विश्वासमत - कोणी कमावले, कोणी गमावले?

संयुक्त पुरोगामी आघाडीने बहुमत सिद्ध केले. या पूर्ण घटनाक्रमात बर्‍याच उलथापालथी झाल्या, जुनी समीकरणे तुटली, नवी समीकरणे जुळली, आरोप-प्रत्यारोप झाले. या एकंदर घटनाक्रमाविषयी तुमचे मत/विश्लेषण कृपया द्यावे. सोयीसाठी काही मुद्दे खाली देत आहे.

कोणी कमावले कोणी गमावले?

डावे पक्ष - डाव्या पक्षांची तुटेपर्यंत ताणलेली दबावनीती. भारतीय राजकारणात एकाकीपण. की येत्या निवडणुकीची तयारी? बंगाल आणि केरळमध्ये प्रतिस्पर्धी क्र. १ कॉग्रेसच असल्याने कधी ना कधी वेगळे होणे आवश्यक होते. जेवढे लवकर तेवढे चांगले. इ. इ.

सपा - संधीसाधू राजकारणाची परंपरा सुरूच. नव्या समीकरणांचे आयुष्य किती? अमरसिंहाला झेलणे कॉग्रेसला कितपत शक्य होईल. सपा च्या व्यावसायिक हितसंबंधातून आलेल्या मागण्या (विंडफॉल टॅक्स इ.) भविष्यातही येत राहतील का? सौदेबाजीचा आरोप इ. इ.

भाजप - केवळ विरोधासाठी विरोध या आरोपाचे समाधानकारक उत्तर नाही, अधिवेशनात पंतप्रधांनांवर अडवाणींची वैयक्तिक टीका, सभागृहात नेत्यांची/वक्त्यांची उणीव इ. इ.

कॉग्रेस - मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा यशस्वी. अणुकरारासाठी सरकार पणाला लावण्याची जोखीम. राहूल गांधींचे भाषण.

याशिवाय संपुआ चे साथीदार शरद पवार, लालू प्रसाद यादव, तिसरी आघाडी यांच्यावर काय काय परिणाम होतील?

सर्वात महत्त्वाचे देशावर आणि नागरिकांवर या सर्वांचे परिणाम काय होतील?

Comments

अखेर

अखेर "सट्ट्याचा" जय झाला! आणि तो कसाही होणारच होता. म्हणजे युपिए जिंकली काय अथवा हरली काय दोन्ही बाजूने सट्ट्याचा कारभार चालला होता.

या संदर्भात मला कायम अटलजींची कविता आठवते:

कौरव कौन, कौन पांडव, टेढ़ा सवाल है|
दोनों ओर शकुनि, का फैला कूटजाल है|
धर्मराज ने छोड़ी नहीं, जुए की लत है|
हर पंचायत में पांचाली अपमानित है|
बिना कृष्ण के आज महाभारत होना है,
कोई राजा बने, रंक को तो रोना है|

हेही खरेच

हेही खरेच पण या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राजकारणात काय काय बदल होतील यावर कृपया आपले विश्लेषणात्मक मत द्यावे.

सट्ट्याचाच विजय

देशावर आणि नागरिकांवर या सर्वांचे परिणाम काय होतील?
देशावर आणि नागरिकांवर काहीच परिणाम होत नाही. भारतीय माणूस तितका संवेदनशील राहिला नाही. (? ) सरकारच्या बाजूने असलेले म्हणतील बरं झालं सरकार वाचलं ! येणार्‍या पिढीसाठी विकासाची दारं किलकिली झाली. विरोधी पक्ष येणार्‍या निवडणूकीत किती संधी आहे, त्याचा लेखा जोगा मांडतील. मायावती बहण ज्यांच्याबद्द्ल त्यांचेच कार्यकर्ते म्हणत होते, आता मिडिया म्हणत आहे, येणार्‍या लोकसभेत पंतप्रधान मायावती बहणच असणार आहे. डाव्या पक्षांची जरा नामुष्की झाल्यासारखी वाटते. अर्थात सरकार कोणाचेही असले तरी अणुकरार रेटला गेलाच असता, पण एका सर्वोच्च सभेत पैसे उधळावेत ही लाजीरवाणी गोष्ट वाटते. बाकी येणार्‍या काळात कोणा-कोणाची युती होईल याचा विचारच करु नका ! डावे+भाजप+बसपा = सरकार, सपा+काँग्रेस= सरकार, म्हणजे कोणा-कोणाचे विचार जूळतील हे तर सांगूच नये. मात्र लोकशाही जीवंत आहे, इतकीच एक भारतीय म्हणुन आनंदाची गोष्ट समजायची आणि बाकी सोडून द्यायचे. पंतप्रधानांचे भाषण जे लिखित होते त्याचा दर्जावर खरे तर चर्चा झाली पाहिजे. काही वाक्य न शोभणारी अशीच आहेत असे वाटते. बाकी सट्ट्याचा विजय झाला हे अगदी सहीच आहे.

