महा विष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर
महा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर !
सातएकशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक मोठा चमत्कार घडला.एका नाथपंथीय बालयोग्याने सोळाव्या वर्षी गीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहली. त्या नंतर अनुभवामृत व चांगदेव पासष्टी यांसारखे अद्वैतावरील ग्रंथ लिहून,एवढे पुरेसे नाही म्हणून, विठ्ठल भक्तांकरिता शेकडो रसाळ अभंग लिहले व बाविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली !
हे आश्चर्यकारक आहे पण "चमत्कार" म्हणण्यासारखे नाही. भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेच आहे की " यदा कदाचित ज्ञानी भक्ताने परत जन्म घेतलाच तर पूर्व जन्मातील त्याचे पूर्व सुकृत,ज्ञान,अभ्यास, सर्व काही बरोबर घेऊनच तो जन्माला येतो ". एखाद्या विलक्षण बुध्दीमत्तेच्या प्रतिभावंत माणसाने शंभर वर्षात महा प्रयत्नाने मिळवावे असे सर्व काही ज्ञानेश्वरांकडे जन्मजात होते. मान्य. मी भगवंतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो. आद्य शंकराचार्यांचे दुसरे उदाहरण आपल्या समोर आहेच.
मला पडलेले कोडे असे : ज्ञानेश्वर महाराजांची गुरु परंपरा नाथ पंथियांची,दैवत शिव, योगाला महत्व, ज्ञानालाच मोक्ष समजणारे. तर हा, ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव ,भोळ्या-भाबड्या,अडाणी,केवळ नाम-महात्म्य मानणारया,फ़क्त विठ्ठल दैवत समजणाया,वैष्णव पंथियांच्या सहवासात आलाच केंव्हा आणि कसा ? आणि का ? केवळ शैव आणि वैष्णव हा महत्वाचा मुद्दा नाही कारण दोनही बाजू हरीहरांमध्ये एकरूपपणा पाहण्याइतक्या सुजाण होत्या. पण तरीही एक मूलभूत फ़रक रहात होताच; तो म्हणजे द्वैत-अद्वैत विचारसरणीचा. ज्ञानेश्वर अद्वैत भुमिकेवर ठाम होते तर वारकरी द्वैतापासून तसूभर हलावयास तयार नव्हते.विठ्ठल भक्तीपुढे त्यांना स्वर्ग सोडाच ,मोक्षही कस्पटासमान होता. तर ह्या दोन टोकांची गाठ केंव्हा पडली ?
जरा वेळेचा हिशेब लावू. ज्ञानेश्वरी,चांगदेव-पासष्टी व अनुभवामृतामध्ये विठ्ठलाचा उल्लेख नाही.म्हणजे तोवर यांची भेट नाही. नाहीतर ज्ञानेश्वरांनी नक्कीच तसा उल्लेख केला असता. सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहली व नंतर अनुभवामृत .म्हणजे अठराएक वर्षे गेली. बाविसाव्या वर्षी संजीवन समाधी. उरली मधली जेमतेम तीन चार वर्षे.त्यातील तीर्थावळीचे वर्ष-सहामहिने सोडले तर किती अवधी उरला ?
ह्या भावंडांच्या व नामदेवांच्या पहिल्या भेटीत भाऊ जरी अदबीने वागले-बोलले असले तरी फ़टकळ मुक्ताबाईने नामदेवांचे पाणी जोखून त्यांची अवहेलनाच केली.नामदेवाला पळता भूई थोडी झाली.श्री विठ्ठलाच्या कान उघडणीने त्यांना आपली तृटी लक्षात आली व त्यांनी व पर्यायाने सर्व वारकरी पंथाने आपल्या विचाराच्या तत्वज्ञानाचा पाया म्हणून ज्ञानेश्वरीचा स्विकार केला. याला तीन चार वर्षे पुरतील ? शक्यता आहे.
