अणुऊर्जा करार : काय खरे काय खोटे?

बरेच दिवस चर्चेत असणार्‍या अणुकरारावरून डाव्या पक्षांनी केंद्र सरकारचा पाठिंबा अखेर काढून घेणार असल्याचे निश्चित केले आहे. केवळ डाव्यांनी विरोध केला म्हणून त्याचे समर्थन करणारे महाभाग जसे आहेत असेच केवळ अमेरिकेचा पाठिंबा आहे म्हणून त्याला विरोध करणारे लोकही आहेत. आता अगदी साहित्य संमेलनही 'तिकडे' होणार म्हतल्यावर निदान मराठी माणसाला तरी आता अमेरिकेचे वावडे नको असे वाटते!

असो. सध्याचे डावे पक्ष हे एकंदरच माध्यमसाळसूद नाहीत असे माझे मत आहे. द हिंदू चे एन. राम वगळता कोणत्याही मोठ्या प्रकाशनसमूहामध्ये, वृत्तपत्रवाहिनीमध्ये उघडउघड किंवा छुपे कम्युनिस्ट सध्या दिसत नाहीत. त्यामुळे अणुकराराला त्यांच्या असलेल्या विरोधाची कारणे जितक्या प्रभावीपणे पुढे यायला हवी होती तितकी ती आलेली नाहीत. गेले काही दिवस या कराराला डाव्यांचा विरोध नक्की का आहे याबाबतची थोडी माहिती मिळाली ती अशी.

विरोध का?
१. भारताला ऊर्जेची प्रचंड गरज आहे हे कोणीही मान्य करील. सध्या भारतात एक लाख वीस हजार मेगावॅट विजेचे उत्पादन होते. साधारणपणे ३० टक्क्याच्या आसपास गळती, चोरी वगैरे प्रकारांमध्ये वीज वाया जाते. पुढील दहा वर्षांमध्ये भारताची विजेची गरज ही चार लाख मेगावॅट पर्यंत असेल असा एक अंदाज आहे.
अणुऊर्जा करार झाल्यानंतर त्यापासून निर्माण होणारी वीज ही फक्त चार हजार मेगावॅट इतकी असेल. भारताच्या एकूण गरजेच्या मानाने ही वीज कमी आहे.

२. अणुऊर्जा करारान्वये भारतातील सध्याच्या कायद्यांनुसार अणुऊर्जेचे व्यवस्थापन व नियंत्रण केले जाईल. मात्र सध्या भारतात याबाबतचे कायदे अतिशय प्राथमिक स्वरुपाचे आहेत. किंवा ते अजिबात नाहीत. जर असे कायदे अस्तित्त्वात नसतील तर अमेरिकन कायद्यांन्वये या ऊर्जेचे नियंत्रण होणे अपेक्षित आहे. अमेरिकन काँग्रेस दरवर्षी या कराराचा व भारताच्या आण्विक धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करील त्याप्रमाणे अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

३. भारताचे परराष्ट्र धोरण अणुऊर्जा कराराला सुसंगत असेच हवे. भारताच्या परराष्ट्र धोरणात काही बदल करायचे असल्यास त्यात अणुऊर्जा कराराच्या संदर्भाने काय आवश्यक आहे हे अमेरिकेच्या संमतीने ठरवणे आवश्यक आहे. जर अमेरिकेला भारताचे कोणते धोरण मान्य नसेल तर अणुऊर्जा करार संपुष्टात येऊ शकतो.

४. अणुऊर्जा करार केल्यानंतर आण्विक विजेची निर्मिती ही भारतात तीन टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यामध्ये युरेनियम वर आधारित आण्विक वीज. दुसर्‍या टप्प्यामध्ये युरेनियम एक्स्प्लोजन वर आधारित वीज आणि तिसर्‍या टप्प्यामध्ये थोरियम वर आधारित वीज. भारतात युरेनियमचे साठे नगण्य आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये हे इंधन आयात करावे लागेल. याशिवाय युरेनियमवर प्रक्रिया करणारे रिऍक्टर भारतात बनत नाहीत हे रिऍक्टरही बाहेरून आणावे लागतील.
एक रिऍक्टर बसवण्याचा खर्च १२ ते १६ कोटी रुपये इतका आहे. हे फक्त 'इन्स्टॉलेशन चार्जेस' आहेत. असे साधारण आठ रिऍक्टरं भारतात बसवली जातील.
सध्या युरेनियमच्या किमतीवर थेट नियंत्रण नाही. मात्र ओपेकच्या धर्तीवर युरेनियमची निर्यात करणार्‍या देशांनी संघटना स्थापन करून किमतीवर नियंत्रण मिळवले तर हा पर्याय तितका आकर्षक राहणार नाही हे उघड आहे.
भारतात थोरियम पासून वीजनिर्मिती करण्याचे स्वयंपूर्ण तंत्रज्ञान विकसित होत आहे. भारतात थोरियमचे अमाप साठे आहेत. हे तंत्रज्ञान व्यावसायिक पद्धतीने वापरले गेले तर भारताची ऊर्जेची गरज भागू शकते. त्यासाठी या जाचक अटी पाळून परदेशी मदत घेण्याची गरज नाही.

५. आण्विक वीज प्रचंड महागडी आहे. भारतात सध्या वापरात असलेल्या औष्मिक विजेच्या निर्मितीचा खर्च प्रति युनिट सरासरी २ रुपये ५० पैसे इतका आहे. वितरणासाठी साधारणतः तितकाच खर्च येतो. गळती व चोरीची भरपाई करण्यासाठी ग्राहकाला साधारण १ रुपये ५० पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागतात. ही वीज ७ रुपयांपर्यंत ग्राहकाला पडते.
आण्विक विजेच्या निर्मितीचा खर्च प्रति युनिट ६ ते ७ रुपये असेल. जर सरकारी अनुदान नसेल तर ग्राहकाला ती वीज १४ ते १५ रुपये प्रति युनिट पडेल.

६. आण्विक विजेमुळे प्रदूषण होणार नाही हा मुद्दा चुकीचा आहे. आण्विक कचरा आणि किरणोत्सर्ग यांना नष्ट करण्याचे कोणतेही प्रभावी तंत्रज्ञान उपलब्ध नाही. हा कचरा व किरणे लपवून ठेवावी लागतात. हे करण्यासाठी उपलब्ध असणार्‍या साधनांच्या क्षमतेबाबत शास्त्रज्ञांमध्ये प्रचंड मतभेद आहेत.

