तुम्ही कोणता निर्णय घ्याल?

{असे प्रश्न(इंग्रजीत) अनेकांनी वाचले असतील. एका प्रश्नाचे हे मराठीकरण.}
....समजा तुम्ही एका प्रयोगात सहभागी झाला आहात.प्रयोगाच्या स्वरूपाविषयी तुम्हाला कोणतीही पूर्वकल्पना नाही.या प्रयोगासाठी तुम्ही एका बंद खोलीत एकटे बसला आहात.समोर भिंतीवर एक फ़ळा आहे. त्याच्या मध्यभागी एक बटण आहे.तुम्ही या सर्व गोष्टींचे कुतूहलाने निरीक्षण करीत आहात.एव्हढ्यात आवाज येतो:
...."धन्यवाद !धन्यवाद!!.या प्रयोगात सहभागी होणार्‍या तुम्हा पाचही जणांचे हार्दिक स्वागत.तुम्ही पाच वेगवेगळ्या कक्षिकेत (केबिन) आहात.परस्परात संपर्क साधण्याची कोणतीही सुविधा तुमच्यापाशी नाही.तुमचा एकमेकांशी पूर्वपरिचय नाही.या प्रयोगासाठी निवडलेले तुम्ही पाच जण सर्वसाधारणपणे समान बुद्धिमत्तेचे ,एकाच वयोगटातील आणि एकाच सामाजिक स्तरातील आहात.माझे हे बोलणे तुम्हा सर्वांना एकाच वेळी ऐकू येत आहे.
तुमच्या समोरच्या फ़ळ्यावर एक बटण आहे.ते दाबायचे की नाही याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.निर्णयासाठी चारशे सेकंद अवधी आहे.माझे बोलणे संपल्यावर फ़ळ्यावरील धड्याळात वेळ दिसेल.वेळ संपल्यावर शंभर सेकंदात फ़ळ्याखालील कप्पा उघडेल.त्या्तील चलनी नोटांच्या स्वरूपातील तुमचे पारितोषिक घ्यावे.
या प्रयोगासाठी पारितोषिक योजना पुढील प्रमाणे:

१.तुम्हा पाचजणांतील एकानेही बटण दाबले नाही तर प्रत्येकाला ४००(चारशे)रुपये.
२.एकानेच बटण दाबले, तर बटण दाबणार्‍याला ४०००(चार हजार) रु.,इतर चौघांना प्रत्येकी २००(दोनशे) रु.
३.दोघांनीच बटण दाबले तर त्या दोघांना प्रत्येकी २०००(दोन हजार)रु,इतर तिघांना प्रत्येकी १००(शंभर) रु.
४ तिघांनी दाबले तर त्या तिघांना प्रत्येकी २००(दोनशे)रु,न दाबणार्‍या दोघांना प्रत्येकी ५०(पन्नास) रु.
५.चौघांनी बटण दाबले तर त्यांना १००(शंभर)रु. प्रत्येकी, उरलेल्या एकाला २०(वीस) रुपये.
६. तुम्ही सर्व पाच जणानी बटणे दाबली तर प्रत्येकाला १०(दहा) रुपये.

चारशे सेकंदांच्या कालावधीगणनेला प्रारंभ होत आहे आता.."
एवढे बोलल्यावर आवाज बंद झाला. फ़ळ्यावर पारितोषिक योजना उमटली. चारशे सेकंद वेळ दिसला. एक एक सेकंद कमी होऊ लागला.
******
कोणत्याही योजनेत आपल्याला अधिकतम (मॆक्झिमम) लाभ व्हावा अशी प्रत्येकाची स्वाभाविक इच्छा असते. तशी तुम्हा पाच जणाची आहे.
तर या प्रयोगात तुम्ही कोणता निर्णय घ्याल? बटण दाबण्याचा की न दाबण्याचा.

...... कृपया आपला निर्णय समर्थनासह प्रतिसादात लिहावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

बटण दाबण्याचा निर्णय घेईन.

बटण दाबण्याचा निर्णय घेईन.

जर सगळ्णंनीच असा विचार करुन बटण दाबले तर मला १०च रुपये मिळतील..पण एकाने जरी न दाबण्याच निर्णय घेतला तर मला १०० रुपये आणि २००० आणि ४००० मिळवण्याच्या संधी निर्माण होतील.

ह्या उलट बटण न दाबण्याच्या निर्णयामध्ये मला वर्स्ट केस २० रुपये मिळतील (१० रुपयांचा तुलनेने शुल्लक लाभ) पण बाकीच्यांचे निर्णय माझ्या फेवर मध्ये गेले तरी मला ५० ते ४०० रुपयेच मिळतील. तेव्हा माझ्या दृष्टीने बटण दाबणेच फायद्याचे.

छा


गुं

दोन वेगवेगळी उत्तरे

(१) माझ्यापाशी (आणि सर्वांपाशी) नाणे असेल तर
पाचदा नाणेफेक करीन. ० किंवा १ छाप आला तर बटण दाबेन, अन्यथा नाही.
स्पष्टीकरण : बटण दाबायची शक्यता ६/३२ ~१/५ म्हणजे बहुधा पाचपैकी एकच व्यक्ती बटण दाबेल. ४८०० रुपये वाटले जातील. पैकी मोठे बक्षीस मिळायची माझी शक्यता समसमान आहे. येथे नाणेफेकीने मिळालेली यदृच्छा कळीची आहे.

(२) माझ्याकडे (सर्वांकडे) नाणे नसल्यास
बटण दाबणार नाही.
यदृच्छा नाही. सर्व एकाच "सर्वोत्तम" निर्णयापाशी येतील. सर्वच दाबतील तर केवळ १०-१० रुपयेच मिळवतील. सर्वच दाबणार नाहीत तर ४००-४०० रुपये मिळवतील. अर्थात, सर्वच दाबणार नाहीत.