हा झाला वारकरी पंथाच्या बाजूने विचार. ज्ञानेश्वरांच्या बाजूने काय झाले असावे ? गहिनिनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितले कीं " हे नाथ पंथाचे समाधीधन तुला देत आहे, ते कली युगातील अडाणी, भाबड्या लोकांचा उद्धार करण्यासाठी ". ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. शिवसुक्तांवर टीका लिहायाऐवजी गीतेवर, मराठीत लिहली. पण नंतर त्यांच्या लक्षात आले असावे की अजूनही समाजाचा एक मोठा भाग, वारकरी पंथ, बाजुलाच राहिला आहे. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन, विठ्ठलाला भीड घालून, नामदेव व इतर वारकरी संतांना तीर्थयात्रेला यावयास भाग पाडले व त्या कालावधीत अद्वैत- भक्तीचा मेळ त्यांना पटवून दिला. शक्य आहे. तीनएक वर्षे पुरेशी आहेत. हे झाले माझे मुक्त विचार. याला अर्थातच ऐतिहासिक पुरावे नाहित. नव्हे, तसे मिळण्याची शक्यताही कमी. [हा disclaimer प्रियालीताईंकरता, एकदा आपली जिरली तेवढे पुरे !] माझ्यापुरता एवढा खुलासा, संत साहित्याच्या अल्प वाचनाने मिळालेला, पुरेसा आहे. कोणी अभ्यासू यात भर घालून मार्गदर्शन करेल तर उत्तमच.
हे झाले नमन.मी "चमत्कार" ह्याला म्हणत नाही. वारकरी पंथात विठ्ठलाला विठाई, विठूमाऊली म्हणतात. तितक्याच प्रेमाने,जिव्हाळ्याने ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरमाऊली म्हणतात. आता हा विशीतला, तरुण मुलगा ! त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या ,निरनिराळ्या जाती-जमातीतील,वेगवेगळ्या ठिकाणच्या, वारकरी पंथातील सर्वांनी त्याच्या इतक्या प्रेमात पडावे ? हा नुसता प्रेमाचा प्रश्न नाही, ठाम विश्वासाचा आहे. ही माझी आई आहे,केव्हाही पडलो तर मला उचलून घेईल असे वाटण्याइतका जिव्हाळा, आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे.आणि हे सर्व तीन वर्षांच्या अल्प काळात. त्या काळात चमत्कार होऊ शकतात यावर जनसामान्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यामुळे ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद म्हणवले,भिंत चालवली, हे सर्वांनी स्विकारून त्यांना विष्णूचा अवतार म्हणून मान्यता दिली असेल. पण " माऊली ’ ही पदवी मिळवण्यास हे पुरेसे नव्हते. चांगदेवांनी साक्षात मृत्युला चवदा वेळा माघारी पाठवले होते.पण त्यांना कोणी माऊली म्हणत नव्हते. ज्ञानेश्वरांनी
अशी काय किमया केली असावी ?
ह्या विषयावर चर्चा चालली असताना एक मित्र म्हणाले, " ही कालांतराने घडलेली गोष्ट असावी. एका पिढीतील दहांनी माऊली म्हटले,दुसया पिढीतील वीसांनी." नाही, मी ज्ञानेश्वरांच्या समकालीनांबद्दल बोलतो आहे. नामदेवांना सोडून द्या. त्यांचे विठ्ठलावर जेवढे प्रेम होते, भक्ती व श्रध्दा होती तेवढीच ज्ञानेश्वरांवर. त्यांनी दोघांच्या आरत्या लिहल्या.तीर्थावळी व समाधी सोहळ्यावर दोनशेपेक्षा जास्त ओव्या लिहल्या. समाधीनंतर ते इतके उदास झाले की त्यांनी विठ्ठलाला गळ घातली की मला परत एकदा ज्ञानेश्वरांना बघावयाचे आहे. देव म्हणाले " देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे " नामदेव म्हणाले " तुझे ब्रह्मज्ञान तुझ्याकडे ठेव, मला ज्ञानेश्वर बघायचे आहेत."
जनाबाई एक दासी. ज्ञानेश्वर हे विष्णूचे अवतार हे तीला मान्य. पण ती नि:संकोचपणे काय म्हणते पहा " महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्चर " माझा सखा ! काय विश्वास,काय अभिमान ! आणखी एक अभंगात जनाबाई म्हणते " ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायी ! धावोनिया येई दुडदुडा !!