७. भारताने अनेक वर्ष कटाक्षाने पाळलेले अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण यामुळे अस्थिर होईल. इराण, इजिप्त वगैरे पारंपरिक मित्रांशी फारकत घेऊन अमेरिकेच्या तंबूमध्ये शिरणे योग्य नाही.

८. अणुऊर्जा करारानंतर आयएईए ला भारताच्या सर्व अणुभट्ट्यांची तपासणी केव्हाही करणे शक्य होईल. मुद्दा ३ नुसार जरी अमेरिकेने अणुकरार रद्द केला किंवा भारत थोरियम पासून अणुऊर्जा निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाला तरी अणुभट्ट्यांची तपासणी करण्याचे आयएईए चे हक्क कायम राहतील.

अणुऊर्जा कराराचे समर्थन करणार्‍यांची मते मात्र फार संदिग्ध आहेत. या कराराचे समर्थन करणार्‍यांनी दिलेली कोणतीही आकडेवारी माझ्या पाहण्यात आलेली नाही. 'अब्दुल कलाम आणि अनिल काकोडकर म्हणतात की हा करार चांगला आहे.' हे कदाचित सर्वात जास्त वेळा ऐकलेले कारण आहे. मात्र कलाम किंवा काकोडकर यांना निवडणुकीला उभे रहावे लागत नाहीत. एका अर्थाने ते कोणत्याही निर्णयाला किंवा परिणामांना जबाबदार नाहीत.

हे सर्व वाचून माझा गोंधळ झाला आहे.

या कराराबाबत काय खरे आणि काय खोटे? तुम्हाला काय वाटते?

Comments

गोंधळ

अरे बापरे!
इतके मुद्दे 'नको' च्या बाजूला वाचून माझाही गोंधळच उडाला.
मुद्दा ३ नुसार जरी अमेरिकेने अणुकरार रद्द केला किंवा भारत थोरियम पासून अणुऊर्जा निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाला तरी अणुभट्ट्यांची तपासणी करण्याचे आयएईए चे हक्क कायम राहतील.

हा मुद्दा डेंजर वाटला बॉ!
मलाही आता नको तो करार असेच वाटले.

पण हा करार व्हावा म्हणून अमेरिकेने काँग्रेसचे किती नेते केव्ह्ढ्याला विकत घेतले आहेत यावरही प्रकाश पडला तर बरे झाले असते.

तसेच हा करार करण्यासाठी अमेरिकेचे धोरण कसे कसे निश्चित होत गेले हे पण वाचायला हवे.
अमेरिकेचा या करारात काय नक्की फायदा आहे हे निश्चितपणे कळले पाहिजे.
मगच आपले धोरण ठरवण्यात फायदा आहे.
अन्यथा भारताला आपल्या पंखाखाली घेण्याचा एक डाव असेही याचे स्वरूप असू शकते.
त्याचवेळी या डावाचा उपयोग करून कराराचे गाजर दाखवत दाखवत भारताने आपला फायदा रेटावा. वेळ पडल्यास खुसपटी काढून करार करूच नये.

बाकी जुने इराण इजिप्त हे मित्र काही बदललेल्या राजकारणात फारसे कामाचे उरलेले दिसत नाहीत हे पण तितकेच खरे. किंबहुना त्यांच्याशी भारताची तितकी सलगीच उरलेली नाही. (त्या इराणी पाईपाचे काही सांगु नका. अमेरिकेने हुं केले की पाकिस्तान आत्ता बासनात गुंडाळेल तो करार!

बाकी चित्र वगैरे टाकून लेख छान लिहिला आहेस!
आपला
गुंडोपंत

डावा करार

लेख चांगला वाटला. पण करार चांगला की वाईट वा हवा की नको हे ठरवण्यासाठी हे मुद्दे पुरेसे वाटत नाहीत.
भारताला विजेची गरज आहे हे भारतातले कोणीही सांगू शकेल. त्यासाठी कोणत्या आकडेवारीची गरज नाही. खरतर येथे विज म्हणण्यापेक्षा उर्जा म्हटलेले जास्त योग्य. मला हा करार म्हणजे तंत्रज्ञान लवकर मिळवण्यासाठीची पळवाट वाटते आहे. भारतीय शास्त्रज्ञ चांगले काम करत आहेत. पण त्याची गती समाधानकारक आहे का? थोरियम बद्दल आम्ही अनेकदा ऐकले आहे. पण ठोस असे काही भारतात उपलब्ध आहे का? अणुकरारामुळे तंत्रज्ञानावर पकड मिळेल हे जास्त पटते. बाकी त्यासाठीचे राजकारण जास्त आहे. हे प्रत्येकाने मान्य करायला हवे. जर डाव्यांची संसदेत आज आहे तेवढी ताकत नसती तर हा विरोध झाला असता काय?

राजकारणात कोणीच कोणाचाही नेहमीचा शत्रू नसतो. मग ते गल्लीतले असो, दिल्लीतले की जागतिक पातळीचे. मग ज्या इराकवर आता अमेरिकेचा ताबा आहे त्याच्या शेजार्‍यावर ताबा मिळवायला कितीसा वेळ लागेल? गरजे प्रमाणे आपण सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले मित्र बनवणे गरजेचे आहे. हाच इराण उद्या भारतात मुसलमानांची गळचेपी होते आहे म्हणून बोंब मारायला कमी करणार नाही.

भारताला उर्जेची गरज आहे हे अधोरेखीत असताना त्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जर पुणे मॉडेल सगळीकडे लागू केले तर हि समस्या खरच उग्र राहिल का? खेडी जर विजेसाठी स्वयंपूर्ण बनायचा विचार करू लागली तर हे असले करार करावे लागतील का?

आता प्रश्न अणुभट्ट्यांच्या तपासणीचा. त्यात एवढे काय आहे कि ज्याने भारताला तोटा होणार आहे? भारत अणु उर्जा शांततेच्या कारणासाठी करेल हे जगजाहिर आहे. तसेच भारताकडे अण्वस्त्रे बनवण्याची आणि वारण्याची क्षमता आहे हे सुद्धा जगजाहिर आहे. मग या करारासाठी एवढा त्रागा का?

अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाने भारताचा फायदा झाला की तोटा हा वेगळाच चर्चेचा मुद्दा आहे. पण आम्ही अलिप्त राहिलो म्हणणे खरचं बरोबर आहे? आजवरच्या महायुद्धांमध्ये मित्रराष्ट्रे जिंकली आहेत. हे सत्य आहे. अन् आता अशी युद्धे होण्याची शक्यता किती? जर झाली तर अण्वस्त्रे वापरली गेली तर जगाचा नाश होणार आहे हे सुद्धा नक्की. मग अलिप्त राहून काय मिळणार आहे? कि आमचे परराष्ट्र धोरण अलिप्ततावादी आहे म्हणून पाकिस्तान आमच्यावर कधीच हल्ला करणार नाही आणि अण्वस्त्रे वापरणार नाही.

भारताचा एकही शेजार असा नाही जिथे भारत शेजार्‍यावर विश्वास ठेवू शकतो. मग जर भारताने नवे मित्र बनवले. ते सुद्धा महासत्ता असणारे तर त्यात काय बिघडले? त्यासाठी अणुकरार हे निमित्त होत असेल तर डाव्यांचा पोटात का दुखते? विरोध करण्या ऐवजी सत्तेत आल्यापासून थोरियमचा मुद्दा लावून धरला असता तर हा करार गरजेचा राहिला असता का? इकडे एका करारावरून सरकार पाडणे सुरू आहे आणि तिकडे चीन अरूणाचल वर हक्क सांगते तिथे असे म्हणणे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे?

हिटलरने रशियासोबत सामंजस्य करार केला होता. पण शेवटी हल्ला केलाच ना? गरजे नुसार प्रत्येक राष्ट्र आपले धोरण बदलू शकते. सरकारे पाडायचीच असतील तर योग्य मुद्यावर पाडा. एकिकडे कांद्याच्या भावावर सरकारे पाडली आणि आज तेच लोक आमच्या डोळ्यात कांद्याच्याच काय प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीवरून पाणी आणतात. त्यांना सरकार चालवायचा नव्हे, बनवायचा तरी अधिकार आहे का? अणुकरार हे एक निमित्त आहे भाराततल्या राजकिय समीकरणात गोंधळ उडवून देण्याचा. सामान्य माणसाला एकदा एक मुद्दा चघळायला दिला की झाले. आता यात भर म्हणून एखादी धार्मिक/जातीय दंगल घडेल आणि भारतात लवकरच धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत येईल, असेच अनेक नवे करार करायला. जे तुम्हाला आम्हाला कधी झाले ते कळत सुद्धा नाही. अन आपण असेच गोंधळलेले राहणार. नेहमीच.





सहमत

आर्य चाणक्य यांच्याशी सहमत.

"हाच इराण उद्या भारतात मुसलमानांची गळचेपी होते आहे म्हणून बोंब मारायला कमी करणार नाही. "
"हिटलरने रशियासोबत सामंजस्य करार केला होता. पण शेवटी हल्ला केलाच ना? गरजे नुसार प्रत्येक राष्ट्र आपले धोरण बदलू शकते. सरकारे पाडायचीच असतील तर योग्य मुद्यावर पाडा."
"आता यात भर म्हणून एखादी धार्मिक/जातीय दंगल घडेल आणि भारतात लवकरच धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत येईल, असेच अनेक नवे करार करायला. "
"आपण असेच गोंधळलेले राहणार. नेहमीच."
आणि या गोंधळात भर टाकायला प्रसिद्धी माध्यमे आहेतच.

जे गोंधळलेले नाहीत ते एकतर स्वतःच गोंधळ घालत आहेत किंवा या गोंधळाशी आपल्याला देणेघेणे नाही असा पवित्रा घेऊन बसले आहेत.

उत्तर १

लेख चांगला वाटला. पण करार चांगला की वाईट वा हवा की नको हे ठरवण्यासाठी हे मुद्दे पुरेसे वाटत नाहीत.
भारताला विजेची गरज आहे हे भारतातले कोणीही सांगू शकेल. त्यासाठी कोणत्या आकडेवारीची गरज नाही. खरतर येथे विज म्हणण्यापेक्षा उर्जा म्हटलेले जास्त योग्य. मला हा करार म्हणजे तंत्रज्ञान लवकर मिळवण्यासाठीची पळवाट वाटते आहे. भारतीय शास्त्रज्ञ चांगले काम करत आहेत. पण त्याची गती समाधानकारक आहे का? थोरियम बद्दल आम्ही अनेकदा ऐकले आहे. पण ठोस असे काही भारतात उपलब्ध आहे का? अणुकरारामुळे तंत्रज्ञानावर पकड मिळेल हे जास्त पटते. बाकी त्यासाठीचे राजकारण जास्त आहे. हे प्रत्येकाने मान्य करायला हवे. जर डाव्यांची संसदेत आज आहे तेवढी ताकत नसती तर हा विरोध झाला असता काय?

भारताकडे थोरियम पासून वीजनिर्मिती करणारे तंत्रज्ञान आधीच उपलब्ध आहे. ऑगस्ट २००५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर अशी रिऍक्टरं भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केली होती. दूरदृष्टीने विचार केल्यास युरेनियम आयात करून त्यापासून वीजनिर्मिती करणे हे परवडणारे नाही. भारताला थोरियमचाच विचार करावा लागेल. कॅनडा, ब्राझील यांच्यानंतर भारत हा थोरियमचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे. याशिवाय एकदा उभारलेली रिऍक्टरं साधारणतः १०-१२ वर्षांमध्ये निकामी होतात. त्यामुळे आता आयात केलेल्या रिऍक्टरांचा पुढे उपयोग नाही.

राजकारणात कोणीच कोणाचाही नेहमीचा शत्रू नसतो. मग ते गल्लीतले असो, दिल्लीतले की जागतिक पातळीचे. मग ज्या इराकवर आता अमेरिकेचा ताबा आहे त्याच्या शेजार्‍यावर ताबा मिळवायला कितीसा वेळ लागेल? गरजे प्रमाणे आपण सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले मित्र बनवणे गरजेचे आहे. हाच इराण उद्या भारतात मुसलमानांची गळचेपी होते आहे म्हणून बोंब मारायला कमी करणार नाही.

किंबहुना इराक, इराण, इजिप्त या राष्ट्रांनी 'मुस्लिम राष्ट्रांच्या संघटना' व तत्सम आंतरराष्ट्रीय मंचांवर नेहमीच भारताला समर्थन दिले आहे. (जे अमेरिकेने कधीही दिले नव्हते.) भारताची मुस्लिमविरोधी प्रतिमा उभी करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना यामुळे बरीच खीळ बसली आहे. या राष्ट्रांनी अमेरिकेप्रमाणे संधीसाधू धोरण न आखता एक दीर्घपल्याचे व परस्पर सहकार्याचे धोरण भारताशी नेहमीच चालू ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून कदाचित मागच्याच आठवड्यात इराणवरील प्रस्तावित अमेरिकन/इस्रायली हल्ल्याला प्रणव मुखर्जी यांनी विरोध केला आहे.


भारताला उर्जेची गरज आहे हे अधोरेखीत असताना त्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जर पुणे मॉडेल सगळीकडे लागू केले तर हि समस्या खरच उग्र राहिल का? खेडी जर विजेसाठी स्वयंपूर्ण बनायचा विचार करू लागली तर हे असले करार करावे लागतील का?

हा अणुऊर्जेला विरोध करणार्‍यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर अतिखर्चिक अणुऊर्जेसाठी एवढा पैसा भारताकडे आहे तर तेवढी गुंतवणूक अपारंपारिक स्त्रोतांमध्ये केल्यास तेवढी वीजनिर्मिती होऊ शकते. किंबहुना एकदा रिऍक्टरं लावल्यानंतर वीजनिर्मिती होण्यास कमीतकमी २ वर्षे लागतात असे म्हणतात. त्या तुलनेत अपारंपारिक स्रोतांपासून मिळवलेली ऊर्जा ही लगेच वापरता येऊ शकते.


आता प्रश्न अणुभट्ट्यांच्या तपासणीचा. त्यात एवढे काय आहे कि ज्याने भारताला तोटा होणार आहे? भारत अणु उर्जा शांततेच्या कारणासाठी करेल हे जगजाहिर आहे. तसेच भारताकडे अण्वस्त्रे बनवण्याची आणि वारण्याची क्षमता आहे हे सुद्धा जगजाहिर आहे. मग या करारासाठी एवढा त्रागा का?

प्रश्न केवळ अणुभट्ट्यांच्या तपासण्यांच्या हक्काचा नसून देशाच्या सार्वभौमत्वाचा आहे. अशा एजन्सीवरील बहुतेक सदस्य हे नेहमी अमेरिकन असतात. या एजन्सींनी दिलेल्या रिपोर्टांचा वापर भारताबाबत बरीवाईट धोरणे आखण्यासाठी होऊ शकतो. इराकवर हल्ला करण्याची सुरुवात करताना बुशमहाशयांनी तिथल्या अणुभट्ट्या तपासणीपासूनच सुरुवात केली होती हे माहीतच आहे.

पुढील मुद्द्यांची जमतील तशी उत्तरे संध्याकाळी देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अलिप्ततावादी चळवळीबाबतची काही पुस्तके हाताशी लागतील. या चळवळीचे फायदे व तोटे दोन्ही सांगता येतील.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तपासणी

प्रश्न केवळ अणुभट्ट्यांच्या तपासण्यांच्या हक्काचा नसून देशाच्या सार्वभौमत्वाचा आहे.

मान्य! पण हे हक्क कोणत्याही एका देशाकडे नाहीत.

अशा एजन्सीवरील बहुतेक सदस्य हे नेहमी अमेरिकन असतात. या एजन्सींनी दिलेल्या रिपोर्टांचा वापर भारताबाबत बरीवाईट धोरणे आखण्यासाठी होऊ शकतो

हे म्हणजे बरेचसे पोलीस भ्रष्ट असतात म्हणून तक्रार नोंदवायला पोलीसांकडे जाऊच नये किंवा पोलीस खाते असूच नये असे म्हणण्यासारखे झाले.

इराकवर हल्ला करण्याची सुरुवात करताना बुशमहाशयांनी तिथल्या अणुभट्ट्या तपासणीपासूनच सुरुवात केली होती हे माहीतच आहे.

पण हल्ला झाला तो अणु भट्टया तपासू दिल्या नाहीत त्यामूळे हे देखिल लक्षात घ्यावे. शेवटी बळी तो कान पीळी!

मस्त लेख!

मस्त लेख! फार आवडला..

टीपः पुढील प्रतिवाद केवळ दुसरी बाजू दाखवण्ब्याच्या उद्देशाने आहे. माझे या कराराबाबतचे मत अजूनही संदिग्ध आहे आणि कर्णाच्या ह्या लेखानंतर तर ते अधिकच संदीग्ध झाले आहे :)

१. भारताला ऊर्जेची प्रचंड गरज आहे हे कोणीही मान्य करील. सध्या भारतात एक लाख वीस हजार मेगावॅट विजेचे उत्पादन होते. साधारणपणे ३० टक्क्याच्या आसपास गळती, चोरी वगैरे प्रकारांमध्ये वीज वाया जाते. पुढील दहा वर्षांमध्ये भारताची विजेची गरज ही चार लाख मेगावॅट पर्यंत असेल असा एक अंदाज आहे.अणुऊर्जा करार झाल्यानंतर त्यापासून निर्माण होणारी वीज ही फक्त चार हजार मेगावॅट इतकी असेल. भारताच्या एकूण गरजेच्या मानाने ही वीज कमी आहे.

भारताच्या विजेच्या गरजेच्या मानाने फारच कमी वीज अणू उर्जेतून मिळेल हे खरंय. पण इथे उद्देश खरंच "वीज" मिळवणे इतका आहे का? भारताला आतापर्यंत जे तंत्रज्ञान नाकारले गेले ते या मुळे सहज उपलब्ध होईल. अनेक शास्त्रज्ञ यासाठीच तर या कराराची वाट पाहत आहेत असे वाटते. आपण स्वयंपूर्णपणे तंत्रज्ञान विकसीत करतो आहोत हे खरे. पण ते बर्‍याचदा अस्तित्वातस् असलेल्या तंत्राला पर्याय म्हणून असते. जगात जे उपलब्ध आहे त्यावरच्या संशोधनात आपला केवढा वेळ आणि संपत्ती वाया जात असेल!?

२. अणुऊर्जा करारान्वये भारतातील सध्याच्या कायद्यांनुसार अणुऊर्जेचे व्यवस्थापन व नियंत्रण केले जाईल. मात्र सध्या भारतात याबाबतचे कायदे अतिशय प्राथमिक स्वरुपाचे आहेत. किंवा ते अजिबात नाहीत. जर असे कायदे अस्तित्त्वात नसतील तर अमेरिकन कायद्यांन्वये या ऊर्जेचे नियंत्रण होणे अपेक्षित आहे. अमेरिकन काँग्रेस दरवर्षी या कराराचा व भारताच्या आण्विक धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करील त्याप्रमाणे अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

यात "जर असे कायदे अस्तित्त्वात नसतील " हे वाक्य अधोरेखीत व्हावे. एकदा का हा करार झाला की ज्या प्रकारे अमेरिका तत्त्वे झाहीर करू शकते त्याच प्रकारे भारतही स्वतःचे कायदे घोषित करू शकतो.

३. भारताचे परराष्ट्र धोरण अणुऊर्जा कराराला सुसंगत असेच हवे. भारताच्या परराष्ट्र धोरणात काही बदल करायचे असल्यास त्यात अणुऊर्जा कराराच्या संदर्भाने काय आवश्यक आहे हे अमेरिकेच्या संमतीने ठरवणे आवश्यक आहे. जर अमेरिकेला भारताचे कोणते धोरण मान्य नसेल तर अणुऊर्जा करार संपुष्टात येऊ शकतो.

अगदी बरोबर. पण असे झाल्यास करार केवळ अमेरिकेबरोबरच संपुष्टात येऊ शकतो. एकदा आय.ए.इ.ए. व एन्.एस्.जी चे समर्थन लाभल्यावर अमेरिका हा एकच पर्याय थोडाच उरतो?

४. ..........................
भारतात थोरियम पासून वीजनिर्मिती करण्याचे स्वयंपूर्ण तंत्रज्ञान विकसित होत आहे. भारतात थोरियमचे अमाप साठे आहेत. हे तंत्रज्ञान व्यावसायिक पद्धतीने वापरले गेले तर भारताची ऊर्जेची गरज भागू शकते. त्यासाठी या जाचक अटी पाळून परदेशी मदत घेण्याची गरज नाही.

थोरीयमवर आधारीत तंत्रज्ञान विकसीत करायला हा करार अडवत नाहि. ते झाल्यावर नका घेऊ विकत युरेनियम आणि अणुभट्ट्या कोण जबरदस्ती करणार? पण त्यासाठी हा रस्ता उघडतोय तो बंद का करायचा?

५. आण्विक वीज प्रचंड महागडी आहे. भारतात सध्या वापरात असलेल्या औष्मिक विजेच्या निर्मितीचा खर्च प्रति युनिट सरासरी २ रुपये ५० पैसे इतका आहे. वितरणासाठी साधारणतः तितकाच खर्च येतो. गळती व चोरीची भरपाई करण्यासाठी ग्राहकाला साधारण १ रुपये ५० पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागतात. ही वीज ७ रुपयांपर्यंत ग्राहकाला पडते.
आण्विक विजेच्या निर्मितीचा खर्च प्रति युनिट ६ ते ७ रुपये असेल. जर सरकारी अनुदान नसेल तर ग्राहकाला ती वीज १४ ते १५ रुपये प्रति युनिट पडेल.

आताच करार केला तरी इतका खर्च आहे. न जाणो पुढे अपरिहार्य परिस्थितीत करार करावा लागला तर याहून जाचक अटींसह अधिक खर्चिक करार करावा लागेल. (कोण रे तो एन्रॉन आठवतोय?)

६. आण्विक विजेमुळे प्रदूषण होणार नाही हा मुद्दा चुकीचा आहे. आण्विक कचरा आणि किरणोत्सर्ग यांना नष्ट करण्याचे कोणतेही प्रभावी तंत्रज्ञान उपलब्ध नाही. हा कचरा व किरणे लपवून ठेवावी लागतात. हे करण्यासाठी उपलब्ध असणार्‍या साधनांच्या क्षमतेबाबत शास्त्रज्ञांमध्ये प्रचंड मतभेद आहेत.

पारंपारीक उर्जेपेक्षा मात्र नक्कीच कमी प्रदुषण होईल असा माझा अंदाज आहे (असे नसल्यास चुभुद्याघ्या :) )

७. भारताने अनेक वर्ष कटाक्षाने पाळलेले अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण यामुळे अस्थिर होईल. इराण, इजिप्त वगैरे पारंपरिक मित्रांशी फारकत घेऊन अमेरिकेच्या तंबूमध्ये शिरणे योग्य नाही.

कोणापासून अलिप्त रहायचं ? जगापासून? जेव्हा जगात दोन तट होते तेव्हा दोन्ही तटांपासून अलिप्त हे समजू शकतो आता कोणतेही तट नाहित. प्रत्येक जण जितका एकत्र आहे तितकाच अलिप्त आहे! नाहि का?

८. अणुऊर्जा करारानंतर आयएईए ला भारताच्या सर्व अणुभट्ट्यांची तपासणी केव्हाही करणे शक्य होईल. मुद्दा ३ नुसार जरी अमेरिकेने अणुकरार रद्द केला किंवा भारत थोरियम पासून अणुऊर्जा निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाला तरी अणुभट्ट्यांची तपासणी करण्याचे आयएईए चे हक्क कायम राहतील.

करू देत की. भारताने हा हक्क मान्य केलाच आहे. परंतु हा हक्क केवळ "नॉन-मिलिटरी" अणूभट्ट्यासाठी आहे. मिटीटरी कार्यासाठी वापरल्या जाणार्‍या/जाऊ शकणार्‍या अणूभट्ट्या यातून वगळल्या जाणार आहेत. शिवाय कोणत्याही नवीन अणूभट्टीचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात करायचे हा हक्क भारताकडेच आहे.

हे सर्व वाचून माझा गोंधळ झाला आहे.

माझाही :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

फार छान विषय आणि चर्चा

मस्त लेख! आणि त्यावरचे ऋषीकेश आणि चाणक्य ह्यांचे प्रतिसाद आवडले.

सध्या भारत आणि चीन ह्या उगवत्या महासत्तांच्या विकासात सगळ्यात मोठा अडथळा आहे तो उर्जेची प्रचंड भूक! आणि त्यावर (सध्यातरी) उपाय हा (लाइक इट् ऑर नॉट्!) अणुउर्जा निर्मीती वाढवणे हाच आहे. चीनने त्यानुसार पावले टाकायला सुरू केली आहे. विकसीत राष्ट्रांमध्ये देखिल फ्रांन्स सारखे देश आता ७०% च्यावर उर्जेची भूक अणूशक्तितुन भागवत आहेत. अमेरिकेकडे अजुनतरी उत्तम प्रतिच्या दगडी कोळश्याचा त्यांच्या गरजेच्या तुलनेत फारसा तुटवडा नसल्याने अणुशक्तिचा वापर ३०% च्या आसपास होतो पण उद्या ही गरज वाढल्यास ते ही टक्केवारी नक्की वाढवणार.

अणु उर्जेतुन तयार होणारा कचरा ही मोठी समस्या असली तरी ह्या कचर्‍याचे रिसायकलींग करुन पुन्हा पुन्हा उर्जा निर्मिती करण्याचे तंत्र बरेच विकसीत होत आहे. अर्थात त्यामूळे कचर्‍यची समस्या पूर्णपणे दूर होणार असे नाही पण भारतात मिळणारा दगडी कोळसा तितका उत्तम प्रतीचा नाही त्यामूळे त्यातून होणारे प्रदूषण देखिल विचारात घ्यायला हवे.

सहमत

हेच म्हणतो. तुम्ही आणि ऋषिकेशने माझी बरिच मते मांडली आहेत. बाकी सविस्तर प्रतिसाद सवडीने. अजानुकर्णाने चर्चा विषय एकदम योग्य प्रकारे मांडला आहे. त्यात कुठे ही उथळपणा अथवा सध्याचा चविष्ट विषय म्हणून टाका विषय आणि पहा गंमत असा नाही. एखादा आंतरराष्ट्रीय विषय आपल्यासारख्यांशी कसा निगडीत आहे हे सामान्य भारतीय म्हणून प्रत्येक भारतीयाला समजावून घ्यावे असे वाटत नाही का? हा प्रश्न मात्र खुप सतावतो.





चांगला लेख

चांगला विषय आणि माहीतीपूर्ण चांगला लेख आणि चांगली चर्चा!

उत्तर देण्यासाठी जरा पोतडीत शोध घेतला आणि बरीच माहीती मिळाली. तरी देखील, वर ऋषिकेशने म्हणल्याप्रमाणे मी काही कुठल्याच बाजूने लिहीत नसून जी काही माहीती (वर आलेल्या पेक्षा वेगळी) आहे ती येथे अशंतः देतो (म्हणजे एकापेक्षा अधिक प्रतिसाद येऊ शकतील!) .

अणुशक्ती आयोगाचे माजी संचालक एम आर श्रीनिवासन् यांचा इंडीयन एक्सप्रेस मधे एक लेख आला होता. त्यातील काही मुद्दे: (या लेखात भारताच्या युरेनियम उत्खननासंदर्भातील माहीती मूळ लेखात वाचू शकाल).

  1. भारताला सध्या युरेनियमची चणचण भासत आहे आणि २००८ साला अखेरीस ती वाढू शकणार आहे.
  2. आत्ता आपण हेवी वॉटर चा उपयोग ८०-९०% इतकाच त्यामुळे करू शकत आहोत. जर आपण आतंर्राष्ट्रीय नागरी अणूशक्तीच्या बाजारात येऊ शकलो तर २००९ पर्यंत आपण आपला वापर ९०%च्या वर नेऊ शकू.
  3. भारताकडे १००,००० टन्स युरेनियमचे साठे जमिनीत आहेत ज्याचा त्यांच्या आयुष्यात १०,००० मेगावॅट हेवीवॉटर रीऍक्टरसाठी उपयोग होऊ शकतो. हे रीऍक्टर अजून २-३ दशकांनीपण थोरीयमच्या जास्त वापरासाठी उपयुक्त ठरू शकणार नाहीत (लहान पडतील). ते वापरता येण्यासाठी आपल्याकडे ३०,००० ते ५०,००० मेगा वॅट पहील्या पायरीसाठीचे नैसर्गीक आणि एन्रीच्ड युरेनियमचे प्रकल्प त्यासाठी लागतील. मगच आपण थोरीयमच्या प्रचंड साठ्यांचा वापर करू शकतो.
  4. जर भारत-अमेरिका करार यशस्वी झाला तर आपण नैसर्गीक युरेनियम कुठूनही घेऊ शकू (केवळ अमेरिकेकडूनच घेतले पाहीजे असे नाही). त्यामुळे सहज अजून १०,००० मेगावॅटचा प्रकल्प अस्तित्वात येऊ शकतो. शिवाय रशिया/फ्रान्स/अमेरिका कुणाकडूनही आपण लाईट वॉटर रीऍक्टर घेऊ शकू (जे आज शक्य नाही). त्याचा उपयोग + भारतातील प्लुटोनियमचा उपयोग हा या फास्ट ब्रीड रीऍक्टरमधे (एफबीआर) होऊ शकतो.
  5. मग थोरीयम या एफबीआर मधे किरणोत्सर्जीत करून युरेनियम २३३ मधे बदलता येऊन त्याचा वापर उर्जा तयार करायला होवू शकतो. भाभा अणुशक्ती केंद्राने अशा पद्धतीची प्रक्रीया करून ३०० मेगावॅटची अणूभट्टी तयार केली आहे.
  6. भारत २०५२ सालापर्यंत २७५,००० ते ३००,००० मेगावॅट अणूउर्जा तयार करण्याची शक्यता आहे. त्यातील सुमारे २००,००० मेगावॅट ही एफबीआर आणि युरेनियम२३३-थोरीयम पद्धतीतून तयार होऊ शकते तर उर्वरीत नैसर्गीक अथवा कमी प्रतिच्या एन्रीच्ड युरेनियम मधून होईल.

आता या मुद्याव्यतिरीक्त या कराराच्या बाजूने आणि "त्यात काळजी करण्यासारखे काही नाही ," असे म्हणणारे अनेक मुद्दे आहेत जे वेळ मिळाल्यावर लिहीन. पण एक महत्वाचा मुद्दा येथे सांगतो:

बर्‍याचदा यातील तात्विक (राजकीय कारणासाठी नसलेला) विरोध हा अमेरीकेतील "हाईड" कायद्यासंदर्भात आहे. ज्यामुळे आपल्यावर बंधने येऊ शकतात असे वाटते. पण जे काही वाचले त्याप्रमाणे:

हाईड ऍक्ट हा युएस काँग्रेसने संमत केला तो भारत-अमेरिका अणुशक्तीकरारासंदर्भात. पण "१२३ करार " (हे नाव आहे) जो या संदर्भात भारत-अमेरिकेत झाला त्यामधे "हाईड ऍक्ट"चा उल्लेख टाळला आहे. थोडक्यात त्या ऍक्टला भारत आणि हा करार बांधील नाही आहे. हा करार एकदा संमत झाला की अमेरिकेच्या दादागिरीमुळे असलेले वर्चस्व संपू शकते - अर्थात केवळ अमेरिकेकडूनच नाही तर इतर कुठल्याही देशाकडून आपण आपल्याला लागणारे युरेनियम आदी विकत घेऊ शकू आणि त्याला अमेरिकेची कलमे बांधील नसतील. हाईड ऍक्टचा संबंध जर आलाच तर तो केवळ अमेरिकन कंपनींना या संदर्भात कंत्राट दिले तरच!

----

अजून बरेच काही लिहीता येईल... याचा अर्थ अजिबातच असा नाही की वर अजानुकर्णाने लिहीलेले बरोबर अथवा चूक आहे. ही केवळ नाण्याची दुसरी बाजू असू शकेल...

हा करार

कुणाच्या तरी मतांवर आधारीत मते वाचण्यापेक्षा,

हा कराराचा मसूदा कुठे मूळ स्वरूपात वाचायला मिळेल?

कुणी दुवा देवू शकेल काय?

आपला
गुंडोपंत
(एक चीनी म्हण: ज्याला जे माहिती झालेले असते ते दुसर्‍याला सांगत नाहीत, आणि जे त्याबद्दल बडबडत असतात त्यांना ते माहितच नसते!)

अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे दुवे

हे दुवे बघावेतः

सेनेट मसुदा क्र ३७०९ (हा विचाराधीन आहे)

एच आर ५६८२ हाईड कायदा (हा कायदा पारित झालेला आहे)

चांगले मुद्दे

चाणक्यः एखादा आंतरराष्ट्रीय विषय आपल्यासारख्यांशी कसा निगडीत आहे हे सामान्य भारतीय म्हणून प्रत्येक भारतीयाला समजावून घ्यावे असे वाटत नाही का? हा प्रश्न मात्र खुप सतावतो.

या आठवड्यात गावाकडच्या एका मित्राशी भेट झाली त्यावेळी तो म्हणाला की हे कम्युनिष्ट देशद्रोही आहेत. ते अणुयुद्धापासून देशाला वाचवू इच्छित नाहीत म्हणून अणुकराराला विरोध करत आहेत. :) एक तर पेपरात येणार्‍या उथळ बातम्यांमध्येही कुठे अणुयुद्धाचा आणि अणुकराराचा बादरायण संबंध जोडला नव्हता. मात्र या कराराबाबत असे गैरसमजच फार आहेत .

आपले सगळेच राजकारणी कसेही असोत पण देशद्रोही नक्कीच नाहीत हे मला मनापासून वाटते. त्यामुळे या कराराबाबत कम्युनिष्टांची भूमिका नक्की काय आहे हे वाचावे अशी ट्यूब पेटली.

या चर्चेत चाणक्य, विकास आणि ऋषीकेश यांनी चांगले मुद्दे मांडले आहेत. त्यातून एकंदर हा करार समजण्यास फार मदत होईल. हाईड ऍक्ट बद्दल अनेक वेळा ऐकले आहे त्याबद्दल विस्तृत माहितीही समजल्यास उत्तम.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काँग्रेसचे राजकारण

खरतर हा प्रतिसाद म्हणजे थोडे विषयांतर होईल. पण मुळात हा चर्चा विषयच पुर्णपणे राजकिय पार्श्वभुमीचा असल्याने फारसे विषयांतर आहे असे वाटत नाही.
निवडणुका आता वर्षभरावर आल्या आहेत. चार वर्षे प्रत्येकानेच आपल्याला हवे ते करून घेतले. चार वर्षांपुर्वीची अवस्था आपण पाहिली तर लक्षात येईल की भाजप आणि काँग्रेस हेच सत्तेचे मुख्य दावेदार होते. यात काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या आणि भाजपने एनडीए सोबत. बाकी जे सगळे आले ते एनडीए सरकारचे अपयश म्हणून आले असे म्हणता येत नाही. केरळ, पश्विम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एनडीए यश मिळवू शकले नाही. तर महाराष्ट्रात शरद पवार नेहमीच किंग मेकर आहेत. थोडक्यात या सर्व राज्यांमध्ये एनडीएचे जे घटक पक्ष होते त्यांचे अपयश हे एनडीएचे सरकार न बनण्यास कारण ठरले. म्हणजेच या राज्यातल्या भारतीयांनी राष्ट्रीय निवडणुकांच्या वेळी प्रादेशिक प्रश्नांवर जास्त भर देउन मतदान केले. परिणामी कमीत कमी २७२ चा आकडा एनडीएला गाठता आला नाही. सहाजिकच होते की या राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष होते त्यांना महत्व प्रात्प झाले आणि एनडीए शिवाय काँग्रेस हा एकमेव मोठा पक्ष होता. म्हणून काँग्रेस सत्तेत आले. त्यात काँग्रेसला भारतीयांनी जवळ केले असे काहीच नव्हते. पण सत्तेत आल्यावर काँग्रेसचे राजकाराण नाही झाले तर गोरगरीब, अल्पसंख्यांक, शेतकरी हे सगळे काय करणार? मग अणुप्रकल्प असो, कि नदिजोड प्रकल्प असो कि सुवर्ण चतुष्कोन रस्ता प्रकल्प. हे असले विकासाचे प्रकल्प कॉंग्रेसला कधीच प्रिय नव्हते, नसतील. त्यांना मते मिळतात ती गोरगरीब, अल्पसंख्यांक, शेतकरी यांची. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे डाव्या पक्षांना जर राष्ट्रीय पक्षाने महत्व दिले तरच ते सत्तेत महत्वाचे बनले आहेत. चार वर्षांपुर्वी डाव्यांना डावलण्यात कोणतेच शहाणपण नव्हते. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. डाव्यांना ठेचायची हिच योग्य वेळ आहे हे काँग्रेसचे मुरब्बी राजकारणी जाणून आहेत. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो आणि तिथे मायावती आणि मुलायम हे मुख्य अडथळे आहेत.
आता हे पहा, मायावती प्रबळ होत आहेत. तर डाव्यांसोबत इतर पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी बनली तर त्रिशंकु अवस्था परत नक्कीच आहे. आता अणुकराराच्या निमित्ताने एका दगडात अनेक पक्षी मारून झाले. तिसरी आघाडी फुटली, डावे फेकले गेले आणि आम्ही देश हिताचा करार करत असताना आमचे सरकार पाडले गेले हि सहानुभुतीची लाट सुद्धा आली. म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीची पुर्व तयारी झालेली आहे. राहता राहिले लालू, शरद आणि इत्यादी. ते जेवढे मिळते आहे ते कधीच सोडत नाहीत. पक्के व्यावसायिक आहेत. स्वतःचे फारसे नुकसान करून घेणार नाहीत.
डाव्यांबद्दल एक मुद्दा आणखीन आहे. भांडवलशाहीवादी काँग्रेस सोबत जाताना त्यांनी हे सांगितले की आम्ही जातियवादी (खरतर धर्मवादी म्हणायला हवे) शक्ति सत्तेत येउ नयेत म्हणून आम्ही नाइलाजाने सत्ता उभारणीसाठी मदत करतो आहे. आता तो मुद्दा बासनात गुंडाळून ठेवला आहे आणि काँग्रेसचा भाडवलशाहीवाद पुढे आला आहे. त्यांना सरकार टिकवणे/पाडणे यात खरच रस होता का? नाही. त्यांना रस आहे तो त्यांची शक्ति वाढवण्यात. त्यासाठी सुद्धा हा करार मुद्दा ते वापरत आहेत.

त्यामुळे अणुकरार हे निमित्त मात्र आहे. एनडीए सरकारने अणुचाचण्या केल्या, आंतरराष्ट्रीय बंधने आली. पण आज काय अवस्था आहे? बंधने घालायला पुढे असणारी अमेरिका आज आमचा मित्र बनु पाहते आहे. पाकिस्तानात लपलेला ओसामा मिळत नाही अन पाकिस्तानात जाणे राजकिय दृष्ट्या सोपे नाही. चीनचा पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा असतो तर या दोघांवर जर अंकुश ठेवायचा म्हटले तर भारताच्या मैत्रि इतके काहीच सोयिचे नाही. थोडक्यात भारता सोबत जवळीक हि अमेरिकेची देखील गरज आले. शेवटी गरजेला उपयोगी पडतो तो मित्र. नाही का? ते राजकारण कोणत्याही पातळीचे असो. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो याची ज्वलंत उदाहरणे आपण आता पाहतो आहोत.

अवांतरः हि चर्चा राजकारण-समाजकारण या समुदायात हलवता येईल काय?





जी ८

आज बातमी आहे की, जी ८ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केविन रड यांना भेटले. अमेरिकेने अणुकरार पुर्ण केला तर ऑस्ट्रेलियाला भारतीय अणुभट्ट्यांसाठी युरेनियम पुरवण्यात कोणतीही आडकाठी नसेल असा निर्वाळा त्यांनी दिला असे वाचले.

असो,

थोरियमचे/च्या भट्ट्यांचे प्रकरण भारतानेच पुढे रेटले पाहिजे. इतकेच नाही तर त्याचे कमर्शियल प्रॉड्क्शन सुरु केले पहिजे. हा भारताच्या निर्यातीसाठी मोठा फायदा ठरेल.
मला कधी कधी अशी शंका येते की, हे घडू नये म्हणून सरकारवर दबाव येत असावा.

कारण स्पष्ट आहे - युरेनियमच्या भट्ट्याही त्यांनीच विकायच्या, युरेनियमही त्यांनीच विकायचे व त्यावर नियंत्रणही त्यांनीच ठेवायचे.

म्हणजे कायमची निर्यात व्यवस्था अंमलात आणायची. त्यात भारताची लुडबुड कशाला?

राजकिय इच्छाशक्ती आणि वेळोवेळी निर्णय घेण्यासाठी दिली जाणारी लाच ही मोठी गोष्ट आहे.
-निनाद

योग्य मुद्दे

कारण स्पष्ट आहे - युरेनियमच्या भट्ट्याही त्यांनीच विकायच्या, युरेनियमही त्यांनीच विकायचे व त्यावर नियंत्रणही त्यांनीच ठेवायचे.

म्हणजे कायमची निर्यात व्यवस्था अंमलात आणायची. त्यात भारताची लुडबुड कशाला?

राजकिय इच्छाशक्ती आणि वेळोवेळी निर्णय घेण्यासाठी दिली जाणारी लाच ही मोठी गोष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय बाजरपेठेतले योग्य मुद्दे मांडले आहेस. माझ्यावरच्या प्रतिसाद लिहिलेले एनडीए सरकारचे काही प्रकल्प हे राजकिय इच्छाशक्तिचेच प्रदर्शन आहे असे माझे मत आहे. पण ते घडू देणे म्हणजे भारतीयांना सक्षम बनू देणे आहे. तसे झाले तर कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग फार अवघड आहे आणि तेच घडू न देणे हा ही एक मुद्दा आहे.

हा करार होऊन तंत्रज्ञान लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहेच. पण त्यासोबच भारतात थोरियमचे साठे, त्यांचा वापर आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला काय फायदा होऊ शकतो हे जाणून पाउले उचलणे फार गरजेचे आहे. अलिप्ततावादाने भारत एकाकी पडला होता आणि त्यांचा अनेक प्रकारे भारताला तोटा झाला असे म्हटले तर जास्त चुकीचे ठरणार नाही.





अणुकराराचा मसुदा

अणुकराराचा मसुदा येथे वाचा.

छान चर्चा चालू आहे.

चर्चा नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण अशीच आहे, विजेचा प्रश्न आणि युनयुरेनियम चा प्रश्न सुटणार असल्यामुळे सदर करार देशहिताचाच आहे इतके आम्हाला समजले.
बाकी आपल्या चर्चेतून आम्हाला बरीच विषयाशी एक्सट्रा माहितीही मिळते आहे.

अवांतर : चीन ला विरोध म्हणुन भारताला मदत किंवा मोठं करायचं असा एक भाग अमेरिकेचा आहे, म्हणतात.
अतिअवांतर : अमरनाथ जागा प्रकरणामुळे भाजपला एक चांगला मुद्दा मिळाला आता काँग्रेसला कुठेतरी स्फोट, वन नेशनच्या मुद्याची गरज आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करार होणार!

संयुक्त पुरोगामी आघाडी ने विश्वासमत जिंकल्याने अणुकरार होणार हे आता स्पष्ट झाले आहे. विश्वासमताची प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे वादग्रस्त झाली.

 
^ वर