'व्याकलन - व्याकरणाचे आकलन'

आरंभः

'देणार्‍याने देत जावे

घेणार्‍याने घेत जावे

घेता, घेता अखेर घेणार्‍याने

देणार्‍याचे हात हि घ्यावे.'

इथं 'हात घ्यावेत' म्हणजे 'चांगले गुण' घ्यावेत, हे आपण जाणता. पण किती दिवस, वर्षे आपण घेतच राहणार? आपल्याकडेही काही 'देण्यासारखे' चांगले नक्कीच आहे. अहो मंडळी, मी आपल्याशी 'भाषे' बद्दल, 'भाषेच्या व्याकरणा' बद्दल बोलतोय.

'व्याकरण म्हणजे काय?' हे आपल्याला इंग्रजी भाषेने/ भाषिकांनी शिकविले. भले सुरवातीला त्यामागचा 'दृष्टिकोन' वेगळा होता. पण 'भाषेच्या सांगाड्याकडे पहाण्याचा, समजून घेण्याच्या' दृष्टिकोनामुळेच मराठी भाषेचे व्याकरण मांडले गेले, रचत गेले.

भाषेच्या 'व्याकरणरूपी सांगाड्या' च्या आकलनाला इथपासून आपण 'व्याकलन' म्हणूया.

मानसिकता:

काळ बदलतोय, नव्हे तो बदलत असतो. बदलत्या परिस्थितीनुसार विचार करण्याची पद्धत बदलत जाते व त्यामुळे त्यानुसार आपली भाषाही बदलत जात आहे. भाषा बदलण्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्यातील ढोबळमानाने तीन प्रकार खालील प्रमाणे.

१. नवीन शब्दांचा वापर

२. नवीन उच्चार

३ नवीन वाक्यरचना

यातील पहिले दोन प्रकार आपण सवयीने, प्रयत्नाने एखादा विद्यार्थी वा भाषिक आत्मसात करू शकतो. पण शेवटचा प्रकार आत्मसात करण्यासाठी योग्य शिक्षणाचीच गरज असते. आयुष्यातील प्रसंग वा परिस्थिती जेव्हा किचकट व गुंतागुंतीची होत जाते, तेंव्हा वाक्यरचना 'नेमकं ते सांगणारी', 'हवं ते / नको ते झाकणारी', 'पाहिजे त्या गोष्टीकडे सहजपणे अंगुलिनिर्देश करणारी' अशी असावी लागते. व हे सुद्धा कमीत कमी शब्दांत, मोजक्याच वाक्यांत जमवावे लागते.

किचकट व गुंतागुंत असून हि विचारांचा डोलारा तोलून धरण्यासाठी, भाषेचा व्याकरणरूपी 'सांगाडा' प्रमाणबद्ध असावयास हवा. बदलत्या काळानुसार हा सांगाडा ही बदलतो. ज्यांना वाक्यरचनेतील व्याकरणरूपी 'सांगाडा' व्यवस्थित उमजतो, ती मंडळी आयुष्यातील अनेक प्रसंगात भाषेच्या सफाईदार वापराने इतरांच्या पुढे जातात, इतरांवर कुरघोडी करू शकतात तसेच अडचणीच्या वेळी वेळ मारून स्वतःची सुटका करून घेऊ शकतात.

इंग्रजी भाषेतील व्याकलनामध्ये हे चापल्य आहे, म्हणूनच इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढतंय.

म्हणूनच मराठी भाषेच्या सफाईदार वापर होण्यासाठी 'व्याकलनात' सुधारणा हवी. व त्यासाठी 'व्याकरणाची मांडणी' व्यवस्थित हवी. सध्यातरी आपण व्याकरणाच्या पुस्तकातील अक्षरांनाच 'व्याकरण' म्हणतो. ते 'व्याकरण' नसून ती 'व्याकरणाची मांडणी' आहे. मुळात 'भाषेचे व्याकरण' हे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये दडलेले असते. ते अदृश्य असते.

स्पष्टीकरणः

मराठीच्या प्रचलित व्याकरणाची मांडणी खालील प्रमाणे:

वाक्याच्या 'प्रयोगा'चे तीन प्रकारः-

प्रयोग --------- मराठी ----- इंग्रजी

कर्तरी --------- तो पुस्तक वाचतो. -------- HE READS A BOOK.

कर्मणी ----------- त्याने पुस्तक वाचले

भावे --------- त्याने इतिहासाचे पुस्तक वाचले

परंतु हे सारं झालं जुनं! ह्या मांडणीत 'कर्तरी' प्रयोगा मध्ये काळाचे नियम पाळले जात नाही. व म्हणून त्यास 'फाटा' द्यावयास हवा. तसेच इंग्रजी च्या grammar च्या मांडणीचा ही नव्या मांडणीत रीतसर सामावेश करण्यास हवा. सध्या च्या व्याकरणाच्या मांडणीत इंग्रजीच्या passive voice ला कसेतरी घुसडवले आहे.