चीनच्या समोर एक मोठी शक्ती म्हणुन भारताला मदत करण्यासाठी अमेरिकेला संधी मिळाली असे म्हणायला हरकत नसावी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खासदार

कमावल्याची अन गमावल्याची चर्चा आहे म्हणून सांगतो. काही खासदारांनी पुरेपूर कमवले आणि काहींनी संधी घालवल्यामुळे थोडे गमावले. बाकी तत्वांची आणि मुद्यांची चर्चा करायची असेल तर ती थोडीफार अणुकराराच्या चर्चेत झाली आहे.





विश्लेषण...

या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राजकारणात काय काय बदल होतील यावर कृपया आपले विश्लेषणात्मक मत द्यावे.

विश्लेषण वगैरे शब्द माझ्यासाठी मोठा वाटतो, पण जे काही वाटते ते सांगतो:

  1. डावे पक्ष - सत्तेच्या राजकारणात मृतवत असलेला पक्ष होता आणि अजून राहील. वैचारीक राजकारणात, जो पर्यंत काही प्रसार माध्यमे आणि डाव्या विचारवंतांचा प्रभाव काही विद्यापिठात/केंद्रांत राहील तो पर्यंत लुडबूड चालू राहील. बाकी त्यांनी सगळ्यात मोठी केलेली चूक म्हणजे सोमनाथ चॅटर्जींची केलेली हकालपट्टी आणि सगळ्यात मोठा विनोद म्हणजे कम्युनिस्टांनी म्हणणे की "हा लोकशाहीसाठीचा दुर्दैवी दिवस आहे" असे!
  2. सपा - स.पा. म्हणजे "संधीसाधू पक्ष" म्हणणे योग्य. यांची काळजी नक्कीच आहे आणि त्याला ताबडतोब काही उत्तर आहे असे वाटत नाही.
  3. भाजप - अडवानींनी नेहरूंचा चुकीचा संदर्भ दिल्याचे इंग्रजी वर्तमानपत्रात वाचले पण मराठी वर्तमानपत्रात निदान काल आले नव्हते. पण तसली चूक जास्त काळ त्रास देत नाही. पंतप्रधानांवर वैयक्तिक टिका केली म्हणजे नक्की काय ते मी अजून वाचले नाही पण वाचायला आवडेल. पंतप्रधानांच्या लिखित प्रतित त्यांनी म्हणले आहे की अडवानी आपल्याला "निकम्मा" म्हणाले. मला जरी अडवानींची प्रत्येक मते पटली नाहीत तरी ते तसे म्हणतील असे खरे वाटत नाही. तरी देखील ते खरेच असेल तर अयोग्यच आहे, पण नक्की तसे म्हणाले नसले तर तसे शब्द त्यांच्या तोंडात त्यांना "रीबटल" करण्याची संधी नसताना "फॉर द रेकॉर्ड" घालणेपण अयोग्य वाटते. बाकी मायवती पंतप्रधान झाली नाही, अणूकराराला स्पष्ट विरोधपण त्यांनी केला नाही (कालचा विरोध आणि विश्वासदर्शक ठराव सरकारसाठी होता, अणूकरासाठी नव्हता!). अणुकरार अस्तित्वात येऊनपण पुढच्या निवडणूकीपूर्वी दिवे लागणार नाहीतच आणि तेलाच्या किंमती, खासदारांना दिलेली लाच वगैरे गोष्टींमुळे निवडणूकांसाठी चांगले मुद्दे पण मिळाले. थोडक्यात त्यांनी विशेष काही गमवले असे वाटत नाही जरी वरकरणी तसे दिसले तरी.
  4. कॉग्रेस - ग्रेस पिरीयड मिळाला आहे. त्याचा कसा वापर करतात ते पहायचे. कुठेतरी वाटत आहे की डिसेंबरला निवडणूका जाहीर करण्यात येतील. त्यामुळे पुढच्या अर्थसंकल्पाला तोंड द्यावे लागणार नाही. वास्तवीक भारतीय घटनेप्रमाणे परदेशी सरकारशी करार करण्याचा १००% हक्क हा निवडून आलेल्या सरकारला असतो. तसा करार हा संसदेला संमत करावा लागत नाही. त्यामुळे दिड-एक वर्षांपूर्वी झालेला हा करार इतके दिवस लांबवून काय मिळवले, तसेच जर विश्वासदर्शक ठराव आणायचाच होता तर विशेष अधिवेशन न वापरता नेहमीच्या अधिवेशनात आणून कोट्यावधी रुपयांची धूळधाण थांबवता आली असती. असा कणखरपणा दाखवण्याऐवजी कम्यूनिस्टांनी चालू केलेल्या राजकारणात गुंतून काँग्रेसचे सामुहीक नेतृत्व आणि पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांचे नेतृत्व कमी पडले असे वाटते. आता जर भाजप-सेनेच्या फुटीर खासदारांना लाच दिल्याचे सिद्ध झाले (मला वाटत नाही तसे सिद्ध होईल म्हणून!) तर ते अडचणीत येतील पण त्यालाही मर्यादा आहेत - झारखंड मुक्तीमोर्चावरून नरसिंहराव सरकारला काही त्रास झाला नव्हताच!
  5. शरद पवार, लालू, आणि इतर यांना काहीच फरक पडणार नाही, ते जसे आहेत, जिथे आहेत तिथेच राहीले आणि राहणार
  6. परदेशात यामुळे भारताची प्रतिमा कमी होण्याचा वगैरे काही प्रश्न नाही. सर्वत्र राजकारणी भ्रष्ट असतात ह्याबाबत दूमत नाही.
  7. देशातील नागरीकांवर आधी म्हणल्याप्रमाणे "कोई राजा बने, रंक तो रोना है|" हीच अवस्था आहे. त्यासाठी बरेच बदल अपेक्षीत आहेत. तुमच्यात, माझ्यात आणि सर्व भारतीयांच्यात.

राजिनामा

सोमनाथदांनी स्वतःहुन राजिनामा द्यायला पाहिजे होता. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली असती.
अर्थात त्यांची हाकालपट्टी होणार हे इतक्या अनुभवी माणसाला कळू नये याचे आश्चर्य वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोमनाथदा

सोमनाथदांनी आधी राजीनामा देण्याची गरज होती असे मला वाटले नाही. अगदी ते काँग्रेसच्या बाजूने अथवा विरुद्ध कसेही असले तरी. शिवाय लोकसभापतीचे पद हे घटनात्मक आणि पदसिद्ध आहे, त्यामुळे एक "सो कॉल्ड" नैतिकता (खरे म्हणजे त्यांचे इमोशनल ब्लॅक मेलींगच) सोडल्यास डाव्या पक्षांना त्यांनी तेथून बाहेर पडावे असे म्हणायचा कायदेशीर अधिकार पण नव्हता. त्यांना संपूर्ण सभागृहाने निवडून दिले होते, पॉलीटब्युरोने नेमलेले नव्हते! पण ज्या पक्षाच्या तत्वात लोकशाही नाही त्यांना ते कसे समजेल!

मात्र आता त्यांची हकालपट्टी झाल्याने त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडणे योग्य वाटते...

सोमनाथदांना कोणी तरी सांगा - वडीलांप्रमाणेच ते देखील हिंदूत्ववादी राहीले असते तर असे झाले नसते !;)

लाभ आणि हानी.

लाभी : काँग्रेस, मनमोहनसिंग, राहुल गांधी, सपा आणि मित्रपक्ष.

हानी : लालकृष्ण आडवाणी, मायावती, डावे, शिवसेना, भाजपा आणि मनमोहन यांचे काँग्रेसमधील विरोधक. कदाचित पूढील वेळेस काँग्रेस निवडून आली तर मनमोहन यांचाच परत विचार करावा लागेल असे दिसते.

