आंतरजातीय विवाह् करू पाहणार्‍यासाठी

ज्या तरूण-तरूणींना आंतरजातीय विवाह करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी प्रतिबिंब मिश्र विवाह मंडळाने (पूर्वीचे सुगावा मिश्र विवाह मंडळ, मुंबई) आता इंटरनेट च्या माध्यमातून नांव-नोंदणी सुरू केली आहे, सध्या काही काळासाठी मोफत नोंदणी सुरू आहे, कृपया, www.pratibimb.info या संकेत-स्थळाला भेट द्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

अनेक शुभेच्छा

जातसंस्थेचा पाया म्हणजे लग्नबंधने होत. कायद्याने जातव्यवस्था बाद झाली, इच्छुक वधूवरांची जातीबद्दल अट नसली, तरीही जातीच्या अंतर्गतच विवाह होण्याची शक्यता खूप असते. भावी जोडीदारांची ओळख घडून यावी लागते, ती बहुतांश जातीतल्या आतच असते. अनेक स्थळांमध्ये एक निवडले जाते, तेही जातीच्या आतले असण्याची शक्यता अधिक. जातीबाहेरच्याही लोकांना एकमेकांची ओळख होण्यास वाव देणार्‍या या संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा.

तांत्रिक छिद्रान्वेष :
'प्रतिबिंब'च्या संकेतस्थळावर नोंदणी न करताही विवाहेच्छुकांची नावे आणि वये दिसतात. (त्यापेक्षा अधिक माहिती दिसत नाही हे उत्तम.) नवीन संकेतस्थळासाठी कदाचित हे ठीक आहे. पण अशा नाजुक बाबतीत ही माहिती देखील आंतर्जालावर प्रकाशित करणे धोक्याचे वाटते. (हे प्रकाशित नाव "टोपणनाव" असल्यास चांगले, असा सल्ला सदस्यांना द्यावा... तसे केल्यास हा धोका नाही.)

अवांतर : जातव्यवस्था/लग्नसंस्था याविषयी "कोण म्हणतो टक्का दिला" हे नाटक १९९१-९२ मध्ये बघितल्याचे आठवते.

शुभेच्छा!

जातसंस्थेचा पाया म्हणजे लग्नबंधने होत. कायद्याने जातव्यवस्था बाद झाली, इच्छुक वधूवरांची जातीबद्दल अट नसली, तरीही जातीच्या अंतर्गतच विवाह होण्याची शक्यता खूप असते. भावी जोडीदारांची ओळख घडून यावी लागते, ती बहुतांश जातीतल्या आतच असते. अनेक स्थळांमध्ये एक निवडले जाते, तेही जातीच्या आतले असण्याची शक्यता अधिक. जातीबाहेरच्याही लोकांना एकमेकांची ओळख होण्यास वाव देणार्‍या या संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा.

+१ धनंजयरावांशी सहमत!

आंतर जातीय विवाह

'आजचा सुधारक' चा एप्रिल २००८ चा अंक हा आरक्षण विशेषांक आहे. त्यात जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी आंतरजातीय विवाह हा पर्याय व्यावहारिक वाटत नसल्याचे अतिथी संपादकांचे ( टी बी खिलारे /प्रभाकर नानावटी) मत आहे. त्यांचे मत
"आर्थिक समता आल्यास बाकीचे इतर मुद्दे गौण ठरतात."
"जोपर्यंत जाती व्यवस्थेचा मूळ पाया ब्राह्मणी हिंदु धर्म व ब्राह्मणी धर्म ग्रंथ उखडले जात नाहीत व विषमता कमी होउन आर्थिक समता प्रस्थापित तोपर्यंत जात रहाणार असे आम्हास वाटते."
विशेषांक मात्र वैचारिक खाद्य आहे. नेटवर टाकल्यास आर्थिक तोटा होईल असे त्यांना वाटते. ( विशेषंकाचे पुस्तक मौज प्रकाशन काढणार आहे. ते कोणी घेणार नाही) अन्यथा अंक जालावर चढवायचा माझा विचार होता.

