मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.

समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी दुपारी ०४ ते ०७ या दरम्यान 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन, पुणे येथील सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे.

कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा.

संपर्क : प्रा. अनिल गोरे, ९४२२००१६७१.

काही शंका,

मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावरच आता का बरे चर्चा होत आहे?

मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव असावा का?

इतर भाषेमध्येही असेच प्रवाह चालू आहेत का?

भाषा हे प्रवाही माध्यम असल्यामुळे काही बदल व्हावेत का?

सर्वसामान्यांचे याबाबतीत काय मत आणि अनुभव आहे.

विद्वानांचे एकमत शक्य आहे काय?

या सर्व चर्चा आणि विवादातून मराठीचे पाऊल पूढे पडेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

दश आणि दुर्दशा

मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावरच आता का बरे चर्चा होत आहे?
मराठी व्याकरणाचा आणि शुद्धलेखनाचा संबंध असला तरी, शुद्ध लिहिण्याकरिता व्याकरण येणे अनिवार्य नाही. व्याकरण चांगले येत असेल तर हेच शुद्ध का आणि ते का नाही याचे उत्तर देता येते. पण कारण माहीत नसले तरी शुद्ध लिहिता येते.

मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव असावा का?
मराठीचे व्याकरण संस्कृतवर आधारित असले तरी ते स्वतंत्र आहे. संस्कृतचे अत्यंत प्राथमिक ज्ञान जरी असले तरी मराठीच्या शब्दनिर्मितीची माहिती होते आणि अशुद्ध लिहिलेले लगेच ध्यानात येते. भारतातील सर्व भाषांवरील संस्कृतचा प्रभाव जेव्हा नष्ट होईल तेव्हाच मराठीवरचा व्हावा.

इतर भाषेमध्येही असेच प्रवाह चालू आहेत का?
थोड्याफार प्रमाणात. इंग्रजीत जोडशब्दात येणारे वियोगचिन्ह टाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. स्पेलिंगमध्ये अत्यंत किरकोळ सुधारणा होत आहेत. त्याही प्रामुख्याने अमेरिकेत. बहुतेक सर्व -ise ने शेवट होणारे शब्द आता -ize ने संपतात. फ़्रेन्चमध्ये ७०० वर्षांत काहीही सुधारणा झाल्या नाहीत. बंगाली लिपीत लिहिली जाणारी मैते भाषा तिच्या जुन्या कालबाह्य झालेल्या लिपीत लिहावी अशी चळवळ चालू आहे. उडिया लिपीतून ऋ, ॡ काढून टाकावे अशी मागणी आहे. तशीच जरूर असेल तर ऋषिकुमार हा शब्द मुनिकुमार असा लिहावा असे या लोकांचे म्हणणे आहे(?). मलयाळम्‌ने लिपी सुधारणेचा प्रयत्‍न करून पाहिला. आता नवीन विद्यार्थ्यांना जुनी लिपीही येत नाही आणि नवी देखील. हिंदीत नुक्ता आणि चन्द्रबिन्दू नकोत असे काही जणांचे म्हणणे आहे, पण या सुधारणांना तेथील विद्वानांची संमती नाही. तसेच गुजराथीच्या अशुद्धलेखनाचा पुरस्कार करणारी ऊंझा-सुधारणा अजून रूळलेली नाही. तमिळमध्ये कुठलीही सुधारणा करण्याचा विचार चालू आहे असे ऐकिवात नाही.
भाषा हे प्रवाही माध्यम असल्यामुळे काही बदल व्हावेत का?
मराठी बोलीभाषा हीच प्रमाण मानावी अशी मागणी आहे. पण कोणती बोलीभाषा यावर कोणीही बोलायला तयार नाही.

सर्वसामान्यांचे याबाबतीत काय मत आणि अनुभव आहे.
भाषेच्या व्याकरणात किंवा लेखनात काय सुधारणा करायच्या हे समाजातील नेहमीच अल्पसंख्य असलेले विद्वान ठरवतात. अशा बाबतीत अडाणी सर्वसामान्यांचा विचार करायचे काहीच कारण नसते.

विद्वानांचे एकमत शक्य आहे काय?
खर्‍या विद्वानांचे मत विचारात घेण्याची संस्कृती आता संपली आहे. मराठी भाषेचे व्यवस्थित ज्ञान नसताना भाषाप्रेमाचा खोटा उमाळा असणारे तथाकथित विद्वान आणि राजकारणी यांची मते विचारात घेऊन भाषेचा बट्ट्याबोळ करण्यात या लोकांचे कदाचित एकमत होईल. १९६२च्या शुद्धलेखन सुधारणा राजकारण्यांच्या सोयीसाठी होत्या, हे कुणीही विसरू नये.
या सर्व चर्चा आणि विवादातून मराठीचे पाऊल पूढे पडेल का?
नाही. मराठी अधिकाधिक गाळात रुतेल. कदाचित पुढील पन्नासएक वर्षांत मराठी इतिहासजमा होईल.--वाचक्‍नवी

पटण्यासारखा | अधिक माहिती

प्रतिसाद पटण्यासारखा आहे.

खर्‍या विद्वानांचे मत विचारात घेण्याची संस्कृती आता संपली आहे. मराठी भाषेचे व्यवस्थित ज्ञान नसताना भाषाप्रेमाचा खोटा उमाळा असणारे तथाकथित विद्वान आणि राजकारणी यांची मते विचारात घेऊन भाषेचा बट्ट्याबोळ करण्यात या लोकांचे कदाचित एकमत होईल. १९६२च्या शुद्धलेखन सुधारणा राजकारण्यांच्या सोयीसाठी होत्या, हे कुणीही विसरू नये.

याविषयी काही अनुभव नाही, अधिक माहिती वाचायला आवडेल.

सरकारी दडपण

१९६० साली जेव्हा महाराष्ट्र् राज्याची स्थापना झाली तेव्हा तत्कालीन मंत्रिमंडळाने राज्यकारभार मराठीत व्हावा अशी रास्त इच्छा बाळगली. त्यासाठी 'फ़ायलीं'वर मराठी नोंदी असणे आवश्यक ठरवले. त्या वेळेपर्यंत मराठी भाषेचे प्रमाणीकरण पूर्ण झाले होते आणि लिखित भाषा कशी असावी याचे संकेत निश्चित झालेले होते. पुस्तकांतून, वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांतून एकाच प्रकारचे मराठी छापले जात होते. शिक्षक प्रमाण मराठी उत्तमप्रकारे जाणत होते आणि तसेच शिकवले जात होते. लोकांच्या डोळ्यासमोर शुद्धलेखनाच्या चुकांनी बरबटलेले मराठी क्वचितच दिसे, आणि ते लगेच मनाला खटके. आजही हिंदी मुलखात सार्वजनिक ठिकाणी, तसेच छापील मजकुरांत चुकीचे हिंदी शोधूनही सापडत नाही, तशीच त्याकाळी मराठीची स्थिती होती. परंतु जाणकारांनी लिहिलेले आणि मुद्रणशोधकांनी तपासून शुद्ध ठेवलेले मराठी छापील लिखाण व्यक्तिगत पातळीवर शुद्ध होतेच असे नाही. र्‍हस्वदीर्घाच्या किरकोळ चुका करणे आणि अर्धोनुच्चारित अनुस्वार गाळणे ह्या गोष्टी सुरू झाल्या होत्या.
सरकारी कामकाजात दोन गोष्टींचा अडथळा होता. मराठीतले भरमसाठ अनुस्वार आणि र्‍हस्वदीर्घाचे कडक नियम. अनुस्वारांमुळे टंकलेखनाचा वेग मंदावत असे आणि छापलेल्या मजकुराचे मुद्रितशोधन अवघड होई. सरकारने १९६१ मध्ये आदेश दिला आणि सरकारी कामकाजासाठी सोप्या(?) मराठी शुद्धलेखनाच्या नियमांची मागणी केली. यासाठी त्यांनी मराठी महामंडळाला वेठीस धरले. १९६१ मध्ये महामंडळाने १४ नियम सरकारला सादर केले. सरकारने ते परत पाठवून आणखी सोपे करण्यास सांगितले. शेवटी तसे केलेले नियम सरकारमान्य झाले आणि महाराष्ट्राचा कारभार मराठीत होण्यास सुरुवात झाली. ह्या नियमांतील काही गोंधळ लक्षात आल्यावर १९७२ मध्ये आणखी चार नियमांची भर टाकून आताचे १६ नियम तयार झाले. जुनी पुस्तके आणि काव्ये, विशेषत: संतकाव्ये यांची परत छपाई केली तर ती जुन्या नियमांप्रमाणेच करावी असे एक कलम त्यांत दाखल करण्यात आले. शब्दकोशात शब्द जुन्या लेखनाप्रमाणेच असावेत असेही नमूद करण्यात आले. प्रत्यक्षात ह्या गोष्टींना प्रकाशक-मुद्रक वाटाण्याच्या अक्षता लावतात आणि सोपी छपाई करतात. शिक्षकांची भरती जिल्हापंचायतीचे सभासद पैसे खाऊन करू लागल्यामुळे मराठीची जाण असलेले शिक्षक मिळणे दुरापास्त झाले, आणि महाराष्ट्रात भाषा शिक्षणाचा एकंदरीत बोजवारा उडाला. इतर प्रांत सावध राहिले आणि त्यांना भाषाशिक्षण दर्जेदार ठेवण्यात यश मिळाले.
हे नियम पसार करताना आपण काही पाप करतो आहोत अशी खंत महाराष्ट्राचे पितामह दत्तो वामन पोतदारांना होती. त्यांनी एक वाक्य या नियमांखाली टाकण्यास सांगितले. ते असें_ हे नियम वापरांत आले तरी जुने शास्त्रपूत नियम वापरून केलेले लिखाण दंडार्ह मानू नये.
आज असे लिखाण चुकीचे समजले जाते.
ता.क.: नियम १९६२ साली तयार झाले तरी ते नियम छापलेले पुस्तक १९८७ मध्ये सरकारने छापून आपल्या मुद्रणालयात विक्रीला ठेवले. २५ पैसे किंमतीचे हे पुस्तक नागरिकांपर्यंत पोचलेच नाही! --वाचक्‍नवी

उत्तम माहिती!

या उत्तम माहितीबद्दल धन्यवाद!

या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर पाठ्यपुस्तके त्यानुसार बदलली असावीत. त्यामुळे त्यानंतरच्या विद्यार्थ्यांनी ही 'नवी' मराठीच शिकल्याने 'जुनी' मराठीही होती किंवा असलीच तर कशी होती याविषयी काही माहिती झाली नाही.

त्या मराठीचे नियम/नमुने कुठे मिळतील?

१९३० ते १९६२

१८५० पर्यंत मराठी लिखाण नियमबद्ध नव्हते. मेजर कॅन्डीने १८३२ आणि नंतर १८५७ साली प्रसिद्ध केलेल्या कोशांमुळे मराठी शब्द शुद्ध स्वरूपात कसे लिहावे ते मराठी जनतेला समजले. मुंबईच्या गव्हर्नर(माउन्ट स्टुअर्ट एल्फ़िन्स्टन)ने प्रसिद्ध केलेल्या मराठी पुस्तकांद्वारे मराठी व्याकरणशुद्ध(वाक्य)लेखनाचे स्वरूप शालेय विद्यार्थ्यांच्या समोर आले. मेजर कॅन्डीने तत्कालीन लेखकांवर जबरदस्ती करून मराठी लेखनातील भोंगळपणा बंद केला. परकीय भाषांतील शब्द मराठीत कसे लिहावेत हे त्याने ठरवले. मराठीत विरामचिन्हांचा वापर पहिल्यांदा त्यानेच केला. मोडी लिपीच्या उणिवा जाणून सर्व प्रकाशित पुस्तके बालबोध मराठीत छापण्याचा त्याचा आग्रह असे.
त्यानंतर १९३० च्या मडगांव(गोवें) येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात नवीन नियम मांडून ते पसार करण्यात आले. ह्या नियमांनुसार संस्कृत तत्सम शब्द मुळाप्रमाणेच लिहावेत असे ठरले होते. हे नियम विदर्भ साहित्य परिषदेने(डॉ.वि.भा.कोलते) कधीच मान्य केले नाहीत. त्यांना उच्चारानुसारी लेखन हवे होते. मराठवाड्यातून विरोध करणारे कुणीच नव्हते. त्यामुळे मडगावच्या अधिवेशनात पसार झालेले नि पुण्या-मुंबईच्या लोकांनी मान्यता दिलेले नियम व्यवहारात आले.
१९३०चे नियम थोडक्यात असे: निव्वळ मराठी शब्दातील, १. अंत्य व उपान्त्य इ-उकार दीर्घ. जसे-आई, काठी, तूं, हळू.(अपवाद लुटुलुटु, दुडुदुडु). २. अ-कारान्तेतर शब्दांतील उपान्त्य व इतर सर्व शब्दांतील उपान्त्यपूर्व इ-उकार र्‍हस्व. उदा. विटा, मारितो, इ. तसेच, चिमटा, किरकोळ इ. (जोडशब्दांना हा नियम लागू नाही. उदा. आईवडील, मोरूमामा, शिडीखालून इ. ३. अकारान्त शब्दांतील उपान्य इ-उकार दीर्घ. पहा:बीळ, जाऊन, मारील, मोकळीक, दुर्मीळ इ. ४. सामन्यरूप दीर्घ-कवीने, गुरूपासून इ. ४. जोडाक्षर आणि खणखणीत अनुस्वार असलेल्या अक्षरांपूर्वीचे इ-उकार र्‍हस्व--भिल्ल, शिस्त, चिंच, सुंठ.
संस्कृत शब्द १. जसेच्या तसे लिहावेत, प्रत्ययापूर्वी किंवा शब्दयोगी अव्ययापूर्व अन्त्य इ-उकार दीर्घ करावा. कवि, कवीने इ. २. मराठीत मिसळून गेलेल्या शब्दांमधील उपान्त्यपूर्व अक्षर वरील नियम २ प्रमाणे र्‍हस्व. शरिरास, जिवाला इ.(परंतु, गीतेत, सूत्रांत असे अपवाद.)

अनुस्वार: १. अकारान्ताशिवाय सर्व मराठी नपुंसकलिंगी नामे विशेषणे आणि क्रियापदांच्या शेवटच्या अक्षरावर.उदा: मोतीं, मोत्यें, वासरूं, केळें, केळीं, झालें, आवडलें इ.(अपवाद, पाणी, लोणी, गुळवणी, ताकवणी इ.) २. तें, नें, एं, शीं, नीं, आं, ईं, हीं या प्रत्ययांवर. सप्तमीच्या प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर. ३. अनेकवचनी सामान्यरूपांवर-मुलांना, गोखल्यांची, आम्हांला इ. ४. तृतीया विभक्तीतील मीं, आम्हीं ,तुम्हीं, कोणीं इ. ४. खालील शब्दांतल्या शेवटच्या अक्षरावर--तूं, कांहीं, नाहीं, गहूं, आम्ही जातों(पण तो जातो), तुम्ही गेलां, जाईं, करूं, जाऊं, करितां, इ. आगगाडी चालू झाली , परंतु चालूं लागली. कां गेलास परंतु गेलास का? केंस, कोंपर, हंसणे, घांस, कांसव, भुंवई, नांव(=नाम), कोंवळा, सांवळा इ. व्युत्पत्तीसिद्ध अनुस्वार द्यावेत. वगैरे वगैरे.--वाचक्‍नवी

धन्यवाद! | स्वतंत्र लेख?

उत्तम माहिती! धन्यवाद!
याचा स्वतंत्र लेख करता येईल का?

पटले

बहुतेक मुद्दे पटण्यासारखे आहेत आणि ते पटले.

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शुद्धलेखनामुळे झालेली दशा

मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावरच आता का बरे चर्चा होत आहे?

शुद्ध लिहिण्याचा रेटा आणि प्रमाणभाषेचा आग्रहामुळे, सर्वमान्यांची भाषा होण्यातील प्रमुख अडथळे हे व्याकरण आणि शुद्धलेखन असावे असे वाटत असल्यामुळे हे बदल होत असावेत, अर्थात अशा बदलांचे स्वागत केले पाहिजे.

मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव असावा का?

व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव आहे.

इतर भाषेमध्येही असेच प्रवाह चालू आहेत का?
इतर भाषा अधिक सोपी करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

भाषा हे प्रवाही माध्यम असल्यामुळे काही बदल व्हावेत का?