झळाळी मिळाली असे : सोमनाथ चॅटर्जी : डाव्यांनी त्यांना कारणे दाखवा अशी नोटीस ( मराठी शब्द काय असावा?) सांगून पक्षातून काढायला हवे होते.

डाव्यासाठी, आडवाणी आणि मायावतीसाठी खायापिया कुछ नही और कपबशी तोडा अशी वेळ आली.

कारणे दाखवा

पक्षातून काढून टाकल्यावर/असतीलच तर कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देणे आवश्यक असते काय?

सोमनाथ चॅटर्जींनी कारणे आधीच दिली आहेत. राष्ट्रपतींना दिलेल्या लिस्ट् मध्ये नाव घालण्याआधी विचारलं नाही. संसदेचा नेता म्हणून त्यांना पक्षाने निवडलेलं नसताना पक्षाने राजीनामा द्यायला कसा सांगितला? वगैरे

अभिजित...

हो.

प्रत्येक पक्षाला / संघटनेला एक घटना असते. सभासदासाठीची पूर्तता, पक्षीय शिस्त, बडतर्फी, निवडणुका इत्यादीचा यात समावेश होत असतो. त्या घटनेप्रमाणे कोणावरही काही कृती करण्यापूर्वी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक असते.

माझ्या मते ( मला कोणतेही आवश्यक असे ज्ञान नसतानाही) सोमनाथजी जर न्यायालयात जाऊन त्यांनी त्यांच्या बडतर्फीला आव्हान दिले तर साम्यवादी पक्षाला सर्व सोपस्कार ( कारणे दाखवा इत्यादी ) करावे लागतील आणि कदाचित बडतर्फी मागे घ्यावी लागेल.

कुणी कुणी कमावले

मायावती ह्यांनी नक्कीच कमावले आहे, तसेच अम्बानी व अमरसिंह ह्यांनी पण..पूर्ण विश्लेषण हिन्दी मधे वाचायचे असल्यास तर खालील अनुदिनी वर जावे...
http://sureshchiplunkar.blogspot.com

समाजवाद्यांची कोलांटी | भाजपाचा (नवा) आरोप

अणुकराराच्या मुद्द्यावर काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देणार्‍या समाजवादी पक्षाला हाइड कायद्यातील काही तरतुदी बोचू लागल्या आहेत असे समजते.

सुषमा स्वराज यांचे ताजे निवेदन - खासदार लाच प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि अमेरिकेशी जवळीक केल्याने दूर गेलेल्या मुस्लिमांना भाजपाची भीती दाखवून जवळ करण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आणले असावेत असा आरोप केला आहे. यात काही तथ्य असावे का?

दुर्लक्षच योग्य.

सुषमा स्वराज्य, अमरसिंग, मुलायमसिंग, मायावती हे दुर्लक्ष करण्याच्या पात्रतेचे आहेत.

निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आता आपण हे शिकायला हवे.

लक्ष

मग लक्ष देण्यासारखे कोण आहेत बरे? जरा सांगितले तर निदान लक्ष तरी देता येईल.





हे आपल्यालाच ठरवायला हवे तरी पण,

हे आपल्या आवडीनिवडी नूसार ठरवता येते.

मी मनमोहनसिंग, अटलबिहारी, सोनीया, लालु, नरेंद्र मोदी याना जरा बर्‍यापैकी ग्राह्य समजतो. ( वैचारिक मतभेद आणि बांधिलकी वेगळी असली तरी).

आपल्यामते सुषमा स्वराज्याबद्दल काय प्रतिक्रिया असावी हे सांगितलेच नाही. कृपया आपलेही मत मांडावे.

राजकारण आणि दुर्लक्ष

राजकारण हा प्रकारच असा आहे जिथे व्यक्तिला महत्व देण फारसे बरोबर नाही. निदान राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणावर तरी. आपण लिहिलेल्या व्यक्ति कोणत्या ना कोणत्या पक्षाचा आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा विचार व्हावा. व्यक्तिचा नाही. आपल्या दुर्दैवाने आपल्या पुर्वजांनी व्यक्ति केंद्रित राजकारणाचा पाया पाडला आणि म्हणूनच आज आपण ही अवस्था पाहतो आहे. जेंव्हा एखादा नेता स्वतःला पक्षापेक्षा मोठा समजू लागतो तेंव्हा तो पक्ष लयाला चालला असे समजायला हवे. पण भारतात व्यक्तिंमुळे काही पक्ष जीवंत आहेत.
अतातायीपणे शेरेबाजी करणे सर्वस्वी चुकीचे आहे. मग नेता कोणत्याही पक्षाचा असो. खरेतर मी आणि माझ्यासारख्या विचार करणार्‍यांसाठी बोलायचे झाले तर भारतातल्या राजकारण्यांनी विश्वास गमवला आहे. पण फक्त राजकारण्यांना दोष का द्यावा? मला दोष द्यावासा वाटतो तो धर्मनिरपेक्षतेचा झेंडा ज्यांनी भारतात लावला त्यांना. देशाला धर्म हवा. जसा पक्षाला नेता असतो जो पक्षाचे विचार स्वतःमध्ये रुजवून त्या विचारांच्या मार्गदर्शनावर सत्तेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. पक्षात सर्वोच्च नेता एकच असतो. टू मेनी कुक्स स्पॉईल द फूड हे आपल्याला माहित आहेच. धर्मनिरपेक्ष भारताता प्रत्येक धर्माला महत्व आहे आणि म्हणून प्रत्येक धर्माचा, जातीचा एक पक्ष आहे. धर्मनिरपेक्षतेचा हा सर्वात मोठा तोटा आहे.
आजच्या भारतात ढिगांनी पक्ष आहेत आणि त्यातला प्रत्येकजण नेता आहे. कार्यकर्ते आहेत कुठे? जे आहेत ते स्वार्थासाठी आहेत? असे कोण आहे जे देशहितासाठी राजकारण करते?
आता गांधी पुत्रच बघा, विश्वासमताच्या वेळी सांगू लागले कि मी विदर्भात जवळून काही गरीब पाहिले त्यांच्या गरिबीचे कारण उर्जा आहे. त्यासाठी अणुकरार हवा. अरे खाजपुत्रा (सत्तेची खाज), तुझ्या आबा आजा पासून नव्हे तर पणज्या पासून येथे गरिबी आहे. त्यांना दिसली नव्हती काय गरिबी? प्रत्येकाने सत्तेच्या खुर्चीची उब मिळवली आहे. त्यांनी ६० वर्षात काय केले? गरिबीचे नाव घेतले की मते मिळतात हे बाळकडू त्याच्या रक्तात इतके भिनले आहे की त्याने स्वतःचे मार्केटिंग करायला योग्य मुद्दे मिळवले. आता निवडणूक जवळ आहे. इमेज उभारणे गरजेचे आहे.
राजकिय नेत्यांना ओळखणे हे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवरच नव्हे तर शालेय जीवनापासून शिकणे गरजेचे आहे. फक्त एकाच पक्षाची सत्ता भारताला सबल बनवू शकते. मग ते कॉंग्रेस असो वा भाजप. पण भारतात हा विचार रुजायला कठीण जाते आहे. आम्हाला मायावती सुद्धा चालेल पंतप्रधान म्हणून. पण सत्ता फक्त बसपाची हवी. पण जोवर नोटांमध्ये दम आहे तोवर आघाडी सरकारे आहेत आणि मग आरोप प्रत्यारोप आहेत. कशाला कोणाकडे दुर्लक्ष करा म्हणायचे? ज्याला करायचे आहे तो करतोच.
देवा भारतीयांना लागलेला व्यक्तिकेंद्रीत राष्ट्रीय राजकारणाचा रुद्ररोग कधी बरा होणार?





बर्‍या अंशी सहमत.

आपला प्रतिसाद आवडला. मनापासून आणि प्रामणिकपणे लिहिलेला असल्यामूळे भावलाही.

राजकारण्यांना नाही म्हटले तरी समजाचा पाठींबा हवाच हवा. सध्या माध्यमाचा अतिरेक असल्याकारणे कोणताही नेता प्रसंगपरत्वे लोकांपर्यंत थेट पोहोचत असतो. त्यात त्याला, त्याच्या पक्षाला, विचारधारेला मानणारे असोत अथवा नसोत.

या पार्श्वभूमीवर काही नेते अतिशय कर्कश्य असतात. परत उदा. साठी मायावती, स्वराज्य यांचे नाव सरळ सरळ घेता येईल. अश्या नेत्यांची छबी जरी आली तर मी सरळ कळ फिरविणे पसंद करतो.

तुम्ही ज्या तत्वाचा आणो शुचितेचा विचार करत आहात त्याला किती लोक ( राजकारणातील अथवा सामान्य जिवनात) पात्र असतील ही शंकाच आहे.

कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण माझा अनुभव सांगतो.पाकिस्तानचे एक परराष्ट्र मंत्री जेंव्हाही ६/७ वर्षापूर्वी दूरदर्शनापूढे येत आणि त्यांचा तर्कशूद्ध प्रतिवाद, बोलण्यातील नजाकत मला आवडत असे. उदा. भारतात एकदा बॉम्बस्फोट झालेत आणि नेहमीप्रमाणे आपल्या राजकिय लोकांनी लगेचच पाकिस्तानला जबाबदार पकडले. तेंव्हा त्यानी असा प्रतिवाद केला की कोणत्याही अश्या घटनेची चौकशी करण्यासाठी आठवडे लागतात आणि हे भारतीय लोक १/२ तासातच पाकिस्तान जबाबदार आहेत असा निष्कर्ष कसा बरे काढतात?

ह्म्म्म्म

तुमच्या आवडीचे आश्चर्य वाटले. कारण एकच. आज सुद्धा या स्फोटांमागे भारतातील राजकिय पक्ष आणि पाकिस्तान असे सगळेच असतील. पाकिस्तानचा आणि आपला आता ६० वर्षांपेक्षा प्रेमसंबंध आहे. एवढाकाळ माझ्यामते अनुभव म्हणून खुपच मोठा आहे. त्यामुळे मला ते निष्कर्ष पटतात. भारतीयांमध्ये फितुरी ठासून भरली आहे. त्यामुळे आपलाच दाम खोटा असतो. पण पाकिस्तानने स्वतःला गरिब गाय समजावे काय? असो.
मला वाटतं की मायावती आणि स्वराज यांची स्वतःची पद्धत आहे मुद्दे मांडायची. तुम्हाला ती पद्धत आवडणे न आवडणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्हाला असे काही मुद्दे डोक्यात जातात जसे हमे आम आदमी के लिये सरकार चलाना है, मेरे पती, सांस वगैरे मुद्दे आले की डोक्यात जातात. तसेच गल्लीचे राजकारण सुद्धा दिल्लीत चालवावे लागते हा सुद्धा असाच एक मुद्दा आहे.

एक शंका: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मराठी कार्यकर्ते शरद पवारांना साहेब म्हणतात. पण काँग्रेसचे मराठी कार्यकर्ते, नेते सगळेच त्यांच्या पक्षाध्यक्षांना बाई साहेब न म्हणता मॅडम म्हणतात. असे का बरे? मराठीची वाईट अवस्था होण्याला हे एक कारण तर नसावे?

अतिअवांतर : मी नेहमीच प्रतिसाद मनापासून आणि प्रामाणिकपणे लिहितो.





प्रतिसाद आवडला पण....

प्रतिसाद आवडला. पण यापुढे आघाडीचे सरकारे असतील, एका पक्षाचे सरकार आता शक्यच नाही असे वाटते त्यामुळे
''एकाच पक्षाची सत्ता भारताला सबल बनवू शकते.'' हे वाक्य काही पटले नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेच तर