बंका महार हा चोखामेळ्याचा मेहुणा. तो म्हणतो " ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली "
भागू महारीण म्हणते " कृपेच्या सागरा मायबापा ज्ञानेश्वरा "
सेना न्हावी म्हणतो "ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भवव्यथा ज्ञानदेव "
आजकालच्या "महाराजां " भोवतीही अपार जनसमुदाय जमतो.पण त्या सर्वांना महाराजांपासून काहीतरी पाहिजे असते.पण वरील सर्व जणांना विठ्ठल भेटलेला होता. त्यांना ज्ञानेश्वरांकडून काही मिळवावयाचे नव्हते. एका प्रेमाशिवाय, आशिर्वादाशिवाय !
मी यालाच म्हणतो " चमत्कार "
समित्पाणी
Comments
ज्ञानेश्वर माउली
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराजमा वली तुकाराम! हे पद जेव्हा मी गावाकडे ऐकायचो त्यावेळी हा तोडलेला मा वली शब्द लक्षातच यायचा नाही. कारण टाळ पखवाजाच्या साथीला ताल व लय यात शब्द बुडून जायचे. एखादा तद्दन वारकरी संप्रदाय मधील माणसाला (गंटिळा लावलेल्या= गंध टिळा) माउली म्हटले जायचे.
प्रकाश घाटपांडे
सद्गुरुनाथ माझे आई। मजला ठाव द्यावा पायी ॥
शरदराव,
फार चांगला अभ्यासपूर्ण आणि विचारात पाडणारा लेख. ज्ञानेश्वर आणि वारकरी संप्रदाय यांचे समयसारणीनुसार नाते मी प्रथमच वाचले. त्यामुळे नवेच काही लक्षात आल्यासारखे वाटत आहे.
आता माउली विषयी. आत्मज्ञानी मनुष्य हा प्रेमस्वरुप होतो असे वाचले आहे. संत (उदा. गोंदवलेकर महाराज) म्हणतात की त्यांच्यातून प्रेम काढून टाकले तर काही शिल्लकच राहत नाही. अश्या प्रेमस्वरुप माणसाची महती त्वरित आसपासच्या ज्ञानी माणसांना पटत आसेल असे निश्चित. तसेच ही प्रचिती या ना मार्गाने आसपासच्या सामान्यजनांनासुद्धा येतेच. अश्याच वेळेस बहुधा ती व्यक्ती हयात असतानाच. लोक तीला माउली म्हणू लागत असावेत. (खर्या प्रचितीमुळे ! न की नुसत्या मौखिक प्रचारामुळे !)
पसायदान मागणारे ज्ञानदेव प्रेमाची मूर्ती असणार हे खचितच. म्हणूनच समकालिनच त्यांना माउली म्हणू लागले असावेत. लोकांनी एखाद्याला (विशेषतः पुरुषाला त्यात लहान वयाच्या) त्याचे जगाप्रती ओसंडणारे प्रेम पाहून माउली म्हणावे हा त्याचा सर्वोच्च सन्मान आहे असे मला वाटते.
-- लिखाळ.
विचारात टाकणारा लेख
माझ्या मनांतील प्रश्नांना अगदी योग्य मूर्त स्वरूप दिले आहे.
फारच सुंदर लेख. कोडे उलगडत आहे असे वाटताना अधिकाधिक कोड्यात पाडणारा. ज्ञानेश्वरांविषयी जे वाचनात येते त्यात चमत्कारांचा भरणा आहे हे वेगळे सांगायला नकोच परंतु तत्कालीन राजे, संत आणि इतर अनेकजण चमत्कारी(क) होते किंवा चमत्कार करता येणे म्हणजे ईश्वराशी जवळीक असणे अशी समाजधारणा होती.
एका कोवळ्या युवकाला जाती-पातींची बंधने तोडून सर्वांनी माऊली म्हटले, त्यांची महती मान्य केली ही गोष्ट खचितच कोड्यात टाकणारी आहे.
लेखाबद्दल धन्यवाद.
