समग्र ग्रंथ वाचल्याविण...
समग्र ग्रंथ वाचल्याविण.....
************************
......एखादे वचन गीतेत आहे,वेदात आहे,साधुसंतांच्या ग्रंथात आहे, म्हणून ते शिरसा वंद्य समजावे असे नव्हे. जे आपल्या बुद्धीला पटेल तेच शिरोधार्य मानावे.
...."समग्र ग्रंथ वाचल्याविण..."हे समर्थ रामदासांचे वचन पटण्यासारखे नाही.व्यवहारात आपण काय करतो? पुस्तकाची एक दोन पाने वाचतो. त्यावरून त्यातील साहित्यिक गुण,भाषाशैली आणि लेखकाची वैचारिक पातळी आपल्या ल़क्षात येते. मग आपण (मी तरी) ते पुस्तक पूर्ण वाचायचे की नाही ते ठरवतो.कुणी त्या पुस्तकाविषयी विचारले तर "भिकार आहे. मी थोडे वाचून पाहिले. पुढे वाचवेना." असे सांगतो.(चांगले असेल तर अवश्य वाचावे असेही सांगतो.) हे योग्यच आहे.एखाद्या लेखाचा अर्धा एक परिच्छेद वाचला की त्याचा स्तर कळून येतो. मग पुढे वाचतो अथवा वाचत नाही.
सद्ध्या ज्योतिषाविषयी चर्चा चालू आहे ,म्हणून भविष्य सदरात लिहितात तरी काय ते वाचावे म्हणून रविवार सकाळ,(१जून २००८) मधील श्री.श्रीराम भट यांचे सदर वाचायला घेतले.त्यांतील प्रारंभीची काही वाक्ये :"...ता. ३जून रोजी शनैश्चर जयंती आहे.शनीचा जन्म रवि-चंद्र युतीत रेवती नक्षत्रावर झाला.रवी हा शनीचा पिता. चंद्र माता...."अशा या पूर्णतया अर्थहीन विधांनांनंतर पुढे वाचवलेच नाही.( विनोदी मानले तरी वाचवत नाही.)
’ऍस्ट्रॉलोजिकल मॅगॅझिन ’ चे संपादक श्री. बी.व्ही. रामन यांचे एक पुस्तक डॉ. शरद अभ्यंकर (वाई) यांनी वाचायचा प्रयत्न केला.एका परिच्छेदाचे मराठीकरण (डॉ.अभ्यंकरकृत) असे:-
"....आत्मा हा एक अनंत असा जलबिंदू आहे. तो सागरमातेच्या उदरातून उद्भवतो आणि अगणित भटकंती नंतर--थंडी आणि पाऊस,हिम आणि वाफ़,झरा आणि नदी--- नियतीच्या नियमानुसार या एकाकी जीवनाच्या विविध अनुभवांसह सर्वांच्या मध्यवर्ती हृदयात प्रवेश करतो........आकाशस्थ गोलांची रासायनिक घटना सतत बदलत असते.त्यांचा आणि आपला विद्युत संबंध(electrical contact) असतो...."
वा! काय ज्ञान आहे! काय अभ्यास आहे!!. ऍस्ट्रॉलॉजिकल मॅगॅझिनचे संपादकपद भूषवायचे म्हणजे एवढा व्यासंग हवाच!!!.
हे असले अर्थशून्य ग्रंथ समग्र वाचून कोण आपला अमूल्य वेळ वाया घालवील? म्हणून शितावरून भाताची परीक्षा करावी लागते. मग समर्थांनी मूर्ख म्हटले तरी वाहवा.
Comments
क्षमायाचना
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वरील लेखात :"ऍस्ट्रॉनॉमिकल मॅगॅझिनचे संपादकपद भूषवायचे ..." असे आहे. त्यात ऍस्ट्रॉनॉमिकल ऐवजी ऍस्ट्रॉलॉजिकल असे हवे. ...
शेवटी काय
शेवटी काय हेच खरे ना?
परिच्छेद १, ओळ दुसरी = जे आपल्या बुद्धीला पटेल तेच शिरोधार्य मानावे.
आपला
[दुसरे वाक्य वाचुनच पिंकलेला] निम्न् स्तर
--------------------------------------------------------------
दुखरी नस हीच आहे की "इतके स्पष्ट आहे तरी दुसर्यांना अजुन का बरे कळत नाही."
ग्रंथ पांडित्य
दोन विद्वान लोकांचे रस्त्यावर् एका झाडाखाली वाद चाललेला असतो. घोड्याला दात किती? एक म्हणतो अमुक अमुक ग्रंथानुसार घोड्याला दात अमुक अमुक.दुसरा म्हणतो 'नाहि' तमुक तमुक ग्रंथानुसार घोड्याला दात तमुक. मग दोघे एकमेकांच्या विद्वत्ते बद्दल शंका घेतात. तेवड्यात एक वाटसरु तेथुन चाललेला असतो तो म्हणतो कि जवळच येथे पागा आहे आपण जाउन तिथे पाहु. दोघे एक होतात व त्या वाटसरुला म्हणतात अरे विद्वान तु कि आम्हि?
प्रकाश घाटपांडे
प्रत्येकदा
प्रत्येकदा दिसली म्हणून मारूतीच्या बेंबीत बोट घालून पाहिजेच असे नाही.
आपल्याला एकदा कळले की हा विषय आपल्या डोक्या बाहेरचा आहे. हे विषय समजण्या इतकी आपली इतकी कुवतच नाही, बुद्धीची झेपच नाही की मग मी त्या विषयाच्या नादाला लागतच नाही!
मग कुणी कितीवेळा खाजवले,
तरी त्याकडे दुर्लक्षच केल उत्तम असे वाटते.
आपला
गुंडोपंत
(एक चीनी म्हण: ज्याला जे माहिती झालेले असते ते दुसर्याला सांगत नाहीत, आणि जे त्याबद्दल बडबडत असतात त्यांना ते माहितच नसते!)
वचन पटण्यासारखे नाही पण...
श्री. यनावाला म्हणतात की:
...."समग्र ग्रंथ वाचल्याविण..."हे समर्थ रामदासांचे वचन पटण्यासारखे नाही.व्यवहारात आपण काय करतो? पुस्तकाची एक दोन पाने वाचतो. त्यावरून त्यातील साहित्यिक गुण,भाषाशैली आणि लेखकाची वैचारिक पातळी आपल्या ल़क्षात येते. मग आपण (मी तरी) ते पुस्तक पूर्ण वाचायचे की नाही ते ठरवतो.कुणी त्या पुस्तकाविषयी विचारले तर "भिकार आहे. मी थोडे वाचून पाहिले. पुढे वाचवेना." असे सांगतो.(चांगले असेल तर अवश्य वाचावे असेही सांगतो.) हे योग्यच आहे.एखाद्या लेखाचा अर्धा एक परिच्छेद वाचला की त्याचा स्तर कळून येतो. मग पुढे वाचतो अथवा वाचत नाही.
युयुत्सूंनी आधी लिहीलेला आणि यनावालांनी त्यावर मत मांडलेला "समग्र ग्रंथ वाचल्याविण..." हे वचन पटण्यासारखे नसले तरी ते नक्की समर्थांचे आहे का? आत्ताच दासबोधातील मुर्खांची लक्षणे (दशक २, समास १) वाचला. त्यात असे काही आढळले नाही. त्यामुळे युयुत्सूंना नक्की कोण समर्थ म्हणायचे आहेत हा एक प्रश्न पडला. तसेच श्री. यनावालांनी न वाचता हा चर्चेचा उहापोह समर्थांच्या संदर्भात केला नाही ना असे वाटले. कृपया आपल्यास समर्थांच्या संदर्भात असले काही वचन माहीत असल्यास येथे सांगावे...
समर्थांचा मुर्खांसंदर्भात पुस्तकाच्या बाबतीत पटकन फक्त एक वचन दिसले:
अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं । नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७०॥
जबरी
अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं । नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७०॥
जबरी हाणला गेला आहे हा असे वाटले! :)))))))))
आपला
गुंडोपंत
(एक चीनी म्हण: ज्याला जे माहिती झालेले असते ते दुसर्याला सांगत नाहीत, आणि जे त्याबद्दल बडबडत असतात त्यांना ते माहितच नसते!)
दासबोधातील वचन
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
दासबोधात असे काहीसे वाचले होते असे स्मरत होते.॰ नेमकी ओवी आठवत नव्हती.तसेच ती मूर्खलक्षण समासात असावी असे गृहीत धरले होते.पण श्री.विकास यांनी शंका प्रदर्शित केली म्हणून दासबोध पुन्हा धुंडाळला.पूर्ण ओवी काय आहे या विषयी श्री. विकास यांना औत्सुक्य असावे. हे मात्र बुद्धिमत्तेचे लक्षण आहे.त्यांना धन्यवाद!
श्रीदासबोध, दशक पहिला, समास पहिला, ओवी बाविसावी पुढील प्रमाणे आहे:
..............
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण|उगाच ठेवी जो दूषण |तो दुरात्मा दुराभिमान|मत्सरे करी||२२||..१/१
.............
संबंध
मूळ ओवी दिल्याबद्दल धन्यवाद.
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण|उगाच ठेवी जो दूषण |तो दुरात्मा दुराभिमान|मत्सरे करी||२२||..१/१
युयुत्सूंनी उर्धृत केलेले "समग्र ग्रंथ वाचल्यावाचून उगाच देई दूषण तो एक मूर्ख " हे तथाकथीत समर्थवचन आणि त्या संदर्भात आपण लिहीले असल्याने समर्थांच्या मूळ वचनाचा गाभा निघून जाऊन, "..कां तें घाली पदरिचीं .." असे आधीच तयार केल्या गेलेल्या वचनाचा आपण कदाचीत नकळत असेल पण (दूरू) उपयोग केलात असे वाटते.
सर्वप्रथम मूळ वचनात मूर्ख न म्हणता मत्सरी स्वभाव दाखवला आहे. समोरच्याला काय म्हणायचे आहे, मूळ मुद्दा काय आहे हे समजून घेयचे असेलचाअणि त्यावर टिका करायची असेल तर पूर्ण वाचणे महवाचे आहे. उ.दा. टिळकांनी लावलेला गीतेचा अर्थ त्यांनी स्वतः वाचून ठरवला "धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाच्चैव किमकुर्वत संजय।" (त्या पवित्र कुरूक्षेत्री, पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेंव्हा वर्तले काय संजया|" ) इतके वाचून त्यांना (टिळकांना) त्याच्यातील कर्मयोग दिसला नसता. उलट कदाचीत ते म्हणाले असते की या गीतेत काय ठेवले आहे ज्याचा आपल्याला समाजासाठी उपयोग करता येईल इत्यादी आणि मग त्या संदर्भात त्यांच्यातील समर्थांच्या भाषेत दुराभिमान आणि मत्सर दिसला असता, ते मूर्ख ठरले नसते.
असे अनेक टिकाकार असतात जे पूर्ण पुस्तक न वाचता केवळ चाळून त्यावरून त्या ग्रंथाची लायकी ठरवतात, हातात माध्यम असले तर स्वतःचे प्रसिद्ध होते म्हणून काही खपवायचा प्रयत्न करतात. तेंव्हा त्या अर्थाने देखील हे वचन मत्सरी/दुराभिमानी म्हणून लागू ठरते मूर्ख म्हणून नाही...
दुर्लक्षच योग्य.
अनेक ठिकाणी आपले एकमत व्हावे अथवा इतरांनीही आपल्या मताप्रमाणे वागावे ही कल्पनाच अतिरेकी आहे.
आपल्याला पटत नसेल तर दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर आहे असे मला वाटते.
अवांतर : अनेक ज्योतिषी भोंदु असतीलही, पण अनेक तज्ज्ञ म्हणवणारे डॉक्टरही फसवणूक करणारे असतात हेही स्विकारावे लागेल.
अगदी
अनेक तज्ज्ञ म्हणवणारे डॉक्टरही फसवणूक करणारे असतात हेही स्विकारावे लागेल.
इतकेच काय अनेक इंजिनियर्सही भोंदू असतात.
आपला
गुंडोपंत
गैरसमज
मला वाटते समर्थांच्या उक्तीचा अर्थ लावण्यात काहीतरी गैरसमज होतो आहे. एखाद्या लेखक दुसर्या लेखकाचा ग्रंथ पूर्णपणे न वाचता उगाच दुरभिमानाने त्याला केवळ मत्सराने दूषण देत असेल तर त्याला दुरात्मा समजावे.--असा हा सरळ अर्थ. अनेक उत्तमोत्तम कादंबर्यांची सुरुवात आपल्याला नीरस वाटू शकते. पी.जी. वुडहाउसच्या 'जीव्ह्ज' वाचतांना तर मला सुरुवातीला फार कंटाळा येत असे. पण एकदा कथानकाने पकड घेतली की ती कादंबरी इतकी आवडायला लागते की मध्येच सोडावीशी वाटत नाही. हॅरी पॉटर वाचण्यापूर्वी आम्ही त्याच्या पहिल्या भागावरचा चित्रपट पहायला गेलो होतो. पंधरा मिनिटात उठून आलो. त्यामुळे केवळ ग्रंथाची सुरुवात वाचून त्यावर आपले मत बनवू नये असे रामदासांचे मत दिसते. त्यांच्या काळी ग्रंथ बहुधा पोथीवजा, पासोडीसारख्या कापडावर किंवा भूर्जपत्रांवर लिहिले असतील. ते चाळून पाहण्याची काही सोय नसेलही, कुणास माहीत?
"...ता. ३जून रोजी शनैश्चर जयंती आहे.शनीचा जन्म रवि-चंद्र युतीत रेवती नक्षत्रावर झाला.रवी हा शनीचा पिता. चंद्र माता...."
ब.मो. पुरंदर्यांनी आपल्या शिवचरित्रावरच्या व्याख्यानाची सुरुवात जर अशी केली असती..ता. १९फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे. शिवाजीचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरच्या देवी शिवाईच्या कृपेने, शालिवाहन १५५१ मध्ये, शुक्लनाम संवत्सरात, उत्तरायणात, फाल्गुन महिन्यात, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्र आणि सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर झाला. शहाजी हा शिवाजीचा पिता, जिजाबाई माता...तर आपण ते व्याख्यान ऐकणार नाही?
इथे शनैश्वर म्हणजे शनी नावाचा उपग्रह नव्हे, तो आहे शनैश्वर नावाचा एक छोटामोठा उपदेव. तो कदाचित वायुरूपात शनी ग्रहावर राहात असेल आणि दर शनिवारी पूजल्यावर प्रसन्न होत असेल, कुंडलीतल्या शनीच्या साडेसातीपासून दिलासा देत असेल, कुणास ठाऊक? --वाचक्नवी
वा
वा!
आपले समजूतदार लेखन वाचल्यावर बरे वाटले.
आपले लेखन येथे सातत्याने यावे हीच इच्छा!
आपला
गुंडोपंत