भारत देश (नाव) कोणाचा?

विशेष सूचना: कृपया, शीर्षकावरून चमकून जाऊ नये. केवळ अधिक टिचक्या पडाव्यात म्हणून केलेली ती सोय आहे.

आपल्या देशाला भारत असे नाव का पडले असा प्रश्न विचारला तर सहसा उत्तर मिळते की

दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र भरत हा अतिशय पराक्रमी सम्राट होऊन गेला आणि त्याच्यामुळेच देशाला भारत असे नाव पडले. परंतु ही गोष्ट खरी नसून कालिदासाने आपल्याला दिलेली देणगी आहे असे काही तज्ज्ञांचे मत पडते. मध्यंतरी माझ्यात आणि वाचक्नवी यांच्यात मराठी विकिवर झालेल्या उघड चर्चेतील काही भाग खाली देत आहे -

ऐतिहासिक/पौराणिक कालात भरत नावाचे अनेकजण आहेत. दुष्य़ंतपुत्र, दशरथपुत्र, ऋषभ राजाचा मुलगा महायोगी गुणवान राजर्षी भरत ऊर्फ जडभरत, नाट्यशास्त्र लिहिणारा भरत(मुनी), मगधराजा इद्रद्युम्नच्या दरबारातील एक ऋषी, काशीचा एक योगी(याने गीतेच्या चौथ्या अध्यायाचे पठण करून बोराची झाडे बनलेल्या दोन अप्सरांचे पुनरुत्थान केले होते), पद्मपुराणातील एक दुराचारी ब्राह्मण, भौत्यमनूचा पुत्र, करंधमपुत्र मरुत्त ऊर्फ भरत इत्यादी. याशिवाय अग्निवंशात चार-पाच भरत होऊन गेले. भरतवंश नावाचे एक पूरुवंश व कुरुवंशाच्या समकालीन घराणे होते; त्यात सुदास, दिवोदास, शतानीक इत्यादी राजे होऊन गेले. या वंशाला तृत्सू व त्यातील लोकांना भरतगण असेही म्हणत. या ऋषभपुत्र भरताच्या नावावरून भारतवर्ष हे नाव पडले, दुष्यंतपुत्राच्या नावावरून नाही. वर्ष म्हणजे वर्षाऋतून एकाच वेळी पावसाखाली असणारा प्रदेश.

आपण विदित केलेला विष्णुपुराणातला श्लोक 'उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव...' वगैरे भारतवर्षाच्या फक्त चतुःसीमा सांगतो, भरत कोण हे सांगत नाही. तसे महाभारतात 'इदं तु भारतं वर्षम्‌ ततौ हेमवतम्‌ परम्‌' किंवा लिङ्‍गपुराणात 'हिमाद्रेर्दक्षिणम्‌ वर्षम्‌' वगैरेसुद्धा ‌भारतवर्ष हिमालयाच्या दक्षिणेला आहे असे सांगतात-कुठला भरत हे नाही. परंतु प्राचीन इतिहास सांगतो की, प्रियव्रताने सात पुत्रांस सात द्वीपे(नद्यांनी वेढलेले प्रदेश) दिली. त्यात आग्नीध्र याच्या वाट्याला जंबूद्वीप आले. त्याने आपल्या नाभी इत्यादी नऊ पुत्रांना नऊ वर्षे(एकाच वेळी पाऊस पडणारा भूमिप्रदेश) दिली. नाभीला मिळालेल्या प्रदेशाचे नाव अजनाभवर्ष. नाभीचा मुलगा ऋषभदेव (याला जैनांनी पुढे 'त्यांचा' केला-हिंदूंनी बुद्धाला अवतार केला तसा!). ऋषभाने अजनाभवर्षाचे नऊ खंड करून नऊ मुलांना दिले. खंडांची नावे- कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक्‌, विदर्भ आणि कीकट. या सर्वांवर, अर्थात अजनाभवर्षावर, अधिपत्य आपल्या भरतनामक पुत्रास दिले. पुढे त्याच्याच नावावरून देशाला भरतवर्ष नाव पडले.--भागवत, स्कंध ५, अध्याय २-२०, २-२१ व ५-४-९,१० व ५-७-१.