बराच गोंधळ
ज्ञानेश्वर अद्वैती म्हणजे योगी आणि वारकरी द्वैती म्हणजे भक्त या मांडणीत बराच गोंधळ आहे. ज्ञानेश्वरीच्या ६ व्या अध्यायात जे वर्णन आहे त्यावरून ते योगी होते हे निश्चित आहे. पण ९ व्या अध्यायात सगुण भक्तीचेही रसाळ वर्णन आहेच. ज्ञानेश्वर भक्त होते हे नक्की. पण विठ्ठलभक्त होते की नाही याबद्दल शंका आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी इतकेच काय हरिपाठातही विठ्ठलाचा उल्लेख नाही. तसेच ज्ञानेश्वरी - अमृतानुभवाची भाषा आणि "पैलतोगे काऊ" सारख्या अभंगांची भाषा यावरून शिवराम एकनाथ भारदे यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर दोन असावेत असा निष्कर्ष काढला होता तो ज्ञानेश्वरी - अमृतानुभव् ज्याने वाचला आहे त्याला तरी पटेल. दुसरे ज्ञानेश्वर ज्यांनी मुख्यतः अभंग लिहिले ते नामदेवाला समकालीन असावेत. संन्याशाची मुले, समाजाकडून छळ आणि लहान वयात् समाधी या गोष्टी दुसर्या ज्ञानेश्वरांबाबत असाव्यात. पहिल्या ज्ञानेश्वरांबद्दल त्यांनी ज्ञानेश्वरी - अमृतानुभव, कदाचित् चांगदेवपासष्टी लिहिली आणि निवृत्तीनाथ त्यांचे गुरू होते यापेक्षा जास्त माहिती नाही.
माझे असे मत झाले आहे की वारकरी पंथाचे लोक ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरांवर आपलाच एकमेव अधिकार असल्यासारखे दाखवतात. ज्ञानेश्वरीत फक्त ९ वा अध्यायच कसा महत्त्वाचा आहे ते सांगतात. कारण त्यात त्यांना सोयिस्कर असा भक्तियोग सांगितला आहे. "माऊली" म्हणून गहिवर काढतात. ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्त्वात प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभा असे तीन पैलू आहेत. त्यापैकी फक्त प्रेमावरच अवाजवी भर देऊन "माऊली" म्हणून गहिवर काढणे मला तरी पटत नाही. "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" असे सांगणार्या खुद्ध शंकराचार्यांचा सुद्धा "म्हणौनि जग परौते | सारुनि पाहिजे माते| ऐसे नव्हे उखिते | आघवेचि मी | " (अर्थ - जग बाजूला सारून मला पहावे हे म्हणणे योग्य नाही, सगळेच मी आहे) अशा शब्दात प्रतिवाद केला आहे. तर अमृतानुभवात "अ़ज्ञानखंडन" हे अख्खे प्रकरण शंकराचार्यांच्या मायावादाचा प्रतिवाद करण्यासाठी खर्च केले आहे.
आणखी एक म्हणजे ज्ञानेश्वरी - अमृतानुभवकार ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली असेल हे पटत नाही. उगीच चमत्कार म्हणून कशावरही विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. त्यामुळे संन्याशाची मुले, समाजाकडून छळ, तरीही अलौकिक प्रतिभेने ग्रंथ निर्मिती आणि लहानवयात समाधी याबद्दल गहिवरून बोलण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे वस्तुनिष्ठ आकलन करून घेणे महत्त्वाचे आहे. नाथपंथी शैव परंपरेतील एक तत्वज्ञ अभिनवगुप्त याचा ज्ञानेश्वरांवर प्रभाव होता हे नरहर कुरूंदकरांनी लिहिले आहे. (आणखी एक मजेची गोष्ट म्हणजे रजनीशांनी "संभोगातून समाधी" हे तत्वज्ञान याच अभिनवगुप्ताकडून घेतले आहे असेही कुरुंदकरांनी सिद्ध केले आहे). तसेच एके ठिकाणी ज्ञानेश्वरीत "सूर्य पृथ्वीभोवती फिरतो" असे लिहिले आहे ती ओवी आर्यभटाच्या श्लोकाचे जवळपास शब्दशः भाषांतर आहे यावरून गीताभाष्य लिहितानाही त्यांनी "आर्यभटीय" वाचले होते हे लक्षात येते. ज्ञानेश्वरांनी संदर्भसूची दिलेली नाही पण स्वतःचे वाचन जितके वाढवू तितकी ज्ञानेश्वरी जास्त समजते असा अनुभव आहे.
