतांना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तिचा थोडासा विस्तार मी या लेखात करणार आहे. 'भाषा' या विषयाचा आवाका तसा खूपच मोठा आहे. मी त्याचा अभ्यासही कधी केलेला नाही. त्यामुळे या लेखाचा विषय फक्त माझ्या पूर्वीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांचा भाषेच्या अनुषंगाने परामर्श घेणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे.

बहुतेक भाषांमध्ये कांही शब्दांना अनेक अर्थ असतात तर कांही वेळा एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात, पण त्या अर्थांना भिन्न छटा असतात. जो शब्द नेहमी वापरात असतो तोच बोलतांना आपल्याला पटकन सुचतो. लिहितांना थोडा विचार करून योग्य असा शब्द लिहिण्याचा प्रयत्न आपण करतो. कधी पुनरुक्ती टाळण्यासाठी किंवा यमक, अनुप्रास वगैरे जुळवण्यासाठी वेगवेगळे शब्द वापरतो. ते वाचकाच्या ओळखीचे नसतील तर त्या शब्दांचा आपल्याला अभिप्रेत अर्थ त्याला न समजण्याचा घोका असतो, पण अशा वेगवेगळ्या शब्दप्रयोगामुळे लेखनाची वाचनीयता वाढते. कांही वेळा श्लेष साधण्यासाठी द्व्यर्थी शब्दांचा कौशल्याने उपयोग केला जातो. एक सभ्यपणाचा आणि दुसरा चावट असे दोन अर्थ निघणारी वाक्ये स्व.दादा कोंडके यांच्या चित्रपटात नेहमी दिसत असत आणि अशा वाक्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने प्रेक्षकांची दादही मिळत असे.

विज्ञान, तंत्रज्ञान, विधी यासारख्या क्षेत्रात आशयाच्या नेमकेपणाला अतिशय महत्व असते. त्यामुळे एकाद्या वाक्यातून दोन अर्थ निघू शकणार नाहीत याची मुद्दाम काळजी घेतली जाते. अनेक पुस्तकांत सुरुवातीला किंवा परिशिष्टांमध्ये त्यातील महत्वाच्या शब्दांची व्याख्या दिलेली असते. एकाद्या माणसाने भररस्त्यात दहा लोकांसमोर दुस-याला भोसकले आणि तो रंगेहाथ पकडला गेला असला तर त्या क्षणापासून सर्वसामान्यपणे तो माणूस 'खुनी' म्हणून ओळखला जातो. पण कायद्याच्या भाषेत तो आधी 'संशयित' असतो, त्याच्यावर खटला भरला गेल्यावर तो 'आरोपी' होतो आणि न्यायालयाने त्याला दोषी ठरवल्यानंतर तो 'गुन्हेगार' समजला जातो असे आपण नाटक, सिनेमे आणि मालिकांमधल्या कोर्टसीन मध्ये पाहतोच.

इंग्रजी भाषेत फोर्स, प्रेशर, स्ट्रेस, थ्रस्ट हे शब्द एरवी साधारणपणे सारख्या अर्थाने वापरले जातात, त्याचप्रमाणे एनर्जी, पॉवर आणि स्ट्रेंग्थ या शब्दांचा उपयोग एकमेकांच्या बदल्यात होत असतो. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिभाषेत यातील प्रत्येक शब्दाची वेगळी व्याख्या आहे आणि समीकरणात वापरण्यासाठी रोमन आणि ग्रीक लिपींमधली विशिष्ट मुळाक्षरेच त्यांचेसाठी वापरली जातात. तिथे एका शब्दाच्या बदल्यात दुसरा घेतला तर गणितच चुकेल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करता करता त्याची परिभाषा कांही लोकांच्या रक्तात भिनत जाते आणि त्यांच्या विचार करण्याच्या किंवा विचार व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत ती गोष्ट जाणवते असे मला वाटते. माझे बहुतेक मराठी भाषिक मित्र वैज्ञानिक किंवा तांत्रिक विषयांवर मराठीत बोलतांनासुध्दा इंग्रजी शब्दांचाच उपयोग
करतात. मी तरी अद्याप त्यांच्यातल्या कोणाच्या तोंडून 'फोर्स' व 'एनर्जी' या अर्थाने 'बल' किंवा 'ऊर्जा' हे शब्द ऐकलेले नाहीत. माझीही हीच परिस्थिती असणार. यामुळे 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन' हे शब्द ऐकतांना त्या शब्दांचे वैज्ञानिक परिभाषेतील अर्थच माझ्या नजरेसमोर येतात आणि त्या अर्थांशी विसंगत असलेल्या गोष्टी मला मान्य होत नाहीत.