दोन उत्तरे

सहभागी सगळ्यांकडे नाणे असणे आणि त्यांचा निर्णय सर्वस्वी नाणेफेकीवरच अवलंबुन असणे ह्या दोन्हीही शक्यता (कोड्यात उल्लेख नसल्याने) नाकाराव्या लागतील. ह्या गृहितकांना कोड्यात उल्लेख असेल तरच तर्कामध्ये स्थान आहे अन्यथा नाही. त्यामूळे पहिला पर्याय बाद ठरतो.

'यदृच्छा' शब्दाने थोडा गोंधळून गेलो होतो..पुन्हा वाचल्यावर लक्षात आले. :)
कोड्यात सगळेजण 'सर्वसाधारणपणे समान बुद्धिमत्तेचे ' आहेत असे म्हंटल्याने ५च्या ५ची जण एकाच निर्णयाप्रत येण्याची शक्यता ही किमान एकाने तरी वेगळा निर्णय घेण्याच्या शक्यतेपेक्षा कमी वाटते. (अगदी समान बुद्धीमत्तेच आहेत असे धरले तरी ४०० सेकंदात सगळेजण एकसारखाच विचार करण्याची शक्यता खूपच कमी आहे)आणि पाचांपैकी किमान एकाने जरी वेगळा निर्णय घेतला तर बटण न दाबण्याचा निर्णय नुकसान करु शकतो.

दोन उत्तरे अशी

पाचही जण "माझ्यासारखेच" (="तुमच्यासारखेच) म्हणजे अनुमान-विवेकी (रॅशनल ऍक्टर्स) आहेत असे मानण्यास जागा आहे.

यात सर्वात अधिक अनुमान-विवेकी नफा यदृच्छेत आहे. यदृच्छेचे प्रशिक्षण असलेला कोणीही रॅशनल ऍक्टर तीच वापरेल.

१. येथे नाणे म्हणजे केवळ नाणेच नाही - कुठलाही यादृच्छिक संख्या दाता (रँडम नंबर जनरेटर) चालेल. त्यामुळे नाणे हे बाद नाही. उदाहरणार्थ मी "पाय"चे जितके आकडे स्मरतात, ते कधीकधी जवळजवळ-यादृच्छिक संख्या म्हणून वापरतो. ३.१४१५९२६५३५... इ.इ. नाहीतर नाडीचे ठोके, घड्याळातील आताची वेळ, चुलबहिणीच्या जन्माचा महिना... आपल्या थेट ताब्यात नसलेल्या कुठल्याही वस्तूपासून जवळजवळ यादृच्छिक संख्या उत्पन्न करता येते. जवळजवळ-यादृच्छिक संख्या उत्पन्न करायला थोडे प्रशिक्षण लागते, ते पाचही जणांकडे असू शकते.

आता कोड्यातलीच वस्तू घ्यायची तर ४०० सेकंद मोजणारे घड्याळ आहे ना. "थोडा" वेळ दुसरीकडे कुठे बघायचे, आणि मग पटकन त्या घड्याळाकडे बघायचे. त्यात किती सेकंद झाले आहेत, पैकी शेवटचा अंक "जवळजवळ" यादृच्छिक आहे. शेवटचा आकडा ०,१ असेल तर बटण दाबणार, २-९ असेल तर बटण दाबणार नाही.

२. यादृच्छिक निर्णय घेण्यास जर "मी" (="तुम्ही") समर्थ नसेन, तर कोणीही समर्थ नसेल, असे मानण्यास हरकत नाही. त्यामुळे जर वरीलप्रमाणे कोलबेर हे "बटण दाबणार" या निष्कर्षाप्रत पोचले, आणि तो निष्कर्ष सर्वोत्तम असेल तर सर्वच जण त्या निष्कर्षाप्रत पोचतील. त्यामुळे बटण दाबणे हा निर्णय सर्वच घेतील (बरोबर तुमचाच तर्क घेऊन) आणि १०-१० रुपये प्राप्त करतील. (स्थिती २अ)

जर बटण न दाबणे हा सर्वोत्तम अनुमान-विवेकी निर्णय असेल तर, सर्वच विवेकी लोक त्या निर्णयापर्यंत पोचतील. कोणीच बटण दाबणार नाही, आणि ४००-४०० रुपये मिळवतील. (स्थिती २आ)

स्थिती २अ आणि स्थिती २आ दोन्हीचा विचार ४०० सेकंदांत होऊ शकतो, त्या अर्थी स्थिती २आ निवडली जाईल.

उत्तरे

१) समजा सगळ्यांनाच रँडम नंन्बर जनरेट करण्याच्या ह्या क्लुप्त्या माहित असल्या तरी सगळेजण एकच क्लुप्ती वापरणार नाहीत. आणि एकच क्लुप्ती वापरली तरी प्रत्येकाचे पर्याय मिळते जुळते असतीलच असे नाही. श्री धनंजय ह्यांनी जर आकडा ०,१ असेल तर बटण दाबणार, २-९ असेल तर बटण दाबणार नाही असे ठरवले तरी श्री. कोलबेर ह्याच्या उलट विचार करू शकतात. (म्हणजेच ०-१ असेल तर दाबणार नाही, २-९ असेल तर दाबणार. )

२) कोड्यात सगळेजण 'सर्वसाधारणपणे समान बुद्धिमत्तेचे ' आहेत असे म्हंटल्याने ५च्या ५ची जण एकाच निर्णयाप्रत येण्याची शक्यता ही किमान एकाने तरी वेगळा निर्णय घेण्याच्या शक्यतेपेक्षा कमी वाटते. आणि पाचांपैकी किमान एकाने जरी वेगळा निर्णय घेतला तर बटण न दाबण्याचा निर्णय नुकसान करु शकतो.

१.रँडम आकडे, आणि २. अनेक "सर्वोत्तम तर्क" उपलब्ध असण्याची शक्यता

सर्व लोकांनी एकच क्लृप्ती वापरायची गरज नाही. रँडम नंबरची ही गंमत आहे, की कुठेलीही क्लृप्ती वापरून मिळवलेले रँडम नंबर्स वापरलेत तरी काही हरकत नाही. रँडम नंबरला "आपण कुठून आलो, त्याची काही स्मृती नसते.