संदर्भ - सोनोपंत दांडेकरांची ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर दर्शन - दोन खंड, महाराष्ट्र संस्कृती - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी ज्ञानेश्वरांवर लिहिलेला लेख , कुरुंदकर लेखसंग्रह, कालनिर्णय - वर्ष आठवत नाही पण म. वा. धोंड यांनी एक अप्रतिम लेख लिहिला होता, तसेच मनोगती राधिकेने दाखवून दिलेले ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि आर्यभटीयातल्या श्लोकातील साम्य
विनायक
श्री.विनायक यांचा प्रतिसाद
शरद
श्री.विकास यांनी माझ्या एका छोट्या लेखामध्ये बराच वैचरिक गोंधळ आहे असा आरोप केला आहे. माझ्या समजुतीप्रमाणे पुढील ६ गोष्टींबद्दल विचार करावयास हरकत नाही.
१] ज्ञानेश्वर योगी म्हणजे अद्वैती... वारकरी द्वैती म्हणजे भक्त... हा वैचारिक गोंधळ आहे.
मी असे कुठेही म्हटले नाही. योगाचे अनेक प्रकार आहेत. उदा.ज्ञान,भक्ती, राज,हठ,लय, कर्म इत्यादि.यामधील एखाद्यात प्रविण्य मिळवणारा तो योगी. लगेच तो अद्वैती होत नाही. पातंजल योगशास्त्राने सांख्यांच्या २४ तत्वांत ईश्वर हे २५ वे तत्व घातले. अद्वैतातील ब्रह्म हे ईश्वराहून निराळे असल्याने दोन्ही विचारसरणीत मूलत; भेद आहेच. माझे म्हणणे
ज्ञानेश्वर बालयोगी, ज्ञानी,अद्वैती,,. याचा अर्थ योगी म्हणजे अद्वैती असा होत नाही. दुसरे उदा. घ्या. रमेश तरूण,देखणा प्राध्यापक आहे. याचा अर्थ तरूण म्हणजे प्राध्यापक किंवा देखणा म्हणजे प्राध्यापक असा होतो कां ? तसेच वारकऱ्यांबद्दल. ते ठामपणे द्वैताच्या बाजूचे. त्यांनी मोक्षाला झिडकारले कारण वैकुंठात सरूपता मिळाली तर भक्ती कुणाची करणार ?
न लगे मुक्ती... कारण मी आणि माझा पंढरीतला विठ्ठलच बरा. म्हणजे ते भक्त आणि द्वैती आहेत, द्वैती म्हणून भक्त नाहित.
२] ज्ञानेश्वर एक की दोन ? हा वाद विसाव्या शतकातल्या विद्वानांसाठी. माझे वारकरी ज्ञानेश्वरांचे समकालीन. त्याना श्री. भारदे यांसी देणेघेणे नाही. श्री. वारदे यांना त्यांच्या समकालिनांनी उत्तरे दिलेली आहेतच. मुद्दा ज्ञानेश्वरांच्या समकालीनांनी माऊली म्हणावयाचा आहे.
३] प्रेम-प्रज्ञा-प्रतिभा...... प्रेमावर अवाजवी भर देऊन गहिवर काढणॆ .....
ज्ञानेश्वरांकडे तीनही होते. तुम्हाला प्रतिभा आवडली...तुम्ही ज्ञानेश्वरीतील लालित्याचे कौतक करा. नको कोणी म्हटले ? [ फ़क्त माऊलींकडे ध्यान द्या... त्यांनी बहिरंगाला भुलून अंतरंगाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या असे सुचवले आहे!] साहित्यशास्त्र न वाचलेल्या अडाण्याने प्रेमाकडे मन गुंतवले तर त्याला हिणवू नका हो. आई दिसली नाही
म्हणून आक्रोष करणाऱ्या बालकाला " तू आईवर अवाजवी प्रेम करून गहिवर काढत आहेस " असे म्हणणे सूज्ञांना शोभादायक दिसत नाही.
