आर्थिक सत्तेचे नवीन केंद्रीकरण
न्यु यॉर्क टाईम्सचे प्रसिद्ध स्तंभ लेखक "थॉमस फ्रिडमन" यांचा मे २१ चा एक लेख वाचनात आला. लेखाचे नाव आणि दुवा आहे, "Imbalances of Power". हा लेख मुळातून वाचण्या सारखा आणि विचार करायला लावणारा आहे. लेखाचे भाषांतर जरी येथे देत नसलो तरी मूळ मुद्दे असे आहेतः
- अमेरिकेच्या पुढच्या वर्षी येत असलेल्या राष्ट्राध्यक्षास परराष्ट्र धोरणासंदर्भात जर काही विचार करायचा असेल तर गंभीर प्रश्न सध्याच्या प्रशासनाच्या इराक मधील घोडचुका आणि इराक युद्ध हे नसेल तर उर्जेचा भेडसावणारा प्रश्न असेल.
- चार महीन्याच्या कालावधीत राष्ट्राध्यक्ष बुशना दोनदा सौदी अरेबीयात जाऊन विनंती करण्याची नामुष्की आली. आणि त्याला काही फळ आले नाही ही वेगळीच गोष्ट!
- आज अमेरीकेला भारत, चीन आणि इतर अनेक देशांकडून आव्हान आहे. हे देश "गुरूची विद्या गुरूला देयला" तयार होत आहेत. (हा मुद्दा त्यांनी रफिक झकेरीया यांच्या "The Post-American World," या पुस्तकासंदर्भात दिला आहे. "They have adopted our lessons and are playing our game")
- दुसर्या एका श्री. रॉथकॉफ या लेखकाच्या "the superclass," या पुस्तकाचा संदर्भ देत फ्रिडमन सांगतात की आज अमेरिका तीन प्रकारच्या घाट्यात (डेफिसीट) आहे - आर्थिक घाटा - ज्याचा परीणाम लवकरच सैन्यखर्च, इफ्रास्ट्र्क्चर, शिक्षण आणि आरोग्यासंदर्भात दिसणार / दिसतो आहे, आयात-निर्यातीमधील घाटा ज्यात अमेरिका जास्त विकण्यापेक्षा विकत घेत आहे, आणि अर्थातच परराष्ट्रीय भूराजकीय (जिओपॉलीटीकल) घाटा..."
या संदर्भात त्यांनी INSTITUTE FOR THE ANALYSIS OF GLOBAL SECURITY (IAGS) चे कार्यकारी प्रशासक आणि या संदर्भातील तज्ञ गाल लफ्ट यांच्या HOUSE COMMITTEE ON FOREIGN AFFAIRS समोर अमेरिकन काँग्रेसमधे केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. उत्सुकतेपोटी ते शोधले. ते भाषण आत्ता वर वरच वाचले पण त्यातील महत्वाचा मुद्दा खाली देत आहे:
खनीज तेलाच्या वाढणार्या किंमतीमुळे आजच्या किंमतीनुसार ओपेक देशांचे आर्थिक बळ हे जागतीक (संपूर्ण जगाच्या) आर्थिक बळाइतके झाले आहे. जागतीक आर्थिक मालमत्ता - $ १४० ट्रिलीयन्स तर ओपेकची $१३७ ट्रिलीयन्स (या तुलनेसाठी जगामधे त्यांनी ओपेक व्यतिरीक्त जग धरले आहे). आता ओपेकचे अध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे जर तेलाच्या किंमती या $२०० / बॅरल झाल्या तर काय होऊ शकेल हे समजण्यासाठी त्यांनी काही साध्या भाषेत काल्पनीक उदाहरणे दिली आहेतः
- बँक ऑफ अमेरीका एका महीन्याच्या तेल उत्पादनात विकत घेतली जाऊ शकेल,
- ऍपल काँप्यूटर्स एका आठवड्यात तर,
- जनरल मोटर्स फक्त तीन दिवसाच्या उत्पादनात!
- दोन वर्षाच्या कालावधीत एस अँड पी ५०० मधे मोडणार्या प्रत्येक कंपनीत ओपेक २०% किमान गुंतवणूक करून वर्चस्व गाजवू शकेल.