> श्री. कोलबेर ह्याच्या उलट विचार करू शकतात. (म्हणजेच ०-१ असेल तर दाबणार नाही, २-९ असेल तर दाबणार.)

असा विचार का बरे करतील? यदृच्छेने आपल्याला बटण दाबायची १/५ शक्यता मिळवायची आहे. श्री. कोलबेर, दुसरी कुठलीही पद्धत वापरून बटण दाबायची १/५ शक्यता मिळवतील. कोलबेर यांनी नेमका उलट विचार केला तर बटण दाबायची शक्यता ४/५ होते.

यदृच्छा नसली म्हणा. सर्वसामान्य लोक असले म्हणून तरी वेगवेगळ्या निर्णयापर्यंत कसे पोचतील? "मी" (म्हणजे कोलबेर किंवा धनंजय) करतो तो विचार जर तर्काच्या दृष्टीने खूप बलवत्तर आहे, सुस्पष्ट आहे, तर तो बलवत्तर तर्क ४०० सेकंदांत न सुचण्यासाठी इतर चौघांपैकी कोणीतरी बर्‍यापैकी मूर्ख असावा लागेल, नाही का?

पण कोडे म्हणते:
> या प्रयोगासाठी निवडलेले तुम्ही पाच जण सर्वसाधारणपणे समान बुद्धिमत्तेचे ,
> एकाच वयोगटातील आणि एकाच सामाजिक स्तरातील आहात

म्हणजे स्पष्ट तर्क न कळणारा बहुधा त्यांच्यापैकी कोणीच नसावा.

(पत्त्यांचा जुगार खेळताना, कुठलीतरी भन्नाट खेळी करताना, थाप मारताना लोक एकमेकांची ओळख वापरतात, डोळ्यांतला भाव वापरतात. ते काहीच येथे शक्य नाही. ब्लफ/कॉलिंग-अ-ब्लफ करायला कुठलाच सुगावा नाही. उदाहरणार्थ कॉम्प्यूटरविरुद्ध जुगाराची पहिली खेळी खेळताना ब्लफ/कॉलिंग-अ-ब्लफ शक्यच नाही. सर्वोत्तम खेळी तर्काने एकच असते. त्यामुळे येथेही सर्वांनाच एकच सर्वोत्तम तर्क वापरावा लागणार.)

समान बुद्धीमत्ता असली विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते

यदृच्छेने आपल्याला बटण दाबायची १/५ शक्यता मिळवायची आहे.

बर्‍यापैकी पटले..आता एकच शंका आहे. ती म्हणजे, बटण दाबायची १/५ शक्यता मिळवायची आहे हा विचार बरोबर आहे पण बटण न दाबण्याची १/५ शक्यता मिळवायची आहे असा सगळ्यांनी विचार केला तर तो देखिल बरोबर आहे. आता कोणत्याही पूर्व संवादा खेरीज नेमकी कोणती पद्धत अवलंबायची ते कसे ठरणार?

तसेच ४०० सेकंदात एकच सर्वोत्तम उपाय दिसत असला तरी तो एकमेवच उपाय आहे का? हे पडताळून पाहण्यास ४०० सेकंद पुरणार नाहीत आणि त्यामूळे समान बुद्धिमत्ता असली आणि एकच सर्वोत्तम उपाय समोर दिसत असला तरी विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकल्याने काही लोकांकडून तो उपाय डावलला जाऊ शकतो.

मुद्दाम अविवेकी विचार करणे, असेही होते

सर्वच लोक विवेकी विचार करणार नाहीत, म्हणून आपणही मुद्दामून जाणून-बुजून अविवेकी "ब्लफ" करायचा मोह पुष्कळदा अनावर असतो.

म्हणूनच काही लोक समभाग-बाजारात "डे-ट्रेडिंग" करतात. "डे-ट्रेडिंग" मध्ये बहुधा हे गृहीतक असते, की कोणीतरी अविवेकी दलाल (आपल्या तो ओळखीचाही नाही) पैसे घालवण्यास उद्युक्त आहे, आणि त्याच्याकडून आपल्याला फायदा करून घेता येईल. अशा परिस्थितीत ते खुद्द समभागाच्या किमतीचा मूलभूत आधार दुर्लक्षून त्या अनोळखी दलालाला फसवायला "ब्लफ" करतात. अर्थात या परिस्थितीत ते खुद्दच पैसे घालवण्यास उद्युक्त झालेले अविवेकी दलाल होतात. असा अविवेक साधारणपणे नफा-तोटा सफाचट असा असतो. त्यामुळे लोकांचा अविवेक आहे, असे जाणूनही विवेकी निर्णय घेणे बहुधा सुज्ञच असते.

सहमत

धनंजय आणि कोलबेरच्या चर्चेशी सहमत. पण संपूर्ण चर्चा आणि युक्तिवाद वाचल्यावर बटन दाबण्याचाच निर्णय घेतला जाईल असे वाटते. मग तो उत्सुकतेपोटी असो किंवा असलेली बुद्धी(सम असली तरी) वापरण्याच्या अनास्थेपोटी असो. धनंजय यांचा युक्तिवाद बरोबर आहे पण ज्या सहजतेने डोक्याला जास्त ताण न देता मीही कोलबेर यांनी निर्णय घेतला जवळजवळ तसाच घेतला असता. हे ही मान्य आहे की सहजतेत ही काही वेळा सूज्ञता नसते. पण समटाईम इट वर्कस्. ;-)

रामू रामगोपाल वर्माच्या 'रिस्क ' नावाच्या फेमस(!) सिनेमात नायकाच्या तोंडी एक वाक्य आहे. लाईफमे इतना रिस्क तो उठाना ही पडेगा.

बटन न दाबणार्‍यांचे स्पष्टीकरण असे आहे की मी बटन दाबले तर कमीत कमी १० रुपये मिळतील आणि नाही दाबले तर कमीत कमी २० मिळतील. पण असे लोक असतील म्हणूनच मी बटन दाबेन. त्यामुळे ५ मधला १ जरी न बटन दाबणारा असेल तर मला १० ऐवजी १०० रुपये मिळतील. १० आणि २० मध्ये तोट्याचा विचार करता क्षुल्लक फरक आहे ह्या कोलबेर यांच्या मताशी सहमत.

