देवानाम पिय, पियदसी

देवानाम पिय, पियदसी,
जेम्स प्रिन्सेप १८१९ साली कलकत्याच्या टांकसाळीत असिस्टंट ऍसेमास्टर म्हणून आला तेंव्हा त्याचे वय होते २० वर्षे. पब्लिक स्कूलमध्द्येही न गेलेल्या जेम्सची जमे़ची बाजू म्हणजे बारकाव्याकडे लक्ष देणे व जास्तीतजास्त अचूकपणा मिळवण्याचा प्रयत्न करणे.वास्तुशास्त्राचा अभ्यास,भौतिक व रसायन शास्त्राची तोंडओळख होती.जेम्सला नाणी गोळा करण्याचा नाद लागला. आता त्याला संस्कृत येत नसल्याची न्युनता लक्षात येऊं लागली. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी दिल्लीला आढळलेल्या एका दगडी स्तंभावर एक
प्राचीन लिपी कोरलेली होती. तशाच प्रकारचा एक खांब अलाहाबादला व एक दगड ओरिसात आढळला.अलाहाबादच्या खांबावरील लेख हे ग्रीक लिपीतील असावेत असा एक नित्कर्ष काढण्यात आला व लगेचच फ़ेटाळण्यातही ! मग तत्सम लेख नेपाळातही सापडले.थोडक्यात, संपूर्ण उत्तर हिन्दुस्थानात अशा प्रकारचे लेख कोरवणारा कोणीतरी सम्राट होऊन गेला होता. पण कोण आणि केंव्हा ?
प्रिसेपला आता या लिपीने पार गुंगवून टाकले.यावर प्रकाश पडावा म्हणून त्याने हिन्दुस्थानभरच्या आपल्या मित्रांना माहिती गोळा करायाच्या कामावर लावले. त्यांत लष्करी अधिकारी, सर्व्हेअर्स, डॉक्टर्स,पाद्री, सर्वजण होते. एकाने प्रिन्सेपच्या विनंतीवरून सांचीच्या स्तुपाबाहेरील दगडी कठड्यावरील लेखाची प्रतिकृती कलकत्याला पाठवली. त्यातील एक शब्द " दानम " असावा असा प्रिन्सेपला संशय आला.म्हणजे द,न, म ही तीन अक्षरे मिळाली.कलकत्याच्या जून महिन्याच्या तीव्र उकाड्यात अक्षरश; रांत्रदिवस काम करून प्रिन्सेप या लिपीचा - अशोक ब्राह्मी - उलगडा करू शकला.लेखाची सुरवात होती " देवानाम पिय, पियदसी म्हणतो की ....."
आता हा देवानाम पिय पियदसी कोण? लंकेहून एका मित्राने कळविले की लंकेच्या राजघराण्यात पियदसी नावाचा राजा होता. पण लंकेच्या राजाने उत्तर हिन्दुस्थानात स्तंभ उभे करणे दुरापास्त वाटत होते. मग पुराणात शोध केल्यावर नाव पुढे आले " सम्राट अशोक " मौर्य वंशातील एक महान सम्राट [सनपूर्व ३०४ - २३७ ] याचे साम्राज्य उत्तरेस हिमालय पायथ्यापासून आजच्या चेन्नाईपर्यंत,पूर्वेस ब्रह्मदेशापासून पश्चिमेस बलुचिस्थान-अफ़गाणिस्थानपर्यंत पसरले होते. त्याचा कारभार लोकहीताकरिता होता. त्याने बळाचा वापर न करता बुध्द धर्माचा प्रसार भारतात व भारताबाहेरच्या देशांत केला. थोड्याच दिवसात अशोकाबद्दल इतकी माहिती गोळा झाली की ११ व्या शतकापूर्वींच्या राजांपैकी सर्वात जास्त माहिती अशोकाबद्दलच आहे.केवळ एका माणसाच्या अपार श्रमामुळेच हिन्दुस्थानच्या इतिहासातील हे सुवर्णपर्ण प्रकाशात आले.
प्रिन्सेपने मग गुजराथपासून ओरिसापर्यंतच्या सर्व लेखां चा अभ्यास केला. अशोकाचा ग्रीक-रोमन साम्राज्यासी संबंध होता असे त्याने सिध्द केले.गिरिनारच्या लेखात टोलेमी[Ptolemy] व ऍंटिओकस [Antiochus] यांचा उल्लेख मिळाला व सर्व लेखांच्या ऐतेहासिक विश्वसनियतेचा पुरावा मिळाला.
१८३९ साली या महान संशोधकाचा दुर्दैवी परिस्थितीत अंत झाला.आजारपणाने त्याच्या मेंदूवर परिणाम झाला व इंग्लंडमध्ये तो बरा न होताच मृत्यु पावला.