इतर सर्वत्र दुष्यंतपुत्र भरत हाच भारतवर्षाचा प्रणेता मानला का जातो? त्याबद्दल पुरावे मिळतात का? भागवत पुराणाची एखादी ऑनलाईन प्रत आपल्याला माहित आहे का? मलाही त्यातील काही संदर्भ हवे होते? नाभी आणि ऋषभ हे ईश्वाकु वंशातील राजे का?

केवळ गैसमजाने भारतवर्ष हे नाव दुष्यंतपुत्र भरतावरून पडले असे मानले जाते. कारण तोच बालपणी सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोजणारा आणि पुढे महान पराक्रम करून पृथ्वीवर एकछत्री साम्राज्य निर्माण करणारा म्हणून प्रसिद्ध. ऋषभपुत्र भरत आपण क्वचितच ऐकलेला. कुणी शाकुंतलासारखे दिव्य काव्य करून त्यात त्याचा उल्लेखपण केलेला नाही.

पंडित महादेवशास्त्री जोशी लिहितात:-"या देशाला भारत बनवणारा दुष्यंतपुत्र भरत खास नव्हे. तो आहे, ऋषभदेवाच्या शंभर पुत्रातला सर्वात मोठा पुत्र भरत. त्याने अनेक अश्वमेध केले आणि आसमुद्र पृथ्वी पादांक्रांत करून तिच्यावर आपली नाममुद्रा उठवली."

भारतवर्ष नाव कसे पडले याचा एक तिसरा पर्याय प्रख्यात संशोधक श्री. वासुदेवशरण अग्रवाल यांनी मांडला आहे. मात्र तो इथे देणे अप्रस्तुत ठरेल.

भागवत पुराणाची ऑनलाइन प्रत मला तूर्त माहीत नाही, परंतु असल्यास शोधून सांगेन. आपण quote केलेल्या विष्णुपुराणातदेखील(२.१.३२) भारतवर्षाचा प्रणेता ऋषभपुत्र आहे असे लिहिले असल्याचे मी वाचले आहे.

इक्ष्वाकु वंशातले आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असलेले राजे:--इक्ष्वाकु, ककुस्थ(प्रभु रामाला बुधकौशिक ऋषींनी रामरक्षेत दोनतीनदा काकुस्थ म्हटले आहे), बृहदश्व, कुवलयाश्च, निकुंभ, मांधाता, हरिश्चंद्र, सगर, दिलीप, भगीरथ, रघु, अज, दशरथ, राम, कुशलव, निषध, नल, पुंडरीक वगैरे. शेवटचा इसवी सनाच्या दुसर्‍या शतकातला जैन वाङ्‌मयात आलेला खारवेल!. या यादीत नाभी, ऋषभ नाहीत. आपला ऋषभ स्वायंभुव मनूच्या वंशातला पाचवा वंशज. स्वायंभुव मनु-प्रियव्रत-आग्नीध्र-नाभी-ऋषभ-भरत. स्वायंभुव मनू इसवी सनपूर्व ३१०२ सालचा

यानंतर काहीजणांशी माझे बोलणे झाले असता त्यांचाही समज दुष्यंत पुत्र भरतामुळेच भारत असे नाव देशाला पडले असे होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी दिलेले उदाहरण असे की महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनाचा उल्लेख भरत/ भारत असा करतो. महाभारतात पदोपदी पांडवांना भरताचे वंशज असे उल्लेखले गेले आहे. यावरून दुष्यंत पुत्र भरत हा अत्यंत पराक्रमी असावाच.

उदा. हे वाक्य जनमेजयासाठी महाभारताच्या सुरूवातीला येते.

O Bharata, Creator as he is of the universe, why should he not know fully what is in the minds of his creatures including the very gods and the Asuras?

वरील वाक्यात जनमेजयाचा उल्लेख भारत असा होत असावा (भरताचा वंशज) चू. भू. दे. घे.

असो तर चर्चेदाखल प्रश्न,

१. भरत या शब्दाला अर्थ आहे का? (रामाचा भाऊ भरत, दुष्यंतपुत्र भरत, ऋषभपुत्र भरत) भरत हे नाव भारतीय इतिहासात - पुराणांत फारच "कॉमन" दिसते.
२. भारत हे नाव देशाला कसे पडले यावर उपरोल्लेखित पुराव्यांपेक्षा अधिक पुरावे किंवा गृहितके आपल्याकडे आहेत काय?