अभिजित...

+१

आता अभिजित रावांशी पुर्णतः सहमत.
(स्वगतः- साला ....दर मिनिटाला तोडिस् -तोड तर्क् लावुन
आम्हा गरिबाला )नुसते जेरीला आणतात बुवा हे सगळे "तर्क्-खोर्" लोक.)

कंपु बदललेले
जन सामान्यांचे मन

उ प्र


गुं

मीही बटण दाबेन

कारण कोलबेरने दाबले आहे, बाकीचे दाबणार नसतील तर २००० नक्की, नाहीतर १०० तरी नक्की कारण

धनंजयांचे ४०० सेकंद छापा काटा करण्यात दोन-चारदा नाणे घरंगळल्याने वाया गेले आणि त्यांनी बटण दाबलेच नाही असे समजू. ;-)

उत्तर ह. घ्यावे

चूक

परस्परात संपर्क साधण्याची कोणतीही सुविधा तुमच्यापाशी नाही. :-)

कोलबेरने बटन दाबले आहे की नाही हे तुम्हाला कळणारच नाही.

अभिजित...

सोडा

सोडा हो!
सगळेजण बटन दाबणारच!
तुम्ही एका खोलीत आहात जिथे एकच बटण आहे.

मला सांगा आज किती
लोक जगात आहेत त्यांना आता काही काम नाहिये आणि समोर एक बटन आहे, आणि ते त्यांनी दाबून पाहिले नाहीये?

लोकं जेथे दिसेल तेथे बटन दाबूनच पाहणार यात मला शंका वाटत नाही! ;))

आपला
गुंडोपंत

रियालिटी

क्लू - ४जण सर्वसाधारण बुद्धीमत्तेचे व पाचवा मी

आजवरच्या माझ्या सर्वसाधारण बुद्धीमत्तेचा अनुभव हा की

१) यातील एक समती[सर्वसाधारण बुद्धीमती हेन्सफॉर्वर्ड मेन्शड ऍज समती] नक्की फळ्यावरच्या मराठीतील व्याकरणाची कशी वाट लावली गेली आहे. [ "रु.," बरोबर का "रु," का "रुपये." स्वल्प विरामानंतर पुढील येणार्‍या शब्दात अंतर असावे की नसावे, जणानी की जणांनी] शुद्धलेखनाचे नियम अशीच लोक बदण्याचा घाट घालत आहेत. निषेध व प्रखर विरोध. ह्यात चारशे पेक्षा जास्त सेकंद हमखास घालवणार. म्हणजे आता बाकीचे तीन जण दाबायची शक्यता.

२) आता ह्यातील एक समती गणीतात हमखास कच्चा. योजनेतील सहाही मुद्दे पाहुन म्हणजे मी दाबु की नको? काय सुचत नाय राव. मी दाबलं तर फायदा की घाटा? जाउ दे विचारु की ही टेस्ट पुन्हा घेता येईल का? एकंदर ४०० सेकंद मधे उत्तर देउ शकणार नाही

३) अजुन एक समती नक्की विचार करील "महाराष्ट्र प्रयोगकर्मी परिषदेच्या विचारार्थ" मधे माननीय अशिकांत शोकसाहेबांनी सांगीतले होते की, "अश्या प्रकारच्या चाचणीचा उपयोग करुन प्रयोगकर्मीचे मानधन कमी करण्याचा घाट विज्ञानसमीती घालत आहे तरी असे आवाहन आहे की यावर प्रयोगकर्मींनी बहीष्कार टाकावा." कशावरुन हे खर आहे की नक्की कोणी बटन दाबले? याचा पुरावा सत्य असेल कशावरुन? आपण परिषदेत हा मुद्दा मांडु. सध्या बहिष्कार.

४) राहीलेल्या समतीला चारशे सेकंद, घड्याळाचे टेन्शन, सहाही मुद्यांवर विचार करुन इतका परेशान की समोर असलेले बटन काय त्याला वेळेत सापडत नायं.

५) आता माझ्यासमोरचा यक्षप्रश्र ४००० रु खिशात टाकावेत की बटन न दाबता इतर समतींना ४०० रु खर्चाला [व आपण सारे समबुद्धी असा न्युनगंड] देउन "गेट अ लाईफ " सांगावे?

मी बटण दाबणार नाही

मी बटण दाबणार नाही

कारण,
१) मी जर बटण दाबले नाही तरः
सगळेच माझासारखे: ४००(चारशे)रुपये
एकाने बटण दाबले असता मला: २००(दोनशे) रु. (व दाबणार्‍याला ४०००! )
दोघांनीच बटण दाबले : मला १००(शंभर) रु.
तिघांनी दाबले : मला ५०(पन्नास) रु.
बाकी चौघांनी बटण दाबले: मला २०(वीस) रुपये.

२) जर मी बटण दाबले:
मी एकट्यानेच बटण दाबले: मला ४०००(चार हजार) रु. व २००(दोनशे) रु.
माझाखेरीज एकाने बटण दाबले: आम्हा दोघांना २०००(दोन हजार)रु व इतर तिघांना प्रत्येकी १००(शंभर) रु.
तिघांनी दाबले तर: मला २००(दोनशे)रु व न दाबणार्‍या दोघांना प्रत्येकी ५०(पन्नास) रु.
चौघांनी बटण दाबले तर: मला १००(शंभर)रु. प्रत्येकी, उरलेल्या एकाला २०(वीस) रुपये.
सर्व पाच जणानी बटणे दाबली : मला १०(दहा) रुपये.

आता ज्या अर्थी "पाच जण सर्वसाधारणपणे समान बुद्धिमत्तेचे ,एकाच वयोगटातील आणि एकाच सामाजिक स्तरातील आहात.माझे हे बोलणे तुम्हा सर्वांना एकाच वेळी ऐकू येत आहे." त्या अर्थी दोन्ही निर्णयातील पहिल्या दोन शक्यता असणे कठीण आहे (कारण बहुसंख्य लोक सारखा विचार करतील याला वाव जास्त आहे) त्यामुळे शक्यता उरतातः

१) मी जर बटण दाबले नाही तरः
मला ४००(चारशे) रु. / मला २००(दोनशे)रु/ मला १००(शंभर) रुपये.

