घरच्याघरी जादु: तरंगते अंडे

खबरदार!! होश्शियार!!! मिस्टर जादुई येत आहेत होऽऽऽ
......
"नमस्कार! छोट्या दोस्तांनो, मी मिस्टर जादुई! म्हणजे माझं खरं नाव वेगळं आहे पण मला सगळे जादुगार जादुई या नावानेच ओळखतात. पण इथे तुमच्याकडे मी जादुचे प्रयोग दाखवायला नाही आलोय तर तुम्हाला जादू शिकवायला आलोय.. हो अगदी खरं! जादुगार होण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घरच्या घरी घरची साहित्य वापरून तुम्ही जादुगार होऊ शकता.
आता मी एक जादु दाखवतो. तुम्हाला माहित आहे ना की अंड पाण्यात बुडतं आता हे बघा एक अंड अगदी साधं अंड आहे. तुम्हाला हवं तर बघा ना! आता हे अंड पाण्यात टाकलं तर बुडतं हे तुम्ही बर्‍याचदा बघितलं असेल ना! आता मी या अंड्यावर जादु करणार आहे"
"ओम् फट् स्वाह: ऽऽ"
"आता बघा हे अंड मी ह्या पाण्यात टाकलं. अरेच्या हे तर बुडतच नाही आहे. तरंगतं आहे."

"सांगा पाहु हे मी कसं केलं असेल? सांगतो सांगतो....आता मी सांगतो ते करा"

१. एक अंड घ्या आणि पाण्याने भरलेलं भांड घ्या. त्या पाण्यात अंड टाकून बघा ते लगेच बुडेल.
२. आता त्या पाण्यात चांगले ८-१० चमचे मिठ टाका आणि भरपूर ढवळा
३. मीठ दिसेनासं झालं की आता त्यात अंड टाकून बघा

तरंगते अंडे

तरंगलं की नाही!!!!

हे कसं होतं माहित आहे?

पाण्यापेक्षा जड वस्तु पाण्यात बुडते तर हलक्या वस्तु जसे लाकुड, थर्माकोल पाण्यावर तरंगते. अंडदेखील पाण्यापेक्षा जड त्यामुळे तेही पाण्यात बुडतं. पण जेव्हा तुम्ही पाण्यात मीठ टाकता तसतसं ते जास्त डेन्स होतं. त्यामुळे एक वेळ अशी येते की अंड पाण्यापेक्षा हलके भासु लागते. त्यामुळे ते मीठाच्या पाण्यावर तरंगते.
आहे की नाहि सोप्पी ट्रिक!

आता ह्या सोप्या ट्रीकने घरी आलेल्या मित्रांना, पाहुण्याचा चकीत कराल ना?

==============
टिपः
१. हे छोटेखानी प्रयोग मुलांची प्रयोगशीलता वाढावी या उद्देशाने देण्याचा प्रयत्न आहे.
२. या लेखमालेतील काही प्रयोग पालकांच्या उपस्थितीत होणे गरजेचे आहे.
३. लोकमित्रला या लेखमालेतील लेख एकदा प्रकाशित करायचे अधिकार मी देत आहे. ह्या लेखमालेत मी प्रताधिकारमुक्त चित्रे / स्वत: तयार केलेली चित्रे-आकृत्या वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हे लेख जसेच्या तसे लोकमित्रसाठी वापरता येतील.
४. असे प्रयोग मुलांना करायला सांगून त्यांच्या प्रतिक्रिया ऐकायला जास्त आवडतील. अर्थात वडिलधार्‍यांच्या प्रतिक्रियांचेही स्वागत आहेच ;)
५. सुधारणा-सुचवण्यांचे स्वागत आहे. खरंतर गरज आहे

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर

चित्रेही सुस्पष्ट.

मिस्टर जादुईंनी कमाल केली!

सही!

मस्तच!
झकास आणि साधा सोपा प्रयोग!
आपला
गुंडोपंत

मस्त

हा हा हा बघता बघता सही तरंगवलास रे एक लेख!!!!

उपक्रमावर स्वतंत्र [चांगला] लेख लिहायला सहज जमेल अशी जादू शिकव रे ऋषिकेशा!!!

जाऽऽऽदू!!

आवडली. लेख मस्त जमला आहे.

मस्त! :)

विज्ञानाचे नियम अश्या मजेशीर जादूच्या/कोड्याच्या साहाय्याने उलगडून दाखवायची कल्पना छानच आहे. :)

ऋषिकेशराव, जादू आवडली बर्र का! अजूनही अश्याच गंमरीशीर जादू येऊ देत!