अर्थात वरील शक्यता केवळ सामान्य माणसे आणि राजकीय व्यक्तींना धोरणे ठरवण्यासाठी केल्या आहेत. पण त्यातील सर्वच नाही तरी काही गोष्टी वास्तव नक्कीच होऊ शकतील.
त्यात अजून एक गोष्ट त्यांनी सांगीतली आहे जी मला माहीत नाही कितपत आत्ताच्या घडीला वास्तवात आहे (वास्तवात आहे हे नक्की, प्रमाण माहीत नाही): इस्लामीक शरीयत कायद्याप्रमाणे अर्थकारण करणे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बँका आणि गुंतवणूक उद्योग हळू हळू "सीएसओ" अर्थात "चिफ शरीयत ऑफिसर" असे पद तयार करू लागले आहेत, जेणे करून मुस्लीम गुंतवणुकीस आकर्षित केले जाऊ शकेल. त्याचे अनिष्ठ परीणाम हे धंद्यांवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर हळू हळू होऊ लागले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तुर्तास त्याचा संबंध हा फक्त इस्त्रायलवर बहीष्कार करा असे सांगण्यापुरता असला तरी त्यातून अनेक अंगाने बंधने सर्वत्र येऊ शकतील. त्यातून हॉलीवूड, माध्यमे अथवा सट्टाबाजार/गँबलींग (लास वेगास)काहीच सुटणार नाही.
तर असे हे एक भयचित्र आज दरोज वाढणार्या खनीज तेलाच्या किंमती संदर्भात दिसते. तर तुम्हाला काय वाटते?
- हे जरा अतीच भयचित्र आहे का या कडे गांभिर्याने पहाण्याची गरज आहे?
- गांभिर्याने पहाताना अमेरिका ह्या जगाचे नेतृत्व करणार्या देशाचे राजकीय सामर्थ्य हे उतरंडीला लागले आहे असे वाटते का?
- जर अमेरीकेच्या उद्योगांना ओपेककडून टेक ओव्हरचे भय असेल तर भारतातील उद्योगांचे, त्यांच्या आणि पर्यायाने भारताच्या वाढणार्या सामर्थ्याचे काय?
- आपले (भारतीय) राजकारणी, समाजकारणी, विचारवंत, माध्यमे, आणि विशेष करून "सुशिक्षित" शहरी समाज या बद्दल काही गांभिर्याने विचार करतो आहे का?
परत राहून राहून आठवते ते ऍसिमोव्हचे "फाउंडेशन" - गॅलेक्टीक सत्तेचा अंत आणि नवीन सत्ता (आणि संस्कृती) तयार होण्यामधे येणारा असंस्कृत/रानटी पणा (बार्बारीझम) हा आपण कदाचीत थांबवू शकणार नाही, पण त्याचा काळ आणि वेदना कमी करू शकू असे त्यातील द्रष्ट्या हॅरी सेल्डनला वाटायचे. आज आपल्याला पण असा काळ कमी करावा लागेल का याचा भितीतून नाही तर वास्तवातून विचार करावा लागणार आहे असे राहून राहून वाटते.
Comments
सुंदर लेख
स्वगतः अरेच्च्या! इअतक्या महत्वाच्या विषयावरच्या इतक्या सुंदर लेखावर अजून एकही प्रतिक्रिया नाही!? मी लिहु का नको.. ऋष्या! झेपणार आहे का या विषयावर काही तरी लिहायला... असो.. मत ठणकवायला मराठी माणूस कधी मागे राहिला आहे का? मग! दे बिनधास्त मस्तपैकी मत ठणकावून :) पुढचं बघु पुढे ;) तसही चर्चेला सुरवात झाली तर पाहिजे..
१. हे जरा अतीच भयचित्र आहे का या कडे गांभिर्याने पहाण्याची गरज आहे?