नमनाला एवढे घडाभर तेल घातल्यानंतर आपण कांही निवडक प्रतिसाद पांहू. भाषा आणि परिभाषा यांमधली सीमारेषा किती पुसट आहे याचे प्रत्यंतर यात येईल."परंतु व्हायब्रेशन्सचा मानवी मनावर परिणाम होतच नाही असे ठाम सांगणे कठीण वाटले. मधुर संगीत, कर्कश्श संगीत अगदी रातकिड्यांची किरकिर या लहरींचा मानवी मनावर परिणाम घडतो असे वाटते."

ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला संगीत ऐकू येते. ध्वनीचे वहन लहरींमधून होते, तसेच प्रकाशकिरणांचेही होते. आपण डोळ्यांनी प्रकाश पाहतो तसेच कानांनी आवाज ऐकतो. याशिवाय जिभेने चंव घेतो, नाकाने वास घेतो आणि त्वचेला स्पर्श जाणवतो तसेच कंपनेसुध्दा जाणवतात. या सर्व संवेदना वरील ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे जातात, तिथे त्याला त्यांचा अर्थ उमगतो आणि मनामध्ये असलेली आवडनिवड, त्या वेळची मनःस्थिती वगैरेंप्रमाणे त्याविषयी तदनुसार भावना मनात उठतात. पदार्थविज्ञानाच्या दृष्टीने संगीतामधून निघालेल्या ध्वनीलहरींचा फक्त कानापर्यंत झालेला प्रवास महत्वाचा असतो. ध्वनी ऐकण्याचा अनुभव हा प्रत्यक्ष
घडणारा अनुभव असतो. त्यात 'अंतर्ज्ञाना'चा अज्ञात असा भाग नाही. ज्या अजब व्हायब्रेशन्सचा उल्लेख मी माझ्या लेखात केला आहे त्यापेक्षा हा अनुभव सर्वस्वी वेगळ्या प्रकारचा असतो. अंतर्ज्ञानातील व्हायब्रेशन्स थेट बुध्दीला किंवा मनाला जाऊन भिडतात किंवा भाग्यात (म्हणजे नक्की कुठे कोणास ठाऊक) प्रवेश करून त्याला उजळवतात असे म्हणतात! या दोन्ही लहरींची गल्लत करणे योग्य नाही.

"स्पर्शाने उर्जेचे संक्रमण होते हे ही खरे आहेच. ...... हात जोडणे, डोक्यावरून हात फिरवणे, गळाभेट वगैरे गोष्टीतून उर्जा वाहत नाही हे कसे स्पष्ट होते? "

भौतिकशास्त्रातल्या नियमांत ऊर्जेचे जे प्रकार येतात त्यातल्या फक्त वीज व ऊष्णता तेवढ्या स्पर्शामधून संक्रमित होतात. विजेचा धक्का क्वचित आणि अल्पकाळ बसत असल्यामुळे यातून वगळला तरी चालेल. एका व्यक्तीला ताप आला असेल तर ऊष्णता संक्रमित होते, पण तिचे प्रमाण इतके अल्प असते की ताप आलेल्या माणसाचा हात हातात धरल्यामुळे आपला हात गरम झाला असे सहसा जाणवत नाही. थंडीने गारठलेल्या माणसांच्या अंगात स्पर्शामुळे ऊब नक्कीच येते. तेवढ्यापुरते प्रतिसादातले विधान बरोबर आहे. टाळी वाजवणे, शड्डू ठोकणे, बुक्का किंवा थप्पड मारणे अशा क्रियातून जो ध्वनी निर्माण होतो त्यातली ऊर्जा हवेत
विरून जाते. या प्रकारांमधूनसुध्दा फारच थोडी ऊर्जा एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे जाते. स्पर्शामुळे शरीरात जी स्पंदने निर्माण होतात, हृदयाचे ठोके वाढतात त्या प्रकारच्या गोष्टी वाचनातूनसुध्दा घडतात. त्यावेळी कोठलाही बाह्य स्रोत नसतो. त्या शारीरिक क्रियांसाठी लागणारी (भौतिकशास्त्रातली) सर्व ऊर्जा त्या माणसाने खाल्लेल्या अन्नापासून त्याला मिळत असते. अंगात उत्साह भरला, वीरश्री संचारली, शक्तीपात झाला वगैरे गोष्टींचा कॉन्झर्वेशन ऑफ (फिजिकल) एनर्जीशी कांही संबंध नसतो. माणसाच्या मनातला जोम किंवा त्याच्या अंगातली (स्नायूमधली) शक्ती या गोष्टी एनर्जीच्या परिभाषेतल्या व्याख्येत येत नाहीत, पण साध्या भाषेत सर्रास त्यांचा वापर होतो.

"एखादा मनुष्य बोलताना "स्वतःच्या संवेदनशक्तीचा किंवा सहनशक्तीचा" उल्लेख करतो. ही शक्ती नेमकी कशी मोजावी यासाठी भौतिकशास्त्राचे सूत्र किंवा परिमाण लागू होईलच असे नाही."

या वाक्यात 'शक्ती' या शब्दाचा उपयोग 'क्षमता' या अर्थाने केला गेला आहे. विज्ञानाच्या परिभाषेतल्या 'पॉवर' या अर्थाने नाही. ज्या गोष्टीचा उपयोग ज्या परिमाणात मोजला जातो त्याच परिमाणात तिची क्षमता व्यक्त करतात. उदाहरणार्थ : पिपाची क्षमता लीटरमध्ये. कांही गोष्टींची क्षमता सुरक्षित वापराच्या दृष्टीने दिली जाते. लिफ्टमध्ये इतक्याच माणसांनी यावे, पुलावरून एवढ्याच वजनाचे वाहन न्यावे वगैरे. ही जड वस्तूंची उदाहरणे झाली. संवेदनक्षमता किंवा सहनशक्ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मला इतका सूक्ष्म आवाज ऐकू येतो किंवा एवढा उजेड सहन होत नाही. या उदाहरणात आपण डेसिबल किंवा ल्यूमेन ही एकके वापरू शकतो. पण नर्म विनोद समजणे किंवा संताप सहन न होणे अशा गोष्टीत विनोद आणि संताप या अंकात न मोजता येणा-या बाबी आहेत. या गोष्टींचा अनुभवाने अंदाज बांधू शकतो पण तो व्यक्त करता येत नाही. मुलाच्या बौध्दिक विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी त्याची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वगैरे मोजण्याच्या पध्दती निघाल्या आहेत. अमूक इतक्या प्रश्नांची अमूक इतक्या वेळात बरोबर उत्तरे देण्यावरून त्या मुलाचे बुध्द्यांक काढले जातात. या उदाहरणातही भाषा आणि परिभाषा यातला भेद दिसतो.

"पण त्या नीट समजण्यासाठी उच्च दर्जाच्या गणिताची बैठक तसेच जेवढी कुशाग्र बुध्दीमत्ता लागते त्यांची अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून करता येणार नाही.
हे वाक्य पटले नाही, पण बहुधा केवळ शब्दांच्या निवडीतला फरक असावा."

आईन्स्टाईनचा सापेक्षतेचा सिध्दांत सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शिकवला जात नाही हा माझ्या लिखाणातला महत्वाचा मुद्दा होता. तो कां शिकवत नाहीत याचे एक कारण माझ्या अंदाजाने मी दिले होते. ते दिले नसते तरी चालले असते. सगळ्याच माणसांना परमेश्वराने ( किंवा निसर्गाने) भरपूर ग्रे सेल दिलेले असतात, पण मेंदूमधल्या फारच थोड्या पेशींचा माणूस प्रत्यक्षात वापर करतो असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार माझी शब्दरचना परफेक्ट नाही. हा शब्दांच्या निवडीतला फरक मला मान्य आहे.

"उर्जा कशाकशातून निर्माण होते हे शास्त्रीय दृष्ट्या सांगता येत असेल, पण काही उर्जा / कंपने त्याचा परिणाम शरिरावर होतो याचे विश्लेषण करता येते का ? आणि त्यामुळे खरे विज्ञान बाजूला पडेल की माहित नाही पण अशा उर्जांबद्दल अनेकदा आपण ऐकत असतो, मला उल्लेख करण्याचा मोह होतो तो 'रेकी' या उर्जेचा... क्षणभर अशी एक उर्जा बाहेर पडते असे ग्रहीत धरले तर त्याच्या आदराबरोबर विश्लेषण केले पाहिजे म्हणजे विज्ञानाची वाट मोकळी होईल असे वाटते."