आपला,
(जादूप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

मी

किनई आत्ताच कलुन पायलं हे सगलं ऋशी-दा.
आई पण खुश झाली मला धमाल करताना पाहुन.
खुप् खुप् मज्जा आली.
मी नाय् सांगनाल ही जादु आणखिन् कुनाला...........

छोट्याशा बालकाचे मन

मस्त रे !!!

तरंगणा-या अंड्याची जादू आवडली.
अजून जादूचे लेख येऊ दे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त!

लेख आणि कल्पना एकदम आवडली! लहान मुलांसाठीच्या विविध लेखनाचा एक वेगळा समुदाय केला पाहीजे असे हा लेख वाचताना वाटले.

मस्त!

सोपे लिखाण. खूपच आवडले.

धन्यवाद!

सर्व प्रोत्साहनकर्त्यांचे - प्रतिसादकर्त्यांचे अनेक आभार!
हा लेख लिहिताना चौकस मुले डोळ्या समोर होती.. परंतू याप्राकारात लिहायला मुलांना घरच्याघरी करता येतील असे ८-१० प्रयोगच माझ्यापाशी आहेत. या शिवाय कोणाला या मालिकेत अधिक प्रयोग वाढवायचे असतील तर माझी अजिबात हरकत नाही.

या शिवाय
१. लेखाची लांबी आजी-आजोबांच्या लेखांपेक्षा कमी ठेवली आहे. याबद्दलही मते ऐकायला आवडतील.
२. प्रत्येक शास्त्रीय इंग्रजी शब्दांला मराठी प्रतिशब्द द्यावाच का? उदा. या लेखात मी डेंसिटीला प्रतिशब्द दिलेला नाहि.
३. ज्यांना लहान मुले आहेत अथवा ओळखीची आहेत त्यांनी कृपया हा लेख त्यांना वाचायला द्यावा/वाचून दाखवावा. त्यानंतर जर ते प्रयोग प्रत्यक्ष करून बघायला उद्युक्त झाले तर मला आनंद होईल :) यावर प्रतिक्रियांची आवर्जून वाट पाहतो आहे

ज्याना ८ ते १५ वयोगटातील मुले अहेत त्यांच्यासाठीएक प्रश्नः
हल्लीच्या मुलांना उपलब्ध असलेल्या माध्यमांमुळे आणि त्यांच्या अफाट चौकस वृत्तीमुळे आपल्यावेळी ८वी पर्यंत समजणारे प्रयोगही सहज समजतील असा माझा कयास आहे. हा अंदाज धाडसाचा आहे का योग्य वाटतो?

सहजराव,
मि. जादुईंना तुमच्या प्रश्नासठी फोन केला होता. त्यावर ते म्हणाले उपक्रमावर विस्तृत व चांगले लिहिता यावे यावर एकच "शास्त्रिय" उपाय आहे - "उपक्रमावर लिहायला सुरुवात करा " :) बाकी प्रतिक्रियेबद्दल धन्यु!

मना,
हा प्रयोग करायला उद्युक्त झालास याचा आनंद वाटला. :) अजून लहान मुलांच्या मनात शिरूनहि बघ ना की टार्गेट ऑडियन्स कशी प्रतिक्रिया देतोय ते .. प्रतिसादाबद्दल आभार!

बाकी धनंजय, गुंडोपंत, प्रियालीताई, जादुप्रेमी तात्या, बिरुटेसर, विकास, चित्राताई सार्‍यांना मनापासून धन्यु!

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

मस्त

छोटेखानी सचित्र लेख आवडला.

अवांतर : मिठाच्या पाण्यात अंडे टाकल्यावर आधी ते प्रसरण पावते आणि त्यामुळे तरंगते का? :))

थोडा बदल केला की

हा प्रयोग संपल्यावर, भाग २ सुरु करावा
-
हेच भांडे ज्वाळेवर चढवावे, त्यात थोडे तिखट, हळद काही मसाला, लसूण आले इत्यादी घालावे. मघाशी तरंगणारे अंडे आता त्याच पाण्यात फोडून घालावे.
उकळी येताच, हवेवर सुरेखसा सुवास 'तरंगु' लागेल.
काही मिनिटे उकळल्यावर मस्तपैकी ताटे घ्यावीत भरपेट मसालेदार बैदा करीचे जेवण झाल्यावर जादूची सांगता करावी!

(मघाशी मिठ जास्त झाले असल्यास, ४ बटाटेही घालावेत! ;)) )

आपला
गुंडोपंत

 
^ वर