आता, नवी 'व्याकरणाची मांडणी' अशी असू शकते त्याचा एक पैलू आपल्यासमोर मांडत आहे.-

उदाहरणः

वाक्याच्या 'प्रयोगा'चे चार भाग पडतात-

--------- उल्लेख ------- रचना

थेट ---- थेट उल्लेख ---- थेट रचना (Direct Speech)
अप्रत्यक्ष - --- अप्रत्यक्ष उल्लेख ---- अप्रत्यक्ष रचना (Indirect Speech)

त्यांचे प्रत्येकी दोन प्रकार पुढील प्रमाणे-

कर्म प्रधान - ज्या वाक्यात क्रियेला महत्त्व असते ते 'कर्मप्रधान वाक्य'.

भाव प्रधान - ज्या वाक्यात क्रियेच्या वैशिष्ट्यावर भर असतो ते 'भावप्रधान वाक्य'.

थेट उल्लेख -

प्रयोग ---- मराठी ---- इंग्रजी
कर्म प्रधान ---- त्याने पुस्तक वाचले ---- HE HAS READ A BOOK
भाव प्रधान ---- त्याने इतिहासाचे पुस्तक वाचले ---- HE HAS READ A HISTORY BOOK

अप्रत्यक्ष उल्लेख -

प्रयोग ---- मराठी ---- इंग्रजी
कर्म प्रधान ---- त्याच्याकडून पुस्तक वाचले गेले. ---- A BOOK HAS BEEN READ BY HIM
भाव प्रधान ---- त्याच्याकडून इतिहासाचे पुस्तक वाचले गेले. ---- A HISTORY BOOK HAS BEEN READ BY HIM

इंग्रजी भाषेत फक्त कृतीला महत्त्व दिले जाते. भाव व्यक्त करणार्‍या व्याकरणाच्या मांडणीकडे लक्ष दिले गेलेले नाही. जर वर दाखविलेल्या पद्धतीचा अवलंब केला तर मराठी बरोबरच इंग्रजीचे व्याकलन सोपे होईल व एकांगी दृष्टिकोनही टाळला जाईल.

समारोपः

व्यवहारातील मराठी भाषा बदलत आहे. पण शालेय पुस्तकातील 'व्याकरणाच्या मांडणीत' काळानुसार बदल झालेला नाही. महत्त्वाचा म्हणजे त्यात 'फाफट-पसारा' हि बराच आहे. ह्या अनावश्यक पसार्‍याने विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयीची अनास्था वाढीस लागते. ह्यात सुधारणा व्हावी या हेतूने हे पाऊल उचलले आहे. जर अशाच प्रकारचा एखादा बदल /व्याकरणाच्या मांडणीतील बदल आपल्याला माहीत असल्यास उदाहरणा सहित स्पष्टीकरण देवून सुचवावा हि विनंती.
------------------------------------------
टिपः फॉरमॅट करून ही इथ जसं हवं तसं दिसत नाहि आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

शब्दांची नशा >>

करण्या साठी त्यातील शब्दोहोल चे केमीकल अन्यालिसी करणे मोजक्या लोकांना कीक् देऊ शकते.. पण.. मेज्योरिटीला नुस्ते सेवन करणे पुरेसे आहे. व्याकरणाचा अभ्यास बंद केल्याने भाषेला मरण येणार नाही.
व्याकरण हे भाषेमुळे तयार होते.
व्याकरणा मुळे भाषा तयार होत नाहीत.
इंद्र्धनु आहे म्हणून सप्तरंगांना किंमत आहे. सप्तरंग कळल्या नंतर इंद्रधनुचे सौंदर्य "तानापीहीअनिजा" या लेबला मुळे फिके होऊ न देता कुठेलेही नांव न देता त्याचा मुळ आनंद घेता येतो का ? ज्याचे त्याने तपासून पहा.

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

सहमत

व्याकरणाचा अभ्यास बंद केल्याने भाषेला मरण येणार नाही.
व्याकरण हे भाषेमुळे तयार होते.
व्याकरणा मुळे भाषा तयार होत नाहीत.

सहमत आहे....!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

?

>>व्याकरणाचा अभ्यास बंद केल्याने भाषेला मरण येणार नाही.<< हे वाक्य व्याकरणासंबंधी गैरसमजावर आधारले गेले आहे.
व्याकरण नसते तर काय होईल? प्रत्येकजण भाषेत नवेनवे प्रयोग करायला लागेल. समजा प्रत्येक मराठी माणसाने रोज एका नवीन प्रकारे बोललेले वाक्य बोलायला सुरुवात केली, तर तो वर्षभरात ३६५ नव्या रचना करेल. जर मराठीत बोलणारी एकूण माणसे ३ कोटी, तर एका वर्षात मराठी भाषेत १० अब्ज ९५ कोटी नव्या वाक्यरचना होतील. म्हणजे मराठी या नावाची भाषा जिवंतच राहणार नाही.