ही चर्चा अशाप्रकारच्या सर्व समजूती-गैरसमजूतींसाठी वापरली जावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

भारत हे नाव

भारत हे नाव देशाला कसे पडले

आर्यांचे आगमन भारतात झाल्यावर त्यांची भटकायची अवस्था संपते. सप्तसिंधुच्या खो-यात मुबलक पाणी,चराउ कुरणे होती; हवामानही प्रसन्न होते. मन रमावे असेच वातावरण असावे. आर्यांना हा प्रदेश आवडला ते वसाहती करुन राहू लागले. पशुपालन,शेतीव्यवसाय यांच्या विकासाबरोबर पुर्वीच्या टोळ्याचे आता आर्यांच्या प्रादेशिक राज्यात रुपांतर झाले. त्यात पुरु, अनू,द्रह्यु, यदू व तुर्वश ही आर्याची पाच शक्तीशाली राज्ये अस्तित्वात आली. त्यांना 'पंचजन' असे म्हणत. याचवेळी 'भरत' नावाच्या आर्याच्या टोळीचे एक राज्य, जे 'पंचजन' पेक्षा मोठे होते ते अस्तित्वात आले होते. 'सुदास' हा भरत टोळीचा राजा होता व त्याने भारतातील सर्व राज्य आपल्या वर्चस्वाखाली आणण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती. विश्विमित्र हा भरत टोळीचा पुरोहित होता; पण् काही कारणामुंळे त्याचे वर राजा सुदास यांच्याशी बिघडले.राजाने विश्वमित्राची हाकालपट्टी करुन वसिष्ठ पुरोहिताची नेमणूक केली. त्यामुळे विश्वमित्र चिडला त्याने भरत टोळीचा सूड घ्यायचे ठरवले. विश्वमित्राने आर्यांची पाच राज्य ( पंचजन) व अनार्याची पाच राज्ये ( भिव,भलान,पख्त, विषणिन,अलिन) असा दहा राज्यांचा एक संघ तयार केला व सुदास राजाच्या टोळीविरुद्ध युद्ध पुकारले. पण दशराज संघ व भरत टोळीत भरत टोळीचा विजय झाला. भरट टोळीने सप्तसिंधुच्या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केले. हे प्रभुत्व दीर्घकाळ टिकले म्हणून आपल्या देशाला 'भारत' व 'भारतवर्ष ' हे नाव प्राप्त झाले. पराभूत राज्य स्वतःच्या राज्यात विलीन केली. आणि सर्वात मोठे राज्य असणारी 'भरत' टोळी राजकीय क्षितिजावर आली.

-इति. भारताचा इतिहास व संस्कृति(इ.स. ६५० पर्यंत )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा!

नेहमीपेक्षा वेगळी आणि चांगली माहिती. यावर प्रकाश टाकण्यासारखं असेल तर अधिकही लिहा ना!

उत्तम माहिती

ही माहिती खरंच उत्तम आहे. आपण जो ग्रंथसंदर्भ दिला आहे (भारताचा इतिहास व संस्कृति ) ह्याबद्दल थोडा विस्तार करू शकता का? (कोणी लिहिलाय, कुठल्या प्रकाशनाकडून तो उपलब्ध झाला आहे?)

धन्यवाद

संदर्भ

डॊ.एस.एस. गाठाळ अंबाजोगाई येथील महाविद्यालयात इतिहास विभाप्रमुख आहेत आणि त्यांनी डॊ. बाबासाहेब आंबेडकर मराठ्वाडा विद्यापीठ औरंगाबाद, कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी लिहिलेले पुस्तक आहे.
( हे पुस्तक जर आपल्याला हवे असेल तर मी आपल्याला पाठवू शकेन.)

भारताचा इतिहास व संस्कृती (इ.स. ६५० पर्यंत. )
डॊ.एस.एस. गाठाळ

प्रकाशक
के. एस. अतकरे
कैलाश पब्लिकेशन
औरंगपुरा, औरंगाबाद.
किंमत : २७५ :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद

संदर्भाच्या विस्तारित माहितीबद्दल धन्यवाद. इथे पुस्तक न मिळाल्यास मी आपल्याला व्य नि पाठवीन.

भरत आणि कुरुवंश

भरत या शब्दाचे अर्थ:-नट; पगारी शिपाई; कोष्टी; वनचर,; भिल्ल, इ.इ. या अर्थांचा आणि भरत नावाच्या व्यक्तींचा काही संबंध नाही.
आता पांडव हे कुरुवंशीय होते आणि स्वत: कुरु भरतवंशीय होता. ही घ्या वंशावळ:-
आयु-नहुष-ययाती-पुरु-दुष्य़न्त-भरत-वितथ-मन्यू-बृहत्क्षत्र-हस्ती-अजमिध-ऋक्ष-कुरु-जन्हु-.-.-.-.-.-.-.-शन्तनु(२)-भीष्म-विचित्रवीर्य- पांडू-पांडव-अभिमन्यू-परिक्षित-जनमेजय इ.इ.
हा भरत ज्याच्या नावाने भारतवर्ष हे नाव पडले तो नक्की नाही. तो भरत आधी लिहिल्याप्रमाणे ऋषभदेवाचा पुत्र.--वाचक्‍नवी

भरत - वनचर, भिल्ल (?)

वर बिरूटे सरांच्या प्रतिसादात भरत नावाची टोळी असल्याबद्दल लिहिले आहे. वनचर, भिल्ल या अर्थाने तर या टोळीचे नाव येत नसावे? असल्यास ते आर्य असावेत का?

वंशावळ

ही वंशावळ महाभारतात दिली आहे का?

अर्थात आहे.

पण वंशावळ म्हणून नाही. महाभारतात वेगवेगळ्या ठिकाणी ही नावे आली आहेत. उदाहरणार्थ:- आयु, पुरुरवा, उर्वशी, नहुष(१.७५); ययाती(१.७८, १.८१); पुरु(१.८४); दुष्यंत(१.६९, ७०, ७३, ७४); भरत(१.७४); वितथ(१.९४); मन्यू(?); बृहत्क्षत्र(?); हस्ती, अजमिध(१.९५); (हस्तीने हस्तिनापुर शहर वसवले.); कुरु(१.९४)कुरूने कुरुक्षेत्र वसवले; शंतनू, विचित्रवीर्य, भीष्म इ.इ.(१.९७ ते १.१३०).
---वाचक्‍नवी

पुराणांत आहे

भागवत् पुराणात आहे. तसेच महाभारतात अनेक संदर्भ आहेत.

येथे चार्ट पाहता येईल.

चार्ट आणि इंद्र

प्रियालीबाईंनी दिलेला 'चार्ट' आणि त्याखालच्या त्यांच्या प्रतिसादात शक्र हा अदितीचा पुत्रच इंद्र असल्याचा उलगडाही आपण केल्याचे कळले होते हे वाक्य दिसले. हा उलगडा मी कधी आणि कुठे केला होता ते आता आठवत नाही. पण इथे सांगणे आवश्यक आहे की, शक्र हा एकुलता एक इंद्र नाही. इंद्र हा एक विशिष्ट माणूस नसून ते एक पद आहे. शंभर यज्ञ यशस्वी केले की ते पद तुमच्याआमच्यापैकी कुणालाही मिळू शकेल. फक्त ते यज्ञ पूर्ण होऊ नयेत म्हणून सध्याचा पुरंदर नावाचा इंद्र त्यांत सत्राशे साठ विघ्ने घालेल. यापूर्वी हिरण्यकशिपू, बली आणि प्रह्लाद या तीन असुरांनी आणि नहुष राजाने हे पद जिंकले होते.

माणूसवरून आठवले. कै.वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..हे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी वेदांत काही कथा आहेत याची कुणाला जाणीव झालेली नव्हती आणि देव ही माणसे होती ही कल्पनाही कधी कुणी केली नव्हती.--वाचक्‍नवी

सहमत

शंभर यज्ञ यशस्वी केले की ते पद तुमच्याआमच्यापैकी कुणालाही मिळू शकेल.

हे मागे वाचले होते. भागवतात असा उल्लेख आहे पण शंभर अश्वमेध यज्ञ केले की इंद्रपद मिळते असे काहीसे आहे फक्त कोणी कोणाला म्हटले ते सध्या आठवत नाही. :-(

१००?

शंभर अश्वमेध यज्ञ ?
त्यातल्या त्या एक्सायटींग विधींसकट?
म्हणजे १०० वेळा घोड्याबरोबर...

म्हणूनच त्या राजांना इतक्या बायका - आय मीन राण्या होत्या...