४] फ़क्त नवव्या अध्यायात भक्ती आहे ...
हे मत टिकण्यासारखे नाही. नवव्यात सुरवात झाली. पुढील अध्यायातील उदाहरणे देत बसण्याऐवजी कलषाध्याय घेऊ.
ज्ञानिये इयेते स्वसंवित्ति !शैव म्हणति शक्ति !
आम्ही परमभक्ति ! आपुलीए म्हणो !! १८.११३३
पै माझे सहज स्थिती ! भक्ति नाम !! १८.१११३
ऐसा हा सहज माझा ! प्रकाशु जो कपिध्वजा !!
तो भक्ति या वोजा ! बोलिजे गा !! १८.१११७
ही उदाहरणे द्यावयाचे कारण येथे भक्तीला सर्चोच्च पदावर नेऊन ठेवले आहे.
५] .... सोळाव्या वर्षी लिहली पटत नाही....
सोळाव्या वर्षी लिहली हे समकालीनांचे मत. लिहली नाही याला पुरावा नाही. पटणे न पटणे हा वैयक्तिक विचार. प्रत्येकाच्या कुवतीवर अवलंबून असलेला. जेंव्हा ज्ञानेश्वर-तुकाराम यांपैकी कोण श्रेष्ठ असा वाद सुरु झाला तेंव्हा आठवण झाली "सातवी नापास शिक्षण महर्षींची, जे आपल्या संस्थेच्या कॉलेजच्या प्राचार्यपदासाठी अर्ज केलेल्याPh D उमेदवारांची परिक्षा घेतात "
६] अभिनव गुप्ताचा प्रभाव..इत्यादी
याचा लेखाशी काय संबंध ? ज्ञानेश्वरांनी आपल्या अभ्यासात अभिनवगुप्त, शंकराचार्य, उपनिषदे, सर्वांचाच अभ्यास केला, आपल्याला आवडले-पटले त्याचा स्विकार केला,नाही ते हळूवारपणे बाजूला सारले.त्याचे खंडन केले नाही. [अवांतर : कोलबेरसाहेब निकॉन कॅमेऱ्याने फ़ोटो काढतात. त्यांनी काढलेल्या चित्राचे रसग्रहण करतांना मी लिहणार "सोनीपेक्षा कॅननच्या लेन्सेस चांगल्या असतात " इति अलम ].
उपक्रमवर लिहतांना थोडी [नवी] माहिती थोडे मनोरंजन, असा साचा असतो. हे लेखन भा, इ,सं.मं च्या त्रैमासिकाकरता नव्हे.
समित्पाणी
अभ्यासपूर्ण लेख !!!
शरदराव,
आपले लेख अभ्यासपूर्ण असतात, विचार करायला लावणारे ते आम्हाला आवडतात.
पंढरीचा भक्तिसंप्रदाय ज्ञानेश्वर-नामदेवच्याकिती तरी अगोदर होता. पंढरपूर क्षेत्र व पांडुरंग यांच्या अस्तित्वाचे पुरावे शिलालेख ताम्रपटात मिळतात. 'ज्ञानदेवे रचिला पाया' याचा अर्थ पूर्वापार चालत आलेल्या पंढरीच्या भक्तिसंप्रदायाला अधिक कार्यक्षम केले. सगुण भक्तीला अद्वैत तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान दिले.
कोणत्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, याचा विचार करतांना ज्ञानेश्वरांची हयात ही जवळपास पंचवीस वर्षाची ( जन्म इ. स. १२७१ व समाधी १२९६) * याची नीट संगती अभ्यासकांनी लावलेली आहे.