भाषेच्या सुरुवातीच्या काळात व्याकरणाची गरज नसते. पण जसजशी भाषा अधिकाधिक लोक बोलू लागतात तसतसे तिचे व्याकरण बनायला लागते आणि स्थिरावते. अगदी रानटी लोकांच्या भाषेलासुद्धा व्याकरण हे असतेच. तसे नसते तर त्या भाषा टिकल्याच नसत्या. आपल्याला त्या भाषा शिकायच्या म्हणजे त्यांचे व्याकरण शिकणे आलेच. मातृभाषेचे व्याकरण मुद्दाम शिकावे लागत नाही कारण जन्मल्यापासून प्रत्येकाच्या कानावर व्याकरणशुद्ध बोलणे पडतच असते, त्यामुळे मूल मोठे होताहोताच व्याकरणाचे नियम पाळूनच बोलते.--वाचक्‍नवी

?

>>व्याकरणाचा अभ्यास बंद केल्याने भाषेला मरण येणार नाही.<< हे वाक्य व्याकरणासंबंधी गैरसमजावर आधारले गेले आहे.
व्याकरण नसते तर काय होईल? प्रत्येकजण भाषेत नवेनवे प्रयोग करायला लागेल. समजा प्रत्येक मराठी माणसाने रोज एका नवीन प्रकारे बोललेले वाक्य बोलायला सुरुवात केली, तर तो वर्षभरात ३६५ नव्या रचना करेल. जर मराठीत बोलणारी एकूण माणसे ३ कोटी, तर एका वर्षात मराठी भाषेत १० अब्ज ९५ कोटी नव्या वाक्यरचना होतील. म्हणजे मराठी या नावाची भाषा जिवंतच राहणार नाही.

भाषेच्या सुरुवातीच्या काळात व्याकरणाची गरज नसते. पण जसजशी भाषा अधिकाधिक लोक बोलू लागतात तसतसे तिचे व्याकरण बनायला लागते आणि स्थिरावते. अगदी रानटी लोकांच्या भाषेलासुद्धा व्याकरण हे असतेच. तसे नसते तर त्या भाषा टिकल्याच नसत्या. आपल्याला त्या भाषा शिकायच्या म्हणजे त्यांचे व्याकरण शिकणे आलेच. मातृभाषेचे व्याकरण मुद्दाम शिकावे लागत नाही कारण जन्मल्यापासून प्रत्येकाच्या कानावर व्याकरणशुद्ध बोलणे पडतच असते, त्यामुळे मूल मोठे होताहोताच व्याकरणाचे नियम पाळूनच बोलते.--वाचक्‍नवी

सहमत

व्याकरणाचा अभ्यास बंद केल्याने भाषेला मरण येणार नाही.
हे तर खरेच आहे.
तानापिनिहिजा उपमेबद्दल गंमत वाटली. हेही खरेच आहे की प्रकाशकिरणांचा अभ्यास बंद केला तर इंद्रधनुष्य बंद होणार नाही.

त्याचप्रमाणे :
अर्थशास्त्राचा अभ्यास बंद केल्याने व्यापार बंद पडणार नाही.
मानसशास्त्राचा अभ्यास बंद केल्याने मन बंद पडणार नाही.

शरीरशास्त्राचा अभ्यास बंद केल्याने शरीर बंद पडणार नाही.
शरीरशास्त्र हे शरीरामुळे तयार होते. शरीरशास्त्रामुळे शरीर तयार होत नाही.

(तरी माझा स्वतःचा उपचार करणार्‍या डॉक्टरांनी शरीरशास्त्र शिकावे असे, का म्हणून कोणास ठाऊक, मला वाटते. म्हणजे माझी तशी अन्य डॉक्टरांवर सक्ती नाही. शरीरशास्त्र नावडणार्‍या लोकांच्या डॉक्टरांनी शरीरशास्त्र शिकले नाही, तरी माझी काही हरकत नाही.)

+१

सध्या कसलाच अभ्यास करण्याची गरज नाही अशा मतप्रवाहाची लाट आलेली दिसते आहे.
संस्कृत नको, व्याकरण नको.
तुमच्या प्रतिसादाला धरूनच पुढे असेही म्हणता येईल..
गाण्याचा तरी का अभ्यास करावा? तोंड उघडले की गळ्यातून सूर आपसूक येतातच, मग गाणे कसे गायचे ते का शिकावे बरे?
गाण्याचे व्याकरण (राग वगैरे) मागाहून तयार झाले. मग ते कशाला शिकायचे? राग न शिकल्याने गाण्याला मरण थोडेच येणार आहे?

धन्यवाद!