मौखिक भाषा लेखन करतांनाही वापरावी, कोणती एक बोलीभाषा प्रमाण मानण्यापेक्षा सर्वच मराठी प्रमाण मानावे, त्यात कोणतेही भेद करु नये. त्यामुळे भाषा प्रवाही आणि सर्वांची होण्यास मदत होईल.

सर्वसामान्यांचे याबाबतीत काय मत आणि अनुभव आहे.

सर्वसामान्यांना मराठी भाषा ही अवघड भाषा वाटते ती त्याच्यातील व्याकरणामुळे, तसेच बोलली जाणारी कोणतीही बोली ही प्रमाणमराठीच आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे, त्यामुळे मराठी भाषेची भीती घालवण्यासाठी सर्व नियम केवळ औपचारिक नियम म्हणुन ठेवावेत त्यांची दहशत नसावी, असे वाटते.

विद्वानांचे एकमत शक्य आहे काय?
प्रमाणभाषेला चोमडणारे विद्वान असे बदल करण्यास विरोध करत आहेत, पण काही बदल नक्की होणारच आहेत.

या सर्व चर्चा आणि विवादातून मराठीचे पाऊल पूढे पडेल का?
होय, मराठीचे पाऊल पुढे पडण्याची ही एक नांदी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंशी सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंशी सहमत

जाहिरातीतील भीषण मराठी

अनुवादाविषयी वाचनात आलेला एक चांगला लेख

भाषातुराणाम् न भयं न लज्जा.. - अभय परांजपे
asparanjape1@gmail.com

एकच मूर्खपणा हजारवेळा केला तर तो शहाणपणा वाटू शकतो. गोबेल्सने हेच केले. वारंवार चुकीचा प्रचार केला की तो खरा वाटतो याचा त्याने रेडियोवरून उत्तम वापर केला आणि राजकारण केले. आता हे सगळं सुचण्याचं कारण हेच की आपल्या आजुबाजूला जी भाषा वापरली जाते, जे अज्ञान प्रकट केले जाते त्यातला फोलपटपणा आपल्याला कळूनही आपण काहीही करत नाही. मराठी माणसाची विनोदबुद्धी नावाजली जाते. ती इथे त्रासदायक ठरते. आपण विनोद म्हणून काही गांभीर्याने घेतच नाही. दोन तीन उदाहरणे देतो. बीपीएल मोबाइलचा लूप मोबाइल झाला. त्यांनी जाहिरातींचा महापूर केला. आमचं नाव बदललंय हे सांगण्यासाठी. पण कॉपी काय? ‘माझा मुंबई, माझा नेटवर्क’ कोण हा शहाणा हे लिहिणार? आणि त्याचं आपल्याला काहीही वाटत नाही? आपण फक्त हसतो?

मूळ लेख येथे पुढे वाचा
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

गाढव जाहिरात आणि घाण मराठी

अभय परांजपेंचा लेख वाचला. लेखातील मुद्दे पटण्यासारखे आहेत.
मात्र लेखामध्ये त्यांनी वापरलेली "मराठीत ओरिजनल कॉपी लिहिणारे लोकं नाहीयेत असं यांना वाटतं का? नाही.. त्यांना तसं नाही म्हणायचंय.. पण त्यांचा मराठी लोकांच्या सहिष्णूतेवर पूर्ण विश्वास आहे.. अशी गाढव जाहीरात करूनही आपलं काहीच ‘वाकडं’ होणार नाही हे त्यांना पक्क माहीत आहे." ह्या वाक्यात 'गाढव जाहिरात' आणि
"आणि आपण खूश कशावर होतो.. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, माधुरी दीक्षित काय सुंदर मराठी बोलते यावर? त्यांनी मराठी बोलले तर त्यात कौतुकाचा काय भाग आहे? ते बोलायलाच हवं. तरी तेंडुलकर आणि माधुरीचं मराठी घाण आहे ही वस्तुस्थिती आहे." ह्या वाक्यातील 'घाण मराठी' ही विशेषणे त्यांच्या भाषेच्या योग्य वापराच्या मु्द्याच्या विरोधात जातात.

^ वर