आपला
गुंडोपंत

इंद्रपदप्राप्ती

वेदांमध्ये सुमारे ४०० यज्ञांची नावे दिली आहेत. रोज करायचे यज्ञ, नेहमी करायचे, वर्षातून निदान एकदा करायचे, आयुष्यातून एकदातरी करायचे, तसेच घरातल्या घरात करायचे यज्ञ असे सर्व प्रकारचे यज्ञ आहेत. यातला अश्वमेध यज्ञ हा फक्त सम्राटाने करायचा यज्ञ आहे, त्यामुळे इंद्रपदप्राप्तीसाठी असले शंभर यज्ञ करायची कल्पना हास्यास्पद वाटते.
यजुर्वेदाच्या वाजसेनीय संहितेत ४० अध्याय आहेत. त्यांतल्या पहिल्या २५ अध्यायांत यज्ञांचे मंत्र आहेत. दर्शेष्ठि यज्ञ आणि पिंडपितृयज्ञ(अध्याय १-२), चातुर्मास्य यज्ञ(अध्याय ३), सोमयाग(४-८), वाजपेय, राजसूय(९-१०), अग्निचयन(११-१८), सौत्रामणी(१९-२१) आणि अश्वमेध यज्ञाचे मंत्र अध्याय २०-२५ येथे दिले आहेत.
याशिवाय अथर्ववेदात शांतिकम्‌, निकुंभिला, पौष्टिकम्‌ आणि अभिचारिकम्‌ इत्यादी यज्ञांचे मंत्र आहेत. घरी करायचे यज्ञ- पाकयज्ञ, गृहयज्ञ, गार्हपत्य इत्यादींचे मंत्रही वेदांत आहेत. .
यापूर्वी इंद्रपद प्राप्त झालेल्या प्रह्लाद, बलि आणि हिरण्यकशिपूने तत्कालीन इंद्राला युद्धांत जिंकून इंद्रपद मिळवले आहे. यातल्या फक्त बलीने शुक्राचार्याच्या पौरोहित्याखाली विश्वजित यज्ञ करून नंतर १०० अश्वमेध यज्ञ केल्याचे दिसते(भागवत ८.१५.३४), पण तेही इंद्र झाल्यानंतर . हिरण्यकशिपू या असुराचा जन्मच मुळी कश्यप ऋषींचा अश्वमेध यज्ञ चालू असतानाच झाला अशी कथा आहे. बाकी जणांनी यज्ञ करून इंद्रपद मिळवल्याचे वाचनात नाही.
वरील तिघांशिवाय झालेले इंद्र असे: भूतधामन(ऊर्फ ऋतुधामन), आयुपुत्र रजि, विश्वभुज्‌(भागवतमतानुसार यज्ञ),
विपश्चित्‌ (भा.म.नु.रोचन), सुशान्ति(ऊर्फ सुकीर्ति ऊर्फ सत्यजित्‌), शिखि(ऊर्फ त्रिशिख ऊर्फ शिबि), विभु, भवानुभव(ऊर्फ मनोजव/मंत्रद्रुम), आणि सध्याचा इंद्र पुरंदर(ऊर्फ ऊर्जस्विन्‌/महाबल).--वाचक्‍नवी

इंद्रपद

सध्याचा इंद्र पुरंदर(ऊर्फ ऊर्जस्विन्‌/महाबल)

सध्याचा इंद्र म्हणजे?

इंद्रपद म्हणजे नेमके काय हे सांगता येईल का? (म्हणजे कोणत्या सुविधा, अधिकार इ. याचे वेदांत किंवा पुराणांत वर्णन आहे का?)

तर मग....

"इंटरेष्टींग" चर्चा ;)

सर्वप्रथम "भारत देश् कोणाचा" ("नाव" भाग काढला आहे!) या प्रशाचे उत्तर देताना "भारत माझा देश आहे इतकी खात्री नक्की आहे, " असे म्हणावेसे वाटते...

आता शकुंतला-दुष्यंत चा मुलगा भरत (जहा सिंह बन गये खिलौने...) ह्यावरून भारत नाव पडले असे मी देखील ऐकले आहे आणि त्याचा येथे आधी उल्लेख देखील केला आहे. म्हणून काही प्रश्न कुतुहलापोटी नक्कीच पडतातः

  1. जय नावाच्या इतिहासाला महाभारत का म्हणायला लागले?
  2. वर आधी आल्या प्रमाणे अर्जुनाला भारत का म्हणले गेले - यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत... मधे तर स्पष्टपणे म्हणले आहे...
  3. दुसर्‍या कोणी ते नाव दिले असले अथवा दुसर्‍या कुणामुळे तसे नाव पडले असले तर फरक पडत नाही असे मला वाटते, आपल्याला पण पडत नसेल असेच वाटते पण आपल्यापैकी कुणाला "फरक" पडतो असे वाटते का? आणि वाटत असल्यास का फरक पडतो असे वाटते?

