प्राचीन भारतातील राजे आणि वंश - २

पुराणांतून काढलेल्या वंशावळीचा हा दुसरा भाग. यांत नवरा बायको (किंवा पुरुष-स्त्री) संबंध "~" चिन्हाने दाखवले असून सर्व स्त्रिया मंद केशरी रंगात दाखवल्या आहेत. येथे वंशावळ बरीच मोठी होत असल्याने केवळ महत्त्वाच्या व्यक्ती दाखवल्या आहेत. एखादी महत्त्वाची व्यक्ती गाळली गेली असल्यास त्यावर चर्चा करता येईल आणि ती तक्त्यात घालता येईल. या व्यक्तींच्या अनुषंगाने येणार्‍या पुराणकथांवर चर्चाही व्हावी.

तुटक रेषा सरळ संबंध न दाखवता, मधल्या काही बिनमहत्त्वाच्या व्यक्ती गाळल्या गेल्याचे दाखवतात.
~ चिन्ह नवरा बायको संबंध दर्शवते.
लाल चांदणी - तिसरा तक्ता कुठून सुरु होईल ते दाखवते.

----------

वरील तक्ता परिपूर्ण असल्याचा दावा नाही. त्यात सुधारणा सुचवाव्या. चित्रावर टीचकी मारल्यास ते मोठे करून पाहता येईल.
लेखिकेला विषयाची संपूर्ण माहिती असल्याचाही दावा नाही. आपल्याकडील माहिती देण्यास उत्सुक असणार्‍या सर्व सदस्यांची आभारी असेन.

लेखनविषय: दुवे:

Comments

कुलवायश्व

हा तक्ता बनवताना कुलवायश्वाचे नाव आले. त्याच्याबद्दल पुराणकथा असल्याचे आठवते पण कोणती ती आठवत नाही. कोणाला माहित असल्यास ती येथे नमूद करावी. (श्रीकृष्णाच्या संदर्भात ती येते का?)

तक्ता वाचता येत नाही ?

तक्ता ठळक दिसत नाही आणि काहीही वाचता येत नाही.
काही तरी दुसरा मार्ग शोधा बॉ ! या तक्त्याच्या ऐवजी.
(चित्र सेव्ह करुनही मोठ्या आकारात नावे दिसली नाहीत. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तक्त्यावर टिचकी मारा

तक्ता मोठा आहे. इथे दिसणे अशक्यच. तक्यावर टिचकी मारून पिकासावर मोठी आकृती पहा. तिथून तो उतरवून घ्या. अर्थात, त्याव्यतिरिक्त तक्ता बनवण्याचा मार्ग कोणाकडे असल्यास त्याने तो येथे द्यावा. "त्याने" सांगितल्याप्रमाणे फॅमिलीएकोवर तक्ता बनवण्याचा प्रयत्न केला होता पण अतिरिक्त टिपा इ. त्यात देता आल्या नाहीत.

अभिनंदन!

व्वा! रामायणापर्यंत पोहोचल्याबद्दल अभिनंदन
पटकन काहि गोष्टी:
१. कद्रुची मुले नाग की क्रोधवशेची?
२. विनताच्या मुलांमधे जटायु पण वाढवता येईल का . रामायणामुळे तो प्रसिद्ध आहे म्हणून म्हटले :)
३. इंद्र राहिला (अदितीच्या १२ मधला थोरला ना?)

बाकी प्रतिक्रिया नीट बघून एकत्रच् देईन. या तुमच्या उपक्रमामुळे माझा मात्र या विषयातला इंटरेस्ट भलताच् वाढलाय :)

-(प्रभावीत)ऋषिकेश

कद्रुची मुले

१. कद्रु, क्रोधवशेची मुले नाग पण कद्रुची प्रसिद्ध झाली. सुरसेची मुले सर्प.

२. जटायुपर्यंतची वंशावळ मिळाली नाही. :( ती असेल तर कोणी द्यावी. तसे वानर, अस्वले(जांबुवंत) आणि पुलस्त्य ऋषींचा वंश (रावण) इ. राहिले आहे. ते बहुधा पहिल्या तक्त्यात घालता येईल. वेळ झाला की करते. तसे, जटायु आणि त्याचा भाऊ संपाती ही गिधाडे होती त्यामुळे विनताशी त्यांचा संबंध होता का हे माहित नाही. कश्यप पत्नी ताम्राला मात्र ६ मुली होत्या आणि त्यांच्यापासून प्राणी आणि पक्षीवर्ग वाढला असे वाचले. त्यात गिधांडांचाही उल्लेख आहे.

३. इंद्र अदितीचा पुत्र असल्याचे मीही आधी वाचले होते पण माझ्याकडे असलेल्या माहितीत अदितीचे १२ पुत्र असे - शक्र, अर्यम्, धाता, विधाता, त्वष्टा, पुष, विवस्वान(सूर्य), सविता, मित्रवरूण, अंश, भग, विष्णु. मला वाटायचे सविता म्हणजेच सूर्य. इंद्र यांत आला नाही की त्याचे दुसरे नाव आले आहे याची कल्पना नाही. :( कोणाला माहिती असल्यास ती द्यावी.

जटायु

जटायुची वंशावळः
जटायुचे वडील अरूण. संपली :) हा तक्त्यात टाकता येइल का?