श्री. धनंजय आणि चित्राताईंनी इतक्या कमी शब्दात व्याकरणाचे महत्त्व सांगितले याला माझी मनापासून दाद.--वाचक्‍नवी

भाषा

माझ्या मते व्याकरण किंवा शाषा आपण शाळेत जायच्या आधी म्हणजे बोलायला लागले की शिकायला सुरुवात करतो. मग ते मोठ्यांच अनुकरण असतं किंवा जाणीवपूर्वक आपल्या चुका(आजूबाजूचे मोठे ज्याला चुका समजतात त्या) सुधारल्या जातात.

भाषेचे कंगोरे आपण शाळेत शिकतो. भविष्यकाळ काय आपण शाळेत शिकल्याशिवाय वापरत नाही? तसेच मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य वगैरे आपण वापरत असतोच फक्त त्याला ते आणि ह्याला हे म्हणायचं हे पद्धतशीर शिकवलं जातं. 'आणि' ऐवजी 'व'वापरला तरी चालतो हे शाळेत किंवा स्वयंवाचनातून निर्माण झालेल्या शंकांतून कळतं.

भाषा घरात शिकतो शाळेत नाही. त्यामुळे भाषेची गोडी निर्माण होण्यासाठी भाषा घरात बोलली जाणे आवश्यक आहे. शाळेत व्याकरणात बदल घडवण्याचा प्रपंच करण्याची कारण नाही.

अभिजित...

+१

माझ्या मते व्याकरण किंवा भाषा आपण शाळेत जायच्या आधी म्हणजे बोलायला लागले की शिकायला सुरुवात करतो.
+१. अभिजित यांचे एक वैज्ञानिक निरीक्षण. व्याकरण-महाभाष्यामध्ये पतंजलीही हेच म्हणतात.

स्वभाषा येण्यासाठी शालेय व्याकरणाची गरज नाही.

तुलना.

तुलना.

सुधारणा करावयाची असल्यास केवळ आंग्लभाषेशी आंधळी तुलना करणे उपयुक्त नाही. तुलना करणे क्रमप्राप्तच होत असल्यास तुलना करण्यासाठी जगात इतरही भाषा आहेत.

मुदलांत प्रत्येक भाषेचे स्वत:चे असे व्यक्तिमत्त्व असते. प्रत्येक भाषेचा विकास हा वेगवेगळा होत आलेला आहे. विविध भाषांना स्वतःची वेगळी अशी सौंदर्यस्थळे असतात. त्यामुळे दुस-या भाषेशी तुलना करणे अस्वाभाविक आणि अस्वीकारार्ह ठरावे. तसेच दुस-या भाषेशी तुलना करतांना आपण आपल्या भाषांना न्यूनगंडात्मक दृष्टिकोनांतून तर बघत नाही आहोत ना, ह्याचाही विचार करणे आवश्यक आहे.

हैयो हैयैयो!

व्याकरणाचा उपयोग

व्याकरण हे भाषेचे शास्त्र (विज्ञान या अर्थी) आहे. प्रौढ वयांत दुसरी भाषा शिकतांना व्याकरणाचा उपयोग होतो. स्वत:च्या भाषेचे व्याकरण नीट माहीत असेल तर आपली भाषा व दुसरी भाषा यांच्या व्याकरणांतील साम्य व भेदामुळे दुसर्‍या भाषेची मांडणी समजणे सोपे जाते.

कळले नाही

मला तुमचा मुद्दा नीटसा कळला नाही.

'व्याकरण म्हणजे काय?' हे आपल्याला इंग्रजी भाषेने/ भाषिकांनी शिकविले.
इंग्रजी भाषेत फक्त कृतीला महत्त्व दिले जाते. भाव व्यक्त करणार्‍या व्याकरणाच्या मांडणीकडे लक्ष दिले गेलेले नाही.

यांतले पहिले वाक्य पटले नाही, व दुसर्‍या वाक्यात आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही.

कर्मप्रधान व भावप्रधान अशी रचना रोचक वाटली, पण आपल्या उदाहरणांतून दोन्हींतील फरक कळला नाही.

राधिका

मुद्दा क्रमांक १ ला उत्तर

मुद्दा क्रमांक १)'व्याकरण म्हणजे काय?' हे आपल्याला इंग्रजी भाषेने/ भाषिकांनी शिकविले.

स्पष्टीकरण :

माझ्या वाचनात 'मराठीचे व्याकरण' लेखिका - डॉ. लीला गोविलकर यांच मेहता पब्लिशिंग द्वारा (सु.चौथी आवृत्ती : डिसेंबर,२००६) प्रकाशित पुस्तक आलेले आहे. त्या वाचनावरूनच हे मत तयार झालेले आहे.