माझ्या मते हे काहि अंशी भयरंजीत चित्रण असले तरी बरेचसे सत्य वाटते. जर "आहे असेच" चालु राहिले तर जग नव्या युद्धाकडे वाटचाल करत आहे हे स्पष्ट दिसुन येत. पण यावर अगदीच उपाय नाहि असे नाहि. इंधनाच्या किंमतीच्या वाढीची चिंता करण्यापेक्षा वैकल्पिक इंधनाशी निगडीत संशोधन व निर्माण (आर्&डी) आणि इंधनाची बचत याकडे जस्त लक्ष घालायची गरज मात्र आहे असे वाटते. सौरउर्जेसारख्या वैकल्पिक इंधनावर चालणार्या वस्तु वापरण्याजोग्या प्रकारे व व्यावसायिक प्रमाणात बनवल्या जाऊ लागल्या तर हळुहळु हे चित्र वाटते तितके भयकारी होणार नाही.
२. गांभिर्याने पहाताना अमेरिका ह्या जगाचे नेतृत्व करणार्या देशाचे राजकीय सामर्थ्य हे उतरंडीला लागले आहे असे वाटते का?
नाहि. परंतू लवकरच त्यास तोडीस तोड संयुक्त नेतृत्त्व उभे राहिल असे वाटते. अन् यामुळे अमेरिका जास्त प्रमाणात व अधिक बेमुवर्तपणे पृथ्वीचा भूगोल बदलायचा प्रयत्न करेल असा कयास करता येईल
३. जर अमेरीकेच्या उद्योगांना ओपेककडून टेक ओव्हरचे भय असेल तर भारतातील उद्योगांचे, त्यांच्या आणि पर्यायाने भारताच्या वाढणार्या सामर्थ्याचे काय?
ओपेकला अश्य कंपन्या टेक ओव्हर करण्यात कितपत रस असेल? कारण काहिहि झालं तरी अमेरिकन-भारतीय-चायनीज कंपन्या यांचे भावी ग्राहक आहेत. ग्राहकांना विकत घेणे कीती फायद्याचे आहे हा वादाचा मुद्दा आहे. लासे टेकओव्हर झालेच तर त्यामुळे फायदा वाढेल का? तसेच या कंपन्यांना टेक ओव्हर नंतर स्वस्तात नियमीत इंधन पुरवठा होईल हे पाहणे रोचक ठरेल.
४. आपले (भारतीय) राजकारणी, समाजकारणी, विचारवंत, माध्यमे, आणि विशेष करून "सुशिक्षित" शहरी समाज या बद्दल काही गांभिर्याने विचार करतो आहे का?
माझा मते होय. मी या विषयावर काहि वृत्तपत्रांतून अग्रलेख वाचले आहेत. त्याच बरोबर अनेक अर्थविषयक पाक्षिके/साप्ताहिके/मासिके यांत यावर विपुल प्रमाणात दखल घेतल्याचे त्यावर खल झाल्याचे जाणवते आहे. परंतू काहि अपवाद वगळता फ्रिडमन यांनी व्यक्त केलेला जगबुडी झाल्याचा अविर्भाव मात्र कुठेही दिसला नाहि :)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
विचार
वा! वेगळा लेख.
थॉमस फ्रीडमन हा 'तसा' एकांगी लेखन करणारा अमेरिकावादी स्तंभ लेखक आहे. शिवाय अमेरिकेचे(च) वर्चस्व कायम राहिले पाहिजे या मताचाही तो आहे. आणि त्याने ही मते आपल्या लेखनात कायम व्यक्त केली आहेत.
त्यामुळे हा लेखही, आजचे स्थर्य गेले तर काय विचाराने अस्वथतेत आलेआ दिसत आहे.
मात्र त्याच वेळी ओपेक मुल्य व इतर जग हे वाचून मलाही अस्वस्थता आली.
चीनी जागतिकिकरणा इतकेच मुस्लीम जागतिकीकरण धोकादायक आहे.
कोणते लोक जास्त वाईट हा मात्र वेगळा विषय आहे. ;)
यावर नॉम चॉम्स्की काय म्हणतो, हे पण वाचायला आवडेल...
अजून परत नंतर लिहितो...
घाईत इतकेच!
आपला
गुंडोपंत
चॉम्स्की
यावर नॉम चॉम्स्की काय म्हणतो, हे पण वाचायला आवडेल...