फरक पडत नाही

पहिले दोन प्रश्न माझ्याही डोक्यात (टाळक्यात) आले होते पण विकिवरून कॉपी-पेष्ट करण्याच्या नादात टंकायचे विसरून गेले. महाभारतात जागोजागी भरत/ भारत असा उल्लेख आहे. तुम्ही ते इथे टाकलेत ते उत्तम. मलाही त्यांची उत्तरे हवी आहेत.

दुसर्‍या कोणी ते नाव दिले असले अथवा दुसर्‍या कुणामुळे तसे नाव पडले असले तर फरक पडत नाही असे मला वाटते, आपल्याला पण पडत नसेल असेच वाटते पण आपल्यापैकी कुणाला "फरक" पडतो असे वाटते का? आणि वाटत असल्यास का फरक पडतो असे वाटते?

अजाबात फरक पडत नाही. ऋषभदेवांचा भरतही आपलाच आणि दुष्यंतपुत्र भरतही आपलाच. :-) पण गैरसमजावर आधारित ज्ञानापेक्षा खरी माहिती शोधावी एवढेच. :-)

अवांतर : भारताची साम्राज्ञी कोण? या प्रश्नाने आणि त्याच्या उत्तराने फरक पडतो का हो? - उत्तर खरडवहीत अपेक्षित. :-)

एक फरक

पण गैरसमजावर आधारित ज्ञानापेक्षा खरी माहिती शोधावी एवढेच. :-)

अगदी मान्य!

फक्त आत्ता मी सर्व प्रतिसाद परत वाचत असताना, आपल्या, वाचक्नवी आणि बिरूटे सरांच्या प्रतिसादात एक मुद्दा ग्राह्य धरला आहे ज्या बद्दल वेगवेगळे प्रवाह आहेत - तो म्हणजे आर्य बाहेरून आलेत हा. "आर्यन इन्व्हेजन" अथवा त्याचे कालांतराने मवाळ झालेले रूप "आर्यन मायग्रेशन"

देशाचे नाव कुठल्या व्यक्तीच्या नावाने पडले हा भाग वेगळा झाला पण त्यातून आर्य बाहेरूनच आले हा निष्कर्ष काढणे हे निदान सध्या असलेल्या पुराव्यातंदर्भात तरी सप्रमाण वाटत नाही.

अवांतरः आर्यन इन्वेजन/ मायग्रेशन

देशाचे नाव कुठल्या व्यक्तीच्या नावाने पडले हा भाग वेगळा झाला पण त्यातून आर्य बाहेरूनच आले हा निष्कर्ष काढणे हे निदान सध्या असलेल्या पुराव्यातंदर्भात तरी सप्रमाण वाटत नाही.

असा कोणताही निष्कर्ष काढणे हे या चर्चेचे उद्दिष्ट नाही परंतु उपस्थित सदस्यांपैकी प्रत्येकजण अनेकांतील एक प्रवाह धरून चालत (पोहत) असेल किंवा प्रवाह बदलू पाहत असेल किंवा केवळ किनार्‍यावर उभं राहू पाहत असेल तर त्याला कोणतीही आडकाठीही नाही. :-)

भरतजनांची टोळी

भारतवर्ष नाव कसे पडले याचा एक तिसरा पर्याय प्रख्यात संशोधक श्री. वासुदेवशरण अग्रवाल यांनी मांडला आहे. मात्र तो इथे देणे अप्रस्तुत ठरेल.
विकीवर, भारत हे नाव कुठल्या भरतामुळे पडले याचीच चर्चा असल्याने वासुदेवशरण अग्रवाल यांच्या उपपत्तीबद्दल माहिती द्यायची राहून गेली. ती अशी:- सुमारे सात आठ हजार वर्षांपूर्वी आर्यांच्या पाच शाखा सिन्धू ओलांडून हिंदुस्थानात आल्या. 'पंच जन' या नावाने त्या ओळखल्या जातात. त्यांतली एक शाखा भरतजनांची होती. भरतांचा हा गट मोठा महत्त्वाकांक्षी आणि तितकाच पराक्रमी होता. या गटाने पंजाबात भरतजनपदाची स्थापना केली. त्या जनपदाला इतर जन भारत म्हणू लागले.
पुढे याच भरतांनी गंगा-यमुनांच्या अंतर्वेदीपर्यंत मजल मारली. तेव्हापासून विंध्याच्या उत्तरेचा सर्व प्रदेश भारत या नावाने प्रसिद्ध झाला. पुढे आर्यांची अनेक गोत्रे विंध्य ओलांडून खाली दक्षिणेत उतरली. त्यांनी द्रविडांच्या प्रदेशात यज्ञ आणि वेद प्रकाशित केले. त्यामुळे 'समग्र पृथ्वी' ही यज्ञवेदी ठरली. 'यावती‌ भूमि: तावती वेदि:' असे सूत्र निर्माण झाले. या सर्व गोष्टींमुळे उभा देश भारत ठरला. हा सर्व भरतजनांचा पराक्रम होता.
ही सर्व माहिती वेगळ्या शब्दांत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी वर दिलीच आहे.
भरतजन आर्यच होते. भरत याचा अर्थ वनचर भिल्ल असा असल्याने तो शब्द भरतजनांचे यथायोग्य वर्णन करतो असे दिसते आहे.
आता जय नावाच्या इतिहासाला भारत किंवा महाभारत का म्हणायचे हा प्रश्न उभा राहू नये.--वाचक्‍नवी

माझी माहिती..!

माझी माहिती -

कृष्णद्वैपायन व्यासांनी या देशाला 'भारत' हे नाव दिले आहे अशी माझी माहिती आहे!

चूभूद्याघ्या!

आपला,
(व्यासभक्त) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

भरत, भारतवर्ष,

माझ्या वाचनांत आलेल्या माहितीप्रमाणे श्रीव्यास महर्षिंनी 'जय' नांवाचा इतिहास रचला. पुढे वैशंपायनाने त्यात भर घातल्यावर 'जय' चा 'भारत' झाला; आणखी पुढे सौतीनें त्याचा विस्तार केल्यावर त्या 'भारता'चे "महाभारत" झाले.
श्रीमद् भागवताच्या पाचव्या स्कंधामध्ये भरताची वंशावळ आहे ती अशी - प्रियव्रत, आग्नीध्र, नाभी, ऋषभदेव, भरत. याच भरताबद्दल भागवतात बरेच ठिकाणी त्याच्या नावावरून या देशाचे नाव ’भारतम्' पडल्याचे उल्लेख आहेत. प्रियालींनी संदर्भ दिलेलेच आहेत. पुढे अकराव्या स्कंधात २-१७ मध्ये 'विख्यातं वर्षं एतत् यन् नाम्ना भारतमद्‍भुतम्' [त्याच्याच नाववरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष नावाने प्रसिद्ध झाला] असा जरी उल्लेख असला तरी अर्थात् ते (नामांकन) पुढे केव्हांतरी झालेले असणार. कारण लगेच पुढे २४ व्या श्लोकात त्याच्या लहान नऊ ऋषि बंधुंबद्दल उल्लेख आहे तो असा - ते जीवन्मुक्त ऋषि अजनाभ वर्षात महात्मा निमीच्या यद्न्यात योगायोगाने पोहोंचले.
वेदकाकलीन उल्लेखिलेला भरत (राजा) हा ऋग्वेदांतील प्रसिद्ध दाशराज युद्धातील (मंडळ ७ वे) सुदासराजाचा पूर्वज. याची वंशावळ वेदकालीन ’बृहत्-देवता' या ग्रंथात तसेच वायुपुराणात सांपडते ती अशी : तृक्ष - देववात - सृंजय - पिजवन - सुदास. पण याच्या नावावरून या देशास त्याचे नाव देण्यात आले असा उल्लेख कुठेच आढळत नाही.
दुष्यंत-शकुंतला पुत्र भरत याच्या नावारून या देशाला भारतवर्ष नाव पडले असा उल्लेख प्रमाणभूत अशा इतिहास-पुराण ग्रंथापेक्षा कथा, काव्य कृतीमध्येच जास्त आढळतो असे (मला) वाटते.
[इंद्रदेखील ज्यांचा साहाय्यक अशा व्यक्तींचा "टोळी" म्हणून उल्लेख होतो तेव्हां एक विचार येतो की मग शिवाजीराजे यांना काय म्हणायचे ? अर्थात् कोणाला टोळीप्रमुख म्हणायचे आणि कोणाला राजे म्हणायचे हे ठरविण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहेच ! ]
एकोहम् -

सुधारणा -

तृक्ष - भरत - देववात - सृंजय - पिजवन् - सुदास

एकोहम् -

धन्यवाद

माहितीपूर्ण प्रतिसाद. खुलाशाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

रोचक माहिती

यातली बहुतेक माहिती मला नवीन आणि रोचक आहे. चांगला चर्चाविषय आहे! सर्वांना धन्यवाद.