२) जर मी बटण दाबले:
मला २००(दोनशे)रु/ मला १००(शंभर)रु. प्रत्येकी /मला १०(दहा) रुपये.

आता मी जर बटण दाबले नाही तर मला अधिक रु. मिळण्याची शाश्वती अधिक आहे. त्यामुळे मी तरी बटण दाबणार नाही

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

मी बटण दाबणार नाही पण..

सहभागी व्हावे की नाही याची संधी दिलेली असता शेंडाबुडखा माहिती नसलेल्या अशा प्रयोगात सहभागी होईन की नाही इथूनच माझी सुरूवात आहे.

जबरदस्ती बसवलेले असेल तर काहीही न करता जर कमीतकमी २० रुपये मिळण्याची शक्यता असताना ती काही करुन १० रुपयावर आणून नक्कीच ठेवणार नाही. त्यामुळेच मी तरी बटणबिटण दाबायला जाण्याच्या फंदात पडणार नाही.

वेळेचा सदुपयोग व्हावा या दृष्टीने फळ्याखालचा कप्पा ५०० सेकंदात उघडण्यामागे नक्की काय मेकॅनिझम असेल ते शोधायचा जरूर प्रयत्न करून पाहीन कारण दिल्या गेलेल्या भाषणावरून 'ही' गोष्ट पक्की आहे की नाही हे आधी पडताळून पहाणे महत्त्वाचे असे वाटते. तसे मेकॅनिझम नसल्यास बाकीच्या ४ खेळगड्यांना तसे सूचित करावे लागेल ना.. ! नाहीतर आहेच बाजारात तुरी आणि..... ! तसे मेकॅनिझम खरोखरच असल्याचे मला आढळून आल्यास मी काय करेन हे वेगळे सांगायची जरूर आहे का? ( किमान ४८००/- चा गल्ला आहे बॉस ! ;D )

मला जास्त हाय फंडू काही लिहिता येत नाही पण राहवले नाही म्हणून माझे मत इथे मांडले आहे. तर्कसंगत उत्तरांच्या मालिकेत हे उत्तर बसत नसल्यास हा प्रतिसाद उडवण्यास माझी अजिबात हरकत नाही हेवेसांनलगे.

मेकॅनिझम्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वेदश्री लिहितात :"वेळेचा सदुपयोग व्हावा या दृष्टीने फळ्याखालचा कप्पा ५०० सेकंदात उघडण्यामागे नक्की काय मेकॅनिझम असेल ते शोधायचा जरूर प्रयत्न करून पाहीन."
.....
मेकॅनिझम् सोपे आहे. एक मध्यवर्ती नियंत्रणकक्ष आहे. त्याच्या भोवती या पाच कक्षिका(केबिन्स्) आहेत.फळा असलेली भिंत समाईक आहे.प्रत्येक कप्प्याचा एक शेवट (एंड) नियंत्रण कक्षात आहे.तिथे पाच स्वयंसेवक आहेत.चारशे सेकंद संपल्यावर नियंत्रण कक्षातील संगणक क्षणार्धात पारितोषिकाच्या रकमा पाच पडद्यांवर दाखवतो.स्वयंसेवक तेवढी रक्कम पाकिटात भरून कप्प्यात टाकून ढकलतो. पलिकडच्या बाजूला कप्पा उघडतो.प्रयोगात भाग घेणार्‍या व्यक्तीला इथे काही ढवळाढवळ करता येणार नाही.
....जबरदस्ती बसवलेले असेल तर काहीही न करता जर कमीतकमी २० रुपये मिळण्याची शक्यता असताना ....
........
प्रयोगातील सहभागाविषयी आवाहन करणारी पत्रे अनेकांना पाठविली होती. काही जणांनी नकार कळविला. ज्यांनी संमती कळविली त्यांतील पाच जणांना निवडले.जबरदस्तीचा प्रश्नच नाही.
......
तसे मेकॅनिझम नसल्यास बाकीच्या ४ खेळगड्यांना तसे सूचित करावे लागेल ना.. ! नाहीतर आहेच बाजारात तुरी आणि..... ! तसे मेकॅनिझम खरोखरच असल्याचे मला आढळून आल्यास मी काय करेन ....
.....
याचा अर्थ समजू शकला नाही. प्रश्नात जे काही दिलेले असते ते सत्य मानायलाच हवे.

धन्यवाद

>प्रयोगातील सहभागाविषयी आवाहन करणारी पत्रे अनेकांना पाठविली होती. काही जणांनी नकार कळविला.

माझा सर्व प्रतिसाद ज्या गृहितकावर आधारीत होता तोच अस्थायी असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रश्नच संपला माझ्यादृष्टीने उत्तर देण्याचा कारण मी नकार कळवलेला असणार !

यनावाला,
तुम्ही लिहिलेले सर्व स्पष्टीकरण एकदम मान्य. गंभीर कोड्यात विनोद करण्याचा क्षुद्र प्रयत्न केल्याबद्दल क्षमस्व.

चान्गला

चान्गला विचार्

आपला
गुंडोपंत

मी पण्...

"माहिती नसलेल्या अशा प्रयोगात सहभागी होईन की नाही इथूनच माझी सुरूवात आहे. "
बटण दाबण्याचा परिणाम आणि पारितोषिक याचा साधकबाधक विचार न करता केवळ पारितोषिकासाठी बटण दाबणे हा मूर्खपणा होय...

बटन दाबणार नाही.

ऋषिकेश राव्, वेदश्री ताई ह्यांच्याशी पुर्णतः सहमत.
बटन् दाबल्यास पैसे मिळायची शाश्वती रु.१० वर् येते.

जन सामान्यांचे मन

नाही दाबणार बटण!