सन्यासोत्तर गृहस्थाश्रम, ज्ञानेश्वर भावंडानी पैठणला शुद्धिपत्र मिळवायचा प्रयत्न, योगबलाने दिपून गेलेली ब्राम्हण मंडळी, त्यांना दिलेले शुद्धीपत्रक, मौजीबंधनाचा अधिकार नाकारल्यावर, येतांना त्यांनी नेवासे येथे ( इ.स.१२९० ला) 'ज्ञानदेवी' व 'अमृतानुभव' हे ग्रंथ लिहिले. पुढे चांगदेवासारख्या योग्याचे गर्वहरण केले. नंतर नामदेव आणि इतर वारकरी संताबरोबर उत्तरेकडे तिर्थयात्रा केली आणि पंढरीच्या दर्शनानंतर इ. स. १२९६ ला समाधिस्त झाले.
याचा अर्थ वयाच्या १९ वर्षी त्यांनी ज्ञानेदेवी लिहिली. ( हे काही आमचे संशोधन नाही,त्याचा अभ्यास या पुर्वीच झाला आहे. )
आळंदीचे ज्ञानेश्वर व आपेगावचे ज्ञानदेव या दोन व्यक्ती आहेत या विषयी जन्मस्थळ, गुरुपरंपरा, पंथ,शिष्यसंप्रदाय असे मुद्दे उकरुन श्री भारदे यांनी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न् केला पुराव्या अभावी ते सिद्ध झाले नाही.
विठठलाच्या कणवयुक्त भक्तप्रेमाची सगुण साकार मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वर.सौजन्य, कारुण्य, क्षमाशीलता, दयाळूपणा औदार्य असे सर्वगूण संपन्न असे व्यक्तित्व ज्ञानेशांचे त्यामुळेच सार्या संतमंडळीनी त्यांना 'माऊली' ही पदवी दिली असावी.
*संदर्भ : प्राचीन मराठी वाडःमयाचे स्वरुप - ह. श्री. शेणोलीकर. पृ. ४२
उत्तर
प्रेम-प्रज्ञा-प्रतिभा...... प्रेमावर अवाजवी भर देऊन गहिवर काढणॆ .....
ज्ञानेश्वरांकडे तीनही होते. तुम्हाला प्रतिभा आवडली...तुम्ही ज्ञानेश्वरीतील लालित्याचे कौतक करा. नको कोणी म्हटले ? [ फ़क्त माऊलींकडे ध्यान द्या... त्यांनी बहिरंगाला भुलून अंतरंगाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या असे सुचवले आहे!] साहित्यशास्त्र न वाचलेल्या अडाण्याने प्रेमाकडे मन गुंतवले तर त्याला हिणवू नका हो. आई दिसली नाही
म्हणून आक्रोष करणाऱ्या बालकाला " तू आईवर अवाजवी प्रेम करून गहिवर काढत आहेस " असे म्हणणे सूज्ञांना शोभादायक दिसत नाही.
माझा मुद्दा पुरेशा स्पष्टपणाने मांडला नाही असे वाटते. प्रेम आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टींबद्दल बरेच लिहिलेले आहे असे वाटते, त्यातही अर्थात प्रेमाबद्दल अतीच, तेही ज्ञानेश्वर - विठ्ठल यांना सांधणारा दुवा कच्चा असताना. पण तुलनेने त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेबद्दल अतिशय कमी लिहिले गेले आहे. कुरुंदकर व तर्कतीर्थ हे सन्माननीय अपवाद. एका बाजूला विठ्ठलप्रेमी वारकर्यांचे गहिवर आणि दुसरीकडे शंकराचार्य भक्तांचे "ज्ञानेश्वर हे आचार्यांचाच अनुवाद करतात" हे मत, यापलीकडे जाऊन ज्ञानेश्वरांचा आणि त्यांच्या साहित्याचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे असे वाटते.
अर्थातच यापैकी काहीच महत्त्वाचे नाही आणि आम्हाला आमची माऊलीच प्रिय आहे असे म्हणायचे असेल त्यांनी माझ्या लेखनाकडे सरळ दुर्लक्ष करून चर्चा पुढे सुरू ठेवावी. खरे तर इतक्या "रसाळ" चर्चेत माझे विक्षिप्त मत देऊन व्यत्यय आणला त्याबद्दल क्षमस्व.
हा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद.