वाचील की वाचेल?

तो पुस्तक वाचेल की वाचील?

"व्याकलन (ले.सतीश रावले) या लेखावरील प्रतिसादात श्री. वाचक्नवी लिहितात:
तो पुस्तक वाचेल-हा भावे प्रयोग
भावे प्रयोग हे खरे. पण
*१. तो पुस्तक वाचेल.
*२. तो पुस्तक वाचील
.
या दोन वाक्यांतील व्याकरण शुद्ध वाक्य कोणते?
काही क्रियापदांची भविष्यकाळ तृ.पु ए.व आणि भविष्यकाळ प्र.पु. ए.व. ची रूपे करताना ही समस्या उद्भवते.या संदर्भात पुढील सर्वपरिचित वाक्यांचा विचार व्हावा. सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांची रूपे कशी होतात ते पाहावे.

१. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन, रूप तुझे।
प्रेमे आलिंगीन, आनंदें पूजीन, भावे ओवाळीन, म्हणे नामा।
......
२. अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक ।
जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा जीवीचिया ।
......
३. गर्जेल तो पडेल काय?
.....
४. तळे राखील तो पाणी चाखील.
....
निळी क्रियापदे सकर्मक, तांबडी अकर्मक.

लेखनविषय: दुवे:

Comments

कर्मकत्वाशी संबंध नसावा

द. ह. अग्निहोत्री एन/ईन आणि एल/ईल असे वैकल्पिक म्हणून देतात. दोन्ही रूपे चालत असावीत.

विकल्प नसतो तेव्हा कर्मकत्वापेक्षा उच्चारसुलभतेचाही विचार असावा.
(आकारांत धातूंना 'एल' रूप सहसा दिसत नाही.)
तो उद्या कोकणात जाईल.
तो तिथे आंबे खाईल.
*खाएल, *जाएल असे क्वचितच ऐकू येते.
(हा नियम बहुधा सर्व स्वरांत आ- ई- ऊ- ए-कारांत धातूंना लागू असावा का? पाणी पील, हात धुवीन [पण धुवेन?], दान देईल)

(आधुनिक भाषेत सकारांत धातूंना 'ईल' रूप सहसा दिसत नाही)
तोवर जेवण उरकले असेल.
जेवणानंतर तो भांडी घासेल.
"*अशील" प्रयोग मी बघितलेला/ऐकलेला नाही
"घाशील" प्रयोग पुराण-मराठी वाटतो. आधुनिक वाटत नाही.

निळी क्रियापदे सकर्मक, तांबडी अकर्मक.

पटण्याजोगा प्रतिसाद पण..

"घाशील" प्रयोग पुराण-मराठी वाटतो. आधुनिक वाटत नाही.

घाशील बद्धल नाहि बोलु शकत नाही पण "घासीन" योग्य आणि 'आधुनिक' आहे की . हे वाक्य पहा:
"तवा घासायचा आहे का? मी घासेन की..." "भांडी घासायची आहेत का? मी घासीन की"
मी वरील दोन्ही शब्द सहजतेने जे येईल त्याप्रमाणे वापरतो. फक्त 'घासेन'च वापरतो असे काहि नाही.

घासीन प्रमाणे, हासीन, फासीन, मारीन यात मला तरी काहिहि 'पौराणिक' वाटत नाहि. अजुनही मी ही रुपे सर्रास वापरतो.

(प्रत्यक्षात भांडी घासायची वेळ येऊ देत नाहि हा भाग अलाहिदा ;) )

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

पण *घासील, *हसील बहुधा वापरात नाहीत

आणि मारेल/मारील बद्दल माझे काहीच ठाम मत नाही. बहुधा वैकल्पिक रूपे असावीत.

शिवाय एक शुद्धिपत्र :
वर "आकारांत" लिहिले आहे त्याऐवजी "आकारन्त" असे लिहिले असते तर असंदिग्ध झाले असते.

घासेल, बसेल इ.इ.

घासेल(घासील/घाशील नाही), पण घासेन किंवा घासीन किंवा घाशीन, तसेच बसेन/बसीन आणि बसेल(बशील नाही), असेन आणि असेल(असीन, अशील नाही), परंतु फसवले किंवा फशिवले(ग्रामीण).--वाचक्‍नवी

वाचेल्

मला तरी वाटत,गावाप्रमाणे बोलणे बदलते.
"तु हे पुस्तक वाच.", या साठी,
"तु हे पुस्तक वाचशील.", असे पण बोलतात.
तुर्त "तो पुस्तक वाचेल" हेच बरोबर वाटते.

बदलत्या काळाची बदलती रूपे.

"तू हे पुस्तक वाच."--आज्ञार्थ.
"तू हे पुस्तक वाचशील."--साधा भविष्यकाळ.
"तो पुस्तक वाचेल".--वाचेल(किंवा वाचील) हे साध्या भविष्यकाळाचे हे तृतीय पुरुषी एकवचनी रूप.
तिन्ही वाक्ये सर्व मराठी गावात अशीच वापरली जातात.
मोरो केशव दामल्यांच्या मते धातूंचे मुख्य गण दोन--१. उमजगण--यातील काही धातू--उमज, ओक, खेळ, चढ, पाव, पोच, पोह, बोल, म्हण, विसर, विसंब, शीक, शीव(स्पर्श करणे), समज, स्मर, हर, लाग, वद, इ.इ.
२. आचरगण--यातील धातू--आचर, आठव, उत्तर, जेव, चाव, जिंक, पांघर, नेस, इ.इ.
वर्तमान काळाची रूपे होताना आचरगणातील धातूंना इडागम होतो. म्हणून आचरतो/आचरितो, करतो/करितो अशी रूपे होतात. दामल्यांच्या मते उमजगणातील धातूंची अशी रूपे होत नाहीत.
भविष्यकाळाकरता असा काहीसा नियम शोधायला हवा, म्हणजे वाचेन/वाचीन, परंतु जाईन(जाएन नाही) असे निश्चितपणे सांगता येईल.
वाचणे या धातूची रूपे:-मी वाचतो/वाचितो/वाचते/वाचिते/वाचत्ये.
वाचत(किंवा वाचीत) आहे/असतो-ते-त्ये,असता,असावा-वी, असेल(अशील नाही). त्याने/तिने वाचत(वाचीत) असावे
वाचेल/वाचील.--वाचक्‍नवी

अवांतर - शब्दांपलीकडले!

द्न्यानाचा एक अर्थ जर माहीती असेल तर त्याचा दूसरा अर्थ नक्कीच.....

आनंद घ्यायला हवा.

आयूश्यात चांगल वागल्यावर नूकसान होतं, मात्र वाईट वागल्यावर होवू शकणार्‍या परीणामांची भीती समोर उभी राहते. ह्या स्वभावामूळे कूरघोडी करूनच स्वत:चं अस्तीत्व वाचवणं यातच शहाणपण वाटतं.

पारश्वभूमी:

वीवीध आंतरजालावर वाद-संवाद, चर्चा होत असतात. त्यांचा नेमका हेतू घटकाभर मनोरंजन व चीमूकलं द्न्यान-अर्जन असतं. मला स्वतःला यातील फरक माहीत नव्हता. मी उपक्रम व दुसर्‍या एका संकेतस्थळावर प्रवेश एका वेगळ्या हेतूने केला. पण माझ्या येथील पहील्याच लेखावर जे प्रतीसाद मीळाले त्यातून माझा अपेक्शा भंग झाला. खरतरं मी जमीनीवर आलो. तीथून माझ्यात माझ्या नकळतच एक बदला घेण्याची व्रूत्ती उफाळून आली. व त्यानंतर संकेतस्थळावर चर्चा, वाद-संवाद ह्याचे काही अलीखीत नीयम मला समजू लागले.
आयूश्य हे 'कूरघोडी' करण्यासाठीच असतं. तीथं प्रामाणीक असावं मात्र साधंभोळं असू नये, गाफील असू नये हे मनोमनी पटलं. व ते समजूनच हा 'घटकाभराचा मनोरंजनाचा खेळ' मी खेळू लागलो.

कूरघोडी कशी करावी?:

वाद-संवाद, चर्चा यांमध्ये एखादा वीशय टाकावा. मात्र दूसर्‍यांच्या लेखावर प्रतीसाद देताना दोन-तीन दीवसांचा अवधी घ्यावा. ज्यांना हे छानपणे जमते, तीथं खेळ रंगतो.

ईथं स्वतःचा माठ सांभाळत-सावरत दूसर्‍यांचा ‍ माठ शीताफीने फोडायचा असतो.

माठ फोडणार्‍यांसाठी यात एक वेगळंच thrill असतं, थरार असतो.

ज्याचा माठ फूटतो, त्यासाठी तो अपमान असतो. 'virtual अपमान'!

जी मंडळी त्या घटनेचे साक्शीदार असतात, वाचक असतात. त्यांच्यासाठी ती एक वेगळीच पर्वणी असते, जम्माडी-जंमत असते.

माठ फोडणार्‍यांने 'माठ फूटल्यावर', आपली ईच्छा व्यक्त करून त्या चर्चेतून पळ काढायचा असतो.

माठ फूटलेल्याने आपली बूद्धीमत्ता पणाला लावून 'शीव्या-शाप' द्यायच्या असतात.

पाहणार्‍यांनी वाटलंच तर, केकवर आयसींग असतं तशी, दोन-तीन ओळींची छानशी प्रतीक्रीया टाकायची.

पण

ह्याचा ह्या चर्चेशी नक्की संबंध काय ते कळत् नाहिये बॉस.
म्हणजे "माठ फोडणे" वगैरे.
चांगलं भाषेबद्दल्, व्याकरणाबद्दल् वाचायला मिळत् होतं.
पण हे वाचलं आणि काय लिंकच लागेना अपण नक्की काय वाचतोय ते.
कृपया जरा उलगडुन सांगाल का ह्याचा अर्थ आणि त्याचा ह्याच्याशी संबंध?

जन सामान्यांचे मन

घालीन लोटांगण, वंदीन चरण |

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इथे भविष्यकाळ प्र.पु. ए.व.आणि भविष्यकाळ तृ.पु. ए.व या रूपांचाच विचार प्रस्तुत आहे. पूर्वींच्या लेखनातील अनेक उदाहरणे वाचल्यावर पुढील नियम दिसतात :
* मूळ धातू एकाक्षरी असेल तर ईन/ईल हेच प्रत्यय लागतात.मग क्रियापद सकर्मक असो वा अकर्मक.
...मी गाणे गाईन. तो गाणे गाईल. (मूळ धातू गा)
...मी जाईन. तो जाईल.
...मी पाणी पिईन. ती पाणी पिईल.
**धातू एकाक्षरी नसेल तरः सकर्मक क्रियापदांकरिता ईन/ईल हे प्रत्य लागतात.
...नाही निर्मळ मन, तेथे काय करील साबण|
...राजा करील ती पूर्वदिशा आणि भट सांगील ती अमवाशा.
***क्रियापद एकाक्षरी नसून अकर्मक असेल तर एन/एल हे प्रत्यय लागतात.
....मी वना वनातुन फिरेन हरिणीवाणी.
.....
निळी क्रियापदे सकर्मक, लाल अकर्मक.
...
पूर्वी वृत्तपत्रात येत असे: सुनील गावस्कर शतक काढील. तो एक हजार धावा पूर्ण करील.
आता वृत्तपत्रात येते : सचिन तेंडुलकर शतक काढेल. तो हजार धावा पूर्ण करेल.
... करेन, वाचेल (रीड;सेव्ह नव्हे), काढेल ही रूपे नियमबाह्य वाटतात. पूर्वीच्या लिखाणात आढळत नाहीत.आढळल्यास उदाहरणे द्यावी.

काही लिखित उदाहरणे

भविष्यकाळातली ईल/एल प्रत्ययांची उदाहरणे जी. ए. कुलकर्णी यांच्या "दूत" या कथेत जितकी सापडली, तितकी देत आहे.

अकर्मक धातूंची रूपे:
१.त्यांनी दूताकडून हीच आज्ञा पाठविली असेल.
२. त्याबाबतचा निर्णय उत्तराधिकाराची निश्चितता झाल्यावरच अर्थपूर्ण होईल.
३. तुमच्या स्मृतीला उजाळा येईल.
४. आम्हाला सम्राटांची आज्ञा श्रवण करता येईल.
५. आम्हाला कृतज्ञ वाटेल.
६. तो कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडेल.
७. याची स्मृती जागी होईल.
८. ते उपासमारीने मठात साध्य होईल.
९. अशी स्मृती होणे आपल्या हिताचे होईल.
१०. हे दूताच्या सुज्ञतेवर अवलंबून राहील.
११. दोष आपल्याला स्वीकारावा लागेल.
१२. अल्पावधीत तुम्हाला मला येथे आणावे लागेल.
१३. तुला हे कार्य साहवेल का?
१४. सार्‍या साम्राज्यावर महान संकट कोसळेल.
१५. परचक्र येईल.
१६. सम्राटांना जीवितास मुकावे लागेल.
१७. तुझ्या सर्वांगावरील त्वचा सोलली जाईल.
१८. हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना?

सकर्मक धातूचे एकच रूप सापडले :
१. आपले शब्द अयोग्य आहेत, असे कोण म्हणेल?

जी. ए. कुलकर्णी जी बोली लिखाणात वापरत त्यात एकाक्षरी-धातू-ईल, अनेकाक्षरी-धातू-एल (अपवाद : राहील) असा नियम दिसतो, पण अकर्मक/सकर्मक भेद दिसत नाही.

पु. ल. देशपांडे यांच्या "तुझे आहे तुजपाशी" नाटकाची संहिता चाळता-चाळता ही उदाहरणे सापडली.
हे काय वाटेल त्याचे काम आहे का? (अकर्मक)
आणि
मामला काय आहे कुणी सांगेल का?(सकर्मक)
अशी रूपे सापडली.
(वर श्री. यनावाला यांनी "सांगील"चे ही उदाहरण दिलेलेच आहे.)
त्यामुळे आधुनिक लिखित बोलीतही एल-ईल विकल्प आहे असे दिसते.

शिवाय वर ऋषिकेश यांनी आपल्या घरगुती बोलीत अनेकाक्षरी धातूंना काही बाबतीत -ईल/-एल यांचा वैकल्पिक उपयोग सांगितला आहे. माझ्या घरगुती बोलीत साधारणपणे सर्व अनेकाक्षरी धातूंना -एल रूपेच वापरतो, पण -ईल रूपे ऐकल्यास काही विचित्र वाटत नाही - म्हणजे एल-ईल-विकल्प मानतो. (एकाक्षरी आणि हकारान्त धातूंची -ईल रूपेच वापरतो. सकारान्त धातूंना -एल रूपच वापरतो.)

अनेक धातूंना तोंडी बोलीतही एल-ईल विकल्प आहे, असे दिसते.

भावे प्रयोग?

बाकी चर्चा छानच झाली आहे पण

"व्याकलन (ले.सतीश रावले) या लेखावरील प्रतिसादात श्री. वाचक्नवी लिहितात:
तो पुस्तक वाचेल-हा भावे प्रयोग
भावे प्रयोग हे खरे. पण

यात "तो पुस्तक वाचेल" हा भावे प्रयोग कसा हे कळले नाही. पुरुष/वचन बदलून पाहिले असता "मी पुस्तक वाचेन, तू वाचशील, ते वाचतील" इ. वरून हा कर्तरी प्रयोग वाटतो. भावे प्रयोग ("त्याने पुस्तकाला वाचले") फक्त भूतकाळातच असतो की काय असे वाटते.
"वैयाकरणीं"नी भावे प्रयोगावर तपशीलवार प्रकाश टाकावा ही वि.

- दिगम्भा

भावे प्रयोग नव्हे

असे वाचक्नवी यांनी मूळ दुव्यावर दाखवलेच आहे. सकर्मक/अकर्मकाची चर्चा करून यनावाला यांनीही हेच दाखवलेले आहे.

येथे मूळ प्रस्तावातला नर्मविनोद एका म्हणीवरून आहे. आमच्या घरी ती म्हण "वाचेल तो वाचेल" अशी म्हटली जाते, काही ठिकाणी "वाचील तो वाचेल" अशी म्हटली जात असावी. (अर्थ : वाचन करेल/करील तो संकटातून सुटेल.)

वाचन करणे या अर्थीचा "वाच" धातू सकर्मक आहे. संकटातून सुटणे या अर्थीचा "वाच" (जुन्या मराठीत "वांच") धातू अकर्मक आहे. वाचन करणे या अर्थी "वाच" धातू कर्तरी किंवा कर्मणी प्रयोगातच वापरात दिसतो. त्याचा भावे प्रयोग मराठीत शक्यच नाही.

त्या अनुषंगाने सकर्मक/अकर्मक रूपांबद्दल मोठी रोचक चर्चा सुरू झालेली आहे.

(तुमची चाचणी आणि कर्तरी असल्याबद्दल निष्कर्ष ठीकच आहे, हे सांगणे नलगे.)

चूक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. दिगम्भा यांनी माझी चूक योग्यप्रकारे दाखवली. धन्यवाद. श्री. धनंजय यांनी माझ्यासाठी सारवसारव केली आहे. पण चूक ती चूकच. मग ती कोणत्याही कारणाने का होईना. मी पूर्ण विचारांती विधान करायला हवे होते.

आणखी उदाहरणे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

म्हणउनी स्वधर्म जो सांडील| तयाते काळू दंडील|
चोरू म्हणूनि हरील| सर्वस्व तयाचे |..(ज्ञानेश्वरी अ.३, ओवी ११२)
....

.... इथे दंडणे हा नामधातू आहे.(दंड करणे) म्हणून क्रियापद सकर्मक आहे.
सकर्मक क्रियापदाच्या भविष्यकाळ प्र्.पु.ए.व. आणि तृ.पु. ए.व. या रूपांना ईन/ईल यां व्यतिरिक्त अन्य प्रत्यय लावल्याचे मला जुन्या लेखनात आढळत नाही.

दासबोधातील उदाहरणे

सापडणे फरच कठिण.
दासबोध शोधता पुढील उदाहरणे विशेष सापडलीत :
सद्गुरुस्वरूप तें संत । आणी देवांस मांडेल कल्पांत । तेथें कैचें उरेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥ ५.३.४१
जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत । जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ ६.१.१६
ये गोष्टीस करी अनुमान । तो शिघ्रचि पावेल पतन । मिथ्या वदेल त्यास आण । उपासनेची ॥ ६.९.३०
ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाणपण । सर्वचि नाही कवण । जाणेल गा ॥ ७.५.६
ऐका प्रचितीचीं लक्षणें । प्रचित पाहेल तें शाहाणें । येर वेडे दैन्यवाणे । प्रचितीविन ॥ १०.८.१ (की "ते शाहाणे"??)
निर्विकारी आणि विकारी । येक म्हणेल तो भिकारी । विचाराची होते वारी । देखतदेखतां ॥ ११.४.९
याकारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखतां समस्त । वोढोनि येती ॥ १३.१०.२९
जाणत्याचे कासेसि लागावें । जाणत्याचें औषध घ्यावें । जाणतां सांगेल तें करावें । पथ्य आधीं ॥ १८.२.७
जाणत्याचे पेंच जाणावे । जाणत्याचे पीळ उकलावे । जाणता राखेल तसे राखावे । लोक राजी ॥ १८.२.११
उपासनेचें सेवटीं । देवां भक्तां अखंड भेटी । अनुभवी जाणेल गोष्टी । प्रत्ययाची ॥ १८.२.३०
पाहातां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥ १९.४.२१
रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ । परलोकींच निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २०.३.२९
(वरील उदाहरणांत सकर्मक -एल निळ्या रंगात दाखवलेले आहेत. अकर्मक खूपच सापडतात, त्यातील काही वर लाल रंगात दिसत आहेत.)

दासबोधात अकर्मक व्यंजनान्त धातूचा "ईल"-प्रयोग सापडला नाही. स्वरान्त अकर्मक आणि सकर्मक -ईल सापडले, व्यंजनान्त सकर्मक -ईल सापडले.

 
^ वर