बटण न दाबताच फुकटचे जर जास्तीत जास्त ४००रू आणि कमीत कमी २० रू. मिळत असतील तर मी त्यातच समाधान मानेन.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मी बटण दाबणार नाही

मी काय करिन !!

- मी प्रथम ३०० सेकंद विचार करिन..कारण इतक्या अटी असल्याने त्या पहिल्या दमात मला कळणारच नाहित.
- मग फळ्यावर लिहिलेल्या त्या अटींपैकी कशाला एखादी चांदणी (उदा.*) नाहि ना ते पाहिन.. कारण अनेकदा अशी चांदणीवाली अट माणसाला (ग्राहकाला गोत्यात आणणारी असते :)
- वरील अटींमध्ये बटण दाबणार्‍या माणसाला बटण न दाबणार्‍या पेक्षा जास्त रुपये मिळतात हे मला कळेल... (मी मनात या बद्दल आनंद व्यक्त करिन..मला ३०० सेकंदांनंतर काहीतरी समजले हा तो आनंद असेल्.)
- मग मी तर्क करेन की.. माझ्याच वयोगटातले आणि सामजिक स्तरातले इतर पाच आहेत..म्हणजे
अ. त्यातला एक तरी माझ्या सारखा विचार करेल,
ब्. एक जण काही न समज्याले पण केवळ कृती करण्याचा उत्साह म्हणून बटण दाबणारा असेल.
क. एक जण बरीच सांख्यिकी मांडून बटण दाबावे या निर्णयाप्रत येईल.
ड. आणि राहिलेला एक बरीच सांख्यिकी मांडून बटण न दाबण्याच्या निर्णयाप्रत येईल.
असा विचार करुन मी असे निश्चित करीन की ब, क, हे दोघे बटण दाबणार..ड. नक्की दाबणार नाही..
आता मी जे करिन तेच अ. करणार.
म्हणजे एकतर
दोन जण दाबणारे आणि ३जण न दाबणारे = मला १००रु. मिळणार
किंवा चार दाबणारे आणि एक न दाबणारा = मला २० रुपये

असा विचार करता मी बटण न दाबता थांबेन.

(माझी विचार सरणी गणिती नसून इतरांच्या भावनांवर आधारलेल्या तर्कावर असेल. )
-- लिखाळ.

कैद्यांसाठी शृंगापत्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अजित ओक यांनी व्यंइ. पाठवला आहे. त्यात लिहिले आहे: "प्रिझनर्स डायलेमा च्या चालीवरच हे कोडे आहे, पण गेन मेट्रीक्स थोडा वेगळा! अजून डोकं खाजवतोय :-''
...
श्री.अजित ओक यांनी बरोबर ताडले.' प्रिझनर्स् डायलेमा' या बहुपरिचित कोड्याचाच हा विस्तारित प्रकार आहे. प्रस्तुत निर्णयसमस्या ही डग्लस हाफ्स्टॅडलर(हे जर्मन नाव मला नीट लिहिता येत नाही.) यांच्या एका प्रश्नावर आधारित आहे. सायंटिफिक अमेरिकन या मासिकात ते "मेटॅमॅजिकल थीमाज" हे सदर लिहित असत.त्यापूर्वी मार्टिन गार्डनर हे मॅथेमॅटिकल गेम्स् हे सदर लिहित असत.

नफेखोरी आणि समाजवाद!

कुणीच बटन दाबले नाही तर प्रयोग आयोजकांना ४०० x ५ म्हणजे २००० रु. मोजावे लागतील, अर्थातच हे दुस-या पर्यायापेक्षा ( ४००० x १ + २०० x ४ = ४८०० ) बरेच स्वस्तात पडेल. बटन दाबले तर 'आपल्याला' जास्त पैसे मिळण्याची जास्त शक्यता आहे हे लक्षात घेऊन सगळ्यांनीच बटन दाबले तर प्रयोगवाल्यांचा आणखीच फायदा होईल ( ५ x १० = ५० रु. मध्ये सगळ्यांना कटवल्याचं समाधान!)

हा प्रयोग पुन्हापुन्हा करण्याची संधी पब्लिकला दिली, तर "जशास तसे" किंवा "tit for tat" या युक्तीचा वापर करून सगळ्यांचा नफा नियमित करता येईल. या कोड्यात "आपला" नफा म्हणजे एका व्यक्तीचा नसून या पाच जणांचा सामूहिक नफा अपेक्षित असेल तर पुन्हा-पुन्हा बटन दाबण्याची (आणि न दाबण्याची) संधी मिळायला हवी.

नाहीतर प्रयोगाचे आयोजन करणा-यांचाच नफा होण्याची शक्यता सर्वाधिक!

- अजित [समाजवादी? ;)]

मी?

मी तरी बटन दाबणार नाही. अकर्मण्येवाधिकारस्मे मा फलेषु कदाचन। काही काम न करणे हा माझा अधिकार आहे, मी कशाला बटन दाबू? फळ जे काय मिळेल त्यात भागवून घेईन.--वाचक्‍नवी

हेच

बटण न दाबताही किमान २० रुपये मिळणार आहेत. मग बटण कशाला दाबायचे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहकार्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
''सायंटिफिक अमेरिकन " चे स्तंभलेखक डग्लस हॉफ्स्टडटर यांनी असा प्रयोग प्रत्यक्ष केला होता.(पण वेगळ्या स्वरूपात). त्यांनी वीस(२०) परिचितांना पत्रे पाठविली.
..."हे पत्र मी तुम्हा वीस जणांना पाठवीत आहे.तुम्ही सर्व जण बुद्धिमान आणि तर्कनिष्ठ (रॅशनल) आहात..........पत्राचे उत्तर म्हणून तुम्ही मला 'होय' /'नाही' यांतील एक शब्द कळवायचा आहे.{आपल्या सोईसाठी ' होय = बटण दाबणार'}.याविषयी तुम्ही कोणाशीही कोणतीही चर्चा करायची नाही..... उत्तर अठ्ठेचाळीस तासांत पोस्ट करायचे. तुम्हां सर्वांवर माझा पूर्ण विश्वास आहे....लाभतालिका ..पेऑफ् मॅट्रिक्स्..सोबत जोडली आहे." (म्हणजे आपली पारितोषिक योजना)
....
कांही उत्तरांविषयी डग्लस लिहितातः
क्रिस मॉर्गनने कळवले.."तर्क न वापरता केवळ अंतःस्फुरणाने (इंटियुशन) ठरविले की नाणेफेकीने निर्णय घ्यावा. कारण इतर १९ जण काय कळवतील याची मला काहीच कल्पना नाहीं . नाणेफेकीने 'नाही' कौल दिला."
...
मार्टिन गार्डनर (डग्लसला हे गुरुस्थानी होते.)
" अवघड शृंगापत्ती. काय निर्णय घ्यावा हेच कळत नाही.मी होय उत्तर द्यावे आणि इतरांनी 'नाही' असे मला वाटते. पण इतरांना तसेच वाटणार.बरे असा विचार करून मी नाही म्हणावे तर माझ्या अशा विचाराची कल्पना करून दुसरा "होय" कळवू शकेल. ...म्हणजे एंडलेस रिग्रेशन...शेवटी 'होय 'कळवितो झाले.."
...
बॉब उल्फ(गणिती आणि तर्कशास्त्री:
"..अ पॅरॅडॉक्स् विथ नो रॅशनल सोल्यूशन.देअरफर आय् चूज "येस" .यावर डग्लसने बॉबला लिहिले: "हाऊ डेअर यू से 'देअरफर,व्हेन यु हॅव डिस्क्राईबड् धिस् सिच्युएशन ऍज अ पॅरॅडॉक्स विथ नो रॅशनल सोल्यूशन? हाऊ डेअर यू से लॉजिक इज फोर्सिंग ऍन आन्सर डाऊन युवर थ्रोट व्हेन द प्रिमाईस ऑफ युवर लॉजिक इज दॅट देअर इज नो लॉजिकल आन्सर?"
.....डग्लस पुढे लिहितो:
:"माझे बहुतेक मित्र "नाही" असे कळवतील अशी माझी अपेक्षा होती. ती फोल ठरली. विसांतील १४ जणांनी होय तर केवळ सहांनी नाही कळविले. इथे सर्वांना हितकारक अशा निर्णयातच व्यक्तीचे हित आहे असे मला वाटते."

छान... आणि...

प्रयोग छानच होता.. आता बाकीचे लोक यावर काय लिहितात ते वाचण्यास उत्सूक आहे..

इथे सर्वांना हितकारक अशा निर्णयातच व्यक्तीचे हित आहे असे मला वाटते. - डग्लस
या वाक्याचा अर्थ निटसा समजला नाही. कोणीच एकमेकांना न विचारता आपल्यासाठी घेतलेला निर्णय त्यातील प्रत्येकाच्या हिताचा कसा ठरला? / ठरावा?
उदा. मी समाजसेवा करणार अथवा करणार नाही यातील नकाराचा निर्णय समाजातल्या प्रत्येकासाठी योग्य कसा ठरेल?..की मी तर्क उगीच ताणून विपर्यास करत आहे? कृपया प्रकाश टाकावा ही विनंती.
--लिखाळ.

एंडलेस रिग्रेशन = अनवस्था

तर्कशास्त्र्यांना याची पुष्कळ भीती वाटते. संगणकाच्या प्रणाली लिहिणार्‍यांनाही याची फार भीती वाटते.

अनवस्थेची भीती कधीकधी अनाठायी असते, कधीकधी नसते.

अणूंच्या विषयी ही अनवस्थेची चर्चा शंकराचार्यांनी आणि गौतमांनी केलेली आहे.

आश्चर्य नाही

विसांतील १४ जणांनी होय तर केवळ सहांनी नाही कळविले

यात आश्चर्य नाही. कारण बहुसंख्य जण असाच विचार करतील. निदान मी तरी!

माझे उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मला होणारा लाभ केवळ केवळ माझ्या निर्णयावर अवलंबून नसून त्यावर इतर चार जणांच्या निर्णयाचा परिणाम होणार आहे.म्हणजे आम्हा पाचजणांचा संघ (टीम) झाला आहे.टीम असताना परस्पर सहकार्यानेच सर्वांना अधिक लाभ होतो. पण संपर्क नसताना सहविचाराने आणि एकमताने निर्णय कसा घेता येईल?अशावेळी सर्वांचे हित कशात आहे याचा विचार करावा लागेल.म्हणून इथे बटण न दाबणे हाच पर्याय योग्य होय.मी बटण दाबले तर मी संघातून फुटून निघालो असा अर्थ होईल."मी बटण दाबणार इतरांनी मात्र दाबूं नये." हा विचार योग्य कसा ठरेल? सर्वजण समान बुद्धिमत्तेचे, एका वयोगटांतील असल्याने सर्वांचा निर्णय एकच असण्याची संभवनीयता अधिक.म्हणून बटण न दाबणे योग्य होय.

आदर्शवाद

हा आदर्शवाद झाला. परंतु असे घडणार नाही! मी बटण न दाबण्यामुळे जर कदाचित दुसर्‍याचा अधिक लाभ होणार असेल तर मी बटण दाबणे पसंत करीन, हा विचार प्रबळ ठरण्याची शक्यता अधिक!!

सहकार्य केल्याने सर्वांना अधिक लाभ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. सुनील लिहितातः"मी बटण न दाबण्यामुळे जर कदाचित दुसर्‍याचा अधिक लाभ होणार असेल तर मी बटण दाबणे पसंत करीन, हा विचार प्रबळ ठरण्याची शक्यता अधिक!!"

हो. पण असाच विचार इतर सगळेच करतील. ते तुमच्या वयोगटातील आणि साधारण पणे तुमच्या एवढा बुद्ध्यंक असलेले आहेत.सर्वांनी बटणे दाबली तर सगळ्यांचा तोटा होईल.म्हणून बटण न दाबणे श्रेयस्कर. हा आदर्शवाद नसून परिस्थितीचे योग्य आकलन आहे.

बटण, मटण, सटाणा, वाटाणा इ.इ.

परभाषेतील एखाद्या शब्दामधल्या न चा ण झाला की त्या शब्दाचे मराठीकरण पूर्ण झाले असे समजायला हरकत नाही. जसे, इंग्रजी बटनचे बटण, मटनचे मटण वगैरे. अशाच रीतीने संस्कृत पानीयचे मराठीत पाणी झाले , नवनीतचे लोणी आणि कठिनचे कठीण. यावरून वाटते की , टन, कार्टून, कर्टन, कार्टन सारख्या शब्दांपैकी बहुतेकांना सहज वापरता येण्यासारखे प्रतिशब्द असल्याने, हे शब्द मराठीत पूर्णपणे रूळले नसावेत, आणि त्यांचे मराठीकरण न झाल्याने या शब्दांतील न चा ण झालेला नाही.
मराठी शब्दांत ट, ठ, ड, ढ नंतर सहसा न येत नाही, आलाच तर ण येतो. म्हणूनच बटण, मटण, सटाणा, वाटाणा, गटाणा, पाटण, पाटणा, चटणी, टणटणी, टणाटणा, टाणकन, ठणठणाट, ठणठणीत, टुणटुणीत, डोणजे, ढाण्या, वगैरे शब्द अस्सल मराठी वाटतात.
असे असले तरी, या नियमाचा व्यत्यास मात्र खरा नाही. म्हणजे शब्दात जर एखादा ण असेल तर त्याच्या अगोदर 'टठडढ'च नव्हे तर इतर अक्षरेही येऊ शकतात. उदाहरणार्थ कण, तण, बाण, इ.
श्री. यनावाला आणि इतरांनी 'बटण' वापरल्याने आणि मी माझ्या प्रतिसादात अनवधानाने 'बटन' टंकल्याने हे सर्व लक्षात आले.
विषयान्तराबद्दल माफी असावी. (बटण न दाबण्यात सर्वांचे भले असल्याने माझा निर्णय योग्य होता हे समजून धन्य वाटले.)--वाचक्‍नवी

सहमत + सामन्यरूप .. मराठवणे

परभाषेतील एखाद्या शब्दामधल्या न चा ण झाला की त्या शब्दाचे मराठीकरण पूर्ण झाले असे समजायला हरकत नाही.

सहमत.

सामान्यरूप हे मराठीचे वैशिष्ठ्य. एखाद्या परकीय शब्दाचे आपण सामान्यरूप करून वापरू लागलो की तो शब्द परकीय राहात नाही. ह्याला आपण मराठवणे (बाटवणेच्या धर्तीवर) म्हणू शकतो.

उदा.

दूध फ्रीजमध्ये ठेव. ("फ्रीज" अध्याप परकीय)
शर्टाला इस्त्री करायला हवी. (शर्टाचे मराठीकरण पूर्ण)
पुस्तक टेबलावर आहे. (टेबलाचे मराठीकरण पूर्ण)

इथे पहिल्या उदाहरणात, दुध फ्रीजात ठेव, असे म्हटले तर फ्रीजाचे मराठीकरण पूर्ण झाले असे म्हणता येईल. परंतु मराठीत सहसा असे म्हटले जात नाही (कोकणीत असे म्हटले जाते) म्हणून फ्रीज हा शब्द मराठीने पूर्णपणे घेतला असे म्हणता येणार नाही. शर्ट आणि टेबल मात्र पूर्ण मराठी शब्द आहेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रोचक निरीक्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी यांचे 'ण' संबंधीचे निरीक्षण रोचक आहे. माझ्या हे कधी लक्षात (तसेच वाचनातही) आले नव्हते.
"परभाषेतील एखाद्या शब्दामधल्या न चा ण झाला की त्या शब्दाचे मराठीकरण पूर्ण झाले असे समजायला हरकत नाही."
हा वाचक्नवीनियम पटण्यासारखा आहे.

+१

श्री.वाचक्नवी यांचे 'ण' संबंधीचे निरीक्षण रोचक आहे

+१ अत्यंत रोचक!
सुनील यांचे म्हणणेदेखील पटले

(फ्रिजातल्या आणि माठातल्या पाण्याचा दोस्त)ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

अधिक एक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सुनील यांचे म्हणणे देखील पटले

अगदी खरे. भाषेशी इतका परिचय असूनही या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या. श्री. वाचक्नवी तसेच श्री. सुनील यांना धन्यवाद!

सामान्यरूप हे आणखी एका गोष्टीचे लक्षण

सामान्यरूप झाले की मराठीकरण पूर्ण झाले हे तर खरेच, पण सामान्यरूपीकरण हे विशेष नामांच्या बाबतीत आणखी एका गोष्टीचे लक्षण असते. अतिपरिचयात असलेल्या विशेष नामांचे सामान्यरूप होते, अल्प परिचय किंवा आदरार्थी उच्चारायच्या नामांचे होत नाही. लताचे गाणे आणि रेखाचा चित्रपट, परंतु शेजारी राहणा‍र्‍या लतेची आई. सीतेचे हरण मात्र गीताचे(गीता नावाच्या लेखिकेचे) लिखाण. पुण्यात परंतु लंडनात नाही. अमेरिकेला पण ग्रीसाला नाही. हे बर्व्यांचे घर, पण हे भक्ति बर्वेचे घर.
आणखी एक..परिचित देशी गावांच्या नावाला 'त' लावण्यापूर्वी सामान्यरूप होते, 'ला' पूर्वी ऐच्छिक. नागपुरात (-पूरत नाही) परंतु नागपूरला किंवा नागपुराला. शब्दयोगी अव्ययापूर्वी सामान्यरूप होते? नागपूरमध्ये योग्य आणि नागपुरामध्ये? पुण्यामध्ये योग्य पण पुणेमध्ये? नागपूरपासून आणि नागपुरापासून दोन्ही योग्य पण पुणेपासून? मुंबई, काशी, झाशी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी, पण वाशी? आणि इटली? ते इंग्लंड, ती अमेरिका पण तो इटली.--वाचक्‍नवी

 
^ वर