प्रस्तुत लेखिकेची ओळखः माजी मराठी विभाग प्रमुख, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर

आपल्या शंका निरसनासाठी या पुस्तकातील काही संदर्भ पुढीलप्रमाणे.-

पान क्र.-१०>

आपला राज्यकारभार सुरळीत चालावा, या हेतूने हिंदी लोकांना पाश्चात्य ज्ञान देण्यासाठी ब्रिटिशांनी शाळा काढल्या. हे ज्ञान ज्या देशी भाषांतून द्यावयाचे, त्या देशी भाषांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा, यासाठी अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तके लिहिली जाणे आवश्यक होते. हा प्रयत्न 'हैंदशाळा मंडळी' (१८२२) या संस्थेमार्फत सरकारने केला. मराठीला आवश्यक असलेले असे शालेय पातळीवरील व्याकरण जॉर्ज जार्विस याने चार पंडितांकडून १८२४ मध्ये लिहवून घेतले. हे चार पंडित म्हणजे जगन्नाथशास्त्री क्रमवंत, रामचंद्रशास्त्री जान्हवेकर, बाळशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके हे होत. त्यापैकी जान्हवेकरांनी, वेगवेगळ्या कामांत गुंतल्याने या कामात लक्ष घातले नाही. या पंडितत्रयांनी मराठीच्या विद्यार्थिवर्गासाठी, मराठीत लिहिलेले हे पहिले व्याकरण होय.

पान क्र.११ ते पान क्र.१३>

याचा अर्थ, मराठीचे व्याकरण इंग्रजांच्या आणि इंग्रजी व्याकरणाच्या प्रभावी सहवासातून प्रथम रचले गेले आणि इंग्रजांच्या अनुज्ञेने-आदेशाने संस्कृतपंडितांनी मराठीला व्याकरणाच्या 'आळ्यात' आणण्याचा प्रयत्न केला.

१८२४ च्या 'महाराष्ट्राच्या भाषेच्या व्याकरणा' वर संस्कृत व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणांचा परिणाम ठसठशीतपणे उमटलेला दिसतो. पुढची बहुसंख्य मराठी व्याकरणे या परिणामातून सुटलेली नाहीत.

१८२४ मध्ये रचलेले पंडितत्रयांचे व्याकरण १९५४ साली छापले गेले. या व्याकरणाचा फारसा परिणाम पुढिल व्याकरणांवर नाही. याच तीन पंडितांपैकी गंगाधरशास्त्री फडकेंनी १९३६ साली 'महाराष्ट्र भाशेचे व्याकरण' लिहिले. मराठीतील हे पहिले मुद्रित व्याकरण होय.

मराठी भाषा ही विविध रूपे धारण करीत आहे. त्या विविधतेपैकी कोणती तरी एक मध्यवर्ती प्रमुख मानून व्याकरण लिहीले पाहिजे, ही जाणीव फडके यांना आहे. 'पूणे प्रांताची भाषा प्रमुख धरून आपण मराठीबद्दलचे नियम देत आहोत.', अशी त्यांनी दिलेली कबुली याच भाषिक जाणिवेची निदर्शक आहे.

शब्द, प्रत्यय आणि वाक्यरचना यांमधील विविधतेमधून मराठीचे एकच एक रूप आदर्श म्हणून लोकांसमोर ठेवावे, या हेतूने १८३६ मध्ये आणखी एक मराठी व्याकरण लिहिले गेले, ते म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकरांचे 'मराठी भाषेचे व्याकरण' हे होय.

फडकेंच्या व्याकरणाचा प्रचार व प्रसार अधिक असावा. कारण १८५० पर्यंत फडकेंच्या व्याकरणाच्या चार आवृत्त्या निघाल्या, तर दादोबांच्या व्याकरणाच्या मात्र केवळ दोनच आवृत्त्या निघालेल्या दिसतात.

दादोबांच्या नावाचा व त्यांच्या व्याकरणाचा ( व्याकरणाच्या मांडणीचा) इतका प्रभाव तेव्हाच्या विद्या खात्यावर होता, की त्यांच्याकडून त्यांच्या प्रौढांसाठी असलेल्या व्याकरणाची छोटी शालेय आवृत्ती या शिक्षण खात्याने करवून घेतली. त्यांच्या या 'लघुव्याकरणा'च्याही, त्यांच्या हयातीत बारा आवृत्त्या निघाल्या. मोठ्यांमध्ये/ विचारवंतामध्ये व छोट्यांमध्ये/ शालेय पातळीवर दादोबांनी आपले व्याकरण किती लोकमान्य केले होते, ते त्यांच्या आवृत्त्यांच्या संख्येवरून कळून येते.

पान क्र.२-

मराठीच्या व्याकरणांना लेखनासाठी इंग्रजी व्याकरणांशिवाय दुसरा आदर्श नसल्याने ही व्याकरणे इंग्रजी (च्या) धर्तीवर रचली गेली. हे मराठीचे व्याकरण कसे लिहावे, याचा मराठीत तरी आदर्श नव्हता. 'मराठी भाषेचे पाणिनी' असे ज्यांना म्हटले जाते, त्या दादोबा पांडुरंग तर्खडकरांच्या व्याकरणाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे :

"या देशांत अद्यापि व्याकरण म्हणजे काय वस्तु आहे, हें बहुत जनांस माहीत नाहीं, व त्यांत आश्चर्य हें आहे, कीं त्यांत थोर थोर व्युत्पन्न (विद्वान) व पुराणिक असतात, तेंही, तें समजून घेण्याविषयीं, तादृश श्रम घेत नाहींत." (दादोबा - प्रस्तावना पृ.७)

संकेतस्थळावरील चर्चा ह्या काहींसाठी निव्वळ मनोरंजनाच माध्यम तर काहीसांठी आपल्या सुशिक्षितपणाची रग जिरवण्यासाठी असतात. चर्चेमद्ध्ये वैचारीक मुद्द्यावर 'एखाद्याच्या (प्रामाणिकपणे विचारलेल्या) शंकेचं कसं निरसन करावं?' हे अजून पर्यंत तरी मला ज्ञात नव्हतं. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. म्हणून, मुद्दा पटल्यास, शंकेच निरसन झाल्यास तसे कळवावे, कारण त्यानंतरच दुसर्‍या मुद्द्याकडे वळता येईल.

धन्यवाद

माझ्या शंकेचे आवर्जून निरसन केल्याबद्दल धन्यवाद.

आपण उद्धृत केलेले उतारे पाहता, 'मराठी व्याकरणाची जी सध्याची मांडणी आहे, ती आपल्याला इंग्रजांनी शिकवली आहे' अशी वाक्यरचना केली असती, तर ती जास्त योग्य वाटली असती. व्याकरण म्हणजे काय, हे आपल्याला आधीपासून माहित होते. पाणिनी, पतंजली, भट्टोजी दीक्षित, कात्यायन, भर्तृहरी अशा अनेक प्राचीन वैयाकरणांची नावे देता येतील. अगदी व्याकरण या शब्दाची वि+ आ+ कृ ही व्युत्पत्तीही फार जुनी आहे. तेव्हा

'व्याकरण म्हणजे काय?' हे आपल्याला इंग्रजी भाषेने/ भाषिकांनी शिकविले.

हे विधान अयोग्य आहे असे मी म्हणेन. तसेही आपल्या वरील प्रतिसादावरून आपल्याला तसे म्हणायचे नसून 'मराठी व्याकरणाची जी सध्याची मांडणी आहे, ती आपल्याला इंग्रजांनी शिकवली आहे' असे म्हणायचे असल्याचे दिसते आहे.

असो, इतर शंकाचेही निरसन आपण करालच.

राधिका

मुद्दा क्र.-२ चे उत्तर

विधानातील काही शब्दांच्या अभावामुळे विचारातील 'भाव' बदलला. हे असं कसं झालं माझ्या हातून? पण जे झालं ते छानच झालं!

पहिला मुद्दा आपल्याला पटला आणि त्याच बरोबर आपण माझ्या विधानातील आपल्या द्दृष्टीकोनातून विधान कसं असायला हवं तेहि सांगितलं त्याबद्दल आभार!

मनोगतः

पहिल्यांदा मला माझी चूक आपण दाखवून दिली याचा मला किंचितसा राग आला. मी मनात म्हटलं कि लेख लिहून मीच सांगतोय कि- ''आपण व्याकरणाच्या पुस्तकातील अक्षरांनाच 'व्याकरण' म्हणतो. ते 'व्याकरण' नसून ती 'व्याकरणाची मांडणी' आहे. मुळात 'भाषेचे व्याकरण' हे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये दडलेले असते." आणि ह्या बाईसाहेब मलाच धडे देताहेत. ह्यांच्या विधानात सुद्धा अनेक चूका आहेतच कि, पण त्या चूका वेगळ्या पद्धतीच्या आहेत. पण, आपले विचार ह्यांनाच बरोबर समजले आहेत. तेव्हा चर्चा 'पुढे सरकणं' गरजेचे आहे.

मुद्दा क्र.-२

कर्मप्रधान व भावप्रधान अशी रचना रोचक वाटली, पण आपल्या उदाहरणांतून दोन्हींतील फरक कळला नाही.

उदाहरणा सहीत स्पष्टीकरणः

वाक्याच्या 'प्रयोगा'चे चार भाग पडतात-

------------------------------- उल्लेख ----------------------- रचना

थेट ------------------------थेट उल्लेख --------------------थेट रचना (Direct Speech)
अप्रत्यक्ष-------------------अप्रत्यक्ष उल्लेख ------------- अप्रत्यक्ष रचना (Indirect Speech)

त्यांचे प्रत्येकी दोन प्रकार पुढील प्रमाणे-

कर्म प्रधान - ज्या वाक्यात क्रियेला महत्त्व असते, कृतिच्या सांगण्यावर भर असतो - ते 'कर्मप्रधान वाक्य'.

भाव प्रधान - ज्या वाक्यात क्रियेच्या वैशिष्ट्यावर भर असतो, जिथे कृतिकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते ते 'भावप्रधान वाक्य'.

थेट उल्लेख -

प्रयोग -------------------------------- उदाहरण-----------------------------वाक्यात काय दडलंय.
कर्म प्रधान --'व्याकरण म्हणजे काय?, हे आपल्याला इंग्रजांनी शिकविले.'----'इंग्रजांची विचार करण्याची पद्धत काय भन्नाट होती'

भाव प्रधान -- 'मराठी व्याकरणाची जी सध्याची मांडणी आहे, ती आपल्याला इंग्रजांनी शिकवली आहे' ----'व्याकरण म्हणजे काय, हे

आम्हांलाआधीपासूनच माहित होते (हो).'

हे उदाहरण पटलं कां? तसं असेल तर द्या टाळी. 'टाळी द्या' म्हणजे प्रतिसादातून पोचपावती द्या.

ईच्छा:
जग बदलतंय! व्याकरणाच्या मांडणीत यासाठीच बदल/ सुधार व्हावा हि माझी ईच्छा आहे. भाषेचा संबंध 'राज्यकाराभाराशी' असतो. राज्य वा देश एकसंध ठेवायचा असेल तर सामान्य जनतेला भाषेच्या शिक्षणातूनच बांधावे लागेल. भाषेचे दोन भाग -लिपी व तिच्या व्याकरणाच्या मांडणी' हे काळानुसार सुधारले तर समाज म्हणून आपला विकास चांगला व उन्नतिशील होऊ शकेल.

टिपः

सध्या च्या व्याकरणाच्या मांडणीत इंग्रजीच्या passive voice ला कसेतरी घुसडवले आहे.

लेखात लिहिलेल्या वरिल विधानात सुधारणा करण्यात आलेली आहे. ती पुढिलप्रमाणे-

आतापर्यंत चालत आलेल्या व चालू असलेल्या मराठीच्या व्याकरणाच्या मांडणीत इंग्रजीच्या passive voice ला कसेतरी घुसडवले आहे.

नाही

अजूनही मला दोन्ही उदाहरणांतला फरक कळलेला नाही. दोन्ही उदाहरणांत परस्परविरोधी मते आहेत एवढेच कळले. क्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या प्रकारचे वैशिष्ट्य? साधारण एकाच अर्थाची आणि अधिक स्पष्ट उदाहरणे दिलीत तर समजायला सोपे पडेल.
राधिका

असंबद्ध मांडणी.

असंबद्ध मांडणी.

श्री. रावले,

एक नम्रपणे नमूद करूं इच्छितो, की अनेकदां आपली मांडणी निष्कारण असंबद्ध होते. आपल्याला काय म्हणावयाचे आहे ह्याचे आकलन अनेक वेळा होत नाही. कृपया सोपी उदाहरणे घेण्याचा (शक्यतो - जमल्यास) प्रयत्न करावा, जेणेकरून क्लैष्ट्य कमी होईल.

एकुणात आपण भाषा / लिपी ह्यांत स्वतःला हवे आहेत तसे बदल घडविण्याकरितां विशेष प्रयत्नशील आहा असे वाटते. आपणांस शुभेच्छा.

धन्यवाद.

हैयो हैयैयो!

मराठी व्याकरणकार

प्र.का.टा.आ.--वाचक्‍नवी

मराठी व्याकरणकार

मराठीतले सर्वात जुने व्याकरण १८१८ च्या बरेच अगोदर लिहिले गेले आणि ते संस्कृतात असून सूत्रबद्ध होते अशी माहिती १९१२ साली राजवाड्यांनी दिली आहे. त्या व्याकरणाची प्रत मद्रासच्या ओरिएन्टल लायब्ररीत आहे असे दामल्यांनी म्हटले आहे. त्यांनी ते पाहिले होते आणि "त्याचा मूलपाठ आणि मी केलेले त्याचे अध्ययन स्वतंत्रपणे प्रकाशित होत आहे" असे त्यांनी लिहिले होते. ते पुस्तक प्रकाशित झाले की नाही ते माहीत नाही.
याशिवाय फादर स्तीफन्स, विल्यम कॅरे, महंमद मखबा, स्टीव्हन्सन, बॅलेन्टाइन, बर्जेस, आस्खेडकर, नवलकर, अ.का. प्रियोळकर, दादोबा तर्खडकर, रामचंद्र भिकाजी जोशी, अप्पाजी काशीनाथ खेर, कृष्णशास्त्रिद्वय(कृष्णशास्त्री चिपळूणकर व कृष्णशास्त्री गोडबोले), गोपाळ गणेश आगरकर, रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, गणपतराव नवलकर, मंजरीकार(म्हणजे विष्णु लक्ष्मण काळे आणि रामचंद्र काशीनाथ हळबे), रावजीशास्त्री गोडबोले, बाळशास्त्री जांभेकर, गंगाधरशास्त्री टिळक, गोपाळ जिवाजी केळकर, वागळे, मोरो केशव दामले, मो.रा. वाळंबे, मो.स.मोने इ.इ. यांची मराठी व्याकरणे प्रसिद्ध आहेत. ही सर्व व्याकरणे वर उल्लेखिलेल्या पंडितत्रयांच्या व्याकरणाप्रमाणेच इंग्रजीच्या धर्तीवर नक्कीच लिहिली गेलेली नाहीत.
लीला गोविलकर, अरविंद मंगरूळ्कर आणि चंद्रहास जोशी यांनी लिहिलेली व्याकरणेही हल्‍लीहल्‍ली प्रकाशित झाली आहेत. याशिवाय, आणखीही बर्‍याच लेखकांची मराठी व्याकरणे आहेत.--वाचक्‍नवी

भावे?

>>त्याने इतिहासाचे पुस्तक वाचले<< हा भावे प्रयोग नाही. त्याने पुस्तकाला वाच(व)ले-हा भावे प्रयोग. भावे प्रयोगात क्रियापद ना कर्त्याप्रमाणे चालते ना कर्माप्रमाणे. भावे प्रयोगातल्या 'भाव' शब्दाला स्वभाव किंवा भावना असा अर्थ नाही.

>> ह्या मांडणीत 'कर्तरी' प्रयोगा मध्ये काळाचे नियम पाळले जात नाही. व म्हणून त्यास 'फाटा' द्यावयास हवा. तसेच इंग्रजी च्या grammar च्या मांडणीचा ही नव्या मांडणीत रीतसर सामावेश करण्यास हवा. सध्या च्या व्याकरणाच्या मांडणीत इंग्रजीच्या passive voice ला कसेतरी घुसडवले आहे.<< म्हणजे काय? कर्तरी प्रयोगात काळाचे नियम पाळले जात नाहीत?
पॅसिव्ह व्हॉइस संस्कृतमध्येपण होता, मराठीत आहेच. पण आधुनिक मराठीत त्याचा प्रयोग फक्त साध्या भूतकाळी वाक्यात दिसून येतो. संत वाङ्‌मयात आणि पोथ्यापुराणात त्याचा वर्तमान काळी वाक्यात सररास वापर होता. इंग्रजीतही परफेक्ट कन्टिन्युअस वाक्यांमध्ये हल्ली पॅसिव्ह व्हॉइस दिसत नाही, पण एकेकाळी तो होता. तिथली फ्यूचर कन्टिन्युअस काळातील वाक्येसुद्धा फक्त कर्तरीत असतात. भाषेत असे फरक कालमानाने होतात. इंग्रजीत परफेक्ट कन्डिशनल नावाचा काळ आहे, तो फक्त कर्मणीत असतो, त्याचा कर्तरी होतच नाही.
मराठीचे असे काही खास वैशिष्ट्य नाही. अशा गोष्टी अनेक भाषांमध्ये असू शकतात. --वाचक्‍नवी

व्याकरण का शिकावे?


अनन्तपारं किल शब्दशास्त्रम्‌ । स्वल्पं तथायुर्बहवश्च विघ्ना: ।
सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु । हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्‌ ॥


खरोखर(किल) व्याकरणशास्त्राला(शब्दशास्त्रम्‌) पारावार नाही(अनन्तपारम्‌). त्यातून(तथा) आपले आयुष्य (आयु:) फार थोडे(स्वल्पम्‌). आणि(च) शिवाय अभ्यासात विघ्ने फार(बहव: च विघ्ना:). म्हणून (तत:) हंस जसा (हंसो यथा) पाण्यापासून(अम्बुमध्यात्‌) दूध(क्षीर) वेगळे करतो तसे(इव) फालतू(फल्गु) गोष्टी दूर करून(अपास्य) व्याकरणातील उत्कृष्ट (सारम्‌) तेवढेच घ्यावे(ग्राह्यम्‌).

यद्यपि बहु नाधीषे तथापि पठ पुत्र व्याकरणम्‌ ।
स्वजन: श्वजनो मा भूत्सकलं शकलं सकृच्छकृत्‌ ॥


बाळा रे(पुत्र) फार(बहु) नाही (ना)शिकलास (अधीषे) तरी चालेल, पण पुरेसे व्याकरणाचे ज्ञान आधी करून घे(पठ व्याकरणम्‌).
साध्या 'स'चा 'श' असा उच्चार झाला तर स्वजनाचे(आप्तेष्ट) श्वजन(कुत्र्यांचा कळप), सकलचे(सगळा) शकल(तुकडा) आणि सकृत्‌चे(एकदा) शकृत्‌(मांस) होईल आणि अक्षम्य घोटाळे होतील.--वाचक्‍नवी

श्लोक/सुभाषित

आवडले@@

सुंदर!!

 
^ वर