ऊष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत आदि ज्या उर्जांचा विचार विज्ञान व तंत्रज्ञानात केला जातो त्यांचा मानवी शरीरावर कसकसा आणि किती परिणाम होतो याबद्दल फार पूर्वीपासून संशोधन होत आले आहे आणि ते चाललेच राहील. यातील निष्कर्ष प्रसिध्द केले जातात एवढेच नव्हे तर त्या आधारांवर त्या ऊर्जेचा वापर करण्यावर प्रतिबंधात्मक नियम केले जातात. विजेचा प्रवाह, बॉयलरमधील वाफेचा दाब, किरणोत्सर्गी स्रोतांचा वापर याबद्दल कायदे केलेले आहेत. भौतिकशास्त्रात ऊर्जेचे मापन तिच्या दृष्य परिणामांवरून केले जाते. थर्मॉमीटरमधील पा-याचे प्रसरण, विद्युतचुंबकीय परिणामामुळे सुईचे फिरणे वगैरेंची उपकरणांद्वारे मोजमापे घेऊन त्या ऊर्जेची तीव्रता ठरवली जाते.
रेकी, फेंगशुई, वास्तूशास्त्र यासारख्या शास्त्रांच्या क्षेत्रामध्ये 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' या शब्दांचा जो उपयोग केला जातो त्या संकल्पनाच वेगळ्या असतात. त्या शुध्द, अशुध्द, लाभदायक, हानिकारक वगैरे असतात आणि तडक मनाला किंवा भाग्याला जाऊन भिडतात. त्यांना भौतिकशास्त्राचे कोणतेच नियम लागू पडत नसल्यामुळे त्या बाह्य उपकरणांद्वारे कशा मोजता येणार? त्यातले तज्ज्ञ जे सांगतील तेवढेच आपण ऐकू शकणार. याबाबतीतली त्यांची परिभाषाच वेगळी असते.

परीकथांमध्ये एक वेगळी परिभाषा असते. त्यातल्या प-या, राक्षस आणि चेटकिणी त्यातल्या संकल्पनांप्रमाणे वागतात. पण ते काल्पनिक असते हे लहान मुलांनादेखील ठाऊक असते. माझ्या लहानपणी ज्या धार्मिक कथा सांगितल्या जात असत त्यांचीसुध्दा एक विशिष्ट परिभाषा होती. वरदान, शाप, दृष्टांत, सिध्दी, मंत्रतंत्र, अंतर्ज्ञान, दिव्यदृष्टी, पापक्षालन, पुण्यसंचय, पूर्वजन्म अशासारख्या संकल्पनांमधून सगळ्या चमत्कारांचे व्यवस्थित स्पष्टीकरण केले जात असे. त्याबद्दल शंका घेण्याची कोणाची प्राज्ञा नसे. त्या कथांचा दाखला देऊन रोजच्या जीवनात घडणा-या घटनांची चर्चा केली जात असे. कांही लोक मंतरलेला गंडा, दोरा वगैरे बांधत, अंगारा लावत आणि त्यापासून आपले संरक्षण होईल किंवा भरभराट होईल अशी त्यांची श्रध्दा असे. हे नेमके कसे घडते ते समजण्याची तेंव्हा आवश्यकता नव्हती. शिक्षणाच्या प्रसारानंतर लोकांना थोडे प्रश्न विचारायचे धैर्य आले आहे. तसेच फेंगशुई व रेकीसारख्या कांही विद्या परदेशातून आल्या आहेत. कदाचित त्यामुळे 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' अशा सायंटिफिक व आधुनिक वाटणा-या शब्दांचा उपयोग करणे सुरू झाले असावे.

एका प्रतिसादात "अस्पृश्य असे कांहीच नाही " असे म्हंटले आहे. त्याच्याशी मी सहमत आहे. माझ्या लेखात लिहिल्याप्रमाणे माझ्या ज्ञानज्योतीच्या मिणमिणत्या उजेडात जेवढे मला स्पष्ट दिसते ते 'आहे' असे मी खात्रीपूर्वक सांगू शकेन, जे अस्पष्ट दिसते ते 'असावे' असे वाटते आणि त्याच्या पलीकडले काही दिसतच नाही. तिथे काय काय आहे याची मला कल्पना नाही. त्यामुळे 'आहे' आणि 'नाही' यांच्या दरम्यान 'कदाचित असेल' ते 'बहुधा असावे' यांच्या एक ते नव्व्याण्णऊ टक्के इतक्या शक्यता असतात. "रेकी, फेंगशुई, वास्तूशास्त्र यासारख्या शास्त्रांपासून आपल्याला खूप फायदा झाला" असे सांगणारे लोक आपल्याला भेटतात. हा त्यांचा प्रत्यक्ष आलेला अनुभव असल्यास त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. हे नेमके कशामुळे घडते हे आपल्याला समजायलाच पाहिजे असेही नाही. कारचे हँडल फिरवल्यावर त्यामुळे अख्खी कार कशी फिरते हे किती लोकांना माहीत असते? पण त्यांना कार चालवता येते. क्रोसिनच्या गोळीने ताप कसा उतरतो हे आपणास माहीत नसते, पण तो उतरतो असे दिसते. त्यामुळे ज्यांना जी विद्या अवगत असेल तिचा त्यांनी (चांगल्या कामासाठी) उपयोग करावा हे सांगायची गरज नाही कारण ते लोक तो करतच असतात. पण असे विशेषज्ञ जी भाषा वापरतात ती विज्ञानातल्या परिभाषेपेक्षा वेगळी आहे याची जाणीव ऐकणा-याने ठेवावी. म्हणजे त्याची दिशाभूल होणार नाही.

'एनर्जी' या नांवाचे एक शीतपेय आहे, कांही लोक आपल्या मुलांना किंवा दुकानांना 'ऊर्जा', 'तरंग' वगैरे नांवे देतात. त्यांना विज्ञानाच्या परिभाषेतल्या या संकल्पनाचे नियम लागू पडत नाहीत. त्यांचे विश्व वेगळे असते. मात्र 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' यासारख्या विज्ञानाच्या परिभाषेतल्या शब्दांचा उपयोग करून त्यातून झटपट आणि हमखास यश, सुख, संपदा वगैरे सबकुछ देऊ करणारे कांही आकर्षक मार्ग आता आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारच्या मार्गाकडे डोळसपणे लक्ष देऊन त्यावरून प्रवास केल्यास फसगत होण्याची शक्यता टाळता येईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान लेख

लेख आवडला.
राधिका

स्पष्ट गोषवारा

तितकाच विचारपूर्ण.

खुलासा

"आपला लेख वाचला परंतु नेमके आपणास काय प्रतिपादन करावयाचे आहे ते कळले नाही. समारोपात आपण ते सांगु शकले असते असे नकळतच वाटते.
लेख बहुधा मुक्त चिंतन आहे असा वाटतो आणि आपण अनेक गोष्टीचा स्वतंत्र आणि परास्परावंबी गोष्टीचा मागोवा घेतला आहे असे वाटते."
असा एक व्य. नि. मला आला आहे.
माझी भूमिका मी प्रस्ताविकातच मांडली आहे असे मला वाटले होते. कोठल्याही शब्दाचा जो अर्थ माणसाला परिचित असतो तोच त्याच्या लक्षात येतो. याचे एक उदाहरण देतो. इंग्लंडमध्ये रहात असलेल्या एका छोट्या मुलीला मी काऊची गोष्ट सांगितल्यावर काऊ कसे बोलतो असे विचारले. तिने मान खाली वळवून मूऊऊऊ असे हंबरून दाखवले. तिला काऊ म्हणजे गोठ्यातली गायच माहीत होती.
माझा लेख मी एका विज्ञाननिष्ठाच्या भूमिकेतून लिहिला होता तर त्यावरील कांही प्रतिसाद सर्वसामान्य वाचकाच्या भूमिकेतून आले होते. त्यामुळे त्यांत थोडा विसंवाद होता. त्या जुन्या झालेल्या लेखावर मी मोठी प्रतिक्रिया दिली असती तर ती कदाचित वाचली गेली नसती म्हणून नवीन लेख लिहिला.

क्लिक


इंग्लंडमध्ये रहात असलेल्या एका छोट्या मुलीला मी काऊची गोष्ट सांगितल्यावर काऊ कसे बोलतो असे विचारले. तिने मान खाली वळवून मूऊऊऊ असे हंबरून दाखवले. तिला काऊ म्हणजे गोठ्यातली गायच माहीत होती.


अगदी अचुक वर्णन. आपापल्या मानसिकतेतुन आपली भुमिका ठरते व त्या चष्म्यातुन् आपण पहातो. कधी मुड नुसार चष्मा बदलतो देखील पण ते जाणिव पुर्वक.एखाद्या गोष्टीतुन कुणाला काय क्लिक होईल तर कुणाला काय क्लिक होईल.
प्रकाश घाटपांडे

डबल क्लिक

आपापल्या मानसिकतेतुन आपली भुमिका ठरते व त्या चष्म्यातुन् आपण पहातो. कधी मुड नुसार चष्मा बदलतो देखील पण ते जाणिव पुर्वक.एखाद्या गोष्टीतुन कुणाला काय क्लिक होईल तर कुणाला काय क्लिक होईल.

लेखातील भा. पो. आणि लेख आवडला.

 
^ वर