प्रकाश घाटपांडे

शुभेच्छा.

पण (एकमेकांशी) आंतरजातीय विवाह करू इच्छिणार्‍यांना विवाह (वधु-वर सूचक?) मंडळाची काय गरज समजली नाही. किंबहुना कुणाशी लग्न करायचे हे ठरले नसल्यास आंतरजातीय विवाह करण्याची 'इच्छा' ('तयारी' समजता येते.) म्हणजे काय हे समजले नाही.

असे ठरवून जातीबाहेर विवाह करणे (आट्टहासाने) विरुद्ध अर्थाने जातीय वादी (स्वतःच्या जाती विरुद्ध) वाटते. (आरक्षणासाठी जात विचारल्याने जातीवादात भर पडते या न्यायाने.)

यालाच जातीची अट नसणार्‍यांचे विवाह का म्हणू नये?

चांगला मुद्दा

असे ठरवून जातीबाहेर विवाह करणे (आट्टहासाने) विरुद्ध अर्थाने जातीय वादी (स्वतःच्या जाती विरुद्ध) वाटते. (आरक्षणासाठी जात विचारल्याने जातीवादात भर पडते या न्यायाने.)

यालाच जातीची अट नसणार्‍यांचे विवाह का म्हणू नये?

चांगला मुद्दा +१

स्तुत्य उपक्रम | हेही महत्त्वाचे

वरील उपक्रम स्तुत्य आहे.

>> असे ठरवून जातीबाहेर विवाह करणे (आट्टहासाने) विरुद्ध अर्थाने जातीय वादी (स्वतःच्या जाती विरुद्ध) वाटते.

हेही महत्त्वाचे. अश्याने जातीपाती मनातून जाणार नाहीत. "जातीची अट नसणार्‍यांचे विवाह" ही तो यांनी सुचवलेली भूमिका योग्य आहे.

ठरवून वेगळा विवाह

म्हणजे नेहमीच्या विवाहाविरुद्ध पक्षपात होतो काय?

सोपे उत्तर आहे, की होतो. पण हा पक्षपात हा जातिवाद ठरतो का? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे.

धोंडो केशव कर्वे यांनी दुसरा विवाह एका बालविधवेशी आवर्जून केला. याने बालविधवा-वादात भर पडली की बालविधवा-वादाचा विरोध झाला हा विचार करावा. माझ्या मते भर पडला नाही.

बालविधवाविवाह

बालविधवाह विवाहाच्या पुरस्काराचे आदर्श उदाहरण स्वतः विधवेशी विवाह करणे (खासच) नसून, स्वतःच्या विधवा असलेल्या (अर्थातच असलेल्या) मुलीच्या पुन्र्विवाहास 'संमती' देणे (तो तसा करावयास लावणे, करवून देणे नव्हे!) आहे असे तो मानतो.

विवाह ही खाजगी बाब असून तिचा 'निव्वळ तुमच्या विचारसरणीसाठी माध्यम म्हणून वापर करणे' अवाजवी वाटते. ते तसे सहाजिकपणे होणे मात्र अशक्य नाही.

जातिनिरपेक्ष विवाह मंडळ


यालाच जातीची अट नसणार्‍यांचे विवाह का म्हणू नये?


असे असल्यास त्याला जातिनिरपेक्ष विवाह मंडळ म्हणणे अधिक उचित होईल. परंतु या ठिकाणी जाणीवपुर्वक स्वजातीत विवाह करावयाचा नाही असे उद्दिष्ट असणार्‍यांसाठी हे मंडळ.

प्रकाश घाटपांडे

आंतरजातीय विवाह व आरक्षणाचे फायदे

आरक्षण विशेषांक दिलेले उत्तर खालील प्रमाणे
एखाद्या अनुसूचित जाती , जमाती ..... च्या पुरुषाने अमागास वर्गीय स्त्रीशी विवाह केल्यास तो जन्माने मागास वर्गीय असल्याने त्यास मागासवर्गीयांच्या सवलती मिळतील; अपत्याची जात वडीलांच्या जातीमुळे ठरत असल्याने त्यांनाही सवलतीचे फायदे मिळतील पण सदर सवलती त्याच्या पत्नीस मिळणार नाहीत.
एखाद्या अनुसूचित जाती , जमाती .....च्या स्त्रीने अमागासवर्गीय पुरुषाशी विवाह केल्यास ती स्त्री जन्माने मागास असल्याने तिला विवाह पुर्वीचे जे फायदे देय होते ते विवाहानंतरही मिळण्यास पात्र राहिल. मात्र या सवलती तिच्या पतीस किंवा अपत्यास मिळणार नाहीत.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

प्रतिबिंब मिश्र विवाह मंडळाची भूमिका याबाबतीत स्पष्ट करावी वाटते, भारतीय समाजातील जातीचे महत्त्व हे नाकारता न येणारे वास्तव आहे, याबाबतीत दुमत होण्याची शक्यता नाही. या वास्तवास काही एका भूमिकेतून नाकारू इच्छिणारी बरीच तरूण मंडळी आसपास दिसतात. त्यांना या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे कारण प्रेम-विवाहाच्या माध्यमातून जातीबाहेर लग्न करण्याचे धाडस (वेळप्रसंगी बराच विरोध सहन करून) करण्याचे सगळ्यांना जमेल असे नाही.
नांव-नोंदणी करून आम्ही थांबत नाही, तर अशा विवाहेच्छूंचे मेळावे भरविणे, मार्गदर्शन करणे, विवाह जुळविताना दोन कुटुंबाचे मिलन होईल असे पाहणे, विवाहोत्तर अडचणींना तोंड देण्यासाठी मानसिक बळ देणे हेदेखील आमचे कार्यकर्ते करत असतात, कारण हा सर्व उपक्रम एका सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे अंग आहे, असे आम्ही मानतो. अशी लग्न होऊन जाती-निर्मूलन होईल, असा आमचा दावा नाही, पण त्याला हातभार जरूर लागतो, असा आमचा अनुभव आहे. आंतरजातीय लग्न करण्याच्या तयारीबरोबर साधेपणाने समारंभ, हुंडा नाकारणे व पत्रिका न पाहणे, यादेखील अटी पाळण्याचा आमचा आग्रह असतो, त्यामुळे वर-वधू संशोधनासाठी ची कार्यकक्षा (domain) चांगल्यापैकी मर्यादीत होऊन लाभ होतो, असे आमचे निरिक्षण आहे.

जातीबाहेरच लग्न करायचे, असा अट्टाहास धरणारे फार कमी सदस्य आम्हांला आढळतात (कारण लग्न जुळविताना किंवा जोडीदार शोधताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होता कामा नये, याचे भान आम्ही ठेवतो) , तेंव्हा त्यांना विरूद्ध अर्थानेही जातीयवादी म्हणणे उचित होणार नाही. पण अगदी असा अट्टाहास धरणारे (मी तसेच करून मुस्लीम मुलीशी सुगावा मंडळाच्या मदतीने लग्न केले) असलेच तर जातीयवादी म्हणवून घेण्याचा मी अभिमान बाळगेन, "जातिनिरपेक्ष विवाह मंडळ" ही सूचना चांगली वाटली. आंतरजातीय विवाह करण्याची 'इच्छा' नव्हे 'तयारी' असेच आम्हांला म्हणायचे आहे. "जाणीवपुर्वक स्वजातीत विवाह करावयाचा नाही असे उद्दिष्ट असणार्‍यांसाठी हे मंडळ" किंवा "जातीची अट नसणार्‍यांचे विवाह" हेदेखील चांगले शब्दप्रयोग या प्रतिसादातून मला सापडले, सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद....

 
^ वर