म्हणजे जटायु गरुडाचा पुतण्या. त्यामुळे ना धड गरुड असं त्याचं रुप म्हणजेच गिधाड असं ही एका ठिकाणी दिलं आहे :)
एका ठिकाणी जटायुचा संस्कृत साहित्यात "जो पाऊस आणि दव हवं तेव्हा पाडु शकतो तो गरुडासारखा पण कमी पिसांचा पक्षी" असं वर्णन आहे असा उल्लेख् आहे. जालावर त्यांनीही कोणतेही उदा. दिलेले नाही तेव्हा हे किती प्रमाण आहे कोणास ठाउक

गरुडजन्म

गरुडजन्माची कथा वाचनात आली ती अशी:

कद्रु आणि विनता या बहिणींमधे प्रचंड स्पर्धा होती. त्या स्पर्धेचं रुपांतर पुढे पुढे असुया-मत्सरादी भावनांमधे झालं. या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा झाल्यानंतर तर हा प्रकार फार वाढला. कद्रुने आपल्याला सहस्त्र नाग मुलगे व्हावेत अशी इच्छा मनी धरली तर विनताने आपल्याला केवळ दोनच् मुले व्हावीत पण् ती या सहस्त्रांपेक्षाही श्रेष्ठ असावित अशी इच्छा मनी धरली. पुढे कद्रुने सहस्त्र व विनतेने दोन अंडी घातली. कद्रुच्या पहिल्या चार अंड्यांतुन अनुक्रमे शेष, वासुकी, ऐरावत आणि तक्षक ही नागमुले जन्माला आली. पुढे यथावकाश तिला सहस्त्र नागमुले झाली. हिला सहस्त्र मुले झाली तरी विनताच्या अंड्यातुन मुल जन्मास येईना. एकि दिवशी संतापलेल्या अधीर विनतेने एक् अंड कृत्रिमरित्या फोडले. त्यातुन अर्धीच वाढ झालेला एक् पक्षी जन्माला आला. हाच् अरुण! याने जन्मल्या जन्मल्या आपल्या मातेला तिच्य अधीरपणामुळे आपली वाढ न झाल्यामुळे दास्यत्वाचा शाप दिला. पण ती माता असल्याने तिला उ:शाप दिला की जर ती दुसरं अंड मधेच् फोडणार नसेल तर् त्या अंड्यातुन जन्माला आलेलं मुलं तिला दास्यत्वातुन मुक्त करेल. हा अरुण पुढे सुर्याच्या रथाचा सारथी झाला.
इथे विनता दुसरं अंड फुटायची वाट पाहत होती. एके दिवशी ति व कदृ बोलत असताना समुद्रमंथनाचा विषय निघाला. कदृने "सांग पाहु, उच्चैश्रवाच्या शेपटीचा रंग काय आहे. " विनताने निसंशयपणे सफेद असं उत्तर दिलं. कद्रुने पैज लावली की जर शेपुट पुर्ण सफेद नसेल तर तु माझी दासी नाहितर मी तुझी दासी बनेन.
कद्रु विनताला दरवण्यासाठी आपल्या नागमुलांना उच्चैश्रवाच्या शेपटीत लपुन बसायला सांगते. पण मुले नकार देतात तेव्हा कद्रु त्यांना शाप देते की जन्मेजयांच्या यज्ञात तुमचा नाश होईल. तरीही काहि इतर कपटाने कद्रु पैज जिंकते व विनता दासी बनते.
यथावकाश दुसर्‍या अंड्यातुन एक देखणा पक्षी जन्मतो. तो म्हणजे गरुड! तो नागकुळाच्या मागे लागतो आणि मातेला दास्यत्वातुन मुक्त करतो.

नाग आपल्या आईकडुन कपटीपणा घेतात आणि तिलाच् सोडून निघुन जातात. शापाने घाबरुन शेष ब्रह्मदेवाकडे जातो. ब्रह्मदेव त्याला मातेची आज्ञा न मानल्याबद्दल शिक्षा आणि शापातुन वाचायचा उपाय म्हणून पृथ्वी तोलून धरायला सांगतो.

अरुण

अरुणाची गोष्ट बरोबर आहे. अशा 'प्रीमॅच्युअर' जन्मलेल्या अरुणाला अर्धवट वाढ झाल्याने पावले नव्हती असे सांगतात.

चांगला प्रयत्न

शिवाय आपली जिज्ञासा व अभ्यासू वृत्ती दाद देण्याजोगी!
आता जरा मराठी माणसाच्या खेकडाधर्माला जागते. मला या आपल्या प्रयत्नाच्या अनुषंगाने २ मुद्दे मांडायचे आहेत.
१- प.वि.वर्तक व त्यांनी संदर्भादाखल दिलेली २-४ पुराणे अशी वंशावळ काढण्यासाठी पुरेशी वाटतात का? मुळात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही, की आपल्याकडे आजच्या आधुनिक अर्थाने 'इतिहास' ग्रंथ फारच कमी आहेत. एक राजतरंगिणी सोडता विक्रमांकचरितम वगैरे सारख्या इतिहासग्रंथांत इतिहासपेक्षा काव्य आणि अद्भूतच अधिक आहे. पुराण,महाभारत , रामायण यांना आपली परंपरा इतिहास मानते हे जरी खरे असले, तरी आपल्या परंपरेला 'इतिहास' या शब्दाने जे अभिप्रेत आहे व सध्या आपल्याला 'इतिहास' या शब्दाने जे अभिप्रेत आहे यांत बराच फरक आहे. त्यामुळे पुराणांतले संदर्भ ऐतिहासिक मानता येणार नाहीत, असा सर्वसाधारणपणे तज्ञांचा कल दिसतो.
आपल्या या संदर्भांच्या ऐतिहासिकतेमधे रस आहे की नाही ही पुढची गोष्ट झाली. परंतू व्याख्यांच्या या फरकामुळे सर्व पुराणकारांनी किंवा कवींनी हे संदर्भ मुळाबरहुकुम ठेवलेले दिसत नाहीत. कल्पना करा १०८च्या आसपास संख्या असलेली पुराणे+ महाभारत+ रामायण + असंख्य काव्ये यांत संदर्भ किती बदलत गेले असतील! ईक्ष्वाकूकुलाची वंशावळ शोधायला गेले तर अशीच मजा येते. रामायणात एक वंशावळ, पुराणांत दुसरी आणि कालिदासाच्या रघुवंशात तिसरी.
अर्थातच, आपण काही मोठे संशोधक वगैरे नाही, आपल्याकडे पुरेसे माहितीचे स्रोत किंवा मूळ प्रती नाहीत त्यामुळे सर्व पुराणांचा तुलनात्मक अभ्यास करून तक्ता काढणे अशक्य आहे, हे मला मान्य! पण या एका अडचणीची किमान जाणीव असावी असे वाटले म्हणून येथे मुद्दाम लिहिते आहे.
२- असे तक्ते काढण्याचा नेमका उद्देश काय, हे एकदा ठरवावे असे मला अजूनही वाटते. म्हणजे इतिहास म्हणून वंशावळ हवी आहे की मिथके म्हणून? मिथके म्हणून हवी असल्यास या वंशावळींच्या व्हेरिएशन्सना अंत उरणार नाही. इतिहास म्हणून हवी असल्यास आपण योग्य पुराण संदर्भाला घेत आहोत का हे तपासून पहायला लागेल. (प.वि.वर्तक याबद्दल फारसे विश्वासार्ह आहेत की नाहीत हा वादाचा विषय आहे) केवळ कुतुहल म्हणून तक्ता काढता येईलही, परंतू का कोण जाणे ही कल्पना माझ्या मनाला झेपली नाही.

असो, आपला विरस करण्याचा हेतू नाही. परंतू या दिशेने अभ्यास करताना काही महत्त्वाचे मुद्दे मनात ठेवले पाहिजेत असे मला वाटते म्हणून हा प्रतिसादप्रपंच. बाकी मला या वंशावळींची ओ की ठो माहिती नसल्याने त्यांच्या योग्यायोग्यतेची चर्चा करत नाही.

राधिका

विरस वगैरे

शिवाय आपली जिज्ञासा व अभ्यासू वृत्ती दाद देण्याजोगी! आता जरा मराठी माणसाच्या खेकडाधर्माला जागते.

ती अनपेक्षित नाही, उलट अशी प्रतिक्रिया कोणाकडून न येती तर आश्चर्य वाटते.

१- प.वि.वर्तक व त्यांनी संदर्भादाखल दिलेली २-४ पुराणे अशी वंशावळ काढण्यासाठी पुरेशी वाटतात का?

अजिबात नाही. तसा प्रयत्नही नाही. असता तर हे काम करण्याचे प्रयोजनच नव्हते. येथे केवळ प. वि. वर्तकांना ग्राह्य न धरता अनेक ठीकाणी केलेल्या वाचनांवरून ही यादी केली आहे. ती परिपूर्ण नाही हे आधी सांगितले आहेच. राहता राहिला वर्तकांचा प्रश्न तर त्यांना संदर्भासाठी वापरावे एवढे काम त्यांनी खचितच केलेले आहे. आपल्या माहितीसाठी असे सांगावेसे वाटते की वर्तकांबरोबरच मद्भागवत, रामायण, ब्रह्मपुराण आणि महाभारतातील अनेक कथाही वाचलेल्या आहेत तेव्हा कृपया केवळ वर्तकांचे पुस्तक वाचून हा प्रयत्न केला आहे असा ग्रह ठेवू नये.

कल्पना करा १०८च्या आसपास संख्या असलेली पुराणे+ महाभारत+ रामायण + असंख्य काव्ये यांत संदर्भ किती बदलत गेले असतील! ईक्ष्वाकूकुलाची वंशावळ शोधायला गेले तर अशीच मजा येते. रामायणात एक वंशावळ, पुराणांत दुसरी आणि कालिदासाच्या रघुवंशात तिसरी.

ठीक! त्या याद्याही येथे याव्यात. वेगवेगळ्या याद्यांची येथे चर्चा व्हावी म्हणूनच हा उपक्रम सुरु केला होता. कोणी याला इतिहास म्हणावे की पुराण भाकड कथा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोणी या याद्यांनी कन्विन्स व्हावे म्हणूनही त्या दिलेल्या नाहीत याची नोंद घ्यावी.

- असे तक्ते काढण्याचा नेमका उद्देश काय, हे एकदा ठरवावे असे मला अजूनही वाटते.

नेमका उद्देश असा की या व्यक्ती ज्या पुराणांत येतात त्यांची थोडीफार माहिती आपल्याला व्हावी आणि ती योग्य की अयोग्य यावर चर्चा व्हावी. उदा. ध्रुव हा परीकथेतील राजकुमार नसून पुराणकथेतील वंशातील एक व्यक्ती आहे, चंद्रवंश आणि सूर्यवंश कसे निर्माण झाले ते कळावे आणि असे अनेक. मला वाटतं हा उद्देश बर्‍याचजणांच्या आधीच लक्षात आला होता, नसल्यास या उत्तराने तो लक्षात येईल ही अपेक्षा करते.

या पलीकडे गहन विचार मी स्वतःही केलेला नाही. ज्यांना करायचा ते अर्थातच या चर्चेत करू शकतील.

अर्थातच, आपण काही मोठे संशोधक वगैरे नाही, आपल्याकडे पुरेसे माहितीचे स्रोत किंवा मूळ प्रती नाहीत त्यामुळे सर्व पुराणांचा तुलनात्मक अभ्यास करून तक्ता काढणे अशक्य आहे, हे मला मान्य! पण या एका अडचणीची किमान जाणीव असावी असे वाटले म्हणून येथे मुद्दाम लिहिते आहे.

एकेकाने आपल्याकडील ज्ञान दाबून ठेवण्यापेक्षा ते चर्चेद्वारे पुढे यावे आणि अधिक माहिती मिळत जावी म्हणून हा प्रपंच. ज्यांना माहिती द्यावीशी वाटते ते देतील. काहींना माहिती असूनही द्यावीशी वाटत नाही, त्यांच्यावर जबरदस्तीही नाही. राजीखुशीचा मामला आहे.

२- असे तक्ते काढण्याचा नेमका उद्देश काय, हे एकदा ठरवावे असे मला अजूनही वाटते.

केवळ कुतुहल म्हणून तक्ता काढता येईलही, परंतू का कोण जाणे ही कल्पना माझ्या मनाला झेपली नाही.

हरकत नाही. एखाद्याच्या मनाला कल्पना झेपाव्यात म्हणून प्रयत्न केला नव्हताच तसेच प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला झेपायलाच हवी असेही नाही.

असो, आपला विरस करण्याचा हेतू नाही. परंतू या दिशेने अभ्यास करताना काही महत्त्वाचे मुद्दे मनात ठेवले पाहिजेत असे मला वाटते म्हणून हा प्रतिसादप्रपंच.

आज गेले वर्षभरापेक्षा अधिक काळ नेटावर लिहित आहे. अनेकांनी विरस करण्याचे भारी प्रयत्न केले आहेत आणि करत राहतील पण मी इथेच आहे. तेव्हा अशा एखाद्या साध्याशा प्रतिसादाने काडीमात्र फरक पडणार नाही. :)

बाकी मला या वंशावळींची ओ की ठो माहिती नसल्याने त्यांच्या योग्यायोग्यतेची चर्चा करत नाही.

कधी माहिती झाल्यास चर्चा जरूर करावी. आभारी असेन!

स्पष्टीकरण

ती परिपूर्ण नाही हे आधी सांगितले आहेच.

माझे बरोबर उलटे म्हणणे आहे की तुमचीच काय इतर कोणाचीही यादी परिपूर्ण असू शकत नाही. कारण प्रत्येक स्रोतात जर आपल्याला वेगळीच वंशावळ मिळणार असेल, तर एकाच वंशावळीच्या सर्व उलट सुलट पाठभेदांचा एकाच तक्त्यात आढावा घेणे निव्वळ अशक्य आहे. परिपूर्ण नाही याची तुम्हाला जाणीव आहेच, परंतू का याबद्दल तुम्हाला वाटणारे कारण आणि मला वाटणारे कारण यांत फरक आहे. मला वाटणारे कारण सर्वांनी लक्षात घ्यावे आणि त्याप्रमाणे अभ्यास करावा एवढाच हेतू आहे.

कृपया केवळ वर्तकांचे पुस्तक वाचून हा प्रयत्न केला आहे असा ग्रह ठेवू नये.

तसे असेल तर चांगलेच आहे. बाकी टग्या यांचा मुद्दा मला पटला आहे. त्यामुळे वर्तकांचे साहित्य संदर्भाला घेऊ नये हा माझा मुद्दा मी मागे घेते.

कोणी याला इतिहास म्हणावे की पुराण भाकड कथा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

१- मी भाकड कथा हा शब्द कोठेही वापरलेला नाही. मी वापरलेला शब्द मिथके हा आहे.
२- इतिहास तेवढा उजवा त्याचाच अभ्यास करावा आणि मिथकांकडे पाठ फिरवावी या विचारांची मी नाही. किंवा इतिहासातच काय ते तथ्य, मिथकांत नाही असेही माझे म्हणणे नाही.
३- इतिहास आणि मिथके या दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून पौराणिक घटनांचा अभ्यास करता येतो. परंतू दृष्टीकोनाप्रमाणे अभ्यासाच्या साधनांत व दिशांत फरक पडतो. त्यामुळे आपला उद्देश काय आहे हे आधीच स्पष्ट असणे केव्हाही चांगले असे मला वाटते.

मला वाटतं हा उद्देश बर्‍याचजणांच्या आधीच लक्षात आला होता, नसल्यास या उत्तराने तो लक्षात येईल ही अपेक्षा करते.

मज अज्ञ बालिकेला हे लक्षात आले नाही, त्याबद्दल माफी असावी. :)

नेमका उद्देश असा की या व्यक्ती ज्या पुराणांत येतात त्यांची थोडीफार माहिती आपल्याला व्हावी आणि ती योग्य की अयोग्य यावर चर्चा व्हावी. उदा. ध्रुव हा परीकथेतील राजकुमार नसून पुराणकथेतील वंशातील एक व्यक्ती आहे, चंद्रवंश आणि सूर्यवंश कसे निर्माण झाले ते कळावे आणि असे अनेक.

मी आपल्याला खरडीद्वारे आपल्याला असाच प्रश्न विचारला असता

मी याला पौराणिक संदर्भ म्हणेन. साहित्य तर आहेच.

इतके मोघम उत्तर आपण दिले होतेत. त्यापेक्षा वरीलप्रमाणे सविस्तर म्हटले असतेत तर माझ्या मूळ प्रतिसादातील दुसरा मुद्दा लिहिलाच नसता.

बाकी आपली काही विधाने वाचून आपण आक्रमक पावित्रा घेतला असल्याचे कळते. आपल्याला माहित नसल्यास साधारण अशाच प्रकारचा थोडा अभ्यास मला काही कारणास्तव करावा लागला होता, हे सांगते (तुमच्याहून अगदी छोट्या प्रमाणात व २च स्रोत संदर्भाला घेऊन). तेव्हा मला आलेल्या अडचणी, विशेषतः आपल्या या सर्व संदर्भांबाबतच्या विचित्र कल्पनांमुळे व अज्ञानामुळे अशा अडचणी येतात, त्या तुम्हालाही येऊ नयेत; पुढच्यास ठेच मागचा शहाणा या विचाराने मी वरील प्रतिसाद लिहिला. परंतू आपल्याला अशा सुचवण्यांची गरज नाही असे दिसते. याची नोंद घेतलेली आहे. बाकी जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती एखादी सुचवणी करते, तेव्हा ती आपल्या चुका काढत असते असे नव्हे.
पु.ले.शु.
राधिका

आक्रमक वगैरे

आक्रमक पावित्रा इ. काही नाही हो, जसे प्रश्न तसे उत्तर. जशी प्रश्न विचारण्याची भाषा तशीच उत्तराची भाषा इतकेच धोरण.

बाकी, मोघम उत्तर दिले नव्हते असे मला वाटते. या लेखाच्या पहिल्या भागात जे स्पष्टीकरण दिले (ध्रुवबाळ् इ.) तेच येथील प्रतिसादात दिले म्हणजेच ते पूर्वीही आले होतेच. खरडीत आपण जो प्रश्न विचारलात त्याचे उत्तर दिले.

हा तुमचा प्रश्न:

मला एक प्रश्न पडला आहे. तुम्ही या ज्या सर्व वंशावळी वगैरे देता त्या इतिहासाचा (म्हणजे खरोखरीच घडून गेलेला इतिहास आहे या अर्थाने) भाग म्हणून की साहित्याचा भाग म्हणून? दुसरा प्रश्न- तुम्ही प.वि. वर्तकांना मानता का?


आणि हे माझे उत्तरः

हे मला जे मिळाले ते दिले. तो इतिहास म्हणता येईल असे नाही पण त्यात तथ्य असायला हरकत नाही. इतिहास वंशावळींतून आणि कालगणनेतून येतो. येथे हे करणे किचकट आहे. ज्याप्रकारे ते प्रेझेंट केलेले आहे त्याप्रकारे त्याला इतिहास म्हणणे धाडस आहे. मी याला पौराणिक संदर्भ म्हणेन. साहित्य तर आहेच.

प. वि. वर्तकांचे लेखन चांगले असते. जोपर्यंत ते संदर्भासह लिहितात. त्यावर स्वतःची टिप्पणी करू लागले की सर्व फिस्कटते.

ही प्रश्नोत्तरे अद्याप खरडवह्यांत आहेत. असो, आपण या प्रकारचा अभ्यास केला आहे हे वाचून आनंद वाटला.

कुलवायश्व

मला माहिती मिळाली ती अशी (कोणी तज्ञाने अनुमोदित करावी):
पुरुरवा--> आयु पर्यंत तक्त्याप्रमाणे. पुढे आयुला पाच मुले नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, रंभ, अनीना. क्षत्रवृद्धाचा मुलगा सुहोत्र. सुहोत्राला तीन मुले होती काश्य, कुश आणि गृहस्मध. (गृहस्मधाचा मुलगा शुनक ज्याचा मुलगा शौनक (जी शौनकजींची मंदिरे दिसतात ती याची)) काश्याचा मुलगा काशी. काशीचा मुलगा राष्ट्र. त्याचा मुलगा दिर्घतमा. आणि दिर्घतमाचा मुलगा धन्वंतरी.

धन्वंतरीचा मुलगा केतूमान. केतूमानचा मुलगा भीमरथ. भीमरथचा मुलगा दिवोदास. आणि दिवोदासाचा द्युमन.
हाच द्युमन अनेक नावांनी ओळखला जातो जसे, प्रतर्दन, शत्रुजित, ऋध्वज आणि कुलवायश्व

आता गोष्ट शोधतो. मिळली की याच प्रतिसादात टाकीन :)

ऋषिकेश

कुलवायश्व

वंशावळ बरोबर आहे.

एक मजेशीर गोष्ट आढळली. कोणी तज्ज्ञ येथे अधिक मदत करू शकतील.

धुंधुमार या राजाचे खरे नाव कुवलायश्व (कुलवायश्व नाही*) असल्याचे वाचले. त्याने धुंधु राक्षसाचा नि:पात केला. हा इश्वाकु वंशातील राजा. या राजांच्या वंशात दशरथाच्या बर्‍याच आधी मांधाता नावाचा एक राजा होऊन गेला. तो अतिशय पराक्रमी होता असे सांगितले जाते. हे मंदिर त्याच्या पुत्राने त्याच्या स्मरणाप्रीत्यर्थ बांधल्याचे सांगितले जाते.

* येथे गफलत आहे की संदर्भ योग्य आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.

कुवलायश्वाची गोष्ट

याचा उल्लेख काही ठिकाणी कुबलाश्वही केलेला आढळला.
या कुवलायश्वाचे वडिल वृहदश्व. त्यांना वानप्रस्थाश्रमी जायचे होते. पण त्यांचे ऋषि उतंक यांनी सांगितले , "आता अरण्यात राज्य सोडून जाऊ नकोस. आपल्याकडे जो समुद्र आहे त्याच्या वाळूत धुंधु नावाचा राक्षस आहे. हा इतका बलशाली आहे की त्याने एकदा उच्छ्वासातून सूर्याला आठवडाभर झाकून ठेवलं होतं आणि अजुनही कोणताही देव (आदित्य) त्याला मारु शकलेला नाही. माझ्या तपस्येत हा राक्षस अनेकदा व्यत्यय आणतो. तेव्हा त्याचा बिमोड केल्याशिवाय वानप्रस्थाश्रमी जाऊ नकोस. तु त्याचा बिमोड करण्यास तयार असल्यास मी तपस्येतुन आतापर्यंत जी सिद्धी आणि विद्या मिळवली आहे ती तुला देईन"
तेव्हा वृहदश्व म्हणाला की "तुमची आज्ञाच असेल तर मी जाईनच् पण मला विचाराल तर धुंधुला मारायला माझा मुलगा कुवलायश्वही पुरेसा आहे. तरी ही शक्ती-युक्ती-विद्या-आयुधे त्याला द्यावीत. मी ठरवल्याप्रमाणे वानप्रस्थाश्रम घेतो."
उतंकानी आपली विद्या कुवलायश्वाला दिली. तो व त्याचे भाऊ यांनी मिळून धुंधुबरोबर युद्ध चालु केले ज्यात त्याचे ३ सोडून सगळे भाऊ मेले (हे तीन दृदश्व, चंद्राश्व, कपिलाश्व पळून गेले). आणि उरलेल्या कुवलायश्वाने धुंधुला एकट्याने ठार केले. म्हणून त्यास धुंधुमार नाव पडले.
(उतंकांनी खुष् होऊन मेलेल्या भावांना सरळ स्वर्गात प्रमेश मिळण्याची व्यवस्था केली ;) )

ऋषिकेश

अधिक स्रोत

अधिक स्रोत उपलब्ध असल्यास तेही उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे, कारण अशा अनेक स्रोतांच्या तुलनेतूनच सत्याच्या अधिकाधिक जवळ पोहोचणे शक्य आहे.

हा अतिशय महत्त्वाचा विचार इथे मांडल्याबद्दल धन्यवाद. अनेक स्रोत, कल्पना, मिथके मांडत जावीत. अनेक गोष्टी नजरेसमोर आल्या की त्यातील बरे वाईट (खरे खोटे) निवडायची इच्छा जागृत होते आणि त्यातून सत्य बाहेर येण्याचे प्रमाण वाढत जाते.

परंतु एक भरीचा मुद्दा मांडण्याचा मोह अनावर होतो,

हा भरीचा मुद्दा? अरे बापरे! पण खरंच, हा मुद्दा (प्रतिसाद/ लघुलेख) आणखी थोडा फुलवलात तर एक चांगला वैचारिक लेख तयार होईल. बायबलावरील टिप्पणीशी सहमत आहे आणि त्या अनुषंगाने अभ्यास करणार्‍या पाश्चात्त्यांचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे.

बरेचसे होय!

शेवटी, इतिहास म्हणजे तरी काय ? बहुसंख्य लोकांना मान्य असलेली भूतकाळाविषयीची मिथकेच ना ?

होय आणि किंचित नाही. इतिहास म्हणजे तत्कालीन आणि सद्यकालीन बहुसंख्य लोकांनी मान्यता दिलेल्या लेखकाचे तत्कालीन कालाविषयी स्वतःच्या समजूतींनुसार दिलेले विवेचन अशीही एक व्याख्या करता येईल.

इतिहासातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुसूत्रता आणि सातत्य (कंटिन्युइटी) शोधणे. जर अमुक वंशातील राजा आपण रामाचे वंशज असल्याचे भाष्य करत असेल तर रामापर्यंत त्याची वंशावळ शोधता येते का याचा अभ्यास म्हणजेही इतिहास.

सहमत

या तक्त्यांचा वापर मुख्यत्वे documentation या दृष्टीने आहे. आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा स्वरूपात माहिती संकलित करणे ही पुढच्या अभ्यासाच्या दृष्टीने सुरुवात म्हणता येईल. संकलित गोष्टींमधील (असल्यास) पुनरुक्ती, किंवा चुका, नंतर / इतरांच्या सहाय्याने दुरुस्त करता येऊ शकतील असे वाटते.

एक फक्त यात सुधारणा सुचवायची आहे कारण तक्ता नीट दिसला नाही - झूम करूनही दिसला नाही. त्यासाठी तक्ते करणार्‍या सुविधा चांगल्या नसल्यास अधले मधले बिंदू "अ", "ब" , "क" असे सुरू करून/ संपवून छोटे तक्ते बनवता येतील. यामुळे वाचताना थोडा रसभंग होईल, पण नीट वाचता येईल असे वाटते.

तक्ता आणि कल्पना आवडली...

हा तक्ता आणि कल्पना आवडली. उपल्ब्ध स्त्रोतांचा उपयोग होऊन यात बरीच माहीती संकलीत झाली आहे.

आपल्याकडे पुराणे आणि इतिहास जरी वेगळे धरले गेले असले तरी त्यात पण पायात पाय घातलेली नाती सहज दिसून येऊ शकतात. वर्तकांचा तर्कटपणा सोडला आणि त्रयस्थपणे माहीती म्हणून वाचले तर त्यांचा अभ्यास समजून येतो असा माझापण अनुभव आहे. (त्याम्च्या बाबतीतले काही उलट ऐकून/वाचून आलेले अनुभव देखील आहेत, पण दूध का दूध, पानी का पानी करायचे,सगळेच दूध समजणे जसे अयोग्य तसेच सगळेच पाणि समजून वेगळे करणे पण अयोग्यच).

एक गंमतशीर निरिक्षण म्हणजे शांत स्वभावाची म्हणून ओळखली गेलेली पण राक्षस कन्या असलेली शर्मिष्ठा हीच्या पोटी आणि नंतर तयार झालेल्या दोनच पिढ्यात गांधार राजे तयार झाले. त्यांनी आणि त्यांच्या (मुली) कडून तयार झालेल्या वंशजांनी म्हणजे कौरवांमुळे महाभारत युद्ध झाले. ते ज्या प्रांताततले तो अफगाण प्रांत सतत युद्धातच राहीलेला दिसतो...

बाकी यात रावण कोठे बसतो? का मी नीट पाहीले नाही? तसेच गरूड हा किणी पुराणातील कथेप्रमाणे माणूस होता का?

रावणाचा घोळ

रावणाचा जरा घोळच झाला त्याबद्दल क्षमस्व! पुलस्त्य ऋषींकडून सुरु होणारा हा वंश पहिल्या तक्त्यात यायला हवा होता. वेळ झाला की पहिले काम तेच करते.

गरूडच नाही तर वानर, गरूड, जांबुवंत, जटायु हे खरेच प्राणी होते असे वाटत नाही. येथे वर्तकांचे विवेचन मला पटते. त्या रुप धारण करणार्‍या किंवा त्या त्या प्राण्याला रिप्रेझेंट करणार्‍या जमाती असाव्यात. (बफेलो बिल्स किंवा सिएटल सीहॉक्सप्रमाणे. आम्हीही म्हणतो की आमचा पुढचा गेम जॅग्वार्स बरोबर आहे. ;-) ह. घ्या)

गरूड

गरूड हा गरुडच् माणूस नव्हे. विनताने पक्ष्यांच्या कुलाला जन्म दिला त्यातील ज्येष्ठ पुत्र गरूड आणि त्याने पुढे पक्ष्यांचे राजापद स्विकारले. हिंदु पुराण केवळ मानवाशी निगडित नसुन मानव, देव, दानव, दैत्य, राक्षस, पिशाच्च्, प्राणी, पक्षी, सरपटणारे, यक्ष, मरुत्, गंधर्व अश्या अनेक प्रकारच्या जिवांचे/वंशाचे आहे.
अवांतरःत्यामुळे "प्राचीन भारतातील राजे आणि वंश - २" यापेक्षा प्राचीन पौराणिक वंश असं म्हणता येईल का ?
(हे वाचीव ज्ञानावर.. अर्थात तज्ञ काय ते सांगतीलच्. चुभुदेघे)

ऋषिकेश

अफगाणिस्तानाचे दुर्दैव

ते ज्या प्रांताततले तो अफगाण प्रांत सतत युद्धातच राहीलेला दिसतो...

वाक्यातली गंमत समजली तरी एक टिप्पणी देण्याचा मोह टाळता येत नाही.

गांधार राजे असताना या भागात शांतता असावी असे वाटते. ते दैत्य कुलातील असले तरी. परंतु नंतर हा प्रदेश सतत भटक्या टोळीयुद्धात राहिल्या. शक, हुण, मंगोल इ. या भटक्या टोळ्यांची स्वतःचीच अवस्था इतकी वाईट असे की ते थोड्या संख्येने आणि अपुर्‍या शस्त्रांशिवाय हल्ले करत, त्यामुळे पकडले जाण्याची शक्यता जास्त. तेव्हा हल्ला करताना तेथील सर्वांची एकजात कत्तल करणे, आगी लावणे, बायका ताब्यात मिळाल्या तर त्यांच्यावर बलात्कार करून आपली संतती वाढवणे असा मार्ग ते अवलंबत. एकंदरीतच प्रदेशाची मानसिकता क्रूर झाली असेल किंवा हीच जीवनपद्धती आहे असे रुढ झाले असेल तर त्यात नवल नाही.

येथे चंगीझ खानाचे घोषवाक्य वाचावे -

पुरुषाकरता सर्वोत्तम आयुष्य कोणते असेल तर, आपल्या शत्रूला हुडकून त्याची कत्तल करणे, त्याची संपत्ती लुटणे, त्याच्या कुटुंबीयांच्या रुदनाचा आनंद लुटणे, त्यांचे घोडे पळवणे आणि त्यांच्या बायकांवर बलात्कार करणे.

या वाक्याचा मोठेपणा सांगण्याचा कोणताही हेतू नाही फक्त ही जीवनपद्धती टोळ्यांत सर्वमान्य होती.

उत्तम आहे.

हा उपक्रम उत्तम आहे.
मला व्यक्तिशः आवडला.
शिवाय हा पौराणिक इतिहास समजून घेण्यसाठी अतिशय उपयुक्त ठरेल.
त्याच प्रमाणे डॉ.प वि वर्तक यांचे लिखाण दुर्लक्षिण्याजोगे वाटत नाही. अनेकदा त्यांच्या लिखाणात तथ्य दिसते असे वाटते.
याशिवाय वर्तक यांची मते पुस्तक स्वरूपात आहेत म्हणजे सर्वमान्य स्वरूपात मांडलेली आहेत. त्या मतांचे खंडन करायचे तर त्याला पुस्तकातून देणेच योग्य आहे असे वाटते. त्यांच्या लिखाणावर टीका करण्या आधी किंवा ते ग्राह्य धरण्याच्या लायकीचे नाही अशी शेरेबाजी करण्या आधी त्यांच्या इतके वाचन करून तितके चिंतन करून त्यावर काही लिखाण केलेले हवे. उगाच 'हा माणूस काहीही लिहितो असे मी 'ऐकले आहे'' या बेसिस वर तीका करणे योग्य नाही.
डॉ. वर्तक यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. त्या अभ्यासावर आधारीत असा ह तक्ता मला सुयोग्यच वाटतो आहे.
श्री. ऋषीकेश यांनी यातल्या कथांवरही चर्चा करून उत्तम पायंडाच पाडला आहे.

बापरे!

वरील चर्चा वाचून बापरे म्हणावेसे वाटले.
प्राचीन संस्कृत ग्रंथ म्हणजे चार वेद; त्यांची व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, छंद, शिक्षा, कल्प आदी सहा वेदांगे; अनेक ललित गद्यसाहित्य व काव्ये, पुराणे, आणि उपनिषदे; तत्त्वज्ञान, गणित, धर्मशास्त्र, कर्मकांड इत्यादी विषयांवरील पुस्तके आणि अनेक चरित्र ग्रंथ. यांमध्ये इतिहास नावाचे काहीही येत नाही. पुराणे हा इतिहास असेल तर पुढील शास्त्रवचनात त्यांचा वेगळा उल्लेख झाला नसता.
शास्त्रवचन असे आहे: इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत्‌ ।
त्यामुळे इतिहासग्रंथ या सर्वापेक्षा काहीतरी वेगळे असावेत.
त्यामुळे पुराणे-इतिहास-काव्य यांच्यातून मिळणार्‍या माहितीची गल्लत होणारच. पुराणे या ऐतिहासिक कादंबर्‍या समजल्या की सर्वच पुराणात आणि काव्यात एकवाक्यता का नाही याचे आश्चर्य वाटत नाही. तरीसुद्धा, पुराणे आणि काव्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असल्याने त्यांतून खरा इतिहास डोकावणारच. त्यांतून आपण सत्य जाणण्याचा प्रयत्‍न करायचा.
आता वंशावळीबद्दल: काही किरकोळ लेखनदोष सोडले तर वंशावळ अचूक आणि उपयुक्‍त आहे. एवढी मोठी वंशावळ एका पानावर सहज वाचता येईल अशा रीतीने परिश्रमपूर्वक तयार करून देणे हे काम खरोखर कौतुकास्पद आहे. त्याबद्दल प्रियालींना कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच वाटतील.

लेखनदोष: (१) मराठीत हिरण्यकश्यपु असे लिहिले जाणारे नाव संस्कृतमध्ये हिरण्यकशिपु असे आढळते. (२) द्रुह्य हे नाव द्रुह्यु असेही लिहितात आणि तसे ते जास्त वापरात आहे. (३) सिंहीका, दिलिप, पुरुरवा ही नावे अनुक्रमे सिंहिका, दिलीप आणि पुरूरवा अशी हवीत.
(४)रुचिक हे अशुद्ध. ऋचीक(ची दीर्घ) हवे. (५) खशा हे नाव खसा असे वाचल्याचे आठवत नाही.

कश्यपाला तेरा पत्‍नी होत्या हे खरे असले तरी त्यांच्यापैकी अनेकांना एकापेक्षा जास्त नावे होती. त्यातली काही अशी: अदिती, अरिष्टा, इरा, कद्रू, कपिला, कालका, काला, काष्ठा, क्रोधवशा, क्रोधा, खशा, ग्रावा, ताम्रा, तिमि, दनु, दनायु, दया, दिति, धनु, नायु, पतंगी, पुलोवा, प्राधा, प्रोवा, मुनी, यामिनी, वसिष्ठा, विनता, विश्वा, सरमा, सिंही, सिंहिका, सुनेत्रा, सुपर्णा, सुरभि, सुरसा, सूर्या इत्यादी इत्यादी.
फक्त २४ अप्सरा मुनी ऊर्फ वसिष्ठाच्या मुली. शुची ताम्राची. तसेच आलंबा, उत्कचोकृष्टा, कपिला, केशिनी, निर्‌ऋता, महाभागा, शिवा या खशाच्या. अनवद्या, अरूपा, तिलोत्तमा, रंभा वगैरे अरिष्टाच्या जवळजवळ २१ मुली मोठेपणी अप्सरा झाल्या. --वाचक्‍नवी

शुद्धलेखन - शु.चि.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुराणांत अनेकांना एकापेक्षा जास्त नावं (कधीतरी पदवी) यांनी संबोधले गेल्याचे दिसते. शक्र हा अदितीचा पुत्रच इंद्र असल्याचा उलगडाही आपण केल्याचे कळले होते.

आपण सांगितलेले सर्व शुद्धलेखन दुरुस्त करते. आपल्यासारखे मानवी शु.चि. नेहमीच उपयोगी पडतात. पुन्हा एकदा आभार.

पदवीच नाही तर कुलनामसुद्धा

पुराणांत अनेकांना एकापेक्षा जास्त नावं (कधीतरी पदवी) यांनी संबोधले गेल्याचे दिसते.
सीतेच्या वडिलांचे नाव सीरध्वज. त्यांना आपण त्यांच्या जनक या कुलनामाने ओळखतो. (सीरध्वजांच्या पित्याचे नाव र्‍ह्स्वरोमन्‌).
तसेच रामाला राघव, धृतराष्ट्रपुत्रांना कौरव, तसेच भार्गव, काश्यप इत्यादी. या काश्यप कुलामध्ये १५हून जास्त प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या. सर्वजण काश्यप हेच नाव लावत होते. --वाचक्‍नवी

पुढे काय?

या लेखाचा भाग ३ यावा असे वाटते. फारच उत्तम लेख आणि प्रतिसाद. निवांत वाचल्यावर अनेक गोष्टींची उकल झाली.

आपला,
(ऐतिहासिक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर