स्वच्छ न्यायव्यवस्थेसाठी चार प्रश्‍न !

भारतीय वकील परिषदेने वकिलांना २६ प्रश्‍नांची प्रश्‍नावली पाठवली आहे. देशातील सहा लाख वकिलांच्या हातात ही प्रश्‍नावली गेली असेल. या प्रश्‍नावलीचे उत्तर प्रत्येक वकिलाकडून लवकरात लवकर परिषदेला अपेक्षित आहे. प्राप्‍त होणार्‍या माहितीवरून स्वच्छ न्यायालयीन कारभारासाठी काय करता येईल, याचा विचार परिषद करणार आहे. असे जरी असले, तरी परिषदेची प्रश्‍नपत्रिका पाहून विद्यमान न्यायाधीशवर्ग चिंताग्रस्त झाला आहे, असे प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे. न्यायव्यवस्थेबद्दल अद्यापही जनमानसात स्वच्छ प्रतिमा आहे, असे न्यायाधिशांना वाटत असल्याचा उल्लेख प्रसिद्धी माध्यमे करतात. ही जर एक बाजू धरली, तर काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधिशांची `हूज हू' स्वरूपाची माहिती देणारी नागपूर येथील एका वृद्ध वकिलाने लिहिलेली पुस्तिका ही दुसरी बाजू म्हणून पहाणे आवश्यक आहे. या पुस्तिकेत प्रत्येक न्यायाधीश कोणाचा कोण आहे आणि कोणता न्यायाधीश कोणाच्या वरदहस्तामुळे न्यायधीश बनला, याविषयीची माहिती या पुस्तिकेत आहे. नागपूरच्या वृद्ध वकिलाने ही पुस्तिका लिहिण्याचे कष्ट का घेतले असावेत, याविषयीचा अंदाज बांधायला मोठ्या चातुर्याची आवश्यकता नाही. विद्यमान सरन्यायाधीश श्री. के.जी. बालसुब्रमण्यम यांनी न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे विधान अलीकडेच केले आहे.

न्यायव्यवस्थेच्या शुद्धीकरणाचा प्रयत्‍न !
परिषदेने तयार केलेल्या २६ प्रश्‍नांमधील चार प्रश्‍न न्यायव्यवस्थेचे खरेखुरे स्वरूप उघड करणारे आहेत. राज्याच्या उच्च न्यायालयामधील न्यायदानाचा दर्जा व कारभार यांविषयी तुमचे मूल्यमापन काय; उच्च व सर्वोच्च न्यायालयांतील सध्याच्या नियुक्‍तीच्या पद्धतीविषयी तुम्हाला काय वाटते, ती निष्पक्षपाती असते का ?; ज्या न्यायालयामध्ये जवळचे नातेवाईक वकिली करतात, त्या न्यायालयामध्ये संबंधित न्यायाधिशांनी काम करण्याविषयी तुम्हाला काय वाटते ?; न्यायालयातील भ्रष्टाचाराविषयी तुमचे मत काय, तुमच्या राज्यात असा भ्रष्टाचार बोकाळला आहे का ?; या चार प्रश्‍नांची उत्तरे परिषदेला प्राप्‍त होणार आहेत. परिषदेने वकिलांना विचारलेले हे प्रश्‍न प्रत्यक्ष न्यायालयाची पायरी चढलेल्यांना विचारले, तरी खूप काही निष्पन्न होऊ शकते. या चारही प्रश्‍नांची उत्तरे त्या प्रश्‍नांतच आहेत, ती वेगळी तयार करायला नको. भ्रष्टाचार हाच या चार प्रश्‍नांच्या उत्तरांचा गाभा आहे. वकील परिषदेचा उद्देश साध्य झाला, तर जनतेला त्याचा लाभ होईल, हे नक्की !

Comments

ढासाळती न्यायव्यवस्था

पुण्यातील वसंत व्याखानमालेचे प्रमुख कार्यवाह डॉ. मंदार बेडेकर यांनी दि.१० मे २००८ रोजी पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड भास्करराव आव्हाड यांना भारतातील ढासाळणारी न्यायव्यवस्था या विषयावर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले होते. सदर व्याख्यान बॅ.वि.म.तारकुंडे स्मृति व्याख्यान होते. यात भास्करराव आव्हाडांनी वरील चारी मुद्द्यांचे विवेचन केले. त्यातल्या त्यात लोकशाहीमध्ये न्याय संस्था ही एकमेव संस्था अशी आहे की जी तुलनात्मकदृष्ट्या कमी ढासाळली असून सामान्य लोकांचे ते शेवटचे आशास्थान आहे. ट्रिब्युनल बाबत कधी कधी अशा लोकांच्या नेमणूकी होतात कि ज्यांना त्यातले ज्ञान नाही. सरकारी कमिशनर सारख्या मोठ्या हुद्द्यावरुन रिटायर झालेले लोक, सामाजिक क्षेत्रातील लागेबांधे असणारे लोक, इतर क्षेत्रातील असंतुष्ट लोक यामुळे ही चराउ कुरणे झाली आहेत. केवळ प्रलंबित राहावीत म्हणुन दाखल होणारी प्रकरणे अनेक आहेत. लोकसभेत प्रश्न विचारायला पैसे घेणारे खासदार जसे आहेत तसे आपली केस केवळ न्यायाधीशाने एखाद्या दिवशी दखलपात्र म्हणून वाचावी यासाठी लाखलाख रुपये मोजणारी मंडळी आहेत.
प्रकाश घाटपांडे

प्रश्नावली

प्रश्नावली

मुंबई उच्च न्यायालय येथे कार्यरत अधिवक्ता ह्या नात्याने सदर प्रश्नावली माझेकडेदेखील आली असून सदस्यांची तशी इच्छा असल्यास त्यातील प्रश्न, माझी उत्तरे, आणि विषयाच्या संदर्भाने काही मार्मिक टिप्पणी येथे यथावकाश लिहेन.

धन्यवाद.

हैयो हैयैयो!

भारताची न्यायव्यवस्था

चांगला विषय व तो हि व्यवस्थित मांडल्या बद्दल आपले अभिनंदन!

स्वच्छ न्यायव्यवस्थेसाठी मला असे सूचवावेसे वाटते कि-
१) न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाचा न्यायाधिशांशी प्रशासनिक संबंध येता कामा नये. ह्या वर्गांवर दुसर्‍या एखाद्या अधिकार्‍याचे नियंत्रण असावे. न्यायाधिशांकडून व न्यायाधिशांसाठी जे काहि संदेशांची वा सुचनांची देवाण-घेवाण होते ती ह्या अधिकार्‍यामार्फतच व्हावी.
२) ताराखा देणं / ठरवंणं हे काम न्यायाधिशांकडून काढून घेतले पाहिजे. ते काम ह्या नव्या अधिकार्‍यास देण्यात यावे. न्यायाधिशाचे काम फक्त न्यायदान करण्यापर्यंतच सिमित करण्यात यावे.
३) 'सर्वोच्च न्यायालय हे दिल्लीत असतं', ह्या दृष्टीकोनात सुधार होण्यास हवा. भारताच्या भौगोलिक प्रांतानुसार या देशाचे पाच विभाग करून चार दिशां व एक मध्यवर्ती ठीकाण अशी पाच सर्वोच्च न्यायालय होण्यास हवी. त्यांचा कारभार आंतरजालाने एकमेकांशी जोडला जावा. असे कारण करण्याने भारताच्या इतर प्रांतावर उत्तर भारताचे उगीचच वाटणारे वर्चस्व कमी होईल.

माफ् करा पण...

>> २) ताराखा देणं / ठरवंणं हे काम न्यायाधिशांकडून काढून घेतले पाहिजे. ते काम ह्या नव्या अधिकार्‍यास देण्यात यावे. न्यायाधिशाचे काम फक्त न्यायदान करण्यापर्यंतच सिमित करण्यात यावे.

ह्याचा नक्की काय उपयोग् होइल ते कळलं नाही ,एक् सामन्य वाचक् म्हणुन.
कारण एक "खुर्ची" भ्रष्ट होण्याची/असण्याची शक्यता वाटते आहे, म्हणुन आपण दुसरी "खुर्ची" निर्माण करतोय,
असं तर होत नाहिये ना हे?

म्हणजे, समजा आहे त्या "खुर्ची"तील माणुस अधिकाराचा गैर वापर करुन "पुढली तारिख" देतोय,
(त्याचा ह्या कामासाठी एका पक्षाकडुन् वापर होतोय) तर तोच पक्ष, तीच पार्टी (वादी-प्रतिवाडी ह्या अर्थाने,पक्ष-प्रति पक्ष)
त्या आपण सुचवलेल्या "नव्या खुर्ची" तील माणसालालाही गैरवापर करण्यासाठी लालुच दाखवणं/प्रवृत्त करणार नाही,
हे कशावरुन?

कारण आपण सुचवलेल्या पदावरील व्यक्ती अर्थातच न्याय शास्त्राशी निगडीत असणे अपेक्षित् आहे,
म्ह्णजेच पुन्हा तीच माणसे आली.थोडक्यात काय तर् अ फक्त पदाचे नाव बदलेल, फार तर व्यक्ती बदलेल.
(आणि एखाद्याला/एखाद्या पार्टिला एकाच्या ऐवजी दोन दोन माणसांना वश करावे लागेल, इतकेच.)
व्यवस्था आहे तीच,आहे तशीच राहणार.

जन सामान्यांचे मन

समस्येला अनेक कांगोरे असतात

'न्यायाधिश भ्रष्ट असतात' असं विधान मी कुठेही स्पष्टपणे केलेले नाही. तसेच निव्वळ भ्रष्ट न्यायाधिशांना रोकण्यासाठी हा मार्ग सुचविलेला नाहि. कुठल्याहि समस्येला अनेक कांगोरे असतात. एखाद्याच कांगोर्‍याला १०० टक्के समस्या म्हणणं योग्य नसतं. आपण कोर्टाची पायरी चढलेले दिसत नाहि. फक्त तर्कसंगतीने आपण आपले मत मांडले आहे. इट्स ओ.के.

कोर्टात गेल्यानंतर न्यायाधिश म्हणजे काय? तिथं त्यांचा दबदबा काय असतो ते कोर्टाची पायरी चढलेल्यांनाच कळतं.

कळी १)
न्यायाधिशांचा वेळ अमुल्य आहे. त्यांचा वेळ वाचविणं हा ही त्यामागचा दृष्टीकोन आहे.

कळी २)
तारखा देणारा/ ढकलणारा खुद्द न्यायाधिशच असेल तर, - याचिकाकर्ता वा आरोपी यांना आपल्या सोयी नुसार तारखा मिळणं दुरापास्तच असतं. न्यायाधिशां जवळच्या कर्मचारी वर्गाचं देखील या अडचणीमुळे फावतं व ते लुबाडायला मोकाट सुटतात.

कळी ३)
आपली तारिख असताना आपली कामं टाकून आपण कोर्टात हजर होतो तेव्हा न्यायाधिशच अचानक कामामूळे सुट्टीवर जातो तेव्हा पुढच्या तारखेचा घोळ वाढत जातो. चकरा मारून मारून जीव अगदी मेटाकूटीला येतो. ('वीस/ तीस रूपये टेकवायचे' हा सर्वसाधारण गैरमार्ग) हा त्रास निव्वळ वाचक म्हणून तर्काच्या आधारे कसा समजणार? असो.

कळी ४)
तारखा देणारा खुद्द न्यायाधिशच नसेल तर, निदान त्याच्याशी भांडता तरी येईल. त्याला जाब-जबाब देण्यासाठी भाग पाडता येईल. तारखा पडल्यानंतर/ बदलल्यानंतर त्या दुरध्वनी वा ई-मेल, एस.एम्.एस. च्या माध्यमातून संबंधित व्यक्तिंना पोहचवीण्याचा पायंडा सुरू तरी होऊ शकतो.

कळी ५)
जे कर्मचारी (गोड-गोड बोलून पण काम न करून/ अडवून) त्रास देत असतील तर त्यांची लागलीच तक्रार या नव्या अधिकार्‍याकडे करणं सोईचं जाईल.

 
^ वर