प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्ष पणे या संदर्भातील राजकारण आणि अमेरिकेवर टिका वाचायची असल्यास, "UNDERSTANDING POWER, THE INDISPENSABLE CHOMSKY " हे त्यांच्या भाषणांवर आधारीत असलेले पुस्तक वाचा. चांगले आहे, माझ्या संग्रही आहे. त्यात अनेक संदर्भ दिले आहेत पण पाने वाचवायला म्हणून त्या संदर्भांचा (तळटिपांचा) अर्थ सांगण्यासाठी म्हणून हे संकेत स्थळ त्यांनी तयार केले आहे.
भंपक
फ्रीडमन हा भंपक लेखक आहे हे त्याचे 'द वर्ल्ड इज फ्लॅट' वाचून कळले होते. सविस्तर प्रतिसाद द्यायला आवडेल. पण सध्या आवरता घेत आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सहमत
फ्रीडमन हा भंपक लेखक आहे
सहमत आहे.
त्याला फार माहत्व देण्यात अर्थ नाही.
आपला
गुंडोपंत
स्तंभलेखक
फ्रीडमन हा भंपक लेखक आहे हे त्याचे 'द वर्ल्ड इज फ्लॅट' वाचून कळले होते.
एकंदरीतच मी कुठल्याच स्तंभलेखकांचे लेखन हे समतोल समजून वाचत नाही. त्यात उल्लेखलेल्या रफीक झकेरीयांचे लेखन पण एकांगीच असते. तरी देखील त्यातील विश्लेषण वजा केल्यावर वास्तवाशी निगडीत माहीती मिळू शकते. तशी मला काही हा लेख वाचताना गॅल लफ्ट यांच्या काँग्रेशनल हिअरींग संदर्भात मिळाला. त्यात देखील काही विश्लेषण हे मी आधी म्हणल्याप्रमाणे त्यांनी सोप्या भाषेत समजावे म्हणून उदाहरणार्थ केलेले आहे. पण माहीती मात्र वास्तव आहे. थोडक्यात सुरवात फ्रिडमन मुळे झाली तरी मी लिहीलेल्या चर्चेच्या प्रस्तावाचा उत्तरार्ध हा या काँग्रेशनल हिअरींग संदर्भातील आहे.
फ्राईडमन बद्दल ...
...एक भीषण विनोदी लेख.
मूळ चर्चाविषयात काही भर न घालता काहीतरी भलतेच पोस्ट् केल्याबद्दल माफी मागतो. पण हा लेख फार म्हणजे फारच विनोदी आहे !
'जागतिक आर्थीक सत्तेचे विकेंद्रीकरण'
मुद्दा:१ अमेरिका ह्या जगाचे नेतृत्व करणार्या देशाचे राजकीय सामर्थ्य हे उतरंडीला लागले आहे असे वाटते का?
उत्तर होकारार्थी द्यावं लागेल. कारण ईस्लामी आतंकवादाला रोकायचं उत्तर त्यांच्याजवळ नाही.
मुद्दा : २ जर अमेरीकेच्या उद्योगांना ओपेककडून टेक ओव्हरचे भय असेल तर भारतातील उद्योगांचे, त्यांच्या आणि पर्यायाने भारताच्या वाढणार्या सामर्थ्याचे काय?
हि भिती काहीशी अनाठायी आहे असे वाटते. तेलाच्या वाढत्या किंमतीवर ओपेक चे नियंत्रण नाही असे ओपेकचेच म्हणण आहे.
मुद्दा : ३ आपले (भारतीय) राजकारणी, समाजकारणी, विचारवंत, माध्यमे, आणि विशेष करून "सुशिक्षित" शहरी समाज या बद्दल काही गांभिर्याने विचार करतो आहे का?
सध्या तरी ही सर्व मंडळी आपलेच अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत आहेत. त्यांमूळे या गोष्टींकडे (येणार्या समस्यांचा) विचार करण्यासाठी वेळ ही नाही व तेवढी जाण त्यांच्याकडे आहे असं जाणवत नाही.
खरतरं उद्याच्या काळात 'सत्तेचे नवे केंद्रीकरण' असे म्हणण्या ऐवजी 'जागतिक आर्थीक सत्तेचे विकेंद्रीकरण' होणार असं म्हणण संयुक्तिक होईल. पण जेव्हा सत्तेचे केंद्र जेव्हा बदलते तेव्हा रक्तपात होतोच, युद्ध होताच. सहज पणे सत्तांतर होईल असं वाटत नाही.