तेच तर म्हणतो आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एक विचार रुजवायला बंधने आहेत. आपलंच घोडं दामटायच झालं तर धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा येतो. म्हणजे सगळे सोबत येतात. त्यातल्यात्यात मग धर्म संपला की जात येते. लोकं धर्म आणि जातीच्या नावावर विखुरलेली आहेत आणि ते एकत्र येउ नयेत यासाठी धर्मनिरपेक्षतेचा गोंडस झेंडा आहे.
धर्म कोणताच वाईट नाही. पण जगात इतरत्र असे देश सुद्धा आहेत जे धर्म आणि राजकारण यात योग्य ती सांगड घालतात आणि योग्य ते अंतर सुद्धा ठेवतात. आम्हा भारतीयांच्या काही कमजोर मुद्यांचा आक्रमण करणार्‍यांनी योग्य तो फायदा घेतला आहे आणि घेत राहातील.
एका पक्षाचे म्हणजे एका विचाराने एकाच नेत्याच्या मार्गदर्शना खाली. भारताची आजची परिस्थिती त्याला अजिबात योग्य नाही. देशाचे राजकारण राज्य पातळीवरचे पक्ष ठरवत आहेत. राज्य पातळीवरच्या सर्वोच्च नेत्यांना देशाच सर्वोच्च नेता बनायचे आहे. दुर्दैवाने दिल्लीचा रस्ता आज सुद्धा उत्तर प्रदेशातूनच जातो. काँग्रेसने तिथे आत्ताच पेरणी केली आहे. ४ वर्षांच्या सत्तेने आता कदाचित योग्य तो पैशांचा पाऊस सुद्धा पाडता येईल आणि मग येत्या निवडणुकीत मतांचे चांगले पिक सुद्धा येईल.
कदाचित अजुन एखादे दशक जाईल अथवा आहे या नेत्यांची पिढी. मग कदाचित एका पक्षाची पहाट येईल. कदाचित तो पक्ष आज अस्तित्वात देखील नसेल.





राजकारण आणि कर्तव्य

आपला "राजकारण आणि दुर्लक्ष" हा आपला प्रतिसाद आवडला. त्याच्याशी सहमत असतानाच त्यातील सध्याच्या राजकारण्यांकडे दुर्लक्ष करणे जितके गरजेचे आहे तितकेच राजकारणाकडे कर्तव्यबुद्धीने पहाणे आणि त्यात दुरून का होईना पण सहभागी होणे गरजेचे आहे. (प्रत्येकाने निवडणूकीच्या राजकारणातच यावे असे म्हणत नाही आहे!)

आज पक्षीय राजकारणाचा विचार करायचाच झाला तर सर्वच पक्षाने आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार्‍या जनतेने देशाचे त्यांच्यात्यांच्या परीने कळत-नकळत नुकसान केले असे म्हणावेसे वाटते. "कळत-नकळत" अशा करता कारण प्रत्येक राजकारणी अथवा सर्वसामान्य नागरीक हा कोत्या उद्देशाने/स्वार्थानेच वागला/वागतो अशातला भाग नव्हता/नाही. किंबहूना आपल्या कृतींचा दूरगामी परीणाम काय होवू शकेल याचा विचार केला गेला नाही. कदाचीत याला थोडा अपवादच असेल तर आणिबाणीचा कालखंड जेंव्हा तमाम आणिबाणीविरोधी राजकारणि एकत्र उभे राहीले आणि तसेच सामान्य माणसाने पण त्यांना साथ दिली. दुर्दैवाने तो प्रयोग फसला म्हणून लगेच र्स निघून गेल्यासारखे सर्व वागले. आज तर काय खाजगी उद्योगात मिळणार्‍या संधींमुळे असेल पण राजकारणाची गरज आपल्याला नाही असे जास्त वाटत असावे असे वाटते.

बाकी आपण म्हणता तशी द्विपक्षिय पद्धत येथे येण्याची शक्यता कमी वाटते. (बिरूट्यांशी सहमत). आणि आजचे त्या अर्थी राजकारण किघी तळागाळाला गेले असे वाटले तरी त्याचमुळे शह-काटशह (चेक अँड बॅलन्स या अर्थी) बसून "काहीतरी " (पूर्ण नाही!) समतोल राहू शकतो असे वाटते. आज पक्षीय पद्धत सर्वार्थाने लोकशाहीनुरूप होणे महत्वाचे आहे. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे येथे अवांतर होईल!

सहमत

सहमत. सगळेच मुद्दे पटले. राजकारण्यांकडे दुर्लक्ष म्हणजे आपल्या भविष्याकडे दुर्लक्ष आहे.
बाकी भारताच्या राजकारणात कमवायचा आणि गमवायचा विचार केल्यास राजकारणी नेते आणि कार्यकर्ते कमवत आहेत आणि आम्ही गमवत आहोत.

अवांतरः परवाच एक सेवादाता म्हणाला साहेब, आम्ही यात ५% च कमवतो, आणि सरकार बघा १२.५% कमवते. आम्ही कसे कमवायचे?





 
^ वर