समित्पाणी

लेखनविषय: दुवे:

Comments

देवानां प्रिय प्रियदर्शी

कॉप्टिक भाषेच्या मदतीने इजिप्शियन हायरोग्लीफ्सचा अर्थ काढणार्‍या जीन फ्रॅन्क्वा चँपोलीयनची आठवण आली.

देवनाम् पिय पियदसी हे अशोकासाठीच. अशोकाच्या शिलालेखांवर त्याचा उल्लेख पियदसी (प्रियदर्शी) असाच केलेला आढळतो. अशोकाचे बरेचसे शिलालेख प्रजाजनांनी अहिंसेचे पालन करावे या आदेशाचे आहेत. गिरनार येथील शिलालेखही तसाच काहीसा आहे.

अशोकाच्या शिलालेखात येणारे टोलेमी आणि अँटिओकस कोण* यावर अधिक शोध घेतला असता अलेक्झांडरचा सेनापती टोलेमी जो पुढे इजिप्तचा राज्याधिकारी बनला त्याचा पुत्र टोलेमी दुसरा याचे अशोकाशी राजकीय संबंध होते. त्याने आपले मुत्सद्दी अशोकाच्या दरबारी पाठवल्याचे उल्लेख या शिलालेखांत येतात.

अँटिओकस दुसरा हा सेल्युकस निकेटरचा नातू. याच सेल्युकसने चंद्रगुप्ताशी झालेल्या लढाईत पराभव झाल्या नंतर आपली मुलगी (का बहिण?) चंद्रगुप्ताला लग्नात देऊन संधी केली होती अशी आख्यायिका ऐकू येते. एकंदरीत सेल्यूकसच्या साम्राज्याचे मौर्य साम्राज्याशी नंतर सलोख्याचे संबंध असावेत. या संदर्भात, बौद्ध धर्माला अँटिओकस दुसरा याने राज्याश्रय दिल्याबाबत शिलालेख दिसतात.

एक शब्द " दानम " असावा असा प्रिन्सेपला संशय आला.म्हणजे द,न, म ही तीन अक्षरे मिळाली.

वाहवा! यनांच्या गूढलेखन कोड्याची आठवण झाली. :-)

शरदराव,

वाह! सकाळी उठून हा लेख वाचला. सकाळ सार्थकी लागली. जेम्स प्रिन्सेपबद्दल मी पूर्वी वाचले नव्हते. लेखाबद्दल धन्यवाद! असे लेख अधिक लिहा. विस्तृत लिहिलेत तर अधिक मजा येईल.

* ग्रीकांत आपल्या अपत्यांना आपले नाव देण्याची प्रथा असल्याने तीच तीच नावे पुन्हा दिसतात. त्यापैकी नेमके कोण हे काळानुसार ठरवावे लागते.

असेच म्हणतो

लेखाबद्दल धन्यवाद! असे लेख अधिक लिहा. विस्तृत लिहिलेत तर अधिक मजा येईल.

असेच म्हणतो..





व्वा शरदराव !!!

जेम्स प्रिन्सेपचा लेख मस्तच !!!