टोळीवाले मानवसमूह

भरत हा एक सुविख्यात मानवसमूह. ऋग्वेदात विश्वामित्राला भरतांमध्ये श्रेष्ठ असे म्हटले आहे. विश्वामित्रानेच भरतांना विपाशा आणि शतद्रु नद्यांच्या संगमापाशी पार करण्याचा रस्ता दाखवला होता. सुदास, दिवोदास हे राजे याच मानवसमूहातले.
वर उल्लेखलेला देववातपुत्र सृंजय हा सृंजय नावाच्या टोळीचा एक राजा. ह्या टोळीचे वसतीस्थान हिलेब्रॅन्टच्या मते सिन्धू नदीच्या पश्चिमेला होते. काही अभ्यासक ही टोळी आणि युनानी लोकांची सेरांगे टोळी एकच समजतात, तर काही यांचे आद्य निवासस्थान ड्रेन्जियाना होते असे मानतात. त्सीमरच्या मते हे लोक सिन्धू नदीच्या खोर्‍यात उत्तर भागात होते आणि मध्यभागात तृत्सुगणाची माणसे राहात.
दाशराजयुद्ध:-ज्याअर्थी ऋग्वेदाच्या जवळजवळ सर्व मंडलांमध्ये या युद्धाचा उल्लेख आहे, त्याअर्थी हे युद्ध फार वैशिष्ट्यपूर्ण असले पाहिजे. या युद्धात सुदास राजाच्या विरुद्ध दहा राजे होते, म्हणून याला दाशराजयुद्ध म्हणतात. प्रत्यक्षात ऋग्वेदात सुमारे ३० राजांची नावे येतात. यातले काही पुरोहित असावेत तर काही अनैतिहासिक. दहा राजांपैकी काही नावे: शिम्यु, तुर्वश, द्रुह्यु, पुरु, अनु, वगैरे.
अवान्तर: वायुपुराणात (४५.७६) मनु नावाच्या एका राजाला लोकांचे भरणपोषण करणारा याअर्थी 'भरत' म्हटले आहे. आणि त्याच्या नावावरूनच देशाला तसेच तिथे राहणार्‍या लोकांना भारत असे नाव पडल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.--वाचक्‍नवी

सेरांगे, त्सीमर, ड्रेन्जियाना

हे शब्द माझ्यासाठी नवे आहेत.

यांच्याबद्दल अधिक माहिती किंवा दुवे देता येतील का?

बाकी, भरत हे नाव भलतंच फेमस होतं असं दिसतंय. भागवतात जडभरत (मूळ नाव भरत पण पुनर्जन्मात राजा मंद[बुद्धी] झाला यावरून - चू. भू. दे. घे)नावाच्या राजाचीही कथा आहे.

त्सीमर

त्सीमरसाठी इथे वाचा. सेरंगे टोळीची माहिती ड्रॅन्जियानाच्या दुव्यावर मिळायला हवी. तिथे या शब्दाचे स्पेलिंग कदाचित सरंगिया असे केले असेल.--वाचक्‍नवी

जोसेफ कॅम्पबेल

दुव्यांसाठी धन्यवाद!

त्सीमर हे गुरू जोसेफ कॅम्पबेलांचे गुरू हे वाचून धन्य वाटले. :-)

ड्रॅन्जियाना

ड्रॅन्जियानासाठी इथे टिचकी मारा.--वाचक्नवी

उत्सुक

माहिती विशेष नाही, प्रतिसाद आणि चर्चा एकूणातच माहितीपूर्ण. पण ज्या गोष्टी लिहील्या नाहीत असे दिसते आहे ("अप्रस्तुत"), त्यामुळे उत्सुकता मात्र चाळवली आहे :-)

फार छान

फार छान चर्चा झाली आहे. दुवे सुद्धा माहितीपुर्ण आहेत.
--लिखाळ.

 
^ वर