सामान्य माणसाला सदाचार शिकवण्यासाठी स्तंभ लेख, गुहालेख आणि गिरिलेख कोरुन धर्माज्ञांच्या द्वारे लोकांना अलौकिक शिकवण देणारा सम्राट अशोक ग्रेट आणि अपार श्रमामुळेच आमच्या पर्यंत सम्राट अशोकाला पोहचवणारा जेम्स प्रिन्सेपही तितकाच ग्रेट .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान

लेख आवडला.. नवी माहिती मिळाली

ऋषिकेश

छान लेख

लेख छान आहे. जेम्स प्रिन्सेपबद्दल काहीच माहित नव्हते. परंतू जुन्या लिपी कशा काय उलगडत असावेत याबद्दल नेहमीच कुतुहल राहिले आहे. यावर आणखी काही लिहिता आले, तर जरूर लिहा.
आणि 'सुवर्णपर्ण' हा शब्द मी प्रथमच वाचला, जाम म्हणजे जामच आवडला.
राधिका

मस्तच लेख

नवी माहिती मिळाली. सकाळ सार्थकी लागली.

छान माहीती

नवीन माहीती कळाली. मधे अशीच माहीती एका ब्रिटीश अधिकार्‍याबद्दल ऐकली होती ज्याने विजयनगरचे साम्राज्य शोधून काढले. तर सातारला असलेल्या एका ब्रिटीश् अधिकार्‍याने (कलेक्टर का न्यायाधीश) येथे नक्की काय काय घडले हे शोधायला लागून भाषा शिकतानाच संपूर्ण मराठ्यांचा इतिहास एकत्र केला असेपण ऐकले होते.

पूर्ण वाक्य

पूर्ण वाक्य

देवानां पिय, पियदसिन राज्ञा लिखा

असे आहे.

आणिक थोडी माहिती. ब्राह्मी लिपी वाचता येणारी 'सुशिक्षित' मंडळी तेंव्हा पुष्कळ होती, परंतु प्रिन्सेपच्या 'लिपी शिकवा' ह्या विनंतीला त्यांनी हेतुपुरस्सरतः धुडकावून लावले.

माझेकडे लिपीशास्त्रावर काही अत्यंत दुर्मिळ पुस्तके आहेत, ज्यात ही माहिती आली आहे. त्यात 'देवानां पिय, पियदसिन राज्ञा लिखा' चे फोटोदेखील आहेत. वेळ झाला की स्क्यान् करून पाठवेन.

धन्यवाद.

हैयो हैयैयो!

हम्म!

ब्राह्मी लिपी वाचता येणारी 'सुशिक्षित' मंडळी तेंव्हा पुष्कळ होती, परंतु प्रिन्सेपच्या 'लिपी शिकवा' ह्या विनंतीला त्यांनी हेतुपुरस्सरतः धुडकावून लावले.

मलाही हीच शंका होती कारण ब्राह्मीही काही अगदी काळाच्या उदरात गडप झालेली इजिप्शियन चित्रलिपी नव्हे. ती लिपी मोहेंजेदारो हडप्पाची. तेव्हा प्रिन्सेपला इतके कष्ट का घ्यावे लागले त्याचे उत्तर हेच असावे.

माझेकडे लिपीशास्त्रावर काही अत्यंत दुर्मिळ पुस्तके आहेत, ज्यात ही माहिती आली आहे. त्यात 'देवानां पिय, पियदसिन राज्ञा लिखा' चे फोटोदेखील आहेत. वेळ झाला की स्क्यान् करून पाठवेन.

नक्की लावा.

मस्त लेख

ह्या प्रिन्सेपबद्दल मी ऐकलेसुद्धा नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद!

वा !

लेख आवडला.. अजून सविस्तर वाचायला सुद्धा आवडेल.
-- (देवनागरी) लिखाळ.

अजून

छान लेख. आणि माहितीचा छोटासा तुकडा.
अजून लिहा, वाचायला आवडेल.

 
^ वर